जरा तुझ्याशी भांडायाचे आहे पण अन् नाही पण
जरा स्वत:शी बोलायाचे आहे पण अन् नाही पण
कुणी ऐकतो मख्खपणे अन् कुणी चघळतो अफवाही
मनातले सल सांगायाचे आहे पण अन् नाही पण
किती ऐकले पोक्त इशारे, टोले, सल्ले प्रेमाचे
फक्त स्वत:चे ऐकायाचे आहे पण अन् नाही पण
करायचे ते केले नाही दिवसा स्वप्ने बहुरंगी
मारुन-मुटकुन सजवायाचे आहे पण अन् नाही पण
जादूच्या ह्या मंचापुढती तर्काचे हे सोंग फुके
जरा-जरासे लपवायाचे आहे पण अन् नाही पण
भाळावरच्या रेषांबद्दल धन्यवाद अन् गार्हाणे
आपण अपुले रेखायाचे आहे पण अन् नाही पण
- मंदार.
[ बेफिकीरजींच्या सूचनां नंतर जे बदल केले ते वर आहेत. आता प्रत्येक ओळीत ३० मात्रा आहेत. शिवाय अलामत काही ठिकाणी चुकली होती त्याची दुरुस्ती केली आहे. मूळ जे लिहिलं होतं ते खाली तसंच ठेवत आहे.
धन्यवाद, बेफिकीरजी! ]
जरा तुझ्याशी भांडायाचे आहे पण नि नाही पण
जरा स्वत:शी जुळवायाचे आहे पण नि नाही पण
कुणी ऐकतो मख्खपणे अन् कुणी चघळतो नुस्त्या अफवा
मनातले सल सांगायाचे आहे पण नि नाही पण
किती ऐकले पोक्त इशारे, उगाच टोले, प्रेमळ सल्ले
फक्त स्वत:चे ऐकायाचे आहे पण नि नाही पण
करायचे ते केले नाही दिवसा स्वप्ने नुसता धुरळा
मारुन-मुटकुन जगावयाचे आहे पण नि नाही पण
जादूच्या ह्या मंचापुढती तर्काचे हे सोंग कशाला
जरा-जरासे फसावयाचे आहे पण नि नाही पण
भाळावरच्या रेषांबद्दल गार्हाणे अन् धन्यवादही
आपण अपुले लिहावयाचे आहे पण नि नाही पण
- मंदार.
वृत्त, मात्रा, अलामत वगैरे
वृत्त, मात्रा, अलामत वगैरे गोष्टी कृपया बघून घ्या. खयाल छान आहेत.
शेवटचा शेर आवडला.
शेवटचा शेर आवडला.
>> वृत्त, मात्रा, अलामत वगैरे
>> वृत्त, मात्रा, अलामत वगैरे गोष्टी कृपया बघून घ्या. खयाल छान आहेत.
धन्यवाद, बेफिकीरजी. तुमच्या सूचनांनुसार बदल करण्याचा प्रयत्न केलाय. आता ठीक वाटतेय का?
>> शेवटचा शेर आवडला.
धन्यवाद, सामो!
छान गझल. बेफी यांची सूचना
छान गझल. बेफी यांची सूचना अमलात आणायला बरीच मेहनत घेतली आहे, अर्थाला कुठेही धक्का लागलेला नाही.
<<<<दिवसा स्वप्ने नुसता धुरळा >> दिवसा स्वप्ने बहुरंगी >>>> हा बदल विशेष आवडला.
एकच ओळ - त्यात मात्रा कमी वाटते आहे. मी छोटासा बदल सुचवला तर चालेल का?
कुणी ऐकतो मख्खपणे, कुणी चघळतो अफवाही >> कुणी ऐकतो मख्खपणे अन् कुणी चघळतो अफवाही
अरे हो! ते अन् आधी होतं ते
अरे हो! ते अन् आधी होतं ते उगाच काढलं.
धन्यवाद, हरचंदजी!
बे फी, इस लाईक कोचेस डोन्ट
बे फी, इस लाईक कोचेस डोन्ट प्ले
त्यांच्या गझल अती सामान्य असल्या तरी सूचना मस्त करतात
हि गझल पण आवडली गद्रे साहेब
उत्तम गझल आणि उत्तम रदिफेची
उत्तम गझल आणि उत्तम रदिफेची निवड! (गझल संमेलनात शेरांच्या एकूण आशयाइतकाच भाव अचानक रदिफच खाऊन जाण्याचे प्रसंग अतिशय दुर्मीळ, त्यात ही रदिफ बसते)
आता 'आहे पण नि नाही पण' मधल्या सगळ्या 'नि' चे 'नी' तरी करावेत किंवा 'अन' तरी!
उत्तम खयालांची गझल!
(माझे आभार मानण्याची गरज नाही, मी फक्त तंत्राबाबत विनम्रतापूर्वक काही सुचवले. आशय, खयाल, मांडणी, जमीन सगळे तुमचेच आहे)
धन्यवाद अमर!
धन्यवाद अमर!
धन्यवाद, बेफिकीरजी! असं कसं, तुमच्या सूचना योग्य होत्या आणि त्यामुळे व्याकरण सुधारता आलं. त्याबद्दल दिल-से आभार! तुमची त्या विषयांवरची पकड जोरदार आहे, आम्हाला त्याचा फायदाच होतो.
कौतुक वाचून सुखावलो! कुठे संधी मिळाली तर ही नक्की सादर करेन.
छान गझल !
छान गझल !