गार्डन रूट – दगडधोंडे, डोंगर-कपारी : २
टूरचा नववा दिवस. हर्मानसचं सरप्राइज पॅकेज बॅगेत बांधून आम्ही Knysna ला पोहोचलो होतो. (उच्चार : नाय्ज्ना, ‘ज’ जहाजातला).
हर्मानस ते नाय्ज्ना अंतर बरंच आहे. इतका कार प्रवास करण्याऐवजी आम्ही एक पर्याय शोधला. हर्मानसहून कॅबने उलटं केप टाऊनला आलो. (तास दीड तास प्रवास). केप टाऊनहून विमानाने George ला गेलो. (एक तास). जॉर्जहून कारने नाय्ज्नाला गेलो. (अर्धा तास). motion sickness वाल्यांना असे उलटे घास घ्यावे लागतात. असो.
तर, नाय्ज्ना. हे एक टुमदार टाऊन आहे. नाय्ज्नात दुपारी १-२ वाजता पोहोचलो. रिपरिप पाऊस आणि प्रचंड गारठा होता. टाऊनचा काही रहिवासी भाग उंचावर वसलेला आहे. हे नुसतं टेकाड किंवा चढ नाही. याला तिथे ‘नाय्ज्ना हेड’ असं नाव आहे. तिथे अशी दोन हेड्स आहेत- east head आणि west head. दोन्हींच्या मधून नाय्ज्ना नदी समुद्राला मिळते. आमचा मुक्काम east head च्या अगदी हेडवरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये होता. (टूरमध्ये आम्ही बहुतेक ठिकाणी मोठी घरं converted into guest houses अशा ठिकाणी राहिलो. सगळीच घरं छान होती. आणि मुळात ‘घरं’ असल्यामुळे खोल्यांची आणि टुरिस्टांची संख्या कमी होती. घरगुती वातावरण कायम होतं. त्यामुळे निवांतपणा वाटायचा.)
तर, त्या हेडवर उंचीमुळे वाराही होता. घराशेजारून एक वाट जरा खाली उतरत होती. तिथे एक lookout point होता. तिथल्या रेलिंगवरून खाली वाकून पाहिल्यावर खरं लक्षात आलं आपण कुठे आहोत. ते हेड म्हणजे खडकाचा एक मोठा, उंच सुळका समुद्रातून वर आलेला आहे. पुन्हा सांगते, ‘सुळका’ म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर सवयीने कातळकडा येतो. पण इथे sand stone चा कातरलेला कडा होता. उभाच्या उभा. खाली थेट खळाळता समुद्रच.
Sandstone चे कडे आणि खळाळत्या लाटा यांची ही जी काही जोडगोळी जागोजागी दिसत होती की नाही! वा! त्या लाटा पाहून वाटायचं, भरती असावी, काही तासांनी ओहोटीला पाणी जरा मागे जाईल. पण छे, सतत आपल्या पाण्याच्या पांढर्या फेसाळत्या मोठाल्या रेषा, उसळून येणार, खडकांवर आपटून मागे सरणार, दिवसागणिक तो खडक धागाभर झिजत जाणार... गार्डन रूटची आताची किनारपट्टी अशा wave-cut platform मुळेच तयार झालेली आहे. आणि लाटांनी केलेली ही कापाकापी नीटनेटकी थोडीच असणार! त्यातूनच खडकांचे एक से एक आकार, नक्षीकाम, गुहा, कमानी, काय म्हणाल ते तिथे हजर!
नाय्ज्नाच्या त्या viewpoint वरून समोर west head दिसत होतं. त्याच्या पायथ्याशी कडेकपारीत तयार झालेल्या अशाच २-३ लहान-मोठ्या ओबडधोबड कमानी दिसत होत्या. लाटांचंच कृत्य ते. एव्हाना खडकांमधले असे वेगवेगळे आकार शोधण्याचा नाद लागलेला होता. नीट पाहिल्यावर दिसलं, की त्या कमानींपर्यंत जाणारी एक पायवाटही होती. ती वेस्ट हेडच्या मागे कुठेतरी लुप्त होत होती. पुन्हा माझी जीभ लपलपायी! पण इस्ट हेडवरून वेस्ट हेडला जाण्यासाठी जवळपास २०-२५ किमीचा वळसा घालावा लागतो. त्यामुळे तो विचार सोडून दिला. शिवाय तसाच आणखी एक प्रसिद्ध arch rock बघण्याचा आमचा विचार होताच.
तसा हा आर्च रॉक Plettenberg bay भागात येतो. पहिल्या लेखात नकाशा दिलाय, त्याच्या संदर्भाने सांगायचं, तर प्लेटेनबर्गला आम्ही नाय्ज्नाच्या पोटात ढकललं होतं. म्हणजे नाय्ज्नाहून जमल्यास प्लेटेनबर्गला जायचं असं ठरवलं होतं. नाय्ज्नात जी गाडी भाड्याने घेतली होती त्याच्या ड्रायव्हर-कम-गाइडला एक मोठी विश-लिस्ट पाठवून ठेवली होती. (नाय्ज्ना म्हणजे heart of the garden route म्हणू शकतो. आणि तिथे आमचा चार दिवस मुक्काम होता. त्यामुळे लिस्टही मोठी होती.) स्थानिक रस्ते, अंतरं, प्रवासाचा वेळ हे सगळं गृहित धरून यातलं काय काय आरामात जमेल तिथे आम्हाला घेऊन चल, असं ड्रायव्हरला कळवलं होतं. त्याने यादीची २-३ versions कळवली, सगळ्यात Plett होतंच. (Plett हा तिथल्या लोकांच्या बोलण्यातला shortform, त्यांच्या तोंडून ऐकायला छान वाटायचा.)
दुसर्या दिवशी सकाळीही पाऊस, गारठा काही कमी झालेला नव्हता. ब्रेकफास्टच्या वेळी गेस्ट हाऊस मॅनेजर मुलीशी गप्पा मारत होतो. ‘आज संध्याकाळनंतर हवामान बदलेल,’ असं तिचं म्हणणं होतं. सहज तिला विचारलं, आसपासच्या not to miss जागा कोणत्या? तर तिनंही पहिलं Plett चंच नाव घेतलं. आम्ही जमल्यास जाऊ म्हणत असलो तरी ‘पूरी कायनात’ वगैरे आम्हाला प्लेटेनबर्गकडे ढकलत होती. प्लेटेनबर्गमध्ये not to miss होता तो arch rock आणि Robberg Nature Reserve. नाय्ज्ना ते प्लेट अंतर आणि रॉबर्ग नेचर रिझर्वच्या सुंदर पण अवघड hike चे reviews यामुळे प्लॅनिंगदरम्यान आम्ही रॉबर्गकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं.
नाय्ज्नातला तिसरा दिवस. पाऊस उघडला होता. त्या दिवशी ठरवलं, Plett ला जाऊ. आर्च रॉक अगदी समुद्रकिनार्यावरच आहे, तो तरी बघून येऊच.
इंटरनेटवर आर्च रॉकचे भारी भारी फोटो आहेत. त्या समुद्रकिनार्याला arch rock beach असंही कुठे कुठे म्हटलं होतं. त्या रॉकच्या एखाद किलोमीटर अलीकडे एक हॉटेल आहे, Hotel Enrico, तिथेच पार्किंग लॉट आहे. हॉटेलच्या मागच्या बाजूने एक छोटा बोर्डवॉक समुद्रकिनार्याला समांतर जातो. साधारण अर्धा किमी. त्याच्या शेवटपर्यंत चालत गेलो. तिथून पुढे जेमतेम ४००-५०० मीटरवर आर्च रॉक आहे, असं GPS वर दिसत होतं. पण पुढे रस्ता दिसत नव्हता. तिथे आणखी एका हॉटेलचं बांधकाम सुरू होतं. तिथल्या कामगारांना विचारलं. ते म्हणाले, ‘जा असंच बीचवरून, वाळूतून’... बरं, म्हटलं, जाऊन बघू... तेवढ्या वाटेतही बीचवरच्या वाळूत दोन-तीन लहान, मोठे, अगडबंब खडक दिसले. प्रत्येकाचे रंग, छटा, आकार सगळं वेगवेगळं; प्रत्येकाच्या पृष्ठभागावरच्या नैसर्गिक रेषा, नक्षीकाम, layers वेगवेगळे.
५-१० मिनिटं मी त्यांच्याकडे नुसती बघत उभी राहिले. समुद्राच्या काठावर कुणीतरी आकाशातून आणून टाकल्यासारखे ते खडकांचे एकमेकांपासून स्वतंत्र गठ्ठे... कसे आले हे इथे? कोणे एके काळी यांच्या आजूबाजूलाही संपूर्ण असाच ऐवज असावा का? त्यांची धूप झाली आणि हे उरले असावेत का? गेले ८-१० दिवस रोज पडणारा प्रश्न मला पुन्हा पडला.
त्या खडकांच्या पायथ्यापर्यंत लाटा येत होत्या. पाण्यापासून बचाव करत करत मी त्यांचं फोटोसेशन केलं.
--
आम्ही थोडं पुढे झालो. आता एक dead end type जागा आली. आधीच्या खडकांहून मोठा एक खडक, वरच्या रस्त्यापासून अखंड खाली उतरलेला, आणि त्याचा पायथा लाटांमध्ये चांगलाच भिजणारा. म्हणजे पुढे जायला कोरडी वाट नव्हती. एक लाट मागे जाईल, तेवढ्या वेळात तिथून पुढे जावं का, असा आम्ही विचार केला. पण खडकाचा वाटेला समांतर span मोठा होता. दोन लाटांच्या मध्ये तेवढी उसंत नव्हती, हे एक. आणि सपाट, सखल समुद्रकिनार्यावरच्या लाटांपेक्षा इथल्या लाटा वेगळ्या होत्या. कारण त्यांच्या वाटेत आधीही लहानमोठे, कातरलेले खडक होतेच. त्यांच्यावर आपटून अधिक खळाळत पाणी पुढेपर्यंत येत होतं.
त्या मोठ्ठ्या खडकावर एका जागी लाटा आपटून आपटून कंबरभर उंचीचा एक कोनाडा तयार झाला होता. एका नव्या arch ची ती सुरुवात होती. कोनाड्याचं तोंड अर्थातच समुद्राकडे, आमच्या वाटेच्या काटकोनात होतं.
एक लाट मागे गेली तेवढ्यात मी त्या कोनाड्यात जरासं वाकून पाहिलं. आतल्या पृष्ठभागावर रेषांचे काय अप्रतिम abstract patterns होते! ते नीट पाहण्यासाठी कोनाड्याच्या तोंडाशी चवड्यांवर बसावं लागणार होतं. पण लाटा अजिबातच उसंत देत नव्हत्या. तरी मी एक-दोन प्रयत्न केले आणि एका splash ला बूट-मोजे, आणि घोट्याच्या वीतभर वरपर्यंत पॅन्ट, सगळं भिजलं.
मी कपाळावर हातच मारून घेतला. ऊन होतं तितकाच गारठाही होता. आणि मला थंडी अजिबात सहन होत नाही. आता बूट-मोजे वाळणार कसे आणि आपण दिवसभर फिरणार कसे, हे कळेना. दरम्यान डोक्यात आणखी एक प्रकाश पडला होता, की या लाटांमधून आपल्याला पुढे जाता येणार नाही; तेव्हा arch rock ला विसरा. जरा वाईट वाटलं, पण ‘चलता है’ म्हणून मागे फिरलो. (बहुधा भरती-ओहोटीच्या वेळा नीट बघून गेलं तर पुढे जाता येण्याची शक्यता असेल. तसं करायला हवं होतं, असं नंतर वाटून गेलं; म्हणजे गार्डन रूट किनारपट्टीवरची ओहोटी दिसते तरी कशी ते समजलं असतं.)
त्या बोर्ड वॉकवर १-२ ठिकाणी छान बाक होते. त्यातल्या एका बाकापाशी मी बूट-मोजे काढून उन्हात ठेवले. बाकावर सावली होती. तिथेच अर्धा-पाऊण तास निवांत बसलो. बरोबर cherries आणल्या होत्या त्या खाल्ल्या. घड्याळ पाहिलं, तर जेमतेम एकच वाजत होता. म्हणजे तिथूनच नाय्ज्नाला परतण्यात काही अर्थ नव्हता.
आम्ही बसलो होतो तिथून लांबवर Robberg peninsula चं समुद्रात घुसलेलं टोक अंधुक दिसत होतं... शेवटी ठरवलं, रॉबर्गला जायचं. तेव्हा कुठे कल्पना होती, की रॉबर्गची भटकंती आमच्या आजवरच्या परदेश टूर्समधली सर्वात breathtaking भटकंती ठरणार होती... आणि त्याला कारणीभूत ठरणार होते तेच- दगड-धोंडे, डोंगर-कपारी.
GPS नं सांगितल्यानुसार साधारण अर्ध्या तासात Robberg nature reserve च्या दारात पोहोचलो. तिथली पाटी वाचून कळलं, की ही world heritage site आहे. पण त्या वर्णनासोबत UNESCO ही अक्षरं काही दिसली नाहीत. इतर कुठल्या संस्थेचा/संघटनेचा उल्लेखही दिसला नाही. ड्रायव्हरनं पार्किंग लॉटमध्ये सोडलं.
आपण जराशा उंचीवरच्या ठिकाणी आहोत, एका दिशेला आलो तो रस्ता, इतर तीनही बाजूंनी समुद्र आहे, इतकं कळत होतं. बाकी तिथल्या landscape चा काही अंदाज येत नव्हता.
इतर कोणत्याही hiking trail सारखाच इथला trail ही सुरू झाला. पार्किंग लॉटच्या भोवताली कंबरभर उंचीची झाडी झुडुपं होती. त्यातून एका कोपर्यातून एक वाट आत जात होती. चालायला सुरुवात केली. सुरुवात छान, टापटीप बोर्डवॉकनं झाली. पाच-एक मिनिटांत कच्ची पायवाट सुरू झाली. डावीकडे खुरटी हिरवी झुडुपं, त्यापलीकडे खाली समुद्र, उजवीकडे टेकाड, त्यावरही खुरटी झुडुपं. पुढे-मागे कुणी ना कुणी चालणारे पर्यटक दिसत होते. सकाळी आर्च रॉक बीचवर लख्ख ऊन होतं, इथे मात्र पूर्ण ढगाळ हवा होती. पण पाऊस अजिबात नव्हता. त्या हवेनं त्या दिवशी फार मजा आणली. पण मजा आणणार्या गोष्टींच्या यादीत ही ढगाळ हवा बघता बघता खाली ढकलली गेली...
चालायला सुरुवात करून दहा-एक मिनिटंच झाली असतील. मी pebble-प्रेमी असल्यामुळे असं कच्च्या रस्त्यांवरून वगैरे चालताना माझा एक डोळा पायांखालच्या वाटेकडे असतोच. इथेही होता. ‘पायवाट’ म्हटलं तरी ती साधी, सुरळीत, निव्वळ मातीची नव्हती. ओबडधोबड खडकांचे छोटे गठ्ठेही वाटेत सतत होते. ते लक्षपूर्वक negotiate करत मला चालावं लागत होतं. अशा वाटांवर उंच झाडं असली की जरा आधार असतो. तो इथे नव्हता. पायांत बूट होते, पण ते काही hiking shoes नव्हते. त्यामुळे अधिक लक्ष द्यावं लागत होतं. आणि अशात मला जाणवलं, की पायांखालचे ते खडकांचे गठ्ठे काहीतरी वेगळेच आहेत. म्हणजे लहान-मोठ्या विविध आकारांचे पण अगदी गोल, गुळगुळीत भरपूर गोटे कसल्याशा गोंदाने एकत्र करून ठेवले तर कसे दिसतील, तसे. किंवा एका मोठ्याच्या मोठ्या कणकेच्या गोळ्यात अनेक लहान-मोठ्या चारोळ्या खोचल्या आणि ते 10x zoom केलं तर कसं दिसेल, तसे. असे embedded pebbles मी पहिल्यांदा पाहत होते. जरा खाली वाकून जवळून पाहिलं, तर प्रत्येक गोटा इतका बेमालूम खोचला गेलेला होता! ते बघून माझा शब्दशः ‘आ’ वासला गेला.
पण तिथे फार वेळ थांबता आलं नसतं. त्या गठ्ठ्यांची उंची जेमतेम आपल्या घोट्यांच्या जरा वरपर्यंत; गोटे बेमालूम खोचले गेले असले तरी टेकता येईल इतपतही सपाट जागा कुठे नव्हती; वाटही अरुंद होती; आणि मागून सतत कुणी ना कुणी येतच होतं. त्यामुळे पुढे झालो.
ते embedded pebbles हळूहळू विरळ होत गेले, आणि मग दिसेनासे झाले. इतका वेळ डावीकडे दाट, हिरवी झुडुपं होती. त्यांच्याजागी जरा विरळ, छोट्याशा पिवळ्या फुलांची झुडुपं दिसायला लागली. आणि त्यांच्या पलीकडे खाली तीच- उसळणार्या लाटा आणि कातरलेल्या कड्यांची देखणी जोडगोळी! उजवीकडचं टेकाड उंच-उंच होत चाललं होतं. वाट आणखी अरुंद झाली होती. आम्ही Robberg peninsula वरून आत-आत निघालो होतो. पुढे लांबवर ते भूशीर जरासं डावीकडे वळून समुद्रात आणखी आत घुसलं होतं. तिथेही एक टेकाड दिसत होतं.
जसजसं ते पुढचं भूशीर दृष्टीपथात येत गेलं, तसतसं दिसलं की hikers त्याच्या शेवटापर्यंत, किंवा त्याच्या सर्वात उंचावरच्या स्पॉटपर्यंत गेले होते; जात होते.
त्या arm चे उभे-आडवे कातरलेले तांबूस-करडे कडे, त्यावर आपटणार्या अखंड उसळणार्या प्रचंड लाटा, लांबून येणारा त्यांचा आवाज, लाटांच्या force मुळे काठालगत ३०-४० फूट उंचीपर्यंत पसरलेलं पांढुरकं mist, वरती गच्च करडं आकाश, त्यामुळे क्षितिजापर्यंत समुद्राचं पाणीही करडंच दिसणारं, ११-१२ अंश तापमान, वारा ... या सगळ्याची एकत्रित भूल पडत असल्यासारखी वाटायला लागली. त्या mist सारखीच. ते वातावरण घेरून टाकायला लागलं. आपण कोण आहोत, कुठून आलो, इथे काही तासांसाठी थांबणार आहोत, हा विरंगुळा काही काळात संपुष्टात येणार आहे, हे सगळे विचार मागे पडत गेले. तिथला निसर्ग, तो तांबूस-करडा-हिरवा रंग आपल्यालाही त्याच्यात सामावून घेईल असं वाटायला लागलं. मी चालत होते, तरी एक तंद्री लागल्यासारखी झाली...
त्या तंद्रीतून मला भानावर आणलं, तिथल्या दगडधोंड्यांनी आणि डोंगरकपारींनीच.
अचानक एका बिंदूपाशी पायांखालची वाट जवळपास ९० अंशांत डावीकडे वळली. त्या वळणापाशी समोर डोंगरकड्यांतलं एक अद्भुत उभं होतं. आधी पिवळसर खडकाचा थर, साधारण आपल्या खांद्यांपर्यंत उंचीचा, त्याच्यावर जरा डोकं पुढे काढलेला काळसर होत गेलेला खडक, overhang म्हणतात तसा, तो असाच आणखी पुरुषभर वरती गेलेला, आणि त्याच्यावर... पुन्हा ते embedded pebbles! पण इथे त्यांचा रंग चांगलाच काळा! चकचकीत. आणि इथे ते बेमालूम खोचले गेलेले नव्हते. सिताफळाचे डोळे वरून दिसतात तसे जरा बाहेर आलेले दिसत होते. पुन्हा माझा ‘आ’ वासला गेला.
मी नंतर नेटवर थोडीफार शोधाशोध केली. माझ्या अल्पमतिनुसार, geology terms मध्ये याला Enon conglomerate म्हणतात. यातला enon हा झाला खडकाचा प्रकार. तो गार्डन रूट भागात सापडतो. त्या भागात चार प्रकारचे खडक सापडतात, त्यातला हा सर्वात जुना- साधारण १२ ते १४ कोटी वर्षांपूर्वी तो तयार झाला. यापेक्षा ते conglomerate प्रकरण मला जास्त इंटरेस्टिंग वाटलं. ते गोलमटोल गोटे, त्यांना म्हणायचं clasts; त्यांच्याभोवती अगदी बारीक sediments असतात, त्यांना म्हणायचं matrix. Clasts आणि matrix ना एकत्र सांधणारे वेगवेगळे घटक असू शकतात- घट्ट झालेली माती, कॅल्शियम कार्बोनेट, आयर्न ऑक्साइड, सिलिका. मला वाटलेले गोंद/कणीक म्हणजे ते हे! सगळ्यांचं मिळून होतं conglomerate. कसला भारी शब्द दिलाय त्यांना. रॉबर्ग नेचर रिझर्व आणि Plettenberg bay, in general, इथे हे खडकांचे प्रकार प्रामुख्याने आणि सहजी बघता येतात, म्हणे.
... हे सगळं मी भारतात, घरी परत आल्यावर नेटवर वाचलं. आणि मला पुन्हा एकदा त्या डाव्या वळणापाशी जावंसं वाटलं. म्हणजे त्या खडकांकडे ‘ते १२-१४ कोटी वर्षांपूर्वीचे खडक आहेत’ या आशाळभूत नजरेनं पाहता आलं असतं!
तेव्हा तिथे पुन्हा माझा ५-१० मिनिटं पुतळा झाला. एका दगडधोंडेप्रेमीला ध्यानीमनी नसताना एक never seen before गोष्ट पहायला मिळाली होती! तेव्हा ही geology ची माहिती नव्हती तरी हे काहीतरी वेगळं, काहीतरी भारी आहे इतकं तर नक्की समजलं होतं. मी जवळ जाऊन वरच्या त्या overhang वरून अलगद हात फिरवला. Conglomerate चा थर बराच उंचीवर होता. त्याचे फोटो काढणे अवघड होतं. मोबाइल कॅमेरे पुरते तोकडे होते. तरी जमेल तसे काही फोटो घेतले.
--
--
डावीकडचं वळण घेतल्यावर आता पुढे लांबवर गेलेलं ते भूशीर पुन्हा एकदा नीट बघितलं. त्याच्या शेवटापर्यंत काही आपण जाऊ शकणार नाही, हे मनात स्वतःला समजावलं. आता आमच्या उजव्या हाताला तो conglomerate चा कडा होता.
GPS वर दिसत होतं, की पुढे एका ठिकाणी The Gap नावाचा स्पॉट आहे. तिथपर्यंत जाण्याचं ठरवलं. त्या स्पॉटच्या दिशेनं वाट जराशी उताराची होती. १०-१५ मिनिटांत तिथे पोचलो. तो स्पॉट काय क-मा-ल होता! पुढे-मागे तो घसघशीत कडा, डावी-उजवीकडे उधाणलेला समुद्र, बाकी नेपथ्य तेच- गच्च आकाश, करडा-हिरवा-तांबूस रंग, थंडगार हवा. आणि या सगळ्याच्या मध्ये आपण. बस्स! त्या जागी रॉबर्गच्या निसर्गानं त्याच्यात सामावून घेतल्यासारखं वाटलं.
The Gap म्हणजे उजव्या हाताला कडा संपून (तुटून) २५-३० फुटी रिकामी जागा तयार झालेली आहे. कोणे एके काळी तो अखंड कडा असणार. कड्याच्या पलिकडून आपटणार्या लाटांमुळे मधला एक मोठा तुकडा तुटून खाली कोसळला असणार आणि ती गॅप, एक फट तयार झाली असणार. डावीकडे एका कोपर्यात एक लाकडी viewing platform बांधलेला होता. बसायला २-३ बाक होते. आमच्यासारखे आलेले, पुढे जाऊन परतणारे अशांची तिथे जरा वर्दळ होती.
अगदी समोरच पुढच्या टेकाडाच्या दिशेनं वाट वर चढत होती आणि मग उजवीकडे वळत त्या पुढच्या कड्यामागून पुढे जात होती. पुढे जायचं नाही असं ठरवलं होतं, तरी त्या वळणापर्यंत जाऊन येऊ म्हणत तेवढं चढून गेलोच. तिथून मागे वळून पाहिलं. Peninsula चं अप्रतिम दृश्य दिसत होतं.
उजवीकडे खाली लाटा अविरत खडकांवर आदळत होत्या. लाटांचा हात पोहोचत नव्हता तिथून वरती बारीक, हिरवं खुरटं गवत आणि पिवळी, केशरी बारीक बारीक फुलं यांचे पॅचेस दिसत होते. आम्ही आलो ती पायवाट शोधायचा प्रयत्न केला. सापडली नाही. सापडली नसतीच. नाहीतर त्याला hiking trail कशाला म्हटलं असतं. हे trails असे जंगलात लपलेलेच असायला हवेत, त्यातच मजा आहे.
इथे पहिल्यांदा जाणवलं, की स्वच्छ ऊन असतं तर इथपर्यंत चालत येणे जरा त्रासाचंच झालं असतं. ढगाळ हवेनं मजा आणली असं सुरुवातीला म्हटलं ते यासाठी.
आम्हाला तिथून पुढे जायचं नव्हतं, आणि ते वळण अरुंद होतं, त्यामुळे थांबता येणार नव्हतं. तिथल्या conglomerate ना हातानं एकदा गोंजारलं. परत खाली उतरून गॅपपाशी आलो. तिथून पाय निघत नव्हता. आणि गॅपमुळे खुली झालेली उजवीकडची (आता डावीकडची) वाट खुणावत होती. त्या वाटेवरही थोड्या अंतरावर एक वळण दिसत होतं. तिथून पुढे ती वाट डावीकडे लुप्त होत होती. तिथपर्यंत अधेमध्ये कच्ची पायवाट, मधूनच लाकडी बोर्डवॉक दिसत होता. त्या वळणापर्यंत जाऊन येऊ म्हणून निघालो. जंगलवाटा, trails हे असं जे काही भरीला घालतात ना, ते भारी असतं. तो मोह दूर सारता येणं महामुश्कील! मग असा काहीतरी मध्यममार्ग शोधावा लागतो.
त्या वाटेवर १-२ अवघड पॅचेस होते. Hiking shoes ची फार गरज भासली. पण कडेला जाड दोरखंड बांधलेले होते. त्यामुळे adventure चा अनुभव आला. एका ठिकाणी तर वाटेच्या दोन्ही बाजूंना खडकांचे मोठे गठ्ठे, ७-८ फूट उंचीचे, एका बाजूचा वाटेला समांतर, दुसर्या बाजूचा वाटेवर लंब टाकल्यासारखा. दोन्हींच्या मध्ये जेमतेम दीड-दोन फूट जागा. त्यातून पुढे सरकताना फार मजा आली. खडकांमधल्या बारीकसारीक कपारी अशा वेळी आधारासाठी उपयोगी ठरतात. आणि गार्डन रूटचे खडक तर या मदतीला सर्वात पुढे!
हे सगळं करताना उजवीकडच्या उधाणलेल्या समुद्राकडे मला दुर्लक्ष होऊ द्यायचं नव्हतं. आतापर्यंतच्या वाटेपेक्षा आता ही वाट बरीच खाली उतरली होती. समुद्र जवळ आला होता. काठावरचे कातरलेले खडक गडद विटकरी, लालसर दिसत होते. लाटा आणि ते खडक नजरबंदी करत होते. The Gap ची वर्दळ आता मागे पडली होती. आमच्या आगेमागे इतर कुणीच नव्हतं.
आरामात चालत त्या ठरवलेल्या वळणापाशी पोहोचलो. तर नजरेसमोर १५०-१६० अंशांत समुद्र आणि मग डावीकडे उरलेल्या १०-२० अंशांत त्या पुढच्या भूशीराची उजवी बाजू open-up झाली.
--
त्या बाजूला लांबवर एका ठिकाणी खडकांमध्ये २-३ प्रचंड मोठ्या गुहा तयार झालेल्या दिसत होत्या. गुहांसमोरूनच १-२ hikers चालत होते. त्यांचे आकार इतके लहानसे दिसत होते, की त्यावरून त्या गुहा केवढ्या huge होत्या याचा अंदाज आला!
मी बराच वेळ ती वाट पुढे कुठे, कशी जातेय ते trace केलं. Robberg च्या सर्वात लांबवरच्या hike चा शेवटचा टप्पा (‘The Point’) याच वाटेवर शेवटी असणार, हे ताडलं. पुन्हा आशाळभूतासारखं त्या गुहांकडे काही सेकंद बघितलं; आपण त्या गुहांच्या तोंडाशी उभं राहून समुद्राकडे पाहतो आहोत अशी कल्पना केली आणि मग मात्र त्या सगळ्याकडे सरळ पाठ फिरवून ५ मिनिटं उभी राहिले. मोह टाळण्याचे, मनाला आवर घालण्याचे हेच प्रसंग असतात. अवघड असतात. वेळ लागतो. त्रास होतो. पण ते करावं लागतं.
जरा वेळाने तिथून निघालो. गॅपच्या चौकात आलो. परतण्याच्या दोन वाटा होत्या. एक, ज्या वाटेनं आलो, ती. शिवाय आणखी एक होती. चौकातले ३ रस्ते पाहून झाले, चौथा का सोडा, म्हणून ती दुसरी वाट धरली. आता आमच्या उजवीकडे conglomerate च्या पहिल्या कड्याची पलीकडची बाजू होती, जी अजून दिसलेली नव्हती. डावीकडे समुद्र, जो मगाशी १५०-१६० अंशांत दिसला होता. त्या वाटेवर पाच-एक मिनिटं बोर्ड-वॉक होता. आणि नंतर एक मोठा चढ-cum-अवघड पॅच आला. (म्हणजे माझ्यासाठी तो अवघड होता.) तिथे एक mini-adventure पार पाडलं. लाटांचा आवाज, वारा, तिथल्या खडकांमधल्या कपारी, तो पॅच पार करण्याचा माझा हरतर्हेचा खटाटोप - हे सगळं लख्ख आठवतंय. या वाटेनं येऊन चूक केली का, अशी शंकाही एका क्षणी टप्पल मारून गेली. पण हळूहळू, one step at a time करत शेवटी तो पॅच पार केला.
ती वाट पुढेही चढाचीच होती. अर्ध्या तासात सावकाश, दमादमानं तो चढ पार केला. एका जराशा सपाट जागी आलो. हा त्या पहिल्या conglomerate कड्याचा माथा.
म्हणजे आम्ही त्या कड्याला आख्खा वळसा घालून त्याच्या माथ्यावर आलो होतो. रॉबर्ग हायकिंग 3 ट्रेल्सपैकी (२ किमी, ४ किमी, ११ किमी.) आम्ही २ किमीचा ट्रेल पूर्ण केला होता. शिवाय थोडं पुढे जा, थोडं उजवीकडे खाली उतर, हे सुद्धा केलं होतं. अशा भटकंतीची सवय नसल्यामुळे बर्यापैकी दमायला झालं होतं. त्यामुळे त्या कड्याच्या काठाशी जाऊन, खाली वाकून ते काळे embedded pebbles दिसतात का वगैरे बघण्याचं डोक्यातही आलं नाही. तिथे एक बाक होता. तिथे बसलो नसतो तर त्या बाकाचा अपमान झाला असता. आता त्या पुढच्या भूशीराकडे बघण्याचा एक वेगळा angle मिळाला. रॉबर्ग peninsula चा तो arm चार वेगवेगळ्या angles मधून आणि zoomed-out frames मधून पाहता आला. सगळीच दृश्यं कमाल होती! एकमेकांपासून पूर्णतः वेगळी होती. सगळ्यात कॉमन होती एकच गोष्ट- कातरलेले कडे आणि उसळणार्या लाटांची जोडगोळी...
त्या बाकापासून पार्किंग लॉटपर्यंत वीस-एक मिनिटांची वाट होती. वाटेत पांढुरक्या, पिवळसर pebbles चा अक्षरशः खच पडलेला होता. हे तिथल्या conglomerate मधले निसटून आलेले clasts होते. साहजिकच इथे काही matrix चे असे गठ्ठे दिसले, की ज्यात clasts च्या खाचा रिकाम्या होत्या... जणू कुणीतरी scoop करून ते pebbles बाहेर काढले असावेत!
मी तिसर्यांदा ‘आ’ वासला... नैसर्गिक आश्चर्यं पचवण्याचंही आपलं एक limit असतं, हे त्यादिवशी समजलं.
Thanks to ‘पूरी कायनात’!
-----
भाग-१ : https://www.maayboli.com/node/86025
भाग-२ : https://www.maayboli.com/node/86039
(लेखातल्या geological माहितीत काही दुरुस्ती असेल किंवा याबद्दल कुणाला आणखी काही माहिती असेल तर अवश्य सांगा.)
Knysna west head चा फोटो काही
Knysna west head चा फोटो काही केल्या डिस्प्ले होत नाहीये.
हर प्रकारे प्रयत्न करून पाहिले.
छान वर्णन!
छान वर्णन!
निसर्गाची भव्यता, सागराने पहाडांना दिलेलं आव्हान फोटोंमध्ये सुरेख पकडले आहे
एका सर्वस्वी अनोळखी प्रदेशाशी तोंडओळख या मार्गे घडते आहे
वाह. निसर्गाची अनवट रूपे.
वाह. निसर्गाची अनवट रूपे.
मस्त मस्त्…. कसला जबरदस्त
मस्त मस्त्…. कसला जबरदस्त निसर्ग आहे हा. थँक्स आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल.
नाय्ज्ना वेस्ट हेडचा फोटो आता
नाय्ज्ना वेस्ट हेडचा फोटो आता टाकलाय. इमेज बरीच कम्प्रेस, रिसाइझ वगैरे करावी लागली, त्यामुळे क्वालिटी बिघडली, पण असू दे.
वाह ! मस्तच ते खोचलेले दगड
वाह ! मस्तच ते खोचलेले दगड आणि नंतर स्कूप केलेले दगड दोन्ही भारी आहेत!