शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्वी एकदा श्री. अरविंद कोल्हटकर यांनी "उपक्रम"वर चार भागांचा एक लेख लिहिला होता. संस्कृत भाषेतील मराठीत नेहमीच्या वापरात येणारी वचने. त्यातून हे घेतले आहे.
"काकणभर सरस.

(’हातच्या कांकणाला आरसा कशाला’ ह्या म्हणीचा अर्थ लगेच उमगतो पण ’अमुक गोष्ट दुसरीहून काकणभर सरस आहे’ म्हणजे काय?) ’काकिणी’ हे प्राचीन भारतातील एका जुन्या नाण्याचे नाव आहे. १ निष्क = १६ द्रम्म = २५६ पण = १०२४ काकिणी = २०४८० वराटक असे कोष्टक भास्कराचार्याच्या लीलावतीमध्ये दिलेले आहे. अन्य ठिकाणी १ काकिणी = २० वराटक ह्याऐवजी १ काकिणी = २० कपर्द (कवडया) असाहि उल्लेख मिळतो. ह्यावरून दिसते की काकिणी हे एक फार छोटया मूल्याचे मान होते. ’काकणभर सरस’ म्हणजे अगदी थोडया फरकाने वरचढ. (कवडयादेखील बाजारात चालत असत ह्याचा पुरावा ’कवडीमोल’, ’कवडीचुंबक’ अशा शब्दांमध्ये टिकून आहे.)"
http://mr.upakram.org/node/3630

भेटा/ भेटे

अमुक व्यक्तीला “भेटा” हा एकच प्रयोग माहित असल्याने “गवताचा एक भेटा उचलून नेला” हाचा अर्थ समजत नव्हता.

मग मराठी बृहद्कोष कामी आला;

भेटा = भारा; गंजी , अनेकवचन = भेटे

काकिणी>>>> छान माहिती
भेटा = भारा; गंजी >>>> नवीन माहिती
ज्वारीच्या कडब्याच्या पेंढ्या रचून ठेवतात त्याला गंज म्हणतात हे माहीत होते.

भेटा - नवीन शब्द कळला.
ह्या वरून आठवलं, पूर्वी व्यक्ती, माणसं भेटायची आणि वस्तू मिळायच्या परंतु आजकाल वस्तू मिळत नाहीत तर "भेटतात". आणि ह्या वस्तू इतक्या सर्रास "भेटतात" की काही वर्षांनी मिळणे आणि भेटणे ह्यात काही फरक उरणार नाही.

आणि "व्यक्ती" ने लिंग बदल करून घेतला आहेच, "तो" व्यक्ती असेच सर्वत्र ऐकू येते.

मी म्हणे शांत रहावे
जो जसे बोलेल ते तसे ऐकावे |

भेटा मला प्रथम अकोला च्या परिसरात भेटला.
अकोल्या जवळ पारस नावाचे गाव आहे. तिथल्या प्लांट मध्ये माझे ट्रेनिंग चालले होते. मला एक पुस्तक प्लांटच्या लायब्ररीतून पाहिजे होते.
मी ग्रंथपालाला विचारले, "अमुक अमुक पुस्तक आहे का आपल्या कडे?"
"कुलकर्णी, ते पुस्तक इथे नाही भेटत." पुणेरी मला खूप मजा वाटली.
पुढे मी कधीतरी मायबोलीवरच ह्याबद्दल लिहिले होते, तेव्हा कुणा मुंबईकर आयडीने मला सुनावले होते. " त्यात काय विशेष? आम्ही मुंबईकरही असेच बोलतो." अशी माझी बोलती बंद झाली.
अजून काही अकोला बोली.
माझा एक सहकारी ऑफिसात आला नाही. का बरे? दुसरा सहकारी म्हणाला, "त्याची बायको जळाली."
ते ऐकून मी मुळापासून हादरलो. "बापरे, काय झाले हे!"
संध्याकाळी त्याच्या घरी भीत भीत गेलो तर त्याच्या बायकोने केलेला चहा पिऊनच परतलो.
काही नाही हो तिच्या अंगावर गरम पाणी सांडून भाजले होते, Nothing serious.
हे अजून एक, "अमुक अमुक गाडीखाली मिळाला."
काय समजलेत्नी?
आणि जळगाव भूसावळची बोली.
"ते दोघे खडे उचल." निर्जीव वस्तूंना सजीव समजून बोलणे.
Any takers?

मला कुठे लिहायचे कळत नाहीये. हे विचारायचे आहे की संस्कृतमधील 'अन' आणि 'अम' प्रत्यय कधी लागतात?
उदाहरणार्थ -
कर्पुरगौरम करूणावततारम
की
कर्पुरगौरन करुणावतारन

कर्पूरगौरम् करुणावतारम् >> संस्कृत नपुंसकलिंगी प्रथमा/द्वितीया एकवचनी शब्द किंवा पुल्लिंगी द्वितीया एकवचनी शब्द. इथे पुल्लिंगी द्वितीया आहे. "शंकराला" या अर्थाने.

(यांच्या द्वितीया अनेकवचनी शब्दात आन् प्रत्यय येतो. अनेक शंकरांना या अर्थाने कर्पूरगौरान् करुणावतारान् )

कर्पुरगौरन करुणावतारन >> तमिळ पुल्लिंगी एकवचनी शब्द

टेक्निकली स्पिकायला गेलं तर त्याची बायको जळाली जास्त बरोबर आहे.
His wife was burned
उसकी बिबी जल गयी

त्या ऐवजी,
His wife was roasted
उसकी बिबी को सेंका
त्याची बायको (मीठ मसाला लावून) भाजली

अमुक अमुक गाडीखाली मिळाला हे
अमुक अमुक गाडीखाली सापडला पेक्षा काय वेगळं आहे?

बोली भाषेत दोन्ही ठीक आहे.

पण कमी संदिग्ध प्रमाण भाषेत लिहायचं असेल तर

त्याची बायको (मीठ मसाला लावून) भाजली >> त्याच्या बायकोला भाजले किंवा त्याची बायको भाजली गेली.

आम्ही पुणेकर असे बोलत नाही. एव्हढेच सांगायचे होते. आता अकोला, उमरावती( अमरावती म्हटले तर त्याना राग येतो) चे लोक पुणेकरांची अशीच खिल्ली उडवत असतील. Lol

छंदस् म्हणजे वेद किंवा पद्य असा मुळचा अर्थ आहे. ज्या भाषांस आर्य भाषा असे म्हणतात त्यात संस्कृत ही सर्वात प्राचीन भाषा आहे, तिला पुष्कळ काळ गेल्यावर नंतर पाणिनीने तिचे व्याकरण लिहिले. त्या वेळेस जे शब्द बोलभाषेत नसून केवळ वेदात होते त्याला पाणिनीने छांदस् असे म्हटले. त्यावरून व्याकरण नियामाबाहेरचे शब्द जे वेद, रामायण, महाभारत या सारख्या आद्य ग्रंथात आढळतात त्यांना छांदस् असे असे नाव पडले. ह्यावरून जो माणूस लोकव्यवहारनियमाबाहेर वर्तन
करतो त्याला "छांदिष्ट" असे म्हणायचे. छांदिष्ट म्हणजे यथेच्छ आचरण करणारा, वेडसर असा माणूस!

अक्रीत

वि. (हा शब्द व्युत्पत्तिदृष्टया बरोबर असून याचा उपयोग मात्र अनियमितपणें होतो. ) १ बेसुमार; अतिशय. ॰घेणें -देणें-एखादी वस्तु प्रमाणाबाहर अतिशय किंमत देऊन विकत घेणें, अथवा विकणें, अतिशय जबर व्याज घेऊन रक्कम देणें. २ भलत्याच दरानें; बाजारभावाच्या मानानें अतिशय जास्त भावानें. ३ मोफत; फुकट; मोबदला न घेतां. 'मी अक्रीत खात नाहीं.' 'मी कोणाचें अक्रीत घेणार नाहीं' = मी दुसऱ्याचें कांहीं चुकीनें घेणार नाहीं. अक्रीताचा व्यवहार = अप्रामाणिकव्यवहार. 'अक्रीत मिळविलेला पैसा जयास जात नाहीं.' [सं. अ + क्री ] ॰विक्या- वि. भलतीच किंमत घेऊन विकणारा.
दाते शब्दकोश
ह्या शब्दाचे मूळ आहे क्री = विकत घेणे ह्या धातूत. विक्रय, विकरी(विक्री), विकणे.
आक्रीत हा शब्द निराळाआहे.

आक्रीत वि. १. अघटित; आश्चर्यकारक : ‘आपल्या घरालाही चौकट अन् दरवाजा लावल्याचं बघून मला व माझ्या बहिणींना केवढी आक्रीत गोष्ट वाटायची?’ – तअं १२. २.विलक्षण; विपरीत; असंभवनीय,जगावेगळे कृत्य : ‘भगतनी, आइकलास तुज्या पोराचा आक्रीत?’ – जैजै ९२. [सं. अकृत्य]
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

पगार हा शब्द पोर्तुगीजमधून आला असावा असा माझा कयास होता. दाते कोशात कन्फर्म झालं.
पगार —पु. मुशाहिरा; वेतन; तनखा; पैशाच्या रूपांत नोकरीबद्दल मिळालेला मोबदला. [पोर्तु. पागा = वेतन; गो. पगार]

जुगार हा शब्दही स्पॅनिश/पोर्तुगीजमध्ये(त्याच अर्थाने) आहे पण तो योगायोग असावा.

फालमफोक = ? अर्थ कुठे मिळेल ?

“अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे”
https://www.aksharnama.com/client/article_detail/7379
. . .
फोकनाड
= थाप; वायफळ बोलणे
दाते शब्दकोश

ठाण

नायकाच्या चित्तस्थिरतेचे वर्णन करतांना “ठाण न चळे” असे वाचले.

याआधी “ठाण मांडून बसणे” या एकमेव वाक्प्रचारात “ठाण” ही शब्द वाचत आलो आहे, अन्यत्र कुठेही नाही.

ठाणे, पोलिस ठाणे तर नेहमीच्या वापरातले. So, ठाण = स्थान/ location असावे हे समजते. पण ते “मांडून” का बसायचे हे नाही समजले.

या मांडणीवर जाणकारांनी प्रकाश पाडावा.

बिर्‍हाड थाटणे , वास्तव्य करणे , संसार थाटणे ;
कायम राहणे , ठाण मांडून बसणे .
..
वरील सर्व क्रियापदे इथे एकत्र ( म्हणजे समानार्थी अर्थाने दिलेली) दिसतात :

https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%...

यात तुमच्या प्रश्नाचे उत्तर आले असावे का ?

रोचक एकाक्षरी ( गोरे कोश)
* थो = खेळातील थोड्या विश्रांतीचा शब्द

* फँ = विशिष्ट एकाएकी केलेल्या क्रियेला उद्देशून वापरायचा शब्द (तो फँ करून माझ्या अंगावर शिंकला)

* मि = नाहीसे होणे ( उदा. मिनले)

* रु / रू = कापूस

थो आणि मि नवीन ऐकते आहे.
रू हे रुईवरून असावं.

रहमानच्या ‘कतिया करूँ’ गाण्यात ‘तेरा रू कतिया करूँ’ अशी ओळ आहे. तुझ्या नावाचा कापूस कातत बसलं आहे माझं मन!

तो फँ करून माझ्या अंगावर शिंकला >> हे नवीन आहे. मी तरी कुणाला शिंकताना फँ किंवा कुठलाच ओष्ठ्य वर्ण उच्चारताना पाहिलेलं नाहीये.

Pages