वाडा ~ भय इथले संपत नाही..

Submitted by रुद्रदमन on 4 September, 2024 - 09:05

वाडा ~ भय इथले संपत नाही..

राजेशने आपल्या शिक्षणासाठी गावातून शहरात जाण्याचा निर्णय घेतला. त्याची शहरात जाण्याची ही पहिलीच वेळ होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करणे त्याला शक्य नव्हते.. तो शहरात पोहोचला.. प्रथम कॉलेज मधील ऍडमिशन चे सोपस्कार उरकून घेतले.. दुपार नंतर तिथे राहण्यासाठी रूम च्या शोधात बाहेर पडला.. त्या दिवशी ऍडमिशन आणि रूम चा शोध पूर्ण करून त्याला सामान आणायला परत गावी जायचे होते.. पण रूम शोधणे म्हणजे त्याच्या साठी एक दिव्य च ठरत होते..आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे कमी भाड्यात रूम मिळवने एक कठीण काम ठरत होते.

“कुठे कुठे फिरून आलो आहे मी? सगळीकडे अवाच्या सवा भाडे आहे. मला इथे कधी रूम मिळेल का ?” शहराच्या गल्ल्या पायाखाली पालथ्या घालत त्याने स्वत:शीच विचार केला..

संध्याकाळ होत आली आणि तो शहराच्या जुन्या भागात पोहोचला. तिथे एका दुकानात चौकशी केल्यावर त्या दुकानदाराने पुढील गल्ली मध्ये बऱ्याच ठिकाणी कमी रेंट वर रूम मिळू शकतात असे सांगितले.. राजेश सांगितलेल्या दिशेने निघाला.. आजूबाजूला बघत तो पुढे चालला होता, तिथल्या बऱ्याच इमारती पडझड झालेल्या जवळपास निर्मनुष्यच होत्या.. पण काही ठिकाणी हालचाल दिसत होती. तो एक-एक करुन प्रत्येक हालचाल असलेल्या इमारतीत गेला आणि चौकशी करू लागला.

“भाऊ, इथे कमी भाड्यात रूम आहे का?” प्रत्येक घरात गेला की हा प्रश्न ठरलेला..

“नाही रे बाबा, इथे एकही रूम नाही. ऑलरेडी दिलेल्या आहेत,” आणि हे उत्तर ही ठरलेलेच..

राजेश निराश झाला. “खरंच, मला इथे पण रूम मिळणार नाही का?” त्याने विचार केला. दिवस मावळला होता, आणि त्याला आता लवकरात लवकर रूम शोधणे गरजेचे होते.. गावी जायची शेवटची गाडी साडे नऊ ची होती.. त्या आत आवरले तर उद्याच त्याला सामान आणून कॉलेज सुरू करता येणार होते..

थोडे पुढे जाताच, त्याची नजर एका जुन्या वाड्या कडे गेली. चांगलाच भव्य दिसत होता, वाड्यात भरपूर लाईट लागलेल्या होत्या. त्याने हिम्मत करून दारावर टकटक केली. थोड्या वेळाने, एक वृद्ध माणूस दार उघडून बाहेर आला.

“ इथे रूम मिळेल का?” राजेशने उत्सुकतेने विचारले.
“तुला रूम पाहिजे ?” त्याने विचारले.

“हो, छोटी शी असली तरी चालेल. फक्त रेंट कमी असावा.." राजेश ने अडचण सांगितली..

"ठीक आहे, आहे एक रूम आमच्याकडे आणि भाड्याचे म्हणशील तर तुला परवडेल ते दे. चल, मी तुला दाखवतो,” वृद्धाने सांगितले आणि राजेश ला आत येण्याची खूण करत, वाड्याच्या मागच्या भागात निघाला..वाड्यात प्रवेश केल्यानंतर राजेश सगळी कडे निरखून बघत त्या वृद्धा मागे जात होता.. वाडा खूप जुन्या घडणीतील होता.. आतल्या सजावटीच्या सर्व वस्तू या कित्येक शतको जुन्या वाटत होत्या.. पण अजूनही त्यांची सुंदरता, आकर्षकता कमी झालेली नव्हती.. राजेश ला जणू त्या सौंदर्याची मोहिनी पडली होती.. पुढे जात असताना त्याची नजर भिंती वर लटकवलेल्या एका फोटो कडे गेली.. जी एक पेंटिंग होती.. त्यात एक अति सुंदर स्त्री पुरुषाचा जोडा दिसत होता.. स्त्री ने लाल साडी परिधान केलेली होती.. तिचे डोळे खूपच आकर्षक वाटत होते.. दोन मिनिट राजेश त्या डोळ्यांमध्ये अडकून तिथेच थांबला.. वृद्धा च्या आवाजाने त्याची मोहिनी तुटली.. वृद्धाने ओळखले की काय असे वाटून तो ओशाळला आणि त्यांचा मागे चालू लागला..
वाड्याच्या सर्वात शेवटच्या भागात उजव्या हाताला एक दरवाजा उघडत त्या वृद्धाने राजेश ला आत जाऊन रूम बघायला सांगितली..
राजेशने रूम पाहिली. ते छोटी होती, पण स्वच्छ आणि व्यवस्थित होती. भिंतीला लागून एक जुन्या पद्धतीचा सागवानी पलंग होता, त्यावर पांढरे शुभ्र बेडशीट अंथरलेली गादी होती.. पांघरण्यासाठी छान मऊ मऊ लाल कलर ची रग होती.... जसे काय ती रूम त्याला लगेच झोपण्या साठीच सज्ज केलेली होती..आतल्या आत एक अंघोळी साठी मोरी होती.. पाण्याची पण सोय दिसत होती... त्याने तातडीने तीच रूम घेण्याचा निर्णय घेतला.

त्या वृद्धा बरोबर बाहेर येत, त्याने भाडे ठरवून घेतले.. आणि मी उद्या सकाळी सामान घेऊन राहायला येतो सांगून, रूम बुक करण्यासाठी साठी वृद्ध नाही म्हणत असताना ही थोडी फार पगडी देऊन तो निघाला..

वाड्याच्या बाहेर रस्त्यावर आल्यावर त्याने एकदा मागे वळून बघितले.. तो वृद्ध त्याच्या कडे बघत हसत हसत दरवाजा बंद करत होता.. तो जाण्यासाठी वळला.. वळताना त्याची नजर वाड्याच्या वरच्या बाजू च्या खिडकीत गेली.. एक अति सुंदर स्त्री सफेद साडी घालून त्याच्याकडेच बघत उभी होती..
त्याने लगेच ओळखले.. तेच डोळे, तेच मोहित करणारे रूप.. पण साडी सफेद?
त्या फोटो मध्ये असलेला तिचा नवरा मरण पावला आहे हेच सूचित करत होता.. ती स्त्री आतल्या बाजूला वळली.. आणि परत एकदा तिच्या रुपाची मोहिनी पडलेला राजेश भानावर आला..
" अरे रात्रीचे 10 वाजलेत", मन थाऱ्यावर आल्यावर तो स्वतःशीच पुटपुटला..
आता कुठून गावी जायला गाडी मिळणार. असा विचार करत तिथेच वाड्या कडे बघत उभा राहिला...
" आज इथेच थांबायचे का? तसे पण आपण पगडी आजच दिली आहे म्हणजे आपण रीतसर भाडेकरू झालेच आहोत या वाड्याचे", मनाची समजूत घालत तो स्वतःशीच बोलत होता..
नक्की कारण काय होते काय माहित.. त्याने त्याला जर गावी जायचेच असते तर कोणत्याही गाड्यांना लिफ्ट मागत तो थेट गावाच्या जवळ पर्यंत पोहोचू शकत होता . पण कदाचित मघाशी खिडकीतून झालेली नजरानजर .. त्याने त्याला मोहिनी पडली होती..
त्याने थांबण्याचा निर्णय घेतला आणि वाड्याकडे निघाला.. वाजवताच एका क्षणात दरवाजा उघडला.. जसे काही उघडणाऱ्याला माहीत असावे आता कोणीतरी येणार आहे म्हणून.. समोर तीच अति सुंदर हा शब्द पण तोकडा पडेल असे रूप असलेली एक लावण्यवती सफेद साडी मध्ये उभी होती..
तिचे ते निळेशार डोळे त्याच्या मनाचा वेध घेत होते..
ती मंद हसत होती. “या, आत या,” तिने नम्रतेने म्हटले. तो परत भानावर आला..
" काय होते आहे आपल्याला आज.. आज पहिल्यांदाच एका स्त्रीला बघितल्यावर आपण असे सैरभैर का होतो आहे?" स्वतः लाच प्रश्न विचारत त्याने त्या वाड्यात पाऊल टाकले..
हॉल मध्येच एका आलिशान सोफ्यावर ते वृद्ध गृहस्थ बसले होते.. त्यांना निर्माण झालेली अडचण सांगून त्याने आज पासूनच रूम ताब्यात देण्याची विनंती केली.. आता बोलत असताना त्या जागा मालकांच्या चेहऱ्यातील आणि त्या फोटोतील तरुणाच्या चेहऱ्यातिल साम्या वरून समजून आले की हे या स्त्री चे सासरे आहे..
त्यांनी त्या स्त्री कडे एक नजर टाकली... तिच्या चेहेऱ्यावर आनंद झळकत होता.. राजेश कडे वळत त्यांनी राजेश ला परवानगी दिली आणि रूम ची चावी त्याच्या हातात ठेवली..
त्या स्त्री कडे एक कटाक्ष टाकत राजेश रूम कडे गेला.. कुलूप उघडताना ती किती जुनी असावी याचा अंदाजच लागत नव्हता.. खूपच सुरेख अश्या आकृत्यांचे कोरीव काम तिच्या वर केलेले होते ... पण त्या कसल्या आकृत्या आहेत याचा राजेश ला काही ही संदर्भ लागत नव्हता..
तो रूममधे आला , लाईट लावली आणि थोडी साफसफाई केली. नंतर बाहेर जाऊन काही तरी खाऊन यावे म्हणून निघाला....
हॉल मध्ये ती स्त्री बसलेली होती.. ते वृद्ध आजूबाजूला कुठे ही दिसत नव्हते.. तिला जेवण करून येतो असे सांगून बाहेर जाण्यास निघाला..
" या वेळी या भागात काहीच भेटणार नाही, तुम्हाला काही अडचण नसेल तर घरात थोडेफार जेवण आहे.. इथेच जेवा, मी वाढून आणते." काय तो मधुर आवाज.. राजेश त्या आवाजातील गोडव्याने भारावून गेला.. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता... तो तिथेच जेवला.. रस्सा शिल्लक होता फक्त, कोणत्या भाजी चा होता माहीत नाही पण खाताना सुद्धा त्याच्या तोंडातून पाणी गळत होते.. जेवताना ती समोर च असावी अशी भावना मनात उफाळून येत होती.. एक मन त्याला हे चूक आहे हे सांगत होते.. पण तिच्या रुपाची मोहिनी त्याला तिच्या कडे आकृष्ट करत होती.. कसे तरी मनावर ताबा ठेऊन त्याने जेवण उरकले.. आणि रूम मध्ये आला..
मऊशार गादीवर अंग टाकले.. त्याचे मन मात्र तिच्या अवती भोवतीच फिरत होते.. तिची सुवर्ण काया रेखीव शरीर त्याला स्वस्थ झोप येऊ देत नव्हते.. बराच वेळ तळमळत पडल्यानंतर त्याला झोप लागली.. स्वप्नातही तीच स्त्री त्याच्या आजूबाजूला रुंजी घालत होती..

रात्री अचानक काही आवाजांनी त्याची झोप चाळवली... बघत असलेल्या स्वप्नातून त्याला बाहेर यायचे नव्हते म्हणून तो आवाजाकडे दुर्लक्ष करत तसाच डोळे बंद करून पडून राहिला.. पण स्वप्न एकदा भंगले की पुन्हा त्याची सांगड घालता येत नाही हे त्याला माहीत नव्हते..
सर्वत्र शांतता पसरलेली होती.. त्यात तो आवाज पुन्हा त्याच्या कानावर पडला.. एखादे श्वापद जिभल्या चाटत असताना जसा आवाज येतो तसा तो आवाज होता.. त्याला नक्की काय होते आहे हे कळेना.. काही तरी भास आहे म्हणून त्याने उशी कानावर दाबून परत झोपण्याचा प्रयत्न केला.. पण तो आवाज अजून ही येत होता..
त्याने डोळे उघडले समोरच्या भिंतीवर एक पाल कर्रकुईई आवाज करत वरच्या दिशेने पळत नाहीशी झाली... कटाक्षात काही तरी वेगळे जाणवले म्हणून त्याने नजर हळू हळू खाली आणली.. समोरील दृश्य बघून त्याचे डोळे खाडकन उघडले.. ती पांढऱ्या साडीतली स्त्री मोरी मध्ये बसली होती.. तिचे निळेशार डोळे आता गारगोटी सारखे झाले होते.. त्या गारगोटी मध्ये एक काळी आडवी रेघ इकडे तिकडे हालत होती.. ती त्याच्या कडेच बघत जिभल्या चाटत होती.. रक्ता सारखी लाल लांब आणि पुढे टोक निघालेली जीभ . तिचा चेहरा पूर्वीसारखा मनमोहक नव्हता.त्यावर भीतीदायक सुरकुत्या होत्या. जसे काही तिची त्वचा आत मांसच नसल्या सारखी लटकत होती... घशातून एखाद्या भुकेल्या श्वापदा सारखा घुर्रर आवाज येत होता...आता आजूबाजूची खोली बरळन्याच्या आणि हेल काढून रडण्याच्या अस्पष्ट आवाजांनी व्यापून टाकली होती.....

“क.. कोण आहेस तू.. काय चालले आहे इथे?” राजेश घाबरून विचारत म्हणाला आणि त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात त्याचे लक्ष पलंगाच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या वृद्धा कडे गेले .मघाशी सर्वसामान्य दिसणाऱ्या वृद्धाचे शरीर आता लिबलिबीत झालेले होते, वर्ण काळवंडला होता, शरीरावर ठीक ठिकाणी काळे पांढरे केस वर आले होते.. पलंगा शेजारीच उभा असल्यामुळे त्याच्या त्वचेतून येणारा उग्र दर्प राजेश ला सहन होत नव्हता..

“हे काय चालले आहे ?” त्याने भीतीने विचारले. वृद्धाचा चेहरा आता भयंकर दिसत होता.

“तू आलास खूप आनंद झाला.. खूप दिवस झालीत कोणी या बाजूला फिरकतच नाही ,”सुरकुतलेले, आक्रसलेले ओठ हलवत वृद्धाने म्हटले, त्याच्या आवाज चिरकत होता.

त्याच्या कडे क्रूर, भेदक, पाशवी नजरे ने बघत दोघेही हळूहळू जवळ येत होते. राजेश मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागला.. मागे टेकण्यासाठी असलेली पलंगाची फळी त्याच्या पाठीला लागली... आता राजेश कडे समोर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता..
पण समोर दोन्ही दिशांना ते दोघे होते..
तो कधी तिच्या कडे तर कधी त्याच्या कडे भीतीने भरलेली नजर टाकत होता..
एकदम सर्व वातावरण स्थब्द झाले..
वृद्ध माणूस स्त्रीकडे पाहून तिला आधी जाण्याचा इशारा करतो. तेव्हा ती स्त्री तिच्या भयानक आवाजात म्हणते, "नाही, आधी तू जा. तुला जास्त गरज आहे. कित्येक दिवसांनी आज तुला जिवंत शिकार मिळाली आहे. जा!" हे ऐकून वृद्ध माणूस पुढे सरकतो.

राजेश थरथर कापत त्या वृद्धाकडे बघतो..
आता त्याच्या तोंडातून दोन टोकदार सुळे बाहेर आलेले असतात. राजेशला त्याचा अंत स्पष्ट दिसत असतो, पण मरताना सुद्धा त्या भयानक माणसाला पाहण्याची हिंमत त्याच्यात नसते. तेवढ्यात त्याला त्याच्या मानेजवळ गरम श्वासांची जाणीव होते. सडलेल्या मांसाची दुर्गंधी त्याला उलटी करण्यास भाग पाडते. वृद्ध माणूस त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ओठ त्याचा मानेजवळ नेतो. राजेश स्वतःला सोडविण्याची धडपड करत असतो.. पण त्या वृद्ध शरीरात असलेली शैतानी ताकत त्याला तसूभरही हालू देत नसते.. वृद्धाच्या सुळ्यांची टोके राजेश ला माने वर जाणवतात.. त्याच वेळी जोरात विजेचा झटका बसल्यासारखे करत तो वृद्ध चित्कारत खोलीच्या कोपऱ्यात जाऊन थरथरत बसतो. राजेश काय झाले हे पाहण्यासाठी डोळे उघडतो.. तेव्हा ती स्त्री त्या वृद्धा कडे एक रागीट तुच्छ नजर टाकत राजेश वर झेपावते. पण मानेला ओठ टेकवताच ती देखील चित्कारत त्याच वृद्ध माणसा ला जाऊन लटकते... राजेशला काहीच समजत नसते.. तो आजूबाजूला बघतो.. आजूबाजूची ती इतकी सुंदर खोली आता जीर्ण शिर्न झालेल्या खोलीत रूपांतरित झालेली असते.. खोलीभर उंदीर चुई चुइ करत पळत असतात.. ठीक ठिकाणी उंदरांनी काढून ठेवलेले मातीचे ढिगारे पडलेले असतात..खाली बघतो तर तो बसलेला पलंग अतिशय विद्रूप झालेला असतो.. आणि गादी कित्येक वर्षापासून न धुतल्यासारखी मेणचट झालेली असते, गादीवर आणि रगीवर ठीक ठिकाणी वाळलेल्या रक्ताचे खूप सगळे डाग असतात..... तो ते सर्व सहन न होऊन झटकत उठून उभा राहतो.. हे काय आहे.. मघाशी ची खोली कुठे गेली आणि आपण नक्की आता कुठे आहोत..काय घडते आहे.. ते नक्की कशाला घाबरले आहेत.. मी वाचलो कसा? एका क्षणात असंख्य विचार राजेशच्या मनात डोकावतात ... राजेश चा हात माने कडे जातो. त्याच्या हाताला एक लॉकेट लागते. त्याला आठवते, शहरात निघण्यापूर्वी त्याच्या आईने श्री गुरुदेव दत्त मंदिरात उपासना करून आणलेले हे लॉकेट त्याच्या गळ्यात बांधले होते.
त्याला कळून चुकते की, त्याच्या वाचण्याचा एकच मार्ग आहे. तो मनोमन गुरूंचे नामस्मरण सुरू करतो.. आणि त्या त्या दोघांकडे पाहतो. ते काहीतरी चर्चा करत असतात. नक्कीच ते पुन्हा प्रयत्न करतील... त्याआधी इथून निघायलाच हवे. राजेश हाच विचार करून तिथेच ठेवलेली आपली बॅग उचलतो आणि इतर कुठे ही न बघता वेड्या सारखा बाहेर पळायला लागतो. ते दोघेही भयानक चित्कार करत त्याच्या मागे धावत येतात.राजेश कसाबसा जीव वाचवत सरळ रस्त्याकडे धावतो. रस्त्यावर पोहोचून मागे वळून पाहतो, तर त्याला ते दोघे खूपच भयानक रूपात दरवाज्याच्या आतून त्याच्याकडे रागाने बघून गुरगुरताना दिसतात. आणि तो संध्याकाळी रोषणाई ने चमकणारा वाडा आता पूर्ण पने पडझड झालेल्या जीर्ण वाड्या सारखा दिसत असतो..
राजेश श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त चा जयघोष करीत त्यांच्या कडे एक कटाक्ष टाकत, अंधाऱ्या रस्त्यावरून पुढे निघून जातो.

सावज हातातून निसटले हे निश्चित झाल्यामुळे.. इकडे त्या पडक्या वाड्या मध्ये, "तुला सांगितले होते ना मागच्या वेळच्या शिकारी चे रक्त आपण दोघे मिळून पिऊ, पण तू मलाच सर्व प्यायला सांगितले.. तू बघ बर कसा झाला आहेस. आता हा पण सटकला हातातून. पुढचा कधी येतो काय माहित.. मागच्या कित्येक शतकात अशी वेळ आली नव्हती कधी.. आपण ही जागा सोडायला हवी.. आता तर उद्या आपल्याला खायला पण काहीच नाही, मागच्या शिकारीचा उरलेला रस्सा आजच त्याला खाऊ घातला होता.." ते दोन अतृप्त आत्मे भांडत असतात... ..
बाहेर वाडा परत एकदा नवीन सावजाच्या शोधासाठी सज्ज झाल्या सारखा रूप पालटून लखलखायला लागलेला असतो....

लेखक: रूद्रदमन

( कथा वाचल्यावर कशी वाटली याचा अभिप्राय नक्की द्या.. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@किल्ली धन्यवाद

@बोकलत तसे झाले तर काही दिवसांनी कथा लिहावी लागेल त्या दोन्ही पिषाचांच्या बॉडी सापडल्यात.. शव विच्छेदन केल्यावर समजले की दोन्ही मध्ये थेंबभर रक्त नव्हते... डॉक्टर लोकांची चर्चा चालू होती तेव्हा..

शव विच्छेदन विभागाच्या बाहेरील खुर्चीवर ती शवे घेऊन येणारा बोकलत एक मोठा ढेकर देत बसलेला होता..
काही

सॉलिड आहे.आवडली.फक्त मध्ये मध्ये जो प्रेझेंट टेन्स आहे (तो पळायला लागतो) त्यामुळं भीती फॅक्टर थोडा कमी झाल्यासारखा वाटतोय. हा टेन्स 'नायकाला स्वप्न पडलं आणि स्वप्नात असं दिसत होतं' च्या पुढच्या कथनाला वापरतात.
कथेतलं नंतरचं बाईचं वर्णन सॉलिड आहे.

खरं तर हल्ली वाडा म्हटलं की भीतीच वाटत नाही, आपलेपणा वाटतो.
तुमचा दोष नाही लेखक महाशय.
नवीन भीती हवीये.

@किल्ली जी एक विरंगुळा म्हणून लिहायचे उद्योग आहेत हे..

तुमच्या सारख्या मुरलेल्या वाचकांना घाबरवणे फक्त नारायण धारपाना शक्य आहे..

Submitted by रुद्रदमन on 4 September, 2024 - 20:49>>> भारी वाटलं वाचून. कोणीतरी आहे इथे माझ्या पॉवर समजणारा Lol