दोघी ....!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 10 November, 2024 - 09:00

दोघी...!
______________________________________

तिला जाग आली तेव्हा मध्यरात्र होती .. गेले कित्येक रात्री तिला झोप येत नव्हती .. आज कुठेतरी डोळा लागला तर अचानक अशी झोपमोड झालेली..!

आता पुन्हा झोप येणं शक्य नव्हतं ... तिला वाटलं , युगानुयुगं आपण जणू जागेच आहोत .. कुठल्याही शिक्षेपेक्षा भयंकर अशी ही शिक्षा आपल्याला मिळाली आहे..

तिने दिवा लावला .. समोर सारं नेहमीचं ओळखीचंच होतं.. भिंतीवर लावलेला गणपतीचा फोटो , कोपऱ्यातला फ्रीज , त्यावर काही औषधांच्या बाटल्या ..!

रात्री बनवलेले व्हिस्कीचे ग्लास तसेच टेबलवर पडलेले .. काश्मिरला गेले असता काश्मिरी पोशाखात काढलेला तिचा एक फोटो कोपऱ्यात होता .. टेबलाच्या मध्यभागी चार दिवसांपूर्वीचे वर्तमानपत्र पडलेले , तिथेच गोळयांचे पाकीट ठेवलेले .. झोपेच्या गोळ्यांचे .. कालच चंद्याने आणले होते .. तिच्यासाठी .. रात्री तिला शांत झोप लागावी म्हणून , मात्र तिने त्यातली एकही गोळी घेतली नव्हती. पाकीट तसेच गोळ्यांनी पूर्ण भरलेले होते.

बाजूला हालचाल झाली म्हणून तिने नजर टाकली . पलंगावर पसरलेला चंद्या झोपेत कूस बदलत होता .. झोपेत किती निरागस दिसत होता .. एखाद्या सात-आठ वर्षाच्या लोभस पोरासारखा ... !

तिला हेवा वाटला.. धुंदावणाऱ्या त्याच्या तारुण्याचा .. त्याच्या शांत , निरागस, बेखबर निद्रेचा ..!

शांत निजलेल्या चंद्याचा झोपेतला निरागस छटेचा चेहरा पाहून एरव्ही त्याच्या बंदुकीतून धडाधड सुटणाऱ्या गोळ्यांनी किती तरी निष्पाप माणसांचा जीव घेतला असेल हे सांगूनही कुणाला पटलं नसतं ..!

शार्पशूटर चंद्या ..!

चंद्या मायकेल भाईच्या गँगसाठी काम करायचा. पोलिस आणि मायकेल भाईचा हाडवैरी असलेल्या छोटा साजनची माणसं सतत त्याच्या मागावर राहत.. त्याचा जीव घेण्यासाठी टपलेली असत ..!

तिची नजर चंद्याच्या लोभस भासणाऱ्या चेहऱ्यावर खिळली. तिने त्याच्याजवळ जात त्याच्या राठ, कुरळ्या - काळ्या केसांतून ममतेने हात फिरवला ..

चंद्या जीव ओवाळून टाकायचा तिच्यावर ... तिच्यापेक्षा वयाने लहान असूनही..!

तिच्यावर विसंबून असायचा.. आसुसलेला राहायचा ... तिच्या प्रेमासाठी .. मायेसाठी ..!

किती पुरणार आपण त्याला .. ??

तिने त्याला बऱ्याचदा म्हटलं देखील ,

" मला आणि गुन्हेगारी जगाला .. दोघांनाही सोड , पुढे जा आयुष्यात ... लग्न कर .. संसार मांड स्वतःचा ...!"

तो फक्त गालात हसायचा .. लहान बाळासारखा तिच्या मांडीवर डोकं घुसळायचा .. म्हणायचा ,

" तू करशील का माझ्याशी लग्न ??.. संसाराचा डाव मांडशील माझ्या सोबतीने ..?"

ती निरुत्तर व्हायची. त्याच्या प्रश्नावर वेदनेची एक झाक तिच्या डोळ्यांत जागायची.

" परतीच्या सगळ्या वाटा बंद झाल्यात .. स्वतःच्या हाताने सगळे परतीचे दोर कापलेत मी .. आता शक्य नाही..!" तो उसासे टाकत म्हणायचा.

ती विचार करत असे , आपल्यासारखाचं हा देखील वाट चुकलेला ... परतीची वाट नाहीच दोघांच्याही नशिबात ..!

असं म्हणतात , दुःखाचा एकसमान धागा असलेले जीव नियती परस्परांत बेमालूमपणे गुंतवते ... त्यांना एकमेकांच्या जवळ आणते ..आपल्या आणि चंद्याच्या बाबतीत हे सत्य नव्हते काय ..?

कितीतरी पुरुष आले तिच्या आयुष्यात, मात्र चंद्यासाखा जीव लावणारा दुसरा कुणी तिला भेटलाच नाही .. तिनेही मुद्दामहून कुणात जीव गुंतवला नाही.. जे होतं ते सगळं व्यवहाराच्या पातळीवर .. मात्र चंद्या सोबतच तिचं नातं व्यवहाराचं नव्हतं .. ती खऱ्या अर्थाने त्याच्याशी रत होत होती. .. आसक्त होत होती...मनाने आणि शरीराने दोहोंनेही.. .!

त्याच्या चेहऱ्याकडे पाहता - पाहता तिला आपली आई आठवली .. परिस्थितीने गांजलेली पण जिवंत होती तोपर्यंत तिच्या डोक्यावर नभ बनून सावली धरणारी ...!

आई नंतर आपल्यावर माया करणारा चंद्या एकमेवच ..

नाही.. नाही ... विसरलो आपण .!! ती स्वतःशीच चुकचुकली .

दुधाच्या सायीसारखं माया करणारं होतं अजून कुणीतरी..! कोण ..??

" अरुण्या "

हो .. अरुण्याचं ...!

तिची आठवण येतेय .. गेले काही दिवस तर तहानेने जीव तळमळावा तशी सतत तिची आठवण येत्येयं.

ती पलंगावर निपचित पडून राहिली ... डोळे टक्क उघडे ठेवून ..!

तिला वाटलं , आठवणी आपल्याला फार फार मागे खेचून नेतात .. आयुष्यात ज्या वाटेवरून न थांबता धावायला सुरुवात केली ... मागे वळून पाहावेसेही वाटले नाही ... ज्या आठवणी पुसाव्याशा वाटल्या त्या पुन्हा आपल्याला प्रारंभालाच नेऊन ठेवतात .. मनात नसतानाही पुन्हा ती वाट चालावी लागते .. अन् मग जे नकोसे आठवावे वाटते ते पुन्हा आठवू लागते.

तिच्या आईला नेहमी वाटे , आपल्या लेकीने खूप शिकावे.. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहावे ..

तिच्या आईने पीटरभाईच्या वशिल्याने तिला ' सेंट मेरी' हायस्कूल मध्ये प्रवेश मिळवून दिला. त्या शाळेत धनदांडग्यांची , राजकारण्यांची मुलं शिकत. तिच्या गबाळ्या, दळीद्री वस्तीतल्या एकाही मुलाला किंवा मुलीला तिथे शिक्षण घेणं शक्य नव्हतं. त्यांना शाळेच्या गेटवरही कुणी उभं केलं नसतं.

तिला आठवलं, पीटर भाईने दिलेली चिठ्ठी जेव्हा शाळेच्या प्रिन्सिपॉलला आईने दाखवली तेव्हा खरंतर त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. मात्र पीटरभाईचा चिठ्ठीतला आदेश डावलण्याचे सामर्थ्य त्यांच्या जवळ निश्चित नव्हते.

प्रिन्सिपॉल चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाले होते , " ओह माय लिटिल प्रिन्सिसेस, वेलकम टू अवर स्कूल ..!"

अश्या रितीने मग ' सेंट मेरी' सारख्या कॉन्व्हेंट शाळेत तिच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला.

पीटरभाई त्यांच्या वस्तीतला दादा होता. खून, मारामाऱ्या, खंडणी मागणे ह्या आणि अश्याच अनेक गुन्ह्यासाठी तो कुख्यात होता. त्याची स्वतःची टोळी होती. वस्तीत, शहरात त्याची दहशत होती.

तिच्या शाळेचा , शिक्षणाचा सगळा खर्च पीटरभाई करायचा. आपल्यावर व आईवर पीटरभाई एवढा मेहेरबान का आहे .. हे कळण्याइतपत तिचे वय नव्हते.

पीटरभाई जेव्हा कधीही चाळीत तिच्या घरी यायचा तेव्हा अप्पा तिला घेऊन तास - दोन तास समुद्रावर फिरायला जायचे. पीटर भाईला चाळीत येताना पाहिलं की, शेजाऱ्यांची दारं पटापट आतुन बंद व्हायची.

ती अप्पांकडे हट्ट करत म्हणायची, आईला पण सोबत घेऊया, तेव्हा तिचे कान पिळत अप्पा तिला पीटरभाईची भीती घालायचे, हळू आवाजात म्हणायचे ,

" चूप रहा जरा वेळ...पीटर भाईकडे मोठ्ठा सुरा आहे... त्याने तो पोटात घुसवला तर आतडी बाहेर येतील .. चल.. पळ लवकर ..!"

ती घाबरून जायची. मुकाटपणे अप्पांच्या हाताला धरून समुद्रावर जायची. कोपऱ्यावर वळताना पाहायची तर चाळीतल्या त्यांच्या खोलीची एकमेव खिडकी बंद झालेली असायची. पीटरभाई आपल्या घरी आल्यावर दार, खिडकी बंद करून आई घरी एकटीच का राहते ते तिला त्या वयात कधीच समजले नाही. पीटरभाईकडे आईला एकटं सोडणाऱ्या अप्पांचा तिला राग - राग यायचा ..

जेव्हा अप्पा आणि ती घरी परतायची तेव्हा पीटरभाई गेलेला असायचा.. तिला आईचे डोळे लाल झालेले जाणवायचे .. बहुतेक ती रडली असावी..

आई अप्पांच्या मुठीत काही नोटा कोंबायची .. तोंडाने पुटपुटायची .. अप्पाचं तिच्या पुटपुटण्याकडे जराही लक्ष नसायचं .. खूश झालेले अप्पा पैसे घेऊन पसार व्हायचे .. आणि मग कधीतरी रात्री डुलडुलत त्यांची स्वारी घरी परतायची .. ती खिडकीतून त्यांना पाहायची. आई दाराबाहेर त्यांचं वाढलेलं ताट आणि पाण्याचा तांब्या ठेवायची आणि घराचा दरवाजा बंद करून घ्यायची .. त्यांचं अंथरूण देखील ती बाहेर टाकायची .. रात्री कधीतरी अप्पा दार ठोठावत पण आई दार कधीच उघडायची नाही.. तिने अप्पांना घरातून आणि आपल्या हृदयातून केव्हाच हद्दपार केले होते.

आई तिला कुशीत घेऊन झोपायची. आईचा पदर ओला झाल्याचा तिच्या गालांना कधीतरी जाणवायचं ... ती आईला घट्ट मिठी मारायची. तिला वाटायचं ही रात्र कधीच सरू नये.. रात्र सरली तर आईच्या कुसेपासून , मायेपासून आपण दुरावणार .. तिला ते नको वाटायचं.

एकदा शाळेतून घरी येत असताना तिने पाहिलं की, चाळीच्या भिंतीवर कुणीतरी खोडसाळपणे खडूने काहीतरी लिहून ठेवलं होतं. ती जवळ जाऊन वाचू लागली.

एक ... दोन ... तीन .... चार.. ..
शेंबड्या उजूला बापच फार ..

तिने ते मोठयाने वाचलं. तिला त्याचा अर्थ लागला नाही.. पण मागून आलेल्या आईने तिला ते वाचताना पाहून बखोटीला धरून घरात नेलं. पोतेरं घेऊन भिंतीवरचं लिहिलेलं आईने पुसून टाकलं. आई आतल्या आत धुसमुसू लागली.

"मेल्यांच्या बुडाला आग लागत्ये .. माझी पोर इंग्लिश शाळेत शिकत्येयं तर जळतात मेले सगळे ..!" आई घरात येत बडबडू लागली.

तिला मात्र कसलाच बोध झाला नाही. चाळीतले, आजूबाजूचे शेजारी - पाजारी आपल्या आईबद्दल आणि आपल्याबद्दल चांगलं म्हणत नसावेत तेवढं मात्र तिला समजलं.

शाळेत ती कुणाशीच जास्त बोलायची नाही. तिला तिच्या आणि इतर मुलांच्या परिस्थितीत असेलेली दरी कळली होती.

तेव्हा ती पाचवीत होती. दुपारच्या सुट्टीत एकटीच आपल्या बाकावर जेवणाचा डबा खात बसली होती. ती खाण्यात गुंतलेली असताना अचानक तिच्या कानावर गोड, नाजूक आवाज पडला.

" मी पण बसू का इथे , डबा खायला ..??"

आजच नव्याने वर्गात दाखल झालेली ती नवी मुलगी तिला विचारत होती.

ती घाबरली. तिने डबा दोन्ही हातांनी लपवला. रात्रीची शिळी भाकरी आईने डब्यात गरम करून दिलेली.. तिला लाज वाटली.

" असू दे , नको लपवू डबा.. माझं नाव अरुण्या .. आणि तुझं .?"

नव्या मुलीच्या चेहऱ्यावरची निरागस हास्य छटा पाहून ती स्वतःशीच हसली.

__ आणि मग पुढे दोघींची घट्ट मैत्री रुजली. सायीसारखी निरागस चेहऱ्याची अरुण्या तिची जिवाभावाची मैत्रीण झाली. दोघींच्याही घरची परिस्थिती पूर्णतः वेगळी होती. मात्र दोघींच्या मैत्रीत त्यांच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळे बाधा कधीच आली नाही. अरुण्याचे आई-वडील दोघेही कॉलेजात शिकवायचे.

कधीतरी तिला वाटायचं , नको अरुण्याशी मैत्री .. कुठे तिचं दुधाच्या सायीसारखं आयुष्य न् कुठे आपलं निखाऱ्या खालचं आयुष्य ... कुठेच न जुळणारी आयुष्य आहेत दोघींची .. मात्र अरुण्याने कधीच तिला तिच्या परिस्थितीबद्दल विचारलं नाही. आपलं उच्च पातळीवरचं जीवनमान कधीच तिच्या दुबळ्या जीवनमानाशी तोललं नाही.

दोघींचा ही गळा सुरेल होता. अरुण्याला भविष्यात गायिका बनायची इच्छा होती. त्यासाठी ती मेहनतही घेत होती. दोघीही शाळेतल्या गायन स्पर्धेत नेहमीच परितोषिक मिळवत.

ती वाढत होती वयाने आणि शरीरानेही..!
मनात भावनांची आणि शरीरात संप्रेरकांची आंदोलन सुरू झाली होती. शरीरात , मनात नव्याने काहीतरी उमलू पाहत होते.

हल्ली पीटरभाईचं घरी येणं थांबलं होतं. आईनेचं त्याला रोखलं होतं.. मात्र आईचं घराबाहेर जाणं वाढलं होतं. तिला काही गोष्टी कळू लागल्या होत्या.

कानात काडी टाकून फिरवत बसलेले अप्पा नाक्यावर दिसले की, तिचं मस्तक उकळायला लागे. लोकांचे हात पाहून भविष्य सांगायचा खुळा नाद त्यांना लागला होता.

अमेरिका - आखाती संबंध, जागतिक राजकारण, भारताचे अर्थकारण , पवारांचे राजकारण , बाळासाहेबांचे हिंदुत्व असल्या भल्या मोठ्या ज्वलंत विषयांवर पानाच्या टपरीवर भाषण ठोकताना त्यांना पाहिलं की, तिची कानशिलं गरम व्हायची. त्यांच्या मागे लोकं त्यांची खिल्ली उडवत. त्यामुळे तर तिचा अजूनच संताप व्हायचा.

आठवीत होती ती तेव्हा ... एके दिवशी शाळा लवकर सुटली तर ती आणि अरुण्या सोबतीने समुद्रावर फिरायला गेल्या. दोघींनीही भेळपूरी खाल्ली. वाळूत बसून खूप गप्पा मारल्या. घरी परतायचं म्हणून दोघी उठल्या .. तर बाजूच्या माडाच्या झाडाखाली हसण्याचा आवाज आला म्हणून तिने वळून पाहिलं तर तिला धक्काच बसला. अरुण्या पुढे गेली. ती थोडी मागे राहून पाहू लागली. तिला काहीतरी ओळखीचं जाणवलं.

आई.. हो.. आईच होती तिची तिथे.. केस मोकळे सोडलेले .. पदर वाऱ्यावर उडत होता तिचा.. आणि बाजूचा पुरुष .. हो तोच होता पीटरभाई .. आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला.. आई त्याच्या केसांतून प्रेमाने हात फिरवत होती.. त्यांच्या गप्पागोष्टी रंगलेल्या .. मध्येच पीटरभाई आईचा हात स्वतःच्या हातात घेत होता.. दोघांनाही आजू - बाजूचे भान नव्हते. एखाद्या नवथर तरूण - तरुणी सारखे दोघे परस्परांत गुंतले होते.

श्शी...! तिला घृणा वाटली .. आईची .. स्वतःची.. स्वतःच्या शरीराची..!

" चल लवकर..! " तिने अरुण्याला हाताला धरून खेचत
नेलं. अरुण्याच्या दृष्टीस काही पडू नये म्हणून ती धडपड करू लागली.

घरी जाण्याची तिची इच्छा जणू मेली होती. ती नगरपालिकेच्या बागेत बसून राहिली. अंधार पडल्यावर सिक्युरिटीने हटकल्यावर ती घराच्या दिशेने निघाली.
चाळीच्या जिन्यात नखं खात बसलेले अप्पा तिला दिसले. तिला त्यांच्यावर थुंकावसं वाटलं.

ती आत आली. आई आज जास्तचं आनंदात दिसत होती. जणू काही घडलंच नाही आणि कुणी तिला पाहिलं नसेल ह्या अविभार्वात ती वागत होती.

" कोण लागतो गं पीटरभाई तुझा.. कोण आहे तू त्याची ..??"

एखादा पेटता फटाका एखाद्याच्या समोर फेकावा तसा तिने आई पुढे प्रश्न फेकला.

आई दचकली.

" का असं विचारतेस..? "

" प्रश्न नको .. उत्तर दे आधी ..!"

आई तिच्या जवळ आली.

" उत्तर पाहिजे तुला..?? जा आणि त्या बाहेर बसलेल्या तुझ्या हरामी बापाला विचार.. कोण लागतो पीटरभाई माझा ते ...??" आईचा आवाज वाढला.

तिच्या डोळ्यांत संताप आणि अश्रूचं मिश्रण जमा झालं.

" ठेवलेली बाई आहे मी पीटरभाईची आणि तो बाहेर बसलायं ना तुझा बाप ... तो दलाल आहे .. लू भरलेला लाचार कुत्रा आहे पीटरभाईचा..! कळलं आता तुला..?"

" पीटरभाईच्या आशिर्वादाने तुझं शिक्षण आणि घर चालतंय हे .. लायकी आहे का आपली ते बघ आधी इंग्रजी शाळेत शिकण्याची .. मला प्रश्न विचारतेस... एवढी मोठी झालीस तू..?"

तिला वाटलं नको हे शिक्षण .. नको ती जळत्या निखाऱ्यावरची आयुष्याची वाट.. शील विकून , इज्जत वेशीवर टांगून घेतलेलं शिक्षण नको आपल्याला..

त्या प्रसंगनानंतर ती हळूहळू आईपासून दुरावू लागली. अरुण्याच्या मैत्रीत जीव गुंतवू लागली. शांत, भोळी , संवेदनशील मनाची, चेहऱ्यावर नेहमी निरागस छटा बाळगणारी अरुण्या तिला तिचा आधारस्तंभ वाटू लागली.

आयुष्यात माया लावणारी फक्त रक्ताचीच नाती असतात का..??

स्वतःच्या डब्यातल्या साजूक तुपाच्या पोळीचा हट्टाने घास भरवणारी अरुण्याची माया आईच्या मायेपेक्षा किंचितही कमी भरत नव्हती.

शाळेचा प्रवास संपत आला होता दोघींचा .. अरुण्याने गायनाचा वर्ग लावलेला ... तिची इच्छा असूनही तिला गायन वर्गाची फी परवडली नव्हती. दहावीला दोघींनाही चांगले गुण पडले. यथासांग दोघींनीही एकाच कॉलेजात प्रवेश घेतला.. पीटरभाईच्या कृपेचा हात तिच्या डोक्यावर कायम होता.

उमलत्या वयात अरुण्याची आणि तिची मैत्री अजूनच घट्ट होत होती. कॉलेजात गेल्यामुळे अभ्यासाचं प्रमाण वाढलं होतं तरिही दोघी कॉलेज सुटल्यानंतर सिनेमा पाहायला जायच्या ..समुद्रकिनारी भटकंती करायच्या.

कॉलेजवयीन आयुष्यात एक प्रसंग असा घडला की, अरुण्याच्या हळव्या, संवदेनशील स्वभावाचा एक पैलू नकळतपणे तिच्यासमोर उलगडला.

कॉलेजचे तास संपल्यावर दोघीही रस्त्यावरून रमत - गमत गप्पागोष्टी करत निघालेल्या.. एक लहानसे , कोवळे कुत्र्याचे पिल्लू त्यांच्या समोरून येत होते..

" "कित्ती सुंदर आहे गं ते पिल्लू ..!" असं अरुण्याने म्हणायचा अवकाश अन् अचानक एका भरधाव मोटारीने त्या पिल्लाला उडवून टाकले. पिल्लू रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले ..

बिच्चारे , अभागी ..!! तिला धक्का बसला. पण
त्यापेक्षा जास्त धक्का तिला तेव्हा बसला जेव्हा अरुण्याने तिच्या खांद्यावर मान टाकली. तिला चक्कर आलेली. अनपेक्षितपणे घडलेल्या प्रसंगाने ती घाबरून गेली. रिक्षा करून तिने अरुण्याला घरी सोडलं. तिच्या आईला घडला प्रसंग सांगितला. पुढचे दोन दिवस
अरुण्या कॉलेजला आली नाही... ती काळजीने तिला भेटायला तिच्या घरी गेली.

दोन दिवस अरुण्या तापाने फणफणलेली.. तिच्या भावविभोर डोळ्यांखाली काळी वर्तुळे आलेली.. पण स्वतःला सावरलेली अरुण्या..!

" पिल्लू मेले ना गं.. उजू ..?? का वागतात गं माणसं अशी..? एवढी कठोर , निर्दयी असू शकतात का गं माणसं...? काय दोष होता त्या एवढ्याशा पिल्लाचा..? अजून त्याला जगायचं होतं ना गं..??" अरुण्या ओक्साबोक्सी रडू लागली.

अरुण्याला असं रडताना पाहून तिला वाईट वाटलं.. पण तिला रडू फुटलं नाही.. तिला दुहेरी वाईट वाटलं , एक तर अरुण्याला दुःख झालेलं त्याचं आणि दुसरं, आपल्याला रडू का फुटलं नाही ह्याचं...?

दिवसेंदिवस आपण भावनाहिन , संवेदनशून्य होतं चाललोयं का..? तिला प्रश्न सतावू लागला.

" पिल्लाच्या आईची काय अवस्था झाली असेल गं..? कित्ती दुःख झालं असेल तिला ..? " अरुण्याला शोक आवरत नव्हता.

" सावर अरु स्वतःला .. अभागी असतात काही जन्मलेले जीव आणि काही दुःख वगैरे झालं नाही त्या पिल्लाच्या आईला .. पाहिलं नाही तू , निपचित पडलेल्या पिल्लाला टाकून कशी खुश्शाल गेली त्या माजलेल्या कुत्र्याबरोबर . काय व्हायचं ते होऊ दे तिथे आपल्या पिल्लाचं.. फरक नाही पडला तिला ...!.'

" नाही गं नाही , असं नसतं उजू.. आई अशी नसते... ती गेली म्हणून तिला दुःख झालं नसेल कशावरून ..?"

दुधाच्या सायीसारखं नितळ आयुष्य जगणाऱ्या अरुण्याला उजूचं म्हणणं पटलं नसतचं..

तिने विषयांतर केलं... मात्र त्यानंतर अरुण्याच्या संवेदनशील , हळव्या स्वभावाची धास्ती तिला वाटू लागली.

एखाद्याच्या नशिबात आयुष्यभर बिकट वाटेवरचं चालणं असलं ना की, नियती ही त्या वाटेवर पावलोपावली काटे पेरायची कसर सोडत नाही.

दिवाळीची सुट्टी संपली आणि कॉलेज नुकतेच सुरू झाले होते.. माधुरी आणि आमिरचा ' दिल' के.टी. व्हीजनला लागलेला ... अरुण्या आणि ती दोघीही दुपारच्या तीनचा शो पाहायला गेलेल्या.

" मुझे नींद ना आये .. मुझे चैन ना आये...!"
ती गाणं गुणगुणतच वस्तीच्या नाक्यावर रिक्षातून उतरली. वस्तीत एकदम चिडीचूप शांतता होती.
आज वस्तीत स्मशानशांतता कशी काय पसरली असावी, तिला नवल वाटले.

ती दारात आली. समोर अप्पा डोक्यात खराखरा खाजवत बसलेले पाहून तिला त्यांची किळस वाटली. ती आत घरात गेली .. घरात अंधार पसरलेला .. तिला त्या अंधाराला सुतकी छटा जाणवली .

तिने दिवा लावला. आई भिंतीला टेकून मान गुडघ्यात घालून बसलेली.. ती दबके हुंदके देत होती..

कोणासाठी रडत्येयं ही..? ती बुचकळ्यात पडली.

तेवढ्यात अप्पा आत आले.

" काय झालं ..? का रडत्येयं आई..??" तिने विचारलं.

" पीटरभाईला मारला आज ..."

" कोणी ..?"" तिला धक्का बसला.

" पोलिसांनी... काशिमिऱ्याला एन्काऊंटर केले त्याचे.. गोळ्या घातल्या डोक्यात ... होणारच होतं एक दिवस असं.. खंडणी वसूल करायला गेलेला मद्रास्याकडे .. दिली टिप त्याने .. उडवला साल्याला ..!"

" मयत पण नाही दाखवलं मेल्यांनी ... नेलं तिथे वसईला .. त्याच्या नातेवाईकांकडे..!" आईला आता कंठ फुटला.. अप्पांकडे रागाने पाहत ती थरथरत्या आवाजात म्हणू लागली. आईचं रडणं थांबत नव्हतं.. रडणाऱ्या आईला ती शांतपणे न्याहाळत राहिली.

दुसऱ्या दिवशी कॉलेजातून ती घरी परतत होती तर तिला पाहून गल्लीतून कुणीतरी कर्कश आवाजात ओरडलं..

" उजू की माँ पीटर की बेवा हो गई रे... मातम मनाओ रे सब लोग .. मातम मनाओ..!"

तिने दगड उचलून आवाजाच्या दिशेने फेकला. दाणदाण पाय आपटत, धुसफुसुत ती घरात घुसली. अप्पा आज तिला चाळीच्या दारात दिसले नाही म्हणून नाही तर आज दुसरा दगड त्यांच्या माथ्यात तिने घातला असता .. इतकं तिचं रक्त उकळलं होतं.

घरात आई सुतकी चेहऱ्याने बसलेली .. कपाळावर कुंकू नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही.. बांगड्या बाजूला फोडून ठेवलेल्या..!

" नवरा मानत होतीस त्याला तर का नाही गेलीस त्याच्या सोबत .. उघडपणे त्याची बायको बनून राहायचं होतं ना .. लोकांनी मानाने तरी त्याची विधवा म्हटलं असतं तुला ... बुळचट, भेदरट नवऱ्यासोबत का राहिलीस मग इथे .?.. आता तमाशे करतेस..! " ती आईचं पांढरं कपाळ पाहून संतापाने कडाडली.

तिच्या आईच्या चेहऱ्यावरची सुतकी रेषा जराही हलली नाही.

" बोल ना , गप्प का..? आता कशाला ही नाटकं हवीत .. मोडायची होती समाजाने ठरवून दिलेली चौकट .. तेवढी हिंमत नव्हती पण पोटच्या पोरीसमोर अनैतिकपणे वागताना, व्याभिचार करताना कुठून आणलेली गं एवढी हिंमत ... ?? लाज वाटली नाही का तुला निलाजरेपणा करताना .??.

तिच्या डोळ्यांसमोर रस्त्यावर निपचित पडलेल्या पिल्लाला टाकून जाणारी त्याची आई आली.

" पूरे कर आता .. थोबाड फोडीन नाहीतर ..! " आई तारस्वरात ओरडली.

" थोबाड कशाला .. जीवच घे ना माझा .. निदान ह्या खातेऱ्यातून सुटका तरी होईल माझी.. !"

पीटरभाई गेला आणि घराची मिळकत बंद झाली. तिला आता काहीतरी काम शोधणं गरजेचं होतं. खायचे वांदे होणार तिथे कॉलेज शिकण्याचे चोचले तिला परवडणारे नव्हते.

" मी कॉलेज सोडतेय .. अरु..!"

" अगं, पण का..? पैशांचा प्रॉब्लेम असेल तर मी आई-बाबांशी बोलत्ये .. पण तू शिक्षण नको सोडू..!"
नेहमीचं दुधाच्या सायीसारखं अरूचं बोलणं... चेहऱ्यावरील निरागस छटा ..!

अरुला काहीही सांगण्यात अर्थ नव्हता.. आता तिला कुणाचीही भीक नको होती.. कुणाच्या तरी उपकाराच्या भिकेची शिडी घेऊन कुठलाही प्रवास आता तिला नको होता.

तिने कॉलेज अर्धवट सोडलं.. आईशी संवाद जवळ-जवळ बंद होण्याच्या मार्गावर होता.. तिची आईवरची माया आटू लागलेली मात्र आईची तिच्यावरची माया निरंतर होती .. पण ती मूक होऊ लागलेली.

अप्पा घरातून निघून गेलेले.. वस्तीत सगळ्यांना सांगायचे .. मी संन्यास घेणार बुवा आता .. माझं मन काही रमत नाही ह्या संसारात .. मोक्ष हवाय आता आयुष्याला ..!

म्हणे मन रमत नाही संसारात ... कुठे होता ह्यांचा संसार..? ... काय स्थान होतं मुलीच्या आणि पत्नीच्या मनात त्यांच्याबद्दल.. दोघींनीही दूषणंच दिली आयुष्यभर त्यांना .!

तिला वाटलं, सुंठी वाचून खोकला गेला... जाऊ दे जिथे जायचंय तिथे...आई आणि तिने त्यांना शोधण्याचे जराही प्रयास केले नाहीत.

एका ओळखीने शेट्टीच्या हॉटेलच्या बारमध्ये
ऑक्रेस्टात तिने गायिका म्हणून काम करायला सुरुवात केली. गळा सुरुवातीपासून गोड होता त्यामुळे गायचा . प्रश्न नव्हता. मनातून कुठेतरी बारमध्ये असं गाणं म्हणणं तिला आवडलं नव्हतं पण शिक्षण अपुरं राहिल्यामुळे चांगली नोकरी मिळणं दुरापास्त होतं. सध्याच्या परिस्थितीत पोट भरण्यासाठी तिला ती नोकरी करणं गरजेचं होतं..

शेट्टीचे बरेच अनैतिक धंदे होते.. एखाद्या कोळ्याने विणलेल्या जाळ्यात त्याची शिकार अडकत जावी अगदी त्याच प्रकारे कळत - नकळतपणे मनाविरुद्ध ती सगळ्या दुष्टचक्रात गुरफटत गेली... ज्या अनैतिक गोष्टींचा तिरस्कार ती करत होती .. तिचं अनैतिक वाट तिला आयुष्यभर चालावी लागणार होती.. नियतीने तसंच योजलं होतं.

तिने चाळीतलं घर सोडलं.. आईची इच्छा नव्हती घर सोडायची .. पण इलाज नव्हता. ती जाणून होती, अरु आपल्याला शोधत आपल्या घरापर्यंत येईल .. ते एक महत्वाचं कारण घर बदलण्याचं होतं.. अनैतिक धंद्यात पडताना तिने नाव बदललं .. जुनी ओळख पुसून टाकली..

कधीतरी तिने पेपरात वाचलं होतं.. अरुण्या नवोदित शास्त्रीय गायिका म्हणून उदयास येत होती.. तिला मनोमन त्याचा आनंद झाला...

काळ पुढे निघालेला ... आईही दिवसेंदिवस पोक्त दिसू लागलेली .. अचानक तिच्या माथ्यावरचे केस पांढरे होऊ लागलेले .. रडणं नाही, हसणं नाही, बोलणं नाही , कुठलीही तक्रार नाही .. तिची माया जणू मूक झालेली. तिला जाणवलं आई थकली आता ..!

__ आणि एक दिवस रात्री शांत झोपलेली आई सकाळी उठलीच नाही. झोपेतच गेली ती हार्ट ॲटकने..!

जुन्या वस्तीत शेजारच्या खोलीत राहणारा चिमुरडा संजू , कवी यशवंत यांची शाळेत शिकवलेली कविता ,

"आई'  म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी
स्वामी तीनही जगाचा आईविना  भिकारी.."

सुरेल पण काळजाला घर पाडेल अश्या सुरात गायचा .. बिचाऱ्याची आई लहानपणीच वारलेली .. त्याच्या आवाजातली ती कविता ऐकताना ती नेहमी स्फुंदू लागायची... काही केल्या तिचं रडणं थांबायचं नाही.

मात्र आज तिची आई खरोखरच तिला सोडून गेली तर अश्रूचा एक टिपूस ही तिच्या डोळ्यात उभा राहिला नाही.

आई गेली.. सोडून गेली आपल्याला... कायमची ..! मेली.. वारली.. संपली.. म्हणजे नक्की काय झालं..?

आपल्या लेखी ती कधीच मेली होती .. बऱ्याच वर्षापूर्वी .. . आपण मारलं तिला आपल्या मनात .. दूर लोटलं आपल्यापासून .. आईने कधीच तक्रार केली नाही.. आकाशातला नभ बनून मायेची सावलीच धरली तिने आपल्या माथ्यावर...!

बऱ्याच काळापासून पायात रुतून बसलेल्या काट्याने वर उमलून येऊन चालताना अचानक ठणका द्यावा असं तिला झालं.

स्वतःला सावरायला ती बालपणीच शिकली होती... मात्र अरूण्या आठवली तिला आई गेली तेव्हा... दुधाच्या सायीसारखी नितळ , पांढऱ्या शुभ्र दंतपंक्तीची, निरागस हास्य छटेची अरु..!

तिने अरुलाही आपल्या मनातून पुसून टाकायला सुरुवात केली.

पुढे चंद्या तिच्या जीवनात आला. तोही तिच्यासारखाच गांजलेला..!!

त्याच्या सहवासात आईच्या, अरुच्या आठवणी पुसट होऊ लागल्या. त्याने तिला खूप वेळा विनवलं, सगळं सोडून देऊन एकत्रित जीवन व्यतित करण्यासाठी.. मात्र तिने ठाम नकार दिला.. तिला कुणाच्यात गुंतायचे नव्हते..

शेट्टीच्या अनैतिक धंद्यात सहभागी होत ती निबर होत चालली होती.. तिच्या संवेदना मृत होत चालल्या...!

शेट्टीची बरीच हॉटेल आणि लॉज होती.. नकळत्या वयातले तरुण - तरुणी तारुण्याच्या धुंदीत प्रेमाचे रंग उधळण्यासाठी तिथे येतं..

तरुण-तरुणी दोघे आत रुममध्ये गेले की थोड्या वेळाने डुप्लीकेट चावीने रुमचे दार उघडून तोतया पोलिस बनून खोटी धाड टाकायची. त्यांना घाबरवायचे..

बदनामीच्या भीतीने रुममधले कपल आपल्या जवळचे पैसे, मोबाईल , दागिने त्यांच्या पुढ्यात टाकायचे...

त्यांना लुटूनही पुढे त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा शेट्टीचा आणि त्याच्या टोळीचा धंदा जोरदार चालेला.. त्यात काही भ्रष्ट पोलिसही सामिल होते.

आठ दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.

तोतया पोलिस बनून तिने त्यादिवशी एका रुममध्ये धाड टाकली. नेहमीप्रमाणे खोलीत सापडलेल्या तरुण-तरुणीचं ब्लॅकमेलिंग सुरु झाले..

दोघेही निरागस दिसत होते.. चांगल्या घरातले वाटत होते.. आमचं प्रेम आहे एकमेकांवर असं छाती फोडून सांगत होते... खूप घाबरलेले .. बावरलेले.. होते ..

तिने ओळखलं , दोघेही मुरलेले नाहीत .. अजाणपणे , नकळत्या वयात रस्ता चुकलेत...

ती कुणीही समुपदेशक नव्हती की एखादी समाजसेविका .. तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं..

मात्र तिच्या लक्षात राहिली गयावया करणारी ती तरुणी..
दुधाच्या सायीसारखी नितळ, शुभ्र .... तिच्या चेहऱ्यावरची ती इनोसंट छटा ...!

तिला क्षणभर अरु आठवली.

नेहमीप्रमाणे लॉजमध्ये सापडलेल्या तरुण-तरुणीचं शेट्टीच्या टोळीकडून ब्लॅकमेलिंग सुरू झालं...

ती तो प्रसंग नंतर विसरूनही गेली.

चार दिवसांपूर्वी सकाळी दारात पडलेले वर्तमानपत्र तिने उचललं..

समोरचं पान उघडलं ... हेडलाइनमध्ये बातमी होती..

" सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अरुण्या सुखदेव यांच्या
मुलीची सायबर ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या ..!'

बातमी मध्येच चौकटीत मायलेकींचा फोटो..!

तिचे हात - पाय थरथरू लागले... सगळं उलटं दिशेने फिरतयं असं तिला वाटू लागलं.

आठ दिवसांपूर्वी शेट्टीच्या लॉजमधली ती तरुणी तिच्या डोळ्यासमोर आली.

दुधाच्या सायीसारखी नितळ.. शुभ्र दंतपंक्तीची , तिच्या चेहऱ्यावरची ती इनोसंट छटा ...!!

अरुण्याची लेक ...लाडकी लेक ..!

आपल्या हातून भयंकर गुन्हा घडल्याची जाणीव तिला झाली. तिच्या गळ्यात आवंढाच आला.

गेले चार दिवस तिचं मन कशात लागत नव्हतं... चारही रात्री निद्रेने तिच्याशी वैर धरलेलं..

अरुण्याला जेव्हा समजेल की, आपल्या लेकीच्या मृत्यूमागे आपल्या प्रिय मैत्रिणीचा हात आहे... तेव्हा काय वाटेल तिला...??

ती समोर आली तर ओळखेल आपल्याला..? काय सांगणार आपण आपल्याबद्दल तिला..??

हे सांगणार की, मी देहविक्रेय करते, ब्लॅकमेलिंग करते, चंद्यासारख्या माणसांचे जीव घेणाऱ्या गँगस्टरसोबत रत होते..??

काय विचार करेल ती आपल्याबद्दल..??

" का वागतात गं माणसं अशी..? एवढी कठोर , निर्दयी असू शकतात का गं माणसं...? काय दोष होता त्या एवढ्याशा पिल्लाचा..? अजून त्याला जगायचं होतं ना गं..??"

अरुण्याचे शब्द तिच्या कानात वाजू लागले. ओक्साबोक्शी रडणारी अरुण्या तिच्या डोळ्यासमोर आली.

अरुण्या तिच्यासाठी कोण नव्हती...?

तिचं निखाऱ्या खालचं बालपण रिझवणारी बालमैत्रिण, तिच्या वर दुधाच्या सायीसारखं नितळ, शुभ्र प्रेम करणारी मैत्रीण नव्हे तर जणू पाठची बहिण .. तिच्या आयुष्याच्या वाळवंटातली ' ओॲसिस ' होती अरुण्या... तिच्या मनातली लहानसी गौरी माता होती अरुण्या ....!

तिलाही अरुण्या सारखंच बनायचं होतं... गायिका बनायचं होतं.. नाही .. नाही.. तिला अरुण्याचं व्हायचं होतं...

ती उठली. चंद्या अजूनही पलंगावर पसरलेला होता... तिला त्याच्या लोभस भासणाऱ्या चेहऱ्यावर ओठ टेकवावेसे वाटले... मात्र तिने तो मोह टाळला.. तिला ओढून , खेचून नात्यात गुंतवणारी कुठलीच भावना नकोशी वाटली.

उघड्या खिडकीतून तिने पाहिलं.. चंद्राची कोर अस्ताला चालली होती. तिला तहान लागली. फ्रिजमधून पाण्याची बाटली तिने काढली .. टेबलवरच्या ग्लासात पाणी ओतले... टेबलवरचे वर्तमानपत्र तिने छातीशी धरले. डोळ्यांतून दोन अश्रू तिच्या गालांवर घरंगळले.

तिने टेबलवरचे गोळ्यांचे पाकीट उचलले... झोपेच्या गोळ्यांचे..!

__सगळ्या गोळ्या ग्लासात ओतल्या अन् तो ग्लास तिने शांतपणे ओठांना लावला..

ती पलंगावर चंद्याच्या शेजारी पहुडली...

बाहेर गार वारा सुटलेला .. झुंजूमुंजू होऊ लागलेलं...

__ आणि तिला शांत निद्रा येऊ लागलेली... अगदी शांत...!

समाप्त..!

धन्यवाद...!

©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com
__________________________________________
( टिप - सदर कथा काल्पनिक असून कथेचा वास्तविक जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. )

_________________XXX_________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑह ! वाईट वाटले वाचून . नायिका आणि तिच्या आईची सासेहलपट बघून . नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही हे खरे

बाकी बऱ्याच दिवसांनी तुझे नाव दिसले कथा विभागात . छान

काय म्हणू?
वाईट वाटलं वाचून
लिखाण छानच आहे

गुन्हेगारी विश्वात छोट्यांची शोकांतिकाच असते. त्याचं जगणं मरणं सगळं मोठ्या भाईसाठी.
कुठेतरी वाटत राहतं माणूस वाईट नाही त्याला परिस्थिती वाईट बनवते. अशा परिस्थितीचा विरोध करणारे लोक खरच खूप संयमी असतात. ते त्यातून बाहेरही पडत असतील.
करुण कथा.

वाईट वाटलं.

तिला दुहेरी वाईट वाटलं , एक तर अरुण्याला दुःख झालेलं त्याचं आणि दुसरं, आपल्याला रडू का फुटलं नाही ह्याचं...?>>> खूपच सवेंदनशील.

खूप छान कथा. अगदी मन लाऊन वाचली..
आकाशातला नभ बनून मायेची सावलीच धरली तिने आपल्या माथ्यावर>> हे वाक्य विशेष आवडलं.

धन्यवाद जाई, किल्ली, दत्तात्रेयजी, शर्मिलाजी, केशवकूल, आशू ..!

जाई , हो गं मला पण खूप दिवस काही लिहिलं नाही म्हणून चुकचुकल्यासारखं वाटत होतं.

दत्तात्रेयजी >> तुमच्या मताशी अगदी सहमत.. एका नातेवाईकांच्या मुलाने चुकीचा रस्ता धरल्याने कुटुंबाची झालेली वाताहत पाहिली होती.

आशू खूप छान वाटलं तू मन लावून कथा वाचल्याचं वाचून..!

कथा चांगली पण फार वाईट वाटलं.
असेही बरेच लोकं पाहिलेत ज्यांनी आयुष्यभर आशेवर राहून कष्टच केले पण त्यांचे अच्छे दिन आलेच नाहीत.
त्यामुळे वास्तववादी वाटली कथा.

भारी..
मोठी म्हणून सावकाश वाचेन विचार करून ठेवली होती.
पण आता वाचायला घेतली आणि एका दमात वाचली. चित्रपटासारखी झरझर डोळ्यासमोर सरकत गेली.
पेशन्स दाखवलेस तर कादंबरी लिहीशील..
पण राहू दे, हेच चांगले Happy

झकासराव धन्यवाद ..!

ऋन्मेष धन्यवाद ..!

पेशन्स खरंच नाही माझ्याकडे .. हि कथाच काही भागात लिहायची होती पण नाही लिहिली कारण जास्त खेचल्या सारखी होईल म्हणून .( कदाचित वाचकांना जास्त लांबल्या सारखी वाटू हि शकेल ..)

कादंबरी नाही पण काही भागांची एखादी दिर्घकथा लिहायची इच्छा मात्र आहे.

ही कथा छोटी असली तरी परिणामकारक झालेली आहे.
दीर्घकथा आणि कादंबरी लिहायचे पोटेन्शियल पण आहे या कथेत.
लिही नक्की लिही. तुझ्या सगळ्या ईच्छा पुर्ण होवोत. पुढील लिखाणास खूप खूप शुभेच्छा.

रूपाली ताई . मला "प्रायश्चित्त" कथा लिहिण्याची प्रेरणा इथून मिळाली म्हणून आभार.
पेशन्स खरंच नाही माझ्याकडे ..>>>+१
सेम हिअर.
लिहिले तरी प्रॉब्लेम,,, नाही लिहिले तरी प्रॉब्लेम!

रोहिणी , शुभेच्छा पोचल्या.. एखाद्या जिवलग मैत्रिणीने शुभेच्छा द्याव्यात तसं वाटलं वाचताना..!

ऋन्मेष , वर मिळाला बरं..!

केकू , ही कथा वाचून तुम्हांला 'प्रायश्चित ' कथा लिहायला प्रेरणा मिळाली .. असं लिहिणं म्हणजे निव्वळ तुमच्या मनाचा मोठेपणा आहे .. खरंतर तुमचं वाचन भरपूर आहे.. तुमचा लेखनाचा उरकही जबरदस्त आहे.. तुमची एखादी कथा वाचल्यावर वाटते, हे कसं सुचलं असेल लेखकाला तेवढ्यात तुमची दुसरी कथा हजर असते समोर..
तुमच्या सारख्या विज्ञाननिष्ठ वाचक / लेखकाकडून प्रेरणा घ्यायला हवी लेखनाची खरंतर ..!

माझेमन धन्यवाद ..!

उर्मिला धन्यवाद..!

छान ओघवते लिहिले आहे.
आवडली कथा. वाईट वाटले. एखाद्या कादंबरी सारखी वाटली कथा.
पुलेशु