सी, हू इज द बॉस

Submitted by SharmilaR on 18 October, 2024 - 01:43

सी, हू इज द बॉस

समजायला लागल्यापासूनच, मेघा स्पर्धेत उतरली होती. कुठे पोहोचायचे ते तिला माहीत नव्हतं, पण आपल्या समोर जो असेल, त्याच्या पुढे तिला जायचं होतं. बरोबर असणार्‍याला मागे टाकायचं होतं. त्याकरिता काय वाट्टेल ते करायची मेघाची तयारी होती. बरोबर किंवा समोर, कोण आहे ते महत्त्वाचं नव्हतंच, तर महत्त्वाचं होतं ते फक्त तिचं सगळ्यांपुढे असणं.

तिचा गोरापान वर्ण, टपोरे डोळे अन् निरागस चेहरा, ह्या भांडवलावर तिला काहीही सहज मिळवता यायचं. प्रचंड गोड बोलणं हा तिचा दागिना होता. जबरदस्त आत्मविश्वास हे तीचं शस्त्र होतं. खऱ्या खोट्याची सहज सरमिसळ तिला करता यायची. तिच्या वाट्टेल ते करण्याच्या तयारीमुळे, खरोखरच तिचं वाट्टेल ते खपूनही जायचं. बरेचदा तर ‘नको हिच्या नादी लागायला’ हाच उद्देश असायचा लोकांचा त्यात.

ऑफिस मध्ये ज्यांना तिचा अनुभव होता, ते तिच्यापासून जरा चार हात लांबच राहणं पसंत करायचे. त्यामुळे ऑफिस मध्ये सहकारी असले, तरी तिला मित्र मैत्रिणी नव्हते. ज्यांना अजून अनुभव यायचा होता, त्यांना मात्र तिच्या कॉन्फिडनंट वागण्या बोलण्याचं कौतुक वाटायचं.

सेक्शन ऑफिसर, सातवने राजीनामा दिला. त्यांचा तीन महिन्याचा नोटिस पिरीअड सुरू झाला. मेघाच्या आशा पालवल्या. डोक्यात नवीन प्लानस शिजू लागले. तशी त्या जागेवर पूर्वीपासूनच तिची नजर होती. विचारांना आता गती मिळाली. रिटायरमेन्टला आलेले ब्रांच मॅनेजर, पाटील सरांशी चांगले संबंध राहतील ही काळजी तर पूर्वीपासून तिने घेतली होतीच.

दोन वर्षांपूर्वी लहानशा आजारचं निमित्त होऊन पाटील सरांची बायको अचानक गेली, तेव्हापासून ते आणि त्यांचा कॉलेजवयीन मुलगा असे दोघंच रहायचे घरात. त्यामुळे मेघाचे काळजीचे शब्द, तिने अधून मधून आणलेलं घरच्या चवीच खाणं, त्यांना सुखावून जायचं. त्यांना ती मुलीसारखी वाटायची. घरची काही अडचण असली, तर पटकन ते तिची मदत घ्यायचे.

मेघाच्या प्रमोशन मध्ये अडचण होती, ती तिच्या सिनियॅरिटीची. तिच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे तीन चार लोकं तरी होते ऑफिस मध्ये. पण तो मुद्दा आपण सहज डावलू शकू, हा विश्वास तिला होता. फक्त फिल्डिंग नीट लावायला हवी होती, कारण अपॉइनमेंट्स हेडऑफिस मधून व्हायच्या. पाटील सर तिच्याकरिता नक्की काही तरी करतील हा तिला विश्वास होता.

सातव सरांकडे दिवसातून चारदा आता मेघा जायला लागली. तिथे जरा वेळ घालवायला लागली. त्यांची जास्तच आस्थेने विचारपूस करायला लागली. उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांच्या काळात, आता लवकरच जाणाऱ्या त्यांच्याशी ती जवळकीचे, प्रेमाचे चार शब्द बोलायला लागली. स्वत:हून त्यांच काम ओढवून घ्यायला लागली.

“सर, मला प्लीज तुमचं आणखी काही काम असेल तर द्या. केवढी कामं सांभाळत होतात तुम्ही. इथे खरंच म्हणावी तशी तुमची कदर झाली नाही. आता जातांना किती धावपळ होतेय तुमची.” असं म्हणत जरा जास्त थांबायला लागली. हे जास्तीचं थांबणं पाटील सरांच्या लक्षात येईल हे जाणीवपूर्वक पाहायला लागली.

सातवना नवीन ठिकाणी जॉइन व्हायचं होतं. काही नवीन गोष्टी त्यांना ऑनलाइन शिकायच्या होत्या. इथल्या कामात आयती मदत चालून आली, म्हटल्यावर त्यांना बरंच वाटलं. मेघा स्वत:हुन जबाबदारी घेतेय दिसल्यावर पाटील सरांची पण काही हरकत नव्हती. त्यांना तिचं असं पुढे होऊन जबाबदारी घेणं आवडायचच. शिवाय त्यांच्या रिटायरमेन्टला आता जेमतेम सहा महीने राहिले होते. त्यांनी बाकीच्या लोकांना, मेघाला कामात मदत करायला सांगितलं. मेघा स्वत: खूप काम करते असं दाखवत सातवची अन स्वत:चीही कामं दुसऱ्यांना वाटायला लागली. पाटील सरांनी सांगीतलं म्हटल्यावर, कुणालाच काही बोलता येईना. धुसफूसत का असेना, लोकं काम करायचीच तिची.

सातव जाऊन पंधरा दिवस होऊन गेले, तरी मेघा ची प्रमोशन ऑर्डर आली नाही. पाटील सरांनी रेकमेंडेशन तर केव्हाच पाठवलं होतं. येईल आज-उद्या, असं रोज वाटत होतं. हेड ऑफिसचा नेहमीचाच घोळ आहे हा, असं म्हणून, आधीच मेघाची कामाची सुरुवात झाली होती. सातवच्या खुर्चीवर ती बसायलाही लागली होती. तिथून सगळ्यांना कामाच्या ऑर्डर्स द्यायला लागली. मेघाचा बॉसिंगचा स्वभाव कुणालाच आवडत नव्हता, विशेषत: अनुभवी आणि सिनियर लोकांना त्याचा खूपच त्रास व्हायचा. पण कामाच्या ठिकाणी कुठे आवड-निवड असते?

आणखी एक दोन दिवस तसेच गेलेत, आणि अचानक मिसेस नेहा जोशी सेक्शन ऑफिसर म्हणून आल्या. पाटील साहेबांसकट सगळ्यांना धक्का बसला. नेहा जोशी दुसऱ्या ब्रांचला बरीच वर्षे काम करत होत्या. कामाचा अनुभव दांडगा होता. मृदुभाषी होत्या. सगळ्या ऑफिसला त्या पटकन आवडून गेल्या. आता पाटील सर लवकरच निवृत्त होणार म्हंटल्यावर हेड ऑफिसने इथे अशा अनुभवी व्यक्तीला पाठवलं असावं.

मेघाचा संताप संताप झाला. पाटील सरांनी तिला समजावलं की, ‘मी रेकमेंडेशन दिलं होतं. आम्हाला इथलाच माणूस हवा होता. पण नाही काम झालं..’ पण मेघा ऐकायलाच तयार नव्हती. त्याच तिरीमिरीत, चार दिवसांनी तिने राजीनामा दिला. पाटील सरांशी वाद घालून, स्पेशल केस म्हणून, तीन महिन्याचा तिचा नोटीस पिरीअड तिने पंधरा दिवसांवर आणला. तिला जोशी मॅडम च्या हाताखाली काम करायचं नव्हतं. आत्तापर्यंत ती बॉसिंग करायची, आता तिला ऑफिस मध्ये सगळ्यांच्या पातळीवर येणं मंजूर नव्हतं. तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता.

पाटील सरांनी तिची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विनंतीवरून हेड ऑफिस मधून एच आर ऑफिसर पण आला. त्या दोघांनीही तिला समजावलं, ‘अशी एकदम तू नोकरी सोडू नकोस. तू अजून खूप ज्युनिअर आहेस. आपण नंतर दुसरीकडे कुठेतरी जागा निघाली तर बघूया. पण आत्ता लगेच नाही तुला काही देता येणार. काही दिवस काढ.’ पण मेघा ऐकायला तयार नव्हती. ती राजीनामा मागे घेत नाही म्हंटल्यावर शेवटी पाटील सरांनीही तिचा नाद सोडला.

आता दोन दिवसांनी ती जायची होती. ऑफिसची वेळ संपल्यानंतर सगळे घरी गेले तरी, मेघा तिच्या टेबल वर बसलेली होती. तशी हल्ली नेहमीच ती थोडी उशिरापर्यंत बसायची, त्यामुळे फारसं कुणी लक्ष दिलं नाही. पाटील सर तर रोजच उशिरा जायचे. त्यामुळे तेही त्यांच्या केबिनमध्ये होते. केबिन बाहेर त्यांचा पीए बसला होता. मेघा पाटील साहेबांच्या केबिनमध्ये गेली. जरा इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या. तशी ती बरेचदा तिथे गप्पा मारत बसायची. असा बराच वेळ गेला.

“सर, मला सेक्शन ऑफिसर ची ऑर्डर आजच्या आज पाहिजे.” जरा वेळाने मेघा ठामपणे म्हणाली, “त्याशिवाय मी आज घरी जाणार नाही.”

“काय? कसं शक्य आहे ते? एक तर तू रिजाइन पण केलेलं आहेस. आणि आता असं अचानक तुला कशी काय ऑर्डर देऊ शकणार मी?” पाटील सर एकदम भांबावून म्हणाले.

“ते काही मला माहिती नाही. पण ऑर्डर घेतल्याशिवाय मी घरी जाणार नाही.”

आता सर पण जरा चिडलेच, “असं काय करतेस मेघा तू? आणि तू घरी जाणार नसशील तर तो तुझा प्रश्न आहे. मी आता निघतो आहे. तुला हवा तेव्हा तू जा.”

“सर, मला आज ऑर्डर मिळाली नाही, तर मी पोलिस कम्प्लेंट करणार आहे.” मेघा चा आवाजात जरब होती.

“पोलिस कंप्लेंट? ती कशाबद्दल?” गोंधळून पाटील सरांनी विचारलं.

“सेक्सउंल हऱ्यासमेंट ची.”

“सेक्सउंल हऱ्यासमेंट? तुझ्याशी? कोणी? केव्हा? मला कसं नाही सांगितलंस तू?” पाटील सर एकदम घाबरूनच गेले.

“सर, प्रमोशनचं आमिष दाखवून तुम्ही माझा गैरफायदा घेतला अशी कम्प्लेंट करणार आहे मी.” मेघाचा स्वर शांतच होता.

आता मात्र ते सटपटलेच. “मेघा , तुलाही माहिती आहे, मी.. असं काही झालेलं नाहीये.. तू तुझ्या मर्जीने काम करायचीस. मी तुला कधीही अमिष वैगेरे दाखवलं नाही. आणि तुझा गैरफायदा वगैरे तर नाहीच नाही.”

“सर, हे मला माहिती आहे. पण बाकी जगाला नाही माहिती ना.”

“हे बघ मेघा, तू मला मुलीसारखी आहेस. आणि ह्या सगळ्या गोष्टींना प्रूफ पण लागतं. तू असे कुठलेही आरोप नाही करू शकत.”
“सर, प्रूफ वगैरे खूप नंतर येतात. मी कम्प्लेंट केली की, आधी चौकशी तर होणारच. तुमची बदनामी तर होणारच. आरोप सिद्ध होणं न होणं हा खूप पुढचा प्रश्न आहे.” मेघा च्या डोळ्यात चमक होती.

पाटील सर सुन्न होऊन बसून राहिले. त्यांना चंगलाच घाम फुटला.

“अग, पण तुला ऑर्डर देणं माझ्या हातात नाहीये.” ते कसंबसं म्हणाले.

“तुम्ही एवढे सीनियर आहात. मला खात्री आहे सर, तुम्ही काहीतरी मार्ग काढालच.”

पाटील सरांना काय करावं कळेना. त्यांनी बेल वाजवली. बाहेर बसलेला पिए आत आला. आत काय झालं हे बाहेर कळणं अशक्य होतं.

“जरा पाणी आण.” ते थकलेल्या आवाजात म्हणाले. बाहेर आणखी फक्त एक ऑफिस बॉय होता.

“तू जरा बाहेर बस. मी बघतो काय करायचं ते.” ते मेघा ला थकलेल्या आवाजात म्हणाले.

मेघाचं त्यांच्याबरोबर उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबणं.. पोस्ट नसतांना, इतरांना डावलून मेघाला कामाचे अधिकार देणं.. मेघाचं बराच वेळ त्यांच्या केबिनमध्ये असणं.. ह्याच गोष्टी सगळ्यां ऑफिस ला माहिती होत्या. मेघाने आरोप केले, तर संशयाचं धुरळा नक्कीच उडाला असता. सगळ्यांच्या संशयाच्या नजरा त्यांच्यावर रोखल्या गेल्या असत्या. पाटील सरांनी योग्य ती काळजी घेतली नव्हती. मेघावर खूप विश्वास टाकला होता. काहीही सिद्ध होऊ शकणार नसलं, तरी त्यांची आणि कंपनीची बदनामी होणार होती. घरात तरुण मुलगा होता. त्याला त्यांची खरी बाजू पटली असती? निवृत्तीच्या इतकं जवळ आल्यावर चारित्र्यावर धुकं येणार होतं. त्यांनी फोन फिरवला.

तासाभरात हेड ऑफिस मधून एडमिन ऑफिसर आणि स्वतः एचआर मॅनेजर आले. त्या दोघांची पाटील साहेबांबरोबर बरीच खलबतं झाली. रात्रीचे आठ वाजायला आले होते. मेघाला केबिनमध्ये बोलावलं.

“आत्ता ह्या ऑफिसमध्ये सेक्शन ऑफिसर म्हणून शक्य नाहीये. पण..” एचआर मॅनेजरनी बोलायला सुरवात केली.

“दुसरी त्याच लेवलची पोस्ट चालेल मला. पण माझं रीपोर्टिंग जोशी मॅडमना नको.” मेघा शांतपणे म्हणाली, “आणि सर, त्याच बरोबर मला अॅप्रिसिएशन लेटर पण हवं. मी आजपर्यंत अतिशय चांगलं काम केलं, याची ग्वाही हवी आहे त्यात मला.”

आजच्या प्रसंगाचा भविष्यात त्रास होणार नाही, याची तजवीज मेघाने केली.

दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये सगळ्यांना दोन मेल आले. पहिला मेल होता, प्रकृती अस्वास्थ्य मुळे पाटील सर अनिश्चित कालावधीसाठी रजेवर जात असल्याचा. आणि दुसरा होता, हेड ऑफिस च्या विनंतीला मान देऊन मेघाने आपला राजीनामा परत घेतल्याचा. आता तिला ‘सीनियर ऑफिसर’ हे पद देण्यात आलं होतं. कामाचे इतर डिटेल्स नंतर मिळणार होते.
********************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद राजा मनाचा, आशु.

बेफींच्या १ ऑफिस कथेची आठवण झाली.>> वाचली नाही अजून. शोधून वाचते.

वेगवान कथन!

काहींना माझी कथा आठवली हे वाचून खूप आनंद झाला आणि मला अरुंधती यांच्या 'कामाच्या ठिकाणी होणारे शोषण' या धाग्याची आठवण झाली

पाटील किंवा त्यांच्या पी ए ने काहीतरी क्लृप्ती करून तिचा डाव उलथवून टाकलेला वाचायला आवडले असते. शेवट बोर झाला अगदीच.

धन्यवाद साधना, बी. एस. बेफिकीर, पियू , स्वाती.
@बेफिकीर,
अरुंधती यांच्या 'कामाच्या ठिकाणी होणारे शोषण' >> चांगला धागा आहे हा.

@पियू
पाटील किंवा त्यांच्या पी ए ने काहीतरी क्लृप्ती करून तिचा डाव उलथवून टाकलेला वाचायला आवडले असते. शेवट बोर झाला अगदीच.>>
पाटील सरांना अनपेक्षित धक्का बसल्यामुळे ते खचून गेले. रिटायर्मेंट च्या ह्या टप्प्यावर त्यानां चौकशीला सामोरे जाणे पण नकोसे वाटले. शिवाय ते मेघाला favour करत होते असं बाकी लोकांना वाटू शकतंच.
ऑफिस मधल्या लोकांना मेघाबरोबर काम करणं किती बोर आणि त्रासदायक होत असेल.

छान लिहिले आहे.
HR ने अस घडू देता कामा नये खरं तर.
HR आणि पाटील यांनी सल्लामसलत करून तिचा डाव उधळून लावायला हवा होता.

छान लिहिली आहे..
पूर्ण कथा भासताना ऑफिसमधले कोणीतरी येत होते डोळ्यासमोर

आणि मला तर कथेचा शेवट असाच हवा होता.
उगाच कश्याला ते दरवेळी अच्छाई की बुराई पे जीत दाखवावे.
कथेतील समस्या आपल्या आयुष्यात सुद्धा उद्भवू शकतात म्हणून रिलेट होतात. पण कथेतील उपाय प्रत्यक्ष आयुष्यात नेहमी कामी येतीलच असे नाही.
त्यापेक्षा आपल्याबाबत असे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हा धडा अश्या कथातून घ्यावा.

SharmilaR, मस्त कथा. तुम्ही शलाकाची गोष्ट लिहिली होती, त्यातल्या पात्राचा विस्तार वाटतोय. असे लोक फार जवळून पाहिले आहेत.

आपल्याबाबत असे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हा धडा अश्या कथातून घ्यावा>>>> ऑफिसमधे कलिग्स असतात, मित्र/मैत्रिणी क्वचित च. असले तरी विश्वास जपून ठेवावा. मी तरी ही काळजी घेते निदान. कधी कोण पाठीत सुरा भोसकेल कल्पना नाही, स्पर्धा फार वाईट.

असला प्रकार एका नामांकित टेलिकम्मुनिकेशन कंपनीत पाहिला आहे.

सर्व माहित असुनही फ़्रेशर असल्यामुळे आणि छोट्या शहरातून आलो असल्याने आम्ही कोणीही बोलायची हिम्मत करू शकलो नाही.

शर्मिला, अजुन एक मस्त कथा. कॉर्पोरेट क्षेत्रात काही unethical गोष्टी पाहिलेल्या असतात त्यामुळे चटकन पटली.

बापरे,मी खूप वर्षे बँक मध्ये नोकरी केली,govt Bank असल्याने असे काही कधी पाहिले नाही,पण प्रायव्हेट मध्ये होत ही असतील असे प्रकार,स्त्री असल्याचा असाही फायदा करून घेतात,अंगावर शहारे आले.................
बिचारे ते तिचे बॉस.

धन्यवाद ऋतुराज, ऋन्मेष, आबा, भक्ती, आशु, कुमार सर, प्रथम म्हात्रे, मीरा, अंजली चौबल.

@भक्ती,
बरोबर आहे.
राजहंस ह्या कथेत शलाका होती.

https://www.maayboli.com/node/84852

ह्या दोन्हीही कथेतील मेघा एकच आहे.
कारण ही सतत 'इतरांपेक्षा पुढे ' जाण्याची प्रवृत्ती तीच आहे. त्याकरता काय वाट्टेल ते करायला ह्या 'मेघा'ची तयारी असते.
आपल्या आजूबाजूला अशा 'मेघा' असतातच.

सर्रास घडणाऱ्या गोष्टी आहेत ह्या.. ह्यातले निबर पुरुष काही घेतल्याशिवाय सहजासहजी काही देत नाहीत.
काही फक्त चार शब्द प्रेमाने बोलल्यानेही फिदा होतात तर काही ह्या कथेतल्या नायकांसारखे अडकून पडतात..

याचसोबत, एखादी हुशार, बोल्ड आणि आत्मविश्वासाने वागणारी, हसत खिदळत टाळ्या देत काम करणारी, मॉड कपडे नीट कॅरी करणारी आणि अनेकांच्या मनात रेंगाळत राहणारी स्त्री आपल्या कष्टाने पुढे गेली तर ती ज्यांना अप्राप्य आहे ते लोक "ही काय, काहीतरी देऊनच पुढे गेली असणार" असं म्हणतात..

दोन्ही बाजू बेकार..

धन्यवाद ममो, झकासराव, अजिंक्यराव पाटील, केशवकुल.

सरसकटीकरण करू नये.>> +१००
ब्लॅकमेल करणारी व्यक्ती अपवाद. बाकी सगळे सामान्य लोकं सरळमार्गीच असतात.

>>ब्लॅकमेल करणारी व्यक्ती अपवाद. बाकी सगळे सामान्य लोकं सरळमार्गीच असतात.>>
खरे आहे. पण तरी आजकाल नुसते सरळमार्गी असणे पुरेसे नाही. स्वतःला सुरक्षितही ठेवता आले पाहीजे. मला ते फुल डिस्क्लोझर प्रकरण आवडते. कुणाला रेकमेंड करताना व्यक्ती लायक असल्याचे गुणवर्णन केल्यावर आपले जे काही नाते-संबंध, ऑफिस बाहेर मैत्री-ओळख वगैरे सांगुन टाकले की नंतर प्रश्न उद्भवलाच तर आपली पोझिशन क्लियर रहाते.

लई भारी.
मी अश्या बायका बघितल्या आहेत. अगदी relate झाले.
काम टाळून पण तळवे चाटून पुढे जाणाऱ्या पण भरपूर असतात.
मला चारुलता सरकार ची गोष्ट आठवली. मस्त होती ती अशीच.