
'खाओ सुये' हे एक बर्मिज पद्धतीचे नूडल सूप आहे. वन डिश मील/ 'एकपात्री प्रयोग' म्हणून त्यातली करी जास्त घातल्यास हलकेफुलके आणि नूडल्स जास्त घातल्यास पोटभरीचे होऊ शकते. संज्योत कीरची पाककृती अचानक फीडमधे आली आणि साक्षात्कार वाटून मीही करायला घेतली. त्यासाठी बर्माला तरफडत जावे एवढीही खास नाही. थाई रेड करी किंवा ग्रीन करी प्रमाणे नारळाचे दूध घालूनच केली जाते पण त्यामानाने अतिशय सोपी वाटली. त्यात संज्योतने दाखवलेले हे व्हर्जन भारतीय पद्धतीचे आहे. त्याने टोफु घाला असे म्हटले नाही पण 'वन डिश मील' मलाच प्रथिनांशिवाय अपूर्ण वाटत होती म्हणून मीच घातला आहे. पोषणमुल्यात सुद्धा तो पदार्थ थोडाफार परिपूर्ण असावा असा माझाच आग्रह होता. ह्यात चिकन घालूनही करता येते.
तो सतत सांगत होता की 'हे नसले तरी हरकत नाही- ते घाला' पण मला दुकानात जाऊन काही नवीन बघून , वेगवेगळ्या शेल्फमधे 'अजून काय- अजून काय' करत पैसे खर्च केल्याशिवाय मजाच येत नाही आणि मी फक्त मज्जेसाठीच भाग घेत होते. त्यात तळलेला कांदा घरात असूनही सापडला नाही. मी कांदा शोधण्यासाठी कितीतरी वेळ फतकल मारून खाली बसले होते. कोकोनट सुद्धा कुतूहलाने पँट्रीत माझ्या शेजारी खेटून वाकून बघू लागला, मग त्याच्या चार पाप्या घ्याव्याच लागल्या. घरात कांदा नाही असे 'डिक्लेअर' करून मनात नोंदवला, आता सापडेल जेव्हा मला गरज नाही तेव्हाच.
त्यामळे नुसते घटकच नाही तर वाढलेले सूप माबोवरील मुख्य चित्रात सुंदर दिसावे म्हणून नवीन सूप बोल सुद्धा आणला. 'तो बोल मंद हळवासा' बघण्याच्या नादात पाककृतीतला 'व्हेजटेबल स्टॉक' हा पर्यायी घटक मी विसरले. ते विसरलेले घरी आल्याशिवाय आठवले नाही , मग 'जाऊ द्या' म्हणून गप बसावे लागले. या एकपात्री प्रयोगाचे ४१$ खर्च झाले. त्यापैकी तीन डॉलरच्या नाचोज त्यातून वजा करा, सदतीस डॉलर मी फक्त तुमच्यासाठी खर्च केले आहेत. तुमची बर्माची ट्रिप वाचवल्याचे उपकार जन्मभर विसरू नका. मीही आठवण करून देत राहीन. /\
साहित्य-
एक कांदा, तीन चार पाकळी लसूण+ अजून तीनचार पाकळ्या, एक ईंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि काड्या, नारळाचे दूध एक कप, तिखट, हळद, हिरव्या मिरच्या, टोफू फर्म, तांदूळाचे नूडल्स छोटी चवड, तळलेले नूडल्स, तळलेला कांदा, कांद्याची हिरवी पात, धन्याजिऱ्याची पूड, ब्रॉकोली, मिक्स भाज्या (गाजर, फरसबी, मटार, मक्याचे दाणे), बेसन एक चमचा, मीठ, चिली ऑईल.
या चित्रात मी लसणाच्या फाका तळून घेतल्या, त्याच तेलात टोफू परतून घेतला. मी टोफू कमी प्रमाणात घेतला आहे.तळलेला कांदा मात्र सॅलडवर घालायला मिळतो त्या प्रकारातला आहे. हे सोबतचे घटक या सूपला खमंग आणि कुरकुरीत करतात त्यामुळे पर्यायी वाटले नाही.
कृती:
कृती अतिशय सोपी आहे.
१. प्रथम एक कांदा, लसूण , आलं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीची देठं थोडेसे पाणी घालून वाटून घेतले.
२. हे वाटण संज्योत एक चमचा तेलात म्हणून अर्धी वाटी घालतो तसे न करता चारपाच चमचे तेल घालून परतले.
३. याचा कच्चा वास उडून गेल्यावर यात तिखट, मीठ, हळद आणि धन्याजिऱ्याची पूड टाकून परतले, याला तेल सुटले की यात भाज्या घातल्या.
४. भाज्या व्यवस्थित परतल्या की यात दीडकप गरमपाणी घातले.
५. ह्याला नीट उकळू दिले.
६. मग यात एक कप नारळाचे दूधात बेसन नीट ढवळून घेऊन यात ओतले व आच कमी केली.
७. दुसरीकडे नूडल शिजवून घेतले, हे वेगवेगळेच ठेवायचे आहे. ऐनवेळी ओतायचे आहे.
८. ओट्यावर टॉपिंगचे रुखवत रचले. तळलेला कांदा, तळलेले नूडल, तळलेला लसूण , चिली ऑईल, पातीचा कांदा, कोथिंबीर, शिजवलेले नूडल, परतून ठेवलेला टोफू वगैरे -
९. नवीन बोलमधे रचवून खाल्ले.
नूडल दिसावेत म्हणून-
घरी बदल म्हणून आवडले सर्वांना.
अधिक टिपा : हाच पदार्थ मी बाहेर दहा डॉलरमधे खाऊ शकले असते.
संज्योत कीरचा व्हिडिओ.
धन्यवाद.
-अस्मिता
खतरनाक.. अवॉर्ड विनिंग रेसिपी
खतरनाक.. अवॉर्ड विनिंग रेसिपी
वन डिश मील बोल के वन बोल मील दिया हा फाऊल माफ..
'तो बोल मंद हळवासा' >> खास
'तो बोल मंद हळवासा' >> खास अस्मिता असलेला ट्च :))
अरे मस्तय रेसिपी! आणि
अरे मस्तय रेसिपी! आणि लिहीलिये पण भारी!
मस्त आहे रेसिपी अस्मिता. नारळ
मस्त आहे रेसिपी अस्मिता. नारळ दूध वाले पदार्थ आवडतातच. खास लाक्सा फ्लेवर असतो त्यांना.
तो बोल मंद हळवासा' बघण्याच्या
तो बोल मंद हळवासा' बघण्याच्या नादात पाककृतीतला 'व्हेजटेबल स्टॉक' हा पर्यायी घटक मी विसरले. >>
रुचकर पाकृ वाचण्याच्या नादात स्टॉक विसरल्यावर काय करायचं ते मी विसरलो. आता स्क्रोल करुन बघितलं तर काहीच नाही.
बाकी आम्ही व्हेजी स्टॉक आणून तो वापरायचं अनेकदा विसरतो त्यामुळे तो घरी नक्की आहे. पण आता काय फायदा! तो नकोच आहे!
घरी असलेल्या गोष्टी न सापडणे हे इतरांचं पण होतं बघुन फार बरं वाटलं. माझ्याकडे इंग्रो मधला तळलेला कांदा पण आहे. पण हल्लीच सेंट लुई मध्ये मिळणार्या बर्गर वर तळलेला कांदा खाल्ल्यापासून... पण तो देसी तळलेला नाही. तुझ्या बाऊल मधल्या बटाट्याच्या सळ्यांसारखा विदेसी.. तर मला तो आणायचाय. टोफू नाही आवडत, त्यामुळे चिकन घालून करेन.
कृती छान. करायच्या आधी वाचुनच मजा आली
मस्त लिहीलेय
मस्त लिहीलेय
बोल दिसतोय पण छान
करता येईल असे आत्ता तरी वाटतेय.
माझ्याकडे इंग्रो मधला तळलेला
माझ्याकडे इंग्रो मधला तळलेला कांदा पण आहे.
>>> तोच होता माझ्याकडे, जो बिर्याणी वर नेहमी वापरते. कुठे गेला काय माहीत. आता हा अमेरिकन तळलेला कांदा घातला. हा जरा कोरडा वाटतो पण चांंगलाच लागतो. आम्ही व्हेजी स्टॉक आणतच नाही. कधी सवयच नाही लागली. यावेळी मात्र आणणार होते, पर्यायी काही ठेवणार नव्हते. ते बोल बघताना रमले तेथेच आणि साफ विसरले. यादीबिदी आम्ही मनात करतो, मग असे गर्वहरण होते.
वाह! काय भारी दिसतेय गं.
वाह! काय भारी दिसतेय गं. नमनाचा घडीभर स्टॉक आवडला. फोटो मस्त आहेत.
तो बोल मंद हळवासा'. >>>.
मग तो बोल तू मंद हलवलास की नाही?
'एकपात्री प्रयोग' शब्द किती चपखल आहे. फार आवडला.
कविन, सोपे आहे.
कविन, आशु सोपे आहे. करून बघा.


मामी, हो. तो स्टॉक विसरला म्हणून येथे भरपाई केली.
'एकपात्री प्रयोग' शब्द किती चपखल आहे. फार आवडला.
>>> एकदम मनात आले की ते असेच लिहिता येईल.
छान पाकृ. अस्मिता style
छान पाकृ. अस्मिता style लिहिली आहे त्यामुळे मजा आली.
करून पाहणार नाही तूच दे पाठवून. पस्तीस डॉलर नाहीत ना माझ्याकडे. Technical issue
पाठवते किल्ली, बोलसहित
पाठवते किल्ली, बोलसहित
सदतीस डॉलर मी फक्त
सदतीस डॉलर मी फक्त तुमच्यासाठी खर्च केले आहेत.>>>>
तुम्ही आमच्यासाठी एवढा खर्च स्वखुशीने केलात त्याबद्दल धन्यवाद! (जर कोणी यापेक्षा जास्त खर्च केला नाही तर) आमचे मत तुम्हालाच…..
मला डिश पाठवू नका, व्हिसा व विमानाचे तिकिट पाठवा. मी तिकडेच येतो खायला.
पाककृती छान आहे. हे सांगायचे
पाककृती छान आहे. हे सांगायचे राहीलंच….
खतरनाक खतरनाक ( चहयेद्या मधला
खतरनाक खतरनाक ( चहयेद्या मधला कोण तो ....त्या टोन मध्ये)
रेसिपी पण भारी आणि लिहीलंयस पण भारीच. रेस्पीतला एक महत्त्वाचा घटक "कोकोनट ची पापी" आम्ही नारळाचा किस घेऊन भागवायची आहे का?
सुंदर, रंगीत, अस्मिता टच वाली
सुंदर, रंगीत, अस्मिता टच वाली रेसिपी आवडली.खर्चलेल्या डॉलर्स चं चीज झालं.ही रेसीपी हवी होतीच.
मी हा पदार्थ नेहमी मागवायचं म्हणते आणि घरचे नावात सुई आहे म्हणून ऑर्डर करू देत नाहीत.आता एकदा वेगळ्या नावाखाली करून खायला घालून आवडतो का बघावा लागेल.(याच न्यायाने अमुक खतखते, तमुक सरसरीत,गटागटीत असे पदार्थही नको म्हटले जातात.)
रेसिपी पण भारी आणि लिहीलंयस
रेसिपी पण भारी आणि लिहीलंयस पण भारीच. रेस्पीतला एक महत्त्वाचा घटक "कोकोनट ची पापी" आम्ही नारळाचा किस घेऊन भागवायची आहे का? ....... भारी!
अस्मिता style मध्ये रेसिपी
अस्मिता style मध्ये रेसिपी वाचताना मजा आली.
फायनल प्रॉडक्ट bowl सहीत आवडले आहे.
रेसिपी सुरू होण्याच्या आधीच मनोगत जे कोतबो होउ शकले असते ते ही आवडले. त्यातील कोकोनट तर फार आवडला
आता 70 रु नंतर 37 डॉलर फेमस होणार तर.
Meme स्पेशालिस्ट कोणीतरी लक्ष द्या इथे
छान आहे one dish meal....
छान आहे one dish meal....
तो बोल मंद हळवासा
ते कोकोनटच्या पाप्या नाही
ते कोकोनटच्या पाप्या नाही घेतल्या तर चालणार नाही का? नाही म्हणजे तिकडं येण्याच्या खर्चात ४ वेळा सहकुटुंब बर्माला जाता येईल म्हणून म्हणते…
बोल हळवासा ठीकाय. एवढा पण मंद वाटत नाहीये.
बाकी चांगल्या हाटिलात इथे ही डिश बरी मिळते. पण नेहमीच्या ठिकाणी ढीगभर कॉर्नफ्लार घालून बुळबुळीत करून देतात. तू रेसिपी दिली आहेस तर धीर आलाय. एकदा करून पाहिन.
त्यासाठी बर्माला तरफडत जावे
त्यासाठी बर्माला तरफडत जावे एवढीही खास नाही.
कसं सुचत हे
>>>>>
रेसिपी छान लिहिलीय
खतरा वर्णन आणि रेसिपी too..
खतरा वर्णन आणि रेसिपी too..
मस्त रेसिपी अस्मिता आणि
मस्त रेसिपी अस्मिता आणि लिहिली पण छान आहेस.
एकच शंका तू ४१ $ खर्च केलेस त्यातून नाचोज चे ३ गेले म्हंजे राहिले ३८ , तू लिहिले आहेस ३७ , ह्यात काही झोल होतोय का ?
पाककृती छान आहे.
पाककृती छान आहे.
एकच शंका तू ४१ $ खर्च केलेस त्यातून नाचोज चे ३ गेले म्हंजे राहिले ३८ , तू लिहिले आहेस ३७ , ह्यात काही झोल होतोय का ?>> १ $ खाल्लेला दिसतोय. बयो, संयम असावा जरा!
छान पाककृती आणि फोटो
छान पाककृती आणि फोटो
भारीच लिहिलंय
भारीच लिहिलंय
दिसतंय पण भारी. मस्तच.
घरचे नावात सुई आहे म्हणून
(जर कोणी यापेक्षा जास्त खर्च केला नाही तर) आमचे मत तुम्हालाच….. >>>>
नक्की या, अतरंगी.
घरचे नावात सुई आहे म्हणून ऑर्डर करू देत नाहीत >>>>
ह्यात काही झोल होतोय का ?>>> चिल्लर हरवली रस्त्यात
> १ $ खाल्लेला दिसतोय. बयो, संयम असावा जरा! >>>>
क्रंची नाचोज मी खाल्ले आणि शशकातल्या प्रियांका चोप्राला दिले. 
आता 70 रु नंतर 37 डॉलर फेमस होणार तर.>>>

ते कोकोनटच्या पाप्या नाही घेतल्या तर चालणार नाही का? >>> नाही चालणार, आम्ही 'पापी' लोक आहोत.
घटक "कोकोनट ची पापी" आम्ही नारळाचा किस घेऊन भागवायची आहे का? >>>
चालेल.
कोकोनट स्वैपाकघरातच असतो, त्यामुळे तो पाककृतीतला महत्त्वाचा घटक आहे.
धन्यवाद सर्वांना.
'एकपात्री प्रयोग' शब्द किती
'एकपात्री प्रयोग' शब्द किती चपखल आहे. फार आवडला. >>> एक्झॅक्टली. तसा उल्लेख वाचल्यानेच हे वाचायला आलो. परफेक्ट शब्दप्रयोग आहे. "बोल हळवासा" वाले बोल/बाउलचे संदर्भही लोल
हलके-फुलके च्या मधे वाक्य पुढच्या ओळीत गेल्याने मी ते आधी "फुलके आणि नूडल्स जास्त घातल्यास पोटभरीचे होऊ शकते" असे वाचले. ते क्रुटॉन्स (फ्रेंच मधे त्याला क्रॉव्हाँ वगैरे म्हणत असतील तर चुभूद्याघ्या) घालणे एकवेळ ठीक आहे. पण फुलके म्हणजे फारच ममव झाले असा विचार करत होतो. मग वरचे वाक्य दिसून "हलके" घेतले.
कोकोनट स्वैपाकघरातच असतो, त्यामुळे तो पाककृतीतला महत्त्वाचा घटक आहे >>> कोकोनट हे तुझ्या पेट चे नाव आहे हे माहीत नसलेल्यांना या वाक्यात आवर्जून लिहीण्यासारखे काय आहे हा प्रश्न पडेल
कांदा सापडला असता तर त्याला वाटले असते याने "फेच" खेळायचे आहे 
आता पाकृबद्दल. "स्टॉक" भारी दिसतोय. एकदम अॅपेटायझिंग. पुढे स्क्रोल करताना चौथ्या फोटोपर्यंत जुरासिक पार्क मधे इयान माल्कम त्या राइडमधे बराच वेळ काहीच न दिसल्याने जॉन हॅमण्डला "डायनोसोर राइड मधे आम्हाला एखादा डायनोसोर दिसणार आहे ना?" असे विचारतो तसे वाटले. सूप च्या रेसिपीमधे सूप दिसणार आहे ना? पण पुढे दिसले. एकूण ग्रेव्ही कमीच दिसते या पध्दतीत. मला थाई सूप्स खूप आवडतात. हे त्या मानाने जास्त आपल्याकडच्या मसालेदार ग्रेव्हीज सारखे वाटले. तयार झाल्यानंतरचेही फोटो मस्त आहेत.
ते तीन डॉलर वाले नाचोज म्हणजे तेच ३-४ बाफवर फेमस झालेले क्रंची ना?
अस्मिता..किती मस्त लिहिले
अस्मिता..किती मस्त लिहिले आहेस!

फोटो ही खूप छान. या सूप ला एक स्मोकी फ्लेव्हर होता मी एका रिसेप्शन मध्ये खाल्लेलं तेव्हा!
तुझ्या या कृतीत येतो का तसा?
बाकी मला तर पहिली ५०% कृती ही मसालेदार ग्रेव्हीच्या भाजी सारखीच वाटतेय. त्यात मग नारळाचे दूध अन् बेसन. टेस्ट डेव्हलप करावी लागेल असे वाटते.
तुझ्या वर्णनाला पूर्ण मार्क्स मात्र!
बोल/बाउलचे संदर्भही लोल >>>
बोल/बाउलचे संदर्भही लोल >>> मी 'बाउल' शब्द कटाक्षाने टाळते. कारण 'बाऊल मुव्हमेंट' शब्दच आठवतात आणि अर्थातच भूक मरते.


एवढेही हरवत नाही मी. कांद्याचे संत्रे करू नका.
ते तीन डॉलर वाले नाचोज म्हणजे तेच ३-४ बाफवर फेमस झालेले क्रंची ना? >>> हो. ते सध्या 'विश्वाचे आर्त' होऊन बसले आहे.
मला थाई सूप्स खूप आवडतात. >>> मलाही भयंकर आवडतात.
सूप च्या रेसिपीमधे सूप दिसणार आहे ना? >>>
कांदा सापडला असता तर त्याला वाटले असते याने "फेच" खेळायचे आहे >>> तळलेल्या कांद्याचे पॅक हरवले होते. कच्चा अखंड 'फेचेबल' कांदा नाही.
-----------
स्मोकी फ्लेव्हर होता मी एका रिसेप्शन मध्ये खाल्लेलं तेव्हा!
धन्यवाद.
>>> नाही, वाटला गं तसा. कांदा भाजून ग्रेव्ही केली तर लागेल कदाचित पण या कृतीत तसे काही सुचवले नव्हते.
मस्त लिहिली आहेस पाककृती.
मस्त लिहिली आहेस पाककृती. बाकी तळलेला कांदा स्टोअरमधून विकत आणता येतो (घरात हरवला असला तरी) हे किती छान. तो कांदा तळायचा कंटाळा येतो म्हणून मी बिर्याण्या करणं टाळते. तळलेला कांदा सोडलं तर बाकी सूप सोप्पे आहे. त्या तळलेल्या कांद्याला आणि तळलेल्या नूडल्स ना पण काही पर्याय दिला होता संज्योत किर ने?
हिवाळ्यात करेन मी ( कांदा आणि नूडल्स तळ्णं आउटसोर्स करून). सूपमध्ये वेगवेगळी नूडल्स / पास्ता आणि चिकन किंवा पनीर घालून खाणे हा माझ्या आवडीच्या वन डिश मिल चा प्रकार आहे.
Pages