शहर मुंबई, काळ नव्वदीचा.
उपनगरात विक्रोळी इथे राहणारा एक लहान मुलगा त्यादिवशी फार खुश होता. कारणही तसेच होते. परीक्षा झाल्यावर त्याला त्याच्या आईवडिलांनी एक गाडी गिफ्ट केली होती. गाडीचा फोटो गूगलवरून शेअर करतो. कारण ती बघितल्याशिवाय किस्स्याची मजा नाही.
तर हीच ती सायकल, जिला तीन चाकी स्कूटर सुद्धा म्हटले जाते. एक पाय फूटबोर्डवर ठेवून, तर दुसरा पाय जमिनीवर होडी वल्हवल्यासारखा मारत उभ्याउभ्यानेच चालवायची असते. एकदा रिदम पकडले तर वेगाला काही मर्यादा नसते. बस याच रिदम आणि वेगाने घात केला.
तर झाले असे,
मे महिन्याच्या सुट्ट्या चालू होत्या. काका नुकतेच कुटुंबासह मुंबईहून विक्रोळीला शिफ्ट झाले होते. एरीयाचे नाव होते टागोर नगर. बऱ्याच बिल्डिंगची मिळून एक वसाहत होती. ज्यात काकांच्या बिल्डिंग समोर लांबलचक त्रिकोणी आकाराचे गार्डन होते. नवीन सायकल चालवायला ती एक उत्तम जागा होती. काही दिवस माझ्या भावाने तिथे सायकल चालवली. पण एकदा का त्यात एक्स्पर्ट होताच त्याला नवनवीन क्षितिजे खुणावू लागली. बरे ही सायकल सुद्धा चालवायला अगदी सोपी असते. कोणीही शिकू शकते. आणि कितीही न कंटाळता चालवू शकते.
तर एकदा दुपारी आई घरात झोपली असताना माझा हा भाऊ सायकल चालवायला गार्डनमध्ये गेला. पण त्या दिवशी भाईच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लान शिजत होता. गार्डन पार करून त्याने सायकल सरळ समोरच्या मेनरोडवर घातली. गुळगुळीत रस्त्यावर वाऱ्याशी स्पर्धा करत चालवायची मजा येऊ लागताच गडी सुसाट सुटला. बघताबघता विक्रोळीची हद्द ओलांडून घाटकोपरमध्ये पोहचला. ही घटना विशेष होती कारण आजवर कधी त्याने एकट्या दुकट्याने विक्रोळी पलीकडे प्रवास केला नव्हता. किंबहुना त्यापलीकडे घाटकोपर नावाचे स्टेशन आहे हे सुद्धा त्याला माहीत नव्हते इतका तो लहान होता.
पण इतक्यावरच तो आज थांबणार नव्हता. आता तर कुठे त्याला मजा येऊ लागली होती. मजेमजेतच त्याने विद्याविहार गाठले. आणि बघता बघता कुर्ल्याला पोहोचला!
काळ काम वेग शिकायचे वय नव्हते ते. इतके आलो आहोत तर तितकेच उलट पावली परत सुद्धा जायचे आहे याची त्याला कल्पना नव्हती. अजूनही त्याची ताकद आणि उत्साह टिकून होता. त्यांच्या जीवावर त्याने आपला घोडा अजून पुढच्या दिशेने दामटवायला सुरुवात केली. तितक्याच वेगात सायन माटुंगा ओलांडून तो मुंबईची आन बान शान.. छे, शाहरूख खान नाही, तर दादरला पोहोचला.
हो मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण दादर, जिथे लोकं येतात आणि तिथल्या मार्केटच्या गर्दीत हरवून जातात. जिथे रेल्वे स्टेशनला गेले तर कुठला ब्रिज कुठल्या प्लॅटफॉर्मला जातो हे पहिले वर्षभर तरी कळत नाही. रस्त्यावर उतरले तर रस्ता क्रॉस कसा करायचा या विचारानेच भंबेरी उडते. सिग्नल लागला की नजर जाणार नाही तिथवर गाड्यांची लागलेली रांग बघून भांबावायला होते. तर अश्या या दादरला एक असा मुलगा जो आजवर राहत्या घरापासून चारशे मीटर दूर कधी एकट्याने गेला नव्हता तो किमान १७ ते १८ किलोमीटर प्रवास करून आला होता. तसेच आपण कुठे आलो आहोत आणि काय पराक्रम केला आहे या बद्दल अजूनही अनभिज्ञ होता.
आपल्या मुलाबाबत असे घडण्याचा विचार जरी केला तरी अंगावर भितीने शहारा येईल. पण तेव्हा याची जराही कल्पना नसलेल्या माझ्या काकी आपल्या घरात निवांत झोपल्या होत्या, किंवा उठून आपल्या कामाला लागल्या होत्या. कारण त्यांच्या मते घरासमोरच गार्डनमध्ये खेळत असलेला आपला मुलगा अंधार पडला, भूक लागली, खेळून दमला की स्वताहून परत येणार होता. पण त्यांच्या मुलाकडे त्यावेळी भूक लागल्यास ना पैसे होते, ना तहान लागल्यास पाणी होते. अंधार पडला तरी पुन्हा परत यायची खात्री नव्हती कारण परतीचा नेमका रस्ता त्याला ठाउक नव्हता.
चित्रपटात छान असते. जर चांगले घडलेले दाखवायचे असेल तर ऐनवेळी कोणीतरी मसीहा हिरो बनून पडद्यावर अवतरतो. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र असे होणे कठीणच असते.
पण त्या दिवशी ते झाले. एखादी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहावी तसे खरेच एकजण देवासारखा तिथे प्रकट झाला. त्यांच्याच टागोर नगरमध्ये शेजारच्या एका बिल्डिंगमध्ये राहणारा आणि याला चेहऱ्याने ओळखणारा एकजण तिथे दादरला उपस्थित होता.
त्याने माझ्या भावाला पाहिले. चौकशी केली. काय झाले हे कळले तेव्हा डोक्याला हात लावला आणि त्याला सायकलसह ट्रेनमध्ये टाकून अंधार पडायच्या आत घरी सुखरूप परत आणला
------------------
परवा एका व्हॉटसअप मित्रांच्या ग्रूपवर हा किस्सा लिहीला. इतका डिटेलमध्ये नाही, तर विषय निघाला म्हणून फक्त चार ओळीत लिहीला. पण काही जणांना तो खोटा वाटला. कारण साध्यासुध्या माणसांच्या आयुष्यात घडलेला हा किस्सा होता. कदाचित यावर श्रद्धेचा मुलामा चढवला असता आणि अमुक तमुक कृपेने भाऊ घरी परतला असे म्हटले असते तर कदाचित चार लोकांनी हात जोडले असते. आणि ज्यांना पटले नसते त्यांनीही इतरांच्या श्रद्धा दुखावतील या भीतीने खिल्ली उडवली नसती.
याउपर एक मानवी स्वभाव सुद्धा असतो. ट्रेनमध्ये अनोळखी लोकांकडून ऐकलेल्या गोष्टीवर एकवेळ विश्वास ठेवला जातो. पण तेच ओळखीच्या लोकांकडून असा किस्सा ऐकला की मन चटकन विश्वास ठेवायला तयार होत नाही. जे आपल्या आयुष्यात घडले नाही ते याच्या आयुष्यात कसे काय घडले असा विचार डोक्यात येतो. त्यात हा किस्सा होताही खरेच थोडा अविश्वसनीय. म्हणून मी अविश्वास दाखवणाऱ्या कोणाचे बोलणे मनावर घेतले नाही. पण त्यावरून प्रेरणा घेऊन हा धागा काढायचे ठरवले.
तसे हा किस्सा माझ्या स्वताच्या आयुष्यात घडलेला नाही तर माझ्या भावाच्या आयुष्यात घडला आहे. माझे स्वतःचे आयुष्य फार सरल आणि सपक आहे. तीन लग्ने झाली हा अपवाद वगळता विशेष जगावेगळे घडल्याचे चटकन काही आठवत नाही. पण इथे कित्येक मायबोलीकरांच्या स्वत:च्या आयुष्यात किंवा ओळखीच्या लोकांत असे काही ना काही घडले असेल ज्यावर चटकन कोणाचा विश्वास बसू नये. म्हणून विचार केला की अश्या घटनांचा एक धागा काढुया. आपल्या आयुष्यातील अश्या घटना इथे प्रामाणिकपणे लिहूया. आणि एकमेकांवर विश्वासाने विश्वास ठेवूया
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
खतरनाक किस्सा.
खतरनाक किस्सा.
माझं आयुष्य पुणेरी वरणभातासारखं आहे.
काही विशेष नाहीये सांगण्यासारखं पण तरीही छान आहे साधं सोपं
<< पण काही जणांना तो खोटा
<< पण काही जणांना तो खोटा वाटला. >>
१८ किमी अंतर हाफ मॅरॅथॉनपेक्षा थोडे कमी आहे, मी स्वतः ते १८ किमी अंतर, पूर्णपणे मोकळ्या रस्त्यावर साधारण सव्वादोन ते अडीच तासात पळेन. त्या मुलाला पळत/सायकलवर किती वेळ लागेल याचा केवळ अंदाज करा. (त्याला जमेल की नाही, रस्त्यात गर्दी किती असेल हा मुद्दा नंतर). मग समजेल की मुलगा २ वाजता घरून निघाला तर दादरला कधी पोचेल.
लहान मुलं काय वाट्टेल ते
लहान मुलं काय वाट्टेल ते करतात.
आवडलं.
उबो छान मुद्दा. टेक्निकली
उबो छान मुद्दा. टेक्निकली पॉसिबल हवेच.
माझ्यामते अश्या सायकलचा वेग बरेपैकी चांगला असतो आणि त्यात दम सुद्धा लागत नाही जसे चालताना किंवा धावताना लागतो.
माझा चालायचा स्पीड ताशी चार किमी तरी आहे, त्यानुसार अशी सायकल घेऊन ताशी ८-१० एवरेज स्पीड राखणे अवघड नाही असे मला वाटते. त्यानुसार दोन तास पुरेसे ठरावेत. फार तर इतर गर्दी वगैरे फॅक्टर पकडून अडीच-तीन तास मोअर than इनफ म्हणू शकतो.
जाणकार प्रकाश टाकतील.
शर्मिला हो, लहान मुलांना
शर्मिला हो, लहान मुलांना परिणामांची भीती नसते कारण संकटांची कल्पनाच नसते. म्हणूनच जास्त लक्ष ठेवावे लागते.
"तीन लग्ने झाली हा अपवाद
"तीन लग्ने झाली हा अपवाद वगळता विशेष जगावेगळे घडल्याचे चटकन काही आठवत नाही"
खरे कि काय, हे आधी वाचलेले नाही. हा गौप्यस्फोट इथे पहिल्यांदा केला कि काय?
माझ्या कडे 11 ऑक्टोबर,
माझ्या कडे 11 ऑक्टोबर, अश्विनी शुक्ला खांडेकर नवमी, अवध पूजा असं दिनविशेष दाखवतंय. सहा महिने भविष्यात तर नाही ना आलो?
डिजिटल चिमटा प्लीज.
उबो. अशा सायकली अमेरिकेत लोक
उबो. अशा सायकली अमेरिकेत लोक घर ते ट्रेन स्टेशन आणि स्टेशन ते ऑफिस व परत अशा प्रवासासाठी वापरतात. या साय्कल्स सहज २५ किमीप्रतीतास वेग पकडू शकतात. त्यामुळे अगदी १० चा स्पीड असला तरी २ तासात तो पोचेल. हे नक्की शक्य आहे कारण मी सायकल वरून बरीच उपनगरे पालथी घातली आहेत.
"या साय्कल्स सहज २५
"या साय्कल्स सहज २५ किमीप्रतीतास वेग पकडू शकतात"
बॅटरी असते त्यांना, तुम्ही अजून कोणती वेगळी सायकल म्हणताय का?
इथे सगळं अद्भुत आणि अविश्वनीय लिहितात सगळे, सुरुवातीला वाटलं बोकलत लेखक आहेत मग ऋन्मेष नाव वाचले. मग म्हटलं १००% खरे असणार.
काळ नव्वदीच्या आहे असे लिहिले
काळ नव्वदीचा आहे असे लिहिले आहे, त्यावेळी विक्रोळी घाटकोपर या रस्त्यावर खूप कमी गर्दी असायची, साधारण अमर महाल, चेंबूर पर्यंत. त्यानंतर गर्दी सुरु होत असे साधारण एव्हरार्ड/सुमन नगर पर्यंत, इथे वाशी वरून आलेला रस्ता जोडतो. परत सायन पर्यंत रस्ता चांगलाच मोठा होता त्यामुळे गाड्यांची गर्दी तितकी जाणवत नसे. परत सायन पासून पुढे त्याकाळी तरी मोठे फूटपाथ असायचे, आता काय परिस्थिती आहे माहीत नाही. आणि अतिशय महत्वाची गोष्ट, या रस्त्यावर त्याकाळी तरी डांबरी रस्ता असून देखील खड्डे नसायचे. सध्या असलेले बरेच उड्डाणपुल त्याकाळी नव्हते. तर हे सगळे विचारात घेता, जर कोणी एका तंद्रीत अशी सायकल चालवत असेल तर सहज २-२:३० तासात दादरला पोहोचू शकेल.
भावाला नंतर कधी विचारले का त्याबद्दल की असे कसे झाले? आता मोठे झाल्यावर त्याला या आठवणी बाबत काय वाटते?
नेमकी तारीख, वेळ, स्टार्ट
नेमकी तारीख, वेळ, स्टार्ट पॉईंट, एंड पॉइंट आणि गुगल मॅप डायरेक्शन्सचा स्क्रीनशॉट, लिंक असे तपशील दिले तर नासा त्यांच्या उपग्रहाकडून आलेले रेकॉर्डिंग पाठवू शकेल.
भावाला विचारले नाही आणि
भावाला विचारले नाही आणि विचारूही शकत नाही. कारण घर घर की कहानी, मागच्या पिढीतल्यांचे प्रॉपर्टीवरून वाद झाले आहेत. कित्येक वर्षांपासून संबंध तुटले आहेत.
भावाचे आणि माझे वय सेम आहे. त्यामुळे माझ्या आठवणी देखील त्याच वयातल्या असल्याने बारीक सारीक डिटेल माहित नाहीत. पण मुख्य तपशील बरोबर आहे.
गर्दीचा मुद्दा योग्य आहे. माझ्याही डोक्यात ते आले होते. तेव्हा त्या काळात उपनगरात इतकी गर्दी नव्हती. मी मे महिन्याच्या सुट्टीत राहायला जायचो त्यांच्याकडे. तेव्हा ते अगदीच जाणवायचे. इतकी कमी गर्दी बघून मला बोर होऊन जायचे.
25 किलोमीटरसाठी मशीन लागत असेल. पण ताशी दहा किलोमीटर पाय मारत गाठणे सहज शक्य आहे.
आता मी जेवल्यावर माझ्या नॉर्मल स्पीडने चालत आहे आणि त्या सायकलचा स्पीड इमॅजिन करत आहे. तो सहज दुप्पट तिप्पट असेल. नाहीतर मजा काय..
लहान मुलं वाटेल ते करतात. +१
लहान मुलं वाटेल ते करतात. +१
छान लिहिलं आहे.
ते "तीन लग्ने झाली" चे काय,
ते "तीन लग्ने झाली" चे काय, लेखनात काही गडबड झाली का
ते "तीन लग्ने झाली" चे काय,
ते "तीन लग्ने झाली" चे काय, लेखनात काही गडबड झाली का>> बहुतेक एकाच मुलीशी तीनदा लग्न केले असेल.
"तीन लग्ने झाली" हे आपले
"तीन लग्ने झाली" हे आपले उगीचच हं. त्या निमित्ताने TRP वाढावेत म्हणून. पण सरांचे काही सांगतायेत नाही. आमच्यात पण करलग्न, सोडलग्न, धरलग्न असे तीन प्रकार असतात.
बहुतेक एकाच मुलीशी तीनदा लग्न
बहुतेक एकाच मुलीशी तीनदा लग्न केले असेल.
>>>>
पहिले आणि तिसरे एका मुलीशी केले.
मध्ये काही काळासाठी दुसरी आली होती.
तिच्या मृत्यूपश्चात परत पहीलीशी
थोडे कांफ्यूजिंग आहे. लिहितो पाल्हाळ न लावता थोडक्यात.
ज्या मुलीशी प्रेम विवाह करायचा होता तिच्या आणि माझ्या पत्रिकेत मृत्युयोग होता.
त्यावर एकाने झाडाशी लग्न करायचा उपाय सुचवला होता.
मधल्या काळात मुहूर्त नसल्याने खूप थांबावे लागणार होते.
पण आधीच आमच्यात जातपात, घाट कोकण, शाकाहार मांसाहार, बारीक जाड असे सतराशे साठ भेद होते.
त्यामुळे असे ठरले की रजिस्टर लग्न करून वेगवेगळे राहायचे म्हणजे पोरगा पोरीला नंतर फसवनार नाही.
त्यामुळे पहिले लग्न रजिस्टर झाले.
दुसरे झाडाशी झाले.
त्या झाडाचे विसर्जन करताच मृत्यूयोग टळला.
मग तिसरे लग्न नऊ महिन्यांनी आपल्या नेहमीच्या पारंपारीक पद्धतीने झाले. मधले नऊ महिने आम्ही आपापल्या माहेरी संयमाने राहत होतो. (एका गोवा ट्रिपचा अपवाद वगळता) कारण तेव्हा आमचे रजिस्टर लग्न जगासमोर उघड झाले नव्हते. किंबहुना आजही फार कोणाला माहीत नाही. चक्क बायकोच्या सख्ख्या भावाला सुद्धा माहीत नाही. तुम्ही लोकं मला मेहुणे मेहुणे बायकोचे पाहुणे पेक्षा जवळचे आहात म्हणून सांगतोय
साथिया स्टाइल स्टोरी आहे
साथिया स्टाइल स्टोरी आहे तुमच्या लग्नाची ऋन्मेश.
मैने दूरदर्शनपे देखा है|
मैने दूरदर्शनपे देखा है|
हो जाई, साथियासारखेच..
हो जाई, साथियासारखेच..
गोवा ट्रिप ही चार पाच दिवसांची कॉलेजची शैक्षणिक सहल होती. ती तेव्हा फार्मसी कॉलेजला शिकवायची. एक दिवस साईट विजिट आणि चार दिवस धमाल अशी सहल असायची.
आता आम्ही होतो नवराबायको. पण लग्न जगासमोर उघड करायचे नव्हते. तरी फिरायचे कपल सारखेच होते. पण विद्यार्थ्यांसोबत कसे. कारण तिथे कॅरेक्टर सुद्धा जपावे लागते. त्यामुळे एंगेजमेंट झाली आहे असे सांगून गेलेलो.
या ट्रिपबद्दल देखील तिच्या माझ्या घरच्या कोणालाही माहीत नाहीये
पेड़ से तोड़ ले मछलियां
पेड़ से तोड़ ले मछलियां बिल्लियों को तू गाना सिखा
चाँद को कर दे चकोर तू और सूरज तिकोना बना
ओ बिना पहिए की गाड़ी में चल भूल जा अपने घर का पता
ले के हाथी को मुट्ठी में तू कैबरे देख ले ऊंट का आंय
मैं तो हूँ पागल
आयच्यान, कसली भारी स्टोरी आहे
आयच्यान, कसली भारी स्टोरी आहे. मला वाटलेला एकदा गंधर्व विवाह, दुसऱ्यांदा नोंदणीकृत विवाह आणि तिसऱ्यांदा पारंपरिक विवाह झाला असेल, म्हणूनच हा प्रश्न विचारला आणि त्यात तुम्ही हा मोठा गौप्यस्फोट केला, जो आप्तेष्टाना माहिती नव्हता ते माबोकरांना सांगितले. धन्यवाद.
पण पुन्हा एक विचार मनात आला याला तीन पद्धतीने लग्न झाले असे म्हणायला हवे ना कि तीन लग्न झाले असे म्हणणार. जनसामान्य चालीरीती नुसार ३ लग्न झाले म्हंजे तीन वेगळ्या व्यक्तीसोबत लग्न होणे. शीर्षकच अद्भुत आणि अशक्य त्यामुळे इथे आलेले लिखाण तसेच असेल.
तिन्ही लग्ने एकीशीच नाही ना
तिन्ही लग्ने एकीशीच नाही ना झाली.
दोन एकिशी झाली पण सलग नाही.
म्हणजे तिसरे लग्न मी माझ्या पहिल्याच बायकोशी केले असे म्हणू शकतो. पण लग्न तीनच झाली.
बायकोला बिचारीला हे सुख नव्हते. तिला दोन्ही लग्ने एकाच माणसाशी करावी लागली. ती सुद्धा माझ्यासारख्या
भारी लिहिलंय.
भारी लिहिलंय.
ही स्कूटर सायकल होती माझ्याकडे. भरपूर धांगडधिंगा केलाय त्यावेळी.
पण फोटोत दाखवलेली आताची दिसतेय. त्या काळात ह्याच बेसिक मॉडेल होतं. आणि मुख्य म्हणजे ती फोल्ड करून ठेवता यायची.
हो ऋतुराज, फोटोत अर्थात
हो ऋतुराज, फोटोत अर्थात आताची आहे, गूगल करून शोधला आहे फोटो.
या सायकलवर सुद्धा डबल सीट घेतली जायची. एक उभा चालवणारा आणि एक त्याच्या पुढे पायाशी बसलेला
अद्भुत, अविश्वसनीय नाहीएत पण
अद्भुत, अविश्वसनीय नाहीएत पण जरा डेन्जर किस्से आहेत जे आठवले कि अजूनही भीती वाटते..
किस्स नं १. तमिळनाडू मधे नवीनच शिफ्ट झालो होतो आम्ही.. मुलगा दोन वर्षाचा होता...
एके दिवशी सकाळी आम्ही दोघेच घरात होतो..पुण्याहून काही मित्रमंडळी भेटायला आली होती आणि त्यांना घर सापडत नव्हते.. घराच्या अगदी जवळच आले होते ते..मी घाईत आता मुलाला कुठे उचलून घ्या म्हणून टिव्ही समोर बसवून घराच्या मागच्या बाजूला गेले..पाचेक मिनटांत परत आले तर मुलगा घरात,शेजारी कुठंही नाही..पाहुण्यांना घरात बसवून शोधाशोध सुरू..१००-१५० पावलांवर ओळख झालेली त्यांचे घर होतं.. त्या काकूंनी एकटा कुठं चाललास म्हणून थांबवलं आणि त्याला घेऊन निघाल्याच होत्या माझ्या कडे तोपर्यंत टेन्शन मध्ये मी दिसले..हुश्श..जीवात जीव आलेला.... कारण जरा पुढंच डायरेक्ट रहदारी चा रस्ता होता...
किस्सा नं.२ मुलगी आठ महिन्यांची होती आणि नुकतीच रांगायला शिकलेली..
एके सकाळी मी किचनमध्ये, ती माझ्या जवळच खेळत होती..
नवरा हॉलमध्ये कपड्यांना इस्त्री करत होता... मी कचरा काय टाकायला एकच मिनट बाहेर गेले..बघते तर नवरा जागेवर नाही आणि मुलगी ऑलमोस्ट उभ्या करून ठेवलेल्या गरम इस्त्रीला हात लावणार इतक्यात मी पाहिले आणि किंचाळले..लेक पटकन वळली पायाला जरा भाजलेच..नवरा दुसऱ्या रूममधून धावत बाहेर....महिनाभर आम्ही यातून सावरलो नव्हतो...
बापरे!! खतरनाक!
बापरे!! खतरनाक!
लहानपणी आम्ही मुलं तीन चाकी
लहानपणी आम्ही मुलं तीन चाकी सायकलवर फिरायचो. मागे सीट असलेली सायकल होती.
एकदा ती सायकल एक तेजस्वी मुलगा चालवत होता. तर त्याचा लहान भाऊ घरातला छताडपंखा काढून घेऊन आला. त्या दोन भावांनी तो पंखा दोन्ही सीटच्या मधे बसवला आणि पायडला बिव्हल गिअरच्या सहाय्याने जोडून टाकला.
तेजस्वी मुलाने पायडल मारताच पंखा फिरू लागला. मग बाकीची मुलं आनंदाने ओरडू लागली. पण गंमतच झाली. पंखा फिरू लागला तशी सायकल हवेत उडू लागली. उडता उडता ती खूप उंच गेली. तेजस्वी मुलाला वाटले कि आता स्पीड कमी करावा.
पण त्या नादात हवा विरळ झाल्याचे त्याच्या लक्षात आले नाही.विरळ हवेत पायडलला स्पर्श केला कि चाक जोरात फिरू लागले. आणि थोड्याच वेळात ते पृथ्वीचं वातावरण सोडून वरच्या थरात आले. इथे हवाही नव्हती कि उजेडही नव्हता. सगळीकडे फक्त ग्रह तारे दिसत होते.
त्याचा लहान भाऊ म्हणाला तो पहा चंद्र. जायचं का ?
तेजस्वी बालक म्हणाले, पुढच्या वेळी जाऊयात. आता आई वाट बघत असेल.
पण आता सायकल खाली कशी घ्यायची ?
मोबाईलला कसं टॉवर पासून दूर गेल्यावर एखादी कांडी दिसते. अगदी तसं कांडीवालं गुरूत्वाकर्षण जाणवत होतं.
दोघेही मग सायकलला लटकले. त्यांच्या फिमेल गुरूचं नाव घेऊन आकर्षण आकर्षण ओरडले.
आणि काय चमत्कार.
गुरूत्वाकर्षण काम करू लागलं आणि ते वातावरणात आले. मग अलगद खाली आले. आता आदळण्याची उंची आली.
तेजस्वी बालकाने उलटा पायडल मारला. यामुळे खाली उतरण्याचा वेग कमी होऊन सायकल अगदी झेल टिपावा तशी अलगद उतरली.
त्या दिवशी त्या दोन बालकांवर आकाशातून पृष्पवृष्टी झाली.
ते ज्या इमारतीत राहत होते तिचे नाव आकाशानंद होते. तिच्या बाल्कनीतून फुलं उधळली गेली.
त्या तेजस्वी बालकाचे नाव सांगायलाच पाहीजे काय ?
त्या तेजस्वी बालकाचे नाव
त्या तेजस्वी बालकाचे नाव सांगायलाच पाहीजे काय ? >>
मला आधी वाटले की हा बोकलतचा प्रतिसाद आहे की काय? बघतो तर र. आ.
आता मात्र धाग्याला विरळ हवा
आता मात्र धाग्याला विरळ हवा लागली आहे. कुठे जाईल ? कसा जाईल ? देवालाच माहित.
Pages