बाजार - एक संस्मरण

Submitted by दत्तात्रय साळुंके on 16 September, 2024 - 08:46

एखादी घनदाट भावना जेव्हा मनाची पकड घेते‌ तेव्हा शब्दांची फुलपाखरं मनपटलावर फेर धरतात आणि आपण त्यापैकी काही शब्दांना पकडून ती भावना कैद करू पाहतो. आपल्याला फक्त शब्दकल्लोळ ऐकू येतो. जोपर्यंत ही भावना शब्दांना गवसत नाही तो पर्यंत मन था-यावर नसतं. अशीच एक जूनी भावना मनात दाटून आलीय आणि तिला पकडायला शब्द धडपडताहेत. माझ्या मनचक्षूसमोर एक बाजार भरलाय…मी पाहिलेला आठवडी बाजार…
एक सुंदर गजल आज प्रकर्षाने आठवली….
ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी
लहानपणीचा श्रावण फक्त ऊन पावसाचा कुठं असतो. तो तर असंख्य रंजक गोष्टींचा खजीना असतो. त्यात आजीच्या गोष्टी असतात. गोष्टीत प-यांचा ठिय्या असतो. अजूनही बरंच काही असतं. तर आज मी अशाच मनात घर करून बसलेल्या गोष्टीच्या शब्दांचे मणी ओवणार आहे आणि एक स्मरणमाळ ओढणार आहे. अशा अनमोल माळा तुमच्याही मनात रुळत असतीलच.
बालपण सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात, शेतात, मळक्या वाटेत दुडूदुडू धावलं. त्याची किंमत मोठेपणी सव्याज चुकवतोय. शोधतोय हरवलेले निवांत मोकळे श्वास, निर्झराचा खळखळाट, पानांची सळसळ, भन्नाट वा-याची उनाड शीळ, पाखराचं मुक्तपण, रात्री अंगणात झोपताना पांघरलेली चमचम चांदण्यांची दुल‌ई. हरवलेले मायेचे हात.
तेव्हा बाजारात शेतमाल घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा सर्रास वापर व्हायचा. हलकं किंवा अगदीच कमी माळवं/धान्य असेल तर टोपली, पाटी शिर्षस्थ होऊन बाजारात जायची . तर कधी सायकलवर स्वार व्हायची. पाटीत शेण असो अथवा माळवं तिचा मान डोईवरच सर्वोच्च सिहांसनी . पण बैलगाडीचा बाजार वाटेवरचा प्रवास एखाद्या रुबाबदार हत्तीवर ठेवलेल्या अंबारीतून केल्यासारखा असायचा.
बैलगाडीच्या साटीत वैरणीच्या पेंढ्या भरलेल्या. त्यावर माळव्याच्या पाट्या/धान्याच्या गोण्या ठेवत. पाट्या तरटात लपेटून ठेवलेल्या असत. माळवं सुकू नये म्हणून तरटावर पाण्याचा शिडकावा देत.
सकाळी नऊ वाजेपर्यंत बाजारात पोहचायला हवं. त्यासाठी अगदी सकाळी लवकर रानात जायचं. जी लगबग सकाळी पानाफुलातून डोकावयला सुर्याची, अगदी तशीच बाजाराला जाणा-या माणसांची. दिवस उगावयाला रानात‌ जाऊन वांगी, गवार, शेवगा, चवळी, भेंडी, घेवडा, वाटाणा,दोडके, टोमॅटो, भोपळे,कार्ली असे वाण तोडून तागापासून बनलेल्या गोणत्यात अथवा बांबूने विनलेल्या पाटीत भरले जात. गाजर, भुईमूग, रताळी सारखे वाण आदल्या दिवशी शेतातून घरी येत. त्याकाळी ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या बांबूच्या वस्तू बनविण्याचे काम बुरुड/कैकाडी करत. त्यांची उपजीविका टोपल्या, पाटी, कणगी, कणगुली विणून चालायची.
फाटक्या तागाच्या गोणीला तरट म्हणत. गोण्या बाजारातून विकत घेतल्या जात. ग्रामीण संस्कृतीत गोणपाट हरहुन्नरी नट असायचं.
काही ठिकाणी याचं गोणंतं असंही बारसं होतं. गोणपाटाला मिळेल ती भूमिका समरसतेनं करायची एवढं पक्कं ठाऊक. धुळीत अंथरूण तर जेवणाच्या पंगतीत, रानात, शाळेत त्याचे बसकर व्हायचे. गोणपाटाचीच शाळेची दप्तरं, माळवं, धान्य भरायला गोणती. अंगाच्या तानून चिंधड्या उडेतो आतला ऐवज सुरक्षित जपते गोणंतं एखादा किल्ला लढवावा तसे. देशावर पावसापासून बचावासाठी केलेली खोळही गोणीची आणि चिखलाचे पाय पुसायलाही दारी गोणीच.
बाजाराच्या बैलगाडीत माळवं ठेवून उरलेल्या जागेत माणसं बसत. गाडीला बैल जुंपण्यापूर्वी चाकाची कुणी घट्ट असल्याची खात्री केली जायची. चाकाला नळ्यातलं वंगण लावलं जायचं. गाडीतून सामान पडू नये म्हणून कास-यानं बांधलं जायचं. एवढं सगळं झाल्यावर गाडी चालू लागायची. तशा बैलगाडीत बसलेल्या लोकांच्या गावगप्पा रंगत. त्यात गाडीवान ही सामील होत असे. गाडीवान मध्येच बैलांना हाकारायचा. नदी नाले ओलांडताना गाडीवान अधीक सावध व्हायचा. एवढ्या कच्च्या रस्त्यावर दगडधोंड्यातून गाडी डिच्च्याव, डिच्च्याव करत बाजार गाठायची. केवढं वैविध्य असायचं प्रवासात. पावसाळ्यात सगळी रानं हिरवीगार झालेली. शेतात पीकं डोलू लागत. मधेच डोईवर काळे मेघ, मधेच ऊन , मधेच पाऊस. ओल्या गाडीच्या चकारीतून मधेच पावसाच्या पाण्याचे ओहोळ वाहत. कधी कंबरभर स्थिर पाणी असायचं नदी नाल्यात पण बैल व्यवस्थित गाडी पैलतीरावर नेत. उन्हाळ्यात बैलगाडीत थोडंसं माळवं असायचं एक दोन पाट्या मग उरलेली जागा इतर माणसं भरायचे.
बाजार लहानांसाठी आणि काही चैनाड्यांसाठी मौजमजेचं ठिकाण असायचं. लहान पोरांना एखाद्या बाजाराला खूप कीरकीर करून जायला मिळवायचं. पण चैनाडे लोक शिताफीने काही तरी एखाददुसरं किरकोळ काम काढून बाजाराला जातं. काही चैनाडे केवळ विड्याची पानं, बिडीकाडी आणायला जात. नाना चेगंटा सारखे काही तंबाखूचा चुना (चूनखडे) आणायला जात. मैतराबरोबर बिनबोभाट फुकटचे खाणंपीणं व्हायचं. टुरिंग टॉकीजचा सिनेमा देखील मैतराच्याच खिशाला चुना लावूनच व्हायचा. कुणाला पाटीलभत्ता खायचे डोहाळे लागले म्हणून केरसुणी आणायचं काम निघायचं. तर बाब्याची रंभा बाजाराला निघाली म्हणून ना-याचं काम दोरखंडावाचून अडलेलं असायचं. हे झाले बाजारात जाणारे हौसे. तसेच काही चोरीच्या उद्देशाने येणारे गवशे असत. काही ठिकाणी बाजार ऐतवारी असायचा. रविवार म्हणजे ऐतवार. मला तर हा ऐतवार म्हणजे आयत्या मौजमजेचा आयता वारच वाटायचा. असा बाजार तिर्थक्षेत्री असेल तर एक पंथ दो काज असं स्वरुप असायचं. देवदर्शन आणि बाजारही.
पोरांना खेळणी, खाऊ, नवे कपडे हवे असतं. तसं मलाही रस्त्याला लागून असलेल्या हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेल्या जाड्या शेटच्या पुढ्यातल्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या भरणीतले बुंदी लाडू खुणावत. त्यामुळे बाजारात जाता क्षणी मी बाबाला घेऊन लाडू खायला जायचो. मिळेल त्या टेबलाला चिकटलेल्या वेताच्या खुर्चीवर बाबा अन् मी बसायचो. बाबानं एक लाडू माझ्यासाठी मागवयचा पण स्वतः फक्त चहा प्यायचा. नुकतीच अमूलची लाडवांची जाहिरात पाहिली. कॅप्शन होतं लहानपणीच्या असंख्य आठवणी एका घासात. हा लेख तोवर लिहून झाला होता. किती अचूक नस पकडलीय या जाहिरातीत. यावरून पटतं बाजारात प्रेझेंटेशन किती मॅटर करतं .
आठवडी बाजारात विक्रेते जागा मिळेल तिथं बसतात. दाटीवाटीने जिन्नस ठेवतात. तरीदेखील थोडीशी शिस्त असतेच. एका रांगेत भाजीपाला. एका रांगेत कपडे. एका रांगेत मिठाई, भेळ. एका रांगेत किराणा. एका रांगेत पादत्राणे. एका रांगेत दोरखंड, केरसुणी,शिंकी. एका रांगेत मडकी, गाडगी. एका रांगेत टोपली, सुपं,पाटी. एका रांगेत भोवरे,भिंग-या,लगोरी,फुगे अशी खेळणी.एका रांगेत विळे, खुरपी. एका रांगेत पाटे,वरवंटे वगैरे. अशा ग्राम्य जगण्याचा बारकाईने विचार झालेला असायचा. अगदी सुया, बिब्बे,करगुटे यांचीही वाण नसायची.
स्वच्छता सुस्तावलेली असते. त्यांचं कुठं प्रशिक्षण झालेलं असतं. मिळेल त्या जागेवर टोपली, घमेली, पाटी, गोणी घेऊन बसायचं अन् अधूनमधून ओरडायचे….दहा रुपये किलो वगैरे. बाजारात असलेले कट्टे सर्वांना कुठं उपलब्ध असतात. पण हे सगळं एक अद्भुत रंगाचं मिश्रण असतं. त्यात हलणारी, ओरडणारी माणसं, रंगबिरंगी वस्तू, रंगबिरंगी भाज्या, रंगबिरंगी फळं, रंगबिरंगी मिठाया, रंगबिरंगी कपडे असा एक भव्य कलरफुल रंगमंचच तो.
बाबानं माझ्यासाठी तारेवरुन थरथरत खाली उतरणारं माकड घेतलं तेव्हा त्याचा पैसे देतानाचा थरथरता हात पाहिलाय मी. मला सगळं कळत होतं पण वळत नव्हतं. मन माकडासाठी आसुसलं होतं. आपला बाबा खूप पैसेवाला आहे असं वाटायचं. माकडाच्या बदल्यात शिटी नको म्हणालो तेव्हा. शिटी स्वस्त म्हणून बाबाला परवडत असेल.
बाजारला जाणारे सगळेच कुटुंबासाठी थोडेच तिथं जात . चैनाड्यांना तमाशा, टुरिंग टॉकीतला सिनेमा, एखाद्या मटनाच्या खानावळीत मटन आणि दारू हवी असायची. अगदीच पैसे कमी असतील तर एखादा पाटील भत्ता आणि नवटाक मिळाली तरी देव पावला.
ज्याला बाजार समजला तो व्यवहारी जगात तरला असं समजायला हरकत नाही. ज्याला/जिला तो समजत नाही अशांना समजदार माणसं बाजार करण्यापासून रोखतात. या संदर्भात पु. ल प्रकर्षाने आठवतात. त्यांचे चितळे मास्तर गोदी गुळवणीच्या नव-याला सांगतात …
“माझी विद्यार्थिनी आहे हो! संसार चांगला करील. पण बाजारात मात्र खरेदीला पाठवू नका. बारा आणे डजनाचे सहा आंबे चौदा आणे देऊन घेऊन येईल.”
बाजार करणं विसराळू लोकांचही काम नाही. तुम्हाला राम गणेश गडक-यांचा प्रेम संन्यासातला विसरभोळा गोकूळ आठवतो का ? नसेल तर सांगतो. गोकुळला बायको शेरभर साखर आणि तोळाभर केशर दुकानातून आणायला सांगते. गोकुळ दुकानात जातो पण शेरभर केशर की तोळाभर केशर हेच आठवत नाही. बरीच लहाण मुलं दुकानात पळत जात असताना काय आणायचे, किती आणायचे हे मोठ्याने घोकत जातात तरी त्यांचा विसर भोळा गोकुळ कधी होतो हे त्यांचं त्यांनाही समजत नाही. एखादी कविता, लेख, कथा लिहिता नाही आली तरी बिघडत नाही पण वानसामानाची यादी बाजारी माणसाला करता यायला हवी. समजेल अशा सुवाच्य अक्षरात लिहिता आली नाही तरी वाणी आणि औषध दुकानदार ‌एका जातकुळीतील असायला हवेत. तशा ग्रामीण गरजा मोजक्या अन् क्वचित बदलतात त्यामुळे लिहायला न येणा-यांच्या डोक्यातही ही यादी पक्की असते. फक्त विसर भोळा गोकुळ होऊ नये म्हणून शिक्षितही यादीचा आधार घेतात. आठवडी बाजाराच्या यादीचा सराव झालेला ही लग्नाच्या याद्या करताना चारचौघांचा सल्ला घेतो.
एकंदरीत बाजार हे चतुर लोकांचे काम आहे हे चतुर वाचकांना सांगायला नको.
अशीच एका चतुर कोंबड्या विकायला आलेल्या ग्रामीण स्त्रीची भन्नाट कहानी सिद्धहस्त ग्रामीण कथा लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी “बाजार” या कथेत फार सुंदर रित्या चितारलीय. तिचा सारांश…
एका कोप-यात कोंबड्यांचा बाजार भरलेला आहे. या बाजारात एक स्त्री कोंबड्या विकते आहे. डालग्याच्या आत काही कोंबड्या व बाहेर पाय बांधून ठेवलेल्या दोन-तीन कोंबड्या आहेत. अशात ती बाई आडोशाला बसण्यासाठी लगबगीने बाजूला जाते आणि तिच्या बांधून ठेवलेल्या कोंबड्याजवळ एक सासुरवाशीन तिचं बोचकं पुढ्यात घेऊन बसते. थोड्याच वेळात ती अचानक ओरडू लागते. रडू लागते. माझ्या कुडीची सोण्याची फिरकी या कोंबडीनं गिळली. बया माझी सासू मला घरात घेणार नाही. आता काय करायचं. माझं कसं व्ह‌ईल रं देवा.
आजूबाजूला भरपूर बघ्यांचा घोळका जमा होतो.
ए बया काय झालं ?
ह्या पाय बांधलेल्या कोंबडीनं माझ्या सोन्याच्या कुडीची फिरकी गिळली.
बघ्यांना कोंबडीने फिरकी गिळली असेल असे वाटते‌. तेवढ्यात आडोशाला गेलेली कोंबड्या विकणारी बाई तिथे येते. दोघींमध्ये वाद होतो. सासुरवासीन फिरकी मागते आणि कोंबडी वाली तिला म्हणते घे शोधून कोंबडीच्या पोटातून. इतक्यात एक इराणी हॉटेल मालक तिथे येतो. त्याला काही कोंबड्या विकत घ्यायच्या असतात. त्याला जेव्हा कळते एका कोंबडीच्या पोटात सोन्याची फिरकी आहे तो सर्व कोंबड्या पन्नास रुपयांना विकत घेतो.
सोनेरी फिरकी कोंबड्यांवर मिळालेला बोनस समजतो. तो कोंबड्या घेऊन गेल्यावर कोंबड्या विकणारी आपले सामानसुमान आवरून तिच्या गावाला जायला निघते. तिच्या पाठोपाठ सासुरवासीण धावत जाते व ती ज्या एसटीत बसते तिच्याच बाजूच्या सीटवर बसते. एसटी सुटताच कोंबड्या विकणारी बाई त्या सासुरवासणीच्या हातात एक दहाची नोट ठेवून म्हणते बरं झालं बया श्रावणात कोंबड्या कोण विकत घेतंया. तू होती म्हून माझा समदा माल खपला. नाहीतर जाण्यायेण्याचं एसटीचे भाडं पण निघलं नसतं.
अहो बाजारात काही विकायला जायचे तर बोलता यायला हवे. म्हणतात ना बोलणाऱ्याच्या अंबाड्या विकतील पण न बोलणाराचे हिरेही विकले जाणार नाहीत. एकंदरीत बोलघेवड्या माणसाला बाजार चांगला जमत असावा.
आपण उगाच वैतागतो कधी कोणी बडबड करत गोंधळ घालत असेल तर. ये काय बाजार मांडलाय म्हणतो. बाजारावर हा अन्याय आहे. बाजारात विकणारे आणि विकत घेणारे दोघेही आपापल्या फायद्यासाठी बोलत असतात. एवढ्या गदारोळातही अगदी स्थितप्रज्ञतेने व्यवहार सांभाळतात. न सांगताही आपल्या सहज लक्षात यावं “ स्थिरावला समाधिस्थ स्थितप्रज्ञ कसा असे”.
त्यांची ही स्थितप्रज्ञता पाहून मनात धडकी भरते. एवढी साधी सोपी गोष्ट आपल्याला जमेल का म्हणून.
किती वेगवेगळे आवाज येत असतात. या सगळ्या आवाजाच्या भेळीतून आपल्याला हवं ते बरोबर ऐकणं केवढं कौशल्य आहे.
एखाद्या भिडस्त माणसाला आवर्जून सल्ला दिला जातो. भिड ही भिकेची बहीण आहे म्हणून. बाजार करायचा तर निर्भीड मनानं. तिथं द्या, माया, ओळख, पाळख आदी भावनांना थारा नाही. या गोष्टींना थारा दिला तर तुमचा तुकोबा होणार. तुमचे दिवाळे वाजणार. अहो कापड दुकानात तुम्हाला लग्नाचा बस्ता बांधायचाय हे कळल्यावर शेट ४-५ कप चहा मागवतात पण बिलातून वसुली होत असते. भाव फक्त तुमच्यासाठी कमी करतोय असे प्रत्येक ग्राहकाला म्हणायचे असते ग्राहकांचा ऊर भरून यावा म्हणून. त्याचवेळी ग्राहकही सगळं खरं मानत नाही आणि घासाघीस करायचं सोडत नाही.
पण ग्रामीण बाजाराचे स्वरूप याला काहिसं अपवाद असावं. तागडीने केलेले वजन सोनं तोलल्या सारखं नसतं तर अगदी झुकतं माप असतं.
ग्रामीण बाजार व्यवहारापलीकडे असतो. या बाजारात आलेली बहुसंख्य माणसं व्यवहार व्यापार म्हणून करत नाहीत तर गरज म्हणून करतात. त्यामुळे इथं मिळणा-या वस्तू कमी मोबदला देऊन मिळतात. यातील बरेच विक्रेते शेतकरी असतात आणि म्हणूनच नफा झाला की तोटा हेही त्यांना कळत नाही. शेतमाल पिकवताना तो खर्च तंतोतंत कुठे ठेवतो. खत, पाणी, बी बियाणे यांच्या किमतीही नोंदत नाहीत तर अहोरात्र केलेल्या मेहनतीचा मेहनताना कधीच विचारात घेतला जात नाही. किती बी उगवलं किती उगवलं नाही, किती रोगराईत गेलं, किती नासधूस झालं, कुठं असतो सगळा हिशोब. त्यामुळं जे मिळेल ते देवाघरचं देणं एवढंच माहीत असतं.
अन् गरज मानगुटीवर स्वार झाल्यावर तोटा होतोय हे दिसलं तरी नाईलाज असतो.
शेतकरी तेल, मीठ, गुळ, साखर,चहा, मसाले, कपडे घेण्यासाठी शेतमाल विकतात. यातूनच चार पैसे वाचले तर मुलांना गोडधोड खाऊ घालतात.
हा बाजार काहिसा गोड काहिसा आंबट असतो. कसाही वाट्याला आला तरी जगण्यासाठी आवश्यक म्हणून अपरिहार्य असतो. तो लहाणवयात शहरी मुलं व्यापार खेळतात अथवा स्नेहसंमेलनात लावलेल्या स्टॉल इतपत मनोरंजक कसा असेल. हा स्वप्नांचा सौदागर आपल्याला पावेल की रुष्ट होईल हे ही माहित नसतं. हो स्वप्नांचा सौदागरच. अगदी छोटी स्वप्न घेऊन येणारी माणसं इथं येतात . मला एक बुंदी लाडू खायला मिळणं म्हणजे स्वर्ग सुखच होतं तेव्हा. याच बाजारातून आणलेला निळा सदरा बैलांनं शिंग घालून बगलेत फाडला तेव्हा खूप रडलो होतो मी.
ग्रामीण भागात अजूनही सोयरेधायरे आसपासच्या गावातच असतात. रोजच्या कामाच्या धबडग्यात त्यांच्या गाठीभेटी होतीलच असे नाही. पण बरेचदा बाजारात नातेवाईक भेटतात. एकमेकांची खुशाली समजते. बरोबर चहापान होते. तासनतास सुखदुःखाच्या गप्पा होतात. लग्न, समारंभ, पुजा अर्चा आदींचं व्यक्तिशः आमंत्रणं होतं. नात्यांची नीरगाठ पक्की होते. एकमेकांना आधार दिला जातो. निरोप दिले जातात वस्तू दिल्या जातात.
बाजार ग्रामीण जीवनशैलीचे जसेच्या तसे दर्शन घडविणारा आरसाच म्हणायला हवा. या निमित्ताने ग्रामीण संस्कृती, सण, उत्सव याचेही बऱ्यापैकी दर्शन होते. ग्रामस्थांसाठी आठवडे बाजार म्हणजे गरजेच्या जवळ जवळ सगळ्या वस्तू रास्त भावात मिळण्याचे खात्रीशीर मोठे दुकान या दुकानात आजूबाजूच्या गावातले लोक अगदी छोट्या-मोठ्या गोष्टी घेण्यासाठी येतात त्यात धान्य, भाजीपाला , गुळ, साखर, तेल, मीठ, मिरची, हळद, मसाले, भांडीकुंडी, मिठाई , भेळ, फळं, फुलं, खेळणी, कपडेलत्ते, पायतानं,केरसुणी, दोरखंड सूप, उंदीर पकडायचा पिंजरा, पाळण्याची पुस्तके अशा वस्तू मिळतातच पण याव्यतिरिक्त अगदी कल्पने पलीकडील किरकोळ गोष्टी हमखास मिळत.
करमणूकीसाठी एखाद्या कोप-यात तमाशाचा तंबू, मौत का कुवा, जादूगार, सापवाला, डोंबारी पाल लावून असतं.
बाजार उठताच घरी जायची घाई एखाद्या शहरी नोकरदारासारखीच असते. तिकडं गावात बाजारच्या वाटेकडे लहान मुलं डोळे लावून बसतात. घरी बाजारचे गाठोडे सुटेतोवर धीर नसतो. मग एकदाचं गाठोडे सुटते. आत काय हे पहायचं कुतुहल जागतं. उघडल्यावर थोडा आनंद, थोडी निराशा असा संमिश्र भाव असतो. रुसवे फुगवे होतात.पुढच्या बाजाराचे अमिष दाखवलं जातं. म्हणूनच.....
बाजार रंगबिरंगी स्वप्नांचा. बाजार आशा,निराशेचा. बाजार देवाणघेवाणीचा. बाजार श्वासांना जिवंत ठेवणारा, गुदमरवणारा. बाजार जिद्दीचा, चिकाटीचा. बाजार कंजूसीचा,बुध्दीकौशल्याचा. बाजार रंगबिरंगी माणसांचा. बाजार माणसांचा, माणसांसाठीचा, माणसांनी भरवलेला. बाजार लहानथोरांना ओढ लावणारा.

दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे नाव पाहून लेख उघडला.
सुंदर, चित्रदर्शी लिहीले आहे. कोणताही बाजार पाहताना आता तुमची नजर उसनी घेणार. हा लेख आठवेल.

अतिशय सुंदर, वास्तववादी, चित्रदर्शी लेख...
गावाकडील अशाच जुन्या गोष्टी, अनुभव, इ. वाचायला आवडेलच...

ऋतुराज व झकासरावांचे अनुभव कथनही आवडलेच अगदी...

नितांत सुंदर आणि सच्चा लेख.

दत्तात्रय साळुंखे, ऋतुराज, झकासराव तुम्ही तर बाजार स्वतः दोन्ही बाजूंनी अनुभवला आहात. हे सर्वच अनुभव आणि किस्से वाचताना मजा आली. काही ठिकाणी वास्तव जाणवून वाईटही वाटलं.

लहानपणी सुटीत फिरायला गेल्यावर काही ठिकाणचा आठवडी बाजार बघितला आहे. दापोली, लोणावळा, भंडारदरा, महाबळेश्वर हे चटकन आठवले. आताही मुंबई, पुण्यात ठिकठिकाणी आठवडी बाजार भरतात त्यांना जमेल तेव्हा भेट देते. आता यांना farmers' market म्हणतात.

@बन्या...
खूप धन्यवाद
@ शर्वरी
>>>कोणताही बाजार पाहताना आता तुमची नजर उसनी घेणार. हा लेख आठवेल.>>> Thanks for compliment...
खूप धन्यवाद
@शशांकजी... खूप धन्यवाद
@मामी...
अनेकानेक धन्यवाद...तुम्ही लहानपणी पाहिलेले बाजार निसर्गाच्या कुशीतील आहेत.

Pages