किरदुर्ग ~ भाग ५
" का? का? काल रात्री गाडी चा आवाज ऐकून निघून आलास, रात्रीच दोघांना संपवणे महत्वाचे होते.. रात्री का निघून आलास," भेसूर आवाजात ते मांत्रिकाचे पिशाच्च स्वतः वरच चिडून बोलत होते..
सिद्ध झाल्यानंतर त्या मंत्रा ची शक्ती काय आहे हे त्याला पूर्णपणे माहीत होते.. तो मंत्र सिद्ध होण्या आधीच अनुष्ठान उधळून लावणे गरजेचे होते...
स्वतः कडून आदल्या दिवशी झालेली चूक लक्षात येऊन ते अजूनच क्रुद्ध झाले होते..
स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्याला मंत्र सिद्ध होण्याच्या आधी प्रहार करून ते अनुष्ठान आणि अनुष्ठान कर्ता दोघांना संपवणे गरजेचे होते... भेसूर आवाज करत ते गावाच्या दिशेने निघाला होते.....
पुढे......
किरदुर्ग ला त्या रात्री एका भयानक वातावरणाने घेरले होते... आकाशात काळे ढग दाटून आले होते.. जणू प्रकृति स्वतः घाबरली होती...
जंगलाच्या गर्भातून तो मांत्रिक पिशाच अंधारातून गावाच्या दिशेला निघाला होता. त्याच्या डोळ्यां मध्ये निखाऱ्यांसारखी लाल चमक आणि मनात यशवर्धन चा नाश करण्याची तीव्र इच्छा होती..
"मला मंत्र सिद्ध होण्यापूर्वी यशवर्धन ला नष्ट करायचे आहे." खर्जातील आवाजात गर्जना करत.. तो सुधाकरच्या घराकडे वाटचाल करू लागला होता...
यशवर्धन चे अनुष्ठान सुधाकर च्या घरी सुरू होते. मंत्रांचे उच्चारण आणि अगरबत्त्या चा सुगंध वातावरणाला एक अद्भुत रंग देत होता... यशवर्धन एकाग्र होता, पण त्याच्या मनात एक भीतीची छाया ही होती. त्याला समजले होते की त्याच्या प्रयत्नांचा विरोध होईल, तरीही त्याला हे अनुष्ठान पूर्ण करण्यासाठी कोणत्याही किमतीला तयार असायचे होते... सर्वात अगोदर त्याला त्याच्या गुरु बरोबर संपर्क करायचा होता.. त्याच्या गुरु नी त्याला कुठूनही त्यांच्या अंतर्मनाशी संपर्क साधण्याची ची विद्या शिकवलेली होती.. त्यामुळे त्याच्या साठी हे खूप अवघड नव्हते...
मंत्रांच्या आवाजा मुळे असेल किंवा मनातील भीती मुळे असेल पण सुधाकर ला झोप येत नव्हती.. तो पण बाहेर येऊन हात जोडून यशवर्धन जवळ बसला ..
त्याचे अस्तित्व जाणवून यशवर्धन ने मंत्र थांबवले आणि त्याच्या कडे बघून त्याच्या हातात एक कागद आणि कोळसा दिला.. कागदावर असलेली तांत्रिक चिन्हे
घराच्या प्रत्येक कोपऱ्यात रेखाटन्यास सांगितली.. दिलेले कार्य पूर्ण करून सुधाकर परत यशवर्धन जवळ येऊन बसला.. अगरबत्ती आणि मंतरलेल्या अग्निकुंडाचा धूर वातावरणात पसरला होता. सुधाकर जरा घाबरलेला होता, पण त्याचा यशवर्धनच्या ज्ञानावर पूर्ण विश्वास होता...
अनुष्ठान पुन्हा सुरु होताच, यशवर्धनने मनाने गुरूंच्या अंतरात्म्याशी संपर्क साधला. गुरू ध्यानस्थ स्थितीत होते.. यशवर्धनच्या मनातील प्रत्येक भावना आणि प्रश्न त्यांनी स्पष्टपणे जाणले. "गुरूजी, इथल्या घटनेने गावे उद्ध्वस्त होत आहेत. ते पिशाच अत्यंत शक्तिशाली आहे, माझी अंतरात्मा मला सांगते आहे की ते लवकरच माझ्यावर हल्ला करणार आहे. मंत्र सिद्ध होण्याच्या आत त्याने हल्ला केला तर मी दुर्बल ठरेल. त्याचा नाश कसा करावा?" यशवर्धनच्या आवाजात चिंता होती...
गुरूंनी शांतपणे सर्व ऐकून घेतले आणि उत्तर दिले, "यशवर्धन, तू तुझ्या मार्गावर खंबीर रहा. साक्षात श्री गुरुदेव दत्त तुझ्या पाठीशी आहे. ती शक्ती तुझ्या पुढे कितीही प्रबळ असली, तरी तू तिच्यावर विजय मिळवू शकतोस. ती तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल, पण मी तुला संरक्षण देणार आहे."
तेव्हाच गुरूंनी स्वतःच्या अध्यात्मिक ज्ञानाच्या ताकतीवर सुधाकरच्या घराभोवती एक अदृश्य संरक्षण कवच उभे केले... त्या कवचाचे सामर्थ्य इतके होते की, कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती त्याच्या आत येऊ शकत नव्हती. पिशाचाचे अंधकारमय स्वरूपही त्या कवचाच्या आत शिरण्याचे धाडस करू शकत नव्हते.
"यशवर्धन मंत्रोच्चार खंडित होऊ देऊ नकोस, मी तुला पूर्णतः संरक्षण दिलेले आहे.. अगदी अंधाराच्या साम्राज्याची ताकद जरी त्याच्या बाजूने उभी राहिली.. तरी जो पर्यंत आतून कोणी बोलवत नाही तो पर्यंत तो त्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही.. याची खात्री बाळग.. मी वेळोवेळी तुला सूचना करत असेल, तेव्हा निश्चिंत मनाने तुझे अनुष्ठान सुरु ठेव.." असे म्हणत गुरुजी यशवर्धनच्या अंतर्मनातून नाहीसे झाले..
यशवर्धनला आता खात्री पटली होती.. त्याने पूर्ण सामर्थ्याने मंत्रसिद्धी जपा ला सुरुवात केली..अनुष्ठानाची सुरुवात होताच, वातावरणात एक विचित्र हालचाल झाली. हवेत अचानक थंडगार वारा वाहू लागला, आणि घराच्या बाहेर अंधार दाटून आला. यशवर्धन चा डोळे मिटून मंत्रोच्चार सुरू होता. प्रत्येक मंत्राच्या उच्चारणासोबत, त्याच्या भोवतीची शक्ती आणखी बळकट होत होती.. .
तेवढ्यात एक जोरदार आवाज झाला. घराच्या बाहेर काहीतरी भयंकर शक्ती टक्कर देत होती.. जणू त्या कवचा ला तोडण्याचा प्रयत्न करत होती.. पिशाच्चा च्या कर्न कर्कश गर्जना कानावर येत होत्या ..
सुधाकर ने खिडकीतून बाहेर पाहिले, पिशाच्चा चा विखारी आणि कृद्ध चेहरा दिसत होता.. त्याची निखाऱ्यासारखी नजर थेट यशवर्धन वर होती. पण कवचा मुळे तो घराच्या जवळ येऊ शकत नव्हता... अचानक त्याची नजर सुधाकर कडे वळली... सुधाकर ची आणि त्याची नजरानजर झाले.. सुधाकर काही क्षण त्या नजरेत हरवला होता.. त्याच क्षणी यशचा आवाज उच्च स्तरावर गेला.. मंत्रोच्चाराच्या प्रभावाने सुधाकर चे लक्ष विचलित झाले..त्याने भीतीने थरथरत नजर त्याच्यावरून बाजूला हटवली...
"उठ सुधाकर उठ, उघड तो दरवाजा आणि बाहेर ये, मला घरात बोलव.. हे सर्व जर तू केलेस तर मी तुला आणि तुझ्या परिवाराला जीवनदान देईल.." भयानक असा आवाज सुधाकर च्या काना मध्ये पडला....... त्या आवाजाने संमोहित होऊन सुधाकर उठण्याच्या तयारीतच होता.. तोच यशवर्धन चा हात सुधाकर च्या मांडी वर पडला... त्या स्पर्शाने सुधाकर वर पडलेली मोहिनी तुटली.. आपण काय करायला चाललो होतो हे जाणवून तो शरमला.. यशवर्धन त्याचे मन समजले होत कदाचित.. त्याने मांडीवरचा हात उचलून सुधकरच्या पाठीवर फिरवला...
डोळे बंद असतानाही यशवर्धन ला सर्व काही समजत होते. मांत्रिकाने सुधाकर वर टाकलेली मोहिनी त्याला लगेच जाणवली.. त्याने सुधाकरला एक क्षणात चुकीचे पाऊल उचलण्या पासून थांबवले.. त्या घटनेने मांत्रिका चे पिशाच्च बाहेर रागाने थयाथया नाचत होते..
त्या मांत्रिकाची ही अवस्था बघून यशवर्धनचा आत्मविश्वास वाढला. गुरूंनी दिलेल्या ताकदीने तो पूर्णतः सज्ज होता. त्या शक्तिशाली पिशाचा ला हरवण्याचा निर्धार त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याच्या प्रत्येक हालचालींवर तो लक्ष ठेवत होता, कारण त्याला एव्हाना समजले होते की हा अंतिम सामना आहे... त्याने ही लढाई उद्या होणार हे गृहीत धरले होते.. पण ते आजच त्याच्यापुढे उभे ठाकले होते.. आता माघार घेणे कदापि शक्य नव्हते... त्याने अग्निकुंडा मध्ये आहुती टाकत मंत्रोच्चारांचा वेग वाढवला.. अग्निकुंडा मधून चैतन्य मयी शुभ्र पांढऱ्या धुराचे लोळ बाहेर निघत होते.. बाहेरील सर्व परिसरावर त्या धुराने जशी चादर अंथरली होती... यशवर्धन ने आता अनुष्ठानाच्या अंतिम टप्प्यात प्रवेश केला होता... मंत्रोच्चार अधिक तीव्र झाले होते आणि त्यांच्या प्रभावाने वातावरणातील ऊर्जा ताणली गेली होती. त्याच क्षणी, पिशाच नेहमीपेक्षा वेगाने हल्ला करत पुढे सरसावले , पण कवचाच्या जवळ येताच ते उडून मागे जात होते.. प्रत्येक फटक्या बरोबर त्याची भयानक किंचाळी पूर्ण आसमंत भेदत होती....
गुरूंनी दिलेला आत्मविश्वास आणि संरक्षण कवचाच्या मदतीने यशवर्धन ने त्या पिशाचा च्या शक्तीला नेस्तनाबूत करण्याचा संकल्प केला होता. तो त्याचा नाश करण्याच्या अंतिम टप्प्यावर पोहोचला होता....
हवा अजून थरथरली, पण या वेळी ते पिशाचा च्याभीतीचे कंप होते. पिशाच वारंवार कवचावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते, पण ते जणू काही एका अदृश्य भिंतीला धडकत होते. त्याच्या भेसुर गर्जना जास्तच तीव्र होत चालल्या होत्या. ते गुरगुरत बोलत होते , "तू माझ्यापासून वाचू शकत नाहीस, तू इथे येऊन खूप मोठी चूक केलीस यशवर्धन. मी तुला नष्ट करणारच, त्याबरोबर किरदुर्गचे अस्तित्व या जगातून नष्ट करून टाकणार. सुधाकर मी दिलेली संधी तू धुडकावलीस त्या बदल्यात तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप भयानक मृत्यू मी देणार आहे.." उसने आवसान आणून बोलणाऱ्या पिशाच्चा चा आवाज भयानक भेसूर भासत होता...
सुधाकर त्याचा आवाज ऐकून अजूनच थरथर कापत होता..
यशवर्धन मात्र शांत होता. त्याच्या अंतर्मनात गुरुजींचा आवाज दुमदुमला.. त्याच्या गुरूंनी त्याला पिशाचाची शक्ती आणि तिचे निर्बल स्थान सांगितले होते. ते जितके शक्तिशाली होते तितकेच ते त्याच्या शक्तीच्या अहंकारात अडकलेले होते. त्याचा अंत साधायचा असेल तर त्याच्या अहंकाराला आव्हान देणे गरजेचे होते.. ते जितक्या वेळेस घरामध्ये प्रवेश करण्यासाठी कवचावर आघात करेल तितकी त्याची शक्ती कमी कमी होत जाईल.. हे यशवर्धन ला समजले होते...
त्याने पिशाच्चा ला उकसावने सुरु केले..
"तू तुझ्या प्रबळ शक्तीवर गर्व करतोस, पण त्याच गर्वामुळे तू पराभूत होशील.. तुझी पूर्ण ताकद वापर आणि तू माझ्या पर्यंत पोहोचून दाखव," यशवर्धन ने त्याला आव्हान दिले... त्याच्या आवाजात आता निर्भयता होती. त्याने अनुष्ठानाची अंतिम पायरी गाठली होती. मंत्रांची गती आणि तीव्रता भयानक वाढली होती.. घराभोवतीचा प्रकाश वाढू लागला होता...
यशवर्धन चे आव्हान स्वीकारून ते पिशाच्च वारंवार घरावर आक्रमण करत होते.. प्रत्येक वेळी कवचाच्या धक्क्याने जोरदार किंचाळी मारून दूर जाऊन पडत होते...
त्याच्या गर्जनां मध्ये आता भय जाणवत होते... "तू मला थांबवू शकत नाहीस!" ते किंचाळत ओरडले, पण त्याच्या आवाजात भीतीची झलक होती. यशवर्धन ने त्याच्या या गर्जनांकडे दुर्लक्ष करून मनोमन गुरूंना स्मरले आणि मंत्र उच्चार अधिक तीव्र केले... यशवर्धन ने शेवटचा एक मंत्र विलक्षण मोठ्या आवाजात उच्चारला आणि प्रचंड वेगाने अग्निकुंडा मध्ये आहुती टाकली... ज्वालांचा भडका उडाला... जो थेट छता पर्यंत पोहोचला होता....
यशवर्धन चे मंत्र आता सिद्ध झाले होते....
त्याच बरोबर अचानक घरामध्ये सगळीकडे रेखाटलेली ती तांत्रिक चिन्हे प्रकाशू लागली.. त्यांच्यामधून निघालेली ऊर्जा घराभोवती असणाऱ्या कवचाच्या दिशेने जात होती....त्यामुळे घराभोवती च्या कवचा ने अधिक बळ प्राप्त केले आणि एक तेजस्वी प्रकाशाचा झोत थेट पिशाचा वर आदळला. ते क्षणात जमिनीवर कोसळले... त्याचा देह कापत होता... प्रकाश झोत त्याच्या छातीवर जिथे आदळला होता, तिथून पूर्णतः काळया रक्ताची धार मातीत मिसळत होती... त्याचे निखार्यासारखे लाल डोळे पांढरे झाले होते.. ते काहीतरी बोलू पाहत होते पण त्याचा आवाज आता क्षीण झाला होता...
यशवर्धन ला गुरूंचा आवाज ऐकू आला, "आता तुझा शेवटचा हल्ला कर, यशवर्धन. ते आता खूपच कमकुवत झाले आहे."
गुरूंची अनुमती मिळताच, यशवर्धनने त्याच्या शेजारी ठेवलेल्या बॅग मध्ये हात घातला. लाल कपड्यांमध्ये गुंडाळलेली, एक लांब वस्तू बाहेर काढली.. ते एक दंडक होते... लाकडी दंडक... विद्यार्जन संपल्यानंतर लॉकेट बरोबरच त्याच्या गुरूंनी त्याला दिलेली भेट.. त्या दंडकाचे कार्य विशेषतः अशा शक्तींचा नाश करणे हेच होते..
यशवर्धन दंडक घेऊन उठला.... दंडक हातात धरत यशवर्धन ने सिद्ध केलेले मंत्र पुन्हा एकदा म्हणायला सुरुवात केली...
सुधाकर त्या सर्व गोष्टींकडे आश्चर्यचकित होत बघत होता... मंत्र म्हणताच सुधाकरला त्या दंडका मधून एक विद्युत ऊर्जा धावल्याचा आभास झाला..
यशवर्धन दंडक हातात पकडून उच्च आवाजात मंत्र म्हणत हळुवार पने दरवाजा उघडून बाहेरच्या दिशेने निघाला.... सुधाकर ही त्याच्यामागे दरवाजापर्यंत गेला.. दरवाजा बाहेर पाऊल टाकण्याची सुधाकर ची हिंमत होत नव्हती.. त्याने तिथूनच बाहेर काय घडते आहे हे बघण्याचा आरंभ केला..
पिशाच्च पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याच्या हालचाली थकलेल्या होत्या... मगाशी त्याच्या शरीरावर आपटलेल्या तेजोमय प्रकाशाने त्याला जवळपास पूर्णतः शक्तीहीन केले होते... यशवर्धन अजूनही जोरात जोरात मंत्र पुटपुटत होता, यशवर्धन त्याच्याजवळ पोहोचला.. तो दंडक त्याच्या दिशेने उगारत, "तुझा अंत जवळ आलाय," यशवर्धन गंभीर स्वरात बोलला..
पिशाच्चा ने उठण्याचा शेवटचा प्रयत्न केला, पण त्या मंत्रांच्या प्रभावासमोर तो अपयशी ठरत होता..
दंडक पिशाच्चा ला स्पर्श करणारच होते.. तोच गुरुजींचा आवाज यशवर्धनच्या कानामध्ये घुमला, "थांब यशवर्धन, त्याला संपवू नकोस."
यशवर्धन चा हात गुरूंचा आवाज ऐकून, त्या क्षणाला मागे आला होता... मंत्र पण थांबलेत..
मांत्रिकाच्या पिशाच्चा ला या गोष्टीची कल्पना आली होती की कोणत्याही क्षणाला त्याचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.. यशवर्धन चे मंत्र बंद झाल्यावर त्याला तिथून पळून जाण्यास वेळ मिळाला... त्या क्षणी उरलेली सर्व शक्ती एकवटून जंगलाच्या दिशेने ते पिशाच्च गायब झाले...
यशवर्धन संभ्रमित झाला होता त्याला कळत नव्हते.. त्या पिशाच्चा चा अंत इतका जवळ आला असताना गुरूंनी त्याला का थांबवले... त्याच्या मागे जंगलात जावे की काय अशा संभ्रमात त्या दिशेने त्याने पाऊल टाकले च होते...
परत एकदा गुरूंचा आवाज आला, "यशवर्धन अजूनही ते 19 जण जिवंत आहेत, परत मनुष्य रूपात पृथ्वीतलावर येण्यासाठी त्याला एकवीस माणसांचा बळी देणे आवश्यक आहे.. हे सर्व बळी देण्यासाठी जो विधी त्याला करायचा आहे.. त्याची योग्य वेळ अजून आलेली नाही... गावातून आत्तापर्यंत गायब झालेले 19 जण आणि तुम्ही दोघे, असा उद्या रात्रीला एकवीस बळी देण्याचा त्याचा मानस होता.. आजची रात्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, अजून दोन बळी मिळाल्याशिवाय त्याने योजलेले कार्य पूर्णत्वास जाणार नाही.. आणि त्याला ते दोन बळी आजच्याच रात्रीत मिळवणे आवश्यक आहे.. आज तो परत गावामध्ये येणार आणि त्याला हवे असलेले दोन बळी घेऊन जाणार.... उद्या सूर्यास्त होण्याच्या अगोदर तुम्हाला जंगला मधील त्याचा ठिकाना शोधणे गरजेचे आहे.. जिथे त्याने सर्व बळी दडवून ठेवलेले आहेत.. हे सर्व मला त्याचा शेवट जवळ आला असताना तो करत असलेल्या क्षीण विचारांमुळे समजले.. "एवढे बोलून गुरूंचा आवाज येणे बंद झाले...
गुरूंना मनोमन प्रणाम करून, यशवर्धन घराच्या दिशेने वळला... सुधाकर दरवाजाच्या मधून त्याच्याकडेच बघत होता.. पिशाच्चा च्या जवळ गेलेला दंडक यशवर्धन ने मागे का घेतला, याबद्दल विचार करूनही त्याला काहीच कळत नव्हते...
यशवर्धन घरात आल्यानंतर त्याने सर्वात अगोदर तोच प्रश्न विचारला, " यश तू त्याला का संपवले नाहीस? "
यशवर्धन ने गुरुजींनी सांगितलेले सर्व काही त्याला सांगितले.. ते ऐकून किशोर जिवंत आहे, तसेच त्याच्याबरोबर आतापर्यंत गायब झालेले सर्व लोक जिवंत आहेत हे कळल्यामुळे सुधाकर आनंदी झाला होता..
"अरे पण आपण त्यांना शोधायचे कुठे तुला काही ठिकाण सांगितले आहे का? " सुधाकर ने विचारले...
"गुरुजींनी बोलताना जंगलामध्ये कुठे तरी दडवले आहे असा उल्लेख केला होता, तुला जंगलामधील अश्या एखाद्या गुप्त ठिकाणा बद्दल काही माहित आहे का?" यशवर्धन ने सुधाकर कडे बघत विचारले..
"आम्ही जन्मल्यापासून बघतो आहोत जंगलाला, पण जंगलात आतापर्यंत असे कोणतेही गुप्त ठिकान मला तरी माहित नाही, आणि इतर कोणी बोललेले माझ्या ऐकण्यात पण नाही.. " सुधाकर विचार मग्न होत बोलत होता..
एकदम त्याला काहीतरी आठवल्यासारखे झाले..
"यश आम्ही नेहाचा पाठलाग करत ज्या ठिकाणापर्यंत पोहोचलो होतो, त्या ठिकाणी तो मांत्रिक अचानक एक वेळा आमच्या समोर गायब झाला, आणि अचानक आमच्या समोर प्रकट झाला... नक्कीच तिथे काही तरी असू शकते.. ते स्थान मी नक्कीच तुला दाखवू शकतो.. आपण तिथे जाऊन शोध घेऊयात का?" सुधाकर बोलला...
यशवर्धन ला सुद्धा शंका आली होती त्याने दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन आपण शोध घेऊयात सांगितले... उद्या दिवसभरात आपल्याला बरेच कार्य उरकायचे आहे.. आता उशीरही खूप झालेला आहे तेव्हा तू झोपायला जा..
सुधाकर झोपण्यासाठी जाण्याच्या अगोदर यशवर्धन ने मंत्रावलेला धागा त्याच्या दंडावर बांधला..
सुधाकर झोपण्यासाठी गेल्यानंतर यशवर्धन ने दंडक लाल कपड्यामध्ये गुंडाळून, महादेवाच्या पिंडी समोर ठेवला आणि परत एकदा ध्यान लावले त्याला आता गावाची चिंता पडलेली होती... पिशाच्च आता गेलेले असले, तरी ते रात्रीतून कधीही दोन बळी नेण्यासाठी परत येऊ शकत होते....
थोडेसे मागे,
मल्हार रावांचे घर, सायंकाळची वेळ..
सायंकाळी यशवर्धन आणि सुधाकर निघून गेल्यानंतर.. मल्हार रावांनी घरात आवाज दिला.. त्यांच्या पत्नीला देवघरात बोलावले आणि नवनाथांची पोथी वाचन सुरू करायला लावले.. ते तसेच बाहेर निघाले, हरीच्या मार्फत सर्वच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना बोलवून घेण्यात आले.. आणि आलेल्या संकटातून जर गावाला वाचवायचे असेल.. प्रत्येक गावकऱ्यांने घरामध्ये नवनाथांची पोथी वाचन सुरू करावे.. ही वाऱ्यासारखी गावभर पसरली.. ही शेवटची लढाई आहे समजून यामध्ये जिंकण्यासाठी भयभीत झालेले सर्व गाव एकजुटीने उभे राहिले.. घराघरात नवनाथांची पोथी वाचन सुरू झाले होते..
सुधाकर चे घर
रात्री दोन वाजता..
दोन बळी नेण्यासाठी पिशाच्च परत येणारच होते, त्याला विरोध करण्यासाठी यशवर्धनने ध्यान लावले होते... पूर्ण गावावर नियंत्रण मिळवणे हे त्याच्या स्वतःच्या क्षमते बाहेरचे आहे हे तो जाणून होता.. तरीही जेवढे शक्य आहे तेवढी मदत करण्याचे मनात आणून त्याने ते ध्यान लावलेले होते.. थोड्याच वेळात त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.. गावातून घराघरातून एक मंद स्वर वातावरणात पसरत होता.. त्याच्या मनाने लगेच ताडले की घराघरात पोथी वाचन सुरू आहे.. त्या स्वरां मुळे प्रत्येक घराभोवती निर्माण झालेल्या ध्वनीलहरी एका पारदर्शी संरक्षण कवचा सारख्या दिसत होत्या....
तरीही स्वतःच्या सुरू असलेल्या जपा मध्ये त्याने कोणतीही कसूर पडू दिली नाही..
ब्रह्म मुहूर्तापर्यंत म्हणजेच साधारण चार वाजून 25 मिनिटापर्यंत त्याचा अखंड जप चालूच होता... त्यानंतर त्याने अनुष्ठान समाप्ती केली.. दुसरा पूर्ण दिवस धावपळीत जाणार होता.. थोडीफार शरीराला विश्रांती मिळावी म्हणून त्याने अंथरुणावर अंग टाकले.....
पण त्याची झोप अवघ्या काही तासा मध्येच दरवाजावरील आवाजाने भंग झाली...
आवाज ओळखीचा होता..
हरी जोरात जोरात दरवाजा वाजवत आवाज देत होता..
यशवर्धन ने डोळे उघडले, त्याला सुधाकर दरवाजाकडे जाताना दिसला..
"सुधाकर भाऊ, किसनरावांच्या घरातले दोन्ही मुलं गायब आहेत." हरी बोलला..
सुधाकर ने त्याला वाड्यावर जाण्यास सांगितले..आणि तो यशवर्धन कडे वळला..
"अरे असे कसे शक्य आहे, रात्री गावात तर सर्व घरांमध्ये पोथी वाचन सुरू होते.. आता हे किसनराव कोण आहेत?" यश बोलत होता..
"किसनराव म्हणजे मल्हाररावांचे विरोधक, त्यांचे सावत्र भाऊ आहेत, पण मल्हार रावांशी त्यांचे एक क्षणभर सुद्धा पटत नाही.." सुधाकर ने माहिती दिली...
"बरोबर आहे.. नक्कीच काल रात्री सगळ्या घरांमध्ये जे पोथी वाचन चालू होते, ते मल्हाररावांनी च करण्यास सांगितले असेल... आणि हे विरोधक असल्यामुळे त्यांनी काय मला रावांचे बोलणे ऐकले नसेल..." यशवर्धन सर्व काही समजून बोलला...
तो दिवस खूप महत्त्वाचा झाला होता.. रात्री देण्यासाठी हवे असलेले बळी त्याला आता प्राप्त झाले होते... सूर्यास्त होण्याच्या आत त्या सर्व एकवीस जणांना शोधणे गरजेचे होते..
यशवर्धन ने सुधाकरला घाई करण्यास सांगितले.. सकाळचे नित्यकर्म उरकून.. सकाळची पूजा अर्चना आवरून ते दोघे मल्हार रावांच्या घराच्या दिशेने निघाले होते...
कुठे असतील सर्व जण?
सूर्यास्त पर्यंत सापडेल का ते गुप्त ठिकाण?
असतील का ते सर्व जण जिवंत?
मांत्रिक विधी संपन्न करून अति शक्तीशाली होऊन पुन्हा उभा तर नाही ना राहणार...
त्या गुप्त ठिकाणी असे काय बघावे लागेल आहे, ज्या मुळे सर्व गाव शोक सागरात बुडेल...
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचत रहा....
किरदुर्ग ~ एक भय मालिका
लेखक : रूद्रदमन
( कथा वाचल्यावर कशी वाटली याचा अभिप्राय नक्की द्या.. )
उत्कंठावर्धक
उत्कंठावर्धक
@धनवंती मनापासून धन्यवाद...
@धनवंती
मनापासून धन्यवाद...
हा भागही मस्त झाला आहे.
हा भागही मस्त झाला आहे.