©वाईल्डलाईफ! - भाग १- नरक चतुर्दशी (I)

Submitted by अज्ञातवासी on 31 October, 2024 - 12:03

©सर्व हक्क लेखकास्वाधीन.

"सरदारा... टेंशन नही लिता, पोहच गये हम लोग."
एक सरदार चिंताक्रांत अवस्थेत बसला होता.
तो आला, आणि त्याच्या खांद्यावर थंडगार
ग्लास ठेवत म्हणाला...
...सरदार त्याही अवस्थेत हसला. त्याने ग्लास हातात घेतला.
दहा लोक विमानात बसलेले होते. सुटा बुटात...
तो मात्र वर पूर्णपणे उघडा होता...
त्यासाठी एकच शब्द पुरेसा होता...
मासिव...
एक एक स्नायू, आटीव, घोटीव बनवलेला... कुठेही अति ताणलेल्या शिरा नाहीत. कुठेही हाडांच प्रदर्शन नाही.
पण आखीव, रेखीव, ग्रीक देवतेसारखं सुडौल शरीर.
पोटावर सहा बिस्किटे उठून दिसणारी. सहा फूट उंचीचा भव्य असा देह..
शरीरावर ठिकठिकाणी जखमा होत्या, त्याच्या गोऱ्या वर्णावर जखमा देखील उठून दिसत होत्या.
एक ढगळ पँट अंगावर घेऊन तो वावरत होता, पायात पूर्णपणे लाल शूज होते. हातात एक जी शॉक लाल रंगातच होतं. गळ्यात मार्शलचे हेडफोन होते.
सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने आणि अभिमानाने बघत होते.
तो कॉकपिटमध्ये गेला. अजूनही तो लंगडत होता...
त्याने ऑटोपायलट बंद केलं, आणि कंट्रोल व्हील हातात घेतलं.
****
पाच फूट सात इंच उंची.
गोरापान दुधाळ वर्ण, गोलाकार चेहरा, आणि खाली निमुळती होत गेलेली हनुवटी.
लांब नाक, मात्र बाक मुळीच नाही. सरळ.
अतिशय प्रमाणबद्ध सुडौल शरीर. शरीरावर एकही ओरखडा नाही, की सैलपणा नाही. अगदी घट्ट...
काळेभोर डोळे. कंबरेपर्यंत येणारे केस.
एखाद्याने मूर्ती घडवावी अशी शरीरयष्टी...
लांबसडक गोरीपान बोटे. उंच खांदे...
एक रेशमी पैठणी तिने काढली, व नेसायला सुरुवात केली.
कानात मोत्याच्या कुड्या, गळ्यात ठाशीव मंगळसूत्र आणि सोन्याचा हार.
तिने केस मोकळेच ठेवले. मात्र एक छानसा हार माळला.
डोळ्यात काजळ, आणि तेच काजळ तिने हनुवटीला लावलं...
...कुठलीतरी देवीच आज भुलोकी अवतरली होती.
*****
"किती छान मुहूर्त आलाय ना दीदी? उद्याच लक्ष्मीपूजन. दादांचा वाढदिवस देखील."
ती हसली. आणि हसताच तिच्या गालावर जीवघेणी खळी पडली.
"रोशनी..." तिचा आवाज बाहेर पडला.
गोड गळा, मात्र त्यात गंभीरता डोकावणारी.
"तुझे दादा आयुध पुजा करुन बाहेर पडले होते... एक मोठी लढाई जिंकण्यासाठी... आणि ते ती लढाई जिंकतील, यात तिळमात्र शंका नव्हती..."
"... तरनने काही सांगितलं? नेमकं काय झालं ते? म्हणजे त्या दहापैकी फक्त तरनच तुमच्याशी बोलायची हिम्मत करू शकतो."
"कारण त्याने त्याला भाऊ मानलंय म्हणून. हनुमान झालाय तो त्याचा. असं समज, पन्नास लोक फक्त एका कुऱ्हाडीने कापली गेलीत... अगणित गोळ्या चालल्या. बॉम्बदेखील पडले, पण शेवटी कुऱ्हाडच कामात आली."
रोशनीने आश्चर्याने आ वासला.
"म्हणून, स्वागताची तयारी कर. उद्या त्याचा वाढदिवस आहे, पण तरीही आजच सगळे येतायेत. उद्या सकाळी आई, बाबा, अण्णा, अम्मा, आर्या, रितु, ओम, मिहिर... सर्वजण इथे असतील. सगळा परिवार इथे असेल... काही गोष्टी लपवाव्या लागतील. तुम्ही सर्वजण काळजी घ्या..."
"जी दीदी..."
"विक्रमादित्य काय करतोय?"
"बॅडमिंटन खेळतोय कोर्टवर."
"गुड. खेळू दे."
तिने रांगोळीचा लाल रंग घेतला, व समोरच्या विशाल आकृतीत भरायला सुरुवात केली.
*****
"दादा."
"बोल तरन."
"ओझर उतरेंगे या गांधीनगर?"
"क्यू?"
"क्यूकी. कल सीएम मुवमेंट है ओझर मैं. उगाच वेळ लागेल. आणि या अवस्थेत..."
"काय अवस्था तरन?"
तरन गप्प बसला.
"सरदारा टेंशन नहीं लिता. जागेवर जाऊन बस. पोहोचलोच आपण." तो म्हणाला.
हळूहळू विमानातून खालची शेते स्पष्ट दिसायला लागली होती.
तरनने सहज खिडकी उघडली. ओझरच्या दिशेने विमान नक्कीच जात नव्हतं.
गांधीनगर. तो मनाशीच म्हणाला.
मात्र गांधीनगरदेखील त्याला मागे पडताना दिसलं...
...त्याच्या मनात एक वेगळाच विचार आला, मात्र त्याने तो झटकला.
आणि थोड्याच वेळात त्याला परिस्थितीची जाणीव झाली.
विमान हळूहळू खाली येत होतं.
समोर धावपट्टीदेखील दिसत होती...
...त्याच्या बंगल्याच्या आवारच तितका मोठा होता.
...आणि आज त्याने विमान सरळ बंगल्यातच उतरवलं होतं.
...त्याच्यामधला पायलट आज पूर्णत्वास पोहोचला होता.
*****
ती रंग भरत होती.
समोर विमान उतरताना तिला दिसलं.
आयुष्यात अनेक अद्भुत गोष्टी बघितलेली ती थोडावेळ स्तब्ध झाली.
...पुढच्याच क्षणी तिच्यातील राणीपणा जागा झाला.
"निर्भय, निश्चल..." तिने आवाज दिला.
जी दीदी.
"उनको लेके आओ." ती समोर बघत म्हणाली.
ते लागलीच पळाले, आणि लगेचच दोन डिफेंडर प्लेनच्या दिशेने निघाल्या.
तिने निःश्वास सोडला, आणि उजव्या हाताची मूठ छातीवर दोनदा मारली.
ती पुन्हा एकदा सज्ज झाली होती.
थोड्याच वेळात दोन्ही गाड्या परत येताना तिला दिसल्या.
खिडक्या उघड्या, आणि खिडकीतून बाहेर निघालेल्या बंदुका.
एका गाडीची ड्रायव्हरच्या शेजारच्या सिटची काच पूर्णपणे बंद होती.
तिला माहिती होतं तो तिथेच होता.
बंगल्यासमोर गाड्या आली. सर्वजण उतरले...
आणि धावतच बंगल्यात आले.
तोदेखील उतरला.
मात्र हळूहळू सावकाश लंगडत तो चालत होता.
ती तिथेच उभी होती.
त्याला बघत.
सुकलेल्या जखमा, काळानिळा चेहरा...कुरळे अस्ताव्यस्त केस...
आणि तिच्यावर रोखलेली नजर.
सावकाश तो तिच्याकडे पोहोचला...
...आणि कडकडून तिला मिठी मारली. अगदी घट्ट. तिचा जीव गुदमरला असेल अशी.
"लव यू गायत्री. जीव आहेस तू माझा." तो एवढंच म्हणू शकला.
"लेट्स गो. मला चेक करू दे तुला अगोदर." ती म्हणाली.
तिचा आधार घेत तो निघाला...
...बघणारे त्यांच्याकडे बघतच राहिले.
*****
ती त्याच्या समोर होती. तो समोर एका बेडवर झोपलेला होता.
त्याच्या पोटावर एका जखमेला ती टाके घालत होती.
अगदी हळूवार हाताने, कारण त्याने तिला भूल देऊ दिली नव्हती. तो भाग बधिर सुद्धा करू दिला नव्हता.
"जखम खोल आहे मनू... वेळ लागेल तुला रिकवरीला. "
"लेट् इट बी."
"पुढचे काही दिवस जास्त हालचाल करायची नाही. शांत पडून रहायचं."
"शक्य आहे मला?" तो म्हणाला.
"शक्य करायचं. ओके?"
"माझ्या जवळ ये."
"इथे कुणीही नाहीये. मोठ्याने बोलू शकतोस."
"ओके. तुला काही दिवस टॉप व्हावं लागेल. जर मला जास्त हालचाल करायची नाही तर."
"वेडा कुठचा." ती हसली. "अँड आय वुड लव दॅट. आता शांत पड."
ती त्याच्या जवळ आली, त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. आणि निघूनही गेली.
तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला.
*****
ती सोफ्यावर बसलेली होती.
समोरच तरन बसलेला होता.
"बोला तरनजितसिंग साहनी."
"काय बोलू भाभी."
"काहीही बोला... कशी झाली तुमची ट्रीप."
"ट्रीप क्या भाभीजी, लढाई करने गये, और उधर वॉर चालू हो गया."
"जे तुम्ही जिंकलात."
"दादा असताना आम्हाला काही होईल का?"
ती शांत राहिली.
"गोळ्या संपल्या होत्या, बॉम्ब संपले होते. समोरून मात्र गोळीबार चालूच होता. असं वाटत होतं की आम्ही जिवंत राहणार नाही...
...एक गोळी तर माझ्या पगडीजवळून निघून गेली. पगडी फाटली माझी...
मला वाटलं संपलो मी. मात्र तेवढ्यात मागून आवाज आला.
सरदारा, टेंशन नहीं लिता...
बघतो तर दादा दोन मोठ्या कुऱ्हाडी घेऊन मागे उभे होते...
...उनके सामने जाके, सबको काट रहे थे. गोली बरस रही थी, धमाके हो रहे थे, और ये काटते जा रहे थे."
"आपले किती गेले?" तिने विचारले.
"वीस गेले भाभी."
तिने निःश्वास सोडला.
"त्यांचे?"
"पाचशे...लष्कर-ए-जब्बार, त्याचा म्होरक्या हुमायून अहमद. सगळं संपलं भाभी... एकट्या दादांनी एकहाती सगळं संपवलं."
ती शांतच होती.
"भाभी एक सांगू?"
"बोल ना."
"दादांना मी विचारलं होतं, की जर यांना संपवू शकलो नाही तर?"
"मग?"
"तर ते म्हणाले, मग गायत्री येईल, आणि यांना आपण जन्म का घेतला, हा प्रश्न पडेल."
"त्याचा माझ्यावर जरा जास्तच विश्वास आहे." ती म्हणाली.
"स्वतःपेक्षाही जास्त." मागून आवाज आला.
तो अजूनही लंगडत होता.
"मनू आराम करायचा." ती उठली.
"वेळ नाहीये गायत्री." तो हसत म्हणाला.
"उद्याची तयारी करावी लागेल. चाळीसावा वाढदिवस आहे माझा. मी चाळीस वर्षे जगलो, हेच जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे."
"किती छान मुहूर्त आहे ना. म्हणजे तुमचा वाढदिवस, लक्ष्मीपूजन, सगळं एकत्रच." रोशनी म्हणाली.
"खूप दिवसांनी सगळी फॅमिली उद्या एकत्र येईल. अप्पा, अम्मा, आई, बाबा, आर्या, मिहिर, रितु, ओम... सर्वजण." गायत्री म्हणाली.
तेवढ्यात एक प्रौढ माणूस आत आला.
"अमित सर. तुमचीच वाट बघत होतो. या बसा."
ती व्यक्ती बसली.
"अरे भाऊ हे काय लावलंय? डायरेक्ट प्लेन बंगल्यात?"
"वेळ नव्हता."
"मी नंतर येतो. तू जरा आराम कर."
"उद्याची लिस्ट आणली."
"कोणती लिस्ट?"
"पाहुण्यांची."
"अरे सगळी नावे तूच फायनल केलीत ना? निमंत्रण सुद्धा गेलंय. मी स्वतः काही ठिकाणी जाऊन आलो."
"काही नावे चेक करा."
"बरं." त्यांनी फोन काढला.
"सायली पटवर्धन."
"हो."
"स्नेहल आणि मनू पटवर्धन."
"हो."
"सोनाली आणि मोहन पाटील."
"हो."
"गौरी आणि प्रकाश वाघमारे."
"हो."
"तनाझ आणि झुल्फी अख्तर."
"हो."
"साक्षी आणि शरावती कुलकर्णी."
"शरावती नाहीये यात." अमित सर म्हणाले.
"मी सांगते साक्षीला. ती घेऊन येईल शराला." गायत्री म्हणाली.
"ज्युली चव्हाण."
"हो."
"मोहिनी आणि कबीर शेट्टी?"
"हो."
"अज्ञातवासी?"
"हो." अमित सर जोरात हसले.
"तोदेखील हसला."
"मोक्ष राजशेखर शेलार."
"काय?" अमित सर चमकले.
बाकी सर्वजण उडालेच...
"मोक्ष राजशेखर शेलार? नाहीये नाव यादीत."
"बोलवा त्याला. स्वतः जाऊन निमंत्रण द्या. त्याला आता नाशिकची खरी ओळख व्हायला हवी."
थोडावेळ कुणीही काही बोललं नाही.
"गायत्री मी आराम करतो थोडावेळ. विक्रम आल्यावर त्याला माझ्याकडे पाठव. रात्री आपण सोबत थोडं बाहेर जाऊयात."
"गुड नाईट मनू." ती हसली.
तो तसाच उठला, आणि सावकाश लंगडत गेला.
"गायत्री..." अमित सर न राहवून म्हणाले.
"तो जे सांगतोय ते करा."
"तू समजवणार नाहीस त्याला?"
"या जगात त्याला दोनच व्यक्ती समजावू शकतात. एक त्याची आई, आणि दुसरी मी.
त्याच्या आईला या गोष्टी कळता कामा नये, आणि दुसरं, मला आता त्याला समजवायचं नाहीये. जेवण तयार आहे. चला जेवण करून घ्या."
"भाभी आप?" रोशनी म्हणाली.
"मी मनूसोबत जेवेन."
गायत्रीदेखील तिथून उठली, आणि आत निघून गेली.
"ऐकलं नाही का. चला जेवण करू." अमित सर म्हणाले.
सर्वजण तिथून उठले...
...डोक्यात प्रश्नांचं थैमान घेऊन...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@असामी - नाही हो, ॲनिमल च्याही आधी या कथा सुरू आहेत. Wink
@आबा. - पूढचे दोन भाग टाकले आहेत.

आता animal

Back to top