“जेवणातला भात बंद करून टाकायचा, मग मधुमेहाची चिंता नको”,
“चहाबाज आहात का तुम्ही ? काही हरकत नाही ; मेंदूच्या आरोग्यासाठी ते चांगलंच”
“रोज तासभर चालत जा, मग हृदय कसे ठणठणीत राहील बघा”
"चॉकलेट भरपूर हादडत रहा; ती दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे”,
वगैरे. . .
वरील प्रकारची असंख्य विधाने आपल्या अवतीभवती रेंगाळत असतात. पारावरच्या गप्पा, निरनिराळी सामान्य वृत्तमाध्यमे आहे आणि आंतरजालाची ज्ञानगंगा हे त्यांचे प्रमुख स्त्रोत. अशा फुकटच्या आरोग्य सल्ल्यामध्ये आहारविषयक सल्ले हे सर्वोच्च स्थानावर आहेत हे सांगणे न लगे. गेल्या दोन दशकांमध्ये व्हाट्सअप सारख्या प्रसार आणि प्रचार विद्यापीठांनी देखील असल्या उथळ विधानांना फैलावण्याचे जोरदार काम केलेले आहे. अशी विधाने वारंवार अवतीभवती आदळत राहिल्याने जनमानसात काही गैरसमज/ मिथके दृढ होतात.
एखाद्या आजाराची कारणे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण व्हावे लागतात. ते निकष तपासून पाहण्याच्या वैज्ञानिक पद्धती प्रस्थापित आहेत. एखादा आजार जेव्हा मानवजातीत प्रथमच समजून येतो तेव्हा पहिली वैज्ञानिक पायरी म्हणजे त्या आजाऱ्याचे बारकाईने निरीक्षण करणे. अशा अनेक रुग्णांचे निरीक्षण केल्यानंतर त्यांची जीवनशैली आणि आरोग्य इतिहास यातून त्या आजाराच्या संभाव्य कारणांचा प्राथमिक अंदाज येतो.
मात्र, अमुक एक कारणामुळे तमुक आजार होतो, असे सप्रमाण सिद्ध करायचे झाल्यास त्यासाठी मोठ्या प्रमाणावरील शास्त्रशुद्ध संशोधन हाती घ्यावे लागते (randomised control trial, RCT). या संशोधनादरम्यान आजाराशी संबंधित मुख्य घटक समजून येतो तसेच त्या घटकावर परिणाम करणारे तब्येतीतील अन्य काही उपघटकही (confounders) विचारात घेतले जातात. असे सर्व घटक एकमेकांशी घासूनपुसून पाहिल्यानंतरच आजाराचा कार्यकारणभाव (causation) सिद्ध होतो. या सर्व प्रक्रियेनंतर विज्ञान हे मानते की ‘अ’ या घटकामुळे ‘ब’ हा आजार होतो (किंवा होत नाही).
परंतु काही आजारांच्या बाबतीत अशी वैज्ञानिक सिद्धता झालेली नसते. त्या आजारांचे अभ्यास निरीक्षण याच पातळीवर रेंगाळलेले असतात. ही संशोधनामधील अधलीमधलीच पायरी (correlation) ठरते. परंतु अनेक वृत्तमाध्यमे या महत्त्वाच्या मुद्द्याला सरळ बगल देऊन अशी अर्धवट अवस्थेतील माहिती बेधडकपणे वैज्ञानिक सत्य म्हणून सांगून मोकळी होतात.
आजाराचा कार्यकारणभाव समजून घेताना एका पूर्णपणे विरुद्ध संकल्पनेचा देखील विचार करावा लागतो. यालाच उलटा कार्यकारणभाव ( reverse causation) असे म्हणतात.
हा मुद्दा स्पष्ट होण्यासाठी एक उदाहरण पाहू :
समजा, “अ या घटकामुळे ब हा आजार होतो”
असे विधान जेव्हा आपण करतो, तेव्हा अ हा घटक किंवा घटना संबंधित माणसात आधी घडावी लागते आणि कालांतराने त्याचा परिणाम म्हणून ब हा आजार दिसून येतो.
याचे एक प्रयोगसिद्ध भक्कम उदाहरण म्हणजे, अनेक वर्ष केलेले धूम्रपान (अ) आणि फुफ्फुसांचा कर्करोग(ब).
( हे विधान 90% सत्य आहे. समजा, धूम्रपानाव्यतिरिक्त अन्य काही कारणामुळे जरी हा कर्करोग झालेला असला तरी कर्करोग आधी झाल्यानंतर ती व्यक्ती काही धुम्रपानास प्रवृत्त होत नाही हे उघड आहे. म्हणूनच त्या 90% केसेसमध्ये अ मुळे ब होतो हा कार्यकारण भाव पक्का होतो).
परंतु उथळ आरोग्य सल्ला देणारी काही विधाने असतात त्यांच्या बाबतीत मात्र अ मुळे ब होतो असे अजिबात नसून ब हा परिणाम अ च्या आधीच घडलेला असतो. म्हणजेच, ब हा आजार अन्य कुठल्या तरी (अज्ञात) कारणामुळे आधी होतो आणि मग त्या रुग्णाचे बारकाईने निरीक्षण केल्यावर आपल्याला अ हा घटक सापडतो, जो त्या आजारानंतर जीवनशैलीत शिरलेला असतो. आहे की नाही हा उफराटा प्रकार ? ("cart-before-the-horse”).
हा नीट समजण्यासाठी आपण मानवी शरीरातील विविध आजार/बिघाड पाहू.
१.
नैराश्य : काही संशोधक असे समजतात की लठ्ठ माणसांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असते. परंतु वास्तव तसे नसून बरोबर उलटे असते. कुठल्यातरी अन्य कारणामुळे व्यक्तीला नैराश्य येते. अशी व्यक्ती मग घरात सतत स्वतःला कोंडून घेते आणि टीव्ही आणि इंटरनेटमध्येच वेळ काढत बसते. त्यात रमलेले असताना वेफर्स आणि चिप्स खाण्याचे प्रमाण भरपूर राहते. तसेच व्यायामाकडेही दुर्लक्ष होते. याचा परिणाम म्हणून कालांतराने ती व्यक्ती लठ्ठ होते.
२.
चिंताग्रस्तता : कठीण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या कॉफी पिण्याच्या सवयीवरून एक गृहीतक मांडले गेले ते असे -
जे विद्यार्थी दिवसातून चार वेळा कॉफी पितात त्यांच्यात चिंतेचे प्रमाण अधिक असते. या उलट जे विद्यार्थी कॉफी पीतच नाहीत किंवा फार क्वचित पितात ते चिंतामुक्त असतात.
यानंतर शास्त्रशुद्ध प्रयोगांती लक्षात आलेले वास्तव मात्र वरील गृहीतकाच्या बरोबर विरुद्ध होते. ज्या विद्यार्थ्यांचा मुळातच चिंताग्रस्त होण्याचा स्वभाव होता, ते त्यावर उपाय म्हणून वारंवार कॉफी पीत होते असे लक्षात आले. आणि जे विद्यार्थी स्वच्छंदी होते, त्यांना मुळातच उठसूट कॉफी पिण्याची आवश्यकता वाटली नव्हती. म्हणजेच, अतिरिक्त कॉफीपानामुळे माणूस चिंताग्रस्त होत नाही.
३.
कोविड आणि ड जीवनसत्व : कोविड१९ पर्वाच्या सुरुवातीस असे लक्षात आले, की ज्या लोकांची ड जीवनसत्वाची पातळी कमी होती त्यांना झालेला कोविड गंभीर स्वरूपाचा होता. हे निव्वळ निरीक्षण होते. परंतु यावर काही संशोधकांनी घाईने मत मांडले, की ड जीवनसत्व हा कोविड सौम्य राहण्याचा उपाय होऊ शकतो.
त्यानंतर शास्त्रशुद्ध प्रयोग झाले. त्यातून असे समजले, की ज्या लोकांमध्ये ड जीवनसत्व कमी होते ते मुळातच वृद्ध, प्रतिकारशक्तीने दुबळे आणि कुपोषित होते. या सर्व घटकांमुळे ड जीवनसत्त्वाची पातळी कमी होते आणि अशा व्यक्तींमध्ये जरी ड जीवनसत्त्वाची पातळी नॉर्मल असली तरीही त्यांना झालेला कोविड तसाही गंभीर होण्याचा धोका राहतोच.
या घटनेतून confoundingची संकल्पना स्पष्ट होते. कुठल्याही एका घटकामुळे दृश्य परिणाम होत नसून जीवनशैलीतील अनेक घटकांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधातून तो आजार होतो आणि त्याची तीव्रता ठरते.
. . .
आता पुन्हा आहार आणि आरोग्य यासंबंधीच्या उथळ आणि फोल सल्ल्यांकडे येऊ. हे समजून घेण्यासाठी या लेखाच्या सुरुवातीच्या संवादांमध्ये दिलेले चॉकलेटचे उदाहरण सर्वोत्तम ठरावे. आधुनिक जीवनशैलीत भोजनोत्तर चॉकलेटयुक्त पदार्थ खाण्याची सवय आढळते. त्यामध्ये डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट असे काही प्रकार असतात. या संदर्भात चॉकलेटची आरोग्यासाठी भलामण करणारे संशोधन अत्यंत सामान्य स्वरूपाचे आहे. त्याची नीट चिकित्सा केली की त्यातील फोलपणा स्पष्ट होतो.
त्या प्रकारचे संशोधन असा दावा करते, की चॉकलेट खाणे हे हृदय आणि मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आता यातील वास्तव बारकाईने पाहू.
चॉकलेटमधील महत्त्वाचा घटक म्हणजे कोकोच्या बिया. त्यांच्यात काही ‘अँटिऑक्सिडंट’ घटक असतात. या घटकांचे आरोग्यदायी परिणाम तपासण्यासाठी केलेल्या शास्त्रीय संशोधनांमध्ये या बियांचा शुद्ध अर्क वापरला जातो. अशा संशोधनातून सुद्धा हा अर्क हृदय किंवा मेंदूसाठी आरोग्यदायी असल्याचे निर्विवाद सिद्ध झालेले नाही.
आता दुसरा मुद्दा. चॉकलेटप्रेमी लोक काही थेट बियांचा अर्क खात नाहीत. त्यांच्यासाठी मूळ कोकोमध्ये दूध व साखर घालून चविष्ट चॉकलेट प्रकार बनवले जातात. या प्रक्रियेमुळे दोन गोष्टी होतात :
१. शुद्ध कोकोत दूध मिसळल्यानंतर त्याच्यातील अँटिऑक्सिडंट घटक निष्प्रभ होतात, आणि
२. त्यातले दूध व साखरेचे प्रमाण बघता हा खायचा पदार्थ भरपूर उष्मांकयुक्त होऊन बसतो !
वरील मुद्दे लक्षात घेता चविष्ट चॉकलेटमुळे रोगप्रतिबंधाचे फायदे होण्याची शक्यता राहत नाही.
. . .
रोगजन्य घटक आणि काही आजार या संदर्भात कार्यकारण भाव आणि उलटा कार्यकारण भाव हे दोन्ही समजून घेतल्यानंतर आता एका रोचक मुद्द्याकडे वळतो आणि तो आहे ‘ द्विदिशात्मक (bidirectional) कार्यकारण भाव’. म्हणजेच,
अ मुळे ब घडते हे जितके खरे असते, तितकेच
ब मुळे सुद्धा अ वर परिमाण होतो.
याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा यांचा संबंध. काटेकोर शास्त्रशुद्ध संशोधनातून जे निष्कर्ष निघालेत ते समजायला अगदी सोपे आहेत.
“बैठ्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा वाढतो” हे विधान आता दोन्ही बाजूंनी तपासून पाहू
१. भरपूर बैठेपणा >>> व्यायामाचा अभाव >>> लठ्ठपणा.
२. लठ्ठपणा जर कुठल्याही उपायांनी कमी केला तर आपोआपच शारीरिक चपळता वाढते आणि बैठेपणा आपोआप कमी होतो.
या प्रकारचे अजून एक उदाहरण म्हणजे उच्चरक्तदाब आणि दीर्घकालीन मूत्रपिंड विकार यांचे एकमेकांशी असलेले नाते.
उच्च रक्तदाब दीर्घकाळ अनियंत्रित राहिल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते. तसेच मूत्रपिंडाचे कार्य जसे खालावू लागते तसा रक्तदाबही वाढता राहतो.
. . .
मधुमेह, लठ्ठपणा, काही प्रकारचे हृदयविकार आणि कर्करोग इत्यादी आजार जीवनशैलीशी निगडित आहेत. त्यांची कारणमीमांसा गुंतागुंतीची असते हे वरील विवेचनावरून लक्षात यावे. जीवनशैलीतील कोणत्याही फक्त एकाच घटकामुळे (अतिरेक किंवा न्यूनता) ते होत नाहीत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या जनुकीय संरचनेबरोबरच अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आजार होण्याच्या किंवा न होण्याच्या दृष्टीने कारणीभूत ठरतो. या आजारांची कारणे अथक शास्त्रशुद्ध संशोधनातूनच सिद्ध होतात. असेच संशोधन यथायोग्य उपचारांचा पाया ठरते. अर्धवट माहिती, सामान्य निरीक्षण किंवा हितसंबंध गुंतलेल्या उद्योजकांनी प्रायोजित केलेल्या तथाकथित संशोधनातून फसवी आणि बऱ्याचदा अशास्त्रीय माहिती पसरवली जाते. त्यापासून आपण सर्वांनी सावध रहावे, हा या लेखनाचा हेतू.
******************************************************************************************************
संदर्भ :
डॉक्टर , बऱ्याच दिवसांनी लेख
डॉक्टर , बऱ्याच दिवसांनी लेख लिहिलात . छान वाटले .
किती छान महत्वपुर्ण & समजेल
किती छान महत्वपुर्ण & समजेल असे लिहिलेत. वीश आय कूड सेंड टू व्हॉट्सॅप युनीव्हर्सीटी वाले काका लोक
छान लेख.
छान लेख.
आशु, लिंक शेअर करू शकतो की आपण.
मी माबोवरच्या बऱ्याच लेखांची लिंक शेअर करतो WA वर.
… अर्धवट माहिती बेधडकपणे
… अर्धवट माहिती बेधडकपणे वैज्ञानिक सत्य म्हणून सांगून मोकळी होतात….
+ १११
आणि त्यावर पूर्ण विश्वास ठेवणारे कोट्यावधी लोक आहेत.
लठ्ठपणा अनुवांशिक + जीवनशैली दोन्ही असतो यावर खूप चर्चा ऐकतो.
एका कुटुंबात साधारण एकाच प्रकारचे खानपान, जीवनशैली असते म्हणून सर्वच कुटुंबीय regular high sugar/fat food intake and less bodily movement प्रकारातले असले तर लठ्ठपणा वाढत जाणार, जन्मत: असो वा नसो.
रच्याकने,
bidirectional ला द्विदिशात्मक शब्द बेस्ट आहे !
आरोग्य लेखन आवडीने वाचून
आरोग्य लेखन आवडीने वाचून त्यावर नियमित प्रतिसाद देणाऱ्या वरील सर्व मंडळींना धन्यवाद !
. . .
*bidirectional ला द्विदिशात्मक शब्द बेस्ट आहे !
>>>> सौजन्य : गुगल.
याहून सोपा व कमी अक्षरी शब्द शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही जमला.
कोणी सुचवावा
लेख आवडला.
लेख आवडला.
आशु, लिंक शेअर करू शकतो की
आशु, लिंक शेअर करू शकतो की आपण>>+१ येस्स
X, Utube वर आरोग्यविषयक
छान लेख...
X, Utube वर आरोग्यविषयक आयुर्वेदिक उपायांची रेलचेल आहे. काही असतीलही गुणकारी पण या माध्यमांवरची माहिती विश्वसनीय आहेच असे म्हणता येत नाही. अजूनही कोलेस्टेरॉलचे अमेरिकन गौडबंगाल कळत नाही. फिजिक्सचे कुठले तरी संशोधन चुकीचे होते हे शंभर वर्षांनंतर कळले.
धन्यवाद !
धन्यवाद !
. . .
* फिजिक्सचे कुठले तरी संशोधन चुकीचे होते हे शंभर वर्षांनंतर कळले.
>>> ओह ! उत्सुकता चाळवली.
छान लेख
छान लेख
काही सिद्धांत आठवले जे पुढे
काही सिद्धांत आठवले जे पुढे चुकीचे आहे लक्षात आले:
सर्व विश्व अवकाश "इथर" माध्यमाने व्यापले आहे आणि अवकाशातून प्रकाश त्या माध्यमाद्वारे प्रवास करतो.
अणु हा पदार्थाचा सर्वात सूक्ष्म व "अविभाज्य" कण आहे.
खाल्लेलं जिरेल एवढी कामं आपण
खाल्लेलं जिरेल एवढी कामं आपण जागेपणी थोड्या थोड्या वेळाने करत नाही म्हणजेच नवीन कुचकामी जीवनशैली असं मी समजतो. मग कधीतरी कोणी हे लक्षात आणून देतो की तू ऐदी झाला आहेस तरी मनावर घेत नाही. चालता बोलता दम लागू लागल्यावर हे मग तपासण्यांतून उघड होतं. आणखी सल्ले घेण्यास आमचा मोबाईल तयारच असतो. मग ते जिरवण्याचं काम आम्ही एकदाचं सकाळी किंवा संध्याकाळी उरकतो. मारला जीवनशैलीला यूटर्न. हाय काय नाय काय.
* "अविभाज्य" कण आहे >>> रोचक.
* "अविभाज्य" कण आहे >>> रोचक. वाचायला पाहिजे
. . .
* एवढी कामं आपण जागेपणी थोड्या थोड्या वेळाने करत नाही >>> बैठ्या कामकाजाच्या बाबतीत दर अर्ध्या तासाने आपली खुर्ची सोडून चक्कर मारून येणे चांगले. मी तसे करतो.
छान लेख, कुमार सर!
छान लेख, कुमार सर!
ललेख आवडला.
ललेख आवडला.
छान लेख, आवडला .
छान लेख, आवडला .
फक्त भौतिकशास्त्रातील चुकलेल्या सिद्धांतामुळे सामान्य माणसाचे काही नुकसान होत नाही . पण वैद्यकशास्त्राचे तसे नाही .
bidirectional ला द्विमार्गी कसा वाटतो ?
थोडेसे अवांतर - दिवसातून किती वेळा खावे हा एक सध्या मला पडलेला प्रश्न . दिवेकर सांगतात कि दर दोन तासाने खा आणि Dr. दीक्षित सांगतात कि दिवसातून फक्त दोनदा . दोघेही आधुनिक वैद्यकशास्त्रवाले.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
. . .
* दिवसातून किती वेळा खावे
>>> लाखमोलाचा आणि एकमत होणे अशक्य असलेला प्रश्न !!
मध्यंतरी एका वैद्यकीय परिषदेत मी दोन डॉक्टर सहकाऱ्यांचे यासंबंधीचे मत ऐकले :
१. एकांच्या मते, दिवसातून फक्त दोनदाच जेवणे हे मुळात ‘फूड फ्याड’ आहे. अशी अनेक फ्याडस् येतात आणि जातात ! जर तुम्हाला खरोखरच तसे करणे झेपत असेल तर करा; अन्यथा विसरून जा .
२. दुसऱ्यांचे मत अत्याधुनिक संशोधनावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची जनुकीय संरचना वेगवेगळी असते. त्यानुसार प्रत्येकाने काय खावे, किती वेळा खावे आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम किती प्रमाणात करावा, हे ठरवावे लागते.
आता हे जाणून घेण्यासाठी genome sequencing या प्रकारचा व्यक्तिगत अभ्यास केला जातो. ज्यांना आहार आणि व्यायाम या बाबतीत अत्यंत काटेकोर धोरण स्वीकारायचे असेल, त्यांनी वरील प्रकारची चाचणी स्वतःवर करून घ्यावी आणि त्यातून जो निष्कर्ष येईल त्याप्रमाणे करावे. तसे करून देणाऱ्या प्रयोगशाळा आता भारतात देखील आहेत.
पुढे जाऊन ते डॉक्टर असे म्हणाले, की ज्याची जनुकीय धारणा दिवसातून तीन ते चार वेळा खाण्यायोग्य आहे त्याला जर तुम्ही सक्तीने दोनदाच ही पद्धत करायला लावलीत तर ते त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते ( त्यांनी suicidal हा शब्द वापरला ! )
* bidirectional ला द्विमार्गी
* bidirectional ला द्विमार्गी >>>
चांगला आहे. धन्यवाद !
Sorry for awantar pan
Sorry for awantar pan द्विमार्गी agdeech bisexual sathicha shabd watatoy
द्विमार्गी agdeech bisexual
द्विमार्गी agdeech bisexual sathicha shabd watatoy >>>> मान्य, पण एकाच शब्दाचे अनेक अर्थ असू शकतातच कि. द्विमार्गी हा two-way रोड साठी सुद्धा वापरता येईल.
bisexual = उभयलिंगी
bisexual = उभयलिंगी
द्विमार्गीचा अर्थ विषयाच्या संदर्भाने घ्यावा असे वाटते.
जर,
एकमार्गी = एकाच मार्गाने , रीतीने जाणारा (https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A...)
तर,
द्विमार्गी लेखातील मुद्द्याच्या बाबतीत बरोबर वाटतो.
छान लेख.
छान लेख.
bisexual साठी उभयगामी हा शब्द वाचला होता. homosexual समगामी.
Our comforting conviction
Our comforting conviction that the world makes sense rests on a secure foundation: our almost unlimited ability to ignore our ignorance.
- Daniel Kahneman,
बैठ्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा
बैठ्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा वाढतो >>> यात व्यायामाचा अभाव गृहीत धरलेला आहे ना?
अंगमेहनतीची जीवनशैली असेल तर मुद्दामून व्यायाम करावा लागत नाही. या अर्थाने असेल ना ते वाक्य?
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
. . .
१. उभयगामी / गमनी >>> योग्य.
यासंबंधी अधिक चर्चा इथे न करता गरज वाटल्यास शब्दांच्या धाग्यावर करूयात.
..
२.
* to ignore our ignorance. >>> वा ! हे खूप आवडले
..
३. व्यायामाचा अभाव गृहीत धरलेला आहे ना? >>
होय बरोबर.
<< बैठ्या कामकाजाच्या बाबतीत
<< बैठ्या कामकाजाच्या बाबतीत दर अर्ध्या तासाने आपली खुर्ची सोडून चक्कर मारून येणे >>
बैठ्या कामकाजामुळे होणारे तोटे टाळावे म्हणून मी लोळत पडतो नेहमी
<< एकांच्या मते, दिवसातून फक्त दोनदाच जेवणे हे मुळात ‘फूड फ्याड’ आहे.... त्यांनी suicidal हा शब्द वापरला ! >>
With due respect to his qualifications, ते डॉक्टर मूर्ख आहेत. हे मुद्दाम सांगा त्यांना. मी कधीच ब्रेकफास्ट करत नाही, दोनदाच जेवतो (ते पण पोट भरेपर्यंत, तडस लागेपर्यंत नाही). हे मी दीक्षित डाएट येण्यापूर्वीपासून, माझ्या लहानपणापासून करत आहे. ( तुमच्याच दुसऱ्या कुठल्यातरी धाग्यावर हे लिहिले आहे.) माझें वजन गेले अनेक दशके +/- ५% बदलते, BMI २१-२२ आहे. माझा सल्ला आहे की नियमित व्यायाम करा, एकच शरीर मिळाले आहे त्याची काळजी घ्या आणि शरीर तुम्हाला संकेत देते, ते ऐका. कुठलाच डॉक्टर ते १००% ऐकू शकत नाही.
>With due respect to his
>With due respect to his qualifications, ते डॉक्टर मूर्ख आहेत. हे मुद्दाम सांगा त्यांना.
@उपाशी बोका शब्दप्रयोग जपून करा. ते चुकीचे आहेत किंवा तुम्हाला हे लागू होत नाही हे तुम्हाला वेगळ्या प्रकाराने सांगता येऊ शकते.
नेहमीप्रमाणेच छान व
नेहमीप्रमाणेच छान व माहितीपूर्ण लेख.
omega-3 बद्दल काही सांगता येईल का ? याच्या गोळ्यांबद्दल व्हाट्स अॅ पवर बरच काही उलट सुलट वाचलय
नेहमीप्रमाणेच छान व
नेहमीप्रमाणेच छान व माहितीपूर्ण लेख.
omega-3 बद्दल काही सांगता येईल का ? याच्या गोळ्यांबद्दल व्हाट्स अॅ पवर बरच काही उलट सुलट वाचलय
नेहमप्रमाणेच अतिशय साध्या
नेहमप्रमाणेच अतिशय साध्या ओघवत्या शैलीत लिहिलेला माहितीपूर्ण लेख.
अजून वाचायला आवडेल.
Pages