मध्यरात्री घडलेला रस्त्यावरील थरार. भाग~५
सुहास जर दारुडा आणि बाहेरख्याली नसता तर त्या रात्री सुजाता ला घर सोडावे च लागले नसते.. एव्हढे सगळे घडले, त्याला कारण सुहास चे वागणेच होते.. तरी सूजाताच्या मनात
त्याच्या विषयी सॉफ्ट कॉर्नर असेल?
की हे त्याला संपवण्यासाठी तिच्या आत्म्याने उभे केलेले नाटक असेल?
शेवटच्या अंकाला सुरुवात झाली आहे..
सर्व प्रश्नांचा उलगडा या भागात होणार आहे..
पुढे
गुळेगाव मधली ती आमची शेवटची रात्र... आम्ही सर्व प्रकरण उद्या मिटणार या आनंदामध्ये शांत झोपलेलो होतो..
रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झाला होता.
कधीतरी अचानक माझी झोप उघडली... मी डोळे उघडून सुहास च्या पलंगाकडे बघितले.. त्याला दिलेल्या इंजेक्शनची पावर कमी झालेली दिसत होती... या कुशीवरून त्या कुशीवर बराच वेळ तो हलत होता... आजूबाजूला सर्वत्र शांतता पसरलेली होती, पण सुहासची सुरू असलेली हालचाल आणि झोपेतही चेहऱ्यावर दिसणारे हावभाव, त्याच्या मनात प्रचंड वादळ सुरु असल्याची ग्वाही देत होते... मी बराच वेळ त्याच्यावर नजर ठेऊन होतो.. पण मला पुन्हा झोप लागून गेली..
झोपेतच सिद्धार्थ ची हाक ऐकू आली.. त्यांच्या आवाजात चिंता डोकावत होती, "रोहित उठ लवकर सुहास गायब आहे."
वाक्य पूर्ण होण्याच्या आतच मी ताडकन उठून बसलो...
सुहास च्या गायब होण्यामुळे सगळे चिंतेत होते. थोड्याच वेळात बाळू पण आला...
सगळ्यांनी गावभर सुहास चा शोध घेतला.. पण तो कुठेच सापडला नव्हता...
"काका सुहास चे घर कुठे आहे? जिथे तो आणि सुजाता राहत होते," सिद्धार्थ नी विचारले...
सखाराम काकांनी लगेच रस्ता सांगितला... आम्ही सर्व त्यांच्या मागे तिथे पोहोचलो... एक छोटे पत्र्याचे घर होते... भिंतीवर ठिकठिकाणी पोपडे निघालेले होते... आतून गवत उगवलेले होते... घरा समोर प्रचंड कचरा साठलेला होता...
स्वच्छ घराच्या दरवाजा मध्ये मीराला घेऊन सुहास ची वाट बघत बसलेली सुजाता असे चित्र माझ्या द्रूष्यपटलावर तरळून गेले... मनात परत एक हळहळ व्यक्त झाली...
आम्ही घरात प्रवेश केला... सर्वत्र अंधार होता... जळमटे पत्र्या पासून जमिनी पर्यंत लटकलेली होती... समोरच्या कोपऱ्यात सुहास काहीतरी छातीशी कवटाळून मुसमुसत होता.. सिद्धार्थ पुढे होऊन त्याच्या जवळ जाऊन उभे राहिले.. त्यांनी ओठातल्या ओठां मध्ये मंत्र पुटपुटले आणि जोरात श्री गुरुदेव दत्ताचे नाव घेऊन सुहास च्या डोक्यावर हात ठेवला....त्या स्पर्शाबरोबर सुहास उठला आणि एखाद्या अजाण बालका सारखा आमच्या बरोबर निघाला... उजेडात आल्यावर आम्ही बघितले... त्याच्या हातात सुजाता आणि मिरा च्या फोटोची फ्रेम होती... एका हाताने ती छातीशी कवटाळून... तो आमच्या बरोबर निघाला..
आम्ही सगळे हनुमान मंदिरात गेलो.. तिथे सुजाता आणि मिरा च्या आत्म्याच्या मुक्ती साठी पूजा करायची होती... तशी सूचना सिद्धार्थ ने काकांना रात्रीच केलेली असल्यामुळे बाळू ने सर्व काही उपाययोजना अगोदरच केलेली होती.... सुजाता चे क्रिया कर्म करायचे होते.. त्यातील काही विधी मंदिरात करून, श्राद्ध कर्मा चे उरलेले विधी रात्री नदीवर करायचे होते ...
मी शक्यतो परी माझ्याकडून होईल तेवढी मदत सिद्धार्थ ना करत होतो... पण ते सर्व करताना मनात एकच प्रश्न होता. ही पूजा सुजाता आणि मिरा ला खरेच मुक्त करू शकेल का?
आमचा पूर्ण दिवस तिथेच गेला.. सिद्धार्थ दिवस भर फळांवर आणि दुधावर होते... नाही म्हणायला मी थोडेफार जेवलो आणि सुहास ला सुद्धा सिद्धार्थने रात्रीच्या सारखे खाऊ घातले होते...
रात्रीचे आठ वाजले, सर्वत्र काळोख दाटून आला होता.. अंधारात एक विचित्र भय पसरले होते. आम्ही पुलाकडे निघालो... सखाराम काका आणि बाळू देखील आमच्याबरोबर होते... सिद्धार्थ नी आखलेल्या योजने प्रमाणे पुलाच्या बरेच अलीकडे गाडी थांबवण्याची मला सूचना केली...
सिद्धार्थ सखाराम काकांकडे वळत बोलले," मी आणि रोहित पुढे जातो आहे. ती आमच्यासमोर प्रकट झाल्यानंतर तिला पिशाच रूपातून मूळ आत्म्याच्या रूपात आणण्यासाठी मला बरेच मंत्र सामर्थ्य वापरावे लागेल.. तो पर्यंत तुम्ही सुहासला घेऊन गाडीतच बसा.. ती एकदा शांत झाली की मी रोहितला तुमच्याकडे पाठवेल.. त्यानंतरच तुम्ही सुहासला घेऊन पुलाखाली यायचे आहे..."
सिद्धार्थ नि गाडी मधून बाळू ने आणलेले लिंबू आणि नारळ घेतले.. डिकी मधून बॅग काढली आणि माझ्या दिशेने बघत चल म्हणाले... आम्ही दोघे पुलाच्या दिशेने निघालो... पुलाच्या खाली आल्यानंतर... मला मागेच उभे राहायला सांगून सिद्धार्थ थोडे पुढे होऊन, नदीकडे चेहरा करून बसले... नदीचे पाणी एकदम शांत होते, पण त्या शांततेत एक प्रकारची अस्वस्थता होती. सिद्धार्थने बॅग मधून सर्व साहित्य बाहेर काढले.. ते सर्व होमाचे साहित्य होते.. अनेक प्रकारच्या जडीबुटी देखील त्यामध्ये समाविष्ट होत्या.... अगदी थोडक्या वेळात त्यांनी सर्व साहित्य व्यवस्थित लावून होम पेटवला.... अजयच्या हातावरील लाल धागा हातात घेतला... सर्व प्रथम गणपतीची आराधना करत त्यांनी मंत्रांचा उच्चार सुरू केला होता... त्यानंतर आणलेले लिंबू आणि नारळ अर्पण करून, त्यांनी महाकाली ची उपासना सुरू केली... तामसिक साधना काय असते हे मी प्रथमच बघत होतो... जशी मंत्रोच्चाराची तीव्रता वाढायला लागली... हवेत थरथर जाणवू लागली होती... नदीतील शांत पाण्यावर छोटे छोटे वर्तुळे दिसू लागली... पाण्यातून दोन आकृती वर येऊ लागल्या... हळूहळू आकृत्या स्पष्ट झाल्या... त्या सुजाता आणि मीरा होत्या.... मिरा एकदम निरागस मुलीसारखी उभी होती..
पण सुजाता कडे बघून माझे काळीज चरकले.. ती त्या रात्री सारखीच भयानक पिशाचाच्या रूपात होती... तिचे डोळे लाल अंगाऱ्या सारखे जळत होते, आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड क्रोध दिसत होता...
ती झपाट्याने माझ्या दिशेने येऊ लागली...
मला नक्की काय करावे हेच सुचत नव्हते... "थांब!" सिद्धार्थने जोरात आवाज दिला.. त्याच्या आवाजा मधील शक्ती तिला जाणवली आणि सुजाता जागेवरच थांबली... तिचे भयकारक रूप थांबवून धरणे सोपे नव्हते... भयानक भेसूर आवाजात किंकाळ्या मारत ती पुढे येण्याचा प्रयत्न करत होती..
सिद्धार्थने महाकाली मंत्रांचा जोर वाढवला... अतिशय उच्च आवाजात एक मंत्र म्हणून त्यांनी होमा मध्ये वेगात आहुती टाकली... सर्वत्र लाल ज्वालांचा प्रकाश उमटला... त्यामध्ये तिचा भेसूर चेहरा अजूनच चमकायला लागला...
तिच्याकडे बघत सिद्धार्थ गरजले, "तू या पिशाच्च रुपात राहू शकत नाहीस. आता तुला तुझ्या शुद्ध आत्म्याच्या स्वरूपात परत यायचे आहे," सुजाता चे पिशाच तडफडू लागले.. प्रचंड ताकदीने ते सिद्धार्थने दिलेला आदेश धुडकवायचा प्रयत्न करत होते... पण मंत्रांच्या प्रभावा समोर त्याची क्षमता कमी पडत होती... हळूहळू तिच्या शरीरातील आणि वागण्यातील भीषणता कमी होत गेली.. थोड्याच वेळात एक शांत, ममता मयी सुजाता समोर उभी राहिली... तिचे ते रूप बघताच, बाजूला उभी असलेली मिरा ची आत्मा तिला येऊन चिकटली....
"माझ्यासाठी तुम्ही इथे आलात, तुमचे उपकार मी कसे फेडू? सुहास... मला सुहासला भेटायचे आहे," ती दारुण स्वरात म्हणाली.. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते... सिद्धार्थने मला सुहासला बोलवायला सांगितले...
मी सिद्धार्थ कडे बघितले आणि विचारले, "ती सुहासला काही करणार तर नाही ना?"
"नाही ती आता तिच्या मुळ रूपात आहे.. आता तिच्यात प्रेम आहे, ममता आहे.. द्वेष थोडा पण नाही.. सुहास कसाही वागला असला तरी त्याच्यावर तिचे निस्सीम प्रेम आहे.. ती त्याला काहीही करणार नाही आणि तसेही त्याला समोर आणल्याशिवाय आपण तिला मुक्ती देऊ शकत नाही.." सिद्धार्थ नि मला आश्वासन दिले..
मी पुलावर जाऊन गाडीकडे बॅटरीचा प्रकाश फेकला... आणि चालू बंद केला.. थोड्याच वेळात सखाराम काका आणि बाळू सुहासला घेऊन आले... पूलाखाली यायची त्यांची हिम्मत झाली नाही.. मी सुहास ला घेऊन पुलाखाली आलो... मी सुजाताच्या दिशेने बोट करत सुहासला तिकडे बघण्यास सांगितले.... सुहास सुजाताला पाहून जागच्या जागी स्तब्ध झाला.. त्याच्या चेहेऱ्यावर दिसणारे वेडगळ हावभाव जाऊन, डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले होते.. तो धावत सुजाता समोर गेला आणि गुडघ्यावर बसला... तिच्या पायावर डोके ठेवत,"परत या तुम्ही, परत या, माझी खूप मोठी चूक झाली मी तुमच्या शिवाय नाही जगू शकत.."असे बोलत सुहास पायावर डोके आपटत रडायला लागला..
सुजाता ने सुहास ला खांद्याला पकडून उठवले आणि रडत रडत म्हणाली, "जे झाले ते आपले प्राक्तन होते, मी तुम्हाला माफ केले आहे सुहास, झाले गेले मागचे सर्व विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करा.. हीच माझी तुम्हाला विनंती आहे...आता मला मुक्ती हवी आहे."
सुहास हतबल होऊन परत तिच्या पायांना स्पर्श करत म्हणाला, "माझ्या माफी ने काहीच होणार नाही, सुजाता. मी तुमचे आयुष्य संपवले आहे."
मिरा शांतपणे उभी होती, तिच्या लहानग्या चेहऱ्यावर निरागसता आणि शांती होती. पुढे होऊन तिने सुहासला कवटाळले... त्या स्पर्शाने सुहास च्या मनातले मळभ दूर झाले, त्याला थोडी शांती मिळाली. तो तसाच त्यांना चिकटून उभा राहिला...
"आता हा विधी संपवूयात," सिद्धार्थ म्हणाले.. त्यांनी सुजाता आणि मिरा च्या आत्म्यांना मुक्त करण्यासाठी शेवटचा मंत्रोच्चार सुरू केला... हळूहळू सुजाता आणि मिरा आकाशात विलीन होत गेल्या... विलीन होताना त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होते.. एवढे भोगल्यानंतर शेवटी त्यांना मुक्ती मिळत होती...
सुहास त्यांच्या दूर होत असलेल्या आकृतीकडे पाहून ढसाढसा रडत होता... त्याने ओरडून म्हटले, "सुजाता, मला तुमच्याजवळ यायचे आहे, मला पण घेऊन जा."
सिद्धार्थ नि माझ्याकडे बघत मला खुणावले.. मी पुढे होऊन सुहास च्या खांद्यावर हात ठेवला...आणि त्याला सिद्धार्थ कडे घेऊन गेलो.. त्यांनी त्याला बसवून उरलेले श्राद्ध कर्म उरकून घेतले...विधी संपला होता.. त्या दोघींच्या आत्मा मोक्ष प्राप्तीच्या दिशेने निघून गेल्या होत्या.. पण त्यांच्या जाण्याने सुहास च्या मनात निर्माण झालेली पोकळी त्याला सहन होण्यासारखी नव्हती.. तिथले सर्व आवरून मी आणि सिद्धार्थ त्याला गाडीजवळ घेऊन आलो.. सखाराम काका आणि बाळू आमच्या कडे अचंबित नजरेने बघत होते.. पण त्या नजरेत ही एक आनंद होता... मी गाडीचा दरवाजा उघडत असताना.. अचानक सुहास माझ्या हातातून हात झटकून पळाला आणि पुलाच्या दिशेने धावत सुटला...
आम्ही त्याच्या मागे धावू लागलो...
तो पुलाच्या कठड्यावर जाऊन उभा राहिला... आकाशाकडे बघत, "सुजाता! मिरा! थांबा, मी येतो आहे!"जोरात ओरडला आणि आम्ही त्याच्याजवळ पोहोचण्याच्या आत च त्याने पुलावरून उडी घेतली....
मी आणि सिद्धार्थ धावत पुला खालच्या दिशेने गेलो.. तिथे सुहास चा निष्प्राण देह पडलेला होता, त्याच्या डोक्यामधून निघणारे रक्त जमिनीवर पसरलेले होते... पण त्याचा चेहरा विलक्षण आनंदी दिसत होता... त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती, समाधान होते, जणू तो सुजाता आणि मिराला पुन्हा एकदा भेटायला निघाला होता..
सुहास च्या मृत्यूनंतर एक विचित्र शांतता तिथे पसरली होती... नदीच्या किनाऱ्यावर घोंगावणारा वारा अचानक थांबला होता.. निसर्गही सुहास च्या आत्म्याच्या मुक्ती चा साक्षीदार बनून स्तब्ध झाला होता. तिथे असलेली अस्वस्थता आता शोषली गेली होती. त्या जागे वरचे दु:ख आणि द्वेष हवेत विलीन झाले होते...आकाशातील चंद्र मंद प्रकाश देत सुहास च्या अंतिम प्रवासाला निरोप देत होता.
सिद्धार्थ आणि मी सुहास च्या निष्प्राण शरीराकडे बघत उभे होतो, त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून आम्हीही काही क्षण निशब्द झालो... त्याच्या त्या निष्प्राण देहा कडे बघताना मला आदल्या दिवशी हॉस्पिटल मध्ये मनात आलेली गोष्ट आठवली.. मुक्तीची आवश्यकता फक्त सुजाता आणि मीरा लाच नव्हती तर ती सुहास ला सुद्धा होती....
आम्ही जड मनाने त्याचे पार्थिव घेऊन गावात परतलो... दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व गावाच्या उपस्थितीमध्ये त्याच्यावर अंतिम संस्कार केले गेले... पुढचे त्याचे सर्व क्रिया कर्म करण्याची जबाबदारी सखाराम काका आणि बाळू ने शिरावर घेतली...
त्या दिवशी संध्याकाळी मी आणि सिद्धार्थने जड अंतकरणाने त्या गावाचा निरोप घेतला...
एका भयानक प्रसंगापासून सुरुवात झालेल्या प्रकरणाचा शेवट विदारक झाला होता....
त्या रात्री घरी पोहोचल्यावर सिद्धार्थ नी माझ्याच घरी मुक्काम केला. आमची मने अस्वस्थच होती.. रात्रीची अस्वस्थ झोप झाल्यावर सकाळी आम्ही जाऊन अजय ची भेट घेतली.. घडलेले सर्व सांगितल्यावर तर तो सर्व परिवार अक्षरशः रडला... सिद्धार्थ नी स्वतः च्या हाताने ते दोन्ही धागे जाळून टाकलेत..
तिथेच जेवण उरकून, अजय आणि सिद्धार्थ ला घेऊन मी मढी च्या दिशेने निघालो ... एकच आशा होती देवाच्या दरबारात गेल्यावर तरी त्या प्रकरणाने मनावर पसरलेले मळभ दूर व्हावे...
समाप्त.....
लेखक: रूद्रदमन
यथार्थ शेवट केला आहे. आवडला.
यथार्थ शेवट केला आहे. आवडला. सर्वांना न्याय मिळाला.
पूर्ण मालिका वाचली.आवडली.फक्त
पूर्ण मालिका वाचली.आवडली.फक्त पहिल्या भागात पूर्ण विरामाऐवजी दिलेले हिंदी स्टाईल दंड बदलता आले तर बघा.
@केशवकुल जी धन्यवाद
@केशवकुल जी धन्यवाद
@mi_anu धन्यवाद...
तुम्ही सांगितल्या प्रमाणे पहिल्या भागाची दुरुस्ती केली..
(या कथेवर ही टिप्पणी नाही
(या कथेवर ही टिप्पणी नाही.मनातला विचार)
स्त्रिया/मुली अत्याचाराने मरण पावल्यावरच न्याय व्हावा, मेणबत्ती मोर्चे निघावे, जनतेत संताप उसळावा, बदला घ्यावा लागावा हे चुकीचं आहे.जिवंत राहिलेल्या स्त्री/पुरुष/ लहान मुलांसोबतही हे हीन कृत्य झाल्यास तितकाच संताप उसळावा, तितक्याच तावातावाने न्याय मागितला जावा.