कुरिंजल

Submitted by विशाखा-वावे on 28 October, 2024 - 03:02

कर्नाटकातल्या चिकमगळूर जिल्ह्यात कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान आहे. या परिसरात सहा-सात ट्रेक्स आहेत. त्यापैकी कुद्रेमुख शिखराचा ट्रेक सगळ्यात मोठा आहे. हे मलयनगिरीनंतर कर्नाटकातलं दुसर्‍या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे. आम्ही यावेळी कुद्रेमुखची चढाई न करता तिथल्याच दुसर्‍या ’कुरिंजल’ नावाच्या शिखराचा ट्रेक करायचं ठरवलं होतं. या ट्रेकचं हे थोडक्यात वर्णन!
कुरिंजल हे शिखर अगदी खूप उंच नसलं, (समुद्रसपाटीपासून साधारणपणे १२०० मीटरवर आहे) तरी चालण्याचं अंतर ७+७ किलोमीटर आहे. ट्रेक करण्याआधी वनविभागाकडे नोंदणी करणं आवश्यक असतं. रोजचे ठराविकच स्लॉट्स उपलब्ध असतात. त्यानंतर नोंदणी बंद होते. या वर्षीपासून ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आहे. मुलांना नवरात्रीची सुट्टी सुरू होती. माझ्या ऑफिसला दसर्‍याला जोडून गुरुवार-शुक्रवारची सुट्टी होती. आम्हाला शक्यतो शुक्रवारची नोंदणी करायची होती, पण ज्या दिवशी या आठवड्याचं बुकिंग सुरू झालं, त्या दिवशी लगेचच शुक्रवारच्या सगळ्या जागा भरल्या. त्यामुळे नाईलाजाने आम्ही गुरुवारसाठी नावं नोंदवली. नवर्‍याने एक दिवस सुट्टी वाढवली आणि मीही बुधवारची सुट्टी टाकली. बुधवारी सकाळी बंगलोरहून निघालो. दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत ’कापी काडु’ या ठिकाणी पोचलो. मागच्या वर्षी मे महिन्यात इथेच दोन-तीन दिवस राहिलो होतो, तेव्हा हा परिसर आवडल्यामुळे यावेळीही हेच ठिकाण निवडलं.
कुद्रेमुखमधे ट्रेकिंग करण्यासाठी ’गाईड’ची गरज भासते. वन खात्याकडून तो मिळू शकतो, पण आमच्यासाठी रिझॉर्टच्या माणसांनी त्यांच्या ओळखीच्या एजंटतर्फे गाईडची सोय केली. अर्थात तो सरकारमान्य असावा लागतोच. गुरुवारी सकाळी ब्रेड-ऑम्लेट आणि चहा, असा नाश्ता करून, दुपारच्या जेवणासाठी नीर दोसे सोबत घेऊन साडेसातच्या सुमारास निघालो. गाईड भेटणार होता ते ठिकाण बारा-तेरा किलोमीटरवर होतं. तिथे पोचून मग त्याच्या गाडीतून साताठ किलोमीटरवरच्या कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाच्या कार्यालयात जाऊन, प्रवेशशुल्क भरून आमचे पासेस घेतले. ट्रेकची प्रत्यक्ष सुरुवात तिथूनही पुढे आठनऊ किलोमीटरवर आहे. या परिसरात पूर्वी लोखंडाच्या खाणी होत्या. सरकारी मालकीची खाणकाम कंपनी होती. तिथल्या कर्मचार्‍यांची इथे वसाहतच होती. वीसेक वर्षांपूर्वी (बहुतेक इथल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी) या खाणी बंद झाल्या. पण त्यावेळी बांधलेल्या शाळा-कॉलेजच्या आणि इतरही इमारती मात्र ओसाड अवस्थेत शिल्लक आहेत.
कुरिंजलच्या प्रवेशद्वाराच्या आत गाडी ठेवून आम्ही चालायला सुरुवात केली. आमच्याशिवाय अजून कुणी दिसत नव्हतं. एका महाविद्यालयाची रिकामी बस तेवढी दिसली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) शिबिरासाठी विद्यार्थी इथे आल्याचं लक्षात आलं. थोडा वेळ डांबरी रस्त्यावरून चालल्यावर मग प्रत्यक्ष कुरिंजलची वाट सुरू झाली. भद्रा नदीने स्वागत केलं.
DSC02670.JPG

भद्रा, तुंगा आणि नेत्रावती या तीन नद्या इथे उगम पावतात. पुढे शिवमोग्याजवळ तुंगा आणि भद्रेचा संगम होऊन त्या ’तुंगभद्रा’ बनून बंगालच्या उपसागराकडे प्रवास करतात. नेत्रावती मात्र मंगळूरकडे, म्हणजे अरबी समुद्राकडे वाहते. आपल्या महाबळेश्वरची आठवण झाली. महाबळेश्वरला कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री अशा पाच नद्या उगम पावतात. त्यापैकी सावित्री अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि बाकीच्या चारही नद्या कॄष्णेच्या रूपाने बंगालच्या उपसागराला मिळतात.
भद्रा नदीवरचा छोटासा पूल ओलांडून पुढे चालू लागलो. सुरुवातीची ही वाट फारशी चढाची नाही. वाटेवरची माती लाल होती. गारगोटीचे आणि काही विविधरंगीही दगड दिसत होते.
DSC02674.JPG

पहिला टप्पा पार केल्यावर मग जंगलाचा भाग सुरू झाला. अधूनमधून थांबत, आजूबाजूचं निसर्गसौंदर्य बघत आम्ही चालत होतो.
DSC02682.JPG
.
DSC02736.JPG
.
DSC02685.JPG

वेगवेगळ्या प्रकारची झाडं असली, तरी एका विशिष्ट प्रकारची झाडं सर्वात जास्त होती. आमच्या गाईडला झाडाचं नाव विचारलं, पण त्याला सांगता आलं नाही.
DSC02734.JPG

वाट छान होती. कधी चढ, कधी सपाटी. या परिसरात दोनशे विविध प्रकारचे पक्षी दिसतात असं वाचलं होतं. पण आम्हाला अक्षरशः औषधालाही एकही पक्षी दिसला नाही. एकदा एका पक्ष्याचा आवाज आला, पण तोही ओळखता आला नाही! या बाबतीत माझी निराशाच झाली. वाटेवर असंख्य जळवा होत्या. त्या चावू नयेत म्हणून आम्ही आधीच पायांना डेटॉल चोपडलं होतं. तरी आम्हाला थोडा प्रसाद मिळालाच. एका ठिकाणी झर्‍याचं स्वच्छ, गार पाणी पोटभर प्यायलो, बाटलीतही भरून घेतलं. आता NSS ची मुलंमुली आमच्या मागून येऊन पुढे जायला लागली. ते बरेच जण होते आणि शेवटपर्यंत मग त्यांच्यापैकी कुणी ना कुणी तरी आमच्या मागे-पुढे होतेच. जंगलाचा भाग संपला आणि उघड्यावरचा, मोठे दगडधोंडे असलेला चढाचा भाग सुरू झाला. थोडं चढून गेल्यावर एक ’व्ह्यू पॉइंट’ आला. मात्र खालचा प्रदेश धुक्याने आच्छादित होता. मधूनच धुक्याचा पडदा बाजूला सरकायचा आणि सुरेख विहंगम दृश्य दिसायचं.

DSC02703.JPG
.
DSC02703.JPG
.
DSC02730.JPG

इथे जरा पाय पसरून बसण्यासारखा कातळ होता. त्यामुळे बसून नीट बघून पायाला आणि बुटांना चिकटलेल्या जळवा काढून टाकल्या. सोबत आणलेली चिक्की खाल्ली, पाणी प्यायलं आणि शेवटचा चढ चढण्यासाठी सज्ज झालो. या शेवटच्या चढाने मात्र चांगलंच दमवलं मला तरी. धापा टाकत वर पोचलो. तिथे NSS च्या शिक्षकांचा पारा बराच चढलेला होता. थोडा वेळ त्यांचं बोलणं ऐकून अंदाज आला की सगळ्यात आधी वर पोचलेल्या मुलांनी काही बेशिस्तीचं वर्तन केलं होतं. मुलांची चांगलीच उभी-आडवी खरडपट्टी काढून शेवटी एकदा ते बोलायचे थांबले. मग ते सगळेच खाली उतरायला लागले आणि आम्हाला जरा शांतता मिळाली. खालचा प्रदेश पूर्णपणे धुक्याने वेढलेला होता. त्यामुळे काहीच दिसत नव्हतं, हवा मात्र छान, ताजी होती.
DSC02727.JPG
हेच ते कुरिंजल शिखर.

आता भूक लागलेली असल्यामुळे आम्ही नीर दोसे आणि चटणीचं जेवण केलं आणि मग खाली उतरायला सुरुवात केली. उतरताना आमच्या गाईडने एक शॉर्टकट निवडला आणि आम्ही पूर्णपणे दाट जंगलातून, अरुंद वाटेवरून खाली उतरलो.

DSC02731.JPG
.
DSC02733.JPG
एका पडलेल्या झाडाला असंख्य अळंब्या लागल्या होत्या.

ट्रेकच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून साधारणपणे तीन-साडेतीन किलोमीटरवर आम्ही मूळ वाटेवर येऊन मिळालो. त्या वाटेवरून थोडं चाललो आणि पाऊस सुरू झाला. सुरुवातीला सौम्य असलेला पाऊस नंतर जो मुसळधार पडायला लागला, तो नंतर दोनतीन तास अखंड तसाच पडत राहिला. आमच्या छत्र्यांचा उपयोग फक्त कॅमेरे न भिजण्यापुरताच होत होता. आम्ही सगळे जवळजवळ पूर्णपणे भिजलो. सतत उतरून उतरून पायाची नखं बुटांच्या आत टोचायला लागली होती. प्रत्येक वळणावर वाटत होतं, आता तो भद्रेवरचा पूल दिसेल. पण छे! शिवाय तो पूल ओलांडल्यावरही पुढे डांबरी रस्त्यावर चालायचं होतंच. तिथून मग गाईडबरोबर त्याच्या गाडीतून काही किलोमीटर आणि मग पुन्हा आपल्या गाडीतून उरलेलं अंतर. हे सगळं पावसात भिजताना डोळ्यासमोर दिसत होतं. पण अखेर हे सगळं पार पडलं आणि आम्ही एकदाचे ’कापी काडु’ मधे येऊन पोचलो. गरम गरम पाण्याने आंघोळी केल्या. सडकून भूक लागली होती. चहा आणि भाजलेला गरम गरम ब्रेड जॅमसोबत खाऊन निवांत पाय पसरून बसलो!
DSC02738.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो.
कुद्रेमुख खूप ओळखीचं वाटतंय, पण कुठे वाचलंय ते आठवत नाहीये.
जळवा-डेटॉल ही जोडी माहिती नव्हती. बेअर ग्रिल्सला सांगायला पाहिजे Wink

नवीन प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.
वर मी एका प्रतिसादात वॉटर डिव्हाईडला मराठीत 'जलदुभाजक' म्हणतात असं लिहिलंय, ते चुकीचं आहे. जलविभाजक म्हणतात. मला शंका आली म्हणून शोधलं.
ललिता-प्रीति, मी गेल्या वर्षी चिकमगळूर प्रवासवर्णन लिहिताना कुद्रेमुखचा उल्लेख केला होता तेव्हा आमचं बुकिंग नसल्यामुळे जाता आलं नव्हतं. विशाखा-वावे आयडीनेच लिहिलं होतं.

Pages