आरोग्यदायी पेय - काळ्या गाजराची कांजी {अल्पना}

Submitted by अल्पना on 17 September, 2024 - 12:37

या वर्षी मार्च - एप्रिल मध्ये एका मैत्रिणीने मला लॅक्टो फरमंटेशन / किण्वन या प्रकाराशी तोंडओळख करून दिली. तिने कंबुचा चे विरजण दिलं, कसं करतात हे शिकवलं. तो प्रयोग करून बघितला आणि हे नवं पेय मला आवडलं. त्याच दरम्यान तिने घेतलेला एक या विषयावरचा कोर्स मला कराय्ला मिळाला. कंबुचा व्यतिरिक्त जिंजर बग आणि रेझिन वॉटर वापरून केलेले फ्रूट सोडा, मॅक्सिकन तपाचे, काफिर ग्रेन्स वापरून केलेले काफिर योगर्ट अश्या काही नव्या पेयांची आणि अजून बर्‍याच पदार्थांची माहिती या दरम्यान मिळाली. किण्वन केलेले भारतिय पदार्थ शोधताना काळ्या गाजराची कांजी, आंबिल या पदार्थांची नावं आठवली. यातली कांजी माझ्या सासरी पारंपारिक रित्या पूर्वापार केली जाते. माझे चुलत सासरे खूप छान कांजी बनवतात. त्यांना आणि सासूबाईंना विचारून मी यावेळी पहिल्यांदा कांजी बनवली.
दिल्लीमध्ये होळीला कांजी पिण्याची पद्धत आहे. माझ्या सासरी मात्र जरा उशिरा उन्हाळ्यात कांजी पितात. कांजी खूप थंड असते प्रकृतीसाठी. मार्च पर्यंत पंजाबमधला हिवाळा संपलेला नसतो, म्हणून सहसा उन्हाळा सुरु झाल्यावर पण गाजर बाजारात असेपर्यंतच्या काळात कांजी बनवतात आमच्या घरी.

साहित्य:
एक किलो काळे गाजर , एक चमचा मिरे, तिन चमचे राई, एक चमचा तिखट, दोन चमचे मीठ, एक चमचा काळं मीठ, दोन लीटर पाणी
कृती:
गाजर सोलून बोटभर लांबीचे आणि पेरभर जाडीचे उभे तुकडे करावेत. गाजरामध्ये असलेला आतला पांढरा भाग काढून टाकावा.
खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये मिरे आणि राई एकत्र जाडसर कुटून घ्यावी.
एखाद्या मोठ्या मातीच्या भांड्यात गाजराचे तुकडे, कुटलेले मीरे -राई आणि इतर साहित्य एकत्र करावं. व्यवस्थित हलवून त्या भांड्याच्या तोंडावर कापड बांधावे. हे भांडे ३ ते चार दिवस उन्हामध्ये ठेवावे.

WhatsApp Image 2024-09-16 at 7.34.55 PM (1).jpeg
कांजीची बरणी.

रोज एक -दोन वेळा सगळं मिश्रण हलवून परत कपडा बांधावा. ३-४ दिवसांत कांजी प्यायला तयार होते.

WhatsApp Image 2024-09-16 at 7.34.56 PM.jpeg

थोडी आंबूस, तिखट अशी चव असते कांजीची.
अधिक टिपा:
कांजी खूप थंड असल्याने उन्हात बसून किंवा दुपारच्या वेळी प्यावी असं म्हणतात. थंडीच्या दिवसांत कांजी प्यायल्यास बाधू शकते. मातीचे भांडे नसल्यास चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये कांजी बनवता येवू शकते. पण मातीच्या भांड्यात बनवलेल्या कांजीचा स्वाद वेगळाच येतो. ही कांजी १५-२० दिवस फ्रीजमध्ये टिकू शकते. काळे गाजर न मिळाल्यास साधे गाजर आणि बीट एकत्र करून कांजी बनवता येते.
कांजीमध्ये आरोग्यदायी चांगले जिवाणू असतात जे आतडयांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. खूप चांगलं प्रोबायोटिक पेय आहे हे.
शिवाय काळ्या गाजरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी ऑक्सिडंट्स असतात. नेहेमीच्या गाजरातली सगळी जीवनसत्वे तर असतातच.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अहाहा! काय सुरेख रंग आलाय

या प्रकाराबद्दल वाचले होते पण कधी करायचे धाडस केले नव्हते (बुरशी लागेल का? चव आवडेल का? नीट जमलेय करायला हे कळेल का? असे बरेच का का वाटेत असल्याने मी करायला का कु करत होते :फाको समाप्त:) करुन बघेन तुझ्या पद्धतीने आधी एकाच गाजराची करेन आणि काचेच्या बरणीत करेन. नुसत्या बीटाचीही सेम पद्धतीने करतात ना? तिची चव अशीच लागते का म्हणजे या प्रकारची पेये थोडी आंबट थोडी मसाल्यामुळे हलके स्पायसी आणि अंगची चव जी असेल ती अशी एकत्र चवीची लागतात का?

अजून कशा कशाची कांजी बनते?

मला फक्त गाजराचीच माहिती आहे. बीटाची पण करतात काही जण आणि काही जण बीट + गाजर करतात. नुसत्या गाजरा ऐवजी बीट + गाजर कर. म्हणजे छान रंग पण येईल.

प्रकारची पेये थोडी आंबट थोडी मसाल्यामुळे हलके स्पायसी आणि अंगची चव जी असेल ती अशी एकत्र चवीची लागतात का?>> हो. राई किंवा मोहरी फरमंटेशन ला मदत करते. त्याचा आणि बाकी मसाल्यांचा एकत्र तिखटपणा आणि आंबल्यामूळे आंबटपणा जाणवतो.

मस्त रंग आलाय..
कोकम सरबत प्रेमी असल्याने त्या जवळ जाणारा हा रंग सुद्धा आवडला Happy

कांजी बद्दल फक्त वाचलं आहे. कधी प्यायलेली नाही.
कृती सोपी दिसते आहे. >
+११ अमितव
हे वाचून बीटामृत आठवलं मालती कारवारकर यांचं

अल्पना, उरलेल्या गाजराच्या तुकड्यांचे काय करायचे? म्हणजे हे फरमेन्ट झालेले पाणीच फक्त कांजी म्हणून पितात की त्यात मुरलेले तुकडेही घालून घेतात की ते वेगळ्या प्रकारे संपवतात (म्हणजे सॅलड्स मधे घालून वगैरे) (अडाणी प्रश्नासाठी माफी द्यावी Proud )

निवांत वाचली.
मस्त आहे आणि रंग सुद्धा सुरेख आलाय.
आमच्या कॉलेजमध्ये एक कपूर मॅडम होत्या त्यांच्याकडून या कांजीबद्दल ऐकलं होत.
पण प्रत्यक्षात कांजी पिण्याचा योग गेल्या वर्षी हरिद्वारला आला. तिथे कांजीवडा खाल्ला/ प्यायला. त्यात ती मोहरीची चव तिखटपणा, आंबटपणा, चरचरीत वेगळी वाटली.
आता तुमच्या पद्धतीने करायला हवी.
कविन म्हणतेय तसं ते जमेल का ही शंका.
लॅक्टो फरमेंटेड भाज्या बद्दल एक वेगळा धागा काढून लिहाल का?

काय काय मस्त उद्योग करता तुम्ही सगळे.सोवर डो काय, ही अशी प्रो बायोटिक पेये बनवायचा कोर्स काय.
रंग खूप मस्त आला आले.घरी बनवणार नाही(कंटाळा) पण कोणी आयते प्यायला दिले तर मस्त.

उरलेल्या गाजराच्या तुकड्यांचे काय करायचे?>>>> बरेच जण कांजी पिताना त्यात एखादं दोन तुकडे पण घालतात. नुसतीच कांजी प्यायली आणि हे तुकडे उरले तर ते पिकल्ड भाज्यांप्रमाणे खाता येतिल. ते पण फरमंट झालेले असतातच. सलाड मध्ये घालता येईल, किंवा हमस आणि पिटा बरोबर पिकल्ड गाजरं आणि बीट खाता येईल. फक्त कांजी संपेपर्यंत ही गाजरं पण संपवावी लागतील. ती जर पाण्यात बुडलेली नसतील तर बुरशी लागून खराब होतील.

त्यात ती मोहरीची चव तिखटपणा, आंबटपणा, चरचरीत वेगळी वाटली.>> हो. आपल्या नेहेमीच्या आंबट -तिखट पणा पेक्षा वेगळी चव असते. चरचरीत आंबट -तिखटपणा हा योग्य शब्द आहे चवीचे वर्णन करायला.

लॅक्टो फरमंटेशन बद्दल लिहिन थोडं. अजून २-३ प्रयोग होवून गेल्यावर. आत्तापर्यंत sauerkraut, कम्बुचा, लॅक्टो फरमेंटेड गाजर- काकडी, कांजी, आंबिल आणि सावर्डो एवढेच प्रयोग करून झालेत.

काय काय मस्त उद्योग करता तुम्ही सगळे.सोवर डो काय, ही अशी प्रो बायोटिक पेये बनवायचा कोर्स काय.>> पूर्णवेळ डिमांडिंग नोकरी नसली, हातात प्रोफेशनल काम नसलं कि मग वेळ घालवायला हे असं सगळं केलं जातं. बाकी काही नाही. त्यात नविन काही ऐकलं कि ते करून बघितलंच पाहिजे, शिकलंच पाहिजे असा स्वभाव आहे. बर्‍याचदा शिकलेल्या गोष्टी एकदा का नीट जमायला लागल्या कि बाजूला पडतात. परत केल्या जात नाहीत.

Outstanding ! रेसिपी, रंग, प्लेटिंग सरस.

कांजी आणि कांजीबडे बृजक्षेत्र, राजस्थान भागात होळीचा फ़िक्स मेन्यू ! सोबत दहीवडे आणि दही पापडी चाट. हे व्हेरियेशन मस्ताय.

… लॅक्टो फरमंटेशन बद्दल लिहिन थोडं. आत्तापर्यंत sauerkraut, कम्बुचा, लॅक्टो फरमेंटेड गाजर- काकडी, कांजी, आंबिल आणि सावर्डो ….

हे अवश्य करा.

@ काली गाजर

आमचे एक लखनौकर भोजनरसिक डॉक्टर मित्र “काली गाजर का जौजी हलवा” बद्दल इतके भरभरून सांगायचे. Bless his soul. त्यांच्या आज़मगढ़च्या शेतात फक्त हलवा आणि या काळ्या कांजीसाठी ‘काली गाजर’चे वाण लावले जाते. शौकीन लोकं तिप्पट मोल देऊन ही गाजरं विकत घेतात.

हे अल्कोहोलिक होतं का?>> साधरणत: २५ ते ३० सेल्सिअस तापमानाला तिन दिवस ठेवलं तर होत नाही अल्कोहोलिक. जर जास्त दिवस (४-५ पेक्षा ही जास्त) दिवस ठेवलं तर माइल्ड अल्कोहोलिक होवू शकतं. (अंदाजे ०.५ ते २ % पर्यंत).
कांजी किंवा कंबुचा सारखी प्रोबायोटिक पेये बनवताना त्यावर फक्त कपडा झाकलेला असतो किंवा झकण अर्धवट लावलेलं असतं. हवा आणि हवेतले जिवाणू आत जावू द्यायचे असतात. कपड्याने झाकणं / किंवा झाकण अर्धवट लावणं आणि दिवसातून एकदा हलवून घेणे यामूळे कांजीचा हवेशी आणि ऑक्सिजनशी संपर्क येतो. यामूळेच कांजीत अल्कोहोल बनत नाही.
गाजरावर असलेले जिवाणू (लॅक्टोबॅसिल बॅक्टेरिया) गाजरामधल्या साखरेचे लॅक्टिक अ‍ॅसिड मध्ये रुपांतर करतात. हे करताना कार्बन डाय ऑक्साइड तयार होतो आणि लॅक्टोबॅसिल बॅक्टेरियाचे प्रमाण वाढत जाते. हे जिवाणू आरोग्यासाठी चांगले असतात.
कांजीमधून बी१२ पण मिळते.

<<काळे गाजर असते हेच मुळात माहीत नव्हते>>
माझ्याच बोटीतील सहप्रवासी Happy
रंग कातिल आहे एकदम, कांजीचा..

छान. सुरेख रंग.

काळे गाजरच माहिती नाहीये. लाल, केशरी असतात इथे. अल्पना काळ्या गाजराचा फोटो नक्की शेअर कर.

अल्पना, मी प्रयत्न करुन बघितला. रंग अर्थात तुझ्या वरच्या कांजी सारखा नाही आलाय कारण गाजरं काळी किंवा लालसरही नव्हती. फिकट केशरी गाजरं होती आणि एक बीटरुटही घातले मी. चव मला आणि बर्‍या अर्ध्याला आवडली. लेक त्याबाबतीत न्युट्रल होती म्हणजे खूप आवडली असे नाही आणि आवडलेच नाही असेही नाही.

खरोखरीची मुळची चव कशी असते हे एकदा कुठे रेडीमेड मिळत असेल तर ट्राय करुन बघायला हवे म्हणजे समजेल मी केलेय ते किती बरोबर जमलेय Proud करत राहीन प्रयोग अगदी एक गाजर्+१ बीट असे घेऊन.

IMG_20241004_095733.jpg

मस्त आहे हे, रन्ग किती सुरेख आलाय.
नेटफ्लिक्स वर राजा, रसोई अस काहितरी नावाची सिरिज होती त्यात "कालि गाजर का हलवा" हे डेलिकसी म्हणून राजा रजवाडे बनवायचे अस दाखवल होत...
अल्पना आपल्या रेग्युलर गाजरामधे आणी यात काय फरक असतो?

छान रंग आलाय कांजीचा. चरचरीत, आंबट आणि तिखट अशी मिक्स चव असते गं.
या आपल्या कांजीसारखाच अजून एक युक्रेनियन प्रोबायोटिक पदार्थ आहे, बीटरूट क्वास नावाचा. साधारण दोन मध्यम आकाराचे बीटचे तुकडे करून (सालासकटच घ्यायचे), ३ कप पाणी, एक चमचाभर खडे मीठ असं सगळं एकत्र करून ३-४ दिवस ठेवायचे. यात हवे असल्यास फ्लेवरसाठी जीरे, तेजपत्ता, दालचिनी, बडीसोप, मीरे, धणे असं काही घालता येतं. ते लोक तर कांदा, लसूण, सेलरी, शेपू, अद्रक इ पण घालतात चवीसाठी. बुडबुडे यायला लागले म्हणजे किण्वन सुरू झालं. किती आंबट हवे यावर ठरते किती दिवस ठेवायचे ते. आणि किण्वन प्रक्रिया लवकर व्हावी असं वाटत असेल तर त्यात थोडं दह्याचे पाणी / व्हे घालायचे विरजण म्हणून.

अल्पना आपल्या रेग्युलर गाजरामधे आणी यात काय फरक असतो?>>>> मी नुसते कधी खाल्लं नाहीये. कांजीतच घालते फक्त.

चरचरीत, आंबट आणि तिखट अशी मिक्स चव असते गं.>> हो चव अशीच लागतेय आणि आम्हाला दोघांना आवडली चव. कांजीवडे साठी हीच कांजी वापरतात का?

क्वास करुन बघायला हवे.

मला दसऱ्याच्या नंतर हे प्रयोग करायला वेळ होणार आहे. तोवर हां धागा वर ठेवा काय!
अल्पना, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन लॅक्टो फरमेंटेड भाज्या बद्दल एक वेगळा धागा काढून लिहाल का?

अल्पना, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन लॅक्टो फरमेंटेड भाज्या बद्दल एक वेगळा धागा काढून लिहाल का?+१११

अल्पना, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन लॅक्टो फरमेंटेड भाज्या बद्दल एक वेगळा धागा काढून लिहाल का?>> लिहिणार आहे. येत्या आठवड्यात अजून काही प्रयोग करतेय, ते झाल्यावर लिहिन.
थोडे फोटो पण काढेन.

Pages