काकडेच्या खुन्याची कथा.
तो एक धंदेवाईक खुनी होता. माफक फी आकारून खून करण्यात तो माहीर होता. खून करायचे तंत्र त्याने अभ्यास करून विकसित केले होते. बळीच्या सामाजिक प्रतिष्ठे प्रमाणे तो फी आकारत असे. राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ति असेल तर जास्त धोका कारण पोलीस मग गुन्हेगाराला पकडण्याचे काम कसोशीने करतात. मग फी पण तशीच. बिल्डर घेतलेले कर्ज परत करायला काच कूच करू लागला की मग फायनान्सरने तरी काय करावे. कर्ज माफ करायला लागले तर धंदा कसा होणार. छातीवर दगड ठेऊन त्याला बोलावणे पाठवावे लागते. आपल्याला कोण सुपारी देतोय, काय म्हणून सुपारी देतोय, ज्याची सुपारी दिली जाते आहे तो काय प्रकारचा माणूस आहे असले विचार मनात आणले तर धंदा करणे मुश्कील. बळी विषयी मन कस निर्विकार पाहिजे. एकदा त्याने एका सामाजिक कार्यकर्त्याला उडवले होते. त्या बाबाचा आश्रम-अनाथाश्रम होता. ती जागा दादाला पाहिजे होती. पण हा बाबा ऐकायलाच तयार नव्हता.(अर्थात हे त्याला नंतर पेपरात वाचल्यावर समजले.) त्याला काय वाटले असेल? काहीही नाही. जगात माणसे दररोज मरत असतात. त्यातलाच हा एक.
दादाने बोलावणे पाठवले. आणि तो गेला. कुणा साहेबराव काकडे नावाच्या इसमाची सुपारी होती. दादाने पैशाचे पाकीट आणि काकड्याचा फोटो दिला.
“ही पार्टी माझ्या एरियात हातपाय पसरत आहे. मांडवळणीच्या गोष्टी केल्या पण ऐकायला घेत नाही. मरीआई चौकात फ्रेंड्स क्लब म्हणून आहे. बाहेर पोरं कॅरम खेळत असतात. पडदा उघडून आत गेलास तर तीन पत्ती दिसेल. बराबर रेको करून जा. दोन चार बाउन्सर आहेत. एक तगडा बॉडीगार्ड आहे. त्याच्याकडे घोडा असणार. काळजी घे. मोठे हत्त्यार घेऊन आत जाता येणार नाही. २२ घे, जवळून गेम कर. अंगावर रक्त उडेल. इलाज नाही. बाकी मी तुला काय सांगणार म्हणा.”
काम फत्ते झालं.
पण नंतर उडालेल्या गोंधळात डाव्या हाताच्या दंडाला बॉडीगार्डची गोळी चाटून गेली. तो तसाच रेटून निघाला. चोरीची बाईक गांधी रोड नाक्यावर सोडून दिली आणि स्वतःची खासम खास गाडी (ती तिथेच पार्क केली होती) घेऊन तो वाट फुटेल तिकडे निघाला. इरादा एकच होता. पोलीसला वार्ता लागायच्या आधी शहराच्या बाहेर पडायचे. एक गोष्ट मात्र निश्चित होती. पोलीस कूल असणार. चौकशीचे निव्वळ नाटक करणार. म्हणणार मरेनात का साले. मारो और मरो. खरा धोका होता काकड्याच्या गॅंगच्या मेंबरांचा.
आजूबाजूला वस्तीचे चिन्ह नव्हते. फक्त ते एक खोपटं दिसत होतं. तहानेने जीव कासावीस झालेला. भूकेचं एकवेळ ठीक आहे. पण तहानेचं काय? जवळचं पाणी संपलेलं. कोणी मागावर नव्हतं. इथे थांबायला हरकत नव्हती.
घरासमोर सदाफुलीचे रोपटे होते. त्यावर एक दोन गुलाबी फुले डोलत होती. तीच एक जिवंतपानाची खूण.
काकडेच्या खुन्याने मोटरसायकल त्या जुनाट घराच्या मागच्या बाजूला लावली. कुणाला सहजा सहजी दिसणार नाही अशी जागा. गायीचा गोठा होता. गाय नव्हती. त्या जागी त्याने आपली गाडी “बांधली”.
खिशातल्या पिस्तुलावर हात ठेवून त्याने दरवाजा ठोठावला. एका तीस पस्तिशीच्या स्त्रीने दरवाजा उघडला.
“काय काम आहे?”
बाई दिसायला वाईट नव्हती. गळ्यात मणी मंगळ होते. कपाळावर ठसठशीत कुंकू.
“मिस्टर?
“नाहीयेत.”
“मी म्हणतोय कि बाहेर गेलेत ते केव्हा परतणार?”
“मिस्टर परागंदा झालेत. तीन वरसं झाली.” तिनं निरिच्छ माहिती दिली.
काकड्याच्या खुन्याची पिस्तुलावरची पकड थोडी ढिली झाली.
“परागंदा? आणि ते कशापायी? चोरीचपाटी? कि राडा केला व्हता?”
“घरगृहस्थीला कंटाळले.” बाई अजूनही नवरया बद्दल आदरार्थाने बोलत होती.
“हे पहा बाई, मी लांबवरून थकूनभागून आलो आहे. जेवायला मिळेल तर खाऊन पिऊन चालता होईन. पैशे देईन. तेव्हा...”
आता तिने दरवाजा पूर्ण उघडला आणि बाजूला झाली. एका मोडक्या खुर्चीकडे बोट दाखवले. रूममध्ये फक्त एक खाट होती. सात आठ वर्षाचा हाफ चड्डीतला मुलगा त्याच्याकडे टक लावून बघत होता. हा तिचा मुलगा असणार.
थोड्या वेळात शिळी भाकरी आणि पिठल्याचे ताट घेऊन ती स्त्री आतून बाहेर आली. पिठले ताजे केलेलं होते. गरम होते. काकड्याच्या खुन्याला फाइव्ह स्टार पासून हे असले शिळेपाके खायची सवय होती. एकदा ठरवलं कि सगळे काही सोपं होऊन जातं. सगळ्या बऱ्यावाईटाची सवय होते.
ताट जमिनीवरच मांडले होतं.
दरम्यान दंडावरची जखम चाळवली गेली. टपक टपक रक्ताचे थेंब जमिनीवर पडत होते. ते ती स्त्री बघत होती.
खुन्यानं जेवण उरकलं. हातावर पाणी घेतलं, तांब्यातून मनसोक्त पाणी प्याला. मग पाकीट काढलं. दादानं दिलेल्या काकड्याच्या खुनाच्या बिदागीतून एक नोट काढून बाईच्या हातावर टेकवली.
“घ्या. मी तुमचा पिठलं भाऊ. अनमान नको करू. मी बाजूच्या गोठ्यात... गाय कुठं आहे?”
“विकली.”
काकड्याच्या खुन्याने गवत पसरून अंथरूण बनवले. झोप येत नव्हती. आता पुढे काय? हा विचार मनात. इथे जास्त वेळ थांबणे इष्ट नव्हते. बाई भली होती, पण कुणाचाही भरवसा नसतो. रक्त पाहून बिचकली असेल. मुलाला पाठवून कुणाला तरी बोलावून घेतले तर?
तो घरात आला. मघाशी रक्त टपकले होते ती जागा आता स्वच्छ केलेली
दिसत होती.
“इथं जवळपास कुठं पेट्रोल पंप आहे का?”
“जवळपास नाही, बराच दूर आहे.”
गाडीत जेव्हढं पेट्रोल आहे, ते संपेपर्यंत जेव्हढे जाता येईल तेव्हढे जावे. भेटला पंप तर ठीकाय, नाहीतर वन टू वन टू करत जाईन.
“बरं मी चलतो. तिकडे शहरात थोडा राडा झाला व्हता. पोलीस माझ्या मागावर आहेत. तेव्हा...”
“मी काय म्हनते, इथेच थांबलात तर बरं पडेल. पोलीस इथपोत्तर पोचलेच तर त्याना हूल देईन मी. ते माझ्याकडे लागलं. मी पाणी गरम करते, अंघूळ करून घ्या.”
आयुष्यात पहिल्यांदाच कोणी त्याच्याशी इतक्या आर्जवाने बोलत होतं. कॉन्ट्रक्ट किलरला बाई बाटली वर्ज. हिचा नेमका डाव काय असावा? की ही आपल्याला सेटअप करतेय? बाई छक्केपंजे वाली वाटत तर नाही. काय करावे? अशा परिस्थितीत तो जे नेहमी करायचा तेच त्याने केले. मनाचा कौल घेतला.
“ठीकाय. तुम्ही म्हणता तसं करतो.”
गरम पाण्याने अंघोळ केल्यावर त्याच्या थकेल्या दमेल्या शरीराला थोडी तरतरी आली.
बाईने त्याला पायजमा दिला होता. कपडे बदलायला. पायजम्यात एक पाय पण घातला नव्हता. तोच बाहेरून कुणा बाप्याचा आवाज आला. बाहेरच्या दारात कोणीतरी टपकला होता. मधला दरवाजा बंद होता. तो आतल्या खोलीत होता.
“बाई, आत कोणी आहे का?” आगंतुक विचारत होता.
“पाव्हनं आहेत. अंघुळ करताहेत.”
त्यान दरवाज्याच्या फटीतून बघितले. जो कोणी होता त्याच्या हातात शॉटगन होती. त्याने आपले .२२ रिव्हॉल्वर हातात घेतले.
“बोलवा त्याला बाहेर. का मीच बघू का जाऊन.”
काय वाढून ठेवलाय त्याची त्याला जाणीव झाली. .२२ आणि शॉटगनचा अन-इवन मुकाबला होता. माघार घ्यायला पण जागा नव्हती. दरवाज्याचाच काय तो आडोसा. एखाद्या जंगली श्वापदा प्रमाणे तो नाईसली ट्रॅप झाला होता.
दरवाजा खाडकन उघडून त्याने गोळीबार केला म्हणजे गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पायात अर्धवट अडकलेल्या पायजम्याने घात केला.
शॉटगनच्या गोळीने जेव्हा त्याचा अचूक वेध घेतला तेव्हा त्याला जोरदार धक्का लागून तो मागे फेकला गेला. पार आडवा झाला.
बाई त्याच्या कडे धावत आली.
“काय केलत पाटील तुम्ही. माझ्या पाव्हन्याला गोळी घातलीत.”
“पाव्हणा! हा शहरात खून करून फरारी होऊन इकडे आला होता. काकडे बाई, ह्याने तुम्हाला काही त्रास तर दिला नाही ना.”
काकडे बाई? ओह नो!
त्याला जाणीव झाली. वेळ आली होती अन काळही आला होता.
शॉटगन वाल्याने त्याला सरळ उताणा करायचा प्रयत्न केला.
“नका काही करू, आता काही उपयोग नाही.” काकडीण बाई जवळ येऊन बसली. उरलीसुरली शक्ती एकवटून तो बोलला, “बाई, तू साहेबराव काकड्याची बाईल?”
त्याची एकच इच्छा होती कि तिनं नाही म्हणावे म्हणजे त्याचा “मार्ग” मोकळा झाला असता. देवा प्लीज रे, प्लीज.
पण ते होणे नव्हते.
आत्तापोत्तरच्या आयुष्यात केलेल्या पापांचे प्रायश्चित्त घ्यायचे अजून बाकी होते.
ती हलकेच म्हणाली, “होय.”
काकड्याच्या खुन्याच्या आशा आकांक्षांचा असा शेवट झाला.
जेव्हा त्याने ते शेवटचे वाक्य उच्चारले तेव्हा त्याचा आवाज खणखणीत होता.
“मला माफ कर.”
एव्हढे बोलून त्याने मान टाकली.
छान कथा , आवडली .
छान कथा , आवडली .
लिखाणाची शैली खूप छान आहे . साधी, सरळ, सोपी वाक्ये . योग्य तिथे पुरेशे संवाद . कथेचा प्रवाह ओघवता आहे . वाचायला घेतल्यावर थांबवत नाही . कथेची लांबीपण योग्य आहे . लिहीत राहा .
मला सहावीत पुरंदरे नावाचे सर
मला सहावीत पुरंदरे नावाचे सर मराठीला होते. त्यांची शिस्त होती. एका वाक्यात सहा/ सात पेक्षा जास्त शब्द झाले तर वाक्य तपासून बघा.
त्याची सवय झाली आहे.
छान आहे कथा
छान आहे कथा
अनपेक्षित शेवट
का कोण जाणे ती भूत असेल असं वाटत होतं
छान कथा.
छान कथा.
कथा छान आहे. शब्दरचना
कथा छान आहे. शब्दरचना सुटसुटीत. शैली वेगवान. वगैरे वगैरे ते सारे ठीक..
पण माफ करा स्पष्ट बोलतो..
हे असले प्रायश्चित तुमच्या कथांना शोभत नाही..
त्याने काहीतरी टाईम मशीन मध्ये बसून मागे जाऊन तिच्या नवऱ्याचा गेम टाळला असता आणि त्या नादात किंवा सुपारीचे पैसे चुकवता आले नाही म्हणून सन्मानाने मेला असता तर काही मजा आली असती.
या असल्या कथा तुम्ही ललित लेखनात टाकत जा..
भावा, पुढची कथा तशीच लिहीन.
भावा, पुढची कथा तशीच लिहीन. पण आत्ता पुरते एक डाव सांभाळून घ्या, सर.
पण Youdia म्हणजे तुमची Idea मात्र भन्नाट आहे. तो मानलेल्र्या बहिणीसाठी भूतकाळात जाऊन साहेबरावाला पुन्हा घरी आणून सन्मार्गावर आणतो, इत्यादी.
वाचायला सुरवात केली... आणि
वाचायला सुरवात केली... आणि शेवट झाल्यावरच थांबलो. छान कथा आहे, केशवकूल.
>>>वाचायला सुरवात केली... आणि
>>>वाचायला सुरवात केली... आणि शेवट झाल्यावरच थांबलो. छान कथा आहे,>>>+१
मस्त जमलीयं कथा...!
मस्त जमलीयं कथा...!
अनपेक्षित शेवट ..
छान कथा... तुमच्या नेहमीच्या
छान कथा... तुमच्या नेहमीच्या शैलीपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीची.
तुमचे इतरत्र प्रतिसाद वाचून मला असं वाटतं की तुम्ही विनोदी लेखनपण खुप छान लिहाल.
छान कथा... तुमच्या नेहमीच्या
छान कथा... तुमच्या नेहमीच्या शैलीपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीची.
तुमचे इतरत्र प्रतिसाद वाचून मला असं वाटतं की तुम्ही विनोदी लेखनपण खुप छान लिहाल.
किल्ली, भरत. उदय, रूपाली
किल्ली, भरत. उदय, रूपाली विशे - पाटील, दसा, आबा सर्वांचे आभार!
@आबा तुमच्या प्रतिसादातील गर्भित अर्थ शोधायचा प्रयत्न करतोय.
कथा छान!
कथा छान!
एक प्रश्न पडला.
कॉन्ट्रक्ट किलरला बाई बाटली वर्ज >> प्रोफेशनल आहे.
मग पाप, प्रायश्चित्त वगैरे? का शेवटच्या क्षणाची उपरती?
छान कथा!
छान कथा!
छान..कल्पना आली पण तरीही
छान..कल्पना आली पण तरीही वाचायला मजा आली.
Abuva
Abuva
पाप हा शब्द मी वापरलेला नाही. प्रायश्चित्त इत्यादी ह्या माझ्या कल्पना. पण
"आयुष्यात पहिल्यांदाच कोणी त्याच्याशी इतक्या आर्जवाने बोलत होतं. "
त्याने विक्तिम च्या नातेवाइकान्चा कधी विचार केला नव्हता. आज प्रथम त्याला ही जाणीव झाली असावी. आणि समोर मृत्यूचे दर्शन झाल्यावर माणसाचे विचार बदलत असावेत.
स्वाती२, मामी आभार.
स्वाती२, मामी आभार.
केकू, खरंय...
केकू, खरंय...
कथा वाचताना मी एखादा वेस्टर्न चित्रपट पहातोय असा फील आला..!
खूनखराबा करून आलेला गनफायटर, बारजवळ व्हिस्कीचे शॉट मागून शॉट ढकलत उभा आहे. तो रक्त ठिपकत आत आल्यावर झालेली पळापळ, आणि बार रिकामा होणे. त्याच्यावर उगाचच जीव लावणारी बारबाला, आणि फडकत्या दरवाजातून आत येऊन एकाच शॉटमध्ये त्याचा खेळ खतम करणारा शेरीफ...
नाही. मी सांगतो. सध्या मी
नाही. मी सांगतो. सध्या मी film noir genre. चा रतीब लावला आहे. शिकागो अंडरवर्ल्ड, माफिया, मॉब, बॉस, जुगारी अड्डे , Speakeasy, प्रोहिबिशन., गंग वार...
तुम्हाला माहित असेल कि नाही पण आपल्याकडेही दाउद इब्राहीम च्या वेळेला अगदी हेच चालले होते.+ लाडकी बहेना!
ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम... ही कथा.
तसेच contract killer बराच रिसर्च केला. ह्त्यारेंची जुजबी माहिती, खून करायच्या निरनिराळ्या पद्धती इत्यादी. ह्यात बरेच काही अजून टाकायचे आहे. कथा खूप मोठी झाली असती म्हणून इतकेच घेतले. picture अभी बाकी है...
मस्त लिहिलीय कथा केकु. मजा
मस्त लिहिलीय कथा केकु. मजा आली वाचताना. कीप ईट अप!!
अगदी Wild West पर्यंत जायची
अगदी Wild West पर्यंत जायची गरज नाही.
देसी हिंदी मुंबई film noir च्या तीन तरी लिस्ट IMDB वर मिळतील.
उदा. Film Noir from India
https://www.imdb.com/list/ls050882308/
Thanks फेरफटका.
मस्त आहे कथा!
मस्त आहे कथा!