तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव Lol

ही जुन्या काळातली pregnancy test असावी ओ.

कोरा किंवा रेडीट चे प्रश्न बाळबोध असतात असे वाटू शकते. पण इकडे जसे दैनंदिन जीवनात पडणारे प्रश्न हा धागा आहे त्याचे ॲप वर्जन रेडीट आणि कोरा आहेत. मायबोलीवर सुद्धा विरंगुळा गृपात नसूनही तुम्ही म्हणताय तश्या बालबोधपणाला टक्कर देणारे अनेक सुपर बाळबोध धागे आहेतच की. शिवाय जिथे वैयक्तिक अनुभव लिहिलेले असतात किंवा शेअर करावे असे आवाहन केलेले असते त्यावर लोकांनी लिहिलेले जेन्युईन अनुभव वाचणे खरोखर रोचक असते. उदा. वर शेअर केलेला रेडीट चा प्रश्न.

किती मस्त हिंदी बोललेत सगळे! १-२ वर्षेच राहिलेत त्या मानाने बरेच फ्लुएन्ट. बहुतेक या लोकांची इतर मजेशीर रील्स बघितली आहेत मी.

मी पहिल्यांदा सॅम्टा बार्बाराला मुली कडे गेलो तेव्हा ती मला दुपारी बीच वर ङेऊन गेली.... मीच हाफ बॅन्ट आणि बनियन मध्ये मोस्ट कव्हर्ड होतो... आजूबाजूला नथिंग लेफ्ट टु इमॅजिनेशन असा प्रकार होता...... मी ओशाळलेला पाहून मुलगी म्हणाली... इट्स ओके पा

साधारण १९८५ वगैरे सालची गोष्ट आहे. आम्ही लातूरला राहात होतो. मी पंधरा सोळा वर्षांचा असेन. रात्रीचे आठ वाजले होते. आईने मला दुकानातून खडेमीठ आणायला सांगितले. मी दुकानात गेलो आणि एक किलो मीठ मागितले. दुकानदार बरेच वयस्कर होते त्यांनी 'नाही' या अर्थाने मान हलवली, माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि दुसरे काम करू लागले. समोर खडेमीठाचे भरलेले पोते दिसत होते आणि दुकानदार सरळ 'नाही' म्हणतायत म्हणजे काय? मी पोत्याकडे हात दाखवून म्हणालो 'हे पोते भरलेले आहे तुम्ही नाही काय म्हणता' ते माझ्यावर खेकसले 'अरे सांगितले ना नाही म्हणून' मी तिरीमिरीत घरी आलो आणि आईला सगळा प्रसंग सांगितला. आई हसू लागली आणि म्हणाली 'अरे मी सांगायची विसरले, आता परत जा आणि एक किलो लातूर द्या असे म्हण' मला कळेना हा काय प्रकार? मी परत दुकानी गेलो आणि म्हणालो 'एक किलो लातूर द्या' दुकानदाराने मुकाट्याने एक किलो मिठाचे वजन केले आणि मला दिले. घरी परत आल्यावर आईला विचारले- असे का? ती म्हणाली 'अरे इथे तशी पद्धत आहे. ते दुकानदार लिंगायत आहेत. त्यांच्याकडे अंत्यविधीमध्ये मीठ वापरतात त्यामुळे त्यांच्याकडे संध्याकाळी मीठ मागणे अशुभ मानतात. म्हणून संध्याकाळ झाली की इथले लिंगायत दुकानदार मीठ देत नाहीत. त्या ऐवजी 'लातूर द्या' म्हटले की पुढचे काही न विचारता मीठ देतात. मागणारा लिंगायत असेल तर पैसेही घेत नाहीत. दिवसा मात्र 'मीठ' मागितले तरी चालेल.' मला बसलेला हा मोठा कल्चरल शॉक होता. आजही लातूरमध्ये लिंगायत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र ही प्रथा पाळताना आता कोणी दिसत नाही.

गमतीदार अनुभव आहे सदानंद कुलकर्णी Lol
आमच्या घरी संध्याकाळी जर कुणी दही विकत न्यायला आलं तर त्यात कणभर मीठ घालून द्यायची पद्धत होती. ( घरी गाई-म्हशी होत्या त्यामुळे आम्ही घरगुती पातळीवर दूध-दही विकायचो.)

Lol मजेदार आहे हे.
लातूर का बरं पडलं असेल नाव विचार करतोय.
मीठ हातावर देत नाहीत इतकंच ऐकलं होतं, आणि पान वाढताना मीठ पहिलं वाढत नाहीत. रिकाम्या पानावर पहिला पदार्थ पांढरा वाढायचा नाही असं ऐकलेलं आठवतं.

मी आत्तापेक्षा लहान असताना मीठ, मोहरी, तेल, तूप असे काही जिन्नस संध्याकाळी विकायचे नाही, तेल, तूप एकत्र घ्यायचे नाही, तेल शनिवारी घ्यायचे नाही असे काही रिवाज आमच्या गावी पाळले जायचे.

मीठ हातावर देत नाहीत इतकंच ऐकलं होतं, आणि पान वाढताना मीठ पहिलं वाढत नाहीत. रिकाम्या पानावर पहिला पदार्थ पांढरा वाढायचा नाही असं ऐकलेलं आठवतं.

मीठ हातावर देत नाहीत हे तेलंगणात अजूनही पाळलं जातं.

मराठवाड्यातील रिवाज - रिकाम्या पानावर पहिला carbohydrate पदार्थ (पोळी, भाकरी किंवा भात) वाढायचा नाही, आधी एकतरी कोरड्यास वाढायचं, पोळी भाकरी वगैरे चतकोर तुकड्यांमध्ये करून वाढायची वगैरे आम्ही पाळतो.

आमच्याकडेही आई सूर्यास्तानंतर तेल किंवा मीठ विकत आणू देत नाही, तेल आणि मीठ एकत्र आणू देत नाही. शनिवारी तेल आणू देत नाही. गावी अजूनही पंगतीत पोळी, भाकरी वगैरे चतकोर तुकडे करूनच वाढतात. नैवेद्याच्या पानावर मीठ वाढत नाहीत. गोग्रास किंवा कावळ्यासाठी काढलेल्या पानावर वरण भाताची मूद आणि दह्याची कवड वाढतात किंवा दुसरी छोटी मूद दहीभाताची असते.

चतकोर का वाढतात? 'चतकोराने मला न सुख' आठवलं. Lol
लातूरची पद्धत म्हणून 'लातूर' असणार >> Lol अरे हो! लातूरची गोष्ट आहे हे पोस्ट संपेपर्यंत विसरुन गेलो.
अशा प्रथांना 'का?' प्रश्न विचारला की आमच्याकडे साधारण 'कारण असं श्राद्धाला करतात' हे ठरलेलं उत्तर असतं. Proud

गवारीची न तोडता भाजी व डाळवडे ( जे मला फार आवडत) फक्त श्राद्धालाच करतात.
पुढचे श्राद्ध कधी आहे ? असे विचारून ओरडा खाल्लेला !

आमसुलाची चटणी हा एक श्राद्ध स्पेशल प्रकार आहे. पण तो आजी पासून सगळ्यांना आवडत असल्याने श्राद्ध घातलं पाहिजे जोक घरी होत असत. Lol

मीठ जमिनीवर सांडल कधी तर आमची आजी आता डोळ्याच्या पापणीने भर अशी शिक्षा द्यायची. अर्थात ह्या शिक्षेची ही अंमलबजावणी अशक्य होती. मग आई आणि आजी खूप ओरडायच्या आणि केरसुणीने भरायला परवानगी द्यायच्या.

११, २१, ५१, १०१ या राउंड फिगर्सच आहेत असं इथल्या किती जणांना इन्स्टिन्क्टिवली वाटतं सांगा. Happy

मॅथ माईंडला वाटत नाही. Lol पण हो! Lol त्यात पण गंमत आहे.
कॅनडात कोणाला पैसे द्यायचे असले तर पाच, दहा, वीस असे देताना बघितलेले आहेत. वर एक देताना आठवत नाही. आमच्याकडे १ ची नोट नाहीच, नाणं आहे पण तरी नाणं देताना बघितलं नाही. पण भारतात +१ शिवाय द्यायचा विचार ही मनात येणार नाही. Lol
मला फेसबुक मार्केट प्लेस वरुन काही घेतलं आणि पैसे नाण्यांत द्यायची वेळ आली तर कानकोंडं होतं आणि सॉरी म्हटलं जातंच. तेच पैसे नोटांत दिले तर ते फीलिंग येत नाहे.

११, २१, ५१, १०१ या राउंड फिगर्सच आहेत असं इथल्या किती जणांना इन्स्टिन्क्टिवली वाटतं सांगा.

#MeToo Wink

मीठ जमिनीवर सांडल कधी तर आमची आजी आता डोळ्याच्या पापणीने भर अशी शिक्षा द्यायची...

ही प्रथा आमच्याकडे सुद्धा होती.

लातुरचं संध्याकाळचं नाव मा लवण. >>> Lol

११, २१, ५१, १०१ या राउंड फिगर्सच आहेत असं इथल्या किती जणांना इन्स्टिन्क्टिवली वाटतं सांगा >>> Lol

अशा प्रथांना 'का?' प्रश्न विचारला की आमच्याकडे साधारण 'कारण असं श्राद्धाला करतात' हे ठरलेलं उत्तर असतं. >> सेम ! श्राद्ध किंवा तत्सम अशुभ दिवशी.

कुणी बाहेर गेल्यावर लगेच केर काढायचा नाही, लगेच आंघोळीला जायचं नाही. घरात भात तयार असेल आणि कुणी बाहेर जायला निघालं तर त्या भातातला घासभर तरी भात (कुणीही ) जेवल्याशिवाय त्या माणसाला बाहेर जाऊ द्यायचं नाही Proud यावरून 'कुकर कधी लावायचा?' यासारखे गहन प्रश्न निर्माण झालेले आहेत घरात!
अजून एक म्हणजे वाटीने पाणी प्यायचं नाही. वाटीने आमटी, सार, आमरस प्यायलेला चालतो, पण पाणी नाही. कारण श्राद्धाच्या वेळी पितात वाटतं.

अजून एक म्हणजे वाटीने पाणी प्यायचं नाही. >>> हो. हे आमच्याकडेही होते. श्राद्धाला कुणी वाटीतून पाणी प्यायल्याने आठवतही नाही. आणि हरमंदिरसाहिबमध्ये तर वाडग्यातूनच पाणी प्यायला दिले होते.

'कुकर कधी लावायचा?' यासारखे गहन प्रश्न निर्माण झालेले आहेत घरात! >> Lol
वाटीने पाणी प्यायचं नाही हे पण ऐकलं आहे. पण रजिस्टर झालेलं नाही. त्यामुळे लोकांचे डोके खाल्लेले नाही.
माणुस गेलं आणि त्या व्यक्तीला घरातून घेऊन गेले की कोकणात मागाहुन पाणी टाकतात बहुतेक. तर पणजी डोंबिवलीला गेली. तेव्हा घरात आत्याबाई होती. पणजीला घेऊन गेले आणि हिने भसाभस चार पाच बादल्या पाणी जिन्यात ओतुन दिले. आजी आता चिडू का हसू मोड मध्ये गेलेली. आत्याबाईला कोण सांगणात आणि सांगुन ऐकलं तर खरं हे एक दुसरं!

>>> कुणी बाहेर गेल्यावर लगेच केर काढायचा नाही, लगेच आंघोळीला जायचं नाही.
हो, हे आमच्याकडेही होतं आणि आता येडपट वाटलं तरी वळण पडून गेलं आहे मलाही.

पानात सर्वप्रथम नुसता भात वाढायचा नाही - हेही एक. डावी बाजू, उजवी बाजू,मग भात आणि माणूस पानावर बसलं की मगच त्या भातावर तूप.
हे बहुतेक वाढलेले पदार्थ पटकन गार होतात म्हणून असावं - मेक्स सेन्स.
तसंच सांडलेल्या खरकट्याला/अन्नाला केरसुणी लावायची नाही असंही सांगत (ओल्या फडक्याने पुसूनच घ्यायचं) - हेही कॉमन सेन्सला पटण्यासारखं आहे.

डावी बाजु उजवी बाजू वगैरे असेल तर ठीक. आम्ही आळशी माणसं नुसता भात आणि वरण/ आमटी खात असू तरी आई आधी वरणाचा एक थेंब वाढते. मग भात आणि मग भातावर परत वरण.
तूप पंगत बसली की मगच. Lol हे अर्थात गणपतीत चार लोक जेवायला असले तर. बाकी तुम्ही तुमचं घ्या मोड मध्ये काय वाटेल ते करा.

सांडलेल्याला केरसुणी नाही हे वाढत वाढत जाऊन रांगोळी घातली तरी ती केरसुणीने गोळा नाही करायची होतं. फडक्याने त्यात ते ओलं असेल तर रांगोळी गोळा करणे पेन इन द नेक आहे. केरसुणीने किंवा रोंबाने किंवा स्टिक व्हॅक्युमने एका मिनिटात होणारं काम तासंतास परत परंपरा वगैरे असतील तर मग बायकांनी करायची हौस असू नये. मॉप करायचा रोंबा वेट मेस ही चांगला साफ करतो.
पाहुणे जेवायला आले की त्यांचं जेवण झाल्यावर स्टिक व्हॅक्युम पटकन फिरवला की छान ना. ते जायची वाट बघायची का साफ करायला! Lol

Pages