वेश्याव्यवसाय

Submitted by प्रकाश घाटपांडे on 2 December, 2024 - 08:36
वेश्याव्यवसाय

वेश्याव्यवसाय
मध्यंतरी अमृता फडणवीस यांनी एक सनसनाटी विधान केले. माध्यमांनी त्याला चटपटीत प्रसिद्धी ही दिली होती.
"वेश्या व्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा" . जर्मनीसारखेच भारतातही वेश्या व्यवसायाकडे आदराने पहावं असं त्यांनी म्हटलंय. देहविक्रय हा पुरातन व्यवसाय आहे. देहविक्रय करणाऱ्या महिलांमुळेच समाजात बॅलन्स टिकून आहे. देहविक्रय करणाऱ्या महिला या समाजाच्या अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे या महिलांना समाजात मानाचे स्थान मिळायला हवे हा अमृता फडणवीस यांचा मुद्दा मध्यंतरी एका चर्चा पीठावर मी मांडला होता त्यावर एका स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्तीनी हा व्यवसाय अमृता किंवा त्यांच्या बिरादरीतील महिला प्रोफेशन म्हणून स्वीकारतील का? असा प्रश्न उपस्थित केला. खर तर अशा विषयांवर अनेक जण मौन राखणॆ पसंत करतात अमृता फडणवीस यांनी तो विनासंकोच मांडला या बद्दल मला त्याचे कौतुक वाटले. अशा प्रकारचे विचार दुर्गा भागवत यांनीही पुर्वी मांडले होते. दुर्गाबाई भागवत यांना “साहित्य अकादमी” पुरस्कार मिळाल्याबद्दल एक सत्कार समारंभ कुलाबा येथे एका महिला संघटनेने आयोजित केला होता.या कार्यक्रमात त्यांनी एक अजब वक्तव्य केले होते.”मी तमाशा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले ते केवळ मानसन्मानासाठी नव्हे तर तमासगिरांचे ,आणि विशेषत: त्यातील स्त्रियांचे जीवन कळावे म्हणून,त्यांचे दु:ख समजावे म्हणून,वेश्यांना आपण बदनाम समजतो,मात्र वेश्या हा समाजाचा एक अत्यावश्यक भाग आहे.सांसारिक जीवन जराही खिळखिळे झाले तर पुरुष अतृप्तीच्या मोकळ्या वाटांवर मोकाट सुटतो. त्याच्या वासनांची पूर्तता करून वेश्या एक प्रकारे समाजाचा तोल सांभाळत असतात.वेश्या व्यवसाय अशा रीतीने समाजाचे रक्षण करतो.डॉक्टर इंजिनिअर प्रमाणे त्याला प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे.
गोलपीठा” या प्रकाशन सोहळ्यात दुर्गाबाई भागवत प्रमुख पाहुण्या होत्या.भाषण करताना त्यावेळी त्या म्हणाल्या की,
“घराला जशी संडासबाथरूमची गरज असते,त्याचप्रमाणे समाजस्वास्थ्यासाठी समाजाला वेश्या व्यवसायाची गरज आहे.परंतु वेश्यांना समाजाने सामाजिक प्रतिष्ठा द्यायला पाहिजे,कारण ती समाजाची गरज भागवते.”
दुर्गाबाई भागवत यांच्या उपरोक्त भाषणांचा राजा ढाले यांनी त्यांच्या भाषणात खरपूस समाचार घेतला होता. ‘वेश्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून द्या,कारण ती समाजाची गरज भागवते,
असं म्हणणाऱ्या भागवत बाईंना वेश्यांना वेश्याच ठेवायचं आहे. हा त्यांचा पतितोद्धार असं ज्यांना वाटतं त्यांनी स्वत: हा धंदा का करू नये?
समाजाच्या लैंगिक जाणीवांचे व्यवस्थापन करणार्‍या साहित्यात र.धों. कर्वे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल आख्ख आयुष्य त्यांनी हा कार्यासाठी खर्च केले आहे.
र.धों.कर्वे वेश्याव्यवसाय या आपल्या पुस्तकातील प्रस्तावनेत लिहितात
"प्रस्तुत लेखकावर वेश्यावृत्तीचा पुरस्कार करण्याचा आरोप अनेकांनी केल आहे आणि त्यांत थोडेबहुत तथ्यहि आहे. परंतु तो पुरस्कार केवळ समाजसुखा- च्या दृष्टीने आहे, वेश्या ही एक उत्तम संस्था आहे अशा विश्वासाने नव्हे. पूर्वी सुखी असलेल्या समाजांनी आज नीतिवाजीच्या आहारी जाऊन अनेकांना काम- तृप्ति दुर्लभ केली आहे. ती सुलभ झाल्याशिवाय समाज सुखी होणें शक्य नाही. कृत्रिम कर्तव्यांपुढे अन्नाची परवा न ठेवणें हाच सद्गुग मानल्यावर कामतृप्तीला अजीबात फाटा देण्याचा प्रयत्न झाल्यास नवल नाही, परंतु ज्यांना निसर्गनियमांचे थोडेबहुत ज्ञान आहे, त्यांना यांत भूषण वाटणार नाही, आणि ज्याप्रमाणे सर्वांना अन्न मिळाले पाहिजे आणि तें खायला वेळ मिळाला पाहिजे, हें आतां लोकांना हळूहळू कळूं लागले आहे, आणि यामुळेच समाजवाद उत्पन्न झाला आहे, त्याचप्रमाणे कामतृप्तीचाहि हक्क सर्वांना असला पाहिजे हैं जेव्हा लोकांना कळूं लागेल, त्या वेळी समागमावरचे फालतू निर्बंध नाहीसे होतील आणि समागम सुलभ होऊन समाज सुखी होईल. परंतु ते निर्बंध जोपर्यंत नाहीसे झाले नाहीत तोपर्यंत समाजाला वेश्यांची गरज आहे. वेश्यांना मागणी नाहीशी झाली म्हणजे त्या आपोआपच नाहीशा होतील, परंतु तेथपर्यंत आणि नंतरहि त्यांना आपला धंदा करण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो त्यांना सरळपणें करूं न देऊन त्यांना छळण्याचा जो प्रयत्न नीतिवाज लोक करीत आहेत तो अत्यंत निंद्य आहे आणि त्यांत समाजाचें हित नाही. मात्र वेश्यांनाहि है घडसें कळत नाही आणि त्यांना देखील आपण पाप करतों असेंच वाटतें. ही भावना ज्यांना आहे, आणि एकाच पुरुषाला चिकटून राहण्यांतच ज्यांना मोठेपणा वाटतो, त्या खऱ्या वेश्याच नव्हत. त्यांत कमीपणा न वाटतां मोकळ्या मनाने ज्या धंदा करतात त्याच खऱ्या वेश्या, आणि त्यांचेवर नीति- बाजांच्या प्रचाराचा विलकुल परिणाम होत नाही. अशाच वेश्यांचा समा- जाला उपयोग आहे आणि याच दृष्टीने येथे या प्रश्नाचा विचार केलेला आहे."
१ जून १९४०.
र. धों. कर्वे
पुस्तकात वेश्याव्यसायाबद्दल जागतिक स्तरावरील माहिती दिली आहे.
1) प्राचीन हिंदुस्थान
2) युरोप
3) नंतरची परिस्थिती
4) वेश्याबंदीची मोहिम
5) कायदेबंदीचा सविस्तर विचार
6) कायदेबंदीचे प्रत्यक्ष परिणाम
7) नियंत्रण कसे असावे
8) वेश्यावृत्तीचा नैतिक विचार
अशा विविध प्रकरणातून सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक,वैज्ञानिक पातळींवर विविधांगी विस्तॄत विचार मांडले आहेत. पुस्तकात खर्‍या व खोट्या वेश्या हे एक प्रकरण पुरवणी म्हणून जोडले आहे. त्यात ते म्हणतात,"
कायद्याचा त्रास होतो काय तो खर्‍या वेश्यांना मुख्यतः यांचाच विचार केलेला आहे. त्यांच्याबद्दल कोणासही सहानुभूती वाटत नाही आणि ती वाटल्याचे ढोंग जे सोंवळे लोक करीत असतात, त्यांचा मुख्य उदेश वेश्या नाहीसा करण्याचाच असतो. हा उद्देश सफल झाल्या विवाहसंस्थेला अनंत धोका आहे हे अशा लोकांस कळत नाही. प्रस्तुत लेखकाला विवाहसंस्थेबद्दल मोठाला आदर नाही, परंतु वेश्या आणि विवाहसंस्था यांचा अत्यंत निकट संबंध आहे ही गोष्ट बाजूला ठेवली तरी वेश्यांना धंदा करण्याचा हक्क आहे आणि तो कायद्याने सरळपणाने कबूल केला पाहिजे आणि वेगवेगळ्या मिषाने त्यांना त्रास देणे हा अन्याय आहे, हे समजण्याइतकी न्यायबुद्धी लोकांत उत्पन्न झाली तरी पुष्कळ आहे. लोकांत न्यायबुद्धी नसते असे नाही, परंतु पारंपरिक बुरसटपणामुळे ती लुप्त झालेली असते, आणि तिचा कांही उपयोग होत नाही ही गोष्ट लोकांच्या नजरेस आल्यास ती कदाचित् जागृत होईल"
र.धों. देहविक्रय शब्द वापरत नाहीत. कारण वेश्या शरीराचा विक्रय करत नाहीत. शरीर भाड्याने देतात. आजही वेश्यांसाठी काम करणार्‍या अनेक संघटनांचे तेच म्हणणे आहे. वेश्यांचे ही तेच म्हणणे आहे. आता सेक्स वर्कर हा शब्द प्रचारात आला आहे. कारण त्यांना वेश्या म्हणायला कसंतरीच वाटते. वेश्या पेक्षा सेक्सवर्कर शब्द जरा प्रतिष्ठा असलेला वाटतो. त्यांचे प्रश्न पुन्हा वेगळे आहेत. तो पुन्हा एक स्वतंत्र विषय आहे. मागे वेश्याव्यवसायची नैतिकता या एका पोस्ट मधे मी काही भाग पुर्वी मांडला होता. असो.
सगळे वाचले की पुन्हा र.धों हे काळाच्या किती पुढे होते हे जाणवत राहते.
मुकुंद टांकसाळे यांनी https://radhonkarve.com/ या संकेतस्थळावर पुस्तक उपलब्ध करुन दिले आहे. अक्षरस्पर्श ग्रंथालयाचे दुर्मिळ पुस्तक ठेवल्याबद्दल आभार.
प्रकाशक- र.धों. कर्वे
राईट एजन्सीज, नवी भटवाडी, गिरगांव मुंबई
प्रकाशन काल-1940
पृष्ठे- 166
किंमत- ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रआंना +१.
या विषयाबद्दल माझेही मत एका बाजुने होत नव्हते बराच काळ.
अमृता फडणवीस अथवा दुर्गाबाई यांचा हेतु चांगला असेलच पण एवढ्या मोठ्या पातळीवर बोलताना केवळ हेतु चांगला आहे एवढ्याने भागत नाही. त्यातील विविध बाजु, पैलु, बारकावे हे सुद्धा पाहायला हवेत, आपल्या चांगल्या हेतूचे इतरके विपरीत परिणाम होऊ शकतात हे पहायला हवे, ते कसे टाळणार यावर सुद्धा विचार करून त्यावरील उपाययोजना सांगायला हवी.

एखाद्या वेश्येशी, सफाई कामगाराशी कुणी त्यांच्या पेशवरून वाईट वागताना दिसले तेव्हा त्यांना हटकणे वेगळे त्याचे रआंच्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिन्याप्रमाणे उदात्तीकरण वेगळे.

वेश्या आहे म्हणुन वाईट वागणुक, तिरस्कार नको याच बरोबर यातुन त्यांना बाहेर काढणे, अजुन कुणावर वेळ येऊ न देणे असा एकदंरित ऍप्रोच असावा. यात टप्प्या टप्प्याने करतानाही त्यात अशा व्यवसायाचे उदात्तीकरण होत नाही ना हे बघायला हवे.
सैन्याची गरज आहे म्हणुन अनेक ठिकाणी काही वर्षे सर्व्हीस केली पाहिजे किंवा गरज पडल्यास बोलावल्यास गेले पाहिजे असा कायदा असतो.

या व्यवसायाबाबत असा काही कायदा केला तर चालेल का, समाज सुरक्षित राहो म्हणुन?

लेखक महोदय मुद्दे चर्चेला घेतात. पण त्यांना फक्त आपल्या मतांचे व्हॅलिडेशन हवे असते. पाठिंबा देणार्‍या मतांची नोंद घेतात. विरोधी मतांना सरळ इग्नोर करतात किंवा धुडकावून लावतात. हे लिहिताना त्यांचा या आधीचा लेखही डोक्यात आहे.
हो. बहुतेक लोक असंच करतात. पण या लेखक महोदयांचं जे वाचत आलंय त्यावरून माझी त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा होती. ती चुकीची आहे का हा विचार त्यांनी करायचा आहे.

प्रस्तुत विषय याही आधी अनेकदा समोर आला आहे. त्यावरचे विचार शब्दबद्ध केले नाहीत. तूर्तास फार्स विथ द डिफरन्स यांचेशी सहमत.
मानव पृथ्वीकर यांनी स्वतः मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत.

खूप जबाबदारीने दिलेले व अभ्यासनीय प्रतिसाद आहेत या धाग्यावर!

फक्त एक मत जरा खटकते. बाकीचा समाज सुरक्षित रहावा या उद्देशाने या व्यवसायाला कायद्याचे कुंपण असावे असा दृष्टिकोन असू नये. मुळातच या शोषित स्त्रियांसाठी व्यवस्थित कायदे असायला हवेत. (काही प्रमाणात आहेतही असे ऐकले आहे). (अनेक संस्थाही कार्यरत आहेत व एकंदरीत जागृतीही बऱ्यापैकी होत आहे असेही ऐकले आहे). मात्र शोषण आहेच व इच्छेविरुद्ध व्यवसाय करावा लागणे व भवितव्य अंध:कारमय असणे हे दुर्दैवी घटक तर आहेतच.

(फक्त लेख व प्रतिसाद वाचून हे लिहिले आहे, लिंका वाचलेल्या नाहीत. त्यामुळे कदाचित हा प्रतिसद विसंगतही ठरू शकेल)

=====

अवांतर - तुम्ही दुर्लक्ष करू शकता हे विधान वाचून फार हसू आले

वेश्या अन्याय मुक्ती परिषद ही संस्था संग्राम या संपदा ग्रामीण महिला संस्थच्या अंतर्गत वेश्यांच्या हक्कांसाठी हिताचे काम करणारी संस्था आहे. श्रीमती मीना सेशू यांनी ती उभी केली आहे.
https://www.sangram.org/

The National Network of Sex Workers (NNSW) is a national network of sex worker-
http://www.nnswindia.org/
हे वेश्यांच्या हक्कासाठी काम करणारे राष्ट्रीय नेटवर्क आहे. यात अनेक संबंधित संस्था आहेत

https://sahelisangh.org/
सहेली संघ पुण्यातील बुधवार पेठ भागात काम करणारी वेश्यांच्या हक्कांसाठी काम करणारी संस्था आहे. श्रीमती तेजस्वी सेवेकरी त्याच काम पहातात.
या सर्वांचे कार्य व उद्दीष्ट व भूमिका त्यांच्या संकेतस्थळांवर पहाता येईल
याला जरुर भेट द्यावी

समीर गायकवाड या सामाजिक कार्यकर्ता, ब्लॉगर व लेखक यांचे खुलूस हे पुस्तक वेश्यांवरील जीवनावर आहे http://sameerbapu.blogspot.com/ हा त्यांचा ब्लॉग आहे
रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात…. ‘कुलटा’, ‘किटाळ’, ‘वेश्या’, ‘रंडी’… असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं… दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा ! अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे. खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा… या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक…. रेड लाइट डायरीज… खुलूस !
मायबोलीवरील लेखक अजातशत्रू म्हणजे आपले समीरबापू

एका दिवाळीत मी भाउबीज म्हणून बुधवार पेठेतील वेश्यांना एक सामाजिक देणे दिले. त्या आहेत म्हणून आपल्या आयाबहिणी सुरक्षित आहेत अशी प्रतिक्रिया मी एके ठिकाणी दिली होती तर काहींना ती असंवेदनशील वाटली होती. जर कर्वेसंस्थे्तील महिलांना भाउबीज दिली जाते तर वेश्यांना भाउबीज का देउ नये? मी सहेली या पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यांसाठी काम करणार्‍या संस्थेस वेश्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाउबीज दिली आहे. तो एक कृतज्ञता निधी आहे. इथे मी हायप्रोफाईल वेश्यांबद्दल बोलत नाही. तो एक वेगळा विषय आहे.
समाजाच्या लैंगिक भुकेचे व्यवस्थापन करण्यात यांचा फारच मोठा वाटा आहे हे माझे मत आहेच. 2023 मधे पुण्याचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनीही वेश्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी भाउबीजेला त्यांच्याकडून ओवाळून घेतले व भाउबीज दिली. त्याचा फोटो व बातमी मटा मध्ये आली होती

मी वेश्यागमन केलं आहे, मी भाऊबीज पण दिली आहे आणि मी बरंच साहित्य वाचलं आहे आणि मला हे हे पण माहिती आहे आणि माझ्याकडे अनेक लिंका आहेत. हेच करायचं आहे दिसतंय.
चालूद्या.

धागा पुस्तकाच्या समीक्षणासाठी आहे कि,
लेखकाचे या विषयातील चौफेर वाचन आणि कार्य यावर आहे? आक्षेप नाही पण वाचू आनंदे मधून विरंगुळा मधे हलवावा.

कि प्रतिसाद देणाऱ्यांनी (फक्त) विषयाला (?) धरून प्रतिसाद द्यायचे आहेत?

एका मुख्यमंत्र्याची पत्नी म्हणून त्यांचे हे वक्तव्य मुख्यमंत्र्यांचे या बाबतीत असेच मत आहे का याबद्द्ल उत्सुकता निर्माण करते. त्यांची त्यावर कधीच प्रतिक्रिया ऐकीवात आलेली नाही.>>>>अनेकदा अमृता फडणवीस ट्रोल होतात त्याबद्दल देवेंद्र यांनी खुलासा अनेकदा दिला आहे. तो असा की ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे व तिची मते ही तिची मते असतात. त्याची जबाबदारी ही तिचीच आहे.आता याचा पुरावा म्हणुन मी काही लिंक देउ शकणार नाही. वाचलेल्या पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टींची लिंक देता येतेच असे नाही. त्यातून माझ्या स्वत:च्या ही काही माणुस म्हणून आकलनाच्या मर्यादा आहेतच की!

हा एक मुद्दा,
फक्त पुरुष तृप्तीसाठी ?? स्त्री तृप्ती फारशी कधीच चर्चीली गेलेली आढळली नाही.
पुर्वी पुरुष काहीही करु शकतो त्याच्या गरजा भागायला किंबहुना ते साह्जिकच आहे पण अजुनही हिच विचारसरणी वगैरे.

वेश्याव्यवसाय आणि बळजबरीने ढकललेल्या बालिका/स्त्रीया हा सुद्धा एक सामाजिक चिंतेचा विषय आहेच.

त्याच बरोबर सामाजिक व्यवस्था कशी काय समतोल रहाते हे अजून काही नीट साबित झालेले नाहीये.
दुसरे म्हणजे, कळीचा मुद्दा "पुरुष अतृप्तीच्या मोकळ्या वाटांवर मोकाट सुटतो". सर्व काही पुरुष?

>>( पर्याय उपलब्ध असतानाही , परिस्थितीची बळी नसताना मनाजोगता व्यवसाय म्हणून या व्यवसायाचा स्विकार करणारी स्त्री आज तरी अपवाद असेल. त्यामुळे त्यावर विचार नको करायला. )<<
एस्कॉर्ट एकले असेलच ना? अगदी एझी मनी म्हणून कॉलेज मुली आहेत ह्यात सध्याच्या काळात; तो एक आणखी वेगळाच विषय आहे.
काही गरिब कुटुंब नाही तर उच्च मध्यवर्गीय मुली सुद्धा आहेत ह्यात. फक्त एक थ्रील आणि सेलेब्रिटी(कुठल्याही कार्यातील) ह्यांना भेटायचे आकर्षण म्हणून आणि मग मजा म्हणून.
पण ह्या लायसन्स घेतील का? आणि इतर फसवलेल्या स्त्रीया सुद्धा घेतील का? बरेच मुद्दे आहेत.

अमृता फडणवीस ट्रोल होतात त्याबद्दल देवेंद्र यांनी खुलासा अनेकदा दिला आहे. तो असा की ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे व तिची मते ही तिची मते असतात. त्याची जबाबदारी ही तिचीच आहे >>
तुमच्या या प्रतिसादाचा असा अर्थ काढायचा का कि, अमृता फडणवीस यांनी वेश्याव्यवसायाबद्दल जी मतं मांडली आहेत त्याची जबाबदारी एक सक्षम राजकारणी म्हणून देवेंद्र फ२० यांची नाही. थोडक्यात, त्यांनी जी मतं मांडली आहेत ती मंत्री म्हणून गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

कदाचित बायकोचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व / स्वतंत्र मतं ही तत्वं आकर्षक वाटली, पण चुकीच्या धाग्यावर चिकटवली असे होतंय का? बऱ्याचदा सोशल मीडियात वाचलेले पुरोगामी तात्विक विचार कुठेही दडपून देऊन समोरच्याला स्पेलबाउंड करता येईल असा विश्वास पहायला मिळतो.
एका पावरफुल मंत्र्यांच्या पत्नीचं एका अत्यंत संवेदनशील सामाजिक समस्येबाबतचं मत हे यात कसं ठोकून बसवता येईल?

दुसरं त्या ट्रोल होत असतील त्याचा इथल्या चर्चेशी संबंध आहे का?

तिसरं अमृता फडणवीस आणि या पुस्तकाच्या समीक्षेचा काय संबंध आहे? या विषयावर - अफ २० (तुम्ही स्वतः हेडर मधे लिहिले आहे) लिहिताना पुस्तक वाचलेले असावे ही अट लागू होते का?

अमृता फडणवीस ट्रोल होतात त्याबद्दल देवेंद्र यांनी खुलासा अनेकदा दिला आहे. तो असा की ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे व तिची मते ही तिची मते असतात. त्याची जबाबदारी ही तिचीच आहे >>>मला मुळात हेच समजत नाही की अमृता फडणवीस यांच्या या विषयातील मताची ( किंवा इतर कोणत्या ही विषयातील - ज्यावर त्या बरळत असतात ) क्रेडिबिलिटी काय? एका मोठ्या राजकारण्याची पत्नी या व्यतिरिक्त त्यांची काय ओळख?  त्यांच्या या विषयावरील मताला तेच लोक किंमत देऊन मोठं करू शकतात जे जाहिराती मध्ये धोनी  घराला इंडिगो कलर लावतो हे पाहून स्वतः इंडिगो पेंट आणतात, त्यांचं याकडे लक्षच जात नाही की धोनी ने जाहिराती पोटी मिळणाऱ्या करोडो रुपयांच्या मोबदल्यात अशा क्रेडिबिलिटी न बघता मते/ सल्ले  घेणार्यांना चुना फासला आहे. अमृता फडणवीसांच २०१४ नंतरचं  ट्रान्सफॉर्मेशन बघता प्रकाशझोतात राहण्याचा त्यांचा हव्यास लपून राहू शकत नाही. चुकी आणि बौद्धीक दिवाळखोरी त्यांना असे प्रश्न विचारणाऱ्यांची आहे. मागे एकदा सचिन तेंडुलकरही असेच कुठल्यातरी प्रोग्राममध्ये बोलला होता की सत्य साईबाबा देव आहेत. आता श्रद्धा आणि भक्ती या विषयांतील सचिनची क्रेडिबिलिटी तुम्हाला तेंव्हाच लक्षात येऊ शकते जेंव्हा तुम्ही त्याच्यापासून जागतिक दर्जाच्या क्रिकेटरचं वलय बाजूला करून त्याच्या वक्तव्याचा विचार कराल, आणि तो विचार देवाने आपल्याला बुद्धी दिलीय/डोकं दिलय अशी ज्यांची समजूत असते त्यांनी करायचा. याउप्पर जे लोक फारसा विचार न करता सहजीच येता जाता कुणाचीही मते विश्लेषणासाठी घेतात त्यांच्यासाठी अमृता फडणवीस काय नी राखी सावंत काय दोन्ही सारखेच.  

झंपी, तुमच्या मुद्द्यांशी सहमत आहे. यावर अभिसारिका भाग 1,2,3 या शॉर्ट फिल्मस जरुर पहा.

1) https://youtu.be/6l0I81_w8bE?si=eq5_BYXyTVLk36fK

2) https://youtu.be/x1p3PSEl14M?si=v-4M2OV2w_o49Jdz

3) https://youtu.be/57ASksb6IEk?si=iOptRQtuVHD4UVon

अवांतर - तुम्ही दुर्लक्ष करू शकता हे विधान वाचून फार हसू आले>>> त्यांना अनावश्यक वाटलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा या सल्ल्यामुळे की त्यांना अनावश्यक वाटलेली बाब मला पूरक वाट्ल्यामुळे?
बेफी तुमचे
२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग १ ते १४ हा मायबोलीवर उत्तम द्स्ताऐवज आहे.

मी सैनिकही ह्याच बकेट मधे टाकतो. ते आहेत म्हणून आपण आहोत म्हणे! अगेन ग्लोरिफिकेशन. कोण आणि का करतो ते उघड आहे.>>>पोकळ/कोरडे शब्द वगैरे सर्व संकल्पना मान्य, पण एखाद्या समूहाचे ऋण जाहीररीत्या प्रकट करूच नये का? तसे करणे अगदीच कृतघ्नपणाचे होत नाही का?(तूर्तास ही शंका फक्त सैनिकी करियरच्या ग्लोरिफिकेशन संदर्भातच आहे.)

बर्‍याच लिंकस आहेत. पण अज्जिबातच वाचवणार नाही. भयानक आहे. त्यापेक्षा शहामृगासारखे वाळूत मान खुपसणे सोईस्कर Sad

मिलिंद बोकीलांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी हे मत मांडलेलं ऐकलं , वेश्याव्यवसाया बद्दल वेगवेगळ्या देशात 2 वेगळे ऍप्रोच , पहिला रेग्युलेटरी दुसरा ऍनिहिलेटरी .. एकात कायदेशीर करणे दुसऱ्यात बेकायदेशीर ठरवून असता नये असा ऍप्रोच ... ते स्वतः बाईला हा व्यवसाय करण्याचा हक्क असावा या मताचे वाटले , तिचा स्वतःच्या शरीरावर हक्क etc , जर पाककौशल्य किंवा बुद्धीकौशल्य वापरून उपजीविका करायला हरकत नाही तर ह्या व्यवसायाला आडकाठी का वगैरे वगैरे ..

बऱ्याच वेळा वाटतं की देशाची सत्ता विचारवंतांच्या , बुद्धिवंतांच्या हाती असली असती तर देश कुठच्या कुठे गेला असता ... पण अशा भावनाशील विचारवंत , बुद्धिवंतांच्या हाती सत्ता असण्यापेक्षा ती मद्दड राजकारण्यांच्या हाती आहे हेच कदाचित व्यापक हिताच्या दृष्टीने योग्य आहे असं वाटलं होतं हे ऐकून ... कारण या बुद्धिवंतांनी कदाचित आणखी भयाण घोळ घालून ठेवले असते काहीतरी चांगलं करायला जाण्याच्या नादात ..

व्यक्तीचा स्वतःच्या शरीरावर हक्क मान्य करायचा झाला तर इच्छामरण कायदेशीर का नाही, आत्महत्या हा गुन्हा का ... जगायची इच्छा नसलेल्या व्यक्तीला जगायला भाग पाडणारा क्रूर कायदा कां.. इच्छामरणाच्या स्तुतीवर पानंच्या पानं भरून निबंध लिहिता येतील , ती बाजू बिनतोड मांडता येईल ..

आपलं मूल कोणत्या लिंगाचं असावं हे ठरवण्याचा हक्क बाईला किंवा नवरा बायकोला का नाही , हा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न मानून भारतीय कायदा त्यात नाक खुपसायचं बंद का करत नाही .. नको त्या लिंगाचं मूल जन्मलं तर ते वाढवण्याची सक्ती करणारा कायदा वैयक्तिक हक्कांची पायमल्ली करतो अशीही डिबेटची बाजू मांडता येईल .

ह्या बाजू ग्राह्य मानून इच्छामरण किंवा गर्भलिंगचिकित्सा कायदेशीर केली की त्याचे जे परिणाम भारतासारख्या देशात होतील ते ह्या विचारवंतांना समजत नसतील असं वाटत नाही ... वेश्याव्यवसाय कायदेशीर केल्यास वेश्या सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची गॅरंटी देता येत नाही , परदेशातल्या आणि इथल्या परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक आहे , थायलँड मधल्या वेश्यांना आलेले सुदिन भारतात येणार नाहीत , निराधार / गरीब स्त्रिया मुली हेरून त्यांना या व्यवसायात ढकलण्याच्या प्रमाणात शेकडो पटींनी वाढ होईल , कायदा त्यांचं संरक्षण करायला देशाच्या कानाकोपऱ्यात पोचायला असमर्थ आहे , गुरं , पशुपालन हा जसा उत्पन्नाचा स्रोत आहे तशी या व्यवसायाची अवस्था होऊ शकते , गुरांची जी उस्तवार करावी लागते तेव्हढीही स्त्रियांची करावी लागत नाही त्यामुळे त्याला अफाट लोकप्रियता मिळू शकते . म्हणजे ऑलरेडी जे आहेच भारतात , वेश्यांच्या कमाईवर जगणारे गुंड त्यात शेकडो पटीने वाढ होईल , कायद्यातल्या पळवाटा शोधणं , कायदा गुंडाळून ठेवणं त्यांना फार जड जाणार नाही .

आदर्श कल्पनेच्या मनोऱ्यात बसून , स्वतःवर एखाद्या निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी येणार नसताना ही वैयक्तिक हक्क वगैरे विधानं करणं सोपं आहे ... एवढ्या प्रचंड लोकसंख्येचा देश मॅनेज वैयक्तिक हक्क वगैरे बाजूला ठेवून जे अधिकांश लोकसंख्येच्या हिताचे आहेत असेच निर्णय घेतले गेले पाहिजेत .

यात इच्छेविरुद्ध ढकलल्या गेलेल्या बायकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी यासाठी काही सामाजिक संस्था काम नक्की करत असतील , त्यांचंच काम देशपातळीवर व्हावं यासाठी सरकारकडून प्रयत्न व्हायला पाहिजेत , त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने मदत केली पाहिजे आणि नवीन स्त्रिया त्यात आणल्या जाणार नाहीत यासाठी निदान प्रयत्न तरी ... आणि त्याचबरोबर त्या व्यवसायात ज्या आहेत त्यांना समाजात चांगली वागणूक मिळावी यासाठी जनजागृती ..

चर्चेर्त दिलेला मराठी किडा यूट्यूब चॅनेलवर 'लाइफ ऑफ सेक्स वर्कर' हा वृत्तपट पाहिला असेलच. त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेणे, त्यांचा संघर्ष हा त्या व्हिडिओचा मुख्य केंद्रबिंदू होता. तो वृत्तपट सहेली संघाच्या सहकार्याने साकार झाला होता. सहेली संघाच्या स्वयंसेविका तेजस्वी सेवेकरी यांच्याशी सेक्स वर्कर्सचे जीवन, त्यांचा संघर्ष, या व्यवसायाची कायदेशीरता याबद्दल सहेली संघाच्या तेजस्वी सेवेकरी गेल्या ३० वर्षांपासून सेक्स वर्करच्या कल्याणासाठी काम करत आहेत. हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा.
लैंगिक कार्य म्हणजे नेमके काय? सहेली संस्था काय करते? स्त्रिया लैंगिक कार्यात कसे प्रवेश करतात?
बुधवार पेठेचा इतिहास काय आहे? सेक्स वर्क हा व्यवसाय मानला पाहिजे का?लैंगिक कार्य निवडणे ऐच्छिक आहे की नाही? सेक्स वर्क हा पैसा कमवण्याचा सोपा मार्ग आहे का? समाज महिलांना लैंगिक कार्याकडे कसे पाहतो?
लैंगिक कार्यात महिलांचा समावेश असलेल्या धक्कादायक घटना.
लैंगिक कार्यामुळे बलात्काराचे प्रमाण कमी होते का?
लैंगिक कार्यामुळे सामाजिक नैतिकतेचे नुकसान होते का?
लैंगिक काम करणाऱ्या महिलांना कुटुंबे असतात का?
पारंपारिक लैंगिक कार्य आजही अस्तित्वात आहे का?
बॉलीवूडमध्ये नोकरी मिळवण्यासाठी सेक्सचा वापर करणे हा व्यवसाय मानला जातो का?
सेक्स वर्कर होण्यापासून ते सन्माननीय जीवन जगण्यापर्यंत सेक्स वर्करच्या मनोरंजक कथा.
हे सर्व या व्हिडिओत पाहायला मिळेल.
https://youtu.be/6qmIX8XeS2w?si=WNz57fG9LGU501HZ

Pages