दहीभात ...

Submitted by किल्लेदार on 11 November, 2024 - 23:09

पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर पेरलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले.

हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे. जसे उत्तर हिंदुस्तानात बासमतीची बिर्यानी, मध्य प्रदेशातला मोगऱ्याचा पुलाव, महाराष्ट्रातल्या आंबेमोहोर आणि इंद्रायणीचा साधा वरणभात तर दक्षिणेत सणासुदीला होणारा सोना मसूरी, कोलमचा गोड पोंगल किंवा इडली-डोसा अशी कितीतरी उदाहरणं मिळतील. इंद्रायणीची बिर्यानी किंवा बासमतीचा साधं-वरण-तूप-भात अशी आंतरप्रांतिय जोडपी केवढी विजोड वाटतात. पण दहीभात मात्र अशा जुलमी मर्यादा जुमानत नाही. त्यामुळेच थोड्याफार फरकाने आणि नानाविध नावांनी दहीभात आसिंधु-सिंधु पर्यंत ग्रहण केल्या जातो.

उत्तरेत दही चावल, महाराष्ट्रात दहीभात, बंगालमध्ये दोईभात, ओरीसातला पोखालो, गुजरातमधे खट्टी कंकी, कर्नाटकात मोसरन्ना तर तामिळनाडूत थाइर सादम्. तामिळनाडू आणि आंध्रामध्ये तर दहीभात देवळात प्रसाद म्हणूनही वाटला जातो. आंध्रात घरच्यासाठी केलेला पेरुगन्नम, देवाचा प्रसाद म्हणून केला तर दद्दोजनं (दध्योजनम्?) होतो. महाराष्ट्रातही संतांना दहीभाताचे फार अप्रूप. संत भानुदास म्हणतात,

अवघ्या सोडियेल्या मोटा । आजिचा दहींकाला गोमटा ॥
घ्या रे घ्या रे दहींभात । आम्हा देतों पंढरीनाथ ॥

कर्नाटकमध्ये मोसरन्नाशिवाय जेवणाला पूर्णविरामच लागत नाही. एखाद्या कोकणस्थानं दही भाताशिवाय आमचं पान हलत नाही असं म्हटलं तर त्याचा शब्दशः अर्थ घ्यावा कारण दहीभात वाढल्याशिवाय ते पान आणि पानावरचा दोघेही हलत नाहीत.

दहीभाताचा उगम द्राविडी प्रांतातला असला तरीही तो बनवायला मात्र द्राविडी प्राणायाम करावा लागत नाही. कुठल्याही तांदळाचा मऊसर भात, चांगलं लागलेलं घट्ट दही, फोडणीसाठी मोहरी-कढीलिंब आणि जरासं मीठ इतका आटोपशीर कारभार. कुणी फोडणीत हिंग आणि वाळलेली लाल मिरची घालतात. कधी थोडी भिजवून मग फोडणीत घातलेली उडदाची डाळही दहीभाताला आणखीनच लज्जत आणते. काही ठिकाणी डाळिंबाचे दाणे पेरून सजवलेला दहीभात पोटाआधी डोळेही सुखावून जातो. पण अमुक वेळी हे खाऊ नये, अमक्यात तमके टाकू नये अशा आयुर्वेदातल्या अनावश्यक सूचनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करावं आणि नको तिथे विरजण पडू देऊ नये.

परिपूर्ण दहीभात कसा असावा... माझी तर बुआ अगदी साधी आणि सात्विक कल्पना आहे. तांदूळ हा आंबेमोहोर असावा. सकाळीच तापवलेल्या दुधावरची ताजी साय आणि त्याखालचं जरासं घट्ट दूध असावं, पांढऱ्या सटात लावलेलं, न मोड्लेलं कवड्यांचं दही असावं आणि चवीला थोडंसं मीठ. बस्स एवढंच! आणि हो, या पाच शुभ्रधवल घटकांचं हे पंचामृत नवीन ताटात किंवा वेगळ्या भांड्यात कालवायचं. बाकीचं जेऊन झाल्यावर त्याच ताटात दहीभात कालवणारे महाभाग बघितले की माझ्याच पोटात कालवाकालव होते.

अशा दहीभाताची तुलना करायचीच झाली तर शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या एखाद्या महात्म्याशीच करावी. सत्संगाने सर्व तामसी विचार निवळून जशी मनःशांती मिळेल त्याच पातळीची क्षुधाशांती या दहीभाताने होते.

मला तर कधी वाटतं की समुद्र-मंथनातून निघालेलं विष-प्राशन केल्यावर दाह कमी करण्यासाठी महादेवानंही पार्वतीला “अगं जरा वाडगाभर दहीभात कालवून आणतेस का” अशी फर्माईश सोडली असेल. अशा या अमृताशीही पैजा जिंकणाऱ्या दहीभाताच्या घटकांना "व्हाईट पॉयझन" म्हणणाऱ्यांना काय बोलावं?

दरवर्षी आपल्याकडे बाप्पाचे स्वागत मोदकांनी होत असले तरी गौरी विसर्जनाच्या वेळी निरोप मात्र दहीभाताने द्यायची बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे. त्याला कारणही तसेच असावे. कदाचित म्हणूनच तुकोबा म्हणतात…

उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥
वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥

म्हणजेच, हा दहीभात खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्म घेऊ कारण असा हा मधुर दहीभात स्वर्गातही मिळत नाही.

20241111_205419

चित्रे आंतरजालावरून साभार…

Group content visibility: 
Use group defaults

व्वा, फारच छान लिहिलं आहे. शैली आवडली.
दही भाताचा नैवद्य बऱ्याच ठिकाणी असतो.
पारायण संपल्यावर पारण्याला दहीकाला (दहीभात) असतो.
गावाकडे काही ठिकाणी श्रावणात सोमवारी दहिभाताने शिवलिंग लिंपतात आणि मग तो प्रसाद म्हणून वाटतात.
भुताखेतांच्या उताऱ्यात कधीकधी दहीभात असतो बहुतेक, त्यांनाही टेस्ट आवडत असावी.

भाताच्या बाता Happy छानच.

आंध्र स्टाईलचा आवडतो, fried and half-crushed लाल मिरच्यांसकट. अर्थातच त्यात साखर नसते.

थमिल थलैवाज् थाइरसादम सोबत अती आंबट लोणचे मिक्स करून खातात, ते नाही झेपत.

मस्त लेख. दही भात एकदम आवडीचा आहे. लहान पणी घरी ताक भातच असे. बरोबर सकाळची भाजी, भें डी नाहीतर बरोबर बटा टा काचर्‍या आई ताज्या बनवायची. साला सकट बटा टे तेव्हा लक्षरी वाटत असे. असे म्हणत असत की ज्या मुली दहि भात खातात त्यांना चांगल सासर मिळ ते. शेजार घरात जरा जास्त कोकणी कार भार होता. त्या मावशी साय जमवून ठेवत कधी कधी धीर करुन मी दोन चमचे त्यातील आंबट सर साय घेउन येत असे- विचारून. सायीचा दहिभा त इज सो प्रेशस. गिल्डिन्ग द लिलि लेव्हल्स.

मस्त लेख.

पण साखर घातली तर चव खुलते.

छान लेख. फोडणीत सांडगी मिर्ची (दही मीठ+मोहरी डाळ भरून उन्हाळ्यात वाळवून ठेवलेल्या )घालून छान होतो दहीभात. चवीला थोडी साखर हवीच.

लग्न करून हैद्रा बाद ला आल्यावर नवर्‍याची नेहमी फर्माइश असे. मी डिनरचा प्रश्न सुटला कमी मेहनती त म्हणून खुशीत. एका फो ड णीचे काम. ती मात्र नीट बसली पाहिजे मिरची क ढी पत्ता ज ळला नाही पाहिजे. तर फोडणी अशी द्या. मेडला भाताचा कुकर लावायला सांगायचे. सुरती कोलम राइस आंध्रात. जरा कमी असट होतो. चांगले दही हलवाया कडून आण लेले असायचे ते प्लस थोडे होल मिल्क असे गार भातात घालायचे . मीठ घालून कालवून बाजूस ठेवायचे.

तेल गर म करून शेंगदाणे तळून बाजूला ठेवा. तेल थोडे गार झाल्यावर जासतीचे वाटीत काढून घ्या भात तेलकट झाला नाही पाहिजे. मग
त्यात मोहरी, हिंग , ला ल सुक्या मिरच्या, कढी पत्ता , हे मं द गॅस वर छान पक्के करुन घ्यावे. व भातावर चरचरत ओतावे. सर्व कालवून घ्यावे.
मग त्यावर विचारून तळलेले दाणे पेरावे. कोथिंबीर पण. काही नग मोहरी न आव डणारी पण असतात. आपण आरामात खाताना पहिले दार उघडून त्यांना हाकलून द्यावे.

दही भाता सोबत आमच्या कडे हॉट चिप्स नामक तीर्थ क्षेत्रा तोन आणलेले तिखट वेफर्स. किंवा कार्ल्याच्या चिपस आंब्याचे अवाकाई लोणचे.

हे मी आधी लिहिले असेलः पती व त्यांचा एक मित्र ह्या दोघाचे एक सिक्रेट होते. शमशा बाद एअर्पोर्ट च्या पुढे त्यांना एक प्रॉजे़ कट दिला होता.
दहा एक र जमिनीवर जिरेनिअम व सि ट्रोनेला कल्टिव्हेश न करायचे डेमो डिस्टि ले शन प्लांट चालवून तेथील शेतकर्‍यांना ते करायला शिकवायचे. हे फार मेह नतीचे काम होते. पण ते करायला हे लोक्स कंपनीच्या जिप्सी तून जात. नवर्‍याला समहाउ घरचा डबा लंच नेणे
फार मम व वाटायचे. मित्र घरून दही भात, छोट्या स्टील च्या डब्यात आणी व वर तेलुगु पद्धतीचे तोंड ली भाजी. शेताव र दुपारी झाडाखाली
बसून खात. कधी कधी बरोबर उडीद वडे. ताक बाटलीत असा मेनू.

दही भाता बरोबर घरगुती तळ्लेले उडीद वडे छोट्या साइजचे पण मस्त लागता त.
न भोक वाले मेदु वडे.

एक कर्नाटकातून आलेले मरा ठी लोक्स होते तयांच्या घरी म्हातारी आई दही भात बनवत साधी फो डणी मिरची आले ते पण भारी लागत.

एक वेंकटेश भ ट्ट चॅनेल आहे. मी मजे साठी बघते तो इतका पॅट्रार्किअल आहे की लै भारी विनोदी. पण त्याची दही भाताची रेसीपी इज क्लासिक भात दुधात शिजवून घेतो. ही थाइर सादम सर्च करून नक्की बघा. क्लासिक रेसीपीज मस्त बनवतो. दही भातात बेसिकली हॉटेल शेफ्स काकडी किसून गाजर किसून घालतात, वरून डा लीम्बा चॅ दाणे घालतात त्याची गरज नाहे असे तो म्हणतो . ते खरेच आहे. हवी तर वेगळा रायता बनवून खावा फारत र. रील्स व जनरल फ्युज न मुळे स्वयंपाका चे गुजराती करण होत चालले आह. गोड व सर्वा त लाल सी डस. अजून चीज घालत नाहीत ते बरे आहे. नाहीत र अनलिमिटेड ३० रु त दिले तरी खाणा र नाही. जय महा राष्टृ.

बरोबरः सांड गी मिरची, व विना फोडणी चा दभा असल्यास मिरची च्या लोणच्या चा खार पण चालतो. तळीव डिंगरी

छान लिहिलंय. माझंही कम्फर्ट फूड!

>>> दद्दोजनं (दध्योजनम्?)
दध्योदन = दधि + ओदन
(यमुनाजळासी जासी मुकुंदा, दध्योदन भक्षी । घनश्यामसुंदरा॥)

छान लिहिलं आहे.
कुठे बाहेर जाताना (पिकनिकला/ प्रवासाला) जर सोबत न्यायचा असेल तर भात सायीसकट भरपूर दुधात नीट कालवायचा आणि विरजणापुरतं दही घालून परत नीट कालवायचा. मीठही घालायचं. त्या दह्याने भातातलं दूध विरजतं आणि तीन-चार तासांनी छान, आंबट नसलेला दहीभात तयार होतो. दूध जरा जास्तच घालायचं, म्हणजे खूप घट्ट होत नाही. बाकी डाळिंब वगैरे हवं असल्यास नंतर खायला घेताना घालायचं.

छान, मला पण आवडतो दहीभात. दही आणि ताकाचा पदार्थ असेल तर आले हवेच. दहीभातात आले किसून छान लागते. अगदी एक चिमुट साखर आणि सांडगी मिरची.

छान लेख!
दही भात नाही आवडत फार.. पण चि. बिर्याणी सोबत रायता आवडतो. त्यामुळे दही भातात चिकन टाकून खाल्ले तर ते सुद्धा आवडेल कदाचित. अर्थात दहीभात तडका मारलेला हवा. त्यात जास्त मजा.

मस्तच. मला दही भात, ताक भात, दूध भात असं सर्व आवडतं

दही बुत्ती करायची असेल तेव्हा मी साजूक किंवा गाईच्या तुपाची फोडणी करते, सांडगी मिरची घालते. साखर अजिबात घालत नाही, उडीद डाळ असली घरात तर घालते. डाळिंबाचे दाणे वगैरे घालत नाही.

कांदा आणि बुंदीसुद्धा! मग कोथिंबीरही हवी.
साखर घातलीच तर अगदी चिमूटभर (बदनामीपुरती) ! Happy

<<कुठे बाहेर जाताना (पिकनिकला/ प्रवासाला) जर सोबत न्यायचा असेल तर भात सायीसकट भरपूर दुधात नीट कालवायचा आणि विरजणापुरतं दही घालून परत नीट कालवायचा. मीठही घालायचं. त्या दह्याने भातातलं दूध विरजतं आणि तीन-चार तासांनी छान, आंबट नसलेला दहीभात तयार होतो. <<,
हे मला फार फार वर्षांपुर्वी माझ्या जैन कलिगने सांगितले होते. ती टिफिन मधे आणायची मधुन मधुन.
मला तोवर दही भात सारखे पदार्थ प्रवासात नेतात हे माहितच नव्हते. आम्ही आपले तिखट, आणि गोड दशम्या, चट्णी, लोणचे अशी शिदोरी नेणारे .

ऋतुराज - भुताखेतांचं माहीत नव्हतं. म्हणजे देव-दैत्य दोघांनाही आवडणारा "युनिव्हर्सल कुझीन" आहे दहीभात

अनिंद्य - दक्षिणेकडची जवळपास सर्वच मंडळी आंबटशौकीन आहे

मनिम्याऊ - धन्यवाद

प्रज्ञा९, SharmilaR, लंपन, rmd - पुण्याने साखरेचा टॉलरन्स वाढवला असला तरीही दहीभातातली साखर अजूनही झेपत नाही

अश्विनीमामी - दहीभात - २ लिहून टाका Happy

स्वाती_आंबोळे - दध्योदनच बरोबर वाटतंय. चिमूटभरही साखर घालून कुणी दही भात खाऊ घातला तर खाऊ घालणाऱ्याची बदनामी नक्की करेन Proud

मंजूताई - सायीशिवाय मजा नाही

वावे - दूधभात बनवून त्यावर विरजण टाकून पिकनिकला नेण्याची पद्धत खरंच सोयीस्कर आणि मस्त आहे.

ऋन्मेऽऽष - दही-भातात चिकन टाकून खाणे ही कल्पना नाविन्यपूर्ण आहे पण आपल्यात तेवढे धैर्य नाही बुआ.

अन्जू - तुपाची फोडणीच जास्त छान लागते.

sneha1 - कांदा घालून बघायला हरकत नाही पण रसाळ कांदा हवा.

मी_आर्या - दही भातासारखे पदार्थ मीही अजून नेले नाहीत पण कल्पना छान आहे.

दहिभातासारखाच चविष्ट लेख !
मी दहीभात लग्नानंतरच जास्त बघितला आणि खाल्लाय. कारण सासर कर्नाटकचे.
लहानपणी दुध भात (साखर) हे अजब काँबिनेशन खायचे मी (कसे काय माहित नाही). दही पोहे पण अनेक वेळा खाल्ले पण दहीभात फारसा कधी खाल्ला नव्हता. सासरी आल्यावर दहीबुत्तीची महती कळली. आता कधीतरी खायला आवडतो. हिरवी मिरची - आलं, कडिपत्त्याची फोडणी घातलेला किंवा नुसताच डाळींब कोथिंबीरीने सजवलेला. वरून चटणी-पुडी घालून पण सासरी खातात. मला नाही तो प्रकार विशेष आवडला.

नुसत्या दही भाताबरोबर तोंडी लावणं म्हणून फोडणीची मिरची, लसणीचं तिखट (लसूण चटणी) , काचऱ्या टाईप भाज्या जास्त आवडतात.

मस्त लेख. माझे पण कंफर्ट फूड आहे दहीभात. पण मला त्यावर कसली तरी फोडणी आवडते. जोडीला सांडगी मिरची असेल तर स्वर्गानुभूती!

वावे, माझ्या लहानपणीच्या प्रत्येक प्रवासात असा विरजलेला दहीभात असायचा. त्याची मजा काही औरच असायची.

मस्त आहे लेख . दही भात माझाही आवडता . ऑफिसात पोळी भाजी खाऊन कंटाळा आला तर मी दहिभातच घेऊन जाते
उन्हाळातील कन्फर्ट फूड

मी केलेल्या दही भाताचा फोटो
IMG_3168.jpeg