मुक्त

Submitted by रघू आचार्य on 7 September, 2024 - 06:16

गडद काळ्या अंधाराला चिरत
वरून आलेल्या स्पॉटलाईटमधला एक भला मोठा पांढरा आयत.
या आयतापलिकडे काहीही नाही.
ना खाली.
ना वर
दिक्कालातून फिरणारी अजस्त्र भुयारं
आणि पलिकडे पोकळी भरून राहिलेली असावी तरीही
चौकोनाच्या पलिकडे कुठलेही अस्तित्व नुरावे .
एक स्पॉटलाईट, एक आयत आणि त्यात मी.
मी त्या मी ला बघत होतो.
बघता बघता आयत मोठा होत गेला.
अनेक आयत एकमेकात मिसळू लागले.
बुद्धीबळाच्या पटासारखे काळे पांढरे
आयताच्या बाहेर आसमंत जिवंत झाला.
कुठे पाय ठेवावा समजत नव्हतं.
धावत सुटलेले आयत.

तो मी थबकला.
त्याचा इवलासा हात वर आला.
बहुतेक त्याला आधार मिळाला. मार्ग मिळाला असावा.
त्याने नेमक्या चौकोनात पाय ठेवला आणि त्याची वाट तयार झाली.
एकेक पाऊल पुढे पडू लागले तसा वाटेचा रस्ता, हमरस्ता होत गेला.
पावलागणिक पाऊलही मोठे होत गेले तस तसा बाजूचा आसमंत विस्तारला.
त्याला आकार आला.

हे बहुधा रस्त्याच्या कडेचं नक्षीकाम आहे.
हिरवाई ओतप्रोत भरलेली आहे.
सकाळची किलबिल जाऊन आता नाजूक किलबिलते आवाज भरून राहिलेत.
चौकोना चौकोनात कशिदाकारी चालू आहे.
एक मनस्वी कारागीर एक शिल्प बनवतोय. ते आता जिवंत होणार आहे बहुतेक.
या हिरवाईच्या जंगलात वाटा अवखळ होत कुठेही हरवत होत्या.
मी त्या मी ला पाहीले.
आता त्याचे तळहात किती मोठे होते.
सगळ्याच चौकोनात सहज फिरत होता तो.
कुठूनतरी आवाज आल्यासारखा तो पुन्हा थबकला.
त्यात जरब होती. ऊब होती.
आवाजाचे अस्तित्व.
तो पुन्हा नेमक्या वाटेवर आला.
तो मी काही तरी विसरला होता.
आता हात मोकळे होते पण त्याला कुठल्या तरी स्कंधाने बांधून ठेवलेले होते.

असे कित्येक चौकोन एकमेकांपासून दूर पळत होते.
स्पॉटलाईट आता किती तरी उंचावरून येत होता.
आवाका केव्हढा तरी वाढला होता.
मी च्या कडेवर पुन्हा मीच होतो.
आश्वस्त !
मी आता त्या मी मधे गुंगला होता.
त्याला माझा विसर पडला होता.
मग कडेवरच्या मी ने चौकोनात पाऊल टाकताना हात वर नेला होता..

रस्त्याच्या कडेला जुनाट वाडा अंग चोरून उभा आहे.
मला "मी" ला माहीत आहे की त्यात एक पंख झडलेला पिवळा पक्षी आहे.
चौकोनांना भिंती आल्या होत्या.
त्या भिंतीतून स्पॉटलाईट आत पोहोचत नाही.
कितीदा वाटलं सांगावं.
पण सांगण्याची गरज काय ?
मी चं मी ला पोहोचतंच की. कितीदा अनुभव घ्यायचा ?

मला मी दिसला नाही बरेच दिवस.
मी ही अंतर्मुख झालेलो.
आमचे आम्हापर्यंत पोहोचणारे अदृश्य प्रकाशतंतू जाणिवा घेऊन फिरत होते.
पण स्पर्श पोहोचत नव्हता.

मी आता स्पर्शाच्या प्रतिक्षेत.
अचानक मी उगवला आणि मी खुदकन हसलो.

आता मी ची जागी मी घेतली.
छप्पर, भिंती कोसळून पडल्या. चौकोन उघडे झाले होते.
कशिदाकामाचा मागमूस नव्हता.

जंगल अस्ताव्यस्त पसरले होते.
त्यातून मी धावत होतो.
निबीड अरण्यात कुठेतरी दिव्य निळा प्रकाश झळाळत होता.
त्याला जांभळी झालर होती.
तेजस्वी आभा पसरली होती.
एक चौकोन समोर धावत आला.
जणू डोक्यावर पाऊल धरायला खाली बसलेला असावा.
हाताची मूठ घट्ट झाली होती.
हात वर झाला आपसूकच.
तेजाला वेगवेगळे आकार येत होते.
एक आकार ओळखीचा. धूसर.
आणि मग तो आवाज. आता तो ऐकू आला नाही.
मी एका झाडाखाली.
त्याला तीन फांद्या. एक भगवी, एक निळी एक हिरवी.
पाने अद्याप हिरवी होती.
आवाजाला अस्तित्व नव्हते.
पण स्वर मनात उमटत होते.

ती जरब मनात दाटली.
आला तसा परत जा इथून. ती पानं निळी व्हायच्या आत या चकव्यातून मागे फिर.
मी इथेच आहे.
तू आता इथे यायचं नाहीस.
हा चौकोन पुन्हा पाहू नकोस.
मागे हिरवे जंगल आहे.
मागे फिर.

स्पॉटलाईट आता खाली खाली येत होता.
मी जडावलेल्या पावलांनी मागे फिरलो होतो.
मला माहीत होतं.
मी मला पाठमोरा पाहत असेल.

रस्त्यात दिसलेला जुनाट वाड्यातला पिवळा पक्षी आता आकाशात भरार्‍या मारत होता.
मी वाट बघत असेल......
पावलांना गती आली आणि चौकोन पुन्हा आक्रसत गेले.
मी ची जागा आता मी घेतली होती.

मी आता मी ला पाहू शकत नाही.
मी च्या भोवती आता कुठला चौकोन आहे हे माहिती नाही.
कदाचित तिथे आता स्पॉटलाईट नाही.
आसमंतही नाही.
एक द्वार आहे.
त्यातून येणारा उबदार प्रकाश
माझ्यात थोडा थोडा मी आहे.
माझ्यातून मी चे चक्र चालत राहणार आहे.
एक अंश निसटला
पंचतत्वात मिसळला
मी आता माझ्यात मिसळण्याच्या
प्रतिक्षेत.....
काळाला काही अर्थ आहे का ?
भ्रम भ्रम भ्रम
यातून तर सुटायचेय.
मला बोलवतोय
मी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users