चाफ्याच्या झाडा ….

Submitted by ऋतुराज. on 11 November, 2024 - 06:05

चाफा म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवते ती लतादीदींनी गायलेली कवी "बी" यांची रचना "चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना". वर वर साधे वाटणारे हे काव्य जीवा-शिवाशी एकात्म साधणारे अद्वैत सांगून जाते.
तसे पाहता चाफा ह्या नावाने अनेक वनस्पती ओळखल्या जातात त्याची फुले सुद्धा वेगवेगळ्या रंगाची, आकाराची असतात पण सर्वात एक समानता आहे ती म्हणजे सर्व फुले अत्यंत सुवासिक असतात. त्यापैकी काही महत्वाच्या वनस्पतींचा घेतलेला हा एक आढावा.

पांढरा चाफा:
P Acutifolia.jpgPlumeria acutifolia

आपल्याकडे सर्रास आढळणारा चाफा म्हणजे, पांढरा चाफा. याला अनेक नावे आहेत. फ्रँगीपनी ट्री (फ्रेंच अर्थ साकळलेले दूध, याच्या चिकासारखे) क्षीर चाफा याच्या खोडातून चीक पाझरतो म्हणून. खूर चाफा (क्षीर चाफ्याचा अपभ्रंश). देवचाफा किंवा "टेम्पल ट्री" यासाठी की मंदिराच्या आसपास याच एखाद तरी झाड असतंच. मंदिरचं नाही पण बौद्ध पॅगोडाच्या बाजूला पण याची झाडे असतात म्हणून हा "पॅगोडा ट्री" ह्या नावानेही ओळखला जातो. स्मशान आणि दफनभूमीत लावला जात असल्याने साहेबाने याच नाव "Dead Mans Flower" असं करून टाकलं. याच्या पांढऱ्या सोडून लाल व पिवळसर रंगाच्या देखील काही जाती आहेत. हा एक मध्यम उंचीचा वृक्ष असून याला मोठी पाने असतात. फुलांचा आकार देखील मोठा असतो फुले अत्यंत सुवासिक असतात. खडकाळ जमिनीत किंवा कमी पाण्याच्या ठिकाणी देखील हा वृक्ष चांगला वाढतो. आपल्याकडे सगळीकडे आढळत असला तरी याच मूळ आहे दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको. बऱ्याच वर्षांपूर्वी तो भारतात येऊन आता आपलासा झाला आहे. उद्यानात लावण्यासाठी याच्या बऱ्याच जाती विकसित केल्या आहेत. हा वन्य नसल्यामूळे याला आपल्याकडे फळे येत नाहीत. पण काही जातींना शेंगेसारखी जोडफळे येतात. याच्या फुलांपासून सुवासिक अत्तर बनवले जाते. या चाफ्याचे कुळ आहे Apocynaceae.
याचे शास्त्रीय नाव आहे Plumeria, फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञ चार्ल्स प्लुमेर याच्या स्मरणार्थ दिलेले नाव. याची सुवासिक जात P. acutifolia (पानाचे टोक निमुळते असल्याने), P. obtusa (पानाचे टोक बोथट असल्याने) व लाल रंगाची जात P. rubra (रुब्रा म्हणजे लाल). ह्याच चाफ्याची एक सुवास नसणारी पण पानांच्या वैशिष्ठयपूर्ण आकारामुळे हमखास बागेत लावली जाणारी एक जात म्हणजे P. pudica
Lal chafa.jpgPlumeria rubra
Obtusa.jpgPlumeria obtusa
pudica.jpgPlumeria pudica

प्रसिद्ध पत्रकार मृणाल पांडे यांच्या मातोश्री शिवानी यांच्या "स्मशान चंपा" या कांदंबरीत एक उल्लेख आहे:
चम्पा तुझमे तीन गुण - रूप रंग और बास.
अवगुण तुझमे एक है, भ्रमर ना आवें पास.

यावर काव्यात्म पद्धतीने दिलेले उत्तर:
चम्पा वर्णी राधिका, भ्रमर कृष्ण का दास.
यही कारण अवगुण भैय्या, भ्रमर ना आवें पास.

अर्थात ते काव्यात्म असलं तरी चाफ्याचं स्वपरागीभवन किंवा पतंगाद्वारे परागीभवन होत.

सोनचाफा:
ज्ञानेश्वरांनी "तो कनकचंपकाचा कळा, की अमृताचा पुतळा." असा ज्याचा उल्लेख केला आहे तो वृक्षराज म्हणजे सोनचाफा.
sonchafa 1.jpgMichelia champaka
याच्या फुलांचा आकर्षक पिवळा, केशरी, सुवर्णकांती रंग व मनमोहक सुगंध अक्षरशः वेड लावणारा आहे. रामायण, महाभारत आणि संस्कृत साहित्यात सोनचाफ्याचे अनेक संदर्भ येतात. सुंदर स्त्रीच्या हास्याने सोनचाफा फुलतो अशी एक कविकल्पना आहे.
Sonchafa 2.png
सोनचाफा हा अस्सल भारतीय वंशाचा सदाहरित वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात व पावसाळ्यात बहर येतो पण आता वर्षभर फुलणाऱ्या चाफ्याच्या जाती उपलब्ध आहेत. याच्या फुलाच्या कळ्याच जास्त वापरात येतात. एकदा फुलले की त्याच्या पाकळ्या गळून पडतात. खरतर या पाकळ्या नसतातच. संदल व प्रदल यांची एकत्रित अशी ती रचना असते. चाफ्याचे पंचांग आयुर्वेदात वापरतात. सोनचाफ्याचे फुले अत्तर, सुगंधी तेल, धूप, साबण यांच्या उत्पादनात वापरतात. तसेच याची फुले तुरटीच्या द्रवांत भरून कायमस्वरूपी शोभेच्या बाटल्यात साठवून ठेवतात. सोनचाफा हा Magnoliaceae कुळातील आहे. याचे शास्त्रीय नाव Michelia champaka असे आहे. अँटोनियो मायकेली या इटालियन शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ प्रजातीनाम तर चंपक हे संस्कृत नावावरून जातीनाम ठेवलं आहे. Tailed Jay, Common Jay व Common Bluebottle या फुलपाखरांची मादी या सोनचाफ्यावर अंडी घालतात.
भुंगा कधीच चाफ्याच्या फुलावर बसत नाही या गोष्टीची कवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान करताना "... लेई रस ऐतिन को, बैठी न सकत है,अली नवरंगजेब चंपा शिवराय है " असे रसपूर्ण वर्णन केले आहे. भुंगा (अली) जसा इतर सगळ्या फुलांतून मकरंद गोळा करतो त्याप्रमाणे औरंजेब सगळ्या राजांकडून कर गोळा करतो परंतु सोनचाफ्याप्रमाणे असणाऱ्या शिवरायांच्या वाटेला मात्र तो जात नाही.
M alba.jpgMagnolia alba
M nilgirica.jpgMagnolia nilagirica

Magnolia nilagirica हा दक्षिणेत निलगिरी पर्वतावर आढळणारा एक सदाहरित वृक्ष आहे. याची फुले पांढऱ्या रंगाची असून दिसायला सोनचाफ्याप्रमाणेच असतात, यालाही अप्रतिम सुगंध असतो. सोनचाफ्याचीच Magnolia alba नावाची एक पांढरी सुवासिक जात संकर करून विकसित केली असून आजकाल ती हमखास बागेत लावली जाते. याच्या पाकळ्या खूप नाजूक असतात. याच कुळातील मुखत्वे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशात आढळणारी एक जात म्हणजे महापुष्प चाफा Magnolia grandiflora याची पांढरी शुभ्र फुले अत्यंत सुवासिक असून याच्या फुलांचा आकार हाताच्या दोन्ही ओंजळीत मावणार नाही इतका मोठा असतो.
M grandiflora.jpgMagnolia grandiflora

कवटी चाफा:
मॅग्नोलिया कुळातील आणखी एक सर्वांच्या परिचयाचा चाफा म्हणजे कवठी चाफा Magnolia pumila (बुटका). याची पांढरी कवटासारखी - अंड्याप्रमाणे दिसणारी फुले खूपच सुवासिक असतात. याला हिमचंपा असेही एक नाव आहे
Kavti chafa.jpgMagnolia pumila
भारताबाहेर मॅग्नोलियाच्या विविध रंगाच्या जाती पाहायला मिळतात.

नागचाफा:
नागचाफा या नावाने ओळखला जाणारा छोटेखानी अस्सल भारतीय वंशाचा वृक्ष भारतात बऱ्याच ठिकाणी आढळतो. Mesua ferrea (दमास्कस येथील मेसु या अरेबियन पिता पुत्रांच्या स्मरणार्थ प्रजाती नाम व फेरुआ म्हणजे लोखंडी गंजाच्या रंगाप्रमाणे - याच्या पालवीचा रंग) या वृक्षाचा समावेश कॅलोफायलेसी या कुळात होतो. नागकेसर, नागवृक्ष, नागचंपा अशा नावांनी देखील हा वृक्ष ओळखला जातो. नागचाफा हा एक छोटेखानी वृक्ष आहे. याची नवीन पालवी लाल किरमिजी रंगाची असते. पाने लांबट टोकदार असतात. याची फुले मोठी, पांढरी व सुवासिक असतात. चार शुभ्र पाकळ्या व मध्यभागी पिवळाधम्मक पुंकेसरांचा गुच्छ असतो. याची फळे अंडाकार व टोकदार असतात. याच्या बियांपासून नवीन रोपे सहज तयार होतात.
Nagchafa.jpgMesua ferrea
Nagchafa leaves.jpgMesua ferrea
नागचाफ्याची फुले औषधी असून फुलांतील पुंकेसरांना नागकेसर म्हणतात. त्याचाही उपयोग आयुर्वेदामध्ये अनेक आजारावर केला जातो.

हिरवा चाफा:
Hirva chafa.jpgArtabotrys odoratissimus
"लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का?" या गदिमांच्या गीतातून प्रसिद्ध झालेला हिरवा चाफा ही आरोही झुडूप लता आहे. याचे शास्त्रीय नाव Artabotrys odoratissimus (लोम्बणारा सुगंधी फळांचा घड) असून ते Annonaceae कुळातील आहे. ही सदाहरित आधाराने वाढणारी वेल असून याची फुले हिरव्या रंगाची असतात. फुलात तीन आत आणि तीन बाहेर अशा सहा जाड हिरव्या, मांसल पाकळ्या असतात. या वेलीवर अनेक हुक सारखे भाग असतात त्याद्वारे ती आधार घेत वाढते. याची फुले सुरवातीला हिरवी असतात व नंतर ती "पिकून" पिवळी होतात आणि त्यांना गोड सुगंध येतो. नंतर त्याच जागी बोराएवढ्या हिरव्या फळांचा घोस येतो तोही पिकल्यावर पिवळा होऊन त्याला मंद गोड सुगंध येतो. याच्या फुलांपासून सुगंधी अर्क काढतात तसेच अत्तर सुगंधी तेल, धूप यातही याचा वापर करतात.

भुईचाफा:
bhuichafa.jpgKaempferia rotunda
उन्हाळ्यात थेट जमिनीतून उमलणाऱ्या व् निळसर पांढऱ्या फुलपाखराच्या आकाराच्या पाकळ्या मिरवणारा भुईचाफा तसा दुर्मिळच. याचा सुगंध मंद, प्रसन्न करणारा, म्हणूनच आरती प्रभूंनी म्हटल आहे "गंधगर्भ भुईपोटी ठेवोनी वाळली, भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी". याचे कंद जमिनीत सुप्तावस्थेत राहतात. उन्हाळ्यानंतर याला सुगंधी आकर्षक फुले येतात. हा फुलोरा जमिनीतून उगवल्यासारखा असल्याने याला भुईचाफा असे म्हणतात. फुलल्यावर याला पावसाळ्यात पाने येतात पाने वरून हिरवी असून त्यावर नक्षी असते व खालचा भाग जांभळट असतो हा Zingiberaceae या कुळातील असून याचे शास्त्रीय नाव Kaempferia rotunda (शास्त्रज्ञ कम्फेरा यांच्या स्मरणार्थ, तर रोटुंडा म्हणजे भूमिगत कंद असणारा). याचे पंचांग औषधात वापरतात. यापासून तेल, मलम बनवितात.

muchkund.jpgPterospermum acerifolium
आपल्याकडे मुचकुंद Pterospermum acerifolium नावाने माहीत असलेल्या फुलांना उत्तरेकडे "कनकचंपा" म्हणतात. तर आणखी एका पिवळ्या रंगाच्या सुवासिक Ochna squarrosa या फुलांच्या वृक्षाला "रामधनचंपा" असे म्हणतात.
kanakchafa.jpgOchna squarrosa

तर असा हा चाफा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींचा आढावा
(लेखातील सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार)
लेख पूर्वप्रकाशित

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

-

क्रिस्प माहितीपूर्ण लेख. भुंग बसत नसल्याचा कवितेत वापर आवडला. शीर्षक ही छानच.
पुलंच्या पहिल्या स्मृती कार्यक्रमांत सुनिताबाईंनी पद्मा गोळ्यांची ही कविता वाचल्याचा व्हिडिओ बघितला आहे.

सुंदर सुगंधी लेख.

सुवासिक फुले भरभरून देणारे आणि no-fuss plant. प्रपोगेशन पण सोपे.

कवी भूषण यांच्या ओळी नवीन आहेत माझ्यासाठी.

थोडे अवांतर:
चंपा तुझमें ….. प्रसिद्धच आहे. फक्त शिवानींचा परिचय मृणाल पांडेच्या मातोश्री एवढाच नाही. हिंदी - बंगाली साहित्यात फार वरचे स्थान आहे शिवानींचे. (टागोरांच्या शांतिनिकेतनमधे शिकल्या त्या)

ते सोडा, या सुंदर लेखाबद्दल तुम्हाला माझ्यातर्फे हे गिफ़्ट, सध्या माझ्या टेरेसवर बहरलेला चाफा :

848d2414-5581-4140-829d-dd4d8d96b5df.jpeg

सुगंधी लेख. आवडला Happy
कवठी चाफा माबोवर आयडी आहे Happy
नागचाफा ह्याचा उल्लेख शामची आई मध्ये आलाय.
सोमवाती च्या व्रतासाठी १०८ फुले वाहते शामची आई देवाला त्याची कथा मोठी गोड आहे.

सुगंधी लेख...आवडला .एवढे चाफ्याचे प्रकार माहिती नव्हते..घरी सोनचाफा लावलाय पण अजून फुल इल्ले Sad
लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का?">>हे छपेल का? आहे ना..

कुमार सर, जिज्ञासा, अमुपरी, किल्ली धन्यवाद.
अमितव, हो. फार छान म्हटली आहे सुनीताबाईंनी ती कविता.
अनिंद्य,
नक्कीच. शिवानी यांचे साहित्य वाचायचे आहे. तुमच्या चाफ्याला अगदी भरभरून फुले आली आहे, रंग सुद्धा मनमोहक. धन्यवाद.
केया, धन्यवाद. बदल केला आहे.

सुंदर लेख आहे!
कोकणात आमच्या घरी देवचाफा, सोनचाफा, कवठीचाफा आहे. सोनचाफ्याची बाटलीही आहे! Happy
Magnolia nilagirica म्हणून तुम्ही जो उल्लेख केलाय ती झाडं बंगलोरमधे बघितली आहेत.
सोनचाफ्याला किंवा या झाडाला (नक्की माहिती नाही) कन्नडमधे संपिगे म्हणतात. मल्लेश्वरम नावाचा बंगळुरातला एक जुना भाग आहे तिथले दोन समांतर लांबलचक रस्ते संपिगे रोड आणि मार्गोसा रोड (मार्गोसा म्हणजे कडुनिंब हे आत्ता गूगल करून समजलं) अशा नावांनी ओळखले जातात कारण या रस्त्यांच्या कडेला पूर्वी ती ती झाडं खूप होती.

नागचाफा, हिरवा चाफा, भुईचाफा मी कधी प्रत्यक्ष बघितला नाही.

सुंदर लिहिलंय !! नागचाफा , भूईचाफा पाहिला नाही अजून . हिरवा चाफा नुकताच जंगली महाराज मंदिराच्या आवारात पाहिला.

खूपच माहितीपुर्ण लेख
उद्या परत एकदा वाचणार.
इतके प्रकार आहेत हे माहीत नव्हतं

लेख आवडला! Happy
चाफ्याचे सगळे प्रकार आवडतात! माझ्याकडे दोन रंगांचे आहेत.
c9d68859-48b1-4b23-a81a-34ebe6c5e29c.jpegf1d17a0c-8f8c-4e3e-af41-36f2bcdae85f.jpeg

आता सोनचाफाही आणेन म्हणते येत्या उन्हाळ्यात.

अनिंद्य, तुमच्या चाफ्याचा बहर बघूनच हरखायला झालं मला! Happy

काय मस्त लिहिलं आहे. इथे माझ्याकडे मॅग्नोलीयाची झाडं आहेत. एकदा बहरतात वर्षातून.
कवटी चाफा का कवठी चाफा?
Magnolia.jpg

खूप सुंदर लेख! चाफा विशेष आवडता. यातले Magnolia nilagirica, कनकचंपा, आणि रामधनचंपा सोडून बाकी सगळे चाफे पाहण्याचं आणि अनुभवण्याचं भाग्य लाभल्याबद्दल मला भारी वाटतंय एकदम Happy

सुंदर लेख.

चाफ्याचे एवढे सारे प्रकार माहित नव्हते.

लिहित रहा.

दरवळणारा लेख मन ताजं करून गेला.
मला लाल चाफा, सोनचाफा विशेष आवडतो.
अनिंद्य मस्त फुललाय तुमचा चाफा

खूपच सुरेख लेख!
कवी भूषण यांचा उल्लेख एकदम पर्फेक्ट जागी छान वाटला.

प्रतिसादातही मस्त मस्त फुलं दिसतायत!

खूप मस्त लेख , प्रतिसाद आणि फोटो ही सगळे.
चाफा फारच आवडता... आणि सगळेच आवडतात.
कोकणात आमच्या कडे लाल आणि तो मॅग्नोलिया (तो म्हणजे अनंत नसेल तर ) सोडून सगळे चाफे आहेत. लाल चाफा मुंबई फोर्ट मध्ये दिसतो बऱ्या पैकी.
नागचाफा हा होळीच्या वेळेस वर्षातून एकदाच फुलतो. आमच्याकडे दोन झाडं आहेत. नागकेशर गोळा ही करतो आम्ही आणि विकतो एखाद्या रसशाळेला. तांबूस कोवळी पालवी अगदी सेम फोटोत आहे तशीच दिसते. आणि पाच पाकळ्यांच फूल ही सुंदर मंद वास असलेलं. मधोमध असंख्य पिवळे स्त्री केशर आणि त्याच्या मध्ये वर आलेला एक पुकेसर..
"लपविलास तू " शिवाय चाफ्याची गोष्ट अपूर्णच. काल पासून दोन वेळा ऐकून झाला. भारी आवडत गाणं . मालती पांडे यांची एक नंबर फॅन आहे मी.
आम्ही कोकणातून एकदा भुईचाफ्याचे कंद ठाण्यात आणले होते. कुंडीत पुरलेले विसरूनच गेलो होतो. त्या रिकाम्या कुंडीत काही तरी झाड लावू या असा विचार करत होतो तोवर त्यातून फुलच उमलली डायरेक्ट. ती अनपेक्षित भेट पाहून फारच भारी वाटलं होतं. पान खोड काही न येता जमिनीतूनच जन्मतात फुलं जणू म्हणून हे नाव अगदी योग्य.
असो. पोस्ट खूप मोठी झाली. पण विषय आवडीचा म्हणून नाईलाज होता.

Pages

Back to top