एखादी घनदाट भावना जेव्हा मनाची पकड घेते तेव्हा शब्दांची फुलपाखरं मनपटलावर फेर धरतात आणि आपण त्यापैकी काही शब्दांना पकडून ती भावना कैद करू पाहतो. आपल्याला फक्त शब्दकल्लोळ ऐकू येतो. जोपर्यंत ही भावना शब्दांना गवसत नाही तो पर्यंत मन था-यावर नसतं. अशीच एक जूनी भावना मनात दाटून आलीय आणि तिला पकडायला शब्द धडपडताहेत. माझ्या मनचक्षूसमोर एक बाजार भरलाय…मी पाहिलेला आठवडी बाजार…
एक सुंदर गजल आज प्रकर्षाने आठवली….
ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी
लहानपणीचा श्रावण फक्त ऊन पावसाचा कुठं असतो. तो तर असंख्य रंजक गोष्टींचा खजीना असतो. त्यात आजीच्या गोष्टी असतात. गोष्टीत प-यांचा ठिय्या असतो. अजूनही बरंच काही असतं. तर आज मी अशाच मनात घर करून बसलेल्या गोष्टीच्या शब्दांचे मणी ओवणार आहे आणि एक स्मरणमाळ ओढणार आहे. अशा अनमोल माळा तुमच्याही मनात रुळत असतीलच.
बालपण सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात, शेतात, मळक्या वाटेत दुडूदुडू धावलं. त्याची किंमत मोठेपणी सव्याज चुकवतोय. शोधतोय हरवलेले निवांत मोकळे श्वास, निर्झराचा खळखळाट, पानांची सळसळ, भन्नाट वा-याची उनाड शीळ, पाखराचं मुक्तपण, रात्री अंगणात झोपताना पांघरलेली चमचम चांदण्यांची दुलई. हरवलेले मायेचे हात.
तेव्हा बाजारात शेतमाल घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा सर्रास वापर व्हायचा. हलकं किंवा अगदीच कमी माळवं/धान्य असेल तर टोपली, पाटी शिर्षस्थ होऊन बाजारात जायची . तर कधी सायकलवर स्वार व्हायची. पाटीत शेण असो अथवा माळवं तिचा मान डोईवरच सर्वोच्च सिहांसनी . पण बैलगाडीचा बाजार वाटेवरचा प्रवास एखाद्या रुबाबदार हत्तीवर ठेवलेल्या अंबारीतून केल्यासारखा असायचा.
बैलगाडीच्या साटीत वैरणीच्या पेंढ्या भरलेल्या. त्यावर माळव्याच्या पाट्या/धान्याच्या गोण्या ठेवत. पाट्या तरटात लपेटून ठेवलेल्या असत. माळवं सुकू नये म्हणून तरटावर पाण्याचा शिडकावा देत.
सकाळी नऊ वाजेपर्यंत बाजारात पोहचायला हवं. त्यासाठी अगदी सकाळी लवकर रानात जायचं. जी लगबग सकाळी पानाफुलातून डोकावयला सुर्याची, अगदी तशीच बाजाराला जाणा-या माणसांची. दिवस उगावयाला रानात जाऊन वांगी, गवार, शेवगा, चवळी, भेंडी, घेवडा, वाटाणा,दोडके, टोमॅटो, भोपळे,कार्ली असे वाण तोडून तागापासून बनलेल्या गोणत्यात अथवा बांबूने विनलेल्या पाटीत भरले जात. गाजर, भुईमूग, रताळी सारखे वाण आदल्या दिवशी शेतातून घरी येत. त्याकाळी ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या बांबूच्या वस्तू बनविण्याचे काम बुरुड/कैकाडी करत. त्यांची उपजीविका टोपल्या, पाटी, कणगी, कणगुली विणून चालायची.
फाटक्या तागाच्या गोणीला तरट म्हणत. गोण्या बाजारातून विकत घेतल्या जात. ग्रामीण संस्कृतीत गोणपाट हरहुन्नरी नट असायचं.
काही ठिकाणी याचं गोणंतं असंही बारसं होतं. गोणपाटाला मिळेल ती भूमिका समरसतेनं करायची एवढं पक्कं ठाऊक. धुळीत अंथरूण तर जेवणाच्या पंगतीत, रानात, शाळेत त्याचे बसकर व्हायचे. गोणपाटाचीच शाळेची दप्तरं, माळवं, धान्य भरायला गोणती. अंगाच्या तानून चिंधड्या उडेतो आतला ऐवज सुरक्षित जपते गोणंतं एखादा किल्ला लढवावा तसे. देशावर पावसापासून बचावासाठी केलेली खोळही गोणीची आणि चिखलाचे पाय पुसायलाही दारी गोणीच.
बाजाराच्या बैलगाडीत माळवं ठेवून उरलेल्या जागेत माणसं बसत. गाडीला बैल जुंपण्यापूर्वी चाकाची कुणी घट्ट असल्याची खात्री केली जायची. चाकाला नळ्यातलं वंगण लावलं जायचं. गाडीतून सामान पडू नये म्हणून कास-यानं बांधलं जायचं. एवढं सगळं झाल्यावर गाडी चालू लागायची. तशा बैलगाडीत बसलेल्या लोकांच्या गावगप्पा रंगत. त्यात गाडीवान ही सामील होत असे. गाडीवान मध्येच बैलांना हाकारायचा. नदी नाले ओलांडताना गाडीवान अधीक सावध व्हायचा. एवढ्या कच्च्या रस्त्यावर दगडधोंड्यातून गाडी डिच्च्याव, डिच्च्याव करत बाजार गाठायची. केवढं वैविध्य असायचं प्रवासात. पावसाळ्यात सगळी रानं हिरवीगार झालेली. शेतात पीकं डोलू लागत. मधेच डोईवर काळे मेघ, मधेच ऊन , मधेच पाऊस. ओल्या गाडीच्या चकारीतून मधेच पावसाच्या पाण्याचे ओहोळ वाहत. कधी कंबरभर स्थिर पाणी असायचं नदी नाल्यात पण बैल व्यवस्थित गाडी पैलतीरावर नेत. उन्हाळ्यात बैलगाडीत थोडंसं माळवं असायचं एक दोन पाट्या मग उरलेली जागा इतर माणसं भरायचे.
बाजार लहानांसाठी आणि काही चैनाड्यांसाठी मौजमजेचं ठिकाण असायचं. लहान पोरांना एखाद्या बाजाराला खूप कीरकीर करून जायला मिळवायचं. पण चैनाडे लोक शिताफीने काही तरी एखाददुसरं किरकोळ काम काढून बाजाराला जातं. काही चैनाडे केवळ विड्याची पानं, बिडीकाडी आणायला जात. नाना चेगंटा सारखे काही तंबाखूचा चुना (चूनखडे) आणायला जात. मैतराबरोबर बिनबोभाट फुकटचे खाणंपीणं व्हायचं. टुरिंग टॉकीजचा सिनेमा देखील मैतराच्याच खिशाला चुना लावूनच व्हायचा. कुणाला पाटीलभत्ता खायचे डोहाळे लागले म्हणून केरसुणी आणायचं काम निघायचं. तर बाब्याची रंभा बाजाराला निघाली म्हणून ना-याचं काम दोरखंडावाचून अडलेलं असायचं. हे झाले बाजारात जाणारे हौसे. तसेच काही चोरीच्या उद्देशाने येणारे गवशे असत. काही ठिकाणी बाजार ऐतवारी असायचा. रविवार म्हणजे ऐतवार. मला तर हा ऐतवार म्हणजे आयत्या मौजमजेचा आयता वारच वाटायचा. असा बाजार तिर्थक्षेत्री असेल तर एक पंथ दो काज असं स्वरुप असायचं. देवदर्शन आणि बाजारही.
पोरांना खेळणी, खाऊ, नवे कपडे हवे असतं. तसं मलाही रस्त्याला लागून असलेल्या हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेल्या जाड्या शेटच्या पुढ्यातल्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या भरणीतले बुंदी लाडू खुणावत. त्यामुळे बाजारात जाता क्षणी मी बाबाला घेऊन लाडू खायला जायचो. मिळेल त्या टेबलाला चिकटलेल्या वेताच्या खुर्चीवर बाबा अन् मी बसायचो. बाबानं एक लाडू माझ्यासाठी मागवयचा पण स्वतः फक्त चहा प्यायचा. नुकतीच अमूलची लाडवांची जाहिरात पाहिली. कॅप्शन होतं लहानपणीच्या असंख्य आठवणी एका घासात. हा लेख तोवर लिहून झाला होता. किती अचूक नस पकडलीय या जाहिरातीत. यावरून पटतं बाजारात प्रेझेंटेशन किती मॅटर करतं .
आठवडी बाजारात विक्रेते जागा मिळेल तिथं बसतात. दाटीवाटीने जिन्नस ठेवतात. तरीदेखील थोडीशी शिस्त असतेच. एका रांगेत भाजीपाला. एका रांगेत कपडे. एका रांगेत मिठाई, भेळ. एका रांगेत किराणा. एका रांगेत पादत्राणे. एका रांगेत दोरखंड, केरसुणी,शिंकी. एका रांगेत मडकी, गाडगी. एका रांगेत टोपली, सुपं,पाटी. एका रांगेत भोवरे,भिंग-या,लगोरी,फुगे अशी खेळणी.एका रांगेत विळे, खुरपी. एका रांगेत पाटे,वरवंटे वगैरे. अशा ग्राम्य जगण्याचा बारकाईने विचार झालेला असायचा. अगदी सुया, बिब्बे,करगुटे यांचीही वाण नसायची.
स्वच्छता सुस्तावलेली असते. त्यांचं कुठं प्रशिक्षण झालेलं असतं. मिळेल त्या जागेवर टोपली, घमेली, पाटी, गोणी घेऊन बसायचं अन् अधूनमधून ओरडायचे….दहा रुपये किलो वगैरे. बाजारात असलेले कट्टे सर्वांना कुठं उपलब्ध असतात. पण हे सगळं एक अद्भुत रंगाचं मिश्रण असतं. त्यात हलणारी, ओरडणारी माणसं, रंगबिरंगी वस्तू, रंगबिरंगी भाज्या, रंगबिरंगी फळं, रंगबिरंगी मिठाया, रंगबिरंगी कपडे असा एक भव्य कलरफुल रंगमंचच तो.
बाबानं माझ्यासाठी तारेवरुन थरथरत खाली उतरणारं माकड घेतलं तेव्हा त्याचा पैसे देतानाचा थरथरता हात पाहिलाय मी. मला सगळं कळत होतं पण वळत नव्हतं. मन माकडासाठी आसुसलं होतं. आपला बाबा खूप पैसेवाला आहे असं वाटायचं. माकडाच्या बदल्यात शिटी नको म्हणालो तेव्हा. शिटी स्वस्त म्हणून बाबाला परवडत असेल.
बाजारला जाणारे सगळेच कुटुंबासाठी थोडेच तिथं जात . चैनाड्यांना तमाशा, टुरिंग टॉकीतला सिनेमा, एखाद्या मटनाच्या खानावळीत मटन आणि दारू हवी असायची. अगदीच पैसे कमी असतील तर एखादा पाटील भत्ता आणि नवटाक मिळाली तरी देव पावला.
ज्याला बाजार समजला तो व्यवहारी जगात तरला असं समजायला हरकत नाही. ज्याला/जिला तो समजत नाही अशांना समजदार माणसं बाजार करण्यापासून रोखतात. या संदर्भात पु. ल प्रकर्षाने आठवतात. त्यांचे चितळे मास्तर गोदी गुळवणीच्या नव-याला सांगतात …
“माझी विद्यार्थिनी आहे हो! संसार चांगला करील. पण बाजारात मात्र खरेदीला पाठवू नका. बारा आणे डजनाचे सहा आंबे चौदा आणे देऊन घेऊन येईल.”
बाजार करणं विसराळू लोकांचही काम नाही. तुम्हाला राम गणेश गडक-यांचा प्रेम संन्यासातला विसरभोळा गोकूळ आठवतो का ? नसेल तर सांगतो. गोकुळला बायको शेरभर साखर आणि तोळाभर केशर दुकानातून आणायला सांगते. गोकुळ दुकानात जातो पण शेरभर केशर की तोळाभर केशर हेच आठवत नाही. बरीच लहाण मुलं दुकानात पळत जात असताना काय आणायचे, किती आणायचे हे मोठ्याने घोकत जातात तरी त्यांचा विसर भोळा गोकुळ कधी होतो हे त्यांचं त्यांनाही समजत नाही. एखादी कविता, लेख, कथा लिहिता नाही आली तरी बिघडत नाही पण वानसामानाची यादी बाजारी माणसाला करता यायला हवी. समजेल अशा सुवाच्य अक्षरात लिहिता आली नाही तरी वाणी आणि औषध दुकानदार एका जातकुळीतील असायला हवेत. तशा ग्रामीण गरजा मोजक्या अन् क्वचित बदलतात त्यामुळे लिहायला न येणा-यांच्या डोक्यातही ही यादी पक्की असते. फक्त विसर भोळा गोकुळ होऊ नये म्हणून शिक्षितही यादीचा आधार घेतात. आठवडी बाजाराच्या यादीचा सराव झालेला ही लग्नाच्या याद्या करताना चारचौघांचा सल्ला घेतो.
एकंदरीत बाजार हे चतुर लोकांचे काम आहे हे चतुर वाचकांना सांगायला नको.
अशीच एका चतुर कोंबड्या विकायला आलेल्या ग्रामीण स्त्रीची भन्नाट कहानी सिद्धहस्त ग्रामीण कथा लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी “बाजार” या कथेत फार सुंदर रित्या चितारलीय. तिचा सारांश…
एका कोप-यात कोंबड्यांचा बाजार भरलेला आहे. या बाजारात एक स्त्री कोंबड्या विकते आहे. डालग्याच्या आत काही कोंबड्या व बाहेर पाय बांधून ठेवलेल्या दोन-तीन कोंबड्या आहेत. अशात ती बाई आडोशाला बसण्यासाठी लगबगीने बाजूला जाते आणि तिच्या बांधून ठेवलेल्या कोंबड्याजवळ एक सासुरवाशीन तिचं बोचकं पुढ्यात घेऊन बसते. थोड्याच वेळात ती अचानक ओरडू लागते. रडू लागते. माझ्या कुडीची सोण्याची फिरकी या कोंबडीनं गिळली. बया माझी सासू मला घरात घेणार नाही. आता काय करायचं. माझं कसं व्हईल रं देवा.
आजूबाजूला भरपूर बघ्यांचा घोळका जमा होतो.
ए बया काय झालं ?
ह्या पाय बांधलेल्या कोंबडीनं माझ्या सोन्याच्या कुडीची फिरकी गिळली.
बघ्यांना कोंबडीने फिरकी गिळली असेल असे वाटते. तेवढ्यात आडोशाला गेलेली कोंबड्या विकणारी बाई तिथे येते. दोघींमध्ये वाद होतो. सासुरवासीन फिरकी मागते आणि कोंबडी वाली तिला म्हणते घे शोधून कोंबडीच्या पोटातून. इतक्यात एक इराणी हॉटेल मालक तिथे येतो. त्याला काही कोंबड्या विकत घ्यायच्या असतात. त्याला जेव्हा कळते एका कोंबडीच्या पोटात सोन्याची फिरकी आहे तो सर्व कोंबड्या पन्नास रुपयांना विकत घेतो.
सोनेरी फिरकी कोंबड्यांवर मिळालेला बोनस समजतो. तो कोंबड्या घेऊन गेल्यावर कोंबड्या विकणारी आपले सामानसुमान आवरून तिच्या गावाला जायला निघते. तिच्या पाठोपाठ सासुरवासीण धावत जाते व ती ज्या एसटीत बसते तिच्याच बाजूच्या सीटवर बसते. एसटी सुटताच कोंबड्या विकणारी बाई त्या सासुरवासणीच्या हातात एक दहाची नोट ठेवून म्हणते बरं झालं बया श्रावणात कोंबड्या कोण विकत घेतंया. तू होती म्हून माझा समदा माल खपला. नाहीतर जाण्यायेण्याचं एसटीचे भाडं पण निघलं नसतं.
अहो बाजारात काही विकायला जायचे तर बोलता यायला हवे. म्हणतात ना बोलणाऱ्याच्या अंबाड्या विकतील पण न बोलणाराचे हिरेही विकले जाणार नाहीत. एकंदरीत बोलघेवड्या माणसाला बाजार चांगला जमत असावा.
आपण उगाच वैतागतो कधी कोणी बडबड करत गोंधळ घालत असेल तर. ये काय बाजार मांडलाय म्हणतो. बाजारावर हा अन्याय आहे. बाजारात विकणारे आणि विकत घेणारे दोघेही आपापल्या फायद्यासाठी बोलत असतात. एवढ्या गदारोळातही अगदी स्थितप्रज्ञतेने व्यवहार सांभाळतात. न सांगताही आपल्या सहज लक्षात यावं “ स्थिरावला समाधिस्थ स्थितप्रज्ञ कसा असे”.
त्यांची ही स्थितप्रज्ञता पाहून मनात धडकी भरते. एवढी साधी सोपी गोष्ट आपल्याला जमेल का म्हणून.
किती वेगवेगळे आवाज येत असतात. या सगळ्या आवाजाच्या भेळीतून आपल्याला हवं ते बरोबर ऐकणं केवढं कौशल्य आहे.
एखाद्या भिडस्त माणसाला आवर्जून सल्ला दिला जातो. भिड ही भिकेची बहीण आहे म्हणून. बाजार करायचा तर निर्भीड मनानं. तिथं द्या, माया, ओळख, पाळख आदी भावनांना थारा नाही. या गोष्टींना थारा दिला तर तुमचा तुकोबा होणार. तुमचे दिवाळे वाजणार. अहो कापड दुकानात तुम्हाला लग्नाचा बस्ता बांधायचाय हे कळल्यावर शेट ४-५ कप चहा मागवतात पण बिलातून वसुली होत असते. भाव फक्त तुमच्यासाठी कमी करतोय असे प्रत्येक ग्राहकाला म्हणायचे असते ग्राहकांचा ऊर भरून यावा म्हणून. त्याचवेळी ग्राहकही सगळं खरं मानत नाही आणि घासाघीस करायचं सोडत नाही.
पण ग्रामीण बाजाराचे स्वरूप याला काहिसं अपवाद असावं. तागडीने केलेले वजन सोनं तोलल्या सारखं नसतं तर अगदी झुकतं माप असतं.
ग्रामीण बाजार व्यवहारापलीकडे असतो. या बाजारात आलेली बहुसंख्य माणसं व्यवहार व्यापार म्हणून करत नाहीत तर गरज म्हणून करतात. त्यामुळे इथं मिळणा-या वस्तू कमी मोबदला देऊन मिळतात. यातील बरेच विक्रेते शेतकरी असतात आणि म्हणूनच नफा झाला की तोटा हेही त्यांना कळत नाही. शेतमाल पिकवताना तो खर्च तंतोतंत कुठे ठेवतो. खत, पाणी, बी बियाणे यांच्या किमतीही नोंदत नाहीत तर अहोरात्र केलेल्या मेहनतीचा मेहनताना कधीच विचारात घेतला जात नाही. किती बी उगवलं किती उगवलं नाही, किती रोगराईत गेलं, किती नासधूस झालं, कुठं असतो सगळा हिशोब. त्यामुळं जे मिळेल ते देवाघरचं देणं एवढंच माहीत असतं.
अन् गरज मानगुटीवर स्वार झाल्यावर तोटा होतोय हे दिसलं तरी नाईलाज असतो.
शेतकरी तेल, मीठ, गुळ, साखर,चहा, मसाले, कपडे घेण्यासाठी शेतमाल विकतात. यातूनच चार पैसे वाचले तर मुलांना गोडधोड खाऊ घालतात.
हा बाजार काहिसा गोड काहिसा आंबट असतो. कसाही वाट्याला आला तरी जगण्यासाठी आवश्यक म्हणून अपरिहार्य असतो. तो लहाणवयात शहरी मुलं व्यापार खेळतात अथवा स्नेहसंमेलनात लावलेल्या स्टॉल इतपत मनोरंजक कसा असेल. हा स्वप्नांचा सौदागर आपल्याला पावेल की रुष्ट होईल हे ही माहित नसतं. हो स्वप्नांचा सौदागरच. अगदी छोटी स्वप्न घेऊन येणारी माणसं इथं येतात . मला एक बुंदी लाडू खायला मिळणं म्हणजे स्वर्ग सुखच होतं तेव्हा. याच बाजारातून आणलेला निळा सदरा बैलांनं शिंग घालून बगलेत फाडला तेव्हा खूप रडलो होतो मी.
ग्रामीण भागात अजूनही सोयरेधायरे आसपासच्या गावातच असतात. रोजच्या कामाच्या धबडग्यात त्यांच्या गाठीभेटी होतीलच असे नाही. पण बरेचदा बाजारात नातेवाईक भेटतात. एकमेकांची खुशाली समजते. बरोबर चहापान होते. तासनतास सुखदुःखाच्या गप्पा होतात. लग्न, समारंभ, पुजा अर्चा आदींचं व्यक्तिशः आमंत्रणं होतं. नात्यांची नीरगाठ पक्की होते. एकमेकांना आधार दिला जातो. निरोप दिले जातात वस्तू दिल्या जातात.
बाजार ग्रामीण जीवनशैलीचे जसेच्या तसे दर्शन घडविणारा आरसाच म्हणायला हवा. या निमित्ताने ग्रामीण संस्कृती, सण, उत्सव याचेही बऱ्यापैकी दर्शन होते. ग्रामस्थांसाठी आठवडे बाजार म्हणजे गरजेच्या जवळ जवळ सगळ्या वस्तू रास्त भावात मिळण्याचे खात्रीशीर मोठे दुकान या दुकानात आजूबाजूच्या गावातले लोक अगदी छोट्या-मोठ्या गोष्टी घेण्यासाठी येतात त्यात धान्य, भाजीपाला , गुळ, साखर, तेल, मीठ, मिरची, हळद, मसाले, भांडीकुंडी, मिठाई , भेळ, फळं, फुलं, खेळणी, कपडेलत्ते, पायतानं,केरसुणी, दोरखंड सूप, उंदीर पकडायचा पिंजरा, पाळण्याची पुस्तके अशा वस्तू मिळतातच पण याव्यतिरिक्त अगदी कल्पने पलीकडील किरकोळ गोष्टी हमखास मिळत.
करमणूकीसाठी एखाद्या कोप-यात तमाशाचा तंबू, मौत का कुवा, जादूगार, सापवाला, डोंबारी पाल लावून असतं.
बाजार उठताच घरी जायची घाई एखाद्या शहरी नोकरदारासारखीच असते. तिकडं गावात बाजारच्या वाटेकडे लहान मुलं डोळे लावून बसतात. घरी बाजारचे गाठोडे सुटेतोवर धीर नसतो. मग एकदाचं गाठोडे सुटते. आत काय हे पहायचं कुतुहल जागतं. उघडल्यावर थोडा आनंद, थोडी निराशा असा संमिश्र भाव असतो. रुसवे फुगवे होतात.पुढच्या बाजाराचे अमिष दाखवलं जातं. म्हणूनच.....
बाजार रंगबिरंगी स्वप्नांचा. बाजार आशा,निराशेचा. बाजार देवाणघेवाणीचा. बाजार श्वासांना जिवंत ठेवणारा, गुदमरवणारा. बाजार जिद्दीचा, चिकाटीचा. बाजार कंजूसीचा,बुध्दीकौशल्याचा. बाजार रंगबिरंगी माणसांचा. बाजार माणसांचा, माणसांसाठीचा, माणसांनी भरवलेला. बाजार लहानथोरांना ओढ लावणारा.
दत्तात्रय साळुंके
चित्रदर्शी लेख. गद्य काव्य.
चित्रदर्शी लेख. गद्य काव्य. अगदी रिलेट झाल. धन्यवाद.
चित्रदर्शी लेख.>>+११
चित्रदर्शी लेख.>>+११
सुंदरच . . .
छानच !!!
छानच !!!
कोकणात आठवडी बाजार मोठे नसतात पण आसेच रंगीबेरंगी, कदाचित जरा जास्तच, आणि, बैलगाड्या नाहीं, तर -
अर्थात, " मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी ", तिथंही लागू होतंच !
फारच सुंदर चित्र रेखाटलं आहे.
फारच सुंदर चित्र रेखाटलं आहे. खुप आवडलं...
गणेशोत्सवाच्या धाग्यांमध्ये हे वाचलं गेलं नाही असं नको व्हायला.
भाऊ >>+१
भाऊ >>+१
हा लेख आणि हा फोटो. जबरदस्त.
आमच्याकडे कोकणात भरतो असाच
आमच्याकडे कोकणात भरतो असाच आठवडी बजार गावोगावी अजून ही पण आता तो आठवडी राहिला नाहीये. घरोघरी बाईक आणि गाड्या असल्यामुळे लांबच्या गावच्या बाजारांना ही मुलं जाऊन वस्तू घेऊन येतात.
भाऊ , मस्तच ...
सुंदर, चित्रदर्शी लेख!
सुंदर, चित्रदर्शी लेख!
कथा, गप्पागोष्टी, लेखांतून
कथा, गप्पागोष्टी, लेखांतून ओळख झालेला हा गावाचा बाजार, आज पुन्हा नव्यानं गवसला, भावला! सुंदर लेखन...
खूप सुंदर लेख, बाजारातील
खूप सुंदर लेख, बाजारातील गोडिशेवेसारखा संपूच नये असा.
कुमारसर, केशवजी ....
कुमारसर, केशवजी ....
खूप खूप धन्यवाद . लेख आवडला भरुन पावलो..
भाऊ नमसकर
तुमच्यामुळे कोकणातल्या बाजाराचा अल्प परिचय झाला. खूप आभार...
मनीमोहोर...
तुमची जी तादात्म्यता कोकणाशी आहे तशीच माझी घाटावरच्या प्रदेशाशी. तुमच्याशी सहमत आहे. हल्ली बाजाराला अल्पशी ओहोटी लागलीय. मोटारसायकलने भरपूर पर्याय मिळतात.गावाकडचे लोकही कधीं कधीं पुण्यात मॉलमध्ये खरेदी करतात. पुणे जिल्हयात दिवेघाटाच्या पायथ्याशी कपड्याची घाऊक दुकानं झालेत. लग़्नाचे कपडे खरेदीसाठी गावाकडचे लोक इथं येतात. त्याचा परिणाम आठवडी बाजारावर होतो. प्रतिसादासाठी अनेकानेक धन्यवाद.
स्वाती २.... .
प्रोत्साहनासाठी खूप धन्यवाद...
abuva...
तुमची अंतर्मनाची दाद भावली.
आग्या१९९०-
गोड प्रतिसाद आवडला. BTW ही गोडीशेव माझा वीक पॉइंट आहे.
छानच !
छानच !
अतिशय भावस्पर्शी लेख ..!
अतिशय भावस्पर्शी लेख ..!
आमच्या भागात अजून आठवडी बाजार भरतात .. ऑफीसच्या खिडकीतून आठवडी बाजार नेहमी माझ्या नजरेस पडतो ... तो बाजार पाहिला की पुस्तकातल्या बाजाराचे चित्र माझ्या मनात उभे राहते .
प्रचंड वाचनीय व रसरशीत लेख!
प्रचंड वाचनीय व रसरशीत लेख! व्वा!
अतिशय चित्रदर्शी लेख. मला
अतिशय चित्रदर्शी लेख. मला मनापासून खूप खूप आवडला.
तुम्ही मला या लेखातून स्मरणरंजनात नेल आहे.
मी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत गावी गेल्यावर हे आठवडी बाजार प्रत्यक्ष अनुभवले आहेत. आमच्या घरच्या शेतीतील माळवं घेऊन ते मी आठवडी बाजारात विकलेले आहे. मेढा, पांचगणी आणि महाबळेश्वर येथील बाजारात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी जायचो. आदल्या दिवशी संध्याकाळी वांगी, काकडी, टोमॅटो, मिरची, गवार, भेंडी तोडून मग ती पाट्यात भरून त्यावरून करंजाचा पाला टाकून वरून त्या बारदानाने शिवून घ्यायचो. मेथी उपटून त्याच्या पेंढ्या केळ्याच्या सोपटाने बांधून त्या विहिरीत टाकायचो. त्यामुळे त्याची माती वेगळी व्हायची व ती ताजी पण राहत असे. हे सगळ रात्रीच शेतातून घरी आणून ठेवायचं. आदल्या रात्रीच पिशवीत तागडी एक आणि अर्धा कीलोच वजन आणि पाव किलोचा दगड टाकून ठेवायचा. सकाळी उठून चपात्या कागदात गुंडाळून घ्यायच्या.सहा साडेसहाला एक तरकारीचा ट्रक असायचा, तो बशीसारखा सगळ्या गावात थांबायचा.त्यात सगळे आपापला माल भरायचे. मला त्या ट्रकच्या टपावर बसायला आवडायचे. वाटेत उंच झाडे वैगरे आली कि खाली वाकायचं. जाम मजा यायची. बाजारात उतरल की मग प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या असायच्या. काही जणं माल खूप असेल तर मग तिथे डायरेक्ट लोकांना किरकोळ विक्रिसाठी द्यायचे. त्यांच्यासाठी मोठा गिऱ्हाईक म्हणजे एकतर हॉटेलचे मालक किंवा धरण कामगारांचा मुकादम कारण तिथे खूप माल एकदम विकला जायचा. मी मात्र जेवढे काही घरचे माळव असे ते घेऊन विकत असे. पूर्ण दिवस फार मजा येत असतात जिथे मी बसत असे त्याच्या मागच्या घरातील काकू मला कळशी भरून देत असत मग त्यालाच ओला रुमाल लावून दिवस दिवसभर त्या कळशीतील पाणी पीत असे आणि त्यांना माझ्याकडची शेलकी भाजी निवडून देत असे. अनेक प्रकारचे गिऱ्हाईक पाहायला मिळत. पांचगणी महाबळेश्वरचे काही सुशिक्षित गिऱ्हाईक फार घासाघीस करत नसत. काही ओळखीचे गिऱ्हाईक पुढल्या बाजारात येताना आम्हला घरची अळूची पाने, गावठी अंडी, कडुलिंबाचा पाला, घरच्या डाळी, सांडगे पण आणा अशी पर्सनल यादी देत. दुपारी जेवणाला बरोबरच्या चपाती घेऊन हॉटेलमध्ये जाऊन भाजी मागवत असू. बरोबर असणारे सुद्धा घरून आणलेल्या भाज्यांची देवाणघेवाण होत असे. येणाऱ्या सर्व बरोबरच जेवण जेवायला फार मजा यायची त्या हॉटेलमध्ये मटार उसळ आणि अंडा करी फारच चविष्ट मिळत असे. माझ्या जिभेवर तर अजूनही त्याची चव रेंगाळते आहे. जेवण होईपर्यंत ओळखीच्या कोणालातरी माल विकायला बसवून यावे लागे. दिवसभर अधूनमधून बाकीचे जण काय करतायेत त्यांची विचारपूस बाजारात काय काय विकायला आले कोणकोण आपल्याकडचा माल कुठल्या भावाने विकत आहे, याचा अंदाज घेतला जाई. संध्याकाळी शेव चिवडा व चहा होत असे. त्याआधी घरून काही बाजार आणायला सांगितलं असेल तर ती खरेदी व्हायची. संध्याकाळी निघायच्या वेळी सगळ्यांना आपला माल संपवायचा असे मग पडेल त्या भावाला माल विकून सगळे परत निघत असत. बाजाराच्या सुरुवातीला जो भाव पाव किलोचा तो आता किलोला आलेला असे. मी तर राहिलेल्या मालाचा ढिग करून ते ढिग विकत असे. काही चाणाक्ष मंडळी बरोबर हीच वेळ साधून येत असत आणि पाव किलोचा भाव सुद्धा आणखी पाडून मागायची तेव्हा फार राग यायचा त्याचवेळी मला भास्कर चंदनशिव यांचा लाल चिखल धडा आठवत असे आणि त्या शेतकऱ्याची अगतिकता अनुभवता येत असे. पुन्हा येताना आज बाजार कसा झाला, किती माल विकला, नफा झाला की तोटा झाला याच्या सगळ्या गप्पा व्हायच्या. सगळे जण आनंदात असत. त्या बाजारातल्या लोकांबरोबर घालवले ते क्षण आणि त्यांच्याबरोबर त्या आठवणी अजूनही माझ्याबरोबर आहेत. आता फारसं जाणं होत नाही मागे एकदा महाबळेश्वर पाचगणीच्या बाजारात गेलो होतो पण बरच बदललेलं वाटलं सगळं. बऱ्याच जणांनी आता Gpay स्कॅनर लावले होते.
पुन्हा एकदा तुम्ही या सर्व आठवणींना उजाळा दिलात त्याबद्दल धन्यवाद असेच लिहित रहा
निवडक दहात नोंद करतो.
चित्रदर्शी + १
चित्रदर्शी + १
मी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत गावी गेल्यावर हे आठवडी बाजार प्रत्यक्ष अनुभवले आहेत +१
आवडला लेख.
ऋतुराज छान लिहिलंय , मजा आली
ऋतुराज छान लिहिलंय , मजा आली वाचताना ... सातारा भागात कंच म्हनायचं वो तुमचं गाव ?
सातारा भागात कंच म्हनायचं वो
सातारा भागात कंच म्हनायचं वो तुमचं गाव ?>>>>> आखाडे, हायवेला पाचवड आहे, तिथून आत ८-१० किलोमीटर.
आखाडे, हायवेला पाचवड आहे,
आखाडे, हायवेला पाचवड आहे, तिथून आत ८-१० किलोमीटर. >> हो का ! पाचवड माहितेय... शिवाजी महाराजांच्या मुलीचा मोठा वाडा आहे त्या गावात.
ऋतुराज....
ऋतुराज....
तुमचा अनुभव भारी आहे. त्यात नुसता व्यवहार नाही. मी ही लेखात म्हटलंय ग्रामीण बाजार व्यवहारापलीकडे असतो. त्याचं दर्शन तुमच्या प्रतिसादात घडते. तुमचे ग्राहकांशी जडलेले ऋणानुबंध खूप काही सांगून गेले. आमच्या गावात तरकारीचा ट्रक येत नसे. टपावर बसण्याचा अनुभवही मस्त. छय्या छय्या गाणं आठवलं. शाहरुख म्हणून रेल्वे पण आपल्यासाठी ट्रकच फीट. आमच्याकडं करंजा ऐवजी कडूलिंब वापरत. हॉटेलातल्या त्या चवी आता तशा लागत नाहीत का कोण जाणे? यावर एक लेख अर्धवट लिहिलाय. बाजार उठताना माल विकणं खरच वेदनादायी होतं. खरंच लालचिखल पाचविलाच पुजलेला.
तुमचा अनुभव काहिसा युनिक आहे असं वाटलं.
खूप धन्यवाद सुंदर अनुभव शेअर करण्यासाठी.
बेफिकीरजी....
@बेफिकीरजी....
खूप धन्यवाद अंगावर मूठभर मांस चढलं
@तोमीन
अनेकानेक धन्यवाद....
@रुपालीताई ....
खूप आभार<<<ऑफीसच्या खिडकीतून आठवडी बाजार नेहमी माझ्या नजरेस पडतो ... >>>> विंडो शॉपिंग होतं का? BTW मी मुंबईला सुरवातीला फोर्टला खूप विंडो शॉपिंग केलंय.
ममो...कोकणासारखे सातारशीही ऋणानुबंध आहेत वाटतं...
@अनिंद्य....
खूप खूप धन्यवाद....
सुंदर लेख
सुंदर लेख
Sparkle... अनेकानेक धन्यवाद.
Sparkle...
अनेकानेक धन्यवाद.
सुरेख, चित्रदर्शी लेख.
सुरेख, चित्रदर्शी लेख.
प्रतिसाद वाचते निवांत.
किती सुंदर
किती सुंदर
सर्व प्रतिसादांना +786
सर्व प्रतिसादांना +786
सुंदर आणि चित्रदर्शी लिहिले आहे.
ऋतुराज यांची पोस्ट सुद्धा आवडली.
मला अनुभव नाही फार अश्या बाजारांचा. म्हणजे पाहिले आहेत, पण ते गावचा चार दिवसांचा पाहुणा म्हणून. तश्याने नाळ जुळत नाही. पण कल्पना असल्याने वाचायला आवडले.
सर्व प्रतिसाद +११
सर्व प्रतिसाद +११
खूपच छान वर्णन आहे.
सोन्याची फिरकी विशेष आवडली.
गोणपाटाला मिळेल ती भूमिका
गोणपाटाला मिळेल ती भूमिका समरसतेनं करायची एवढं पक्कं ठाऊक. °°°°°गोणीच.>> किती साध्या वस्तूचे वेगवेगळे पदर/कि तागे म्हणावं इथे? तुम्ही उलगडून दाखविले आहेत.. संपूर्ण लेख सुरेख आहे. जीवन, साहित्य आणि अनुभव यांची वीण सहजपणे घातलेली आहे. त्यांमुळे हा 'बाजार ' गजबजलेला जाणवतोय.
लेख आवडला
लेख आवडला
ऋतुराजचा प्रतिसाद देखील सुंदरच
मला फारसे जायला मिळाले नाही.
एकदा सुट्टीला गावी गेलो होतो.
मला सोडायला येताना काका आणि मोठ्या काकूने गवार तोडून घेतलेली.
कोपुत कुठल्यातरी मार्केट मध्ये विकायला गेलो होतो.
फार लहान होतो.
आमची जवारी गवार ( गावरान वाण ) सव्वा रु पाव आणि हायब्रीड एक रु पाव असा दर आठवतोय.
उन्हात बसून कंटाळलो होतो.
भूक लागली असेल म्हणून काकाने हॉटेलातून भजी आणून दिले होते ( जे मला आवडले नव्हते ) असे आठवतंय.
मोठी चुलत बहीण पन्हाळ्याला जायची शेतातले माळवे विकायला. आली की बरेच वर्णन करून सांगायची.
मी येतो म्हणालो तरी न्यायचे नाहीत.
कारण गाव ते पन्हाळा चालत जायचं ते ही चढ चढत.
नंतर जरा मोठा झालयावर मावशीचे गाव ते पन्हाळा असेल 6 ते 7 किमी. गावरान आंबे, शेतातले थोडेफार तांदूळ वै विकायला मावशी जायची. एका मी आणि मावसभाऊ दोघे गेलो होतो. मावशी ST की दुधाच्या टेम्पोने गेली होती.
आम्ही गावातल्या दुसरया मुलांसोबत शॉर्टकटने चालत.
आम्हाला काय विकायला बसायचे नव्हते. केस कटिंग पन्हाळ्यात जाउन करायचे होते नाहीतर गावात पोत्यावर बसून झिरो कट मारायला लागला असता म्हणून तो प्लान.
तेव्हा पाहिलेला बाजार देखील अंधुक आठवतोय.
नंतर नंतर मी कॉलेजात आलो.
वडिलांच्या पगारात माझं सायन्स साईडचं शिक्षणाच गणित ताळमेळ लागेना.
वडिलांनी रविवारी लक्ष्मीपुरी कोंडाओळ की धान्यओळ येथे आठवडी बाजारात किरकोळ गूळ विक्री करायचे ठरवले. रविवारी ही होलसेल दुकान बंद असायची.
मी मंदतनीस म्हणून जायचो. रद्दीतल्या बातम्या वाचणे ह्यात जास्त लक्ष. गुळ पेपरात बांधून देणे पैसे घेणे हे काम करायचो. विशेष लेख पुरवणी असलेला पेपर बाजूला ठेवायचो.
तुम्ही विक्रेते आहात की ग्राहक त्यावर तुमचे बाजारात दोस्त बनतात. समोरच एकजण लसूण आणि कोपु कांदा मसाला साठी लागणारे धने वै देखील विकायचा.
त्याचाही ओळख छान झालेली इतकी की त्याला आमच्या एरिया मधील एक मुलगी लग्नसाठी सांगून आली होती तर माझ्याकडे त्यांचे घर वै चौकशी केलेली त्याने.
डब्यात आई चपाती भाजी द्यायची. बाजूलाच बरेच केळेवाले विकत असायचे , त्यांच्याकडून 3 किंवा 4 केळी जेवताना सोबत म्हणून घ्यायचो. त्या मावशी देखील छान पिकलेल्या केळी द्यायच्या. मी कॉलेजला जातो वै माहीत होतं त्यांना. नंतर तर लाडाने जावई बापू म्हणायच्या. मी लाजायचो तर जास्त चिडवत असायच्या आणि हसायच्या. बाकी किरकोळ गूळ विक्री करणाऱ्या इतर लोकांसोबत देखील ओळख झालेली.
त्यात 2 मुस्लिम भाभी होत्या.
त्यांचं मराठी मिश्रित हिंदी ऐकत मजाच यायची.
मुस्लिम समाजातील।ग्राहक आली की हे बोलणे ऐकायला मिळायचं.
कन्नड भाषिक ज्यांना लमाण म्हणतात अशा समाजाचे लोक स्वस्तात मस्त गूळ शोधायचे नेहमी
नाश्त्याला सांजा गूळ घालून असायचा त्यांच्याकडे.
हे लोक बाजार संपताना यायचे जेणेकरून त्यांना उरलेला माल स्वस्तात मिळेल.
त्याततलेही काहीजण नेहमीचे ग्राहक होते.
लेख आणि ऋतुराजचा प्रतिसाद आठवून बऱ्याच गोष्टी आठवल्या. स्मरणरंजन
झकासराव तुमचे अनुभवही
झकासराव तुमचे अनुभवही निसर्गसुंदर गावातले. ऋतुराज आणि तुमचा परिसर खूप सुंदर आहे. मी तेवढा नशीबवान नाही.
तुमची रद्दी पेपर वाचण्याची सवय माझ्या वडिलांनाही होती. ताजा पेपर वाचायला ते प्राथमिक शाळेत जात. तेव्हा आमच्या गावात फक्त शाळेत पेपर येत असे. गुळाची विक्री मीही केलीय. गवार आमच्याकडेही गावरान असायची. मला तिचीच चव आवडायची. बाजारात लग्न जुळतात हा तुमचाही अनुभव आहे. तुमचेही बाजारातल्या माणसांशी छान मैत्र जुळलेलं. ग्रामीण मुस्लिम भाभीच हिंदी साधारण असं असावं..
"गफूर भागते भागते आता आन धप्पकून पड्या, गाडगं बी फुट्या आन कालवान बी सांड्या."
कुणीतरी मलाही खरेखुरे जावई करु पहात होते. आपल्याला मार्केट आहे याची खात्री पटल्यावर लग्नाळू मुलांचा आत्मविश्वास वाढतो
लमाण गरीब असत. त्यांचा उदरनिर्वाह मोलमजुरी करून चालायचा. त्यामुळे बाजार उठताना येत असावेत.
एकंदरीत तुमचे अनुभवही वजनदार आणि बहुमोल असेच आहेत.
खूप धन्यवाद सुंदर प्रतिसादाबद्दल..
अन्जू...
अन्जू...
रेव्यू....
लेख आवडला... खूप खूप धन्यवाद...
ऋन्मेष ...
कधी वेळ मिळेल तेव्हा आजूबाजूला आठवडी बाजार असेल तर तुमच्या मुलांना फेरफटका मारुन या... खूप धन्यवाद...
किल्ली...
खूप धन्यवाद...
प्राचीन...
>>>जीवन, साहित्य आणि अनुभव यांची वीण सहजपणे घातलेली आहे. >>> खूप धन्यवाद या सुरेख शाबासकीसाठी...
Pages