खमंग कुरकुरीत शेव

Submitted by मनीमोहोर on 31 October, 2021 - 05:08
Shev,  मराठी शेव
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दिवाळीच्या फराळामध्ये चकली ,करंजी, बेसन लाडू , चिवडा हे जरी मानाचे सरदार असले तरी चिवड्याची लज्जत आणखी वाढवणारी शेव ही आपले चिवड्या बरोबरचे अस्तित्व मानाने टिकवून आहे.

नुसती शेव जरी कमी खाल्ली जात असली तरी पोहे, उपमा, भेळ, चिवडा ह्या पदार्थाना शेव एक प्रकारची परिपूर्णता देते. त्या पदार्थांची लज्जत आणखी वाढवते.

जाडी, बारीक नायलॉन, तिखट, मसाला, प्लेन, लसूणी, भावनगरी असे अनेक प्रकार आहेत शेवेचे. कोणत्या पदार्था बरोबर कोणत्या प्रकारची शेव चांगली लागेल ह्याचे प्रत्येकाचे नुस्के ठरलेले ही असतात. जाड शेवेची चटपटीत शेवभाजी खान्देशात खूप प्रसिद्ध आहे.

अस जरी असलं तरी जनरली शेव कोणी घरी करत नाही. लागेल तसं पॅकेट विकतच आणलं जातं. परंतु दिवाळीच्या फराळाच्या ताटात इतर पदार्थां बरोबर घरी केलेल्या शेवेच फुल (कोणी ह्याला शेवेचा चवंगा ही म्हणतात ) फार शोभून दिसतं. फराळाच ताट भरल्या सारख ही दिसत ह्यामुळे.

शेव करणं चकल्या करण्या एवढं धोकादायक नाहीये. जनरली शेव करणाऱ्याला दगा नाही देणार. कुरकुरीत खमंग शेव कोणालाही सहज जमण्या सारखी आहे. घटक पदार्थ ही मोजकेच लागतात शेवेसाठी आणि होते ही खूप पटकन.

दर वर्षी दिवाळीत मी शेव घरीच करते. पितळी सोऱ्यात बारीक जाळी वापरून पाडलेली शेव खूप नाजूक सुंदर दिसते आणि चवीला ही खमंग, कुरकुरीत लागते.

अजून दोन दिवस आहेत दिवाळीला . तर तुम्ही ही करून बघा ह्या वर्षी बारीक शेव घरच्या घरी.

लागणारे साहित्य :
चार वाट्या बेसन ( चाळून घेतलेलं गुठळ्या नकोत )
2) तांदुळाचे पीठ अर्धी वाटी,
३) दोन टी स्पून ओवा वाटून तो अर्धी वाटी पाण्यात मिक्स करून ते पाणी गाळून घेणे , ह्या बरोवर तुम्ही थोडी लसूण ही वाटू शकता पण मी नाही घातलीय लसूण.
4) हिंग अर्धा चहाचा चमचा मीठ चवीनुसार, पाव चहाचा चमचा हळद आणि तेल.

क्रमवार पाककृती: 

कृती .

परातीत बेसन ,तांदुळाचे पीठ, मीठ, हिंग, हळद हे सगळं एकत्र करून घ्यावे. त्यात चार चहाचे चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. ते मोहन सगळ्या पीठाला चांगले चोळून घ्यावे. ओवा गाळून घेतलेलं पाणी त्यात घालावे. नंतर गरजे प्रमाणे पाणी घालून पीठ भिजवावे. पीठ घट्ट नको थोडं सैलसर च असावे . हे पीठ दहा मिनिटं ठेवून द्यावे. चकलीच्या सोऱ्यात शेवेची बारीक जाळी घालून पीठ त्यात भरावे आणि गरम तेलात शेव पाडून शेव तळून घ्यावी.

वाढणी/प्रमाण: 
नाही सांगता येणार.
अधिक टिपा: 

1) बारीक जाळी वापरून शेव छान होते.
2) तेल फार गरम नको मध्यम गरम असावे . शेव घालताना गॅस मोठा व घालून झाली की गॅस मध्यम करावा.
3९ शेव पाडताना बाहेरून आत पडावी. कढईच्या मध्ये जास्त हिट लागते त्यामुळे तिथे शेवट शेव पाडावी.
3) शेव पटकन तळून होते. चकली सारखा शेव तळायला वेळ लागत नाही.
4) फार लालसर काढू नये ,रंग नंतर थोडा चढतो.
5) सोऱ्यात पीठ भरताना जाळी प्रत्येक वेळी धुवून पुसून घ्यावी.
6) ओवा वाटलेले पाणी गाळून घेणे मस्ट आहे. बारीक जाळीत न गाळलेला ओवा अडकून शेव तळणीत पडणार नाही म्हणून.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_20221022-172533.jpg
ममो काकू अगदी या कृतीने नाही ज रा वेगळ्या कृतीने केली पण या वर्षी आवर्जून शेव केली. जाळी धुण्या पुसण्याची युक्ती खूप कामी आली. थँक्यु. Screenshot_20221022-172518.jpg

अनामिका मस्तच दिसतेय शेव. रंग सुंदर आलाय आणि झालीय ही नाजूक.
Btw, ती दुरडी डोकावतेय कागदाखालून ती मस्त आहे.

ममो, तुमच्या रेसिपीने यंदा शेव केली. फारच मस्तं झालीये, सगळ्यांना खूप आवडली.
धन्यवाद, एकदम फुलप्रूफ रेसिपी आहे

@ममो काकु, थँक्यु. दुरडीचं म्हणाल तर तशा ३ लहान मोठ्या आकाराच्या दुरड्या आहेत. आईने दिलेल्या. फार जुन्या.

अदिती, थॅंक्यु
वैष्णवीका, मस्त दिसतेय शेव. ते एकावर एक ठेवलेले चवंगे भारी दिसतायत.
तशा ३ लहान मोठ्या आकाराच्या दुरड्या आहेत. आईने दिलेल्या. फार जुन्या. >> किती छान , मस्तच दिसतायत.

दिवाळीत मी या कृतीने शेव केले. मस्त झाले होते. लगेच संपले ही. फोटो मात्र काढायला जमले नाही. मनीमोहोर खूप खूप धन्यवाद.

शेव कोण करणार घरी, असं म्हणून शेव जनरली ऑप्शनला टाकली जाते पण माझ्या ह्या धाग्यामुळे अनेकांनी शेव करून पाहिली आणि त्यांना नीट जमली ही म्हणून मस्त वाटतय. सगळ्यांना थॅंक्यु.

निकु , वेळ मिळाला तर बघ करून किंवा आता पुढच्या वर्षीसाठी ठेव सरळ.

आ_रती, थॅंक्यु .

धाग्याने शंभरी गाठली आणि एक वर्षही पूर्ण झालं. Happy >> अनामिका, हो ग , मस्त निरीक्षण.

धन्यवाद मनीमोहोर ताई. तुमच्या कृतीमुळे शेव करण्याचे स्फुरण चढले. मी थोड्या वेगळ्या पद्धतीने शेव करते. पाव वाटी तेल आणि एक वाटी पाणी एकत्र करून पांढरट होईपर्यंत खूप फेसते. मग त्यामध्ये हळद, तिखट, मिठ, ओव्याची पावडर घालून मावेल तेवढे बेसन आणि 3/4 चमचे तांदुळाचे पीठ घालून सैलसर भिजवते.
20221021_165628_resized.jpg

<<वा, शेवेचे सगळे फोटो परत परत करायचा मोह होत आहे, पण अजूनतरी ऑफिस च्या कृपेने जमले नाहीये Sad

Submitted by निकु on 25 October, 2022 - 11>>>

निकु, करून बघा. फार वेळ नाही लागत. खूप पटकन होते. अनुभवाचे बोल Happy

मनीमोहोर, खरेच खूप छान आणि सुटसुटीत पाकृ आहे. या वर्षी पण फोटो टाकले जात नाहीत.

मी पण पूर्वी तेल फेटून इ. करायची पण आता या पद्धतीने करते तर पटकन होते आणि चवीत पण फरक पडत नाही.

मी वैदेही, मस्त दिसतेय शेव. तेल पाणी फेटून घेऊनची रेसिपी मी ऐकली होती आणि मला एकदा करून ही बघायची आहे , इथे प्रमाण दिलंस म्हणून धन्यवाद.
आता धनवंती म्हणतेय , चवीत फरक नाही म्हणून थोडी साशंक आहे. बघू करीन ही एखाद वेळेस.

धागा वर काढतेय.
ऑफिस वगैरे सांभाळून फराळ ही घरी करणं काही सोपं नाहीये अजिबातच. पण ही शेव खुप सोपी आहे, बिघडण्याची शक्यता ही कमी आहे खुप, होते ही मोजक्याच साहित्यात आणि पटकन. तेव्हा जमलं तर करून बघा नक्की.

धागा वर काढतेय .
आज करणार आहे.

ममो, यात पाण्याचे प्रमाण पण लिहा
म्हणजे एकदम बरोबर पातळ पीठ लगेच करता येईल.

करा करा... माझा ही आहे विचार करायचा.... .
आत्ता लगेच नाही सांगता पाणी किती ते, आता केली की मोजून लिहून ठेवते इथे.
घालताना सहज गाळली गेली पाहिजे शेव , हात मोडता नये.
पाणी घालताना एकदम घालायचं नाही कारण बेसन पटकन् खूपच सैल होतं अंदाज घेत घालायचं. पाहिजे तर थोडी घालून बघ आणि त्या प्रमाणे सैल कर. पू पो च्या कणके एवढं ठेवून बघ आधी.

ही रेसिपी आणि फोटो बघून ह्यावर्षी पहिल्यांदाच इथे शेव केली. मागे आई करायची पण हल्ली तिनेही केली नाहीये बर्‍याच वर्षांत.

तर ह्या प्रमाणाने नक्की किती शेव होईल ह्याचा अंदाज आला नाही प्रचंड शेव झाली आहे. दिवाळीच्या सगळ्या पॉटलकांना आमच्याकडून शेवच नेणार आहे आता Proud दुसरं म्हणजे पहिला घाणा करून बघितला आणि खाल्ल्यावर लक्षात आलं की ह्या प्रमाणाने केलेल्या शेवेला अजिबात म्हणजे अजिबात काही चव नाहीये! डाळीचं पीठ तळून खाल्यासारखं लागलं. मग तो भरड केलेला ओवा, लाल तिखट, लसूण पावडर आणि अजून थोडं मिठ असं सगळं घातल्यावर छान चवीची खमंग शेव झाली. ओवा जाळीत अजिबात अडकला नाही. तसेच आई, आज्जी ह्यांना चकल्या शेव करताना कधी सोर्‍या धुताना, पुसताना पाहिलेलं नव्हतं त्यामुळे प्रत्येकवेळा पीठ भरताना सोर्‍या धूवून, पुसूनही घेतला नाही.

ममो रेसिपी साठी थॅन्क्यु! आज करुन बघितली,खरतर वर सगळ्याची जेवढी भारी दिसतेय तेवढी भारी नाही झाली पण
करताना प्रयोग करत करत केल...चुका कळल्या आता पुढच्या वेळेस अजुन चान्गली जमेल बहुधा!

IMG_4527.jpeg

ज्याचा शेवट खमंग ते सगळच गोड अस झालं वाचताना पराग.
जिरं , तिखट, कसुरी मेथी, बटाटा, टॉमॅटो, पालक, लसूण असे अनेक पदार्थ घालून त्या त्या स्वादाची शेव करता येते. पण दिवाळीत मी फक्त हिंग, ओवा घालूनच करते, त्याला आम्ही खारी शेव म्हणतो. दिवाळीत चकली कडबोळी , चिवडा असे दुसरे ही तिखट पदार्थ असतातच त्यामुळे मसालेदार शेव नको वाटते. खारी शेवच आवडते दिवाळीत. त्यामुळे तिचं रेसिपी लिहिली गेली. असो. पसंद अपनी अपनी. :).
अर्धवट कुटलेला ओवा घालून आणि जाळी ही न धुता शेव गाळता आली म्हंजे तुम्ही जाडी शेव घातली का ? माझा पितळ्याचा गोल फिरवायचा सोऱ्या आहे , त्याची सर्वात लहान छिद्र असलेली जाळी बसवली होती मी . त्यामुळे गाळून घेतलं नसत ओवा वाटलेलं पाणी तर शेव पडलीच नसती तेलात. हे तुम्ही कोणती जाळी वापरता ह्यावर अवलंबून आहे अस वाटत. असो.
प्राजक्ता, शेव छानच दिसतेय अग.

Pages