द्वे्ष : एक भय गूढकथा
भाग १२
तिचं किळसवाणं, अंगावर काटा आणणारं हास्य सुरूच होतं. एव्हाना घडलेल्या अघटीत प्रकाराची सोनाली अन् राजाभाऊंना चांगली कल्पना आली होती, अन् ते, विशेषतः सोनाली गर्भगळीत होऊन गेली होती. श्री स्थिर नजरेने, शांतपणे तिच्याकडे बघत होता. मग एकदम त्याच्या तोंडून जरबेच्या, खणखणीत आवाजातले शब्द बाहेर पडले.
" बास... हे पहा. तुम्ही कोण आहात याची मला चांगलीच कल्पना आहे ; पण काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. ज्यांची उत्तरे मला तुम्ही द्यायची आहेत. समजलात ? "
त्याचे कठोर शब्द चाबकाच्या फटकाऱ्यासरशी कानावर पडताच ती एकदम थबकली. तिच्या ओठांवरचं हास्य हळूहळू विरत गेलं. त्यामुळे तर तिचा चेहरा अजूनच विद्रूप आणि भयानक वाटू लागला. क्षणभरच ती श्री कडे एकटक बघत राहिली. मग जेव्हा तिने बोलायला सुरुवात केली तेव्हा तिचा स्वर आणि एकेक शब्द कमालीचा थंड, कठीण आणि जहरी भासत होता.
" तू...? तू मला, या वैजयंतीला दम भरतोस ? अरे नादान पोरट्या ! तुला तसं वाटतंय ; पण खरंतर तुला कसलीही कल्पना नाहीये. कसलीही नाही. भ्रमात आहेस तू. मला समोर बोलावून घेणं तुला शक्य झालं खरं ; पण तुझे हे मंत्र तंत्र माझं काहीही वाकडं करू शकत नाहीत. खिखिखी.." आणि ती पुन्हा हसू लागली. इतकी मोठमोठ्याने की तिचे दोन्ही खांदे ही वरखाली होत होते.
" बस करा आता..." पुन्हा श्री पूर्वीच्याच कठोर स्वरात कडाडला ; पण मग त्याच्या आवाजात नरमाई आली. " का करत आहात तुम्ही हे सगळं? अपेक्षित तरी काय आहे तुम्हाला ? इतका कालावधी लोटलाय तुम्हाला जाऊन. मग आता या बिचाऱ्या प्रियाला सतावून काय साध्य करणार आहात तुम्ही ? "
" तुझ्या फालतू प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाहीये मी. जास्त हुशारी करायला जाऊ नकोस. तू काहीही करू शकत नाहीस. माझ्या समोर तू आणि तुझ्या मंत्रशक्ती तुच्छ आहेत. नादानी सोड, आणि इथून चूपचाप निघून जा." मग नाटकी सुरात " आणि, या तुझ्या बिचाऱ्या प्रियाची चिंता मुळीच करू नकोस हं. आता ती माझी जबाबदारी आहे. मी तिची बरोबर काळजी घेते."
" हूं..." हसून श्री पुढे म्हणाला. " खरंतर तुम्हीच मोठ्या भ्रमात आहात. मी देखील खूप काही करू शकतो. आणि करणारच आहे. कुठल्यातरी कारणाने या जगात अडकून पडलेल्या तुमच्या आत्म्याला मुक्ती देणार आहे. हे घर पुन्हा आधी सारखं पवित्र करणार आहे."
" अस्स्ं." चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणत प्रिया म्हणाली मग हळूहळू चालत बिनदिक्कतपणे थेट श्रीच्या समोर येऊन गुडघ्यावर बसली. आणि नाटकी, भ्यायलेल्या सुरात म्हणाली -
" मग आता बघूच, तू काय करू शकतोस ते. दाखव तुझं सामर्थ्य."
असं म्हणून आपली नजर त्याच्यावरून बिलकुल न हटवता किंचितशी मान खाली झुकवली. आणि एकदम समोरच्या स्थिरपणे तेवत असलेल्या मेणबत्तीवर हळूवार फुंकर घालून ती विझवली.
मिट्ट अंधार सगळीकडे व्यापून राहिला. इतक्या वेळचा मेणबत्तीचा मंद, क्षीणसर प्रकाश गेल्यानंतरचा तो काळोख अधिकच गडद भासत होता. आणि जोडीला आपल्या श्वासोच्छ्वासाचा आवाजही स्पष्ट ऐकू येईल इतकी चिडीचूप, स्तब्ध शांतता. हालचालींचा, बोलण्याचा कसलाही बिलकुल आवाज नाही. राजाभाऊंनी हातातील टॉर्च शिलगावून तिचा झोत खोलीभर फिरवला. आता प्रिया तिथे नव्हती. राजाभाऊ हबकले. सोनालीचा चेहरा भीती अन् काळजीने पांढराफटक पडला. कसलाच किंचितसाही आवाज ऐकू आला नसताना ही प्रिया गेली तरी कशी आणि कुठे ? ती शांतता भंगली श्री च्या आवाजाने.
" ती नक्कीच जिन्याने वरच्या मजल्यावरील खोलीकडे गेली असणार. तिला थांबवायला हवं. राजाभाऊ चला. सोनाली तुझ्याकडे टॉर्च असेलच ना ? "
" हो. आहे ना." इथे येताना राजाभाऊंच्या सूचनेप्रमाणे तिने सोबत टॉर्च घेतला होता.
" मग तू इथेच बस. आम्ही प्रियाला घेऊन येतो." असं म्हणून श्री ताड्ताड् पावलं टाकत जिन्याच्या दिशेने गेला. त्याच्यामागे भाऊ होतेच.
सोनाली बिचारी प्रियाच्या काळजीने घाबरली होती. काहीच समजत नव्हतं. सुचत नव्हतं. संथ, जड पावलांनी ती सोफ्याकडे जाऊ लागली ; पण मग मध्येच थबकली. काहीतरी आवाज ऐकू आला का ? एकदम स्तब्ध होऊन सोनालीने कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. परत तोच बारीकसा आवाज आला. मागच्या बाजूने. सोनाली त्या दिशेने गेली. प्रियाच्या खोलीच्या दाराची थोडीशी फट उघडी होती. हे दार उघडं कसं ? प्रिया आत तर नसेल ? मनात हा विचार येतो न येतो तोच पुन्हा आवाज ऐकू आला. अधिक स्पष्टपणे. जोरजोरात हुंदके देण्याचा आवाज होता तो. जो समोरच्या प्रियाच्या खोलीतूनच येत होता, हे ध्यानात यायला सोनालीला बिलकुल वेळ लागला नाही. चटकन पुढे सरसावून तिने दरवाजा आत लोटला, अन् ती बेडरूममध्ये शिरली. बेडजवळ असलेल्या नाइट लॅम्पच्या मंद, सोनेरी प्रकाशात तिला बेडवर गुडघ्यात डोकं खुपसून बसलेली प्रिया नीट दिसली. हुंदक्यांनी तिचं संपूर्ण शरीर गदगदत होतं. क्षणाचाही वेळ न दवडता सोनाली बेडवर तिच्याशेजारी जाऊन बसली. आणि तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून म्हणाली -
" प्रिया... ए प्रिया. शांत हो. वर बघ. माझ्याकडे बघ."
तसे प्रियाचे हुंदके किंचित कमी झाले. क्षणभरानंतर तिने हळूहळू मान वर केली. तिचे केस जरा विस्कटलेले होते. डोळे पाणावले होते.
" सोनाली ताई. हे काय घडतंय गं माझ्यासोबत ? पपांना भेटायची माझी इच्छा होती. ते तर नाहीच ; पण..."
" प्रिया, आता तुला असं धीर सोडून चालणार नाही. जे काही समोर येईल त्याला आता फेस करायला हवं. आणि तू काही एकटी नाहीयेस, आम्ही सगळे आहोत नं तुझ्यासोबत ? "
प्रियाने हलकेच होकारार्थी मान हलवली. आणि ती सोनालीला बिलगली.
" प्रिया... मला सांग, ती बाई नक्की कोण आहे ? तुझ्याशी तिचा काय संबंध ? ती तुझ्या जीवावर का उठलीये ? "
मात्र यावर प्रिया काहीच बोलली नाही. तिचे हुंदके आता पूर्णपणे थांबले होते. एखाद्या पुतळ्या प्रमाणे तिचं शरीर सोनालीच्या मिठीत ताठ झालं होतं. पुन्हा सोनालीने विचारलं -
" प्रिया... अगं काय विचारतेय मी ? "
" काही सांगून काय फायदा ? " मग पूर्वीच्याच त्या घाणेरड्या, खरखरीत आवाजात " तिचं भविष्य तर केव्हाच ठरलंय. हीहीही."
तो आवाज ऐकताच सोनाली हबकली. नकळत भीतीची एक थंडगार लाट तिच्या शरीरावरून वाहत गेली. काही क्षणासाठी तर ती सुन्न होऊन गेली होती. मग चटकन तिने प्रियाला आपल्या मिठीतून दूर सारलं. तिचे ते डोळे सोनालीवर खिळले. त्या डोळ्यांत मिष्कीलतेची झाक होती. तशीच थंड क्रूरता ही होती. त्या डोळ्यांत पाहण्याचीही सोनालीला भीती वाटू लागली. अन्... तिला काही समजतं न समजतं तोच प्रियाने तिचा गळा पकडून तिला खाली पाडलं. त्या हाताची पकड क्षणाक्षणाला अधिक घट्ट होऊ लागली. सोनाली सगळा जोर लावून तो हात झटकायचा प्रयत्न करत होती ; पण तिची सारी ताकद थिटी पडत होती. गळा अजूनच आवळला जात होता. श्वास घुसमटत होता. डोळ्यांसमोरची जोरजोरात खुदूखुदू हसणारी प्रिया धूसर होत होती.
क्रमशः
© प्रथमेश काटे
तुमच्या इतर कथांच्या तुलनेत
तुमच्या इतर कथांच्या तुलनेत ह्या कथेचा वेग कमी वाटतो
एकतर भाग उशीरा आणि छोटे आहेत (त्यामुळे प्रतिक्रिया ही कमी मिळतात).
थोडासा तोच तोच पणा दिसतोय, इतर भायकथांपैक्षा काही फार वेगळं वाटत नाही.
प्रिया चे वडील भूत नसतील ह्याची कल्पना होतीच, आता वैजयंती च काय रहस्य आहे ही उत्कंठा असल्याने कथा पुढे वाचाविशी वाटते
भाग जरा लवकर येऊ द्या
खूपच थरारक लिहत आहात. लेखनाची
खूपच थरारक लिहत आहात. लेखनाची क्वालिटी पण अजून चांगली वाटत आहे.
पुभाप्र. लिहत रहा.
हि कथा पूर्ण होईल का?
हि कथा पूर्ण होईल का?
काटे पटापटा लिहा हो भाग !!
काटे पटापटा लिहा हो भाग !! नहितर मग ढेपाळते कथा, आणि इंट्रेस्ट निघुन जातो हो वाचकांचा.
: स्मित:
काटे आता अंत नका बघू. येउ द्या पुढचा भाग. का "१३" ची भीती वाटतेय?
@केशवकूल, @प्रसन्न हरणखेडकर-
@केशवकूल, @प्रसन्न हरणखेडकर- तुमची उत्सुकता अगदीच समजू शकतो ; पण सध्या जरा शक्य होत नाही. त्यात पासवर्ड सुद्धा विसरलो होतो. मात्र आता पुढील भाग शक्य तितक्या लवकर अपलोड करून सगळी कथा मालिकाच पूर्ण करून टाकेन. थॅंक्यू
इतरांना एवढंच सांगेन - होय, ही कथा पूर्ण होणार आहे.
>>@केशवकूल, @प्रसन्न हरणखेडकर
>>@केशवकूल, @प्रसन्न हरणखेडकर- तुमची उत्सुकता अगदीच समजू शकतो ; पण सध्या जरा शक्य होत नाही. त्यात पासवर्ड सुद्धा विसरलो होतो. मात्र आता पुढील भाग शक्य तितक्या लवकर अपलोड करून सगळी कथा मालिकाच पूर्ण करून टाकेन. थॅंक्यू Bw
इतरांना एवढंच सांगेन - होय, ही कथा पूर्ण होणार आहे.<< इसका मतलब फिलहाल काटे साहब के लिखने के रास्ते पे काटे बिछाये हुवे है !!
(No subject)