अदभुत आणि अविश्वसनीय, पण मानवीय सत्यघटना!

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 October, 2024 - 17:36

शहर मुंबई, काळ नव्वदीचा.
उपनगरात विक्रोळी इथे राहणारा एक लहान मुलगा त्यादिवशी फार खुश होता. कारणही तसेच होते. परीक्षा झाल्यावर त्याला त्याच्या आईवडिलांनी एक गाडी गिफ्ट केली होती. गाडीचा फोटो गूगलवरून शेअर करतो. कारण ती बघितल्याशिवाय किस्स्याची मजा नाही.

IMG_20241011_005850.jpg

तर हीच ती सायकल, जिला तीन चाकी स्कूटर सुद्धा म्हटले जाते. एक पाय फूटबोर्डवर ठेवून, तर दुसरा पाय जमिनीवर होडी वल्हवल्यासारखा मारत उभ्याउभ्यानेच चालवायची असते. एकदा रिदम पकडले तर वेगाला काही मर्यादा नसते. बस याच रिदम आणि वेगाने घात केला.

तर झाले असे,
मे महिन्याच्या सुट्ट्या चालू होत्या. काका नुकतेच कुटुंबासह मुंबईहून विक्रोळीला शिफ्ट झाले होते. एरीयाचे नाव होते टागोर नगर. बऱ्याच बिल्डिंगची मिळून एक वसाहत होती. ज्यात काकांच्या बिल्डिंग समोर लांबलचक त्रिकोणी आकाराचे गार्डन होते. नवीन सायकल चालवायला ती एक उत्तम जागा होती. काही दिवस माझ्या भावाने तिथे सायकल चालवली. पण एकदा का त्यात एक्स्पर्ट होताच त्याला नवनवीन क्षितिजे खुणावू लागली. बरे ही सायकल सुद्धा चालवायला अगदी सोपी असते. कोणीही शिकू शकते. आणि कितीही न कंटाळता चालवू शकते.

तर एकदा दुपारी आई घरात झोपली असताना माझा हा भाऊ सायकल चालवायला गार्डनमध्ये गेला. पण त्या दिवशी भाईच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लान शिजत होता. गार्डन पार करून त्याने सायकल सरळ समोरच्या मेनरोडवर घातली. गुळगुळीत रस्त्यावर वाऱ्याशी स्पर्धा करत चालवायची मजा येऊ लागताच गडी सुसाट सुटला. बघताबघता विक्रोळीची हद्द ओलांडून घाटकोपरमध्ये पोहचला. ही घटना विशेष होती कारण आजवर कधी त्याने एकट्या दुकट्याने विक्रोळी पलीकडे प्रवास केला नव्हता. किंबहुना त्यापलीकडे घाटकोपर नावाचे स्टेशन आहे हे सुद्धा त्याला माहीत नव्हते इतका तो लहान होता.

पण इतक्यावरच तो आज थांबणार नव्हता. आता तर कुठे त्याला मजा येऊ लागली होती. मजेमजेतच त्याने विद्याविहार गाठले. आणि बघता बघता कुर्ल्याला पोहोचला!

काळ काम वेग शिकायचे वय नव्हते ते. इतके आलो आहोत तर तितकेच उलट पावली परत सुद्धा जायचे आहे याची त्याला कल्पना नव्हती. अजूनही त्याची ताकद आणि उत्साह टिकून होता. त्यांच्या जीवावर त्याने आपला घोडा अजून पुढच्या दिशेने दामटवायला सुरुवात केली. तितक्याच वेगात सायन माटुंगा ओलांडून तो मुंबईची आन बान शान.. छे, शाहरूख खान नाही, तर दादरला पोहोचला.

हो मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण दादर, जिथे लोकं येतात आणि तिथल्या मार्केटच्या गर्दीत हरवून जातात. जिथे रेल्वे स्टेशनला गेले तर कुठला ब्रिज कुठल्या प्लॅटफॉर्मला जातो हे पहिले वर्षभर तरी कळत नाही. रस्त्यावर उतरले तर रस्ता क्रॉस कसा करायचा या विचारानेच भंबेरी उडते. सिग्नल लागला की नजर जाणार नाही तिथवर गाड्यांची लागलेली रांग बघून भांबावायला होते. तर अश्या या दादरला एक असा मुलगा जो आजवर राहत्या घरापासून चारशे मीटर दूर कधी एकट्याने गेला नव्हता तो किमान १७ ते १८ किलोमीटर प्रवास करून आला होता. तसेच आपण कुठे आलो आहोत आणि काय पराक्रम केला आहे या बद्दल अजूनही अनभिज्ञ होता.

आपल्या मुलाबाबत असे घडण्याचा विचार जरी केला तरी अंगावर भितीने शहारा येईल. पण तेव्हा याची जराही कल्पना नसलेल्या माझ्या काकी आपल्या घरात निवांत झोपल्या होत्या, किंवा उठून आपल्या कामाला लागल्या होत्या. कारण त्यांच्या मते घरासमोरच गार्डनमध्ये खेळत असलेला आपला मुलगा अंधार पडला, भूक लागली, खेळून दमला की स्वताहून परत येणार होता. पण त्यांच्या मुलाकडे त्यावेळी भूक लागल्यास ना पैसे होते, ना तहान लागल्यास पाणी होते. अंधार पडला तरी पुन्हा परत यायची खात्री नव्हती कारण परतीचा नेमका रस्ता त्याला ठाउक नव्हता.

चित्रपटात छान असते. जर चांगले घडलेले दाखवायचे असेल तर ऐनवेळी कोणीतरी मसीहा हिरो बनून पडद्यावर अवतरतो. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र असे होणे कठीणच असते.

पण त्या दिवशी ते झाले. एखादी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहावी तसे खरेच एकजण देवासारखा तिथे प्रकट झाला. त्यांच्याच टागोर नगरमध्ये शेजारच्या एका बिल्डिंगमध्ये राहणारा आणि याला चेहऱ्याने ओळखणारा एकजण तिथे दादरला उपस्थित होता.
त्याने माझ्या भावाला पाहिले. चौकशी केली. काय झाले हे कळले तेव्हा डोक्याला हात लावला आणि त्याला सायकलसह ट्रेनमध्ये टाकून अंधार पडायच्या आत घरी सुखरूप परत आणला Happy

------------------

परवा एका व्हॉटसअप मित्रांच्या ग्रूपवर हा किस्सा लिहीला. इतका डिटेलमध्ये नाही, तर विषय निघाला म्हणून फक्त चार ओळीत लिहीला. पण काही जणांना तो खोटा वाटला. कारण साध्यासुध्या माणसांच्या आयुष्यात घडलेला हा किस्सा होता. कदाचित यावर श्रद्धेचा मुलामा चढवला असता आणि अमुक तमुक कृपेने भाऊ घरी परतला असे म्हटले असते तर कदाचित चार लोकांनी हात जोडले असते. आणि ज्यांना पटले नसते त्यांनीही इतरांच्या श्रद्धा दुखावतील या भीतीने खिल्ली उडवली नसती.

याउपर एक मानवी स्वभाव सुद्धा असतो. ट्रेनमध्ये अनोळखी लोकांकडून ऐकलेल्या गोष्टीवर एकवेळ विश्वास ठेवला जातो. पण तेच ओळखीच्या लोकांकडून असा किस्सा ऐकला की मन चटकन विश्वास ठेवायला तयार होत नाही. जे आपल्या आयुष्यात घडले नाही ते याच्या आयुष्यात कसे काय घडले असा विचार डोक्यात येतो. त्यात हा किस्सा होताही खरेच थोडा अविश्वसनीय. म्हणून मी अविश्वास दाखवणाऱ्या कोणाचे बोलणे मनावर घेतले नाही. पण त्यावरून प्रेरणा घेऊन हा धागा काढायचे ठरवले.

तसे हा किस्सा माझ्या स्वताच्या आयुष्यात घडलेला नाही तर माझ्या भावाच्या आयुष्यात घडला आहे. माझे स्वतःचे आयुष्य फार सरल आणि सपक आहे. तीन लग्ने झाली हा अपवाद वगळता विशेष जगावेगळे घडल्याचे चटकन काही आठवत नाही. पण इथे कित्येक मायबोलीकरांच्या स्वत:च्या आयुष्यात किंवा ओळखीच्या लोकांत असे काही ना काही घडले असेल ज्यावर चटकन कोणाचा विश्वास बसू नये. म्हणून विचार केला की अश्या घटनांचा एक धागा काढुया. आपल्या आयुष्यातील अश्या घटना इथे प्रामाणिकपणे लिहूया. आणि एकमेकांवर विश्वासाने विश्वास ठेवूया Happy

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृणाली डेंजर..
मुलांच्याबाबत निष्काळजीपणा दाखवल्याने, किंवा अमुकतमुक होऊ शकते असा विचार न केल्याने होणारे अपघात, काय करावे आणि काय करू नये या अनुभवांचा, सल्ल्यांचा खरे तर वेगळा धागा हवा. हवे तर मीच काढतो. नोट करून ठेवतो.

तिन्ही लग्ने एकीशीच नाही ना झाली.
दोन एकिशी झाली पण सलग नाही.
म्हणजे तिसरे लग्न मी माझ्या पहिल्याच बायकोशी केले असे म्हणू शकतो. पण लग्न तीनच झाली.

बायकोला बिचारीला हे सुख नव्हते. तिला दोन्ही लग्ने एकाच माणसाशी करावी लागली. ती सुद्धा माझ्यासारख्या
>>>

कमाल लॉजिक.

महिला नेहमी सोशिक आणि बिचाऱ्या असतात, त्यासाठी काही केले पाहिजे.

लहान मुलांचं काही सांगता येत नाही ... ती काहीही करू शकतात ..

मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण दादर, जिथे लोकं येतात आणि तिथल्या मार्केटच्या गर्दीत हरवून जातात. जिथे रेल्वे स्टेशनला गेले तर कुठला ब्रिज कुठल्या प्लॅटफॉर्मला जातो हे पहिले वर्षभर तरी कळत नाही >> अगदी सहमत ..
मला किती वेळा गेलं तरी गोंधळायला होते ..
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा जो मोठा ब्रिज आहे त्या वरच्या गर्दीतून धावताना समजते की मुंबईला धावणारं शहर का म्हणतात ते ... !
मला तर वाटते , ती धावणारी माणसं त्या ब्रिज वर शाहरूख खान आला तरी त्याला पाहायला सुद्धा थांबणार नाहीत ..

मुंबई म्हटलं की मला मराठी माणूस ( आता जवळपास मुंबई बाहेर फेकला गेलायं तरीही ) आणि शिवसेना डोळ्यासमोर येते ..( मी कुठल्याही पक्षाची समर्थक नाही ..)

रुपाली पोस्ट आवडली आणि पटली.. अगदी हे सुद्धा पटले, <<<ती धावणारी माणसं त्या ब्रिज वर शाहरूख खान आला तरी त्याला पाहायला सुद्धा थांबणार नाहीत>>> संध्याकाळी हा टीव्हीवर दिसेलच म्हणतील Happy
..

बाकी मराठी माणूस सोबत आता शिवसेना सुद्धा बाहेर फेकली गेलीय. पण माझ्याही डोळ्यासमोर तीच येते कारण आईवडीलांच्या दोन्ही घरामध्ये सारे कट्टर सेना समर्थक होते.
बाकी मी स्वतः सुद्धा त्या किंवा कोणत्याही एका पक्षाचा समर्थक नाही. घरचे मानत असलेला देव मानत नाही तर त्यांचा राजकीय पक्ष कश्याला मानतोय Happy

या किस्याचे सुद्धा डोंगर जाळायच्या किश्श्यासारखे झाले.
ज्यांनी मला लिहायला उद्युक्त केले तेच इथे फिरकले नाहीत Happy

यात थाप मारावे असे काही नाहीये ओ..
आणि मारून काही फायदा सुद्धा नाही माझा..
इतका तपशीलवार किस्सा कल्पना शक्तीवर रंगवावा इतकी प्रतिभा सुद्धा नाहीये माझ्यात. लोकं मला उगाच ओवरएस्टीमेट करतात.

असो,
कोणीतरी मला व्हॉटसअपवर म्हटलेले, मायबोलीवर तू लिही, मी तिथे येतो, ते आले नाहीत. त्यांना आवाज देतोय इतकेच. आमच्या दोघांतील पर्सनल आहे हे Happy

आणि हो,
अविश्वास दाखवणारे कुठेही दाखवू शकतात.
तरी मी शक्य असेल तितके पुरावे प्रामाणिकपणे देतो.

मागे या धाग्यावरील व्हिडिओ वर सुद्धा असाच अविश्वास दाखवला गेला होता.
मी पुरावा म्हणून चॅनेलची लिंकच शोधून दिली.
https://www.maayboli.com/node/84550

पण त्यानंतर अविश्वास दाखवणारे पुन्हा तिथे फिरकलेच नाहीत.
आता आमचा विश्वास बसला, तसदीबद्दल क्षमस्व वगैरे काहीतरी प्रतिसाद द्यायला हरकत नव्हती.

असो, त्यामुळे मी सुद्धा आता कोणाचा विश्वास अविश्वास मनावर घेत बसत नाही Happy

अशीच स्लीपिंग स्कूटर रमासाठी घेतली आहे.
पण अजून तिची मजल सोसायटी च्या बाहेर गेली नाही
(मी जाऊ देणार ही नाही Lol )
पण सावध राहीन हा किस्सा वाचल्यामुळे.

रानभूली यांच्या धाग्यावरील व्हिडिओ इथे शेअर करायचा मोह आवरत नाही

कारण ही घटना देखील (सत्य असल्यास!) अदभुत आणि अविश्वसनीय अशीच आहे.
पण मानवीय नाही तर एका सिंहीणीच्या प्रवासाची आहे.

धाग्यातील मूळ लेखाशी मिळती जुळती वाटल्याने इथे शेअर करतोय.. जरूर बघा.. ऐका.. वाचा.. आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा Happy

https://www.youtube.com/watch?v=7Y3cVQp5Qxs

९० साली सायन तसे गजब्जलेले असायचे. विक्रोळी टागोरनगर ते घाटकोपर काही दूर नाही पण तरीही मुलाच्या वयानुसार व सवयीवर अवलंबून आहे इतके अंतर पार करणे.
काय वय होते भावाचे?
आम्ही आमच्या एका नात्यातल्या काकांकडे आलो की आरसीफ ते चेंबूर स्टेशन एका पेप्सीकोला दुकानात जाण्यासाठी ह्याच स्कूटीवरून करायचो. रस्ते दुपारचे सुनसानच असायचे त्यावेळी. ९० च्या बराच आधीचा काळ होता.
मी सुद्धा दादर ते सायन चालत आले आहे एकदा. तुफान पावसाने पाणी भरून बसेस बंद होत्या. २-३ तासच लागलेले आठवतय. साल बहुधा ८० च्या आसपास असेल.

या धाग्याखालचे प्रतिसाद Gender demographically न्याहाळले असता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत 'लाडक्या बहिणीना मासिक २१०० रुपये मिळणार' हा जाहीरनाम्यातील वायदा इतका अपील होऊन का यशस्वी झाला याचा काहीसा थांग लागतो.

bike_fun_0.jpg
ही अशी सायकल माझ्याकडे देखील होती.  ती आताच्या सायकलींच्या तुलनेत (जी चित्रात दाखवली आहे ) वजनाने अधिक व पळायला कमी वेगवान अशी असायची.

highway.JPG
आत्ताचा इस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजेच २०१३ पूर्वीचा डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड aka सायन - पनवेल रोड. त्यावेळी विक्रोळी ते दादर हे अंतर तब्ब्ल १८-१९ किमी होते.

मी स्वतः घाटकोपर मध्ये सुरवातीची २३ वर्षे राहिलो आहे, कन्नमवार मध्ये आमच्या गावातले एक काका राहत असत, जरी त्यावेळी घाटकोपर ते कन्नमवार ( विक्रोळी ) हा रोड तुलनेत चांगला असला तरी घाटकोपर ते सायन ( रमाबाई नगर - छेडानगर - मानखुर्द फाटा - अमरमहाल या ठिकाणी सर्वत्र रस्ताच्या कडेला घाण व माती असायची - less plain road ) इथपर्यंतच्या रस्त्याची अवस्था ( रस्त्या कडेला) तितकीशी चांगली नव्हती. अमर महाल ते सायन या रस्त्यांच्या कडेच्या भागाची अवस्था देखील विक्रोळी - घाटकोपर व सायन - दादर या पॅच च्या तुलनेत खडबडीतच होती .  (अशा रस्त्यावर २ सलग तासांसाठी १० वर्षाच्या मुलाचा कमाल वेग हा ५-८ किमी प्रती तास असू शकतो असे गूगल सांगते, त्याउपर तीन साडेतीन तास सलग पाय मारून सायकल ( आताची तुलनेने सोपी अशी किक स्कूटर) चालवणे हे ऍथलीट असलेल्या प्रौढ पुरुषाला देखील कठीण असे काम आहे हे ही तो सांगतो. त्यामानाने लहान मुले शाररीक क्षमतेच्या अभावामुळे फारच लवकर थकतात. )
bile ride02.JPG

अशा रस्त्यावर एक ९-१० वर्षांचा मुलगा मे महिन्याच्या भर दुपारी या वर दाखवलेल्या सायकल वर ताशी ५ -६ किमीचा सरासरी वेग पकडून तीन साडेतीन तास सलग पाय मारून १८-१९ किमी सायकल चालवतो हे नुसतेच अविश्वसनीय नाही तर तद्दन फेक आहे. आणखी एक मी स्वानुभवावरून सांगू शकतो मे महिन्याच्या भर दुपारी धुळीच्या मैदानात २-३ तास खेळताना सर्वोच्च रग असणाऱ्या वयाच्या १७-१८ व्या वर्षी देखील जीवाची जी काहिली होते ती प्रत्यक्ष अनुभवल्या शिवाय फक्त कागदावर वेगाची १०+१० = २० अशी सरळ सोपी बेरीज करून नाही समजायची, अशा दुपारी कोणत्याही परिस्थितीत हवा गार लागत नाही( अपवाद दाट झाडे असलेले ठिकाण ) , आणि उन्हाची धग ही नेहमीच धुळीच्या मैदानापेक्षा डांबरी रोड वर जास्त जाणवते.

सायकल वर ताशी ५ -६ किमीचा सरासरी वेग पकडून
>>>>>

वेग फार म्हणजे फारच कमी पकडला आहे.
माझा मॉर्निंग वॉकला चालायचा वेगच जवळपास ताशी पाच किलोमीटर आहे.
तुमचा काय आहे एकदा चेक करून सांगता का?

त्या सायकलचा वेग माझ्या चालण्या इतकाच असतो हे हास्यास्पद आहे. तो सहज तिप्पट असावा. आई ग नाहीतर किती बोरिंग राईड होईल ती Happy

तुमचा काय आहे एकदा चेक करून सांगता का?>>> माझा २० मिनीटाला वॉकिंग ट्रॅकवर ३.७ किमी आणि ताशी सरासरी ८ किमी जातो....रस्त्यावर सरासरी ७-७.५ किमी पण हा सरासरी चालण्याच्या वेगापेक्षा खुप अधिक आहे...आपण जेव्हा १० वर्षांच्या मुलाबद्दल बोलत असतो तेव्हा त्याची कमाल उंची, शक्ती आणि, स्टॅमीना आणि परिस्थिती यांचा विचार करणे भाग पडते, कोणत्या परिस्थितीत किती शाररीक कस ते किती वेळ दाखवू शकतात याला मर्यादा असतात.

त्या सायकलचा वेग माझ्या चालण्या इतकाच असतो हे हास्यास्पद आहे.>>>गुगल ने जो वेग सांगीतला आहे तो नवीन आधुनिक आवृत्तीतल्या सायकल्सचा पुर्णपणे स्मूद नसलेल्या रस्त्यावरचा आहे....त्या जुन्या सायकल्स चा वेग तर त्याहूनही कमी होता, परंतू फॉर आरग्यूमेंट सेक त्या दिलेल्या वेगाचा विचार होऊ शकतो. रेडीट वर एका युजर ने लिहीलेल्या प्रतिसादा नुसार, बाहेरील देशांत जिथे रस्ते गूळगूळीत असतात तिथे त्याने सध्याच्या प्रचलित आणि आधुनिक आवृत्तीतील सायकल वरुन ४.५ तासात ४० कीमी अंतर कापले होते पण तो प्रौढ माणूस होता.... यावरुन आणि स्वतः च्या अनुभवावरुन एक १० वर्षांचा मुलगा एवढ्या उन्हात, त्या प्रकारच्या रस्त्यावर, आणि तितक्या साधारण क्षमतेच्या सायकलवर कमाल किती अंतर कापू शकतो याचा अदमास बांधता येतो. त्या सायकल या लहान मुलांना खेळण्यासाठी होत्या, आता लोक त्यांचे जे अनुभव शेअर करता आहेत त्या सायकल्स त्या तुलनेत खूप अधिक कार्यक्षम, वेगवान आणि वापरायला सोप्या आणि वाहतुकी साठी वापरण्यायोग्य आहेत.. त्या जुन्या सायकल्सचा वेग किती असायचा आणि एकदा ढकलून ती किती अंतर कापयची हे ज्याने ती सायकल चालवली आहे त्याला नक्कीच माहीती असेल. खरबरीत रस्त्यावर ती सायकल चालवणे हा फार मेहनतीचा प्रकार होता.

सायकलच्या स्पीड चालण्याच्या वेगाईतका कसा असेल?
यासाठी गूगल करायची काय गरज आहे?

म्हणजे मी मॉर्निंग वॉक करत आहे आणि सोबत माझी मुलगी तशीच सायकल चालवत आहे आणि आम्हा दोघांचा स्पीड सेम आहे??

मला तर हेच अदभुत आणि अविश्वसनीय वाटत आहे Happy

माफ करा, पण
तुमच्या डोळ्यासमोर वेगळीच वस्तू असावी असे वाटत आहे. म्हणजे चाक असलेले चहाचे टेबल, किंवा व्हील चेअर वगैरे..

आमच्याकडे होती मागे अशी सायकल ती सापडली पाहिजे. मग माझ्या सात वर्षाच्या मुलाला चालवायला देऊन दूध का दूध पाणी का पाणी करता येईल. आणि आपण दोघे एकाच वस्तू बद्दल बोलत आहोत का हे सुद्धा क्लिअर होईल.

हा धागा आधी पण वाचला होता.
प्रत्येकाच्या घरात असे काही किस्से असतात. या धाग्यात सख्खा भाऊ कि चुलत ते कळत नाही. पण ते असू द्या.
आमचं पण कुटुंब मोठं आहे. वेगवेगळे राहत असलो तरी काकाच्या घरातले काही किस्से, मामाकडचे काही किस्से असतात.
हे कुटुंबात ठीक असतात. त्याचा सोशल मीडीयावर उल्लेख झाला कि हे असं होतं.
आपण कधीच तपशिलात जात नाही. कधी कधी काही काही डिटेल्स माहीत नसताना सोमिवर टाकले कि मग ते अंगाशी येतात.

हा किस्सा खरा असेल तर एकूण अंतर आणि किती वेळ लागला हे माहिती नसावं. रंगवून सांगण्याच्या नादात भरीचं टायमिंग घातलं आणि ते अंगाशी आलं असं झालं असेल. हा अंदाज. किती बरोबर माहिती नाही.

हा किस्सा खरा असेल तर एकूण अंतर आणि किती वेळ लागला हे माहिती नसावं.
>>>>

एकूण अंतर विक्रोळी ते दादर
किती वेळ लागला हे माहित नाही..

काही काही डिटेल्स माहीत नसताना सोमिवर टाकले कि मग ते अंगाशी येतात.
>>>>>

सोशल मीडिया ही अशी एक जागा आहे, जिथे तुम्ही सूर्य पूर्वेला उगवला म्हटले तरी चार लोक हे खोटे आहे आज पश्चिमेला उगवला म्हणतील.. त्यामुळे सगळ्यांचेच मनावर घ्यायचे नसते हे ज्याला कळते तोच इथे टिकतो Happy

@ फार्स,

Youtube वर काही व्हिडिओ शोधले..
पाच सहा वर्षाच्या मुलांसाठी ज्या किक स्कूटर दिसल्या त्या होत्या तर चकचकीत पण अगदीच खेळण्यातल्या वाटल्या. चिंचोळ्या आणि वजन सुद्धा जास्त घेणार नाहीत अश्या वाटल्या.

आमच्या काळी म्हणजे 90 च्या दशकात ज्या होत्या त्यावर आम्ही पुढे आणखी एकाला बसवून डबल सीट सुद्धा चालवायचो इतक्या त्या मजबूत होत्या. आणि डबल सीट चालवताना सुद्धा त्यांचा स्पीड चालण्याच्या वेगापेक्षा जास्त असायचा.

म्हणून मग किक स्कूटर्स फॉर एडल्ट शोधल्या.. एक खालील व्हिडिओ मिळाला. ब्रँड मेक मॉडेल वगैरे बघू नका, फक्त स्पीडचा अंदाज येईल इतके बघा.

https://youtu.be/Y-0ua-i8WVs?si=u4VpyrlH2r6uc_cH

बाकी आम्ही तर दरवेळी स्पर्धा लागलीय इतके सुसाट चालवायचो.. नाहीतर इज्जत मिळायची नाही. झपझप दोन-चार पाय मारले की दहा वीस मीटर तर पाय न मारता लंगडी पोझिशन वर पुढे जायचो म्हणजे विचार करा Happy

<< मुलाला चालवायला देऊन दूध का दूध पाणी का पाणी करता येईल >>

सर,
ते लहान मुलाचे जाऊ द्या, ९० चे दशक आणि तेव्हाचे खडबडीत रस्ते पण जाऊ द्या, डबल सीट पण जाऊ द्या. तुम्ही या वयात पण, सध्याच्या गुळगुळीत रस्त्यावरून पण, मे महिन्यात भर दुपारी तश्या सायकलवर पाय मारत हे अंतर ४-५ तासाच्या आत जाऊ शकणार नाही, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.

मी मे महिन्यात काय डिसेंबर महिन्यात सुद्धा दुपारी चार पाच तास काय चार पावले उन्हात चालत नाही.. मला नाही आवडत ऊन Happy

सध्या गुळगुळीत रस्ते फक्त सरकारच्या वचननाम्यात असतात..
सध्याचे उन्ह तेव्हाच्या उना पेक्षा बेकार कडक असते. तेव्हा ग्लोबल वॉर्मिंग ची स्पेलिंग सुद्धा कोणाला माहित नसेल..
सध्याच्या मुलांमध्ये देखील तेव्हाच्या मुलांइतका मैदानी खेळांबाबत दम राहिला नाही असे वाटते

तुमच्या डोळ्यासमोर वेगळीच वस्तू असावी असे वाटत आहे. म्हणजे चाक असलेले चहाचे टेबल, किंवा व्हील चेअर वगैरे..>>> Biggrin
मी त्या सायकलचे चित्र डकवलेल आहे, उगाच सोईस्कर रित्या दुर्लक्ष करू नका. ( Submitted by फार्स विथ द डिफरंस on 2 April, 2025 - 13:28 पोस्टीतलं खालच्या रकान्यातलं कयसाले चे चित्र दिसत नाही आहे का? खाली पुन्हा डकवतो) कदचीत थोडीशी वेगळी असू शकेल, खालचा पाय ठेवायचा भाग थोडा रुंद आणि पत्र्याचा असायचा. बहुतेक करून चौकोनी आकाराचा फुटबोर्ड असलेल्या पूर्णपणे पत्र्याच्या आणि लोखंडी सळयानी बनलेल्या अशा आताच्या किक स्कुटर्स च्या तुलनेत वजनाने खूपच अधिक अशा त्या असायच्या.

trottinette-metal-rouge-vintage.jpg

किक स्कूटर्स फॉर एडल्ट शोधल्या.. एक खालील व्हिडिओ मिळाला. ब्रँड मेक मॉडेल वगैरे बघू नका, फक्त स्पीडचा अंदाज येईल इतके बघा.>>> आधीच लिहिलेल की आताच्या किक स्कूटर्स आणि त्या लहान मुलांच्या खेळायच्या सायकल्सच्या वेगाची, चालवण्याच्या सुलभतेची आणि रोडवर एकूणच वाहतुकीसाठी असणाऱ्या उपयुक्ततेतेची तुलनाच तुम्ही करू शकत नाही इतक्या त्या भिन्न क्षमतेच्या होत्या .....आताच्या किक स्कुटर्स अगदी तुम्ही जी यु ट्यूब लिंक दिली आहे त्यात दिसत असणाऱ्या सुद्धा वजनाला हलक्या आणि अधिक वेगासाठी दोन चाके (ती सुद्धा लहान ) असलेल्या बनवल्या जातात. तुम्ही तुमच्या मनात एक पूर्णपणे असंबद्ध तुलना करत आहात, किंवा वाचकांना कल्पना करायला एक पूर्णपणे विजोड दाखला देऊन त्यावर आपल्या अद्भुत आणि अविश्वसनीय अशा कथेचा डोलारा उभा करायचा प्रयत्न करत आहात.

सध्याचे उन्ह तेव्हाच्या उना पेक्षा बेकार कडक असते. तेव्हा ग्लोबल वॉर्मिंग ची स्पेलिंग सुद्धा कोणाला माहित नसेल.>>>> केविलवाणा असला तरी प्रयत्नाला मनापासून दाद. Rofl

फार्स, प्रयत्न तर तुम्ही करत आहात असे वाटत आहे हे खोटे ठरवण्याचा...

कारण प्रामाणिकपणे सांगतो चालण्याचा वेग असलेली सायकल कोणीतरी दहा-बारा वर्षाचा मुलगा चालवेल का हा प्रश्न तुम्हीच स्वतःला प्रामाणिकपणे विचारा Happy

Pages