शहाणे करुन सकळ - एक ''रमणीय प्रवास" -प्राचीन

Submitted by प्राचीन on 17 September, 2024 - 10:51

जेव्हा मायबोलीवरती हा उपक्रम वाचला,आवडलाच.. की एखाद्या क्षेत्रामध्ये यशाचं शिखर किंवा प्रथितयश किंवा लक्षणीय यश वा वेगळा अनुभव घेण्याबद्दल इथे लिहायचं.
आपण किमान वरील शेवटच्या निकषामध्ये तरी आहोत, या विचाराने ,शिवाय इथे अजून कुणी लिहिलेलं दिसलं नाही, तेव्हा आपण निदान इथे तरी “”पयलं नमन”” करूया, असं वाटलं नि लेखणी सरसावली. (हा डिस्क्लेमर आहे हं)
तर तो दिवस होता, २८ फेब्रुवारी २०२२.. म.भा.दि. मायबोलीवर छान साजरा होत होता, आणि त्यात एका उपक्रमामध्ये मी अभिवाचन केलं होतं. नेहमीप्रमाणे माबोकरांचं कौतुक आणि काही दिशादर्शक सल्ले मिळाले. (आवाज,शैली यांना अनुसरून)
मी सहज याबाबत माझ्या घरी जेव्हा बोलले, तेव्हा धाकट्या भावाने आणि लेकाने आग्रह धरला, की तू ही गोष्ट सीरियसली घ्यायला हवीस. म्हणजे असं दोन-चार वर्षांपूर्वीच लेकाने म्हटलं होतं, की तुला पुस्तकांची आवड आहे, वगैरे सगळं ठीक आहे. पण तुझी आवड ही तुझ्यापुरतीच मर्यादित का ठेवतेस? जगाला त्याचा काय उपयोग? इ.इ.
मी यावर उत्तर दिलं होतं, की “मी जगासाठी कशाला वाचीन? मी माझ्यासाठी वाचते…माझ्या आनंदासाठी वाचते..इ.”
लेकाचं म्हणणं असं, की लोकांनीही वाचावं, असं काहीतरी तू करायला हवंस..
आता पुन्हा दोघांनी जोर धरला आणि त्यातूनच आकाराला आली, पुस्तक दर्पण ही यूट्यूब चॅनेलची संकल्पना !
यामागचा तांत्रिक भाग वगैरे - ज्याची शिकवणी मला या दोघांकडे लावून घ्यावी लागली, तिच्याबद्दल अगदी तपशीलवार काही लिहीत नाही. मुख्य गोष्टी तेवढ्या बघू.
तर, यूट्यूब या क्षेत्रामध्ये मी अगदी शून्य होते. व्हिडिओ बघणे, डाऊनलोड, सेव्ह फॉर लेटर, इ. या पलीकडे अक्षरशः मला फक्त सबस्क्राईब करणं तेवढं माहीत होतं; पण नेमका त्याचा अर्थ काय होतो, म्हणजे चॅनेलच्या दृष्टीने, अशा बऱ्याच गोष्टी मला टप्प्याटप्प्याने या दोघांनी सांगितल्या.
लोकांना पुस्तकवाचनाकडे वळवण्यासाठी व्हिडिओ बनवणे, तिथे पुस्तकांची थोडक्यात ओळख करून देणं, हे उद्दिष्ट निश्चित केलं. आपण वाचलेले जे पुस्तक आहे, त्यात आपल्याला काय आवडलं, लोकांनी ते वाचावं असं आपल्याला का वाटते, ते आपण थोडक्यात व्हिडिओमध्ये सांगायचं. वाचनाची आवड असलेल्यांनी आणि वाचनाची आवड नसलेल्यांनीही पुस्तक दर्पण बघून पुस्तकांकडे वळावं, असा उद्देश होता.
माझी इच्छा होती, की मी स्वतः व्हिडिओमध्ये दिसू नये, नुसती पुस्तकं दाखवायची, माहिती द्यायची इ.
शिवाय हे सर्व बोलणं मनोरंजक असेल का, आपण कितपत मनोरंजन बोलू शकतो, (व्याख्यानांचा, अध्यापनाचा अनुभव होता व आहे) पण आपल्यासमोर प्रत्यक्ष माणसे नसताना, हे जमेल का (ऑनलाईन लेक्चर्स अनुभव जमेस धरता येईल का, )अशा शंका होत्या. जगभरासमोर स्वतः नजरेत येणं, हे मला तितकसं रुचलं नव्हतं. बरेच धोके दिसत किंवा वाटत होते. संकोच असा, की यूट्युब म्हटल्यावरती त्याला देशकालपरिस्थितीच्या मर्यादा नाहीत..मग आपण एकदम असं लोकांसमोर येण्यानं खाजगीपणाला बाधा येईल का, शिवाय घरामध्ये, नातलगांमध्ये याचं कितपत स्वागत होईल, विशेषतः जोडीदाराचं काय मत्त आहे, (हो. अजुनही त्याचं मत माझ्यासाठी महत्त्वाचं असतं, फिदी ) असा विचार करून मी सुचवलं होतं, की आपण काय करूया.. की एखाद्या पुस्तकाची पानं , पुस्तकातला तपशील, मजकूर व्हिडिओमध्ये दाखवू आणि आवाज मात्र माझा असेल. पण माझ्या भावाने ही कल्पना खोडून काढली. तो म्हणाला, "तू काय गोष्ट वाचत नाहीयेस.. पुस्तकाची माहिती देते आहेस,” त्याने मला असंही सांगितलं, कि याचा जो प्रेक्षक वर्ग असणार आहे, तो एक विशिष्ट दर्जाची अभिरुची असणारा असण्याची शक्यता खूप आहे. म्हणजे थोडक्यात, सोप्या शब्दात सांगायचं, तर इथे प्रेक्षकवर्ग हा निव्वळ मनोरंजनासाठीच आपल्याशी जोडला जाणार नाहीये. त्या दृष्टीने घाबरण्याचं काही कारण नाही आणि आपण काही पथ्य पाळणारच आहोत स्वतःला प्रेझेंटेबल करताना.. कारण (आपल्याला फेस व्हॅल्यू असो वा नसो (फिदी) ), आपल्या व्हिडिओला फेस व्हॅल्यू येण्यासाठी, आपण स्वतः त्याच्यावर दिसणं हे लोकांचं व्हिडिओकडे लक्ष जाण्याच्या, टिकण्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे. मग मी याबाबतीत जोडिदाराचा सल्ला घेतला. त्यांचं मत विचारल्यावर त्यांनी एकदम सहजपणे अनुकूल मत दर्शवलं. मी आईलासुद्धा विचारलं, तेव्हा आईने मला स्पष्ट शब्दात सांगितलेलं, "गाजराची पुंगी.. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, इतका सहज दृष्टिकोन ठेव. म्हणजे अगदी त्याचा जीवनमरणाचा किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न करू नकोस."
मग त्यानंतर...
याच्याबद्दल अर्थातच अनेक चर्चा केल्या.. विचारमंथन केलं, ज्याला तांत्रिक तपशील म्हणता येईल, त्याच्यावरती आम्ही इतके वेळा चर्चा केल्या ! भावाशी आणि मुलाशी कदाचित मी यापूर्वी (उपदेश न करण्यासाठी )इतकी बोललेच नसेन..विशेषतः भावाशी.. लग्न झाल्यानंतर..
या निमित्तानं आम्ही बराच संवाद साधला, (मला शिकवायची अमर्याद संधी हा त्यांच्यासाठीही फायदा होताच) हा माझ्यासाठी पुष्कळ मोठा ठेवाच निर्माण झालाय. मूळ उद्देशाव्यतिरिक्त विशेष मोठं काही साध्य केलं असेल, यूट्यूब चॅनेलमुळे,तर हा आनंद, हे समाधान...
तर एकंदर आमच्या सगळ्या मंथनाचा निष्कर्ष , नवनीत जे बाहेर आलं, तो परिपाक म्हणजे पुस्तक दर्पण..
आमच्या तिघांचं खूप छान टीमवर्क झालं यानिमित्तानं आणि विचारांची देवाण-घेवाण करता करता एकदाचं चॅनलचं नाव ठरलं.
मग पुस्तकांची निवड कशी करायची, वगैरे हे स्वातंत्र्य अर्थात माझं होतं. तांत्रिक बाजू, ज्याला आपण रेकॉर्डिंग म्हणतो ते, यूट्यूब चॅनेल कसं तयार कराय़चं, अकाउंट कसं उघडायचं, आपण सबस्क्राईब करतो, त्याचा काय उपयोग असतो, व्ह्य़ूज म्हणजे मला फक्त किती जणांनी व्हिडिओ बघितला, इतपतच माहीत होतं. पण त्याचा युट्यूब च्या दृष्टीने अर्थ काय असतो, अशा अक्षरशः आपण म्हणतो ना, हाताला धरून, तशा बऱ्याच गोष्टी मला लेकानं आणि भावाने शिकवल्या.. आजही शिकवतात..
काही गोष्टी मात्र ,पाण्यात पडलं की पोहता येतं, तशा हळूहळू स्वतःच्या अनुभवातूनसुद्धा शिकत गेले. अजूनही ती प्रक्रिया सुरू आहे आणि मला वाटते सुरू राहील.
सुरुवातीला त्यात काही चुका झाल्या, हे मी प्रांजळपणे मान्य केलेच पाहिजे. पण एक नवी दृष्टी आली. माझ्या आवडत्या गोष्टीच्या सहवासात राहण्याची संधी मला या उपक्रमाने दिली. पुस्तक समजून घेणे पुस्तकांवरती विचार करणे, स्क्रिप्ट, रेकॉर्डिंग, ते कसं करायचं.. या गोष्टीसुद्धा मी वेगवेगळ्या ट्प्प्यांवरती शिकत गेले.
समोर कोणी नसताना आपण बोलत राहणं, याचा अनुभव तितकासा नव्हता. (त्रस्त गृहिणी मोड वगळता).
यापूर्वी मी एका संस्थेसाठी यूट्यूबवरती एक व्हिडिओ केला होता आणि तोही योगायोगाने पुस्तक परिचयाचाच होता बरं का.. पण तेव्हा मी अगदीच ढोबळ चुका केल्या होत्या काहीच माहीत नसल्यामुळे आणि कमी वेळात मला तो व्हिडिओ द्यायचा होता म्हणून..
पुस्तक दर्पण करता करता नंतर तेही जमून गेलं सुदैवानं !
आवडीची गोष्ट करायची असल्यामुळे यात कष्ट होतात, असं तेव्हाही वाटलं नाही आणि आजही वाटत नाही. प्रोफेशनॅलिझम, तांत्रिक सफाई असू देत नाही, तर आणखीन कितीतरी यात साधलेलं आहे का, मला माहीत नाही..
पण ह्या सगळ्या उपक्रमामध्ये एक जो पुस्तकांबरोबरचा, प्रेक्षकांबरोबरचा चिरंतन संवाद साधला जात आहे, तो मोलाचा आहे.
हे सगळं खरंच इथे लिहायला बसले ना, तर पुष्कळच होईल.. पण उपक्रमाची मर्यादा म्हणून मी काही गोष्टी वगळता मुख्य गोष्टींवरती इथे भर दिलाय.
एक गंमत.. हा उपक्रम जेव्हा सुरू केला, तेव्हा मला माहीत नव्हतं, की जे पुस्तकांची माहिती देण्यासाठी किंवा पुस्तकांशी संबंधित व्हिडिओ बनवतात, त्यांना युट्युबर नाही म्हणत. त्यांना बुकट्यूबर म्हणतात. मग मी स्वतःला बुकट्य़ूबर म्हणून घेतलं एकटीनेच आणि स्वतःचीच खुदकन हसूनही घेतलं !
पहिला व्हिडिओ जेव्हा टाकला, तो दिवस मला आजही आठवतो .. तीन जून 2022 .. मी. आतापर्यंत ऐकलं होतं, की सिनेमाचा प्रीमियर असतो. पण यूट्यूब व्हिडिओचाही प्रीमिअर असतो, हे नव्याने समजलं ! नंतर यथावकाश चॅनेलचा विस्तार होत गेला. अजूनही माझ्या डोक्यात याबाबत काही संकल्प आहेत..
इथे रिक्षा फिरवण्यासाठी आता काही गोष्टी सांगते. लेखकाची मुलाखत घ्यायला हवी आपण, असं कुठेतरी मला वाटलं. मग एका लेखकांची मुलाखत घेतली. बालकथा लिहिणारे लेखक.. तो एक वेगळा टप्पा होता.. पण तो मनात आलं, करून टाकलं, अशा टाईपचा इंटरव्यू होता, त्यामुळे काही मजेशीर गोष्टी झाल्या . नंतर मला समजल्या.
एकदा नारायण धारपांचं पुस्तक घेतलं, तेव्हा मी वातावरण निर्मिती करण्यासाठी मग चक्क काळोख केला घरामध्ये. आणि टॉर्चच्या प्रकाशामध्ये तो व्हिडिओ केला..नशिबाने एका प्रेक्षकाला तरी हे समजून त्यानं कौतुक केलं.. घरात मात्र सगळे हसत होते- हा असफाईदार प्रयोग पाहून !
अशा छोट्या छोट्या गोष्टी, नवीन नवीन प्रयत्न करत गेले. आपल्याला लोकांना वैविध्यपूर्ण, प्रसंगोचित पुस्तक देता यावीत, यासाठी प्रयत्नशील असते. या दोन वर्षात चॅनल यशस्वी झालं असं म्हणता येईल का, मला माहीत नाही.. माझ्या दृष्टीने येथवरचा प्रवास.. याचा आनंद आणि समाधान आहे. उद्देश बऱ्यापैकी साध्य करता आलाय. अजूनही बरंच काही करायचं आहे..
सारांशात विचार केला , तर या पुस्तक दर्पणने मला बऱ्याच गोष्टी दिल्या, काही मी वरती नमूद केलेल्याच आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला,पुनरावलोकनाची संधी दरवर्षी मिळते, लोकांशी जोडून घेता आलं, त्याहीपेक्षा अनेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पुस्तक परिचयरूपी संधी यानिमित्तानं मिळते.. (संदर्भ - संस्कृत भाषा कृतज्ञता)
प्रथमतः तर मी मायबोलीची ऋणी आहे. मायबोलीच्या उपक्रमातून मला माझ्यातील एक अनोळखी बाजू समजली. माबोकरांनी चॅनेल च्या प्रवासात सक्रिय पाठिंबा दिलेला आहे...
इतर इनिंग माझ्या खरं म्हणजे सुरूच आहेत, काही तर खंड पडून पुन्हा सुरू झाल्यात.. पण दुसरी इनिंग म्हणण्यापेक्षा एक वेगळी इनिंग म्हणून पुस्तक दर्पण कडे नक्कीच पाहता येईल.
हे इथे व्यक्त करता आलं, याबद्दल गणेशोत्सव संयोजकांचे आभार. उपक्रमाच्या निकषांमध्ये लिखाण बसत असावं, असं मला वाटतं.
हे अगदी राजहंसाचं चालणं नसलं, तरीसुद्धा छोटीशी पावलं आहेत आणि वाट मात्र आनंददायी आहे खरी.
इति अलम्.
पुस्तक दर्पण चॅनेल ची परिचय व्हिडिओ लिंक -

https://youtu.be/9ay9Ep5XoFw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रवास छान सांगितला आहे. तुमचं हार्दिक अभिनंदन! इथे लिंक शेअर करता येईल का?
किंवा चॅनलचं नाव तरी सांगून ठेवा. शुभेच्छा! Happy

अमितव, लेखामध्ये चॅनेल चं नाव आहे ना..पुस्तक दर्पण.
शुभेच्छांबद्दल आणि प्रथम प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.
लिंक अवश्य देईन. Wink Wink
पहिल्या व्हिडिओ पासूनच माबोवर वेगळा धागा काढून त्यावर नेहमी अपडेट्स देत असतेच.

तुमचा रमणीय प्रवास खूप आवडला.
हे लिखाणही सुंदर! बऱ्याच ठिकाणी हसू येत होत... खुसखुशीत.

पुस्तक दर्पण चे व्हिडीओ बघितले तेव्हापासून उत्सुकता होती की कधी/ कशी सुरुवात झाली असेल, तसच सातत्यानं नवनवीन पुस्तक वाचून ती अतिशय रंजक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवताय याच कौतुकही वाटतं.

अजुन असे अनुभव वाचायला आवडतील! शुभेच्छा!

तुमचा आनंददायी प्रवास तुम्ही लेखाद्वारे छान उभा केलात .. तुमचे विडियो मी जमेल तेव्हा पाहते ... तुमची मेहनत जाणवते .
पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा तुम्हांला..!

प्राचीन, पुस्तकाची ओळख करून देताना तुझा हसरा आणि प्रसन्न चेहरा साक्ष देतो की ही सगळी प्रोसेस तू किती मनापासून एन्जॉय करतेस ते ! खूप आशीर्वाद व शुभेच्छा!

>>>>>>त्रस्त गृहिणी मोड वगळता
हाहाहा
तू प्रचंड उद्योगी (आंत्रप्रिनर/उद्योजक) आणि हुषार आहेस प्राची. अ बिग हग टु यु. कमालीचा सुंदर चॅनल आहे तुझा.

किती छान लिहिलस Happy
मुळात तुझा प्रकल्प फार सुंदर, त्या मागची प्रेरणाही फार छान. महत्वाचं म्हणजे तुझं सातत्य, चिकाटी. खरच सगळं कौतुकाचं!
हा सगळा प्रवास छान उलगडून सांगितलास.
अजून काही गोष्टींसाठी खास कौतुक. पुस्तक निवडताना खूप वैविध्य दाखवतेस. तुझा कॅमेरासमोरचा वावर आल्हाददायक, उत्साह देणारा असतो.
मी प्रतिसाद देणं फार केलं नाही पण तुझे बहुतांश व्हिडिओ बघते, आवडतातच. काही पुस्तकं नव्याने कळली. तर काहीं व्हिडिओज पुन:प्रत्ययाचा आनंद देऊन गेले.
मनापासून खूप धन्यवाद. आणि हा उपक्रम असाच चालू रहावा या साठी खूप शुभेच्छा!

खूप छान आणि प्रांजळ लिहिले आहे.
तुझं पहिलं कथावचन आणि आवाज खूप आवडलं होतं.
.
आठवतात ते त्या गणेशोत्सवातले दिवस तेव्हा कथा वाचनात तुझी entry सर्वांना आवडली होती

मस्त लिहिलं आहे!
तुमचा चॅनेल मला आवडतो. अगदी आठवड्याच्या आठवड्याला नाही पण अधून मधून व्हिडीयो बघत असतो. सुरुवातीपासून आत्तापर्यंत खूप चांगले चांगले बदल होत गेले आहेत. आता छान सेटल झाल्यासारखा वाटतो आहे चॅनेल. एकंदरीत स्क्रीप्ट आणि कंटेंट डिलिवरी दोन्हीवर तुम्ही घेतलेली मेहेनत दिसून येते. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा! Happy

उत्तम वर्णन.

पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!

छान प्रवास आणि छान मूडमध्ये लिहिले आहे..
तुमचा चॅनेल आणि त्यावरचा धागा माहीत आहेच. आता हा लेख वाचल्यावर पुन्हा बघायला हवा.. स्पेशली तो अंधारातला व्हिडिओ शोधायला हवा Happy

ममो, छन्दिफन्दि, रुपाली, कविन, आशिका, मामी, अवल, शर्मिला, ऋन्मे §ष, पशुपत, सामो, अस्मिता, किल्ली, पराग मंजूताई, सगळ्यांचे मनापासून आभार.
छन्दिफन्दि, खरंतर मूळ लेख मी अगदी ओतप्रोत लिहिलेला. पण मग स्थळ भान येऊन कटौती केली. अनेक अनुभव सांगायचे राहिलेच.

किल्ली, तुला आठवतंय हे वाचून आनंद झाला. तुझ्या शब्दांश प्रकाशनाच्या अंकात अभिवाचन करणंही छान अनुभव होता.
अवल, सविस्तर कौतुक केलंयस. तुझ्यासारख्या अभ्यासू व्यक्तीच्या चॅनेल पसंतीस उतरणं हे भारी वाटलं.
सामो, भरभरून दाद देणं हे माझ्या पहिल्या व्हिडिओ पासूनच तुझं सुरू आहे. धन्सं.
मामी, रुपाली, अस्मिता आणि इतरही प्रतिसाद देणाऱ्या , पण कदाचित अजून व्हिडिओ न पाहिलेल्या मंडळींना सवडीनुसार चॅनेलवर चक्कर मारण्यासाठी निमंत्रण देत आहे. Bw
पराग, तुम्ही सुरुवातीपासूनच चॅनेल प्रवासाचे पाठिंबा दिलेला स्मरतोय.
मंजूताई, तुम्ही नियमितपणे व्हिडिओ पाहता आणि शिवाय तिथे कमेंट देता, धन्सं.
रूपाली, असाच लोभ असू द्यावा हं.
ऋन्मे§ष, तुम्ही धारप व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुकता दर्शविली आहे, तर प्लेलिस्टमध्ये नक्की मिळेल तो. प्रोत्साहनाबद्दल धन्सं.

छान प्रवास आहे. सातत्य व चिकाटी वाखाणण्यासारखी आहे. इतरांना जोडून घेतल्याने आनंदही बहुगुणीत झाला. मी इतरांना हे चॆनेल रेकमेंड करत असतो.