प्रयोजन भाग ४

Submitted by पर्णीका on 17 November, 2024 - 23:48

।।४।।
“अमृता प्लीज अशी घाबरुन जाऊ नकोस. मला वेड लागले नाही. निदान आतापर्यंत तरी. माझी विचार करण्याची क्षमता अजुन शाबूत आहे. “

“यामिनी तू आता मला जे काही सांगितलेस त्याचा मला अर्थच लागत नाहीये. असं कसं होईल?”

“मी म्हणाले होते ना तुला, माझा स्वता:चाच ह्या सगळ्या वर विश्वास बसत नाहीये म्हणून. तुझा किंवा इतर कुणाचाही बसणार नाही हे माहिती आहे मला.”

“तुझ्या आत कुणीतरी अजुन पण आहे म्हणजे नक्की काय? नक्की काय जाणीव होते तुला? कसं कळत ती तुझ्याशी संवाद साधतेय ते. तु तिच्याशी बोलतेस म्हणजे एकटीच बोलत असतेस तु?”

“नाही मी बोलत नाही तिच्याशी कारण ती कुणी व्यक्ती नाही. मी तिला पाहू शकत नाही. पण ती अस्तित्वात आहे. मी एकटी असताना मला तिचं अस्तित्व जाणवत.”

“मला अजुनही कळत नाहीये तुला काय म्हणायचे आहे ते. तू म्हणतेस की ती कुणी व्यक्ती नाही पण तरीही तुला तिचं अस्तित्व जाणवत. ती स्त्री आहे हे पण तुला माहिती आहे. तु तिच्याशी बोलत नाहीस तरी पण ती तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे.‌ एकाच वेळी अशा दोन विरुद्ध गोष्टी कशा खऱ्या असु शकतील यामिनी?”

“अगदी हाच गोंधळ माझ्या मनाचाही उडालाय अमृता. मलाही ह्याचा अर्थ लागत नाहीये. मला आता पर्यंत वेड लागले नाहीये असे मला जे वाटतेय ते तरी खरे आहे का नाही कोणाला माहिती.”

“शांत हो यामिनी. रडु नकोस. हे पाणी पी. तुला अजिबात वेड लागले नाहीये. हे जे काही चाललंय त्यात काही तरी विचित्र, ऍबनॉर्मल आहे हे तुला कळतंय ह्यातच काय ते आले. तु मला सगळे सुरुवातीपासून सांग त्यातुन तुलाही क्लॅरिटी येईल आणि मलाही. आपण आधी सगळे नीट समजुन घेऊ मग ह्यावर काय करता येईल ते शोधू.”

“मी गेल्या डिसेंबरमध्ये भारतात जायचं अचानक ठरवले. अगदी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मला कळले की काही मेंटेनन्स इश्यु मुळे आमची लॅब बंद राहणार आहे महिनाभर. लॅब बंद रहाणार म्हटल्यावर मी तिकीट बघितले आणि योगायोगाने मला चांगल्या किमतीत तिकीट मिळालेही. “

“विमानात नेमका माझ्या सीट साठी असणारा स्क्रीन चालत नव्हता. मी बरोबर पुस्तक किंवा किंडल ही आणलेले नव्हते. लॅपटॉपची बॅटरी संपल्यावर काय करावे ते न कळुन डोळे बंद करून बसले होते तेव्हा पहिल्यांदा तिने मला साद घातली.”

“साद घातली म्हणजे?”

“ आपण जेव्हा मनात विचार करतो तेव्हा आपण स्वतः शी संवादच करत असतो ना? म्हणजे मी यामिनी माझ्याशीच बोलत असते, बरोबर? “

“हो”

“त्या विमानात डोळे बंद करून बसले होते तेव्हा पहिल्यांदा मला अशी जाणीव झाली की माझ्या मनात यामिनी व्यतिरिक्त अजुन कुणीतरी आहे आणि ती मला म्हणजे यामिनीला हाक मारुन, माझे लक्ष वेधुन घेण्याच्या प्रयत्नात आहे.”

“मग?”

“पहिल्यांदा मला हसुच आले. मला वाटले अतीशय बोअर झाल्याने माझं मन हा असला काही बाही विचार करतंय. मग स्वतःला गुंतवण्यासाठी मी पुण्यात गेल्यावर काय काय करायचे त्याची यादी करायला घेतली मनातच. अम्माच्या हातचे कुठले पदार्थ खायचे, कुठे कुठे आणि काय खरेदी करायची, आजी कडे कोइंबतूरला एखादी धावती भेट शक्य होईल का? असे काही बाही विचार ठरवुन करायला लागले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तिचे अस्तित्व सतत जाणवत होते.

पुण्याला गेल्यानंतर मी कशात ना कशात गुंतले होते. त्यामुळे फार काही जाणवले नाही. परतीच्या प्रवासात मात्र पुन्हा ते जाणवायला लागले. मी बघत होते त्या पिक्चर मध्ये पण लक्ष लागेना. खुपच अस्वस्थ करणारा अनुभव होता तो. तरीही मनात कुठे तरी असे वाटत होते की हा सगळा मनाचा चाळा आहे. मागच्या वेळी हे सगळे झाले त्याची भिती मनात बसली आहे. विमानातून उतरले की हे सगळे भास थांबतील.

पण ते नंतर कधीच थांबले नाहीत. इथे आल्यानंतर जेट लॅग, मागे पडलेल कामाचं गाड रुळावर आणणे, पेपर वर आलेल्या रिव्ह्युवरस् च्या कमेंट्स ऍड्रेस करणे ह्या सगळ्यात मी बिझी होते निवांत विचार करत बसले आहे असं कधीच झालं नाही. तरी पण त्यातल्या त्यात एकटी असीन तेव्हा म्हणजे ट्रेडमिल वर चालताना, रात्री घरी येऊन स्वयंपाक करताना, सगळे आटपुन बेडवर पडल्यावर अर्धवट गुंगीत इ. तिची हाक यायचीच.

माझ्या ही नकळत मी तिला विनंती करायला लागले. मला ह्या सगळ्याची खुप भीती वाटतेय. प्लीज माझ्याशी बोलण्याचा आग्रह धरु नकोस. त्या दिवशी पेपरच फायनल डिसिजन येणार होते, नाही म्हंटले तरी ऍंझायटी होतीच. त्यामुळे मी लॅब मधले काम ठेवलेच नाही त्यादिवशी. काहीबाही रॅंडम पेपर्स वाचत बसले होते.

त्या दिवशी मला पहिल्यांदा लक्षात आले, की मी तिची विनंती अमान्य करायला का होईना तिच्याशी नियमित बोलते आहे. ती एक स्त्री आहे जिची धुसर प्रतिमा माझ्या जाणिवेत तयार होते आहे. ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतेय हा माझा भास नाहीये. ही जाणीव झाल्यावर मी मुळापासून हादरले.

हे जे काही चाललंय तो माझ्या मनाचा खेळ नाहीये, अमृता. ती खरंच अस्तित्वात आहे. तिला माझ्याशी बोलायचे आहे. ह्या जाणीवेची मला खूप भिती वाटते. पण त्याच बरोबर तिला काय सांगायचे आहे ही उत्सुकता पण आहे. त्यामुळे एकदा तिच्याशी बोलावे हा मोह मला हल्ली वरचेवर होतो. जितकी मी ह्यावर जास्त विचार करते, तितकाच हा गुंता वाढत चाललाय.”

Group content visibility: 
Use group defaults

छान!

आता या सगळ्याची कशी सांगड घातली जातेय त्याची उत्सुकता वाढली आहे Happy