संध्याकाळचे ६ वाजत आले होते. पावसाचा जोर ओसरलेला होता. दिवसभर माळरानावर चारा चरून गुरे ढोरे आपल्या गोठ्यांकडे शांतपणे जात होती, त्यांचा मागे गुराखी सुद्धा त्यांचावर न ओरडता शांतपणे हातात काठी घेऊन चालत होता. वडाच्या पारावर काही रिकामटेकडी म्हातारी उगाचच सुतकी चेहरा करत समोरच्या कच्च्या रस्त्याकडे पाहत बसलेली होती. त्या वडाच्या पाराजवळच पारगावचं छोटस सरकारी कार्यालय होतं. त्या कार्यालयाच्या दरवाजावर तशी पाटी सुद्धा लटकत होती, जवळपास मोडकळीला आलेल्या त्या कार्यालयात गणपत चोरगे हा सरकारी खात्यातील माणूस गावातील २-३ ग्रामपंचायत सदस्यांसोबत कसलीतरी चर्चा करत बसलेला होता.
पावसापाण्याचे दिवस होते आणी या वर्षी पाऊस जरा जास्तीचाच झालेला होता, वादळवाऱ्यासोबत पावसाने गेल्या आठवड्यात चांगलेच थैमान घातलेलं होते. त्यामुळे गावातील काही घरांची छपरे उडून गेलेली होती, शेतात अतिरिक्त पाणी साठून राहिल्याने पिकांचे नुकसान झालेले होते. काही भागात जनावरांच्या गोठ्यांचे छप्पर खाली पडून काही गुरांना प्राण सुद्धा गमवावे लागलेले होते. सरकारने या गोष्टींची दखल घेऊन लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन गावागावात जी काही नुकसानी झालेली होती, त्याची पाहणी करून सरकार दरबारी अहवाल सादर करायला सांगितलेलं होतं, त्यामुळे नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाई मिळणार होती. त्यामुळे शहरामधून इथे पारगावात गणपत चोरगे यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करायला यावं लागलं होतं. दिवसभर पाहणी करून संध्याकाळच्या सुमारास चोरगे गावातील सरकारी कार्यालयात पाहणीमध्ये आढळून आलेल्या गोष्टींचा मसुदा तयार करत बसलेले होते. त्यांच्या आजूबाजूला गावातील मंडळी कोंडाळ करून उभी होती.
“ चला, या २-३ गोष्टी व्यवस्थित लिहिल्या कि अहवाल तयार होईल, “ वहीत नजर रोखत पेनाने काहीतरी लिहित चोरगे बोलले.
“ हा ते हुईलच ओ साहेब, पर नुसकान भरपाई कवा पतूर मिळन ते जरा सांगा कि” बाजूला उभा असलेला ग्रामसेवक कसबस हसत चोरगेंना म्हणाला.
त्याच्या या प्रश्नासरशी काहीश्या तिखट आवाजात चोरगे म्हणाले
“ सरकारी काम आहे दादा, आत्ताशी कुठे अहवाल बनवायला मचकूर लिहितोय मी, तो मोठ्या साहेबांकडे सुपूर्द होणार त्यात अजून काही कमी जास्त असेल तर पाहिलं जाईल. मग सरकारकडे ती फाईल पाठवल्यावर सरकार जेव्हा यावर मदतीची रक्कम जाहीर करेल तेव्हाच काय ते कळेल” एवढ बोलून चोरगेंनी पेन खिशाला लावला वही मिटून त्यांच्या जवळील बॅगेत ठेवली.
चोरगेंच्या या बोलण्यावर अजून एक दुसरा खेडुत जो बाजूला उभा होता तो म्हणाला-
“कमी काय लिहू नका बघा त्या अवालात जे असलं ते जास्तीच लिव्हा” आणी असं म्हणून दात काढत फिफी करत हळू आवाजात हसू लागला.
“ ते आता आमचे मोठे साहेबच ठरवतील” असं म्हणत त्या माणसाकडे दुर्लक्ष करत चोरगे जागेवरून उठले. खिडकीतून बाहेर पाहत त्यांनी पावसाचा अंदाज घेतला. पावसाने जरा विश्रांती घेतलेली होती. त्यामुळे जास्त पाऊस वाढायच्या आत परत शहराकडे आपल्या घरी जावे असा विचार चोरगेंनी केला. कारण गावातील नदीला पाणी जास्त आल्याने पुलावरून पाणी वाहू लागे मग लोकं वाहने त्या धोकादायक स्थितीत पुलावरून जाऊ शकत नसत. चोरगेंनी स्वतःच वाहन सोबत आणल नसल्याने गावातीलच टमटम किंवा अन्य वाहनांनी अंधार पडायच्या आत गाव सोडावं असा विचार चोरगेंनी केला. त्यामुळे पटापट सामान आवरून, वही आणी काही कागदपत्रे पिशवीत ठेवून ती पिशवी खांद्याला अडकवून चोरगे जाण्यासाठी निघाले.
सरकारी कार्यालयातून चोरगें बाहेर पडले तसं त्यांच्यामागे कार्यालातील इतर ग्रामस्थ सुद्धा त्यांच्यामागोमाग बाहेर आले.
“ बर चला निघतो मी आता, अंधार पडायच्या आत घरी जावं लागेल. कारण उद्या परत शहरातील कार्यालयात जाऊन मसुदा सुपूर्त करावा लागणार आहे” खांद्यावरची पिशवी नीट करत आभाळाकडे टक लावून पाहत चोरगे म्हणाले.
“ अवो साहेब आता अंधार पडन. रातच्याला इतच राहा, कि सकाळच्या कोंबडा आरवायच्या वक्ताला लगोलग निगा, सरकारी बिल्डींग मध्ये चांगल्या खोल्या हायेत माणसं पण आहेत हाताशी.” एक वृद्ध ग्रामस्थ कपाळावर आठ्या पाडत म्हणाला.
“ नाही नाही नको... थांबता येणार नाही, आणी जरी थांबलो तरी उद्या सकाळी धावपळ होईल” चोरगे जरा पुढे जात म्हणाले.
“ खरं आहे साहेब तुमचं पर पावसाने लयं थैमान घातलं होतं आज, आणी गावच्या बाहेर जी नदी आहे तिच्या पुलावर पाणी आलं होतं सकाळी, तुम्ही आलात तेव्हा जास्त न्हवत पर आता जरा वाढलं आसन. कशाला रिक्स घेता. आन वाहन पन पुडे जाणार नाई” दुसरा एक ग्रामसेवक काळजीच्या सुरात म्हनला.
पण चोरगेंना थांबण्यात अजिबात रस न्हवता. गावतील लोकांमध्ये राहून त्यांची टकळी ऐकून घ्यायची त्यांची मुळीच इच्छा न्हवती. एकतर आधीच दिवसभरच्या कामाने त्यांना शीण आलेला होता.
“ हा साहेब उद्या सकाळी पानी कमी हुईल तवा जावा” बाजूचा अजून एक ग्रामस्थ ग्रामसेवकाच्या कानाला लागून काहीतरी पुटपुटला. तसा त्या ग्रामसेवकाचा चेहरा हिरवा गार पडला. त्याने बाजूच्या वृद्ध ग्रामस्थाला जवळ बोलावून कानात काहीतरी सांगितलं तसं त्या वृद्ध ग्रामस्थाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. चोरगेंचा यांच्या पुटपुटण्याकडे लक्ष न्हवत. ते आपले समोर रस्त्याकडे पाहत उभे होते.
“ साहेब ... ऐका जरा आजची रात थांबा सकाळच्या पहिल्या वक्ताला मी स्वतः तुम्हाला शहरापतूर सोडाय येतो” जराश्या खालच्या आवाजात चाचरत ग्रामसेवक बोलला.
“ नाही हो ..मला निघावं लागेल. “ काहीश्या त्रासिक सुरात चोरगे म्हणाले आणी पुढे चालू लागले. त्यांच्या आग्रहाला न जुमानता चोरगे चालू लागले.
मागे उभ्या असलेल्या गावकऱ्यामध्ये कुजबुज चालू झाली. चोरगे थांबायला तयार न्हवते ते तसेच पुढे चालू लागले. मागे उभे असलेल्या गावकऱ्यांपैकी एकजण पळत चोरगेजवळ आला. आणि त्यांना थांबवून म्हणाला.
“ साहेब अवो एक सांगायच हुत” चोरगेंच्या अगदी जवळ येत तो गावकरी म्हणाला.
तास थोडंस थांबून त्रासिक चेहरा करत चोरगे म्हणाले ” बोला “
“ साहेब जर पुलावर पानी असलं आन तुमाला पूड जाता आलं न्हाई कि सरळ माघारी वळा आन गावात यावा, आनं कुटबी आसरा घेऊ नकासा साहेब”
त्याच्या या वाक्यावर चोरगेंना जरासं विचित्र वाटलं कि हे लोकं आजची रात्र गावातच काढा असं का म्हणत असावेत. कदाचित नुकसानभरपाई जास्त मिळावी म्हणून रात्री कोंबड, मटण वगेरे खायला घालून लांगुलचालन करायचा विचार दिसतोय यांचा. नक्कीच असंच असावं नाहीतर कशाला कोणी राहायचा आग्रह करेल.
“ बर ठीक आहे” असं बोलून पिशवी सांभाळत चोरगे चालू लागले. काय डोक्याला ताप आहे असतो अशा लोकांचा असं वाटून परत काहीतरी कारण काढून त्यांनी थांबवू नये म्हणून चोरगे भराभर चालू लागले. रस्त्याच्या शेवटी वळणावर चोरगेंनी सहजच मागे वळून पाहिलं. तर ते २-३ गावकरी गंभीर चेहऱ्याने चोरगेंकडेच पाहत उभे होते. चोरगेंना जरासं आश्चर्य वाटलं पण अंधार पडायला जरासाच अवधी असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ते पुढे चालू लागले. वेशीबाहेर पोहोचताच त्यांना सुदैवाने एक टमटम उभी असलेली दिसली.
“ चला लवकर आत बसा, पुलावर पानी वाढायच्या आत जायचं आहे” टमटमवाला ओरडत बोलला.
त्याच्या बोलण्यासरशी बाजूला बसलेले २-३ खेडूत आणि त्यांच्या बायका टमटममध्ये बसल्या. चोरगे सुद्धा सीटवर एका कोपऱ्यात बसले आणी टमटम चालू झाली, आजूबाजूला पाहत चोरगे बसलेले असताना त्यांना दिसलं बाहेर बहुतांश ठिकाणी पाणीच पाणी झालेलं होतं. सगळ्या शेतात पाणीच पाणी झालेलं होतं. लोकांचं चांगलंच नुकसान झालेलं दिसतं होतं. तशी गावची लोकसंख्या पण जास्त नसल्याने नुकसानभरपाई लगेचच मिळेल असं वाटत होतं. वेशीपासून टमटम आता बरीच दूर आलेली होती. काही वेळातच टमटम रस्त्यांवरील खड्ड्यातून मार्ग काढीत नदीच्या पुलाजवळ आलेली होती. समोर पाहिलं तर अख्ख्या पूल हा पाण्याखाली गेलेला होता. आणी नदीचा प्रवाह देखील जोरदार होता. कालच्या पावसाने नदी चांगलीच दुथडी भरून वाहत होती. टमटमवाल्याने गाडी जागीच थांबवली.
“ च्यामायला ज्याची भीती व्हती तेच झालं बगा, समदा पूल पाण्याखाली गेला हाय” टमटम वाला चरफडत बोलला. टमटम मधल्या प्रवाशांनीसुद्धा कपाळावर हात मारून घेतला.
“ चला आता टमटम पुडे जाणार नाई, सरळ गावाकडं जाऊयात आता” एवढ म्हणून टमटमवाल्याने टमटम मागे वळवली. अंधार चांगलाच पडू लागलेला होता.
चोरगेंना कळेना कि आता काय करावे. आता परत गावात जावं लागणार आणी त्या ग्रामस्थांची टकळी ऐकत बसावं लागेल, जे करण्याची चोरगेंना अजिबात इच्छा न्हवती. ते करण्यापेक्षा इथच कुठेतरी रात्रीचा आसरा घ्यावा असं चोरगेंना वाटलं. टमटम वेशीजवळ पोहोचायच्या आत त्यांनी जरा दूरवरच टमटम वाल्याला टमटम उभी करायला सांगितली आणी ते खाली उतरले. चोरगेंना सोडून टमटम पुढे गावात निघून गेली. चोरगे एकटेच रस्त्यावर उभे होते. पुलावर पाणी असल्याने रस्त्यावर अन्य कोणतेही वाहन येजा करताना दिसत न्हवते. खांद्यावरची पिशवी सावरत चोरगे एकटेच रस्त्यावरुन चाललेले होते, आता अंधार देखील चांगलाच पडलेला होता. समोर एक कच्चा रस्ता डाव्या बाजूला वळलेला चोरगेंना दिसला. तिथून पुढे गावात विरुद्ध दिशेला प्रवेश करता येईल आणी कोणाच्या तरी घरात आजची रात्र आसरा मिळेल या उद्देशाने चोरगेंनी कच्च्या रस्त्यावरून आपली पावले उचलायला सुरुवात केली. अंधार पडल्याने रातकिड्यांचा आवाज येत होता. दोन दिवस पाऊस पडल्याने गावात वीज देखील न्हवती त्यामुळे काळोख अजूनच भयाण वाटत होता. आजूबाजूला झाडी होती त्यातून किर्रकिर्र असा आवाज येत होता. चोरगेंना खरंतर थोडी भीती वाटत होती पण ती दूर करायला ते आपल्या कामाचा विचार करायला लागले. विचार करत रस्ता तुडवत चोरगे पुढे चाललेले होते. अजून कोणाचं घर दिसत न्हवत. रातकिड्यांचा आवाज वाढलेला होता. थोडं पुढे गेल्यावर जराश्या अंतरावर एक मिणमिणता प्रकाश दिसत होता. चोरगे त्या दिशेने गेले. कच्च्या रस्त्याचा आजूबाजूला काटेरी झाडे होती, चोरगे जसे जसे पुढे जाऊ लागले तसं तो प्रकाश त्यांना स्पष्ट दिसू लागला. कच्चा रस्ता सोडून जरा आतल्या बाजूला वळाल कि एक घर दिसत होतं. चोरगे त्या दिशेला वळले.
काही अंतर चालल्यावर ते त्या घराजवळ पोचले. घराच्या आतून मेणबत्त्यांचा प्रकाश बाहेर येत होता आणी बाजूच्या खिडकीजवळ एक मोठी मशाल लावलेली दिसत होती. ज्यामुळे घराच्या आसपासचा परिसर न्याहाळता येत होता. आजूबाजूला आता चांगलाच काळोख पडलेला दिसत होता. चोरगे त्या घराजवळ आले, ते एक जवळपास मोडकळीला आलेलं घर होतं. जुन्या दगडांच बांधलेलं ते घर होतं पण तरीही पडकं घर असल्याप्रमाणे ते वाटत होतं, कोण राहत असेल अशा घरात असं वाटुन चोरगेंनी दार वाजवलं. आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. चोरगेंनी थोडा वेळ पाहून परत दारावर आवाज केला. कोणीही बाहेर आलं नाही. चोरगेंना जरा आश्चर्य वाटलं. जरा जोर लावून त्यांनी दार वाजवायचा प्रयत्न केला तसं दार पुढे सरकलं, म्हणजे दार उघडंच होतं तर. स्वतःशीच पुटपुटत चोरगेंनी दार आत ढकलून घरात प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश करताच चोरगेंना मेणबत्त्यांचा प्रकाश पसरलेला दिसला आणी आजूबाजूला लाकडी खोकी आणी गवतांचे भारे पडलेले दिसत होते. चोरगे दरवाजाजवळच घुटमळले.
“ आहे का कोणी आतमध्ये” चाचरत चोरगे बोलले. आतमध्ये एक खोली असलेली दिसत होती. घरातील समान अस्ताव्यस्त पडलेला दिसत होतं. घरात एक विचित्र प्रकारचा दर्प येत होता. आजूबाजूला चोरगे निरीक्षण करत असतानाच चोरगेंसमोर अचानक वयोवृध्द झालेली म्हातारी येऊन मक्ख चेहऱ्याने उभी राहिली. ती म्हातारी अशी अचानक येऊन थांबल्याने चोरगे दचकले. म्हातारी अशी अचानक कशी काय येऊन पुढ्यात उभी राहिली असं वाटून चोरगेंच्या तोंडातून शब्द फुटेना.
आतल्या खोलीतून ती म्हातारी आली कि अजून कुठून हे चोरगेंना कळेना. डोक्यावरचे पाढरे केस, अंगात खेडवळ पद्धतीची साडी घालून शांत चेहऱ्याने म्हातारी चोरगेंकडे पाहत उभी होती.
“ म..मी.. गणपत चोरगे, सरकारी कामानिमित्त गावात पाहणीसाठी आलेलो होतो. परतत असताना नदीच्या पुलावर पाणी साठल्याने माघारी जाता आलं नाही. आजची रात्र राहायला कुठे जागा मिळते का ते पाहत असताना इथे आलो, आजची रात्र जागा मिळेल का मला ” एका दमात चोरगेंनी आपल्याबद्दलची माहिती सांगून इथे येण्याचा हेतू सांगितला. एवढ सांगून पण ती म्हातारी काहीही बोलली नाही कि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाही. अजूनपण ती म्हातारी तशीच मक्ख्पणे चोरगेंकडे पाहत उभी होती. चोरगेंना तशी भीती वाटली. ते अंग चोरून तसेच उभे राहिले.
“ बसा तित...” बाजूच्या मोडकळीला आलेल्या खुर्चीत बसण्याचा इशारा करत म्हातारी तशाच मक्ख चेहऱ्याने आतमध्ये निघून गेली.
चोरगेंना खरंतर यापेक्षा जास्त आदराची अपेक्षा होती पण तसं काही झालेलं न्हवत. बाजूच्या कळकट खुर्चीवर बसत चोरगेंनी आपली पिशवी बाजूला ठेवून दिली. बाहेर हलकासा पाऊस चालू झाल्यासारखं वाटत होतं. एकदम वीज सुद्धा कडाडून गेली. पूर्ण परिसर काळोखात बुडून गेलेला होता. बर झालं हे घर सापडलं नाहीतर पुढे पावसात चांगलाच अडकलो असतो. प्यांट वरची घाण हाताने साफ करत चोरगे मनातच म्हटले. अजूनही त्यांना घरात कसलातरी विचित्र दर्प येतच होता. प्यांट साफ करून चोरगेंनी वर पाहिलं तर म्हातारी हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभी होती. चोरगे दचकले त्यांना वाटलं हि म्हातारी असंच अनपेक्षितपणे समोर येऊन दचकावू लागली तर आपल्याला हृदयविकाराचा झटकाच येईल. म्हातारीच्या हातातील पाण्याचा ग्लास घेऊन चोरगेंनी घटघटा पाणी प्यायले. तेवढ्यात आतल्या खोलीतून कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज आला. कोणीतरी जोरजोरात खोकत होतं. चोरगेंनी जरा चमकूनच म्हातारीकडे पाहिलं.
“ आमचं मालक हायेत, आजारी असत्यात” म्हातारी गंभीर चेहरा करत म्हणाली. चोरगेंनी काहीही विचारलं नाही कारण चोरगेंना इतर कोणत्याही गोष्टीशी घेणं देणं न्हवत. आजची रात्र कशीबशी काढायची एवढाच विचार त्यांनी केलेला होता.
“ मी आजची रात्र थांबेन इथे सकाळ झाली कि लगेच जाईन” चोरगे कशाबशा आवाजात म्हणाले.
त्यावर म्हातारीने नुसतच चोरगेंकडे पाहत हम्म.. असं म्हटलं. आणी ती आतमध्ये निघून गेली. आता इथे झोपायचं कुठे असा विचार करत असतानाच आतून म्हतारी एक चटई आणी गोधडी घेऊन आली चोरगेंच्या पुढ्यात ते टाकून आतमध्ये निघून गेली. चोरगे यावर काहीही बोलले नाहीत. बाजूला गवताचे ओलसर भारे, अस्ताव्यस्त समान अशा घाणेरड्या झोपायचं म्हणजे चोरगेंना शिसारीच आली. आजची रात्र कशीबशी काढून इथून सकाळी लवकरच सटकायच असा विचार करत चोरगेंनी म्हातारीने आणलेली चटई खुर्चीच्या शेजारी पसरली. चटई वर अंग टाकून चोरगे शांतपणे पडले. बाहेर पूर्ण किर्रर्र अंधार पडलेला होता. घुर्रघुर्र असा घुबडाचा घुत्कार तेवढा ऐकू येत होता. घरात आल्यापासून चोरगेंना एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. जणू काही अंग दोराने बांधल्यासारखा वाटत होतं. काही वेळ ते तसेच डोळे मिटून पडून विचार करू लागले. त्यांना झोप काही केल्या येईना. नाकात तो विचित्र दर्प परत दरवळला आणी त्यांची तंद्री भंग पावली. कसला वास असावा हा चोरगेंच्या काही केल्या समजेना. चोरगेंना अचानक लघवीला जायची इच्छा झाली, पण आता इथे बाथरूम कुठे आहे हे म्हातारीला विचारायचं ते विसरूनच गेले होते. रात्री असं लघवीला जायची चोरगेंना सवय असल्याने बाथरूम कुठे आहे हे म्हातारीला विचारावं या उद्देशाने चोरगे उठले.
हळूच आवाजात त्यांनी म्हातारीला “ मावशी अहो ऐकता का .. अशी हाक मारली.
पण कोणीही आलं नाही. परत एक दोनदा चोरगेंनी आवाज देऊन देखील कोणीही आलं नाही, तेव्हा म्हातारी कदाचित झोपली असेल असं वाटुन आणी बाथरूमची सोय कुठे आहे हे माहित असणे गरजेचे असल्याने स्वतःच आतमध्ये जाऊन म्हातारीला विचारावं असं त्यांना वाटलं. चोरगे हळूच आतमधल्या खोलीत जायला लागले, पुढे काही अंतरावर एक छोटासा लाकडी दरवाजा होता. चोरगे हळुवारपणे त्या दरवाजाजवळ आले. दरवाजा हलकासा उघडाच होता आणी आतून परत एकदा तोच विचित्र दर्प चोरगेंच्या नाकात शिरला. आतमध्ये कोणी असेल कि नाही हे चोरगेंना माहित न्हवता. एक अनामिक भीतीची शिरशिरी चोरगेंच्या मनात उगाचच उठली. दरवाजाच्या जवळ जाऊन हळूच चोरगेंनी आतमध्ये पाहिलं.
आतमध्ये खोलीत लाकडी फळ्या ठेवलेल्या होत्या त्या फळ्यांवर काही काचेच्या बरण्या ठेवलेल्या होत्या आणी त्या पारदर्शक बरण्यांमध्ये कसलातरी द्रव पदार्थ ठेवलेला दिसला. आतमध्ये लावलेल्या काही मेणबत्यांमधुन जेवढा प्रकाश येत होता त्यातून जेवढे पाहता येईल एवढचं चोरगे पाहत होते. बाजूलाच एक खाट ठेवलेली होती त्या खाटेवर कोणीतरी झोपलेलं होतं. चोरगेंना फक्त त्या व्यक्तीचे पाय दिसत होते. मगाशी म्हातारीने सांगितल्याप्रमाणे तिचे मालक असावेत कदाचित चोरगेंना वाटून गेलं. पण म्हातारी आतमध्ये आहे कि नाही हे पाहण्याकरिता चोरगेंनी अजून दार हळूच पुढे करून आत मध्ये डोकावत पाहिलं. तर समोर एका लाकडी टेबलाजवळ म्हातारी आपले पांढरे केस मोकळे सोडून हात बाजूला पसरून पाठमोरी उभी होती. कदाचित डोळे मिटून काहीतरी करत असावी. बाजूला एका चुलीवर एक छोटंसं भांड ठेवलेलं आणी त्यामध्ये काहीतरी उकळत होतं, त्याचाच विचित्र दर्प सगळीकडे पसरलेला होता. त्या चुलीजवळच बाजूला काही मानवी हाडे पडलेली दिसत होती.
चोरगेंनी हे सगळं पाहून एकदम आ वासला. हे नक्की काय चालू आहे हे त्यांना समजेना. अचानक त्यांची नजर म्हातारीच्या बाजूला असलेल्या एका मडक्यावर गेली आणी ते दृश्य पाहून त्यांना भीतीने आपली शुद्ध हरपतेय कि काय असं वाटून गेलं. त्या उपड्या ठेवलेल्या मडक्यावर एक कोंबडी उभी होती जिचं शीर कापलेलं होतं आणी आश्चर्याची गोष्ट म्हणजे शीर कापलेलं असून सुद्धा ती कोंबडी जिवंत होती आणी आपले पंख वरखाली हलवत उभी होती. मानेवरच्या तिच्या कापलेल्या भागातून रक्ताचे थेंब मडक्यावर पडत होते. हे दृश्य पाहून चोरगे जागीच गोठून गेले. एवढ्यात घर्र्घर्र असा आवाज चोरगेंना आला, तो आवाज खाटेवरच्या माणसाचा होता त्या माणसाच्या घशातून तो असा घर्रघर्र असा आवाज येत होता. आश्चर्य वाटून चोरगेंनी तिकडे पाहिलं तर तो माणूस डोळे सताड मोठे करून दरवाजाकडे पाहत होता. त्या माणसाला कदाचित जागचे हलता येत नसावे पण त्याचा कपाळावर एक काटकी धाग्याच्या सहाय्याने बांधलेली होती, त्या माणसाला कदाचित बोलताही येत नसावे. त्याच्या घशातून फक्त घर्रघर्र असा आवाज येत होता. त्या माणसाचा तो भयंकर चेहरा पाहून चोरगेंची बोबडीच वळली. आधी ती शीर नसलेली जिवंत कोंबडी आणी आता तो डोक्यावर काटकी बांधलेला डोळे मोट्ठे करत बघत असेलला माणूस पाहून चोरगेंच्या अंगाला भयानं कापरं भरलं. त्यांचा श्वास वेगाने वरखाली होऊ लागला.
अंगात सगळं त्राण एकवटून चोरगेंनी तिथून काढता पाय घेतला.
थरथरत्या अंगानेच चोरगे बाहेरच्या खोलीत आले. त्यांची विचारशक्ती पूर्णपणे कुंठीत झालेली होती. आल्याआल्या त्यांनी चटई वर अंग टाकलं. डोक्यावर पूर्णपणे गोधडी पांघरून ते धपापत्या उराने पडून राहिले. आपण आत्ता काय पाहिलं यावर त्यांचा विश्वासच बसत न्हवता. म्हातारीच ते केसं सोडलेलं रूप, मानवी हाडे आणी त्याहूनही कहर म्हणजे ती शीर कापलेली जिवंत कोंबडी. नक्की आपण काय पाहिलं ते सत्य होतं कि भ्रम त्यांनाच कळेना. आपण स्वप्नात तर नाही ना असं चोरगेंना वाटलं. म्हातारी नक्की काय करत होती?, खाटेवरचा तो विचित्र माणूस नक्की कोण होता? त्याची हि अवस्था कशामुळे झाली असेल? एक ना एक प्रश्न चोरगेंना पडत होते. या कुशीवरून त्या कुशीवरून वळण्याचे सुद्धा धैर्य चोरगेंमध्ये न्हवते. या घरात्तून कुठेतरी पळून जावं असं चोरगेंना वाटलं. पण पळून जाणार कुठे, मध्यरात्री झालेली होती, अचानकच बाहेर घुबडांचे घुत्कार वाढले होते. बाहेरच्या झाडांवर वटवाघळांची फडफड होऊ लागलेली होती. अशा मध्ये बाहेर पडून जायचं कुठे हे काही चोरगेंना कळेना. विचार करता करताच चोरगेंना कधी झोप लागली हे कळलेच नाही.
नंतर चोरगेंना अचानक जाग आली ती खिडकीच्या धडकन उघड्ण्यानेच. हवेच्या जोरदार तडाख्याने भिंतीवरील खिडकी उघडली होती आणी बाहेरचा थंडगार हवेचा झोत आतमध्ये शिरला होता. डोळे किलकिले करून चोरगे चटईवर उठून बसले. खिडकीतून थंडगार हवा आतमध्ये येत होती. झोपेची झापड जाऊन चोरगे जरा भानावर आले आणी त्यांना मगाशी आतमधल्या खोलीत पाहिलेला प्रसंग आठवला आणी त्यांचा अंगावर शहारे आले. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं तर बाहेर अजूनही अंधार पडलेला होता. आतमध्ये म्हातारी अजून काय करत असेल या विचारांनीच चोरगेंना घाम फुटला. लघवी करण्यासाठी म्हणून चोरगे जागेवरून उठले आणी घराच्या बाहेर आले. बाहेर पूर्ण काळोख होता अजूनही चांगलीच रात्र आहे अशी जाणीव चोरगेंना झालेली होती.
घराला थोडासा वळसा घालून चोरगे घराच्या मागच्या बाजूला आले. आजूबाजूला काही झाडे होती आणी पुढे झाडांच्या रांगाच रांगा होत्या, आसपास कुठेही वस्ती किंवा घरं असल्याचं त्यांना दिसत न्हवत आणी तसंही अंधार अजूनही चांगलाच पडलेला होता. लघवी आटोपून चोरगे मागे वळणार इतक्यात त्यांना दूरवर झाड्याच्या रांगेपुढे शेकोटीसारखं काहीतरी जळताना दिसतं होतं. काय असावे बरे ते असा विचार करत असतानाच चोरगेंची पावले त्यांच्या नकळतच पुढे जाऊ लागली. आसपास भयाण शांतता होती. चोरगे हळुवारपणे त्या जळत्या शेकोटीकडे जाऊ लागले. चोरगेंच्या संवेदना पूर्णपणे गलितगात्र झालेल्या होत्या, ते भारल्याप्रमाणे चालत चालत शेकोटीकडे जाऊ लागले. झाडांच्या रांगा ओलांडून ते शेकोटीपासून काही अंतरावरच आले. जवळ येईल तसं शेकोटीची आग गडद दिसू लागली. तेथील जागा ही मोकळी मैदानी होती आसपास झाडे किंवा इतर गोष्टी न्हवत्या. एक झाडापाशी ते चालत चालत आले, तिथे आल्यावर त्या झाडाच्या झुकलेल्या फांदीचा फटका त्यांचा तोंडावर बसला अंधारात त्यांना फांदी दिसली नसल्याने ती फांदी त्यांच्या तोंडाला लागलेली होती.
फांदी तोंडावर लागताच चोरगे भानातून वर आल्यासारखे करत आजूबाजूला पाहू लागले. प्रथम त्यांना समजलंच नाही कि काय आलंय तोंडावर, पण नंतर बाजूच्या झाडाची फांदी पाहून त्यांना जरा हायसं वाटलं. चोरगे आता पुढे न जाता जागीच थांबून समोर शेकोटीकडे पाहू लागले. लहान आकाराची लाडकांची रास करून आग लावलेली होती आणी त्या आगीपुढे कोणीतरी बसलेलं त्यांना दिसतं होतं. लांबून त्यांना फक्त शेकोटीच दिसतं होती. पण जवळ आल्यावर त्यांना कोणीतरी शेकोटीपुढे बसलं असल्याच दिसलं. ती व्यक्ती शेकोटीकडे पाहत बसलेली होती तिच्यापुढे एक भांड असल्याचं दिसतं होतं. झाडाच्या मागे जात त्यांनी डोळे बारीक करून ते कोण बसलं आहे ते पाहिलं आणी त्यांना धक्काच बसला. चोरगे ज्या घरात थांबलेले होते त्या घरातील म्हातारीच त्या शेकोटीपुढे बसल्याचं त्यांना दिसलं. तिने अंगामध्ये पायापर्यंत येणारा एक विचित्र झगा घातला असल्याने चोरगे आधी त्या म्हातारीला ओळखू शकले नाहीत. समोरच्या असलेल्या भांड्यातील कसलातरी पदार्थ आगीमध्ये टाकत आगीकडे काहीतरी पुटपुटत म्हातारी स्तब्ध पणे बसलेली होती. बाजूच्या काही ठराविक अंतरावर सगळीकडे कसलीतरी राख पडलेली दिसत होती
चोरगे डोळे फाडून त्या म्हातारीकडे पाहत होते. एवढ्या रात्री म्हातारी इथे काय करत आहे हे चोरगेंना समजेना. चोरगे झाडाच्या आधाराने उभे होते, वातावरण पूर्णपणे स्तब्ध होतं. इतक्यात म्हातारीच्या बाजूने कसल्यातरी प्राण्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. चोरगेंनी झाडाला घट्ट पकडत फांदीचा मागे आले आणी लपून पाहू लागले.
परत एकदा गुरगुरण्याचा आवाज आला. तो आवाज नक्की कुत्रा किंवा कोल्हा नक्की कोणत्या प्राण्याचा होता समजत न्हवत. चोरगे श्वास रोखून समोर पाहू लागले. म्हातारी आता आगीमध्ये पटापट भांड्यातून काहीतरी काढून टाकू लागली. गुरगुरण्याचा आवाज वाढत होता. म्हातारीच्या बाजूच्या झाडीतून कसलीतरी खुसपूस झाली आणी एक मोठ्या आकाराचा प्राणी बाहेर आला. त्याचे तीक्ष्ण दात लांबून सुद्धा दिसत होते, आकाराने कुत्र्यापेक्षाही मोठा आणी रंगाने पूर्ण राखाडी होता तो. त्या प्राण्याचे कान उभे राहिलेलं होते. गुरगुरत त्या प्राण्याने म्हातारीकडे पहिले. म्हातारीने बाजूला ठेवलेला चाकू काढला आणी आपला डावा हात पुढे करून त्यावर तो चाकू फिरवला. रक्ताची धार म्हातारीच्या हातातून पडू लागली. पण म्हातारीच्या तोंडावरचे भाव काही बदलले नाही उलट म्हातारीने रक्ताळलेला हात त्या प्राण्यापुढे धरला. हे दृश्य पाहून चोरगेंना मळमळल्यासारखे झाले आणी उलटी होईल असं वाटलं. म्हातारीच्या हातातून रक्ताची धार पाहून तो प्राणी गुरगुरत म्हातारीच्या हाताजवळ आला आणी त्या प्राण्याने तो हात तोंडात पकडला आणी तो प्राणी ते रक्त गुरगुरत पिऊ लागला.
चोरगेंना आता पुढचे दृश्य पाहावेना, त्यांना खूप घाम फुटलेला होता आणी त्यांच्या शरीरात कंपने जाणवू लागलेली होती. ते हळूहळू मागे सरकू लागले, आपल्या उपस्थितीची जाणीव होऊ न देता त्यांना मागच्या मागे पळून जायचं होतं. मागे काही पावले टाकत असतानाच त्यांना तोल गेला आणी ते खाली पडले. असं पडल्यामुळे आता त्या म्हातारीला आणी त्या विचित्र प्राण्याला आपली चाहूल लागली असेल असं वाटुन झटक्यात उठत मागे वळूनही पाहता जीव खाऊन चोरगे धावत सुटले. तसं त्या प्राण्याने मोठ्याने गुरगुरत आवाज केला. त्या प्राण्याने आपल्याला पाहिलं असून आता तो आपल्याचं मागे येईल असं वाटल्याने चोरगे जीवाच्या आकांताने धावत सुटले. रात्रीच्या त्या भयाण काळोखात चोरगे कोणत्या दिशेने पळत आहेत हे देखील त्यांना सुधरेना. मागे वळून तो प्राणी आपल्या मागावर आहे कि नाही हे देखील त्यांना बघण्याची इच्छा न्हवती. उर फुटेपर्यंत ते पळतच राहिले.
म्हातारीच्या त्या पडक्या घरापासून त्यांना शक्य तितक्या लांब पाळायच होतं म्हणून ते वेगळ्याच दिशेने धावत होते. चोरगेंच पूर्ण अंग घामाने डबडबलेल होतं. धावत धावत ते एका दगडी घरापाशी येऊन पोहोचले धापा टाकत मान खाली घालून त्यांनी जरा दम खाल्ला. ते खूप लांब पळत आले आहेत असं त्यांना वाटलं, जरा दम खाऊन झाल्यावर त्यांनी मग समोरच्या घराकडे नजर वळवली आणी समोर पाहून ते अवाकच झाले. कारण ते लांब जायचं सोडून त्याचं म्हातारीच्या पडक्या घरासमोर उभे होते. लगेच मागे जात त्यांनी परत त्या घरापासून लांब जात दूर धावायला सुरुवात केली. अंधाऱ्या मार्गातून कसबस वाट काढत चोरगे पळत होते. काही वेळ धावल्यानंतर त्यांना मिणमिणत्या प्रकाशातील एक घर दिसू लागलं ते अजून वेगाने धावत त्या घराजवळ गेले आणी त्यांनी त्या घराकडे पाहिलं तर त्यांना हादराच बसला कारण ते परत एकदा त्या म्हातारीच्या पडक्या घरापाशीच येऊन पोहोचले होते. चोरगेंची मती कुंठीत होऊन ते वेड्यासारखे घराकडे पाहत बडबडू लागले. असं का होतंय त्यांना कळेना, आपल्याला या गलिच्छ घरापासून दूर का जाता येत नाहीये. पण तरीही थकलेल्या अवस्थेत ते तसेच घरापुधून पळू लागले. हळू हळू धावत चोरगे बडबड करत पळत होते.
काही अंतर धावून झाल्यावर पुन्हा चोरगेंना एक घर दिसलं जवळ जाऊन पाहताच परत तेच, म्हातारीच पडकं घर. चोरगेंना आता वेड लागायची पाळी आलेली होती. हे काय होतंय त्यांना समजतच न्हवत. चोरगे अतिशय थकून गेलेले होते. अंगात त्राण उरलेला न्हवता. तरीही न थांबता ते धावतच राहिले. कितीतरी वेळ चोरगे धावत होते आणी कितीतरी वेळा चोरगेंना त्याचं पडकं घरापुढून जावं लागतं होतं. नंतर धावता धावता चोरगेंची शुद्ध हरपली आणी ते जमिनीवर कोसळले.
कोंबडा आरवला आणी त्याने पहाट झाल्याची जाणीव गावाला करून दिली. चोरगे अचानक जागे होऊन जमिनीवरून उठू बसले. रस्त्यावर माणसांची लगबग चालू झाली होती. सकाळ झाल्याने चोरगेंना जरा हायसं वाटलं. थोडं अंतर ते पुढे चालून गेले. पुढे माणसांची खूप मोठी गर्दी जमलेली होती. काय झालंय हे कळत न्हवत. बाजूने एक माणूस चाललेला होता त्या माणसाला चोरगेंनी हटकल आणी पुढे काय झालाय हे विचारलं पण त्या माणसाने चोरगेंकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणी काहीही न पाहताच तो पुढे निघून गेला. चोरगेंनी मग स्वतः जवळ जाऊन पाहिलं तर एक माणूस जमिनीवर उताणा पडलेला होता. लोक त्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न करत होते. चोरगेंनी जवळ जाऊन पाहिलं तर त्या जमिनीवर पडलेल्या माणसाच्या अंगावर चोरगेंनी घातलेलेच कपडे दिसत होते. चोरगेंना आश्चर्य वाटलं जरा जवळ जाऊन पाहताच चोरगेंना धक्काच बसला कारण तो जमिनीवर पडलेला माणूस दुसरा तिसरा नसून स्वतः चोरगेच होते. गावातील लोकांनी चोरगेंच्या देहाला उचलून बाजूला नेलं. आपल्या सारखाच दिसणारा हा माणूस कोण आहे हे चोरगेंना कळत न्हवत.
“अरे हे काय करताय.. मी इथे आहे “ असं बोलून चोरगेंनी गर्दीचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्या गर्दीमधील कोणीही चोरगेंचा आवाज ऐकू शकत न्हवत. कोणालाही त्यांचा आवाज ऐकू कसा येत नाही हे पाहून चोरगेंना आश्चर्य वाटलं. खूप आवाज देऊनही कोणीही पाहत न्हवत.
हताश झालेले चोरगेंना काहीच कळत न्हवत. तेवढ्यात चोरगेंची नजर रस्त्याचा दुसऱ्या टोकाला गेली तिथे एका मोठ्या दगडावर पडक्या घरातील म्हातारी काल रात्री घातलेला लांब झगा घालून बसली होती. आणी तिच्या डावीकडे पडक्या घरातील तो खोकणारा माणूस डोळे मोठे करून आपल्या चवड्यावर बसलेला होता. त्याच्या कपाळावर अजूनही तशीच एक काटकी धाग्याने बांधलेली दिसत होती. त्यांना पाहतच चोरगे स्तब्धच झाले.
तिकडे गावकऱ्यांची गर्दी चोरगेंचा देह घेऊन पुढे निघून गेली आणी इकडे ती म्हातारी चोरगेंकडे पाहत आपले पिवळे दात विचकत हसू लागली, आणी हातानेच आपल्या बाजूच्या असलेला दगडावर बसायला सांगत चोरगेंना इशारा करत बोलावू लागली.
चोरगे ते पाहून डोक्याला हात लावत मटकन खाली बसले.....
समाप्त.
बापरे....!
बापरे....!
थरारक!
थरारक!
आणि शेवटी ट्विस्ट!
नारायण धारप आठवले कथा वाचून.
नारायण धारप आठवले कथा वाचून. जबरदस्त लिहिलीये.
फारच भारी
फारच भारी
काल रात्री झोपताना वाचली.....
काल रात्री झोपताना वाचली.....