मातृत्वाचा शृंगाररस

Submitted by अभय आर्वीकर on 19 October, 2024 - 13:52

मातृत्वाचा शृंगाररस

चंदन चांदणं गोंदण ल्याली
नवथर कांती तनू सुकुमार
अर्ध मोकळ्या केसावरती
माळून गजरा चंद्राकार

कुठे निघाली चंचल रमणी
थबकत लचकत हरिणी समान
सरकत शेला सावरलेला
धरत रोखुनी नयन कमान

ठुमकत मुरडत गवळण राधा
जणू विहरत यमुनाकाठ
गोप बघुनी झाकू पाहते
पदराखाली भरला माठ

हिंदोळणाऱ्या पदरासंगे
डुचमळते बेचैन उभार
हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार

अर्ध्या उघड्या पाठीवरती
भुरुभुरू केसांचे नर्तन
नाभी भवती करुनी रिंगण
पिंगा खेळतो द्वाड पवन

गुलाब जाई मोहित होई
रूप गोजिरे पद्मसमान
लपून आडून चोरून बघती
फुलामागुनी पिकले पान

कुणी म्हणाले शेंग चवळीची
कुणी म्हणाले पेवंदी आम
कुणी म्हणाले कामुक मैना
खुदुखुदू हसुनी रमताराम

कुण्या मुलखाची राजपरी ही
कुजबुज करती वल्लीशिवार
जशी घडविली, तशी मढवली
ही रंगीली नटवी नार

तव वदली ती प्रसन्नवदना
हो मी आहे नटवी नार
खळखळ वाहत असतो माझ्या
नसानसातुनी रस शृंगार

विरक्तीला लुब्ध कराया
करीत पीयुषाची पखरण
सजणेधजणे, लटक, मटकणे
प्रीत लालित्याची उधळण

जरी दिसतो तुम्हां दुरुनी
माझ्याठायी हा एकच रस
परी मी आहे सर्व रसांचा
जणू घुसळला अमृतरस

कधी असते मी झाशी, अहिल्या
मीच कालिकेचा अवतार
मी राधिका, मीच मीरेच्या
अद्वैत भक्तीचा एकतार

मीच कैकेयी, मी कौशल्या
मी वनवासी जनकाची लेक
मीच देवकी, मीच यशोदा
माझे स्वरूप, रूप अनेक

मीच भीमाई, मी जीजाऊ
मी क्रांतीची ज्योतमशाल
पंकामध्येही पंकजाची
पालनकर्ती मी मृणाल

आदी माया आदी शक्ती
सचेतनाची मी सृजक
जैवजिवांची उत्पत्ती अन
प्रणयरसाची मी पूजक

स्त्रित्वाची मी अभय स्वामींनी
सजीव सृष्टी माझं बाळ
ब्रह्मांडाला व्यापून उरली
माझ्या मातृत्वाची नाळ

- गंगाधर मुटे 'अभय'
==============
अठरा/दहा/चोवीस

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्दल आपले आभार सर.

त्या ओळीचा अर्थ उलगडला तर माझ्यावर टीका होण्याची शक्यता आणि भीती आहे. कविता लिहितानाही ती भीती होती म्हणून विशेष शब्द मी वापरले. त्यामुळे कवितेला साजही चढला आणि टीका झेलण्याचा प्रसंगही टळला.

ती ओळ निरर्थक नाही. अर्थपूर्ण आहे. पण अर्थ समजून घ्यायला थोडे श्रम नक्कीच घ्यावे लागतील.
त्या दोन शब्दांमुळे सहजासहजी कुणाला अर्थ कळणार नाही, हे साध्य झाले आणि मला जे लिहायचे होते ते लिहिणेही झाले. Happy

त्यामुळे त्या ओळीचा अर्थ न लागेल तितके चांगले. Happy Lol

अर्थ सांगा.. कुठेही हे शब्द वाचले नाहीत. माझे वाचन कमी पडले असेल.

आणि

ये क्या गोडा चतुर गोडा चतुर
या तो गोडा बोलना या तो चतुर बोलना...

(रच्याकने फ्रॉइड अनुयायी असल्यास घोडा चतुर बोलण्यास हरकत नाही)

अर्थ सांगा हा तुमचा आग्रह समजू शकतो. परंतु कवीने एकदा कविता लिहून झाली कि ती वाचकांच्या स्वाधीन करायची असते. कवीने जर त्याच्या कवितेचा उलगडा करायचाच असेल तर कविता कशाला लिहायची, गद्यच का लिहू नये.? कविता काय लिहायची निबंध का लिहू नये? प्रबंध का लिहू नये?

कवितेत आलेले शब्द मराठी शब्द आहेत. दुर्बोध नाहीत.

>>> कवीने जर त्याच्या कवितेचा उलगडा करायचाच असेल तर कविता कशाला लिहायची, गद्यच का लिहू नये.? कविता काय लिहायची निबंध का लिहू नये? प्रबंध का लिहू नये? ...त्या ओळीचा अर्थ न लागेल तितके चांगले...

टीकेला इतके घाबरणार्‍याने कविता, प्रबंध, निबंध काहीच लिहू नये - लिहिलं तर प्रकाशित करू नये. प्रकाशित करण्याची उर्मी टाळायला थोडे श्रम नक्कीच घ्यावे लागतील.

तन शरीर
मीलन = एकत्र येणे, बहुधा वरच्या कडव्यांच्या अनुषंगानं संभोग

नमन : नमस्कार
मिनार?

ह्याला खरंच काही अर्थ आहे की उगाच आपलं यमकासाठी यमक?

घोडा चतुर: कवितेत आधी अगदी शृंगार आणि अचानक कालिका दुर्गा भिमाई आणि काय काय? फ्रॉइड: अपत्यास आईबद्दल सुप्त आकर्षण असते असे मांडणारा तत्वज्ञ.

<<<टीकेला इतके घाबरणार्‍याने कविता, प्रबंध, निबंध काहीच लिहू नये - लिहिलं तर प्रकाशित करू नये. >>>

कोण घाबरतय? कविता आहे ती. कौतुक होईल तशी टीकाही होईल.
जर तुम्हास मराठी नीट कळत नसेल (कळत नाही हे बरेचदा आणि अनेक वर्षांपूर्वी सुद्धा सिद्ध झालेले आहे, मी सिद्ध करून दाखवलेले आहे.) तर कशाला मराठी भाषेच्या वाटेला जाता?

अजिंक्यराव.... आपली टीका शिरसावंद्य. पाहिजे तेवढी टीका करा. तो अधिकार प्रत्येक रसिकाला / वाचकाला असतो. कवीला जाब विचारण्याचाही हक्क रसिकाला असतो.
मात्र
कवीने कवितेचा अर्थ समजून सांगितलाच पाहिजे . ... असा हक्क कुणालाच नसतो. त्यामुळे तो दुराग्रह ठरतो.

परत एकदा सांगतो कि कवीने कविता लिहून रसिकांच्या स्वाधीन करायची असते. ज्याला जसा अर्थ घेता येईल तसा तो घेईल. कवीने काय बोलायचे ते कवितेतून बोलले पाहिजे. अर्थ समजावून सांगण्याचे किंवा कविता उलगडण्याचे काम कवीचे नाही.

पुन्हा एकदा रिपीट करतो की कवितेचा अर्थ समजावून सांगण्याची ज्या कवीला हौस असते त्याने कविता ना लिहिता थेट अर्थच लिहून काढावा . .. असे केले तर तो गद्य स्वरूपातील सविस्तर लेख वगैरे तयार होऊ शकतो. गद्य हे सुद्धा साहित्यच आहे आणि गद्य लेखन पद्य लेखनापेक्षा हीन स्वरूपाचे असते असेही नाही.

अहो कवितेचा अर्थ कोणी विचारलाय?!
दोन शब्दांचा अर्थ विचारलाय फक्त. नसेल माहीत तर तसं सांगा की - तत्वज्ञान कशाला?!

<<<<दोन शब्दांचा अर्थ विचारलाय फक्त. नसेल माहीत तर तसं सांगा की - तत्वज्ञान कशाला?!>>>

मी आधीच म्हटले की तुम्हाला मराठीच कळत नसेल तर कशाला मराठी भाषेच्या भानगडीत पडता?

दोन शब्दाचा अर्थ.... याबद्दल कवीची भूमिका काय असते हे मी आधी लिहिलेच आहे. तुम्हाला मराठीत नीट कळत नसल्याने पुन्हा तोच प्रश्न तुम्ही उपस्थित केला आहे.

प्रथम पुरुषी एकवचनी हे वाक्य केवळ फक्त तुमच्यासाठी. "कवी तुमचा गुलाम नाही. कोणताही कवी त्याचे सृजन कुण्या एका स्वाती आंबोळीसाठी करत नाही. त्याचे सृजन समस्त मराठी भाषिकांसाठी असते. ज्यांना त्या कवीची भाषा कळते ती लोक त्या कवीची कविता वाचतात. स्वाती आंबोळी यांनी वाचणे अनिवार्य नाही"

इथे या धाग्यावर दोनच वाचक दिसत आहेत - आंबोळे आणि पाटील. शब्दार्थ पाटलांनी विचारला आहे.
बाकी मायबोलीवरच्या समस्त मराठी भाकांना तुमची भाषा कळत नाही असं दिसतंय.

तुम्ही एकदा म्हणता >>> कविता लिहितानाही ती भीती होती म्हणून
मग विचारता 'कोण घाबरतय?'
एकदा म्हणता 'कवीने कवितेचा अर्थ समजून सांगितलाच पाहिजे . ... असा हक्क कुणालाच नसतो'
मग म्हणता 'दोन शब्दाचा अर्थ.... याबद्दल कवीची भूमिका काय असते हे मी आधी लिहिलेच आहे'
एकदा ठरवा बुवा काय ते!

कुठल्या भाषेच्या भानगडीत पडायचं ते माझं मी बघेन, पण आधी सांगा,
>>>
"कवी तुमचा गुलाम नाही. कोणताही कवी त्याचे सृजन कुण्या एका स्वाती आंबोळीसाठी करत नाही. त्याचे सृजन समस्त मराठी भाषिकांसाठी असते. ज्यांना त्या कवीची भाषा कळते ती लोक त्या कवीची कविता वाचतात. स्वाती आंबोळी यांनी वाचणे अनिवार्य नाही"
<<<
या वाक्यातला प्रथम पुरुष कोण?

<<. शब्दार्थ पाटलांनी विचारला आहे.>>>
आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही कशाला मधामध्ये कुदलात? तुम्हाला कवितेविषयी काय वाटते ते तुमचे तुम्ही बोलायला पाहिजे होते. एक काव्य रसिक म्हणून भारत भूमीला तुमचा अभिमान वाटला असता.

<<<< बाकी मायबोलीवरच्या समस्त मराठी भाषकांना तुमची भाषा कळत नाही असं दिसतंय. >>>>
समस्त मायबोलीला कशाला रणांगणात ओढता? तुमची लढाई तुम्ही स्वबळावर लढायला काय हरकत आहे? प्रयत्न तर करून बघा.

<<<<< तुम्ही एकदा म्हणता >>> कविता लिहितानाही ती भीती होती म्हणून
मग विचारता 'कोण घाबरतय?'
एकदा म्हणता 'कवीने कवितेचा अर्थ समजून सांगितलाच पाहिजे . ... असा हक्क कुणालाच नसतो'
मग म्हणता 'दोन शब्दाचा अर्थ.... याबद्दल कवीची भूमिका काय असते हे मी आधी लिहिलेच आहे'
एकदा ठरवा बुवा काय ते! >>>>>

कवितेचा किंवा कवितेतील काही शब्दांचा अर्थ समजावून सांगणे याविषयीची भूमिका कवीची काय आहे ते एकदाच काय हजारदा सुद्धा ठरवले तरी भूमिका तीच असणार आहे ती कशाला बदलणार आहे?

<<<<< या वाक्यातला प्रथम पुरुष कोण? >>>>
जो कोणी होता तो आता काशी, वाराणसी, प्रयाग, गोदा, अयोध्येला तीर्थयात्रा करायला निघून गेलेला आहे.

स्तनघळ?? नाही. आत्ताच कुठेतरी स्तनपन्हाळ असा शब्द वाचला. तो चांगला आहे. बाकी प्रतिसाद वाचूनच तृप्त झालो. मूळ कविता वाचायची हिंमत नाही. मर्ढेकर , P. मंगेश. कहाॅ हो भाई तुम लोग. "बेगमेचे शिवाजीस पत्र" नावाच्या कवितेची पुसटशी आठवण झाली.

वर उल्लेखिलेल्या कवितेस उत्तर म्हणून अनंत काणेकरांनी पुढील कविता जुलै ३,१९२८ ह्या दिवशी केली.

मज पाहुनी तुवा गे । लिहिलेस बेगमे, ते
अडखळत वाचुनीया । आनंद होइ माते
ते ’नाथ’ आणि ’स्वामी’ । मज सर्व काहि उमजे
इश्की, दमिष्कि, दिल्नूर । काहीच गे, न समजे !
जरि या मराठमोळ्या । शिवबास बोध व्हावा,
तरि फारशी-मराठी । मज कोश पाठवावा

@पृथ्वी मानव,
@केशवकुल,
तर्कयुक्त प्रतिसादाबद्दल आपले मनःपूर्वक आभार.

कवीचे आवडीचं वाक्य
" गरिबी टिकावी आणि वाढावी म्हणुन शासन जे प्रयत्न करते,
तेवढे थांबवावेत म्हणजे गरिबी आपोआप हटेल."
हे बरिक पटलं,

कविता सुंदर आहे.
कुणाला ती नार नटरंगीच वाटली असेल तर तो पाहणाराचा दृष्टीदोष आहे.

मी काही मराठीचा जहापनाह किंवा जिल्ल-ए-ईलाही नाही, पण मला वाटते मला त्या शब्दांचा आणि त्या ओळीचा अर्थ तर्कबुद्धीने समजला आहे.

आणि कवी म्हणतात तसे,
त्या ओळीचा अर्थ न लागेल तितके चांगले...
याला माझाही +७८६ आहे

तर्क आणि runmesh एका वाक्यात आले.. धन्य पावलो.

अजूनही "माझे मत" आहे की कवी महोदयांनी मायबोलीच्या प्रतलावर एक यमकाच्या हव्यासापोटी नवा शब्द जन्माला घातला आहे..

पूर्णविराम!

>>>ही कविता नटरंगीच आहे असं कोणी म्हटल्याचं मला प्रतिसादात तरी आढळून आलेलं नाही.>>>
अनिरुद्ध तुमचा प्रतिसाद माझ्या प्रतिसादाला अनुसरून आहे असे वाटते. मी नटरंगी हे विशेषण स्री साठीच वापरले प्रतिसादात . कवितेत स्रीची उदात्त रुपेही आलेली आहेत.

@अजिंक्यराव पाटील, मी कोणताही नवीन शब्द जन्माला घातलेला नाही. फक्त दोन शब्द स्पेस काढून एकाला एक जोडले आहेत.

तन, मिलन, नमन, मिनार हे नेहमीचे शब्द आहेत आणि फार जुने आहेत.

मी कोणताही नवीन शब्द जन्माला घातलेला नाही. फक्त दोन शब्द स्पेस काढून एकाला एक जोडले आहेत.
>>>>

अगदी हेच बोलणार होतो.
नवीन शब्द नाही तर प्रचलित शब्दच जोडले आहेत

@दत्तात्रय साळुंखे,

सर्व सजीव सृष्टी मधील माता आणि तिचे मातृत्व हा कवितेचा केंद्रबिंदू आहे. मानवी स्त्री कवितेत केवळ त्या मातृत्वाचे प्रतिनिधित्व करते. मानवी स्त्री कवितेची नायिका असणे, कवितेची गरज म्हणून निमित्तमात्र आहे.

मातृत्व हे फक्त मानवी स्त्री पुरते मर्यादित नसते. मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, जवळजवळ ते एकसमानच असते.

माणूस, पशु, पक्षी, वनस्पती सहित सर्व सजीव यांच्या प्रजनन, पोषण आणि संरक्षण ह्या सर्व प्रेरणा बहुतांश प्रमाणात एकसमान आहेत.

माझे मत असे आहे की, कोणतेही मातृत्व सर्व गुण संपन्न आणि सर्व रसांनी परिपूर्ण असते. जरी एखाद्या मातृत्वातला एखादाच गुण/रस अधोरेखित होत असला किंवा ठळकपणे जाणवत असला तरी उरलेले गुण (अदृश्य स्वरूपात वगैरे) मातृत्वामध्ये असतेच, असे माझे मत आहे.

सर्व रसांनी परिपूर्ण नाही असे मातृत्व असू शकत नाही. जसे मानवी स्त्रीमध्ये स्त्रीत्व जन्मताच येते तसेच मातृत्वही उपजत असते. शृंगार ही मातृत्वाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे कोणतेच मातृत्व शृंगारहीन असू शकत नाही.

मातृत्व हे सर्वठाई सारखेच असते. उदाहरणार्थ... कैकयीची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते तर कौशल्येची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते. व्यक्तिरेखा बदलल्या पण मातृत्व स्थायी आहे, असे माझे मत आहे.

कविता तुकड्या तुकड्यात दिसत असली तरी मुळात ती कविता मातृत्वाभोवती फिरत असल्यामुळे कविता एकजिनसी आहे. मातृत्व आणि मातृत्वाच्या प्रेरणा केंद्रबिंदू म्हणून कविता वाचली तर कविता उलगडायला फार अवघड जाऊ नये.

@ऋन्मेऽऽष, एस सर.... शंभर टक्के.

कवितेत येणारा बटबटीतपणा काढून टाकण्यासाठी, सहज सुलभता कमी करण्यासाठी दोन शब्दांमधील स्पेस काढून टाकली आहे.

सरजी, अनेकांना मान्य नसले तरी कवितेला गहन, सखोल, गूढ, अगम्य, जटिल वगैरे करण्याचा अधिकार कवीला असतोच.

>>>सर्व सजीव सृष्टी मधील माता आणि तिचे मातृत्व हा कवितेचा केंद्रबिंदू आहे. >>> मलाही हेच अभिप्रेत होते फक्त विस्तृत प्रतिसाद टाळला. पंक, पंकज, मृणाल,सजीव सृष्टी माझे बाळ या शब्दांतून यांचा उलगडा होतोय.
तुम्हीं सुंदर उलगडले विविधांगी पदर कवितेचे... धन्यवाद

द.सा.दादा,
तुम्हाला कविता आवडली आहे, तर निदान तुम्ही समजावून सांगा नमनमिनाराचा अर्थ कृपया.

कवीमहाशय, तुम्ही द .सा. आणि माझ्या मधामध्ये (!) पडू नका, बरं का.

Pages