
'खाओ सुये' हे एक बर्मिज पद्धतीचे नूडल सूप आहे. वन डिश मील/ 'एकपात्री प्रयोग' म्हणून त्यातली करी जास्त घातल्यास हलकेफुलके आणि नूडल्स जास्त घातल्यास पोटभरीचे होऊ शकते. संज्योत कीरची पाककृती अचानक फीडमधे आली आणि साक्षात्कार वाटून मीही करायला घेतली. त्यासाठी बर्माला तरफडत जावे एवढीही खास नाही. थाई रेड करी किंवा ग्रीन करी प्रमाणे नारळाचे दूध घालूनच केली जाते पण त्यामानाने अतिशय सोपी वाटली. त्यात संज्योतने दाखवलेले हे व्हर्जन भारतीय पद्धतीचे आहे. त्याने टोफु घाला असे म्हटले नाही पण 'वन डिश मील' मलाच प्रथिनांशिवाय अपूर्ण वाटत होती म्हणून मीच घातला आहे. पोषणमुल्यात सुद्धा तो पदार्थ थोडाफार परिपूर्ण असावा असा माझाच आग्रह होता. ह्यात चिकन घालूनही करता येते.
तो सतत सांगत होता की 'हे नसले तरी हरकत नाही- ते घाला' पण मला दुकानात जाऊन काही नवीन बघून , वेगवेगळ्या शेल्फमधे 'अजून काय- अजून काय' करत पैसे खर्च केल्याशिवाय मजाच येत नाही आणि मी फक्त मज्जेसाठीच भाग घेत होते. त्यात तळलेला कांदा घरात असूनही सापडला नाही. मी कांदा शोधण्यासाठी कितीतरी वेळ फतकल मारून खाली बसले होते. कोकोनट सुद्धा कुतूहलाने पँट्रीत माझ्या शेजारी खेटून वाकून बघू लागला, मग त्याच्या चार पाप्या घ्याव्याच लागल्या. घरात कांदा नाही असे 'डिक्लेअर' करून मनात नोंदवला, आता सापडेल जेव्हा मला गरज नाही तेव्हाच.
त्यामळे नुसते घटकच नाही तर वाढलेले सूप माबोवरील मुख्य चित्रात सुंदर दिसावे म्हणून नवीन सूप बोल सुद्धा आणला. 'तो बोल मंद हळवासा' बघण्याच्या नादात पाककृतीतला 'व्हेजटेबल स्टॉक' हा पर्यायी घटक मी विसरले. ते विसरलेले घरी आल्याशिवाय आठवले नाही , मग 'जाऊ द्या' म्हणून गप बसावे लागले. या एकपात्री प्रयोगाचे ४१$ खर्च झाले. त्यापैकी तीन डॉलरच्या नाचोज त्यातून वजा करा, सदतीस डॉलर मी फक्त तुमच्यासाठी खर्च केले आहेत. तुमची बर्माची ट्रिप वाचवल्याचे उपकार जन्मभर विसरू नका. मीही आठवण करून देत राहीन. /\
साहित्य-
एक कांदा, तीन चार पाकळी लसूण+ अजून तीनचार पाकळ्या, एक ईंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि काड्या, नारळाचे दूध एक कप, तिखट, हळद, हिरव्या मिरच्या, टोफू फर्म, तांदूळाचे नूडल्स छोटी चवड, तळलेले नूडल्स, तळलेला कांदा, कांद्याची हिरवी पात, धन्याजिऱ्याची पूड, ब्रॉकोली, मिक्स भाज्या (गाजर, फरसबी, मटार, मक्याचे दाणे), बेसन एक चमचा, मीठ, चिली ऑईल.
या चित्रात मी लसणाच्या फाका तळून घेतल्या, त्याच तेलात टोफू परतून घेतला. मी टोफू कमी प्रमाणात घेतला आहे.तळलेला कांदा मात्र सॅलडवर घालायला मिळतो त्या प्रकारातला आहे. हे सोबतचे घटक या सूपला खमंग आणि कुरकुरीत करतात त्यामुळे पर्यायी वाटले नाही.
कृती:
कृती अतिशय सोपी आहे.
१. प्रथम एक कांदा, लसूण , आलं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीची देठं थोडेसे पाणी घालून वाटून घेतले.
२. हे वाटण संज्योत एक चमचा तेलात म्हणून अर्धी वाटी घालतो तसे न करता चारपाच चमचे तेल घालून परतले.
३. याचा कच्चा वास उडून गेल्यावर यात तिखट, मीठ, हळद आणि धन्याजिऱ्याची पूड टाकून परतले, याला तेल सुटले की यात भाज्या घातल्या.
४. भाज्या व्यवस्थित परतल्या की यात दीडकप गरमपाणी घातले.
५. ह्याला नीट उकळू दिले.
६. मग यात एक कप नारळाचे दूधात बेसन नीट ढवळून घेऊन यात ओतले व आच कमी केली.
७. दुसरीकडे नूडल शिजवून घेतले, हे वेगवेगळेच ठेवायचे आहे. ऐनवेळी ओतायचे आहे.
८. ओट्यावर टॉपिंगचे रुखवत रचले. तळलेला कांदा, तळलेले नूडल, तळलेला लसूण , चिली ऑईल, पातीचा कांदा, कोथिंबीर, शिजवलेले नूडल, परतून ठेवलेला टोफू वगैरे -
९. नवीन बोलमधे रचवून खाल्ले.
नूडल दिसावेत म्हणून-
घरी बदल म्हणून आवडले सर्वांना.
अधिक टिपा : हाच पदार्थ मी बाहेर दहा डॉलरमधे खाऊ शकले असते.
संज्योत कीरचा व्हिडिओ.
धन्यवाद.
-अस्मिता
<<<<कोकोनट सुद्धा कुतुहलाने
<<<<कोकोनट सुद्धा कुतुहलाने पँट्रीत माझ्या शेजारी खेटून वाकून बघू लागला, मग त्याच्या चार पाप्या घ्याव्याच लागल्या >>>>>>
हे वाक्य माझ्यासाठी show stopper इतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच पुढची पाकृ नंतर वाचेन. सध्या याच वाक्याचा आनंद मनात घोळवत राहिन.
एवढे सगळे फोटो दिलेस, पण
एवढे सगळे फोटो दिलेस, पण महत्वाचा कोकोनटचा फोटो द्यायला विसरलीस ना?
कोकोनट सुद्धा कुतुहलाने
कोकोनट सुद्धा कुतुहलाने पँट्रीत माझ्या शेजारी खेटून वाकून बघू लागला, मग त्याच्या चार पाप्या घ्याव्याच लागल्या >>>>>>
हे वाक्य माझ्यासाठी show stopper इतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच पुढची पाकृ नंतर वाचेन. सध्या याच वाक्याचा आनंद मनात घोळवत राहिन.>>अगदी. मला विज्युअलाईजही झाला सीन
इकडेही मिळतो तळलेला कांदा. नादूही रेडीमेड आणेन. असे सगळे कष्ट वाचवेन आणि करुन बघेन एकदा.
इकडेही मिळतो तळलेला कांदा. >>
इकडेही मिळतो तळलेला कांदा. >>> एखाद्या कंपनीचा मिळतो कि लोकल प्रॉडक्ट आहे? मला आमच्याकडे बाजारात कधी दिसला नाहीये.
मिळतो तळलेला कांदा.जरा स्पेशल
मिळतो तळलेला कांदा.जरा स्पेशल दुकानं लागतात, अग्रज किंवा अशीच थोडे तयार पदार्थ विकणारी.पण दुकानं कमी संख्येने.
मिळतो तळलेला कांदा.जरा स्पेशल
मिळतो तळलेला कांदा.जरा स्पेशल दुकानं लागतात, अग्रज किंवा अशीच थोडे तयार पदार्थ विकणारी.पण दुकानं कमी संख्येने.>> मग मला नाही मिळणार इथे बहूतेक.
अमेझॉन वर आहे बघ अल्पना, एकदा
अमेझॉन वर आहे बघ अल्पना, एकदा मागवून बघ कमी प्रमाणात.होपफुली व्हिनेगर नसावे.
https://www.amazon.in/Biryani-Fried-Onion-1-Kg/dp/B07CVG6TMN/ref=mp_s_a_...
एखाद्या कंपनीचा मिळतो कि लोकल
एखाद्या कंपनीचा मिळतो कि लोकल प्रॉडक्ट आहे? >> local product
त्या तळलेल्या कांद्याला आणि
त्या तळलेल्या कांद्याला आणि तळलेल्या नूडल्स ना पण काही पर्याय दिला होता संज्योत किर ने?
>>> तो हे accompaniments घातले नाही तरी चालतील म्हणाला होता. पण याने चव फार खुलते. मी येईपर्यंत तुला अनुने कांदा पोचता केला.
सध्या याच वाक्याचा आनंद मनात घोळवत राहिन.
मला विज्युअलाईजही झाला सीन
>>>> धनवन्ती आणि कविन, असे आनंदाचे निरागस क्षण 'होल्ड'वर ठेवत नाही, लगेच जगून घेते.
वर संज्योत कीरच्या मूळ पाककृतीचा व्हिडिओ दिला आहे. धन्यवाद सर्वांना.
डिशचं नाव वाचून गोविंदाचा
डिशचं नाव वाचून गोविंदाचा डायलॉग आठवला.
रेसिपी बद्दल काहीही बोलण्यास असमर्थ असलेला.
सुंदर फोटो. रेसिपीही आवडली.
सुंदर फोटो. रेसिपीही आवडली.
मस्त आहे रेसिपी
मस्त आहे रेसिपी
फर्मास लेखन. कोकोनट काय नसून
फर्मास लेखन. कोकोनट काय नसून कोण आहे, हे लक्षात यायला वेळ लागला. त्यामुळे त्याच्या पाप्या कशाला असा प्रश्न पडला होता. मग आठवलं.
सूपचा रंग छान आलाय.
मस्त.
मस्त.

मंद हळव्याश्या बोलमध्ये नूडलशेला शोभतोय.
त्याच्या पाप्या कशाला असा
त्याच्या पाप्या कशाला असा प्रश्न पडला होता. >>>
ओल्या नारळाच्या रंगासारखा कुत्रा आहे म्हणून 'कोकोनट' नाव ठेवले आहे.
नूडलशेला>>
कसली सही कलरफुल, खर्चिक
कसली सही कलरफुल, खर्चिक
रेसिपी. ते टोफू काही आणणार नाही मी (जणू मी करणारच आहे). बेसनच्या ऐवजी अजून काय लावू शकतो, इन जनरल बेसन कढी, ताकातल्या भाज्या, पिठलं यासाठी नेहेमी वापरले जातंच म्हणून विचारते.
खुसखुशीत लेखन as usual अस्मिता स्टाईल.
बाकी बोल भारी दिसतोय, हे कौतुक करायलाच हवं, अस्मिताचे पैसे वसूल व्हायला हवेत
टोफू तसाही पर्यायीच होता. मला
सर्वांना धन्यवाद.
तांदूळ पीठ मनात होतं, थँक्स
तांदूळ पीठ मनात होतं, थँक्स त्यासाठी.
बाकी बोल मंद नाही, चलाख वाटतोय, तुझी रेसिपी सामावून घेतली त्याने.
(No subject)
हलके घे, रेसिपी अप्रतिम आहे,
हलके घे, रेसिपी अप्रतिम आहे, मंद वर कोटी करायची म्हणून उगाच लिहिलं आहे ते.
मला आवडली होती कोटी
मला आवडली होती कोटी
एकदम अस्मिता स्टाइल लिखाण,
एकदम अस्मिता स्टाइल लिखाण, पुर्ण रेसिपीत कोकोनट लक्षवेधी आयटेम आहे..रेसिपीच्या एकूण गुणातले अर्धे त्याचेच आहेत..
ही डिश मला एकदा करायचीच आहे
ही डिश मला एकदा करायचीच आहे पण जमेल का म्हणून काळजी वाटते . बाकी लिखाण नेहमीसारखेच खुसखुशीत .
मस्त लिहिली आहेस पाककृती
मस्त लिहिली आहेस पाककृती अस्मिता!
मी नुकत्याच एका रेस्तरॉ मधे सूप खाल्ले होते घरच्यांबरोबर. सगळ्यांना आवडले. पण त्यात नुसती ग्रेव्ही एका बोल मधे आणि भाज्या व बाकीचे सिझनिंग वेगवेगळे दिलेले.
अर्थात हे जरा मसालेदार होते का ? बाकी हे घरी, झटपट होऊ शकेल असे आजिबात वाटले नव्हते. आता नक्की करून बघेन!
प्राजक्ता, आरती आणि निकू आभार
प्राजक्ता, आरती आणि निकु आभार.
प्राजक्ता, कोकोनटचे भरपूर फॅन्स आहेत माबोवर.
आरती, काळजी करण्यासारखे काही नाही यात. सोपी आहे.
निकु, किती दिवसांनी
तसे वेगवेगळे खाता येते हे संज्योत कीरनेही सुचवले आहे व्हिडिओत. नाही होत मसालेदार, नारळाचे दूध सगळ्याच चवींना 'ओव्हरपावर' करते.
Pages