मराठी गझलेने घेतलेली काही आशयविषयक वळणे

Submitted by बेफ़िकीर on 14 November, 2024 - 11:50

काही दिवाळी अंकांसाठी माझेही लेखन मागवण्यात आले होते यंदा! (ऐकावे ते नवलच)

तर त्यापैकी 'महासागर' या अंकात छापून आलेला माझा 'गझलेतील गेल्या काही वर्षातील वळणे' या विषयावरचा लेख:

=====

मराठी भाषेत खर्‍या अर्थाने गझलविधा ही स्व. सुरेश भटसाहेबांनी आणली हे सर्वश्रुत आहेच. भटसाहेबांची स्वतःची गझल जितकी उत्तुंग होती तितक्या पातळीवर मराठी गझलकार नंतर पोचू शकलेले नाहीत हे थोडे निराशाजनक वास्तव आहे. भटसाहेबांच्या गझलेत एकाचवेळी दिसू शकणारी हळवी तरलता आणि तेजस्वी शब्दरचनेने ओथंबलेल्या ओळी हे मिश्रण कितीही आव आणला तरी नंतरच्या फळीतील गझलकारांना आत्मसात करता आले नाही. किंबहुना ते त्यांच्या निसर्गतः नव्हतेच. भटसाहेबांच्या स्वतःच्या गझललेखनाचा प्रभाव इतका मोठा आहे की आजही ना त्यांच्या नामोल्लेखाशिवाय मराठी गझलेचे कोणते संंमेलन सुरू होत, ना कोणता परिसंवाद!

ज्या काळात भटसाहेबांनी मराठी भाषेत गझलेची स्थापना केली तो काळ गझलविधेला पोषक असा काळ नव्हता. गझलेच्या बंदिस्त आकृतीबंधाचे वावडे असण्याचा तो काळ होता. खरे तर हा आकृतीबंधही मराठी कवी व रसिकांना भटसाहेबांनीच माहीत करवून दिला. 'इतके बंदिस्त साचेबद्ध लिहून जर यमके, अंत्ययमके आणि स्वरचिन्हे हे सगळे काही जपत काव्य लिहायचे असेल तर त्यात नैसर्गिकता ती कोणती' हा प्रश्न समकालीन कवींनी उभा केला व त्यांच्या कथित विरोधात या विधेची स्थापना करण्याचा संघर्ष भटसाहेबांना करावा लागला असे समजते. इतक्या बंदिस्ततेमध्येही इतके उत्तुंग व सहज-प्रेरित वाटेल असे काव्य निर्माण होऊ शकते हे सिद्ध करण्याचे शिवधनुष्य भटसाहेबांना पेलावे लागले व ते त्यांनी लीलया पेललेही! हे करताना आपसूकच त्यांच्या गझल लेखनात या व इतर प्रकारच्या संघर्षांचे पडसाद उमटले. अलवारता जितक्या अलगदपणे त्यांच्या गझलेत प्रवेशली तितक्याच सहजतेने शाब्दिक प्रहारही सामील झाले व 'शेवटी मीच योग्य होतो' ही भावनाही प्रतिबिंबित झाली. येथे गझलेच्या मराठी स्वरुपाची मुहुर्तमेढ रोवली गेली असे म्हणता येईल. प्रेयसीशी किंवा एकुणच प्रेमविषयक हितगुज करताना कमालीची तरल होत जाणारी गझल समाजाबद्दल किंवा कवीला अप्रिय असलेल्या व्यक्तींबद्दल व्यक्त होताना शाब्दिक आसूड ओढू लागली. उर्दू गझलेचे जे मूळ स्वरुप आहे त्यात निव्वळ प्रेमच नाही तर समाज, संघर्ष, शोषण, अपयश, व्यसने, नातीगोती असे अनेक विषय येतात, मात्र त्यांची अभिव्यक्ती बरीचशी संयत व हळुवार असते. मराठी गझलेने अभिव्यक्तीच्या या शैलीपासून जणू काहीशी फारकत घेतली. मराठी गझल ही दुसर्‍यावर टीका करणे, दुसर्‍याची खिल्ली उडवणे यासाठीही वापरता येते ही भावना रुजत गेली.

तेथपासून ते आजपर्यंत मराठी गझलेने आशय-विषयक अशी असंख्य वळणे घेतलेली आहेत. भटसाहेबांच्या दिव्य लेखणीतून साकार झालेली गझल ज्या शिखरावर पोचली ते अजून अस्पर्शच राहिले आहे. मात्र गझलेने तेवढी उंची गाठली नसेल तरी तिची व्याप्ती वाढली आहे.

भटसाहेबांचे गझललेखन ते सुमारे इ.स. दोन हजार दहा हा काळ बराचसा एकसूरी आशयाचा राहिला. भाषाशैली, प्रतिमा, वृत्तांची योजना, या गझलेच्या साच्याशी निगडीत बाबीही साधारण समान राहिल्या व आशयही साधारण हळुवार किंवा टीकात्म या दोन रुळांवरच पुढे जात राहिला. याला कारणीभूत होता एक दरारा, जो भटसाहेबांच्या गझलेबाहेर जाऊन प्रयोग करावेत की करू नयेत या विचारांवर हावी झालेला होता. मात्र हळूहळू नवनवे प्रयोग होऊ लागले. बाणेदार, तीक्ष्ण, दुसर्‍याला कस्पटासमान लेखणारी भाषाशैली हळूहळू बदलू लागली.

या ठिकाणी आणखी एक उल्लेख होणे आवश्यक आहे तो म्हणजे मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर यांचा! भाऊसाहेब पाटणकर यांचे शायरीचे कार्यक्रम तुफान गाजलेले असले तरी त्यांनीही शायरीला जो रंग दिला तो गझलेच्या मूळ प्रवृत्तीच्या अगदी उलट होता. मी सूर्यापेक्षा मोठा, मी प्रेयसीला किंमत न देणारा वगैरे अश्या स्वरुपाची शायरी करून त्यांनी तात्कालिन व आजकालीन मराठी रसिकांना उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवायला लावल्या असतील हे ठीक आहे, पण या काव्यात दर्द नव्हता. ही शायरी नुसतीच मंचीय नव्हती तर शायरीचा दर्जा बाधित करणारी होती. तिला टाळ्यांची आणि वाहवाची तहान होती पण एखाद्या रसिकाने अंतर्मुख व्हावे अशी त्या शायरीची इच्छाही नव्हती आणि तयारीही नव्हती. तंत्राबाबत बोलायचे तर भटसाहेबांच्या बाराखडीत दिलेल्या नियमांमध्ये असंख्य तडजोडी करून अवतरलेली अशी ती शायरी होती.

मराठी रसिकांनी 'आपण आपली अभिरुची वाढवावी का आणि वाढवावी तर कशी' यावर स्वतः तर कधी फारसा विचार केलेला दिसतच नाही पण मोठमोठ्या कवींनीही त्यांना तसा विचार करण्यास प्रवृत्त केलेले जाणवत नाही. याचा परिणाम असा झाला की काही ठराविक नावे मोठी होत राहिली व नाविन्याचे प्रयोग दुर्लक्षित होत राहिले.

दोन हजार दहा नंतर मात्र विरह, समाज, राजकारण, पुढारी, ग्रामीण माणसाचा संघर्ष, गरिबी, नातीगोती, स्वतःचे अपयश कथन करणे, दुसर्‍याला महत्व देणे, दुसर्‍याचा सन्मान राखणे, अदबशीर शेर-लेखन हे प्रकार गझलेत प्रकर्षाने येऊ लागले. गझल म्हणजे फक्त 'बघा, मी किती भारी आणि दुसरे किती फालतू' ही व्याख्या बदलू लागली. गझलकार तटस्थपणे भोवताल निरखू लागले व जे म्हणावेसे वाटते तेच म्हणू लागले. मुख्य म्हणजे हळूहळू या वळणाचे स्वागत होऊ लागले. या दरम्यान आणखी एक गोष्ट होऊ लागली ती म्हणजे भटांच्या शिष्यगणांनी आपापल्या विचारधारेत पुढील गझलकारांना सामावून घेण्याचा जो आटोकाट प्रयत्न वर्षानुवर्षे चालवला होता त्याला खीळ बसली. तरुण गझलकार हे नव्या उमेदीने व आत्मविश्वासाने स्वतःच्या लेखनाची सार्थ जबाबदारी घेऊ लागले. त्यांना आता प्रमाणपत्रांची गरज राहिलेली नव्हती. एखादा गंभीर सामाजिक विषय जबाबदारीने गझलविधेत मांडता येतो व अधिक परिणामकारकरीत्या रसिकांपर्यंत पोचवता येतो हे या गझलकारांच्या फळीने स्वतःहून सिद्ध करून दाखवले. येथे गझलेने एक मोठे वळण घेतले. ते म्हणजे व्यक्तीप्रवण असलेली गझल ही विचारप्रवण बनली.

त्यानंतरची सुमारे आठ वर्षे ही नवीन गझलकारांना सुवर्णकाळ वाटावा अशीच होती. असंख्य गझलसंग्रह निघाले. असंख्य मुशायरे होऊ लागले. कित्येक कार्यशाळा होऊ लागल्या. अनेक पुरस्कार निर्माण झाले. या सर्व प्रक्रियेत अर्थातच विविध कंपू निर्माण होणे अगदी नैसर्गिक होते. मात्र हे कंपू एकमेकांशी शतृत्व घेत नव्हते. आजही घेत नाहीत. ते आपापले काम आपापल्या शैलीने करत राहतात. जवळपास प्रत्येक शहरात गझलेसाठी एखादे तरी त्या शहरातील असे व्यासपीठ आहे. अनेक गझलविषयक संस्था आहेत. महाराष्ट्रातील आजचे शेकडो गझलकार एकमेकांना चांगले ओळखतात व सौहार्दाचे संबंध ठेवूनही असतात. भटसाहेबांच्या नंतर जी एक अनागोंदी होती आणि श्रेष्ठत्व लाटण्यासाठी अहमअहमिका सुरू होती ती आता फारशी दिसत नाही. आता निव्वळ गुणवत्तेवर गाजण्याचा काळ आला आहे हे मराठी गझलकारांना समजलेले आहे. ही प्रचंड स्वागतार्ह बाब आहे. गझलविषयक होत असलेले हे कार्य आता फार व्यापक व अधिक आशयपूर्ण असे झालेले आहे. मात्र नेमके याच काळात गझलेने आणखी एक वळण घेतले जे गझलेसाठी हानिकारक होते पण सुदैवाने आता तेही मागे पडले आहे. हे वळण म्हणजे, या काळात गझलेला मंचीय स्वरुपाचे आकर्षण जडले. हे आकर्षण काही वेळा तर इतके पराकोटीला पोचले की गझलेचा शेर म्हणजे काहीतरी विनोदी आशय सादर करून शिट्ट्या, टाळ्या व हसे मिळवणे असे वाटते की काय ही वेळ आली होती. याच काळात सोशल मीडिया फोफावल्याने लहानातील लहान गझलकार आणि मोठ्यातील मोठा गझलकार असे सगळे अचानक एकाच ऑनलाईन मीडियाच्या मंचावर आले. आता दर्जा महत्वाचा की गाजणे महत्वाचे, आह महत्वाची की वाह महत्वाची, उद्गार महत्वाचा की टाळी महत्वाची या द्विधा स्थितीत मराठी गझल येऊन पडली. काहीही झाले तरी माणसाला गाजण्याचे सुप्त आकर्षण हे असतेच. त्यामुळे टाळीबाज, मंचीय शेरांना भाव मिळू लागला आणि गझलेने हे दुर्दैवी वळण घेतले. गझल वाचण्यातील आनंदापेक्षा ऐकण्यातील आनंद वाढू लागला. यामुळे गझलेच्या आशयाचे रंगही बदलू लागले. पुन्हा एकदा शेरांमधून शेखी मिरवणे किंवा प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणारे शेर रचणे अशी शैली मूळ धरू लागली. मुशायरे भरवणार्‍या संस्थांचे शीर्शस्थ नेते हे स्वतः ताकदीचे गझलकार नसणे हे त्यामागचे मूळ कारण होते असेही म्हणता येईल. मात्र या काळात प्रतिमासृष्टीच्या पातळीवर मराठी गझलेने अद्वितीय उंची गाठली. नवनव्या निरनिराळ्या प्रतिमा, उपमा, प्रतीके यांची योजना होऊ लागली. गझलतंत्र मात्र सुदैवाने अबाधित राहिले.

याच दरम्यान सोशल मीडियाच्या विस्फोटामुळे आणखी एक बाब अशी झाली की 'सुचलेला एकच शेर सोशल मीडियावर पोस्ट करून' वाहवा मिळवण्याची शैली सार्वत्रिक झाली. यामुळे, संपूर्ण गझल रचण्यासाठी जी एक मनस्थिती, जो एक संयम आणि जी एक परिपक्वता आवश्यक असते ती लोप पावू लागली. हा शेर म्हणजेही मतला असण्याची आवश्यकता नव्हती. केवळ एक शेर! त्यामुळे, आज सकाळपासून काही सुचले नाही, चला, काही सुचले नाही यावरच एक शेर लिहून पोस्ट करू, अश्या प्रकारची काहीतरी भावना मूळ धरू लागली. हे वळण एकुण गझललेखनाला काहीसे हानिकारक आहे. हे वळ आजही बर्‍यापैकी प्रमाणात आढळून येत आहे. मात्र आता गझलसंग्रहांची संख्या समाधानकारकरीत्या वाढू लागल्याने संपूर्ण गझल लेखन करण्याकडे कल वाढू लागला आहे हे सुखद आहे.

हे सर्व सुरू असतानाच भारतातील सरकार २०१४ साली बदलले. राजकारणात झालेला सत्तापालट आणि सोशल मीडियाचा विस्फोट हे दोन्ही साधारण एकाचवेळी झाले. त्यामुळे, राजकीय टीकाकारांच्या वाणीला असीम प्रखरता लाभली आणि तिचे पडसाद काव्यात उमटू लागले. जी गझल सुरुवातील व्यक्तीप्रवण व नंतर काहीशी विचारप्रवण होती ती आता समाजघटक-प्रवण होऊ लागली. कोणी आपापल्या जातीपुरते लिहू लागला तर कोणी दुसर्‍या समाजघटकाची निंदा करू लागला. या वळणाला अर्थातच गझलक्षेत्राची माफक व मर्यादीत दाद मिळाली याचे कारण मर्यादीत समूहालाच अश्या प्रकारच्या काव्याचा आनंद मिळू शकत होता.

मात्र, या सर्व प्रकाराचा अतिरेक झाल्यानंतर पुन्हा एकदा गझलक्षेत्राला भान आले व पुन्हा गझलेने गंभीर वळण घेतले. यातच, गझलेसाठी निस्पृहपणे पदरमोड करणारे, चांगल्या गझलेला खुल्या दिलाने नावाजणारे असे अनेक आधारस्तंभ महाराष्ट्रात उभे राहिले. आजही काही संस्था, काही व्यक्ती मराठी गझलेच्या प्रसारासाठी नेकदिलाने काम करत आहेत. आता गझलकारांमधील प्रगल्भताही वाढली आहे. गझलने सध्या घेतलेले जे वळण आहे ते अर्थातच आजवरचे सर्वात आधुनिक वळण आहे. यात प्रचलीत परभाषिक शब्दांचा वापर चांगल्या प्रकारे होत आहे. अकारांत स्वरकाफिया मराठी गझलेत घेऊ नये हा संकेत मात्र काहीजण पाळत नाहीत हे दुर्दैवी आहे. याने गझल पुढे अशुद्ध होत जाईल. मात्र आजच्या गझलेतील आशय हा सन्मान्य पातळीला पोचलेला आहे. त्यातच महिला गझलकारांची संख्या सुखदरीत्या वाढल्याने गझलेच्या आशयाला निराळेच रंग प्राप्त होऊ लागले आहेत. प्रथा, रुढी, निसर्ग, नाती, प्रेम, वियोग, संघर्ष, सोसणे, निराशा, आशा, वक्रोक्ती, उपहास, विरोधाभास, अश्या अनेक अंगांनी आज गझलेचा विकास होत आहे. प्रमाण मराठी भाषाही गझलेच्या माध्यमातून टिकवली जात आहे आणि प्रांतीय, स्थानिक मराठीची रुपेही मराठी गझलेला सजवत आहेत. विदर्भ, खानदेश, कोकण, मराठवाडा येथील खास भाषाशैलीही आता गझलेत स्थिरावत आहे. त्यामुळे खूप अधिक रसिकसंख्येला हा काव्यप्रकार आपलासा वाटू लागला आहे. खूप अधिक गझलकारांना यात प्रयत्नरत व्हावेसे वाटू लागले आहे.

आता गझलेने एक आणखी महत्वाचे वळणही घेतले आहे. इतकी वर्षे गझल हा केवळ गझलकार म्हणून मिरवण्याचा व सुप्रसिद्ध ठरण्याचा प्रकार होता जणू! मात्र आता गझलेमध्ये काहीजण करिअर करू शकत आहेत. गझलविषयक विविध प्रकारचे लेखन आता विद्यापीठांमध्ये अभ्यासले जात आहे. विविध संस्थांमार्फत होणार्‍या गझलकार्याच्या माध्यमातून उलाढाल होऊ लागली आहे. मराठी गझलेला दूरचित्रवाणीवर चांगले स्थान मिळाले आहे. ऑनलाईन कार्यक्रमांची संख्याही सुखदरीत्या वाढत आहे. निव्वळ गझला ऐकवण्याचे कार्यक्रम तिकीट काढून बघितले जात आहेत.

खरे तर हा मराठी गझलेसाठी एक प्रकारे सुवर्णकाळच आहे. या काळात गझलकारांनी चांगली गझल रचून गझलेला न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.
=====
-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता वरवर चाळला आहे, मोठा आढावा घेतलेला दिसतो आहे.
काही मुद्दे पटले, काही प्रश्न पडले, पण पुन्हा नीट वाचून, नीट विचार करून ते विचारेन. Happy

(लेख दोनदा पोस्ट/पेस्ट झाला आहे तो वाचकांनी दोनदा वाचावा म्हणूनच की काय? Proud )

Proud लोक एकदाही वाचत नाहीत म्हणून

(संपादित केला आहे, अजूनही योग्य संपादन झाले असेल की नाही सांगता येत नाही. याचे कारण असे की मुळात असे झाले कसे हेच कळले नाही Proud )

अवश्य मतप्रदर्शन करावेत Happy

सर्वप्रथम दिवाळी अंकांसाठी लेखन मागवलं गेल्याबद्दल अभिनंदन. Happy

मराठी (एकूणच) गझलेबद्दलची तुमची सक्रीय आस्था माहीत असल्यामुळे लेख अपेक्षेने वाचला. याला शब्दमर्यादा दिली गेली होती का? कारण लेख मला त्रोटक वाटला, मुख्य म्हणजे उदाहरणांची कमतरता जाणवली. कदाचित तुमचा 'टार्गेट ऑडियन्स' हा माझ्यापेक्षा माहीतगार असावा.

माझ्यासारख्या गझलक्षेत्राशी फारसा संबंध नसलेल्या / न उरलेल्या वाचकांना

>>>
भटसाहेबांचे गझललेखन ते सुमारे इ.स. दोन हजार दहा हा काळ बराचसा एकसूरी आशयाचा राहिला. भाषाशैली, प्रतिमा, वृत्तांची योजना, या गझलेच्या साच्याशी निगडीत बाबीही साधारण समान राहिल्या व आशयही साधारण हळुवार किंवा टीकात्म या दोन रुळांवरच पुढे जात राहिला
...
दोन हजार दहा नंतर मात्र विरह, समाज, राजकारण, पुढारी, ग्रामीण माणसाचा संघर्ष, गरिबी, नातीगोती, स्वतःचे अपयश कथन करणे, दुसर्‍याला महत्व देणे, दुसर्‍याचा सन्मान राखणे, अदबशीर शेर-लेखन हे प्रकार गझलेत प्रकर्षाने येऊ लागले
...
जी गझल सुरुवातील व्यक्तीप्रवण व नंतर काहीशी विचारप्रवण होती ती आता समाजघटक-प्रवण होऊ लागली
<<<
या सर्वांची वानगीदाखल उदाहरणं वाचायला आवडलीही असती आणि तुमचा विचार अधिक स्पष्टपणे पोचला असता असं वाटलं.
तुम्ही यापूर्वी अन्य कवींच्या काही काव्य/गझलसंग्रहांची ओळख करून दिल्याचं आठवतं, त्यामुळे हे आणखीनच प्रकर्षाने वाटलं.

भटसाहेबांचं कर्तृत्व वादातीत आहेच. एकाच व्यक्तीत पाणिनी आणि कालिदास दोन्ही वसत असावेत तसं त्यांनी व्याकरणही लिहिलं आणि ते वापरून उत्तम साहित्यनिर्मितीही करून दाखवली.
>>> इतके बंदिस्त साचेबद्ध लिहून जर यमके, अंत्ययमके आणि स्वरचिन्हे हे सगळे काही जपत काव्य लिहायचे असेल तर त्यात नैसर्गिकता ती कोणती' हा प्रश्न समकालीन कवींनी उभा केला
हे वाचून खरंच नवल वाटलं. मराठीत वृत्तबद्ध आणि तरीही आशयघन कविता आणि गीतं लिहिली जात होतीच की, मग गझलला असा विरोध का झाला असावा काही समजत नाही.

भटांव्यतिरिक्त लेखात एकच नामोल्लेख आला आहे तो पाटणकरांचा याची मजा वाटल्याशिवाय राहिली नाही. तुम्ही त्यांच्याबद्दल मांडलेल्या मतांशी अर्थातच सहमत आहे.

मंचीय गझलबद्दल तुम्ही काहीशा नाराजीने लिहिलेलं दिसतं. ते का हे समजून घ्यायला मला आवडेल. गझल मुळात लिहा-वाचायचं साहित्य नव्हतंच ना कधी? 'शेर कहना' असाच शब्दप्रयोग वापरला जातो ना?
खेरिज प्रत्येकच कलाप्रकारात असे प्रवाह असतातच की, त्यातलं जे सकस असतं तेच काळाच्या प्रवाहात टिकतं, बाकी दोनचार टाळ्या मिळवून अस्तंगत होतं, नाही का?

तसंच एखादाच शेर पोस्ट करण्याबाबतही मला वाटतं. प्रत्येक शेर ही स्वतंत्र संपूर्ण कविता असणं हेच जर गझलचं गमक असेल, तर ती एक स्वतंत्र परिपूर्ण कविता पोस्ट केली तर बिघडलं कुठे? तिची पुढे गझल होईलही किंवा नाहीही.

असो - हे प्रश्न तुम्हाला कमी आणि माझं प्रकट चिंतन अधिक झालं आहे बहुधा - मात्र ते करायला लावल्याबद्दल अनेक आभार.
तुमची भूमिका समजून घ्यायला आवडेल.
तसंच अंकाला शब्दमर्यादा असतील, पण इथे काही सहज आठवणारी उदाहरणं दिलीत तर फारच आवडेल!

*** अवांतर ***
>>> या विचारांवर हावी झालेला होता.
हा शब्दप्रयोग मराठीत प्रथमच वाचला मी - तो रुळला आहे का आता?
तसंच 'शीर्शस्थ'(शीर्षस्थ?)सारख्या काही शब्दांशी अडखळले मी - हा मुद्रितशोधनापूर्वीचा खर्डा आहे का? Happy

चाळला. लेखाचा विषय चांगला आहे. सुरूवातही चांगली आणि प्रामाणिक वाटते.

मराठी गझल ही गझल नको पण गझलकारांना आवर या वळणावर गेली.
गझलेवर होणार्‍या चर्चा पाहता गझलकारांना मार्शल आर्टचे ट्रेनिंग देणे गरजेचे आहे असे वाटते. जे शिल्लक राहतील तेच पुढे मराठी गझलेचे तख्त राखतील.

स्वाती आंबोळे,

विस्तृत मतप्रदर्शनाबद्दल आभार! तसे दिवाळी अंकात माझे काही ना काही लेखन येत असते गेली काही वर्षे, पण मीच ते द्यायला विशेष इछुक नसतो. त्याचे कारण ते विषयाधारीत असते व त्यासाठी मुद्दाम मनात नसताना लिहावे लागते. असो! Happy

शब्दमर्यादा - त्यांनी दिलेली नव्हती. ते नुसतेच लेखाची मागणी करत होते. मीच जरा घाईघाईत आढावा घेतला.

उदाहरणांची कमतरता - उदाहरणे दिली की काही संबंधित नाराज होऊ शकतात तर काही खुषही होतात. शिवाय, मला वेळ नसल्याने मी उदाहरणे मुद्दाम शोधत बसलो नाही. एकुण मराठी गझलेचे माझे जे काही वाचन आहे त्यावर विसंबून लिहिले.

>>> या सर्वांची वानगीदाखल उदाहरणं - होय, वर लिहिल्याप्रमाणे मी उदाहरणे देण्यात वेळ व्यतीत करू शकत नव्हतो. अंकवाले मागे लागलेले असल्याने उदाहरणांशिवायच लेख पाठवला. मात्र येथे त्याबाबत थोडे लिहू शकेन. भटसाहेबांच्या गझलशैलीचा व आशयशैलीचा प्रभाव हा सुमारे २०१० नंतर ओसरू लागला. विजा घेऊन येणार्‍या पिढ्या, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य, साध्याच माणसांचा एल्गार, यांच्या चहाचे चांदणे, कुत्रे रदीफ असलेली गझल, या नवा सूर्य आणू चला यार हो, अश्या प्रकारच्या गझलांचे अनुकरण भटांच्या पहिल्या फळीतील शिष्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेले होते.उदाहरणार्थ, हा वळाया तो पळाया लागला अशी काहीशी ओळ असलेली गझल त्यांच्या बहुतेक शिष्यांच्या संग्रहात आढळते. (कदाचित तरही मिसराही असेल). मात्र, भटांच्या 'चंद्र (की सूर्य?) आता मावळाया लागला' ची सर त्या गझलांना नाही. या शिष्यांचे हात जोवर लिहिते होते तोवर या अनुकरणाप्रमाणे वाटणार्‍या गझला हा मापदंड ठरत होता. त्यानंतर गझल शहरी आणि ग्रामीण विभागात फार वेगाने फोफावली. (सोशल मीडिया कारणीभूत होताच, पण कार्यशाळा, गझलांना गझलेतर कवितांपेक्षा मिळणारी अधिक प्रसिद्धी, गझलेतर कवीपेक्षा गझलकाराला - खरे तर उगीचच - मिळणारे एक एक्स्ट्रा वलय वगैरेही कारणीभूत होते.) या दरम्यान शेती, शेतकर्‍यांच्या समस्या, ग्रामीण जीवनातील साधेपणा, शहरात येऊन ग्रामीण युवकांची होत असणारी घुसमट, अवहेलना, गरीबी, आज शहरी थाटात राहणार्‍या युवकांच्या आधीच्या पिढीचे ग्रामीण जीवन असे प्रकार येत राहिले. येथे मायबोलीवर असलेल्या विजय दिनकर पाटील यांचा स्वतःच्या वडिलांवर एक शेर आहे ज्यात त्यांची ओळ आहे की 'इतक्या आवेगाने त्याची बंडी भिडते घामाला'! डॉ. कैलास गायकवाड यांनी मायबोलीवर आगरी गझलही सादर केली. ह बा शिंदे हे एक गझलकार आहेत त्यांनी एका गझलेतील शेरात असे म्हंटले की देवळातील घंटा उंच असल्याने ती वाजवू न शकणार्‍या शूद्राच्या बाळाला ब्राह्मणाने डोक्यावर उचलून घेतले व घंटा वाजवायला मदत केली. ही मायबोलीवरची सहज आठवणारी उदाहरणे! हे रंग गझलेत यायला लागले व ते रसिकमनांत विशेषत्वाने स्थिरस्थावर व्हायला लागले. गझलेच्या आशयाचा एकसूरीपणा कमी होऊ लागला व गझल गावागावात पोचू लागली. बोली भाषांचा अंतर्भाव होणे हे मराठी गझलेने भटांच्या गझलेपासून बर्‍यापैकी फारकत घेण्याचे एक उदाहरण! स्व. सतीश दराडे याची गझल उत्तुंग झाली. त्याची शैली पूर्ण वेगळी होती. त्यानंतर आणखी नवीन मुले आली. स्वप्नील शेवडे, सुशांत खुरसाले वगैरे! तसेच जयदीप जोशी यांच्यासारखे निराळीच गझल लिहिणारेही झाले. मायबोलीवरून निष्कारण घालवून देण्यात आलेला वैभव वसंतराव कुलकर्णी हा आजघडीला मराठी गझलेचा उत्तम अभ्यासक व निरिक्षक आहे व शिवाय गझलकारही आहे. सातत्यपूर्ण चर्चेच्या माध्यमातून त्याने कित्येकांच्या गझलांचे रंग बदलून दिलेले आहेत याचा मी साक्षीदार आहे. आता प्राध्यापक डॉ सतीश देवपूरकर व माझे संबंध खूप चांगले आहेत, पण त्यांची गझल ही भटसाहेबांच्या गझलेच्या जातकुळीची आहे. तर वर लिहिल्याप्रमाणे, मी याच क्षेत्रात अजूनही पूर्णपणे कार्यरत असल्याने, मला उदाहरणे न देताही लेख लिहिणे शक्य होते व वेळ नसल्याने मी तो तसाच लिहिला.

>>> मग गझलला असा विरोध का झाला असावा हे समजत नाही - वृत्तबद्धता आणि गझलतंत्र यात प्रचंड फरक आहे हे तुम्ही केव्हापासूनच जाणून आहात. विशिष्ट ध्वनीसाधर्म्याचे शब्द काफिया म्हणून वापरायलाच हवेत या अनेक अटींपैकी एका अटीनेच आधी गझलेवर कृत्रिमतेचे आरोप होतात, होत होते. त्यात रदीफ, अलामत, वृत्त, प्रभावी समारोप या इतर अटीही! त्यामुळे भटांच्या समकालीन कवींनी विरोध केला होता कारण ते स्वतः तसे लिहू शकत नव्हते व त्यामुळे तसे लिहू इच्छित नव्हते. मात्र भटांच्या लेखणीच्या ताकदीपुढे त्यांचे काही चालतही नव्हते. सोम्यागोम्याने त्या काळात गझलविधा स्थापन करायची ठरवली असती तर आज त्याचे नांवही कोणाच्या स्मरणात नसते. Happy

शेर कहना - येथे जुन्या उर्दू आणि मराठी गझलेत एक महत्वाचा फरक पडतो. शेर कहना हे अगदी बरोबर आहे. मात्र मराठीत जे 'ऐकवायचे' म्हणून शेर झाले त्यांना शिट्ट्या, टाळ्या मिळू लागल्या जे गझलेच्या मूळ प्रवृत्तीशी विसंगत आहे. उर्दू मुशायर्‍यांमध्ये वैचारिक शेरांना जबाबदारीने दिलेली दाद मिळते / मिळायची तसे मराठी भाषेत झाले नाही. मराठीत सवंग दाद मिळू लागली व त्याचा थेट परिणाम सवंग गझल निर्माण होणे असा झाला. 'अरे त्याला पुढे जाऊ दे - तो एम एच बारा आहे' हा किंवा 'आज नक्की पार्टी करू - आज बिल भरणारा आहे' असे कोणाचेतरी शेर मी स्वतः सभागृहात ऐकलेले आहेत व सभागृह शिट्ट्यांनी दणाणून गेलेले पाहिले आहे. असे शेर करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली व तिची एक परंपरा होऊ लागली. उर्दूमध्येही राहत इंदोरी आणि मुनव्वर राना यांनी हेच केले. काही शेर हे वाचण्याचे शेरही असतात (किंबहुना, खूप शेर असे असतात) याचे विस्मरण होऊ लागले. काही शेर असे असतात जे वाचणे आणि ऐकणे या दोन्हीतून समान परिणाम करू शकतात व याचे उदाहरण म्हणजे सुरेश भट, चित्तरंजन भट, (काही प्रमाणात काहीजण माझेही नाव घेतात यात, पण त्याची लाज वाटते), सतीश दराडे व इतर काही!

>>> एखादाच शेर पोस्ट करणे - एक शेर ही एक कविता असते हे खरेच! मात्र गझलतंत्र हे गझलकाराला कोणत्या प्रकारचे आव्हान देते हे तुम्हीही जाणता. विशिष्ट जमिनीत पाच शेर असे रचणे जे जमीन कायम ठेवूनही कृत्रिम वाटू नयेत तर आपसूक आलेले वाटावेत. आता हे पाच शेर नाही रचले तर फरक काय पडतो असे मत मांडता येईल. मात्र सातव्या शतकापासून जी गझल निर्मिती झाली आहे ती 'पूर्ण गझलेची निर्मिती' यावरच बेस्ड राहिलेली आहे. सर्व मोठ्या शायरांच्या गझलसंग्रहाच्या शेवटची दोन तीन पाने ही सुट्टे शेर, फुटकळ, कत्तअ, रुबाई यासाठी सोडलेली असतात, पण मूळ भागात सर्व परीपूर्ण गझलाच असतात. पूर्ण गझल ही अधिक रसास्वाद देणार यात मतभेद नसावेत. उमराव जान मधील इक सिर्फ हमही मयको, इस शम्मा फरोजा को, इक तुमही नही तनहा हे तीनही शेर जर एकत्र ऐकले गेले नाहीत तर काय मजा येणार! एक सुट्टा शेर वाचून आस्वाद नक्कीच घेता येईल, पण पूर्ण गझल वाचण्याचा आनंद वेगळाच असतो हे तुम्ही जाणता हे माहीत आहे. Happy

>>> प्रकट चिंतन - उलट तुम्ही मला विषय अधिक उलगडायला मदत केलीत त्यामुळे हे प्रकट चिंतन फार भावले.

>>> शब्दमर्यादा - शब्दमर्यादा नव्हती. मला अनेक इतर काही अंकांसाठी लेखन करायचे होते व इतर अनेक व्यवधाने होती.

>>> शीर्षस्थ - तो माझा टायपो आहे. त्यांनी तो अंकात दुरुस्त केला आहे की नाही हे मी अजून बघितलेलेच नाही. अंक मला मिळाला आहे, पण मी फक्त 'आपला लेख आला की नाही' एवढेच बघितले. (आणि चेक कितीचा आहे ते Proud )

स्वाती आंबोळे,

मनःपूर्वक आभार ! आशा आहे की माझी स्पष्टीकरणे उचित वाटतील.

रघू आचार्य,

सुदैवाने, तुम्ही म्हणता ती काही वर्षांपूर्वीची परिस्थिती आता पालटली आहे. आता समस्त गझलकारांमध्ये खूप एकोपा आहे. Happy

वाचतोय....
मी या प्रांतात नवशिक्या आहे... काही शब्दांचा उलगडा व्हावा...जसे की आजकालीन या ऐवजी हल्ली म्हटले तर नाही चालत का?
हे विषय गझलविधेत आले ऐवजी हे विषय गझलेत हाताळले गेले नाही चालणार का?
सध्या भा.रा. तांबेंच्या वृत्तबद्ध कवितांनी भारावलोय. त्यांनी त्यांच्या वृत्तबद्ध कविता कुठल्या रागात गाव्यात हे देखील विषद केलंय. त्यामुळे एकंदरच वृत्तबद्ध रचना करणा-याविषयी प्रचंड आदर वाटतो. एका वृतात गझल लिहिताना कष्ट पडतात मला. पण भा.रा. तांबेची पुंगीवाला कविता १५-२० पाने आहे आणि वृत्तसंख्या १०-१५ असावी.

>>>मात्र गझलेने तेवढी उंची गाठली नसेल तरी तिची व्याप्ती वाढली आहे>>>> भट साहेबां बाबतचे मत खरे असले तरी कलाकारानं कुणाची उंची गाठण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचं वेगळेपण झाकोळणारा ठरेल . प्रत्येकाची जमेची बाजू वेगळी असू शकते. भट साहेंबा एवढी शब्दांवर हुकुमत इतरांना असेलच असे नाही.

एकंदरीत तुम्ही सुंदर टिपलेत बदल. छान लेख.

सविस्तर उलगड्यासाठी आभारी आहे, बेफिकीर. या चर्चेच्या ओघात आलेली उदाहरणं खरंच सुंदर आहेत. यापुढेही तुमच्या वाचण्या-ऐकण्यात काही छान आलं तर कृपया सांगत जाल का?

>>> वृत्तबद्धता आणि गझलतंत्र यात प्रचंड फरक आहे
इतकाही प्रचंड नाही असं आपलं मला वाटलं होतं. ज्याला वृत्ताची जाण आहे त्याला खरंतर ही एखादी extra step घ्यायचं आव्हान tempting/appealing वाटायला हवं. हा अगदीच विरोधासाठी - किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे असुरक्षिततेतून आलेला - विरोध वाटतो.
असो - झालं ते झालं. कदाचित त्या विरोधामुळे भटांच्या काव्याला आलेली धार ही (त्यांच्या संघर्षाचा मान राखूनच, पण) इष्टापत्तीही म्हणता येईल.

>>> असे कोणाचेतरी शेर मी स्वतः सभागृहात ऐकलेले आहेत व सभागृह शिट्ट्यांनी दणाणून गेलेले पाहिले आहे
अर्र!

>>> सर्व मोठ्या शायरांच्या गझलसंग्रहाच्या शेवटची दोन तीन पाने ही सुट्टे शेर, फुटकळ, कत्तअ, रुबाई यासाठी सोडलेली असतात
There you go! त्यांनाही ते सुट्टे शेर पब्लिश करायचा मोह आवरता येत नव्हताच - तो आताच्या इन्स्टाग्रामस्थांना कसा येणार?! बदलतं जीवनमान, अटेन्शन स्पॅन, इत्यादींचं प्रतिबिंब लिखाणात पडणारच की. ते चांगलं आहे असं म्हणत नाही, पण बहुधा अनिवार्य असावं असं मला वाटलं होतं. पण तुम्ही लेखाचा शेवट आशादायी केला आहे त्यावरून त्यातून मार्ग निघत/निघाला असावा. Happy

या चर्चेसाठी खरंच मनापासून आभार! Happy

*** अवांतर ***
>>> तसे दिवाळी अंकात माझे काही ना काही लेखन येत असते गेली काही वर्षे
मग लेखाच्या सुरुवातीचं ते 'ऐकावे ते नवलच' काय वृत्तपूर्तीसाठी घातलं होतं? माझं एक अभिनंदन वाया गेलं ना! Proud

लेख आवडला. अजुन काही अंकांत लिहिले असेल तर इथे वाचायला आवडेल.

लेख वाचताना खालिल ओळ आठवली.

गझल मे बंदिश-ए-अल्फाझही नही काफी
जिगरका खुन भी चाहिये कुछ असर के लिये..