वेश्याव्यवसाय

Submitted by प्रकाश घाटपांडे on 2 December, 2024 - 08:36
वेश्याव्यवसाय

वेश्याव्यवसाय
मध्यंतरी अमृता फडणवीस यांनी एक सनसनाटी विधान केले. माध्यमांनी त्याला चटपटीत प्रसिद्धी ही दिली होती.
"वेश्या व्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा" . जर्मनीसारखेच भारतातही वेश्या व्यवसायाकडे आदराने पहावं असं त्यांनी म्हटलंय. देहविक्रय हा पुरातन व्यवसाय आहे. देहविक्रय करणाऱ्या महिलांमुळेच समाजात बॅलन्स टिकून आहे. देहविक्रय करणाऱ्या महिला या समाजाच्या अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे या महिलांना समाजात मानाचे स्थान मिळायला हवे हा अमृता फडणवीस यांचा मुद्दा मध्यंतरी एका चर्चा पीठावर मी मांडला होता त्यावर एका स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्तीनी हा व्यवसाय अमृता किंवा त्यांच्या बिरादरीतील महिला प्रोफेशन म्हणून स्वीकारतील का? असा प्रश्न उपस्थित केला. खर तर अशा विषयांवर अनेक जण मौन राखणॆ पसंत करतात अमृता फडणवीस यांनी तो विनासंकोच मांडला या बद्दल मला त्याचे कौतुक वाटले. अशा प्रकारचे विचार दुर्गा भागवत यांनीही पुर्वी मांडले होते. दुर्गाबाई भागवत यांना “साहित्य अकादमी” पुरस्कार मिळाल्याबद्दल एक सत्कार समारंभ कुलाबा येथे एका महिला संघटनेने आयोजित केला होता.या कार्यक्रमात त्यांनी एक अजब वक्तव्य केले होते.”मी तमाशा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले ते केवळ मानसन्मानासाठी नव्हे तर तमासगिरांचे ,आणि विशेषत: त्यातील स्त्रियांचे जीवन कळावे म्हणून,त्यांचे दु:ख समजावे म्हणून,वेश्यांना आपण बदनाम समजतो,मात्र वेश्या हा समाजाचा एक अत्यावश्यक भाग आहे.सांसारिक जीवन जराही खिळखिळे झाले तर पुरुष अतृप्तीच्या मोकळ्या वाटांवर मोकाट सुटतो. त्याच्या वासनांची पूर्तता करून वेश्या एक प्रकारे समाजाचा तोल सांभाळत असतात.वेश्या व्यवसाय अशा रीतीने समाजाचे रक्षण करतो.डॉक्टर इंजिनिअर प्रमाणे त्याला प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे.
गोलपीठा” या प्रकाशन सोहळ्यात दुर्गाबाई भागवत प्रमुख पाहुण्या होत्या.भाषण करताना त्यावेळी त्या म्हणाल्या की,
“घराला जशी संडासबाथरूमची गरज असते,त्याचप्रमाणे समाजस्वास्थ्यासाठी समाजाला वेश्या व्यवसायाची गरज आहे.परंतु वेश्यांना समाजाने सामाजिक प्रतिष्ठा द्यायला पाहिजे,कारण ती समाजाची गरज भागवते.”
दुर्गाबाई भागवत यांच्या उपरोक्त भाषणांचा राजा ढाले यांनी त्यांच्या भाषणात खरपूस समाचार घेतला होता. ‘वेश्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्या,कारण ती समाजाची गरज भागवते,
असं म्हणणाऱ्या भागवत बाईंना वेश्यांना वेश्याच ठेवायचं आहे. हा त्यांचा पतितोद्धार असं ज्यांना वाटतं त्यांनी स्वत: हा धंदा का करू नये?
समाजाच्या लैंगिक जाणीवांचे व्यवस्थापन करणार्‍या साहित्यात र.धों. कर्वे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल आख्ख आयुष्य त्यांनी हा कार्यासाठी खर्च केले आहे.
र.धों.कर्वे वेश्याव्यवसाय या आपल्या पुस्तकातील प्रस्तावनेत लिहितात
"प्रस्तुत लेखकावर वेश्यावृत्तीचा पुरस्कार करण्याचा आरोप अनेकांनी केल आहे आणि त्यांत थोडेबहुत तथ्यहि आहे. परंतु तो पुरस्कार केवळ समाजसुखा- च्या दृष्टीने आहे, वेश्या ही एक उत्तम संस्था आहे अशा विश्वासाने नव्हे. पूर्वी सुखी असलेल्या समाजांनी आज नीतिवाजीच्या आहारी जाऊन अनेकांना काम- तृप्ति दुर्लभ केली आहे. ती सुलभ झाल्याशिवाय समाज सुखी होणें शक्य नाही. कृत्रिम कर्तव्यांपुढे अन्नाची परवा न ठेवणें हाच सद्गुग मानल्यावर कामतृप्तीला अजीबात फाटा देण्याचा प्रयत्न झाल्यास नवल नाही, परंतु ज्यांना निसर्गनियमांचे थोडेबहुत ज्ञान आहे, त्यांना यांत भूषण वाटणार नाही, आणि ज्याप्रमाणे सर्वांना अन्न मिळाले पाहिजे आणि तें खायला वेळ मिळाला पाहिजे, हें आतां लोकांना हळूहळू कळूं लागले आहे, आणि यामुळेच समाजवाद उत्पन्न झाला आहे, त्याचप्रमाणे कामतृप्तीचाहि हक्क सर्वांना असला पाहिजे हैं जेव्हा लोकांना कळूं लागेल, त्या वेळी समागमावरचे फालतू निर्बंध नाहीसे होतील आणि समागम सुलभ होऊन समाज सुखी होईल. परंतु ते निर्बंध जोपर्यंत नाहीसे झाले नाहीत तोपर्यंत समाजाला वेश्यांची गरज आहे. वेश्यांना मागणी नाहीशी झाली म्हणजे त्या आपोआपच नाहीशा होतील, परंतु तेथपर्यंत आणि नंतरहि त्यांना आपला धंदा करण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो त्यांना सरळपणें करूं न देऊन त्यांना छळण्याचा जो प्रयत्न नीतिवाज लोक करीत आहेत तो अत्यंत निंद्य आहे आणि त्यांत समाजाचें हित नाही. मात्र वेश्यांनाहि है घडसें कळत नाही आणि त्यांना देखील आपण पाप करतों असेंच वाटतें. ही भावना ज्यांना आहे, आणि एकाच पुरुषाला चिकटून राहण्यांतच ज्यांना मोठेपणा वाटतो, त्या खऱ्या वेश्याच नव्हत. त्यांत कमीपणा न वाटतां मोकळ्या मनाने ज्या धंदा करतात त्याच खऱ्या वेश्या, आणि त्यांचेवर नीति- बाजांच्या प्रचाराचा विलकुल परिणाम होत नाही. अशाच वेश्यांचा समा- जाला उपयोग आहे आणि याच दृष्टीने येथे या प्रश्नाचा विचार केलेला आहे."
१ जून १९४०.
र. धों. कर्वे
पुस्तकात वेश्याव्यसायाबद्दल जागतिक स्तरावरील माहिती दिली आहे.
1) प्राचीन हिंदुस्थान
2) युरोप
3) नंतरची परिस्थिती
4) वेश्याबंदीची मोहिम
5) कायदेबंदीचा सविस्तर विचार
6) कायदेबंदीचे प्रत्यक्ष परिणाम
7) नियंत्रण कसे असावे
8) वेश्यावृत्तीचा नैतिक विचार
अशा विविध प्रकरणातून सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक,वैज्ञानिक पातळींवर विविधांगी विस्तॄत विचार मांडले आहेत. पुस्तकात खर्‍या व खोट्या वेश्या हे एक प्रकरण पुरवणी म्हणून जोडले आहे. त्यात ते म्हणतात,"
कायद्याचा त्रास होतो काय तो खर्‍या वेश्यांना मुख्यतः यांचाच विचार केलेला आहे. त्यांच्याबद्दल कोणासही सहानुभूती वाटत नाही आणि ती वाटल्याचे ढोंग जे सोंवळे लोक करीत असतात, त्यांचा मुख्य उदेश वेश्या नाहीसा करण्याचाच असतो. हा उद्देश सफल झाल्या विवाहसंस्थेला अनंत धोका आहे हे अशा लोकांस कळत नाही. प्रस्तुत लेखकाला विवाहसंस्थेबद्दल मोठाला आदर नाही, परंतु वेश्या आणि विवाहसंस्था यांचा अत्यंत निकट संबंध आहे ही गोष्ट बाजूला ठेवली तरी वेश्यांना धंदा करण्याचा हक्क आहे आणि तो कायद्याने सरळपणाने कबूल केला पाहिजे आणि वेगवेगळ्या मिषाने त्यांना त्रास देणे हा अन्याय आहे, हे समजण्याइतकी न्यायबुद्धी लोकांत उत्पन्न झाली तरी पुष्कळ आहे. लोकांत न्यायबुद्धी नसते असे नाही, परंतु पारंपरिक बुरसटपणामुळे ती लुप्त झालेली असते, आणि तिचा कांही उपयोग होत नाही ही गोष्ट लोकांच्या नजरेस आल्यास ती कदाचित् जागृत होईल"
र.धों. देहविक्रय शब्द वापरत नाहीत. कारण वेश्या शरीराचा विक्रय करत नाहीत. शरीर भाड्याने देतात. आजही वेश्यांसाठी काम करणार्‍या अनेक संघटनांचे तेच म्हणणे आहे. वेश्यांचे ही तेच म्हणणे आहे. आता सेक्स वर्कर हा शब्द प्रचारात आला आहे. कारण त्यांना वेश्या म्हणायला कसंतरीच वाटते. वेश्या पेक्षा सेक्सवर्कर शब्द जरा प्रतिष्ठा असलेला वाटतो. त्यांचे प्रश्न पुन्हा वेगळे आहेत. तो पुन्हा एक स्वतंत्र विषय आहे. मागे वेश्याव्यवसायची नैतिकता या एका पोस्ट मधे मी काही भाग पुर्वी मांडला होता. असो.
सगळे वाचले की पुन्हा र.धों हे काळाच्या किती पुढे होते हे जाणवत राहते.
मुकुंद टांकसाळे यांनी https://radhonkarve.com/ या संकेतस्थळावर पुस्तक उपलब्ध करुन दिले आहे. अक्षरस्पर्श ग्रंथालयाचे दुर्मिळ पुस्तक ठेवल्याबद्दल आभार.
प्रकाशक- र.धों. कर्वे
राईट एजन्सीज, नवी भटवाडी, गिरगांव मुंबई
प्रकाशन काल-1940
पृष्ठे- 166
किंमत- ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार गंभीर विषय आहे.
वेश्याव्यवसायामुळे अबाधित रहाणारे समाजस्वास्थ्य - पटते.

पण त्याचबरोबर असेही वाटते की ज्या स्त्रिया स्वखुषीने, ईझी मनी म्हणा (ईझी रिअली?) काहीही म्हणा म्हणुन जर हा व्यवसाय करत असतील तर ठिकच. पण ह्युमन ट्राफिकिंग हे भयाण वास्तव आहे ज्याचे, मूळापासून निर्मूलन व्हायला हवे.

अजुन एक समजा वेश्याव्यवसाय बंद झाला तर सेक्स टॉइज किंवा अन्य काही मार्गांनी (उदारमतवाद येइल का, अनाठायि शुचितेचा बाऊ निघून जाणे) मार्गांनी लैंगिक उपासमारीचा निचरा होइल का?

अजुन एक समजा वेश्याव्यवसाय बंद झाला तर सेक्स टॉइज किंवा अन्य काही मार्गांनी (उदारमतवाद येइल का, अनाठायि शुचितेचा बाऊ निघून जाणे) मार्गांनी लैंगिक उपासमारीचा निचरा होइल का?>>>>> काही अंशी होईल. जसे की हस्तमैथुनाने होतो. परंतु ती शेवटी पर्यायी व्यवस्था आहे. मूळ शमन उपलब्ध नसल्याने असलेली व्यवस्था. अश्वत्थामाला दिलेले पिठाचे दूध हे त्याला जोपर्यंत खर्‍या दुधाची चव समजत नसते तोपर्यंत चालून जात होती.
मी नुकताच वेश्यांच्या मिटिंगला जाउन आलो. त्याना लायसनिंग नको आहे. बाकी अमृता फडणवीस यांचे मुद्दे हवे आहेत. त्यांच्याशी गप्पा मारल्यावर अकॅडमीक चर्चा व वास्तव यातील फरक जाणवत राहतो. मी नुकतेच "वेश्यागमन" ही करुन आलो त्याचा अद्भूत अनुभव त्यांना सांगितला. फेसबुकवरही मी तो टाकला आहे. सर्व डिटेल्स दिले नसले तरी गाभा दिला आहे. कधीतरी उस्फुर्ततेच्या ओघात इथेही तो टाकेन.
या पुस्तकाच्या दीर्घकाळ मी शोधात होतो.

राजा ढाले यांना अनुमोदन.
गटारं साफ करणारे समाजाचा function at() { [native code] }यावश्यक भाग आहेत, त्यांना सन्मान द्या.
संडास साफ करणारे समाजाचा function at() { [native code] }यावश्यक भाग आहेत. त्यांचा सत्कार करा.
ही अशी लिस्ट मोठी आहे.

ते जे करताहेत ते काम आपण करू शकत नाही, पण त्यांनी करत रहावे म्हणून त्यांना प्रोत्साहन. त्यांच्या मनाला गुदगुल्या व्हाव्यात आणि हेच काम करत रहावे म्हणून त्यांच्या कामाचा गौरव ही बदमाषी आहे असे मी म्हणणार नाही. कारण बदमाषीच्या पुढचा नीच शब्द या क्षणी माहिती नाही.

छान विषय आहे. पण फार कॉम्प्लिकेटेड. दोन्ही बाजूनी विचार करताना मनात प्रश्नच जास्त येतात.

वेश्याव्यवसायाला मान्यता मिळाली आणि जास्तीत जास्त स्त्री पुरुष आपल्या मनाने या व्यवसायात उतरले तर जोर जबरदस्तीने कोणाला वेश्या बनवायचे प्रमाण कमी होईल का? की लोक बिनधास्त वेश्यागमन करू लागल्याने डिमांड वाढेल तसे जास्त अल्पवयीन मुलेमुली यात ओढले जातील?

वेश्या नसतील तर लैंगिक निचरा कसा होणार असे म्हटले जाते पण असे किती सरळमार्गी मध्यमवर्गीय पुरुष वेश्यागमन करतात. मोजकेच असावेत. म्हणजे मला तरी वाटते की अफेअर करण्यापेक्षा वेश्यागमन करायला जास्त डेअरिंग लागते. सर्वाँना इच्छा असूनही नाही जमत, शक्य होत.
पण तरीही भावनांचा निचरा न होताही बरेच जण सुखी असतातच. शेवटी तुमच्या अपेक्षा किती आहेत यावर सुद्धा हे अवलंबून आहे. लहानपणापासूनच मानसिकता अशी असेल की आयुष्यात एका व्यक्तीशी पुरेसा सेक्स करायला मिळाला तरी ठिक तर काही उपासमार होते असे वाटत नाही.
त्यामुळे कदाचित सेक्स सहज उपलब्ध झाला तर अपेक्षा वाढतील आणि जास्तीत जास्त हवासा वाटू लागेल असेही होऊ शकते. एकदा चटक लागली की कोण निचरा करून थांबेल. व्यसन लागणार याचे.

या व्यवसायात उद्या आपल्या नात्यातले कोणी उतरले तर आपल्याला आवडेल का हा प्रश्न देखील मनात येतोच. मग पुन्हा छे बाई आमच्यात नाही असे संस्कार म्हणायचे तर हा पुन्हा दुटप्पीपणाच झाला. आपल्या घरातील मुली सुरक्षित राहायला वेश्या समाजात असाव्यात हा तर अजून हलका विचार झाला.

जोर जबरदस्ती या व्यवसायात कोणी उतरवले जाणे बंद होत नाही तोपर्यंत मी तरी या व्यवसायाला मान्यता द्यायचे समर्थन करू शकत नाही.

मी आंतरजालावर उपक्रम मायबोली, ऐसी अक्षरे मिसळपाव अशा संकेतस्थळांवर 2007 पासून सामाजिक विषयांवर विशेषत:फलज्योतिष विषयावर लिहित आलो आहे. मानवी लैंगिक नाती व निती हा विषय समाजात नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. वरील चर्चापीठांवर आमच्या याही विषयांवर चर्चा होतात. त्यात माझे मित्र धनंजय यांनी लिहिलेला वेश्याव्यवसायाची नैतिकता हा विषय 2008 साली चर्चेला घेतला होता.
हा लेख व त्यावरील चर्चा दोन्ही अतिशय वाचनीय आहे. सामाजिक क्षेत्रातील लोकांनी त्या आवर्जून वाचाव्यात म्हणुन मी लिहित आहे.चर्चेत माझ्याही काही प्रतिक्रिया आहेत. . 2008 चे असल्याने प्रतिक्रियेतील काही लिंक आता काम करीत नाहीत.
वेश्याव्यवसायाची नैतिकता
हा लेख व त्यावरील चर्चा अतिशय वाचनीय आहे. .चर्चेत माझ्याही काही प्रतिक्रिया आहेत. 2008 चे असल्याने प्रतिक्रियेतील काही लिंक आता काम करीत नाहीत. पण वाचल्यावर कळेल.
लेख मी त्या क्षेत्रातील काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांना व संस्थांना ईमेल द्वारे पाठवला. त्यातील मीना सेशू यांनी त्यावर VAMP ( वेश्या अन्यायमुक्ती परिषद) या गटाला पाठवल्या. तिथल्या सेक्स वर्कर्स नी त्यावर काही प्रतिक्रिया ध्वनीफितीत पाठवल्या आहेत .लेख तळागाळातील सेक्स वर्कर्स पर्यंत पोहोचला. तो वाचून समजावून घेवून त्यावर त्यांनी चर्चा केली व समन्वयकाद्वारे प्रतिसाद पोहोचवला
श्री.के क्षीरसागर ( 1901 ते 1980) यांचे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले लैंगिक नीती आणि समाज हे ही पुस्तक वाचनीय आहे. र धों कर्वेंचे ते समकालीन आहेत. लैंगिकता व नैतिकता यातील परस्पर संबंधांचा तत्कालीन उहापोह करणार्‍या त्यांच्या अनेक लेखांचा संग्रह त्यात आहे. त्यामुळे वेश्याव्यवसायाबद्दलच उल्लेखही त्यात आहेत.

पुढील धाग्यात ३ ऱ्या पानावर जा , तिथे सहेली तिज्जन हा आयडी घेउन कोणीतरी कविता टाकल्यात. त्या कविता मला तरी विचित्रच वाटलेल्या तेव्हा.
http://aisiakshare.com/node/4043?page=2
हा आय डी नंतर परत दिसला नाही. माझी मात्र त्याच्याशी बोलायची हिंमत झाली नसती आणि नसतीच - एवढे खरे.

"बुधवार पेठ" हा शब्द तसा फार बदनाम झाला आहे. बर्‍याचदा तो सांकेतिक अर्थाने वापरला जातो. मी होस्टेल मधे असताना टारगट पोरं म्हणायची, "बुधवार पेठे"त जायला सुद्धा डेअरिंग लागतं येर्‍यागबाळ्याच काम नव्हे." "बुधवार पेठ" विषयी माझ्या मनात दीर्घकाळ भय होत. तिथून गल्लीबोळातून जाताना एखादा नवखा असेल तर तेथील वेश्या त्याच्यावर झडप घालून त्याला आत नेतात व "नागडा" करुनच बाहेर पाठवतात अशी काहीतरी भयचित्रे काही लोकांनी तयार करुन ठेवली होती. कधी काळी त्या भागातून जायचा प्रसंग आलाच तर मी जीव मुठीत धरुन जात असे. भूक लागल्यावर हॉटेल मधे जाउन वडा सांबार खाउन आलो असे ज्या सहजतेने आपण सांगतो त्याच सहजतेने "बुधवार पेठे" त जाउन आलो असे सांगणारे मला भयचकीत करायचे.तसा मी शाम_ळू, "त्या" अर्थाने कधी बुधवार पेठेत आतापर्यंत गेलो नाही. इथून पुढे जाण्याची शक्यता तर फारच कमी. तेवढी खाज नाही कि डेअरिंग नाही हा प्रश्न आहे खरा. माहित नाही काय आहे ते. हे सगळं का आठवतय मला तर नुकताच र.धों कर्व्यांच्या समाजस्वास्थ्य या विषयाला वाहिलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन समारंभाला गेलो होतो. त्यानिमित्ताने मुकुंद टांकसाळे, अतुल पेठे, विनोद शिरसाठ, प्रियदर्शनी कर्वे,कुमार केतकर या सर्वांनी आपले र.धों व लैंगिकता या विषयावर आपले विचार मांडले. रविवारच्या लोकसत्ता मधे ’रधों आणि स्त्री लैंगिकता ’ या लेखात डॉ. अंजली जोशी म्हणतात," रधोंचे विचार पेलणे तेव्हाही सोपे नव्हते आणि अजूनही नाही. पण आज रधों वाचताना वाटते, की त्यांचा प्रत्येक शब्द आजही तितकाच लागू आहे. त्यांची निरीक्षणे तितकीच अचूक आहेत. त्यांचा बिनतोड युक्तिवाद खोडून काढता येणे आजही कठीण आहे. आणि त्यांची कळकळ आजही तितकीच आतपर्यंत भिडणारी आहे. आजूबाजूला काळोख पसरला असताना विवेकवादाची मशाल त्यांनी समर्थपणे पेटती ठेवली. पण आज इतक्या वर्षांनंतरही गाभ्यातले बदल झालेच नाहीत. उलट, काही पावले आपण मागेच गेलो आहोत. आजही तसाच काळोख आहे. उलट, तो अजून मिट्ट झाला आहे. विवेकवादाची मशाल दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. ती पेटती ठेवण्यासाठी १०० वर्षांपूर्वीच्या समाजाला रधोंची जितकी गरज होती त्याहीपेक्षा जास्त गरज आजच्या समाजाला आहे." आपणही या संकेतस्थळा जरुर भेट द्या व समाजस्वास्थ्य चे पहिल्या पासूनचे "समाजस्वास्थ्य"चे मूळ अंक जरुर वाचा. मी सध्या तेच वाचतो आहे. आपला लैंगिक बुद्ध्यांक नक्की वाढेल.
https://radhonkarve.com/

योगायोग म्हणा, पण आजच ही बातमी‌ वाचनात आली.
https://apnews.com/article/belgium-sex-workers-social-protection-health-2f935f414572517d74a46c682419f20b
Starting Sunday, sex workers in Belgium will be able to sign formal employment contracts and gain labor rights on par with those in other professions in a legal breakthrough some call a “revolution.”

मी मराठी किडा वर वेश्यांच आयुष्य हा वृत्तपट पाहिला होता , तो शेअर करतोय. तुम्ही बाकी काही करु शकत नसला तरी त्यांच्याप्रति संवेदनशीलता ठेवा.
https://youtu.be/NIglFzYCE9U?si=1SaxRnpTztQSGqVZ

वेश्याव्यवसायाला विरोध करणारे पॉर्न बघत नसावेत अशी माफक अपेक्षा करावी का? का ही अपेक्षा करणे चूकीचे आहे? जस्ट वंडरिंग.

वेश्याव्यवसाय हे एक भयाण वास्तव आहे. यात स्वमर्जीने आलेल्या किती व जबरदस्तीने ढकललेल्या किती हा प्रश्न आहेच. ज्या जबरदस्तीने ढकलल्या गेल्या आणि दुसरा मार्ग नाही म्हणुन यात आहेत त्यांच्यासाठी ‘व्यवसाय’ म्हणुन मान्यता मिळाली तर त्यांना होणारे सरकारी त्रास थांबतील किंवा कमी होतील ही अपेक्षा असावी. त्यांच्याप्रती आदर/गौरव दाखवा म्हणजे आज जी हेटाळणी होतेय ती थांबवा ही अपेक्षा असावी.

>>>>दुसरा मार्ग नाही म्हणुन यात आहेत त्यांच्यासाठी ‘व्यवसाय’ म्हणुन मान्यता मिळाली तर त्यांना होणारे सरकारी त्रास थांबतील किंवा कमी होतील ही अपेक्षा असावी. त्यांच्याप्रती आदर/गौरव दाखवा म्हणजे आज जी हेटाळणी होतेय ती थांबवा ही अपेक्षा असावी.
अमेरिकेत काय स्थिती आहे ते माहीत नाही. सोशल सेक्युरिटी भरतात का? म्हातारपणी त्यांना सोशल सेक्युरिटी मिळते का वगैरे.

दुसरा मार्ग नाही म्हणुन यात आहेत >>> यातही स्वेच्छेने आल्या आहेत असा अर्थ निघत नाही. अशा स्त्रियांना पोट भरण्यासाठी कुठलेच साधन नसणे यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. पर्याय उपलब्ध असतील तर त्या वेश्याव्यवसायाकडे वळतील का ?

जेष्ठ साहित्यिक,विचारवंत,दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांनी साहित्यिक,लेखिका दुर्गाबाई भागवत यांची “गोलपिठा” या नामदेव ढसाळ यांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात हुर्ये उडवली होती.तो किस्सा त्यावेळी वर्तमानपत्रातून खूप गाजला होता,आणि महाराष्ट्रातील साहित्यिक सामाजिक परिप्रेक्षात देखिल तो दीर्घकाळ चर्चिला गेला.पुढे दुर्गाबाई भागवत यांनी या घटनेचा बदला घेतला. अगोदर आपापसातील बौद्धिक कुरापती असणार. हिशोब चुकते करणे. दुर्गाबाई म्हणजे रणरागिणी अवतार. आत्ता सुद्धा एका साहित्यिक चर्चेत मी अमृता फडणवीसांचा वर उल्लेखलेले मत व्यक्त करणारा व्हिडी ओ शेअर केला तेव्हा एका स्त्रीवादी साहित्यिकेने या व्हिडिओवर खालील प्रश्न उपस्थित केला होता
हा व्यवसाय अमृता किंवा त्यांच्या बिरादातीतील महिला प्रोफेशन म्हणून स्वीकारतील का? अजूनही हे मान्यवरांना पचवणे जड जातय. ही चर्चा मी सांगलीच्या वेश्या अन्याय मुक्ती परिषद या संस्थेला भेट दिली तेव्हा देखील केली होती. मोठी चर्चा झाली होती.

प्रघा, वरच्या पोस्टमधली माहिती अनावश्यक आहे.
दुर्गाबाई असोत किंवा कुणीही असोत त्यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे , त्याचा विरोध करणे हे चूक की बरोबर असा साधा मुद्दा आहे.

त्यांचे जुने हिशेब होते कि नव्हते वगैरे गोष्टींचा इथे काहीही संबंध नाही.

>>पुढे दुर्गाबाई भागवत यांनी या घटनेचा बदला घेतला. >> कसा घेतला?
कुणाला पडलेली नाहीये. आपली स्किन वाचवायला बदला घेतला आणि आपली कातडी बचाव वेश्या समाज स्वास्थ्य राखतात म्हणे! ग्लोरिफिकेशन!

मी सैनिकही ह्याच बकेट मधे टाकतो. ते आहेत म्हणून आपण आहोत म्हणे! अगेन ग्लोरिफिकेशन. कोण आणि का करतो ते उघड आहे.

प्रघा, वरच्या पोस्टमधली माहिती अनावश्यक आहे.>>>>मला ती पूरक वाटते. तुम्ही दुर्लक्ष करु शकता

>>पुढे दुर्गाबाई भागवत यांनी या घटनेचा बदला घेतला. >> कसा घेतला? >>>>आपापसात कुरघोड्या चालायच्या त्यांच्या. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असे वाद होते. विद्रोही साहित्याला त्यानंतरच प्रतिषठा येउ लागली

साधना, त्यांना व्यवसाय म्हणून लायसन्स असे नको आहे. पण सामाजिक मान्यता हवी व डिक्रिमिनिलायझेशन हवे आहे. म्हणजे घरगुती डबा जसा असतो तसे. हॉटेल चे लायसन्स नको पण खानावळ म्ह्णून घरगुती व्यवसाय मान्यता हवी असे काहीसे . मला ही ते जरा चमत्कारिक वाटते. सरकारी यंत्रणेचे फायदे हवे असतील तर सरकार मान्यतेचे नियमही पाळले पाहिजेत.

याच नाही पण कुठल्याही विषयावर ग्राउंडवरील सामजीक-आर्थिक परिस्थिती ध्यानात न घेता, व्हॅक्यूममधे समाजमाध्यमांवर कुठेतरी वाचलेले, मनोमन कल्पिलेले शतप्रतिशत आदर्शवादी व्यवस्थेचे विचार टंकणे फारच सोपे आहे. ते तसे असू नयेत हा काही आग्रह नाही. कोण किती डिल्यूजन्स कवटाळू शकतो हे प्रत्येकाच्या वैयक्तिक मानसिक असुरक्षीततांच्या तिव्रतेवर अवलंबून असते.

ह्या व्यवसायास अधिकृत मान्यता दिली तर बरेच काही चांगले सुद्धा घडवता येऊ शकते. आधार लिंक करत करत आता हळूहळू सर्व डीजिटलायझेशन झाले तसे हा एक ऐच्छिक व्यवसाय म्हणून शासन मान्यता मिळाली तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतील -
१) ऐच्छिक आहे की जबरदस्ती हे पडताळण्याची सोय असेल तर लैंगिक शोषण कमी होईल
२) कामगारांच्या हक्कासाठी विविध कायदे असतात त्यांचा लाभ घेत स्वतःच्या न्याय्य मागण्या मांडता येतील.
३) आता रोजचे पैसे कोठा मालकीण दर ठरवणार ते थांबून आर्थिक शोषण थांबू शकेल.
४) सर्वात महत्वाचे म्हणजे एकाच छत्राखाली अंमल बजावणी होत असल्याने वैद्यकीय निदान ठराविक कालावधी नंतर सक्तीचे करत ( जसे गाड्यांना पीयूसी ) एसटीडी चे वेळेत उपचार करणे शक्य होईल आणि सामाजिक स्वास्थ्य राखणे सोपे होईल.
५) जो ऐरणीचा मुद्दा आहे अल्प वयीन वेश्यांचा सहभाग तो सुद्धा ह्या नोंदणीकृत प्रोसेसमुळे आटोक्यात ठेवता येऊ शकेल.
६) त्यांना होणाऱ्या मुलांचे संगोपन आणि शिक्षण ह्यासाठी मनापासून प्रयत्न केले जातील आणि दूषित वातावरणात वाढून होणारे बाल गुन्हेगारीचे प्रमाण कदाचित कमी करण्यात यश मिळू शकेल.
७) अनैसर्गिक संभोगास कायद्याने कठोर शिक्षा असणे गरजेचे आहे त्यामुळे आता मुक मान्यता गृहीत धरली जाते त्यास वाचा फोडण्याचा/ नकाराधिकार अवलंबण्याचा मार्ग उपलब्ध असला तर अनेक मानसिक स्तरावर अत्याचार थांबू शकतील.

व्यवसाय म्हणणाऱ्या लोकांसाठी काही प्रश्न -
1. यात स्वखुशीने उतरणाऱ्या स्त्रिया व ढकललेल्या स्त्रिया यांचं गुणोत्तर काय?
2. तोटा झाला, बॉसशी पटत नाही, कलीग्ज आवडत नाही, पगार कमी आहे म्हणून हा ‘व्यवसाय’ सोडण्याची मुभा किती जणींना आहे?
3. नोकरी शोधताना मी शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईंकाना, मित्र मैत्रिणींना बिनधास्त रिझ्युमे फॉरवर्ड करू शकते, लिंक्डइनवर लुकींग फॉर जॉब स्टेटस टाकू शकते. या ‘व्यवसायाची’ जाहिरात ओपनली करणाऱ्यांचं प्रमाण काय आहे?
4. संघटीत/असंघटीत व्यावसायिकांना कुठल्याही कारणासाठी कुठल्याही ग्राहकाला सेवेच्या कुठल्याही स्टेजवर नकार देता येतो. फार फार तर आर्थिक नुकसान झेलावे लागते, ४ ग्राहक कमी येतात. या व्यवसायात ही मुभा आहे का?
5. जो व्यवसाय करताना मन, स्वप्नं, शरीर यांचा चुराडा होऊनही भविष्यातील कमाईची शक्यता १०१% डिमिनीश होत जाते असा व्यवसाय किती लोक निवडतात?
वेश्यांनी डिक्रिमिनलाईज करा याला पाठिंबा आहे. त्यांना तुच्छतेने वागवू नका याला पूर्ण सपोर्ट आहे. त्यांना दलदलीतून बाहेर पडण्यासाठी, त्यांचं जीवन सुसह्य होण्यासाठी जे करता येईल ते करूया. पण हा व्यवयाय नाही. हे क्रुर व निर्दयी शोषण आहे. हा लैंगिक भावनांचा निचरा नाही, कुणावरही अन्याय न करता तो निचरा म्युचुअल कन्सेंटने करता येतो. या व्यवसायात कुणालाही ढकललं जाणं हे समाजाचं अपयश आहे.

अमितव धन्यवाद. प्रतिसाद दिसला नव्हता काल. क्षमस्व.

या विषयावर पहिल्यांदाच प्रतिसाद देत आहे असे नाही.
अनेकदा मूळ समस्येवर बोट ठेवलं कि असा आक्षेप घेण्यात येतो कि , "म्हणजे आता ज्या स्त्रिया या व्यवसायात आहेत, त्यांच्या साठी काहीच करायला नको"

स्त्रियांना (काही अपवादात्मक परिस्थितीत पुरूष सुद्धा) मनाविरूद्ध अशा व्यवसायात ढकलले जाणे ही मूळ समस्या आहे. ज्या स्त्रिया नाईलाजाने स्वतःहून या व्यवसायात येतात त्या सुद्धा शोषणाच्या बळी असतात.
( पर्याय उपलब्ध असतानाही , परिस्थितीची बळी नसताना मनाजोगता व्यवसाय म्हणून या व्यवसायाचा स्विकार करणारी स्त्री आज तरी अपवाद असेल. त्यामुळे त्यावर विचार नको करायला. )

ज्या स्त्रिया आज या व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी किमान मानवी हक्काच्या जाणिवेतून उपाय करणे हे समाजाचे, सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी अमृता फडणवीसांनी ज्ञान नको द्यायला. अशा वक्तव्यातून या व्यवसायाचे उदात्तीकरण होत नाही ना हे कोण पाहणार ? त्या काही सर्वसामान्य आहेत असे नाही. एका माजी आणि आता भावी मुख्यमंत्र्याची, आजी उपमुख्यमंत्र्याची पत्नी आहेत. त्यामुळेच त्यांची ओळख आहे. एका मुख्यमंत्र्याची पत्नी म्हणून त्यांचे हे वक्तव्य मुख्यमंत्र्यांचे या बाबतीत असेच मत आहे का याबद्द्ल उत्सुकता निर्माण करते. त्यांची त्यावर कधीच प्रतिक्रिया ऐकीवात आलेली नाही.

एक स्वतंत्र व्यक्ती /एक स्वतंत्र्य स्त्री म्हणून त्यांना आवडीचा छंद हा व्यवसाय म्हणून त्या पदामुळेच स्विकारता आला. हे भाग्य अनेकींना नसतं. याची जाणिव त्यांच्या वक्तव्यातून दिसायला हवी होती.

( या आधीच्या सरकारांमधेही वेगळी मतं असणारे लोक जबाबदारीच्या पदावर होते असे नाही.)

आर आर पाटलांचं कौतुक झालं कारण त्यांनी डान्सबारमधील बारबालांच्या समस्या सोडवण्याऐवजी डान्सबारच बंद केले. त्या निर्णयावर सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या एका महिलेने कडाडून टीका केली होती. त्या नाईलाजाने या व्यवसायात येतात. त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी पोटावरच मारण्याचं काम पाटलांनी केलंय. त्यावर आर आर यांनी उत्तर दिलं होतं कि अनेक महिला धुणी भांडी, कचरा वेचणे, झाड लोट अशी कामे करून पोट भरतात. नाईलाज आहे म्हणून सगळ्याच या व्यवसायाकडे वळत नाहीत. त्यांच्या कडे गृहखाते असल्याने यातल्या अनेक मुली बांग्लादेशातून मुंबईत काम लावतो असे स्वप्न दाखवून आणलेल्या असतात आणि या धंद्यात ढकललेल्या असतात. पासपोर्ट शिवाय आलेल्या असल्याने आणि पोलिसांचं भय असल्याने सुरूवातीला त्या निमूटपणे ऐकतात. नंतर पैशांची सवय झाल्यावर त्या यातून बाहेर पडू शकत नाहीत. पण वय झाल्यावर त्यांना दुसरं कुठलंही काम जमत नाही आणि नंतरचं आयुष्य भयाण असतं. त्या निर्णयाला अनेक पदर होते.

डान्सबारच्या व्यवसायात वरीष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय नेते, बिल्डर्स, काळे धंदेवाले यांचे पैसे गुंतलेले होते. पनवेलला डान्स बारच्या शेजारी लॉजेस असत. तिथे या बारबालांना देहविक्रय करता यायचा. विशेष म्हणजे जो या डान्सबारचा मालक त्याचेच हे लॉज असायचे.

अर्थात आर आर पाटलांचा हा निर्णय धडाकेबाज होता. पण बारबालांना पर्यायी व्यवसाय देण्यात ते असमर्थ होते. यावरही अनेक लेख होते.
बेरोजगारांची संख्या लक्षणीय आहे. या सर्वांना सरकार काम देऊ शकत नाही. पण अशा बेरोजगारांना समाजात मान्यता नसलेले धंदे उपलब्ध असू नयेत हे शासनाचे कामच आहे.

रोजगार देऊ शकत नाही म्हणून नाईलाजाने गुन्हेगारी, टोळीयुद्ध, खंडणी , अपहरण, कॉण्ट्रॅक्ट किलर, ड्रग्ज अशा व्यवसायात तरूण गेले तर ते क्षम्य समजायचे का ? त्यांनाही मानसन्मान देऊन सुविधा देणार का ? असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. हे धंदे ही समाजातल्या काही व्यक्तींची गरज आहेत. या व्यवसायात सुद्धा ग्राहक आहेतच. वेश्या ही समाजाची गरज आहे हे गृहीतक इथे का लागू केलं जात नाही ? कारण त्या जीव घेत नाहीत. त्यांच्या धंद्यामुळे लोकांना धोका उत्पन्न होत नाही तोपर्यंत त्यांना समाजाची गरज म्हटले जाईल.

ज्या दिवशी वेश्याव्यवसायातली गुन्हेगारी स्वतःच्या मुली / बायका, सुना पळवून या व्यवसायात ढकलण्यापर्यंत जाईल आणि हतबलता अनुभवायला मिळेल त्या दिवशी ही मतं कायम असतील का ?

या क्षेत्रातील वेश्या अन्याय मुक्ती परिषदची कार्यकर्ती व पुर्वीची सेक्स वर्कर किरण देशमुख यांची न्युज रुम मधील विस्तृत मुलाखत पहा
https://youtu.be/QgYmUnwQQg0?si=CaCElqqM8wuXshj_

1) र.धों कर्वेंचे वेश्याव्यसाय हे पुस्तक https://radhonkarve.com/ इथून डाउन लोड करुन वाचा. वेश्या व वेश्याव्यसाय अशा नावाचे पुरुषोत्तम गोविंद नाईक यांचे अजून एक पुस्तक तिथे आहे. र.धों पेक्षा वेगळ्या धाटणीचे पुस्तक आहे. समकालीन आहे.
2) वेश्याव्यसायची नैतिकता हा मिसळपाव वरील लेख व त्यावरील चर्चा वाचा. लिंक वर आहेच
3) अजून ही काही संदर्भ वेळोवेळी येत असतात तेही वाचा
4) र.धोंचे समाजस्वास्थ्य चे सर्व अंक संकेतस्थळावर आहेत तेही वाचा 1927 ते 1947
हे सर्व वाचून मग प्रतिक्रिया देणे हे फार सोपे नसले तरी आपल्या मनातील अनेक शंका,अज्ञान, पुर्वग्रह यावर प्रकाश पड्तो.. मायबोलीवर अनेक तज्ञ व मान्यवर अभ्यासू विद्वज्जन आहेत. त्यांचेही या क्षेत्रातील वाचन व संदर्भ त्यांनी इथे द्यावेत. मतमतांतरे ही असणारच आहेत. शिवाय ती प्रगल्भतेनुसार बदलत ही जाणारी असतात. माझी देखील बदलली आहेत. नको देव राया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाउ पाहे हा अभंग लिहिणारी संत कान्होपात्रा ही गणीका कुळातील होती.
अजूनही बरेच काही पण नंतर

हा लैंगिक भावनांचा निचरा नाही, कुणावरही अन्याय न करता तो निचरा म्युचुअल कन्सेंटने करता येतो>>>>>>>

पुरुषी रचना अशी आहे की त्याला असा निचरा करता येतो. तो करताना समोरच्या व्यक्तीचे मन व ईच्छा समजुन घ्यायची त्याला गरज पडत नाही कारण समोरुन प्रतिकार असला तरी त्याला त्याचे काम करता येते. म्युटुअल कंसेंट वगैरे खुपच पुढच्या गोष्टी झाल्या.

समाजात आजही प्रचंड विषमता आहे. वेश्याव्यवसाय हा या विषमतेचा एक परिपाक आहे. उद्या एखादी वेश्या यातुन बाहेर पडलीच आणि धुणी भांडी करुन पोट भरु इच्छीली तर तिला स्वतःचे पुर्वायुष्य लपवुन हे करावे लागेल. तेही कितपत शक्य होईल देव जाणे. एकदा लोकांना हे कळले की तिची इतर स्त्रिया हेटाळणी करणार व पुरुष मौकेपे चौका लावायला मिळतो का हे पाहणार.

हे चित्र थोडेफार बदलावे व वेश्यांवर इतर समाजात तोंड लपवुन फिरायची वेळ येऊ नये एवढीच त्यांची अपेक्षा असावी. ही अपेक्षा पुर्ण होण्यासाठी काय करावे हे त्यांना कदाचित अजुन उगमले नसणार.

प्रकाश घाटपांडे - लिंक बद्दल धन्यवाद. विचारांचा फार मोठा ठेवा तिकडे उपलब्द आहे, वाचतो आहे. या धाग्यावर प्रतिक्रिया पण चांगल्या अभ्यासू येत आहेत.

लिंक बद्दल धन्यवाद.
हेडर मधे लिंक दिली असती आणि इतर फाफटपसारा न मांडता फक्त पुस्तकाची समीक्षा लिहिली असती तर धागालेखकाला अपेक्षित अशी पुस्तक वाचून त्यावर चर्चा होणे शक्य होते.

अर्थात अमृता फडणवीस ते दुर्गा भागवत राजा ढाले हे र धों कर्व्यांच्या पुस्तकाला पूरकच आहे आणि दुर्लक्ष करणे हे वाचकाचे काम आहे हा प्रतिसाद आधीच वाचला आहे.

Pages