कर्नाटकातल्या चिकमगळूर जिल्ह्यात कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान आहे. या परिसरात सहा-सात ट्रेक्स आहेत. त्यापैकी कुद्रेमुख शिखराचा ट्रेक सगळ्यात मोठा आहे. हे मलयनगिरीनंतर कर्नाटकातलं दुसर्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे. आम्ही यावेळी कुद्रेमुखची चढाई न करता तिथल्याच दुसर्या ’कुरिंजल’ नावाच्या शिखराचा ट्रेक करायचं ठरवलं होतं. या ट्रेकचं हे थोडक्यात वर्णन!
कुरिंजल हे शिखर अगदी खूप उंच नसलं, (समुद्रसपाटीपासून साधारणपणे १२०० मीटरवर आहे) तरी चालण्याचं अंतर ७+७ किलोमीटर आहे. ट्रेक करण्याआधी वनविभागाकडे नोंदणी करणं आवश्यक असतं. रोजचे ठराविकच स्लॉट्स उपलब्ध असतात. त्यानंतर नोंदणी बंद होते. या वर्षीपासून ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आहे. मुलांना नवरात्रीची सुट्टी सुरू होती. माझ्या ऑफिसला दसर्याला जोडून गुरुवार-शुक्रवारची सुट्टी होती. आम्हाला शक्यतो शुक्रवारची नोंदणी करायची होती, पण ज्या दिवशी या आठवड्याचं बुकिंग सुरू झालं, त्या दिवशी लगेचच शुक्रवारच्या सगळ्या जागा भरल्या. त्यामुळे नाईलाजाने आम्ही गुरुवारसाठी नावं नोंदवली. नवर्याने एक दिवस सुट्टी वाढवली आणि मीही बुधवारची सुट्टी टाकली. बुधवारी सकाळी बंगलोरहून निघालो. दुपारी जेवायच्या वेळेपर्यंत ’कापी काडु’ या ठिकाणी पोचलो. मागच्या वर्षी मे महिन्यात इथेच दोन-तीन दिवस राहिलो होतो, तेव्हा हा परिसर आवडल्यामुळे यावेळीही हेच ठिकाण निवडलं.
कुद्रेमुखमधे ट्रेकिंग करण्यासाठी ’गाईड’ची गरज भासते. वन खात्याकडून तो मिळू शकतो, पण आमच्यासाठी रिझॉर्टच्या माणसांनी त्यांच्या ओळखीच्या एजंटतर्फे गाईडची सोय केली. अर्थात तो सरकारमान्य असावा लागतोच. गुरुवारी सकाळी ब्रेड-ऑम्लेट आणि चहा, असा नाश्ता करून, दुपारच्या जेवणासाठी नीर दोसे सोबत घेऊन साडेसातच्या सुमारास निघालो. गाईड भेटणार होता ते ठिकाण बारा-तेरा किलोमीटरवर होतं. तिथे पोचून मग त्याच्या गाडीतून साताठ किलोमीटरवरच्या कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाच्या कार्यालयात जाऊन, प्रवेशशुल्क भरून आमचे पासेस घेतले. ट्रेकची प्रत्यक्ष सुरुवात तिथूनही पुढे आठनऊ किलोमीटरवर आहे. या परिसरात पूर्वी लोखंडाच्या खाणी होत्या. सरकारी मालकीची खाणकाम कंपनी होती. तिथल्या कर्मचार्यांची इथे वसाहतच होती. वीसेक वर्षांपूर्वी (बहुतेक इथल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी) या खाणी बंद झाल्या. पण त्यावेळी बांधलेल्या शाळा-कॉलेजच्या आणि इतरही इमारती मात्र ओसाड अवस्थेत शिल्लक आहेत.
कुरिंजलच्या प्रवेशद्वाराच्या आत गाडी ठेवून आम्ही चालायला सुरुवात केली. आमच्याशिवाय अजून कुणी दिसत नव्हतं. एका महाविद्यालयाची रिकामी बस तेवढी दिसली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) शिबिरासाठी विद्यार्थी इथे आल्याचं लक्षात आलं. थोडा वेळ डांबरी रस्त्यावरून चालल्यावर मग प्रत्यक्ष कुरिंजलची वाट सुरू झाली. भद्रा नदीने स्वागत केलं.
भद्रा, तुंगा आणि नेत्रावती या तीन नद्या इथे उगम पावतात. पुढे शिवमोग्याजवळ तुंगा आणि भद्रेचा संगम होऊन त्या ’तुंगभद्रा’ बनून बंगालच्या उपसागराकडे प्रवास करतात. नेत्रावती मात्र मंगळूरकडे, म्हणजे अरबी समुद्राकडे वाहते. आपल्या महाबळेश्वरची आठवण झाली. महाबळेश्वरला कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री अशा पाच नद्या उगम पावतात. त्यापैकी सावित्री अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि बाकीच्या चारही नद्या कॄष्णेच्या रूपाने बंगालच्या उपसागराला मिळतात.
भद्रा नदीवरचा छोटासा पूल ओलांडून पुढे चालू लागलो. सुरुवातीची ही वाट फारशी चढाची नाही. वाटेवरची माती लाल होती. गारगोटीचे आणि काही विविधरंगीही दगड दिसत होते.
पहिला टप्पा पार केल्यावर मग जंगलाचा भाग सुरू झाला. अधूनमधून थांबत, आजूबाजूचं निसर्गसौंदर्य बघत आम्ही चालत होतो.
.
.
वेगवेगळ्या प्रकारची झाडं असली, तरी एका विशिष्ट प्रकारची झाडं सर्वात जास्त होती. आमच्या गाईडला झाडाचं नाव विचारलं, पण त्याला सांगता आलं नाही.
वाट छान होती. कधी चढ, कधी सपाटी. या परिसरात दोनशे विविध प्रकारचे पक्षी दिसतात असं वाचलं होतं. पण आम्हाला अक्षरशः औषधालाही एकही पक्षी दिसला नाही. एकदा एका पक्ष्याचा आवाज आला, पण तोही ओळखता आला नाही! या बाबतीत माझी निराशाच झाली. वाटेवर असंख्य जळवा होत्या. त्या चावू नयेत म्हणून आम्ही आधीच पायांना डेटॉल चोपडलं होतं. तरी आम्हाला थोडा प्रसाद मिळालाच. एका ठिकाणी झर्याचं स्वच्छ, गार पाणी पोटभर प्यायलो, बाटलीतही भरून घेतलं. आता NSS ची मुलंमुली आमच्या मागून येऊन पुढे जायला लागली. ते बरेच जण होते आणि शेवटपर्यंत मग त्यांच्यापैकी कुणी ना कुणी तरी आमच्या मागे-पुढे होतेच. जंगलाचा भाग संपला आणि उघड्यावरचा, मोठे दगडधोंडे असलेला चढाचा भाग सुरू झाला. थोडं चढून गेल्यावर एक ’व्ह्यू पॉइंट’ आला. मात्र खालचा प्रदेश धुक्याने आच्छादित होता. मधूनच धुक्याचा पडदा बाजूला सरकायचा आणि सुरेख विहंगम दृश्य दिसायचं.
.
.
इथे जरा पाय पसरून बसण्यासारखा कातळ होता. त्यामुळे बसून नीट बघून पायाला आणि बुटांना चिकटलेल्या जळवा काढून टाकल्या. सोबत आणलेली चिक्की खाल्ली, पाणी प्यायलं आणि शेवटचा चढ चढण्यासाठी सज्ज झालो. या शेवटच्या चढाने मात्र चांगलंच दमवलं मला तरी. धापा टाकत वर पोचलो. तिथे NSS च्या शिक्षकांचा पारा बराच चढलेला होता. थोडा वेळ त्यांचं बोलणं ऐकून अंदाज आला की सगळ्यात आधी वर पोचलेल्या मुलांनी काही बेशिस्तीचं वर्तन केलं होतं. मुलांची चांगलीच उभी-आडवी खरडपट्टी काढून शेवटी एकदा ते बोलायचे थांबले. मग ते सगळेच खाली उतरायला लागले आणि आम्हाला जरा शांतता मिळाली. खालचा प्रदेश पूर्णपणे धुक्याने वेढलेला होता. त्यामुळे काहीच दिसत नव्हतं, हवा मात्र छान, ताजी होती.
हेच ते कुरिंजल शिखर.
आता भूक लागलेली असल्यामुळे आम्ही नीर दोसे आणि चटणीचं जेवण केलं आणि मग खाली उतरायला सुरुवात केली. उतरताना आमच्या गाईडने एक शॉर्टकट निवडला आणि आम्ही पूर्णपणे दाट जंगलातून, अरुंद वाटेवरून खाली उतरलो.
.
एका पडलेल्या झाडाला असंख्य अळंब्या लागल्या होत्या.
ट्रेकच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून साधारणपणे तीन-साडेतीन किलोमीटरवर आम्ही मूळ वाटेवर येऊन मिळालो. त्या वाटेवरून थोडं चाललो आणि पाऊस सुरू झाला. सुरुवातीला सौम्य असलेला पाऊस नंतर जो मुसळधार पडायला लागला, तो नंतर दोनतीन तास अखंड तसाच पडत राहिला. आमच्या छत्र्यांचा उपयोग फक्त कॅमेरे न भिजण्यापुरताच होत होता. आम्ही सगळे जवळजवळ पूर्णपणे भिजलो. सतत उतरून उतरून पायाची नखं बुटांच्या आत टोचायला लागली होती. प्रत्येक वळणावर वाटत होतं, आता तो भद्रेवरचा पूल दिसेल. पण छे! शिवाय तो पूल ओलांडल्यावरही पुढे डांबरी रस्त्यावर चालायचं होतंच. तिथून मग गाईडबरोबर त्याच्या गाडीतून काही किलोमीटर आणि मग पुन्हा आपल्या गाडीतून उरलेलं अंतर. हे सगळं पावसात भिजताना डोळ्यासमोर दिसत होतं. पण अखेर हे सगळं पार पडलं आणि आम्ही एकदाचे ’कापी काडु’ मधे येऊन पोचलो. गरम गरम पाण्याने आंघोळी केल्या. सडकून भूक लागली होती. चहा आणि भाजलेला गरम गरम ब्रेड जॅमसोबत खाऊन निवांत पाय पसरून बसलो!
हिरवेगार आहे अगदी !!!!
हिरवेगार आहे अगदी !!!!
पक्षी न दिसल्याने ( आणि आम्हाला फोटो ना पाहायला मिळाल्याने ) निराशा झाली
wow! मस्त हिरवागार ओलावा बघून
wow! मस्त हिरवागार ओलावा बघून डोळे निवले.. मस्त झाला ट्रेक पण बरीच लांबलचक रपेट(हा शब्द अपुराच आहे .. ) झाली का म्हणजे? किती किलोमीटरचा आहे हा ट्रेक. जळवा चावतात ना ? मग त्यावेळी दुखलेले /टोचलेले कळत नाही का? डास चावताना होते तसे?
त्या चावू नयेत म्हणून डेटॉल लावायचे असते हे नव्हते माहिती.. पण म्हणजे सतत सगळीकडे डेटॉल च्या वासासोबत चालायचं!!
छान वर्णन. परीसर हिरवागार आहे
छान वर्णन. परीसर हिरवागार आहे एकदम.
मस्त वृत्तांत! त्रोटक आणि
मस्त वृत्तांत! त्रोटक आणि मुद्देसुद! (क्रिस्प... त्रोटक निगेटिव्ह वाटतं म्हणून क्रिस्प लिहितो ).
फोटो ही आवडले.
छान वृत्तांत आणि फोटो.
छान वृत्तांत आणि फोटो.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
जळवा असणार आहेत हे माहिती असलं तर जळवांसाठीचे (त्रास होऊ नये म्हणून) मोजे मिळतात. त्यांचा बराच फायदा होतो.
सुरेख लिहिलं आहे. कुद्रेमुख,
सुरेख लिहिलं आहे. कुद्रेमुख, नेत्रावली माझ्या आवडीचा भाग. संध्याकाळी प्रवास करताना बऱ्याच वेळेला पोलीस चौकशीला सामोरे जावे लागू शकते. नक्षली भाग आहे.
छान वृत्तान्त आणि ट्रेक..
छान वृत्तान्त आणि ट्रेक..
जळवांची चर्चा ऐकून संजय दत्तचा सफारी पिक्चर आठवला.
हाssssssssमस्त वाटलं फोटो
हाssssssssमस्त वाटलं फोटो बघून आणि वर्णन वाचून.जळवांची मला लय भिती वाटते. ती ओढून काढावी लागते म्हणे.आणि अशी काढली की रक्ताची धार ( हे सगळं ऐकीव माहिती आहे, आणि पिक्चरी ज्ञान)
मस्त ट्रेक, सुरेख वर्णन/लिखाण
मस्त ट्रेक, सुरेख वर्णन/लिखाण!
छान वृत्तांत. जळवा वगैरे
छान वृत्तांत. जळवा वगैरे वाचून 'बापरे' असं वाटलं. बुटांच्या आत शिरल्या का त्या? पायाला कश्या काय लागल्या?
तुझा लेख आहे हे पाहून मी ही पक्ष्यांचे फोटो असतीलच असं गृहीत धरलं होतं थोडीशी निराशा झाली खरी. पण ट्रेकचे फोटोज मस्त आहेत. डोळे निवले.
धन्यवाद सर्वांना. पक्षी
धन्यवाद सर्वांना. पक्षी कुरिंजल ट्रेकमध्ये दिसले नाहीत तरी आम्ही जिथे उतरलो होतो (कापी काडु) तिथे दिसले.
हा सुभग.
White-rumped munia
Brown Shrike (गांधारी)
जळवा बुटावरून प्रवास करत वर
जळवा बुटावरून प्रवास करत वर वर आल्या आणि बहुतेक मोज्यातून आत शिरल्या. चावताना जाणवलं नाही. मला हुळहुळल्यासारखं जाणवलं तेव्हा लक्षात आलं. जळू चावत असते तेव्हा सहजासहजी काढून टाकता येत नाही. शिवाय ती लिबलिबीत असते. नंतर खूप खाज येते.
धनुडी, रक्ताची धार अगदी नाही, पण थोडं रक्त आलं. बहुतेक पिताना रक्त गोठू नये म्हणून जळवा, डास वगैरे यांच्याकडे काही तरी स्राव असतो जो ते आपल्या रक्तात मिसळतात. त्यामुळे रक्त जास्त वाहतं.
अनिरुद्ध, हे स्पेशल मोजे माहिती नव्हते. पुढच्या वेळी लक्षात ठेवू. डेटॉलची आयडिया इंडिया हाईक्सच्या वेबसाईटवर वाचली होती.
जिन्क्स, नक्षलींचं माहिती नव्हतं.
पक्षी फोटो फारच छान
पक्षी फोटो फारच छान
अरे वा! पक्ष्यांचे फोटो पण
अरे वा! पक्ष्यांचे फोटो पण भारी!
जळवा बुटावरून प्रवास करत वर वर आल्या आणि बहुतेक मोज्यातून आत शिरल्या >>> बापरे!! जळवा बहुतेक चावताना तेवढा भाग बधीर करतात असं ऐकल्याचं आठवतंय. त्यामुळे नसेल कळलं कदाचित.
छान वर्णन . एकदम चपखल शब्दात
छान वर्णन . एकदम चपखल शब्दात लिहिलेल आवडले
वृत्तांत छान आहे. फोटो पण
वृत्तांत छान आहे. फोटो पण मस्त, खूप आवडले.
पक्षी तुला पोज देतात वावे,
पक्षी तुला पोज देतात वावे, असं वाटतं.
खूप छान अनुभव वर्णन!
खूप छान अनुभव वर्णन! फोटोसुद्धा सुरेख!
मस्त वर्णन आणि फोटो
मस्त वर्णन आणि फोटो नेहमीप्रमाणेच! कापी काडू (इथे कॉफीचा काहीतरी संदर्भ आहे असे उगाचच वाटते ) वरून एका दिवसांत हा ट्रेक होऊ शकतो असे दिसते.
त्या भागातील जंगलाबद्दल ऐकले आहे. सहज विकीवर पाहिले तर त्या भागात प्राण्यांची खूप विविधता दिसते. पक्ष्यांबद्दल तेथेही फारसे लिहीलेले नाही.
नेत्रावती मात्र मंगळूरकडे, म्हणजे अरबी समुद्राकडे वाहते >>> हे माहीत नव्हते. तेथे ते "वॉटर डिव्हाईड" सारखे मार्कर्स आहेत का? मराठीत काय म्हणतात माहीत नाही. मधला असा पॉइण्ट की ज्याच्या एक बाजूला पडलेले पाणी अरबी समुद्राकडे जाते, तर दुसर्या बाजूला पडलेले बंगालच्या उपसागराकडे?
धन्यवाद फारएण्ड, धनुडी,
धन्यवाद फारएण्ड, धनुडी, झकासराव, उ.बो., जाई, मार्गी, rmd
कापी म्हणजे कॉफीच. काडु म्हणजे जंगल. कापी काडु हे आम्ही जिथे राहिलो होतो त्या रिसॉर्टचं नाव आहे. कॉफी इस्टेट आहे आणि त्यात राहण्याची सोय केलेली आहे.
वॉटर डिव्हाईडला मराठीत जलदुभाजक म्हणतात.
या तिन्ही नद्यांचे उगम मात्र पाहता येत नाहीत. आमच्या गाईडने सांगितलं की पूर्वी तुंगा नदीच्या उगमापर्यंत जाता यायचं. ते ठिकाण खूप सुंदर आहे. पण तिथे काही अपघात झाले आणि तेव्हापासून तिथे पर्यटकांना जाता येत नाही.
सुंदर फोटो, सुंदर वृत्तांत
सुंदर फोटो, सुंदर वृत्तांत लेखन!
अतिशय सुंदर फोटो व वर्णन, फार
अतिशय सुंदर फोटो व वर्णन, फार आवडले. अजून लिही असे, छान सहल झाली. नद्यांची माहिती व सर्व प्रतिसादही आवडले.
अतिशय सुंदर फोटो व वर्णन, फार
अतिशय सुंदर फोटो व वर्णन, फार आवडले. जावेसे वाटले वाचुन पण उन्हाळ्यात ट्रेक असेल तर जाईन.
फोटो अगदी अप्रतिम.. कुरिंजल नाव वाचुन मला सतत निल कुरिंजी आठबतेय.
आमच्या घराच्या बाहेरच जळवांचा इतका प्रसाद मी खाल्लाय की आता पश्चिमी घाटांच्या कुठल्याही जंगलात जावेसे वाटत नाही.. तरी घराच्या बाहेरच्या जळवा लहान आहेत, आमच्या जंगलात मोठ्या आहेत. जळु कसाही प्रवास करु शकते. गेल्या आठवड्यात मला एकदा पोटावर व एकदा पाठीच्या कण्यावर जळु लागलेली आहे. मी घरासमोर अंगणात साफ सफाई करत होते तेव्हाचा प्रसाद. मी अजिबात जमिनीवर लोळत नव्हते जळु लागल्याचे काही नाही पण तिने जिथे भोक पाडले ती जागा तिन दिवस सुजलेली राहते आणि महिनाभर खाजत राहते. त्यामुळे नकोसे होते अगदी.
बेफ़िकीर, अस्मिता, साधनाताई,
बेफ़िकीर, अस्मिता, साधनाताई, धन्यवाद!
खरंच, कुरुंजीचं माझ्या लक्षात नव्हतं आलं. असेलही काही संबंध. बघते.
जळवा खरंच कशाही प्रवास करतात. आम्ही गाडीत बसल्यावरही इकडून तिकडून तीनचार जळवा निघाल्या!
वर मी दगडांचा फोटो दिलाय त्यातही एक जळू आहे.
मस्त छान लिहिलं आहेस वावे .
मस्त छान लिहिलं आहेस वावे . तिकडे पक्षी खुप आहेत वाचून पक्ष्यांचे फोटो पहायला मिळतील अशी आशा वाटली पण नाही दिसले. अर्थात प्रतिसादात तरी मिळाले पहायला , मजा आली. छान काढतेस तू पक्ष्यांचे फोटो.
असं झऱ्याच पाणी फार गोड आणि गार लागत. तहान भागते असं पाणी प्यायल की ...
जळवा फक्त ऐकूनच माहित आहेत , पाहिल्या नाहीयेत अजून.
सुंदर वर्णन ! मला कुद्रेमुखचा
सुंदर वर्णन ! मला कुद्रेमुखचा ट्रेक करायचा होता पण त्याबद्दल नीटशी माहिती मिळू न शकल्याने आणि आसपास रहाण्याकरता हॉटेलही न मिळाल्याने तो राहूनच गेला. पण चिकमंगळूरचा भाग खूप सुंदर आहे. मुलायनगीरी, बाबाबुदानगीरी या पिक्सना ट्रेक म्हणणे काहीसे विनोदी वाटेल पण वरून दिसणारा नजारा अप्रतिमच आहे.
धन्यवाद माधव, मनीमोहोर!
धन्यवाद माधव, मनीमोहोर!
यानंतर कुद्रेमुख भागात ट्रेक करायचा असेल तेव्हा बहुधा आम्ही इंडिया हाईक्स किंवा तत्सम ग्रुपबरोबर जाऊ कदाचित. वनखात्याकडे नोंदणी आपली आपल्यालाच करावी लागते. पण बाकी जाणं-येणं, खाणं-पिणं याची सोय ते करतात.
बरेच दिवस वाचायचा राहिला होता
बरेच दिवस वाचायचा राहिला होता.
छान सुरेख वर्णन. फोटो सुद्धा मस्त.
कुरिंजल नाव आवडले.
बाकी पक्षी दिसले नाही त्यामुळे झालेली निराशा समजू शकतो. पावसाळी वातावरणामुळे असेल.
नंतरचे पक्षी मस्ताच.
सतत उतरून उतरून पायाची नखं बुटांच्या आत टोचायला लागली होती.>>>>> ही अवस्था अनुभवली आहे.
खूप सुंदर ट्रेक वर्णन....
खूप सुंदर ट्रेक वर्णन.... घरबसल्या ट्रेक घडवला....... मस्त
Pages