तान्हेपणाचा उत्सव

Submitted by अनघा देशपांडे on 3 September, 2024 - 05:30
बालपण देगा देवा

तान्हेपणाचा उत्सव

त्या तान्ह्या जीवाला या अवतीभवती व्यापलेल्या अजस्त्र जगामध्ये जन्म घेऊन नुकतेच काही दिवस होऊ घातले होते चराचर सृष्टीला त्याचे लोभणारे बाळरुप मोहकचं वाटत होते. म्हणून तर तसेच कित्येक जीव ती पक्ष्यातून ,प्राण्यातून, तरुतून, कीटकातून, अगदी माळावर तटस्थ राहिलेल्या फांदीच्या काटकीतून सृजन होऊन नवनिर्मिती करत राहिली होती. या सगळ्याला मनुष्याचा अपवाद तरी कसा राहील?अश्याच एका लोभस क्षणी त्या जन्म घेऊ पाहणाऱ्या जीवाचा गर्भवास चालू झाला. मातीपासून मडके घडावे तश्या त्या मांसल गोळ्याला प्रतीजीवाचे आकार, स्वरुप ,अमुर्तेतून मुर्त होतं गेले. जसा जसा गर्भ फुलू लागला तशी गर्भवतीही डहुळू लागली. हुळहुळू लागली. पाहता पाहता दिवस भरले. अन तो क्षण आला. त्या प्राणशक्तीने जन्मवेणा सोसून झाल्यावर या प्रकृतीला कोऽहम् असा सवाल केला. अश्याप्रकारे त्या भाबड्या जीवाने अजाणतेपणी त्याचे विश्वामध्ये चिमुकले पाऊल टाकले. परंतु इतक्या महाकाय जगाच व त्याच्या जन्माने घातलेल्या कोड्याचं त्याला कोणतंच वावडं नव्हतं. कारण त्याचे विश्व 'आई' या मायेनं भारुन गेले होते. आईच्या उबदार मायेच्या स्पर्शानं, तिच्या काळजीने भरलेल्या नजरेनं, तिच्यातून पाझरणाऱ्या पान्ह्यानं, तिच्या प्रेमाने दुथडी भरलेल्या हाकेनं, तिच्या एकूण एक सहवासानंच त्याच जग भरून गेलं होतं.

उजाडत्या दिवसाच्या खुणा पाहून बाळाच्या जन्माला काहीसे दिवस होऊन गेल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले. तिच्यासाठी कोणता दिवस अन कोणती रात्र याचे गणितच नव्हते. बाळ निजले की ती निजायची ते जागले की ती जागती व्हायची. जणू पाळण्याच्या दोरीनंच तिचा दिवस हलता डुलता रहायचा. बाळाने ओळख धरुन हसलेलं बिन दाताचं बोळकं पाहून तिच्या मनाचे मोती ओघळत रहायचे. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तिचा चेहराही तेच बिंबित करायचा जणु पाण्यावर सांडल्यासारखा. त्याच्या लडिवाळ हातापायाच्या हालचालीने मातृत्व या सुखानं भरुन पावलेली झोळी तिला सापडायची. त्या बाळुकल्याचं चिमुकल जग तिने भरुन गेलयं या आनंदाची तिला मनोमन हुल पडायची. तिच काळीज निव्वळ ममतेनं भरुन ओसंडून वहात रहायचं. जणू काळजाचा मासा होऊन तो लळा जिव्हाळ्यात पोहत रहायचा. तिच्या कुशीत बाळाला उब जाणवत असेलच पण त्याच्या धुपट्यात तिलाही उनउन वाटत रहायचं. तिच्या मायेच्या स्पर्शानं जस त्याला आश्वस्त वाटायचं कदाचित त्याहूनही जास्त त्याच्या मृदुल नाजूक स्पर्शाने तिला निंश्चिंत वाटायचं. आई हे नवीन नात जन्माला आल्यानंतर तिच्या हृदयालाही डोळे आले होते. तेथूनच ती नवीन जग निरखित होती. जगण्याचे सगळे ताळे त्या शिखरावरुन समजू पहात होती.जणू तो जन्म तान्हुल्याचा एकट्याचा नव्हता. तिलाही जागतेपणीच संजीवनी मिळाली होती. अशाप्रकारे मातृत्व या नदीला तिचे अंतरंगाचे पाणी जाऊन मिळाले होते.

धुपाच्या ,वेखंडाच्या वासाने भरुन गेलेल्या बाळंतखोलीतलं धुकं गडद होतं होतं धुपतं रहायचं अन अलगदपणाने विरुन जायचं. या धुक्याला येणाऱ्या सुवासाने श्वास देहभर पखरण करत रहायचा. श्वास सुवासाच्या चाललेल्या संवादात अत्तर नसलेले अत्तर परिमळत रहायचे. तेव्हा झबली टोपडी यातल रंगीत उन खोलीत प्रवेश करु पहायचे. या अनोख्या रंगानी भरलेली चित्रमाला कोणता हव्यास बाळगायची कोण जाणे? खोलीभर तीच छाया ठिकठिकाणी उमटवीत पडून रहायची. प्राजक्ताच्या झाडाखाली फुलांचा सडा पडावा तशी ती गोजिरीही वाटायची. पाळण्याने अडविलेल्या जागेने खोलीलाच उसण अंगण दिलेले असायचे. या अंगणात बसून गोष्टीचे वेल्हाळ चांदणे चमचमत रहायचे. अंगणात उगवलेलं लाजर बुजरं रोपटं धुपट्याची सावली परिधान करायचं अन अंगाईचे आकाश पांघरून निजून जायचं. निरनिराळ्या आकाराची निरनिराळ्या आवाजाची खेळणी त्यांचे प्रदर्शन भरवत खोलीवर त्यांचा हक्क सांगत रहायची. बाळासोबत खेळता खेळता ती नकटी चपटी धाकटी दुकटी व्हायची. बाळ सांगेल तो हुकूम मानायची. त्याच्या इवल्या इवल्या बोटात अडकून बसायची. बाळ जागे आहे तोवर ती पहारा करायची. बाळ निजताच ती देखील त्याचे सोबती होऊन कलंडून निजून जायची. खोलीला आलेले जिवंतपण कसलेसे कसब साकारत असल्यासारखे भासवायचे. बाळंतखोलीतील सुख पाहता पाहता घरातील वासे लडिवाळ होऊन घरभर फिरत राहत.

स्निग्ध तेलात बुडविलेल्या बोटांनी आज्जीची सुरकुतू लागली त्वचा नव्हाळी अनुभवायची. बाळाला मालिश करता करता बाळाच्या सानुल्या बोटांचा घड आजीच्या बोटांनी साकारत साकारात भरुन जायचा. तेव्हा त्याचे पुर्णत्व अनुभवताना आजीची बोटे गवताच्या पातीसारखी डोलत रहायची. त्याच्या हाताला पायाला रगडल्यावर आजीचेही अंग पिसासारखे हलके होऊ लागायचे. पण लागलीच कुठलीशी माती पकडून पुन्हा बाळाचे बाळसे आज्जी धरायची. आज्जीच्या डोळ्यापुढ तिच्या मागच्या पिढ्यातली सगळी बाळ आठवत आठवत चिमण्या पिल्लुचे टाळू भरायला घ्यायची. त्याचे दुमडलेले हात मुडपलेले पाय यांना लकेरीने झुलवत फुलवत अलगद जागतं करायची. तेव्हा निजलेला सुस्मावलेला बाळराजा जागा होऊन त्याच्या हालचालींना हातपाय आणायचा. आणि त्याची आठवण म्हणून खोडकर हास्याने धनुष्यासारखी ओठांची कमान करायचा. तेव्हा आज्जीला त्याने धाडलेले पत्र मिळाल्यासारखे वाटे. छोट्याश्या गडूने कढत कढत पाण्याने बाळाला न्हाऊ घालणारी आज्जी तिच्या अनुभवांची सगळी चळत पालथी घाले. व नाजूक पाण्याची धार धरुन नवीनवेली होऊन जात असे. अवतीभवती आलेल्या तिच्या स्थितप्रज्ञ मनातील लहरी घरंगळत तिलाच सचैल स्नान घालत असल्याची जाणीव तिला होई. पाण्याच्या तरल स्पर्शाने आजी व बाळ या नात्याची हळवेसे बंध सुगरणीच्या घरट्यासारखे विणले जातं. घरातीलच कुण्या थोरं पूर्वजाचा जन्म झाल्याची स्वप्न हकीकत स्मरुन त्या तान्ह्या जीवाच्या ऋणात तशीच डुंबून जाई. बाळाचे कोरडेसे अंग करताना तिच्या जीवातही कोणतीशी चेतना फुंकर मारुन जाई. त्या फुंकरीवर तिचा अख्खे आज्जीपण डोलत राही. या आज्जीपणाला काजळाचा तीट लावून आपणच आपली दृष्ट काढत राही.

तसे ज्याला जे आवडेल त्या नावाने बाळाला हाकारत असतं. आजोबा गुंड्या म्हणत, आई सोनू म्हणे, आज्जी मन्या म्हणे, शेजारची फ्रॉकमधली परी त्याला बेबी म्हणे पण त्याने ओळख धरली होती ती बाबाने ठेवलेल्या नावाची. 'पलाश' हे नाव त्याला दिवसाउजेडी ऐकू येई नि कधी कधी झोपेतही. धुपट्यातलं ओझ साखरेच पोतं म्हणून अंगावर खांद्यावर घेतल्याखेरीज दिवसाने स्पर्श केल्याचा अनूभव बाबाला येत नसे. बाबाच्या तोंडातल्या बोबड्या बोलाने त्याचे ओठही अस्पष्टसे उच्चार बोलू लागत. तो आधी आई म्हणणार की बाबा की आत्या आजी या पैजेचा हक्कदार बाबाच होई. बबबब या एक अक्षराची बाळूकले एकसलग माळ करुन ती माळ विजेत्या बाबाच्या गळ्यात अधीरपणाने टाके. मोठ्या किल्याला दिंडी दरवाजा असावा अन त्यातून प्रवेश करताच किल्ल्यात प्रवेश मिळावा. तसे बाबापणाचे सुख त्याच्या मांडीवर निर्धास्तपणे विसावलेले असताना जगण्यात दडलेले मर्म त्याला सापडल्यासारखे वाटे. त्याच्या मागे पडलेल्या बालपणं, लहानपण यांनी लपंडावात धप्पा देऊन गाठावे तसे त्याला वाटत राही. बाळ म्हणून स्वतःचेच न पाहता आलेलं रुपड पहाण्याची योजना कशी परमेश्वराने केली आहे या कौतुकात त्याचे जगणे बुडून जाई. व्यवहाराला चिकटलेल्या जगण्यापासुन अलिप्त होत होत बाळासोबतच बाबाही निरागस होत जाई. आणि आरामखुर्चीत टेकलेल्या आपल्या वडिलांच्या पावलापाशी जाऊन त्याचे मन स्थिर होई. बाप नामक या छत्राखाली विसावलेल्या लेकाला एकाच वेळी बाबा आणि तत्क्षणी लेक होता आलेल्या क्षणाला तो आलटून पालटून बदलत राहता आलेल्या जगण्याचे धन्यवाद देत राही. अन कामाच्या व्यापात बुडालेला दिवस बाळराजाच्या नावे करत अनाहूतपणे रिकामा होऊन जाई.

सगळ्यांची सगळी कर्तव्य पार पडली की आजोबा त्यांची भूमिका वठवायला घेत. आजोबा नावाच्या गोड फळाला नातवंड नावाचा भुंगा चिकटावा तसे काही घडून येई. बाळाच्या भवतालच्या जगाला मित्रत्व देण्याकरता आजोबा आकाशाकडे बोट करत तेव्हा आकाश त्याचे निळेपण साजरे करी. झाडाची ओळख करुन देताच त्यावरले मोहरलेले पान आपसूक बाळाच्या चिमटीत येऊन पडे. चिऊ व काऊ यांना तर आजोबांनी ऐकवल्या गोष्टीखेरीज इकडून तिकडे उडताच येत नसे. तेव्हा बाळकोबा आजोबासोबत खदखदून हसत राही. रस्त्यावरुन धावणाऱ्या गाडीसोबत बाळासाठी आजोबांच्या गुडघ्याच्या वाटीसोबत धावणारी घोडागाडी भलतीच चपळ होऊन जाई. खेळता खेळता आजोबांच्या दाढी नि मिशा ओढताना बाळाला ना भिती वाटे ना लज्जा .तेव्हा कुणा कुणाला मिळणार नाही अशी दुर्मिळ गोष्ट आजोबांकडे सोपवल्यासारखे बाळूकला त्यांना गोड गोड पापा देई. त्याच्या ओलसर नाजूक ओठांचा स्पर्श गालाला होताच आजोबांना सप्तपाताळात सप्तखणात कुणीस दडवून ठेवलेलं गुपित धन गवसल्यासारखे वाटे. बाळराजा कुणासारखा दिसतो? या तर्काला उत्तर देताना लहानपणीचा लेक डोळ्यासमोर भोवरा फिरवत असलेला दिसे. पण त्याहुनही दाट माया दाटून आल्याने बाळराजा माझ्याचसारखा दिसतो म्हणत मिश्किलपणाने हसत आजोबांची आरामखुर्ची पाळण्यासारखीच डोलत राही. अश्यातऱ्हेने आजोबांच्या मनाच्या चोरकप्प्यात बाळराजे खुशाल जाऊ बसे. प्रेमाशिवाय जगणे अपूर्ण आहे हे आयुष्याच्या मध्यवर्तात सापडलेले सुत्र अर्थपूर्ण आहे याची जाणीव आजोबांना पुन्हा पुन्हा होत राही. ते सापडलेले सुत्र ते बाळाच्या सहवासात गिरवित गिरवित राही. मनकवडा असलेले बाळ ते ओळखून तो देखील प्रेमाच्या गिरगोट्या आजोबांसोबत मारत राही. कुतुहलाचे शंभर कवडसे मग आजोबांच्या मांडीवर सांडत रहात. शोभादर्शकाप्रमाणे ते बदलत रहात तेव्हा आजोबा त्यांना अर्थ द्यायचे काम करत. तो अर्थ म्हणजे बाळं हेच पुन्हा पुन्हा आजोबांना सापडत राही.

सगळी भाबडी निभावलेली नाती अनुभवून बाळ निजेच्या स्वाधीन होई. तेव्हा समोरच्या भिंतीवरील चित्रातला बुध्द शांतपणे डोळ्यांच्या पापण्या मिटून घेई. खिडकीत आलेला चंद्र पिठूर होऊन खिडकीतील आतील दृश्य टिपून घेई. खिडकीबाहेर असलेला औंदुबर वृक्ष योगनिद्रीस्थ असल्याने त्याला तो निजेपुर्वीच शुन्य झालेला असे. पण त्याच्यावर विसावलेली पक्षीण तिच्या पिल्लांना कवेत घेई. वाऱ्यासोबत कुजबुजणाऱ्या पानांच्या सावल्या अंधाराला बिलगून जात. मनीला व टिपूला आवाज न करण्याची ताकीद दिल्याने ते मुकेपणाने बाळाकडे पहात. दिवसभर दमलेल्या आजोबांच्या आज्जीच्या व बाबांच्या पावलापाशी देखील निज येऊन बसे. गायीच्या डोळ्यातली शांतता हलकेच पाखरासारखी उडत यावी तशी बाळाच्या खोलीत येऊन विचक्षण होऊन थांबे. अन जणू बाळाला व त्याचे सवंगडी बनलेल्या सर्व चेतन अचेतन गोष्टींना मायेने कुरवाळत राही. तेव्हा पाळण्याची दोरी मागे पुढते करुन नाजूक स्वरात गात असलेल्या आईच्या अंगाईत ती शांतता अंगाई होऊन जाई .तशी आईच्या हातातली पाळण्याची दोरी मंदपणे स्थिरावी. सारीच पाखरं निजेच्या झाडावर गोळा होताच सटवाई नव्या जन्मलेल्या जीवाचे नशीब त्याच्या कपाळावर कोरायला घेई. आणि जन्मलेला जीव दूरदुर पसरलेल्या विश्वाच्या अथांग पसाऱ्याचा एक इवलासा भाग म्हणून स्थित होऊन राही. पाचवीच्या पुजेला पुजलेला कागद व पेन अजूनतरी वरवर कोरा भासत राही व बाळ त्याच्या तान्हेपणाचा उत्सव घरभर सजवित जाई

--------अनघा देशपांडे

चित्र सौजन्य : गुगल
चित्रकार :VASANTHA SENA KARUMURI

Group content visibility: 
Use group defaults