ओझं

Submitted by अनघा देशपांडे on 14 October, 2024 - 03:38

ओझं

दिवसाच ओझं तिच्या माळव्याच्या पाटीत येऊन जड झालेलं असायचं. तस भाजी विकायचा तिच्या पोटापाण्याचा धंदा कधीच नव्हता. कुण्या श्रीमंताची ती लेक होती असही नाही. पण डब्यात पैसा खणाणत असायचा. त्या आवाजाच्या जोरावर जगातील सगळी सुख विकत घेता येतील असे तिला वाटायचे. तिची समजूत खोटी ठरवण्याकरिता महामारीनं तिचा नवरा त्याच्यासंग ओढून नेला होता. तेव्हा पोटाची गाठ सोडवण्याकरिता तिने भाजीपाल्याचं गाठोडं डोस्कीवर उचललं होतं. देवाची करणी भल्याभल्यांना समजत नाही तिथ त्या बिचारीचे काय ?जगण्याचे रोजचे ताळे कालचा हिशेब विसरायला तिला भाग पाडत. तस ती विसरूनही जाई. 'एका दिवसाचेच आयुष्य आहे' हा ठेका घेत तिने जगायचा करार केला होता. रोज दिवस बुडाला की निजे आणि रोज सुर्यासंग उठून पुन्हा कामाला जुंपत असे.

कुंकवाच्या रंगानं रसभरित असलेलं कपाळ बोडक झालं होतं. तरी ती धन्याच्या नसलेल्या नावानं ठसठशीत लाल रंगाचा बंदा रुपया माथ्यावर लेवित असे. तसा तिला दागिन्यांचा सोस कधीच नव्हता. पण कुंकवाच्या लेण्याच तिला भारी अप्रूप. तिची आवड ओळखून जल्मानं सुध्दा तिला भव्य आणि रुंद कपाळ बहाल केलं होतं. पण काळ्या मण्यांची गोष्ट तशी नव्हती कोल्ह्या कुत्र्यांच्या नजरा ओवाळून जाऊ नयेत म्हणून मंगळसुत्राची माळ गळ्यात अडकवून फिरत असे. तस नवऱ्यावर तिच प्रेम होतच कुठं? त्यामुळे जोडव्यांचा विषय नवरा असतानाच मिटलेला होता. तसा नवरा अगदी देवावानी नव्हता. माणूस म्हणून जगायला लायक होता इतकंच. पण कधी त्याच्यातल जनावर माणूसकीवर हावी होईल सांगता यायच नाही. पोरग कॉलेजातच शिकत होतं. ते हाताखाली आलं की या नसत्या उठाठेवी तिला लागणार नसल्याची एक खूणगाठ तिने मारली होती.

पाण्यानं फुगलेल्या लाकडाच्या दरवाज्याला कुलूप घालून घराबाहेर पडली की तिची भूतकाळातली काळजी भविष्यातल्या चिंता चिडीचूप होऊन जायच्या. दुःखाच्या वाटेनं वस्तीला आलेला बाजार तिच्याही नकळत तो जगण्याचा भाग बनला होता. विटावर वीट चढवत जावी अन नजर आड होताच त्याच घर व्हावं तसं तिच झालं होतं. भाजीपाल्याची एक पाटी खपेपर्यंत दुसरी विकायसाठी ती हाजीर करी. भाज्यांचा सौदा होई तेव्हा सर्वाधिक माल ती उचलत असे.

कुणी म्हणे तिच्या हातात लक्ष्मी आहे. कुणी म्हणे तिला वशीकरण येत त्यान ती माणस काबीज करते. कुणी तिच्या चारित्र्याचा पदर फाडायलाही कमी करत नसे. व्यापाऱ्याच्या दोन चाकीवरुन माग बसून आल्यापासून तिची चाल कसली? यावर बाजारातल्या बायका बापे एकमेकांच्या कानात कुजबुजत असतं. नवरा नसलेली बाई ही ओळख झाल्यानं तिच्यावर असल्या शंकाचे शिंतोडे उडवलेच पाहिजेत अशी बाजाराची रीतच जणू होऊन बसली होती. नवऱ्याच्या उठता बसता मिळालेल्या लाथेनंतर जगाच्या कोरड्या उफराट्या बोंबा तिला ऐकूच येत नसतं.

तिचा सुखाचा ऐवज तिला मिळाला होता त्याला ती जपत असे. कष्टाला मोल आहे याचा कौल तिला सतत मिळत होता. नवऱ्यापुढ हात पसरुन मागाव लागणार दानं तिच्या झोळीत तिच्या कष्टानं पडतं होतं. हीच उंबऱ्याची वेस नवरा असतानाच ओलांडली असती तर आपला घरातसुध्दा मान टिकला असता, निदान चुलवणाचा खर्च आपला आपण भागवला असता,सासु सासरयावर बोज म्हणून पडला नसता, कुणास ठाऊक नवऱ्याच काळीजही बदललं असतं.असे भूतकाळाचे पिंजर उगाचच ती उसवत बसलेली असे.

तिच्याकडे भाजी घेण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे लोक येत असतं. सगळ्यांची सुख दुख तिला आपली वाटतं. कमकुवत मनाचा एक किंवडा म्हातारा तिच्याकडे चहासाठी पैसे मागायला येई. दिवसभरातन एकदा पैसे घेऊन गेला की माघारी फिरकत नसे. आताशा ती मालाची भवानी होण्याआधी म्हाताऱ्याची वाट बघत बसलेली असे. हातात कळकटलेली पिशवी धरुन त्यात कोंबलेली लाह्याची पाकीट धरलेला म्हातारा तिला अगदी लांबूनही ओळखून येत असे. त्याच्या फाटलेल्या लेंग्याला त्यानं इतकी ठिगळ जोडली होती की लेंगा कु़ठला नि ठिगळ कुठलं यात अंतरच उरल नव्हतं. त्याच्या वेड्यावाकड्या तोंडातनं कुठलाच शब्द फुटत नव्हता. त्याची वाढलेली पांढरी दाढी त्याची करुण कहाणी जगाला वर्णन करुन सांगत असे.
त्याच्या लाह्याची पाकीट खपायला सगळी तान्ही पोरं त्यांचे आई बाप हात पुढं करुन बसलेली असायची. त्या पैशातून खर म्हणजे चहाचा बिल भागल गेलं असतं. पण तो तिच्याकडून उसना पैसा घ्यायचा. वर तिला दोन लाह्याची पाकीट बक्षीसी म्हणून द्यायचा. त्याच्या रुपानं बहिरोबाच तिला आशीर्वाद देण्यासाठी आला असे समजून ती त्याला माणसात बघतच नव्हती. त्याच नाव गाव पत्ता तिला काही ठाऊक नव्हते. बाजाराला तो नवखा नव्हता. कुणाला त्याच्या जन्मापासूनच्या कहाण्या ठाऊक होत्या. तर कोणाला त्याच्या पायाला बांधलेली दैवाची चक्र सुध्दा माहित होती. तिचा यातल्या कोणत्याच गोष्टीवर ती नजर फिरवित नव्हती. तिला फक्त म्हातारबाबान चहा घेतला की जीव थंडावत होता इतकच कळत होतं.

तशी ती सराईत व्यापारी झाल्याने तिचे बाजारातले ध्रुवबाळागत असलेले तिचं अढळपद तिनं राखून ठेवल होतं. आठवडी बाजारच्या आदल्यारात्री रस्त्या मोक्याच्या ठिकाणी भटाराचा कागद चारी बाजून निसरड्या रश्शीन बांधून करकचून गाठ मारुन दुकानाचा सांगाडा थाटत असे. गावातल्या शेतकरणी व्यापाऱ्याचा माल म्हणून तिच्या भाजीपाल्याला हिणवत असतं. "व्यापाराच असुंदे नायतर शेतकऱ्याचा ,भाजी काय मातीविना उगवती काय म्हणून ती फटकारत असे" आधीच भसाडा असलेला तिचा आवाज वर चढल्यानं ती भांडकुदळ म्हणून नावाजली जात होती. पण त्याचाही तिनं कधी बोभाटा केला नव्हता.

तशी तिची एक जिवाभावाची संगतीण होती तिच्यापुढं ती तिच सगळ काळीज विस्कटून ठेवायची. पण संगतीण कधीतरीच उंबराचे फुल आल्यावानी तिच्याकड यायची अख्खा दिवस काढायची नि पुन्हा कुठल्यातर अमावस पौर्णिमेला गाठ पडायची. त्यामुळे सुखापरीस सुख दुखाभरीस दुख एकट्यानं झेलायला ती तयार झाली होती. पण वाळंवटात बसलेल्या चटक्यापेक्षाही तिच्या जीवाला कसरीतरी डागणी बसली होती. ती तिच्या एकाकी जीवाला सोसत नव्हती. याकरिता तिच्या संगतीणीच्या वाटेकडं डोळे लावून ती बसली होती. ती कधी येईल याचा नेम नव्हता. पण ती लवकर यावी म्हणून तिनं काळीज कितीवेळा उलथपालथ केलं होतं याची तिची तिलाच गणती नव्हती. कुठल्याशा रागानं तरण पोरंग घर सोडून निघून गेलं होतं. त्याच्याकरता झुरणी लागलेलं तिच काळीज हरणासारख भटकत होतं.

एके दिवशी-
सगळा बाजार उठल्यावर ती उरलेले भाजीपाल्याच गाठोड घेऊन घराकडे निघाली होती. उरलेला भाजीपाला कुठपर्यंत माना ताठ ठेवील याची खात्री तिला होतीच. तरीही ओझ वागवत डांबावरच्या दिव्याच्या उजेडानं दाखवलेली वाट धरुन ती चालत होती. अंगापिंडान मजबूत असलेल शरीर कधीतरी त्याचही रडगाण गाणारच की नुकत्या फणफणून गेलेल्या तापानं तिच अंग अगदी अशक्त झालं होतं. ती चालत होती एवढचं पण कुणीतरी तिला ढकलत असल्याचा भास होत होता. दुपारच्या उन्हाच्या सोललेल्या झळा आता त्यांचे खरे रुप तिच्या डोळ्यांना दाखवत होत्या. पण पावले पडत होती. खरतर पायातलाही जीव कुठेतरी गोळा होणार होता त्याला तशी जागा तिने दाखवली नव्हती त्यामुळे रेटत रेटत पावले पडत होती. अखेर कुठेतरी पायाचा आणि डोळ्यांचा मेळ चुकला तशी ती भेलकांडून जमिनीवर पडली. त्यासोबतच गठळही पडलं. गठळ्याच्या गाठीला सोडून भाजी विस्कटून पडली. भाजी मापायच्या ताजव्याच्या पाटीचा आधार घेत कलंडलेली ती उठून बसली. तसही सगळ्या काला किच्चा झालेल्या भाजीचा चिखल झाला होता. ती रस्त्यावर तशीच टाकून तिने घराचा पकडलेला रस्ता पुन्हा तुडवू लागली.

कागदाच विमान येऊन पुढ्यात येऊन पडाव तशी कुण्या एका पुरुषाची दुचाकी तिच्याजवळ येऊन थांबली. तशी ती दचकून घाबरली. चेहरा ओळखीचा दिसल्याने सावरली. तिच्या घराच्या मागच्या आळीत त्या बापई माणसाची पिठाची चक्की होती. आठवड्याच पंधरवड्याच दळण दळून आणायची अन त्याच्या हातावर पैसा टेकवायची एवढीच चालीरीतीतली तिची त्याची ओळख होती. तिचे चालण्याचे कष्ट दुर करावेत असे त्याला का वाटले कोण जाणे? म्हणून तो तिला गाडीवर बसण्यासाठी रुजवात घालू लागला. पुढच्या संकटाची हुल तिच्या पावलांनी जाणवली नाही. तिची पावलं दुचाकीच्या पायाड्यावर विसावली. कुठल्याश्या नात्यातल्या कुणाच प्रेत पोहचवून तो घरी चालला होता. हेच त्याच अवेळी असण्याच कारण होतं. तिच्या घरापासून पुढं दहा घर ओलांडल्यावर त्याच घर येणार होतं. तिच्या घराच्या कोपऱ्यापर्यंत त्याने गाडी हाकली. तिथेच तिला सोडून तो त्याच्या वाटेने निघून गेला.

अभ्यासात लक्ष न लागणारा तिचा पोरगा खिडकीतून अंधारलेल गाव बघत बसला होता. त्याच्या डोळ्याला दिसणारा अंधार डांबावरचा लखलखीत पिवळा दिवा सतत त्याच वलय निर्माण करुन धुवून टाकत होता. पण गावच्या वावड्यांनी कलुषित झालेल त्याच मन दुसरेच काही पहात होतं. त्याच्या गाडीवरन उतरलेली तिची सावली त्यान दुरूनही ओळखली. त्याच्या संतापाच्या ठिणग्या देह फुटून बाहेर आल्या. त्याच्या गरम कानशिलांना तिच्याबद्दल ऐकलेले बरेवाईट उदगार आठवू लागले. त्याच्या हातापायाची होणारी लाहीलाही तो दात ओठ खाऊन विझवत होता. तिच्या येण्याकरता उघडलेल्या दरवाज्यातून त्यान जायची वाट निश्चित केली. घर सोडायचा निर्णय त्याचा पक्काच होता. पण त्याकरिता लागणारे बळ त्याच्यात एकवटले नव्हते. तिरस्काराच्या विळख्यात तो अडकताच त्याच्यातला दुखाचा धुसमुसता निखारा त्वेषाने पेटला होता.लेकराची ओळख आईपेक्षा कुणाला असणार? त्याच्या रगारगातन वाहत असलेले चीडीचं वारं तिला दिसताच प्रश्न विचारून त्याची अडवणूक केली होती. काही न बोलताच मुकेपणानं त्याने घराला माग टाकलं होतं. अगदी वाऱ्यावर सोडून दिलं होतं.

तिच्या ममतेची हजार शकलं तिचं दुःख सांत्वु शकली नव्हती. तिची विव्हळ झालेली आसवं तिचा ठाव घेऊ शकली नव्हती. सगळे दिवस सारखे नसतात हे तिला माहीत होतं. पण हा दिवस का वाट्याला आला म्हणून ती घरातल्या भांड्याकुड्यांना बरणीतल्या तिखटा मिठाला ती विचारत होती? पण कोण उत्तर देणार?

त्यादिवशी-
आठवडी बाजारचा दिवस होता. रस्ता नुसत रंगीत लुगड नेसल्यावानी नटून बसला होता. पाणी सांडल्यावर ओघळाव तस रस्ता जागा करुन देईल तिथ मळेकरी व्यापारी पथारी पसरुन बसले होते. कुणाच्या हिश्श्याला कुठली जागा आली यात तिला रसच उरला नव्हता. रस्त्याच्या एका कोपऱ्यात जिथ किडा मुंगीसुध्दा येणार नाही तिथं तिन आज दुकान थाटलं होतं. बाकी कुणी येवो न येवो म्हातारा चहाचे पैसे मागायला तिला शोधत येणार असल्याची खात्री तिला होती. पण तस झाल नाही.संध्याकाळ होताच पावसानं दमदाटी करायला चालू केली. उरलेला माल निम्म्या किमतीला विकून बाजार उठला होता. तिचा कालचाच उरलेला माल तिने पाणी शिंपडून ताजा म्हणत विकला होता. रिकामी झालेली पाटी डोईवर घेऊन ती घराकडली वाट तुडवू लागली. एरवी वीस पंचवीस किलो ओझ पेलणारा तिचा डोक्याचा ताजवा रिकामी पाटी उचलू शकत नव्हता. कोरी पाटी घेऊन ती घराकड पोचली.

घराला लागलेल्या गळतीखाली ठेवलंल पातेलं पाण्यानं ओसंडून वहात होतं. ते पातेल बाजूला सारुन तिथ तिनं गोणपाट पसरला. तशी सगळी ओल त्यात जमा झाली. पोराच्या आठवणीनं गलबलेल काळीज डोळ्यातून टिप गाळत होतं. पण आसवाची ओल शोषलीच जात नव्हती. पायात घुटमळणाऱ्या मुंगळ्यान तिला म्हातारा चहाचे पैसे वसूल करायला आला नसल्याची आठवण करुन दिली होती. पावसाच्या पाण्यानं किंवड्या म्हाऱ्याला घराबाहेर पडू दिलं नव्हतं. तिच्या घराचा पत्ता शोधून वाट काढीत तो पैसा मागायला घराकडं आला होता. नुकतीच चुल पेटवून ती भाताला कड देत बसली होती. बंद नसलेला दरवाजा ठोठावुन तिच्या घरात शिरला.
"पैका देती का पैका? चाय प्यायची हाय" त्याच्या लवथवत्या आवाजात त्यानं विचारलं
"आता रातच्याला कुठली हॉटेल उघडी हाईत"
तिच्या प्रश्नाचा रोख न कळल्यान तो कंप पावलेल्या आवाजात म्हणाला
"राहुं दे नग पैका म्या जातो"
"भूक हाय का? जेवतोस?"
"नाही भूक नाय भाकर खाल्ली "
"दम जरा चाय करते"

म्हाताऱ्याच्या हातावर पैसा ठेवायऐवजी त्याला चहा पाजवताच तिला माणुसकीचं इमान राखल्यासारखं वाटलं. म्हातारा चाय पिऊन घरातून निघून गेला. पुन्हा एकदा बहिरोबाच त्याच्या रुपात येऊन प्रगटल्यासारखा तिला वाटला. म्हाताऱ्याची पावलं कोपऱ्यावर वळता न वळतंच चार दिवसामाग रागारागाने घर सोडून गेलेल पोरग माघारी परतून आल होतं. त्याच्या अंगात संचारलेल भूत कुठल्या मांत्रिकान हडपल होत त्याच त्याला ठाऊक .परंतु त्याच्या आईला पाहून त्याच्या डोळ्यात आलेल पाणी पावसाच्या पाण्याहुनही शुद्ध होते. अगदी त्याच्या आईच्या अंतकरणा इतके स्वच्छ व नितळ. त्याच्या आसवांनी कितीतरी वेळ तिच काळीज ममतेच्या डोहात भिजत राहिले. तिच्या माळव्याची रिकामी झालेली पाटी तिला उगाचच भरल्यासारखी वाटली. त्याच ओझ्याखाली तिनं हलक झालेलं मन सरकवल आणि उजाडत्या दिवसाची वाट पाहू लागली.

-------- अनघा देशपांडे

Group content visibility: 
Use group defaults

खुप छान कथा... सुखकर शेवट झाला हे बरं झालं Happy

आधीच भसाडा असलेला तिचा आवाज वर चढल्यानं ती भांडकुदळ म्हणून नावाजली जात होती. पण ती त्यापुढही बभ्रा होत नसे.
>>>>>> म्हणजे काय ?
बभ्रा होणे म्हणजे बोभाटा होणे ना ?

@आबा

धन्यवाद दुरुस्ती सुचवल्या बद्दल. घाईगडबडीने चूक झाली होती सुधारली.
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.

छान आहे कथा.
काही काही वाक्यरचना फक्कड जमल्यात.

कथा छान आहे. मुलगा का परतला, त्याचे मत परिवर्तन का/कसे झाले हे यायला हवे होते.

व्याकरणाच्या खुप चुका आहेत. कित्येक शब्दप्रयोग असे केलेत की शब्दावर टिंब असणे आवश्यक होते पण ते दिले गेले नाही. कथा टंकताना इतकी घाई करु नका. हवे तर दुसरीकडे टंकुन इथे पोस्टा. पोस्टायच्या आधी त्रयस्थपणे व शांतपणे वाचा म्हणजे पोस्ट निर्दोष होईल.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!