सांत्वन

Submitted by कविन on 30 September, 2024 - 05:17

कठीण असतं सांत्वन करणं
आणि त्याहूनही कठीण असतं,
सांत्वन स्विकारणं

दु:खाचा तळ काठावरुन दिसत नाही
सांत्वन असलं सच्चं, तरी तेही तळ गाठत नाही
आणि दु:खाचा डोह शोषता येईल,
अशी जादू मलाही येत नाही

मी फक्त मिठी मारेन तुला
काठावर बसून राहीन तुझ्या बाजूला
दु:खाच्या डोहाची खोली तुला घाबरवेल
तेव्हा मी मूक सोबत करेन
पण अजिबात म्हणणार नाही
I can feel your pain

कारण कितीही सहवेदना म्हंटले
तरी त्या दु:खाचा प्रत्येक पापुद्रा
फक्त तुलाच समजणार
काठावरुन मला कितीसा उमजणार?

म्हणून सखे, मी तुझं सांत्वन करणारच नाही
आज नाही, उद्या नाही आणि कधीही नाही
कारण कठीण असतं सांत्वन करणं
आणि त्याहूनही कठीण असतं,
सांत्वन स्विकारणं

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशयाशी सहमत!

सांत्वन या कृतीचा आवश्यक तो पापुद्रा व्यवस्थित उलगडला आहेत

तरी त्या दु:खाचा प्रत्येक पापुद्रा
फक्त तुलाच समजणार
काठावरुन मला कितीसा उमजणार?
किती गहन अर्थ आहे. आणि वास्तव आहे. आपण कितीही सांत्वन केल तरी आपण कोणच दु:ख कमी करु शकत नाही. खुप छान कविता

This is so me.. :'(

This is so me.. :'(

किती छान लिहिलं आहेस कवे.
आत्ताच एका जवळच्या व्यक्तीचे वडील गेले. तू लिहिलं आहेस तेच अनुभवते आहे. म्हणजे आय एम देअर फॉर हर बट आय एम नॉट देअर असं आहे.

परफेक्ट !
सर्व प्रतिसादांना +७८६

<< पण अजिबात म्हणणार नाही
I can feel your pain. >>

Well said. ज्याचे त्याचे दुःख त्या व्यक्तीलाच भोगायचे असते.

ये दुःख नाम की बिमारी का इलाज किसी डॉक्टर के पास भी नही। इसका इलाज खुदको धुंडना पडता है, दुःख को भुलना पडता है।