![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2024/09/01/Screenshot_2024-09-01-20-43-23-40.jpg)
मी स्वतः कोणत्याही कार्यक्रमात शामील झालो की मला भेटणाऱ्या लोकांशी मैत्री करायची खूप सवय आहे.. मग अवांतर गप्पा चालू झाल्या की त्यांचे रूपांतर भुतांच्या गप्पांमध्ये कसे करायचे यावर तर मी PHD केली आहे.. असेच एके ठिकाणी गप्पा मध्ये ऐकलेला किस्सा.. ज्याने सांगितले त्याच्या गावात घडलेला हा किस्सा.. मी अनुभव कर्त्याच्या शब्दात सांगत आहे..
मी एका शेतकरी कुटुंबात जन्मलो..घरची परिस्थीती बेताची... वडील , आई, एक मोठी बहिण आणि मी असे छोटे कुटुंब...
शेती कमी असल्यामुळे आणि आमचा भाग दुष्काळ ग्रस्त असल्यामुळे.. जेमतेम मीठ मिरची मिळेल एव्हढेच उत्पन्न...
मला लहान पना पासून अभ्यासाची खूप आवड.. त्यात अवांतर वाचन पण भरपूर.. लहान असतानाच अनेक लेखक माझे आयडॉल झाले होते.. वाचनामुळे म्हणा किंवा आई वडिलांच्या लढावू जीन्स मुळे म्हणा.. पण माझ्यात काही तरी करून दाखविण्याची इच्छा निर्माण झाली.. पँट च्या पार्श्वभागावर एव्हढे मोठे ठिगळ घेऊन मी शाळा करत होतो.. या परिस्थितीतून माझ्या घराला फक्त शिक्षण च बाहेर काढू शकते याची कल्पना आल्यामुळे मी स्वतःला त्या मध्ये वाहून घेतले.. माझ्या प्रयत्नांना यश म्हणून असेल किंवा नियतीच्या मनाने ठरविले असेल.. माझा नंबर नवोदय ला लागला.. मनात एक द्विधा परिस्थिती होती घरच्यांना सोडून कसे जावे.. पण वयात आलेल्या बहिणीच्या अंगावरील फाटके कपडे आणि माझ्या पार्श्वभागावर असलेले ठिगळ मला जाण्यासाठी प्रोत्साहित करत होते.. मी नवोदय च्या शाळे मध्ये गेलो.. तिथे स्वतःला अभ्यासा मध्ये झोकून दिले.. आनंद एकच होता की आपल्या शिक्षणाचा आणि खाण्या पिण्याच्या खर्च वाचला.. आता घरची लोक 2 घास जास्त खाऊ शकतील..
मी सुरुवातीला वर्षातून 3 वेळेस घरी जात होतो.. गेलो की आई वडिलांना शेतीत मदत करणे आणि उरलेल्या वेळे मध्ये गावात जुन्या मित्रांमध्ये गप्पा मारत बसणे.. हे माझे नित्यकर्म..
पण जसे मोठा होत होतो. माझ्या लक्ष्याच्या दिशेने माझी भावना अजून दृढ होत गेली.. त्यामुळे पुढे मी वर्षातून फक्त एकदाच उन्हाळ्याच्या सुट्टीतच घरी जाऊ लागलो.. त्यावेळी मोबाइल गरिबांसाठी दिवास्वप्नच होते.. अधून मधून फक्त घरच्यांचा खुषालीचा पत्र व्यवहार सुरू असायचा..
असेच एक दिवस पत्र आले.. माझ्या बहिणीने रक्षाबंधन ला यावे असे खूप मनापासून विनंती केली होती.. बहिण आता लग्नाला आली होती.. वडील तिच्या साठी स्थळे बघत होते..
मी विचार केला की पुढच्या वर्षी ती असेल नसेल आता बोलावते आहे तर तिचे मन का मोडावे.. तेव्हढाच हालाकित दिवस काढताना तिच्या जीवाला आनंद..
मी पत्राचे उत्तर न देता.. रक्षाबंधन च्या दोन दिवस अगोदर घरी येऊन धडकलो.. तिचा आणि घरच्यांचा आनंद बघून मला माझ्या या निर्णयाचा अभिमान वाटून गेला..
आल्यावर एक पूर्ण दिवस त्यांच्या सोबत घालवला.. दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन होते.. राखी बांधण्याचा मुहूर्त उशिरा असल्यामुळे राखी बांधण्याचा कार्यक्रम उरकायला 4 वाजले.. त्यानंतर करण्यासारखे काही नसल्या मुळे मी गावा मध्ये चक्कर मारायची ठरवली..
आई ला सायंकाळ पर्यंत येतो सांगून बाहेर पडलो.. गावात एक चक्कर मारली तर कोणी ही मित्र नजरेस पडला नाही.. तेव्हा आठवले की रक्षाबंधन ला शेजारच्या गावात जत्रा असते ते.. गावातील बरीचशी मंडळी तिकडे च गेलेली होती.. काय करावे हा विचार करताना.. मला नदी कडे चक्कर टाकायचे सुचले.. मी वेळ घालविण्यासाठी नदी वर गेलो.. पाऊस चांगला असल्या मुळे बऱ्या पैकी पाणी वाहत होते... तिथेच जवळील झाडाखाली एक दगड बगून त्यावर बसत निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागलो... निसर्गाच्या सानिध्यात वेळ कसा गेला कळलेच नाही.. दिवस जवळ जवळ मावळला होता.. सूर्याचा अस्त पावल्या नंतरचा लाल प्रकाश सर्व आकाशात पसरला होता.. मी घरी जाण्यासाठी उठलो.. आणि निघणार तेव्हढ्यात.. नदी कडून मला भास्कर येताना दिसला.. त्याला बघून मी जागेवर थबकलो.. भास्कर माझा गावात शाळेत असतानाचा वर्गमित्र..
" कुणाल कधी आला तू? त्याने माझी चौकशी करत विचारले..
"कालच आलो.. तू इकडे कसा.. जत्रेला नाही गेलास का?" मी त्याला विचारले..
त्याच्या अगोदरच खिन्न चेहऱ्यावर अजूनच खिन्न भाव आणून तो उत्तरला," नाही या वर्षी नाही जमले मला जायला".
त्यांनतर आम्ही तिथेच दगडावर गप्पा मारत बसलो.. दिवस केव्हाच संपला होता.. सगळी कडे अंधार पडला होता..तो जास्त काही बोलत नव्हता..बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे मी मात्र भरपूर गप्पा मारत होतो.. अचानक त्याच्या मनात काय आले काय माहीत..
मला म्हणाला.. " कुणाल चल पोहायला जाऊ.."
मी त्याच्या कडे आश्चर्याने बघत बोललो," अरे ही काही वेळ आहे का, बघ किती अंधार झाला आहे... उद्या परत येतो मी मग पोहू हवे तर."
" तू कधी गेला नाहीस या वेळी पाण्यात.. म्हणून तुला या वेळेची मजा नाही माहीत.. चल ना मला सोबत, मी याच वेळी पाण्यात जात असतो.." त्याने मात्र खूपच आग्रह धरला..
मी मात्र नकारा वर ठाम होतो..
तेव्हढ्यात दुरून बॅटरी आमच्या कडे येताना दिसली.. मागून कुणाल असा बाबांचा आवाज येत होता.. मी जोरात "आलो आलो" म्हणून बाबांना प्रतिसाद दिला..
आणि भास्कर कडे वळून त्याला उद्या दुपारी नदीवर यायला सांगितले.. ..
भास्कर काही ही न बोलता नदीच्या दिशेने निघाला व जाताना मागे वळून म्हणाला, "कुणाल, मी रात्री येईल तुला भेटायला.. भेटशील ना मला."
मी हा इकडे कुठे चालला याच विचारात त्याला हो बोललो.. इकडे बाबांचा आवाज वाढला होता.. ते बरेच जवळ आले होते.. बराच वेळ झाल्यामुळे ते चिडू नये म्हणून मी घाई घाई ने निघालो.. तत्पूर्वी भास्कर कडे नजर टाकली तर तो अंधारात पाण्याच्या कडे कडेने चालला होता.. मी बाबां जवळ पोहोचलो.. बाबा उशीर झाला होता म्हणून चिडलेच... मी ते अजून चिडू नये म्हणून झपाझप पावले टाकत घराकडे निघालो.. थोडे अंतर गेल्यावर बाबा बोलले," काय करत होता इतका वेळ? आणि या वेळी नदीकडे यायला नको कळत नाही का तुला."
मी त्यांचा राग शांत करण्यासाठी त्यांना संगितले की मी एकटा नव्हतो.. तिथे भास्कर भेटला होता.. त्याच्याबरोबर बोलत बसलो होतो.. बाबांनी एकदा माझ्याकडे बघितले.. आणि " बर बर, चल लवकर आता.. आपल्याला लवकर घरी पोहचायला हवे... आधीच खूप उशीर झाला आहे.." असे म्हणत त्यांनी चालण्याचा वेग वाढविला.. आम्ही थोड्या वेळात घरी पोहोचलो... गेल्या गेल्या आईने जेवायला वाढले.. जेवतांना बाबा काहीच बोलत नव्हते.. मला वाटले चिडले असावेत म्हणून मी पण शांत पने जेवण आवरले...आणि दुसऱ्या खोलीत गेलो.. आल्यावर मी तिथेच झोपत असे.. आई वडील आणि बहिण मागच्या खोलीत झोपत असत..
मी झोपण्याच्या खोलीत गेल्यावर थोड्या वेळाने मला दिसले की बाबा दरवाजे आणि खिडक्या बंद करत होते. ते माझ्या खोलीत आले आणि खिडकी बंद करायला लागले. मी त्यांना अडवत म्हणालो, "काय झाले, खिडकी का बंद करत आहात?" बाबांनी मला खिडकी उघडू नकोस असा आदेशच दिला. मी काहीच बोललो नाही आणि पुस्तक वाचत तसाच पडून राहिलो...
रात्र खूप झाली होती. मला पण झोप यायला लागली... कदाचित सर्व झोपले असतील म्हणून घरात सर्वत्र शांतता पसरली होती. मी पुस्तक बाजूला ठेवले, पाणी पिलो आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागलो.. थोडीफार झोप लागली असेल..तेव्हढ्यात खिडकीजवळ टक टक चा आवाज यायला लागला. मी बंद खिडकीकडे पाहिले तर ती हलत होती. निश्चितपणे कोणीतरी बाहेरून खिडकी हलवत होते. मी उठलो आणि खिडकीजवळ जाऊन बाहेरचा आढावा घेतला, पण कोण आहे हे काहीच समजले नाही. मी आवाज दिला, "कोण आहे? इतक्या रात्री काय काम आहे?"
जसे मी विचारले तसे आवाज आणि खिडकी हालने दोन्ही बंद झाले. मी थोडा वेळ वाट बघितली आणि पुन्हा बाहेरचा कानोसा घेतला. बाहेर जो कोणी होता तो कदाचित निघून गेला असेल. या गोष्टीची जेव्हा मला खात्री पटली, तेव्हा मी खिडकी उघडली. त्याच क्षणी भास्कर अंधारातून खिडकीजवळ आला आणि म्हणाला, "कुणाल, बाहेर ये ना. मला तुला काहीतरी महत्त्वाचे दाखवायचे आहे. माझ्यासोबत चल.. दरवाजा उघड."
भास्कर ला बघून मला हायसे वाटले. मी त्याला मुख्य दरवाज्याकडे येण्यास सांगितले .आणि खिडकी बंद करून दरवाज्याकडे गेलो. मी दरवाज्यापर्यंत पोहोचण्याच्या आत भास्कर पोहोचला होता.. आणि बाहेरून दरवाजा वाजवत होता... कारण दरवाजा मागे पुढे हालत होता. मी अंधारा मध्येच दरवाजा उघडण्यासाठी कडीला हात लावला, तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. दरवाजाला आतून कुलूप लावलेले होते. माझ्या मनात प्रश्नांचा पुर आला...
इतक्यात बाहेरून भास्कर चा आवाज आला, "दरवाजा उघड." मी त्याला कुलुपा बद्दल सांगितले आणि चावी शोधू लागलो, पण चावी कुठेच सापडत नव्हती. जसे जसे वेळ जात होता, तस तसे भास्कर चा आवाज वाढत चालला होता.. त्याचे हे वर्तन मला समजण्याच्या पलीकडचे होते. थोड्या वेळानंतर अचानक भास्कर च्या आवाजात राग जाणवायला लागला. असे वाटू लागले की तो दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत आहे. मी खूप घाबरलो होतो.. मला हे सर्व खूप विचित्र वाटू लागले होते. मी जोरात ओरडत त्याला म्हणालो, " उद्या भेटू, आता जा!" पण त्याला आताच भेटायचे होते.. तो वारंवार आवाज देत दरवाजावर धडका मारत होता..
इतका वेळ इतका आवाज झाल्यावरही, घराच्या आतून कोणी जागे का झाले नाही हे देखील मला समजत नव्हते. दरम्यान भास्कर चा दरवाजावर धक्का देण्याचा प्रयत्न आणखीन जोरात झाला. त्याचा आवाज आता घोगरा झाला होता.. तो जसा माझ्या अंगावर आदळत होता.. मी घाबरून मागे हटू लागलो. अचानक मागे येताना माझा हात टेबल वर ठेवलेल्या ग्लास ला लागला आणि ग्लास जोरात खाली पडला...घरात सगळीकडे आवाज घुमला...
त्याचवेळी मला बाबांच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. बाबा माझ्याकडेच येत होते. येताच त्यांनी जोरात विचारले, "कुणाल, ग्लास कसा पडला? आणि तू इथे काय करतोय?"
मी घाबरत दरवाजा कडे बघितले.. मला एक जाणवले की जसा बाबांचा आवाज आला, तसे बाहेरून भास्कर चा आवाज येणे बंद झाला.. वजनदार पावलांचा आवाज दरवाज्या पासून दूर जातांना ऐकू आला आणि त्या पाठोपाठ, "वाचलास कुणाल, आज वाचलास" असा ध्वनी माझ्या कानात उमटला.... माझा थरकाप होत होता..
बाबा माझ्याजवळ आले. माझा घाबरलेला चेहरा पाहून त्यांना काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला. त्यांनी मला आपल्या खोलीत घेऊन बसवले आणि मी त्यांना सारी घटना सांगितली. काही क्षण ते शांत राहिले आणि म्हणाले, "जेव्हा तू संध्याकाळी नदीवर भास्कर ला भेटण्याची गोष्ट सांगितली होती, तेव्हाच मला तुला सर्व काही सांगायचे होते. पण रात्री ची वेळ होती, म्हणून मला वाटले की सकाळी सांगेन. याच कारणासाठी मी तुला लगेच घरी आणले. तो तुला तिथे भेटला आहे म्हणजे रात्री तो घरी येऊन तुला बोलावण्याचा प्रयत्न नक्की करेल. याचा अंदाज मला लगेच आला होता. म्हणून मी दरवाजाला कुलूप लावले होते."
मला काहीच समजत नव्हते. मी आधीच घाबरलो होतो आणि आता बाबांच्या या गूढ बोलण्याने, मी त्रासून त्यांना विचारले, "भास्कर असा का वागत होता? त्याचा आवाज असा का येत होता, आणि मला का बोलवत होता तो?" बाबा माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, "भास्कर 2 महिन्यापूर्वी नदीवर पोहण्यासाठी गेला असताना नदीत बुडून मेला.. त्यांनतर 3 दिवसांनी त्याचे प्रेत सापडले होते..
मी अवाक होऊन बाबांकडे पाहत राहिलो. मी काही बोलण्याच्या आधी बाबांनी मला शांत केले आणि ते पुढे म्हणाले, "त्याच्या मृत्यूनंतर 12 , 13 दिवसांनी, भास्कर च्या घराजवळ राहणारा संतोष, जो पुणे मध्ये काम करत होता, तोही असाच नदी मध्ये मृत्यू पावलेला आढळून आला. आणि त्यानंतर काही दिवसांनी विशाल ही असाच नदीत सापडला. तो पण बाहेर गावी शिकण्या साठी राहत होता.. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, संतोष आणि विशाल मरण्याच्या आदल्याच दिवशी संध्याकाळी गावात आले होते." बाबा बोलायचे थांबले...
मी मात्र ऐकून मला भोवळ येते की काय या मनस्थिती मध्ये त्यांच्या कडे बघत बसलो होतो..
लेखक: रुद्रदमन
( टीप: कथा आवडल्यास अभिप्राय द्या.. )
छान आहे भुताची गोष्ट… असे
छान आहे भुताची गोष्ट… असे किस्से गावात तुरळक ऐकलेत.
जुलाब लागल्यागत टाकता आहात हो
जुलाब लागल्यागत टाकता आहात हो, काहीच क्वालिटी नाहीये
Quality Control Inspector!
Quality Control Inspector!
आवडत नसेल तर लॉंग जंप - हाय जंप मारून पुढे जायचं.
मस्त किस्सा
मस्त किस्सा
अर्र, किती हगेश
अर्र,
रुद्रदमन,
रुद्रदमन,
कथेतील मुद्दा खूप आधी लक्षात येत असल्याने कथेचा विस्तार अधिक असल्यासारखे वाटते, पण छान वातावरण निर्मिती!
(ज्यांना येथील ऍडमीनही हात लावू शकत नाहीत अश्या खास आय डिंच्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करत राहणे व संकेतस्थळाचे मनोरंजन मूल्य जोपासणे हे स्तुत्य ठरेल)
कथेतील मुद्दा खूप आधी लक्षात
कथेतील मुद्दा खूप आधी लक्षात येत असल्याने कथेचा विस्तार अधिक असल्यासारखे वाटते, पण छान वातावरण निर्मिती! >> +१
@बेफिकीर जी पुढच्या कथांमध्ये
@बेफिकीर जी पुढच्या कथांमध्ये झालेल्या चुका सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल..
अभिप्राय दिल्या बद्दल धन्यवाद..
@असामी जी धन्यवाद
कथा आवडली.लिहीत राहा.
कथा आवडली.लिहीत राहा.
एवढं काय मालक !
एवढं काय मालक !
न्हाय आवडलं तर फाट्यावर मारायचं, पण जुलाब बिलाब काय ??