स्वयंपाकघरातील सोनं… हळद
भारतीय स्वयंपाकात हळदीचा वापर खुप पूर्वीपासून आणि अगदी मुबलक प्रमाणात होतो. हा एक अत्यावश्यक मसाला आहे. मिसळणाच्या डब्यातील मोहरी संपली असली तर त्या ऐवजी जिरं घालून वेळ भागवून नेता येते पण हळद नसली तर ठेवणीतल्या बरणीतील हळद काढावीच लागते, त्या शिवाय स्वयंपाक होऊच शकत नाही.
आमच्या लहानपणी श्रावणी सोमवारचं खूप प्रस्थ होतं. लहान मुलं सोडून सगळ्यांचा उपास असे. मुलांना ही नॉर्मल जेवण न देता धान्य फराळ म्हंजे प्रत्येक गोष्ट भाजून घेऊन मग शिजवायची असे पदार्थ खाऊ घालत असत. आधी भाजून घेतलेल्या तांदळाचा भात आम्हाला आई श्रावणी सोमवारी करत असे. त्याला " सोजी " असं फार गोड नाव होतं. एरवी रोजच्या भातात हळद घालत नाहीत पण सोजीमध्ये आवर्जून हळद घातली जात असे. बाकी सगळं सेम फक्त हळद हा एकच जास्तीचा पदार्थ घातलेला तो पिवळा भात लहानपणी आमचा खुप आवडता होता जो आम्हाला फक्त श्रावणी सोमवारी दुपारच्या जेवणातच मिळत असे. असो. अर्थात उपम्या सारख्या काही पदार्थात मात्र हळद एकदम वर्ज्य. हळद घातली तर तो उपमा न होता तिखट मीठाचा शिरा होईल. अगदी एक चमचा हळदीने पदार्थाच्या रंग रुपात जमीन अस्मानाचा फरक पडतो तो असा. आहे की नाही हा हळदीचा महिमा…
हळदीचे औषधी गुणधर्म ही खुप आहेत. हळदी मुळे कांती सुधारते . “ हलदी और चंदन का अनोखा उबटन “ ही विको ची जिंगल पाठच आहे सर्वांना. अजून ही लहान बाळांना तेल आणि वस्त्रगाळ केलेल्या हळदीने चांगल्या सतेज कांतीसाठी मालिश करतात. गरम दूध आणि हळद हे खराब घश्यासाठी एक उत्तम औषध आहे. तसेच आमची आजी लहानपणी आम्हाला खोकला झाला की हळद, गुळ आणि थोड तूप अस एकत्र कालवून त्याच्या वाटण्या एवढ्या आकाराच्या गोळ्या करून ठेवत असे औषध म्हणून. अर्थात त्या गोळ्या आम्ही औषधा प्रमाणे न खाता लिमलेटच्या गोळ्यांसारख्या सारख्या खात होतो हा भाग निराळा. हिंग, हळद आणि थोडं मीठ एकत्र करून ते दुखणाऱ्या दातावर चोळल्याने दात दुखी ही कमी होते हा स्वानुभव आहे.
किती ही काळजी घेतली तरी स्वयंपाक करताना कधीतरी बोट कापलं जातच. कापलेल्या जागी हळद घालून दाबून धरलं की रक्त यायचं तर थांबतच शिवाय हळद जंतुनाशक असल्याने जखम चिघळायची ही भीती रहात नाही. मी कधी ही कृत्रिम मलम लावत नाही कापलं तर, नैसर्गिक हळदी वर जास्त विश्वास आहे माझा. तसेच स्वयंपाक करताना जखमेवर लावलेलं क्रीम अनावधानाने एखद्या पदार्थात जाईल ही भीती असते . हळद मात्र नैसर्गिक असल्याने निर्धोक आहे. मुका मार लागला तर पूर्वी अंबे हळद आणि तुरटी उगाळून त्याचा लेप दुखऱ्या भागावर लावत असत. अर्थात आता हा उपाय कोणी करत असेल असं वाटत नाही.
अश्या ह्या बहुगुणी हळदीला देवाच्या पूजेत कुंकवा बरोबरीचा मान नाही मिळाला तरच नवल. आणि गंमत म्हणजे अस्सल पंढरपुरी नैसर्गिक कुंकू ही हळदी पासूनच तयार करतात. नवरदेवाच्या आणि नवऱ्या मुलीच्या अंगाला हळद लावल्याशिवाय लग्न लागूच शकत नाही. हल्ली तर हळदीचा मोठाच समारंभ आयोजित करतात लग्नाच्या दोन दिवस आधी. हळकुंड हे वंशवृद्धीच प्रतीक मानलं जातं त्यामुळे सुवासिनीची अगर देवीची ओटी भरताना तांदूळ आणि नारळ ह्या बरोबर मूळ असलेलं हळकुंड ही लागतचं. एवढं सगळ असलं तरी हळद म्हटलं की डोळ्यासमोर ऊभी राहते ती हळदीने माखलेली खंडेरायाची सोन्याची जेजुरी…
हळकुंडापासून रोजच्या वापरात असणारी हळद पूड तयार करणं हे मात्र तसं जिकिरीचं काम आहे. पूर्वी घरोघरी हळकुंड उन्हात वाळवून मग ती खलबत्त्यात फोडून घेऊन मग जात्यावर दळून वर्षभराची हळद घरीच तयार करण्यात येत असे. नंतरच्या काळात ती घरी न दळता दळायला डंक्यावर देणं रूढ झालं आणि आता तर जनरली रेडिमेड हळद पावडरच घरात येते. आमच्याकडे ठाण्याला ही हळद पावडर रेडिमेडच येते पण हळदीची लागवड करण्यापासून ते थेट ती दळून आणे पर्यंतची सगळी उस्तवार आमच्या कोकणातल्या घरी केली जाते.
पावसाळ्याच्या सुरवातीला हळदीची लागवड किंवा पेरणी करतात. हळदीचे पीक हातात यायला साधरण सात आठ महिने तरी लागतात. साधारण श्रावण महिना आला की हळदीची रोपं चांगलीच तरारतात. पानं चांगली लांब रुंद, हिरवीगार आणि तजेलेदार दिसतात. हळदीची पानं हाताने नुसती जरा चुरडली तरी त्यांना मन ताजतवानं करणारा टिपिकल हळदीचा सुवास येतो. पावसाळ्यात अंगावर पावसाचे थेंब मिरवणारी ती पानं फारच सुन्दर दिसतात. हळदीची रोपं सरळसोट न वाढता चारी बाजूंनी गोल होत वाढत जातात ती रोपं फार उंच ही वाढत नाहीत त्यामुळे सरळ रेषेत लागवड केलेलं, जमिनीलगत पसरलेलं हळदीचे शेत फार म्हंजे फारच सुन्दर दिसत.
हे हळदीचे रोप. हे मायबोली आयडी अनया हिच्या शेतातील आहे. तिने लेखात डकवण्या साठी मला मुद्दाम हा फोटो सेंड केला आज.
थँक्यु सो मच अनया....
श्रावणात येणाऱ्या नागपंचमीच्या पूजेचा नाग हळदीच्या पानावरच स्थापन करतात. आणि नागपंचमी ला ज्या पातोळ्या करतात त्या ही हळदीच्या पानातच वाफवतात. पिठोरीला केल्या जाणाऱ्या खीरी मध्ये वेलची वगैरे न घालता स्वादासाठी हळदीचे पानच घातले जाते. गणपतीत उकडीचे मोदक हळदीच्या पानावर ठेवून वाफवले तर त्यांचा ही स्वाद कैक पटीने खुलतो. अश्या खास दिवशी हळदीच्या पानांना इतकी मागणी असते की कधी कधी पुरवठा कमी पडतो. जेव्हा हवी तेव्हा पानं हमखास मिळावीत म्हणून शहरात काही जण फक्त पानांसाठी कुंडीत हळद लावतात.
साधारण दिवाळी नंतर जमिनीखाली हळदीचे कंद तयार होतात. बाजारात ओली हळद विकायला येऊ लागते. आवळा, आलं आणि ही ओली हळद किसून केलेलं लोणचं भन्नाट लागत. फेब्रुवारी महिन्यात हळदीच्या रोपांची वरची पान सुकायला लागणे ही जमिनीत हळदीचे कंद पक्व झालेत हे समजण्याची खूण. कोयत्याने अलगद खणून काढतात हे जमीनीखालचे हळदीचे मोठे मोठे कंद. त्यातले काही आपल्या तळहाता एवढे मोठे ही असतात. त्यांना भरपूर माती लागलेली असते म्हणून ते तीन चार वेळा धुवून स्वच्छ करतात आणि मग उकळत्या पाण्यात घालून दहा पंधरा मिनिटं शिजवतात. नंतर ते चाळणीत ओतून पाणी काढून टाकतात आणि आठ दहा दिवस उन्हात चांगली खडखडीत वाळवली की बाजारात मिळतात तशी हळकुंड तयार होतात. ही गिरणीतून दळून आणली की हळद पावडर तयार. ज्या दिवशी हळद दळून घरी येते त्या दिवशी घरभर हळदीचा घमघमाट सुटलेला असतो.
खरं तर तामिळनाडू मधील सेलम ह्या भागातली हळद सर्वात उत्कृष्ट समजली जाते. सांगली ची हळद ही प्रसिद्ध आहेच पण त्याही पेक्षा आमची कोकणातली गावठी हळद खूपच छान असते असं मला वाटतं. ती अगदी थोडी घातली तरी रंग तर छान येतोच पण तिचा स्वाद ही अप्रतिम असतो. विकतच्या अगदी प्रसिद्ध ब्रँड च्या हळदीला ही तो स्वाद येत नाही असं मला वाटतं. कोकणातील लोह मिश्रित मातीमुळे तिला पिवळट केशरी रंग प्राप्त होतो असं म्हणतात. कोकणातून आम्ही हळद आणतो मुंबईच्या घरी प्लॅस्टिक पिशवीत पॅक करून पण जर ती तशीच प्लॅस्टिक पिशवीत ठेवली तर महिन्याभरातच प्लॅस्टिक पिशवी बाहेरून चिकट होते. तसेच पिशवी जिथे ठेवली असेल तिथे हळदीचा पक्का डाग ही पडतो. हे टाळण्याचा सोपा मार्ग म्हंजे ती काचेच्या बाटलीत भरून ठेवणे. हळदी मधलं ऑईल रिलीज झाल्यामुळे हे घडतं हा माझा तर्क . जाणकारांनी ह्यावर अधिक प्रकाश टाकावा.
टर्मरिक लाटे सारखी पेयं लोकप्रिय झालेल्या परदेशात ही फेमस झालेल्या आपल्या बहुगुणी हळदीची गोष्ट इथे समाप्त.
हेमा वेलणकर
छान माहिती
छान माहिती
माझ्यासारखे अगणित मासेखाऊ तर
कोकणातील माझ्यासारखे अगणित मासेखाऊ तर ठामपणे म्हणतात की हळद व मासे हे खरं तर एकमेकांसाठीच निसर्गाने निर्माण केले आहेत !!!
छान लेख.
हळदीबद्दल छान माहिती. भारतातून येतांना जमेल तसे हळद, तिखट आणतो. येथे सर्व काही मिळते पण म्हणावी तशी चव नसते.
भाऊ नमसकर - हळद व मासे हे खरं तर
एकमेकांमनवासाठीच निसर्गाने निर्माण केले आहेत !आठवणी, उपयोग, माहिती सगळं
आठवणी, उपयोग, माहिती सगळं गुंफणारा सुंदर लेख...
ममो,
ममो,
रोजच्या वापरातल्या घरगुती वस्तू / पदार्थ बोलू शकले असते तर त्यांनी तुला नक्की सांगीतले असते त्यांना किती छान वाटते ते.
त्यांना मस्त ग्लॅमर मिळवून देतात तुझे लेख.
हर्पेन +११११ छान लेख
हर्पेन +११११
छान लेख
छान लेख.
छान लेख.
हर्पेन +११११
हर्पेन +११११
छान लेख
छान लेख
नेहमीप्रमाणेच छान लेख
नेहमीप्रमाणेच छान लेख
पी हळद आणि हो गोरी.. मला तर हळद याचसाठी आवडते
हर्पेन सहमत
हर्पेन सहमत
ममो, खूप छान लिहिलय.
ममो, नेहमीप्रमाणेच मस्त. आले
ममो, नेहमीप्रमाणेच मस्त. आले,हळद,आवळा किसून केलेले लोणचे खूपच आवडते आहे. आणी अजूनपण आम्ही मुका मार लागल्यावर आंबेहळद तुरटी उगाळून लेप लावतो. असेच तुमचे छान छान लेख वारंवार वाचायला मिळू द्यात.
मी शहरात वाढल्यामुळे
मी शहरात वाढल्यामुळे दुधापासून हळदीपर्यंत सगळं पिशवीतूनच उत्पन्न होताना पाहिलं आहे. तुमचे लेख त्यामागच्या मावळत्या घरगुती पाकसंस्कृतीचं सहज डॉक्युमेन्टेशन करतात त्यामुळे वाचायला मजा येते.
>>> नागपंचमी ला ज्या पातोळ्या करतात त्या ही हळदीच्या पानातच वाफवतात. पिठोरीला केल्या जाणाऱ्या खीरी मध्ये वेलची वगैरे न घालता स्वादासाठी हळदीचे पानच घातले जाते. गणपतीत उकडीचे मोदक हळदीच्या पानावर ठेवून वाफवले तर त्यांचा ही स्वाद कैक पटीने खुलतो.
तूप कढवतानाही घालतात ना हळदीचं किंवा विड्याचं पान?
हळदीचं (बहुतांशी मसाल्याच्या पदार्थांचं) अनुपान फॅट हे आहे. म्हणजे फॅट (आणि पेप्पर)बरोबर तिचं सेवन केलं की तिचं अॅब्सॉर्प्शन जास्त चांगलं होतं. म्हणून तेलातुपाच्या फोडणीत हळदीसोबत तिखटाची चिमूट घालतात. हळद-दुधातदेखील दुधातल्या फॅट्स असतातच, पण शिवाय तूप आणि थोडं मिर्यंही घालावं असं वाचलं होतं.
हळकुंड वंशवृद्धीचं प्रतीक असल्याचं माहीत नव्हतं. पाच फळं म्हणून ओटीत सहसा नारळाबरोबर सुपारी, हळकुंड, खारीक आणि असोला बदाम घातलेला पाहिला आहे. हे पदार्थ बहुधा घराघरात सहज उपलब्ध असावेत ही प्रथा बनली तेव्हा.
वाह! मस्त लिहीलेय
वाह! मस्त लिहीलेय
लावतात हो अजूनही हळद तुरटी लेप. नुकताच मला लावायचा योग आला होता
हळदपुराण बेस्ट.
हळदपुराण बेस्ट.
कुणी कधी हळद “खाऊन” बघितली आहे का इथे ?
त्या स्वादाचा जवळपास जाणारा दुसरा कोणताच स्वाद मसालेवर्गीय जिन्नसांत नाही. (अपवाद फक्त एका विशिष्ट जातीच्या मिरच्यांच्या बियांचा)
Try it !
वलय, भाऊ, उदय, मृ ,हर्पेन,
वलय, भाऊ, उदय, मृ ,हर्पेन, किल्ली, SharmilaR, जाई , ऋन्मेष धनवंती, ssj, स्वाती, कविन अनिंद्य सर्वांना धन्यवाद...
रोजच्या वापरातल्या घरगुती वस्तू / पदार्थ बोलू शकले असते तर त्यांनी तुला नक्की सांगीतले असते त्यांना किती छान वाटते ते.
त्यांना मस्त ग्लॅमर मिळवून देतात तुझे लेख. >> हर्पेन धन्यवाद... मस्तच वाटलं वाचून.
हळद व मासे हे खरं तर एकमेकांसाठीच निसर्गाने निर्माण केले आहेत !!! Wink > बरोबर भाऊ.. असे मासे आवडणारे मेंबर
घरातच आहेत.
भाऊ नमसकर - हळद व मासे हे खरं तर एकमेकां मनवासाठीच निसर्गाने निर्माण केले आहेत ! Happy उदय ,
आठवणी, उपयोग, माहिती सगळं गुंफणारा सुंदर लेख... मृ धन्यवाद
पी हळद आणि हो गोरी.. मला तर हळद याचसाठी आवडते > ऋ,
तुमचे छान छान लेख वारंवार वाचायला मिळू द्यात. >> धन्यवाद ssj
ssj आणि कविन, अजुन ही लेप लावता मुक्या मारावर अंबे हळद आणि तुरटीचा म्हणून मस्तच वाटलं.
स्वाती खुप छान प्रतिसाद , हळदीचं (बहुतांशी मसाल्याच्या पदार्थांचं) अनुपान फॅट हे आहे. म्हणजे फॅट (आणि पेप्पर)बरोबर तिचं सेवन केलं की तिचं अॅब्सॉर्प्शन जास्त चांगलं होतं. म्हणून तेलातुपाच्या फोडणीत हळदीसोबत तिखटाची चिमूट घालतात. हळद-दुधातदेखील दुधातल्या फॅट्स असतातच, पण शिवाय तूप आणि थोडं मिर्यंही घालावं असं वाचलं होतं. >> हे माहित नव्हत अजिबात. धन्यवाद. आणि लोणी कढवताना विड्याच पान घालतात माहित आहे पण हळदीच ही घालतात नव्हत माहित.
हळद वंशवृद्धी प्रतीक आहे हे असच कुठेतरी वाचलं आहे. ओटीत जे हळकुंड घालतात त्याला मूळ फुटलेलं असावं असं ही आहे. असो.
हळदीच असोसिएशन रंगाशी आहे खर तर पण तिचा स्वाद आणि वास ही जबरदस्त असतो जो शब्दात लिहिता येणं कठीण आहे. विकतच्या हळदी मध्ये तो स्वाद च मिसिंग असतो अस मला
वाटतं. माझ्या मुलीला विकतची हळद अजिबात पसंत पडत नाही, तिला परदेशात ही कायम नाडणचीच हळद लागते. :).
आम्ही कोकणातून हळद आणली की लगेच इतर सामनातून ती बाजूला काढून ठेवतो. चार दिवस जरी तळलेले गरे आणि हळद एकत्र राहिली तरी दोन्ही पॅक बंद असून ही गऱ्याना पर्मनंट वास येतो हळदीचा.
अनिंद्य, हळद तूप गुळ गोळी खाल्ली आहे बरेच वेळा खोकल्या साठी. पण नुसती हळद नाही खाऊन बघितली आहे कधी. तुम्ही म्हणताय तर आता लवकरच बघते खाऊन.
>>> मुका मार लागला तर पूर्वी
>>> मुका मार लागला तर पूर्वी अंबे हळद आणि तुरटी उगाळून त्याचा लेप दुखऱ्या भागावर लावत असत
माझी आई रक्तचंदन, हळकुंड आणि तुरटी उगाळायची त्याची आठवण आली एकदम!
>>> ओटीत जे हळकुंड घालतात त्याला मूळ फुटलेलं असावं असं ही आहे
ओह इन्टरेस्टिंग! हे नव्हतं माहीत.
आज सावकाशीने वाचला लेख!
आज सावकाशीने वाचला लेख!
हर्पेनशी सहमत! इथे दरवर्षी पानांसाठी कुंडीत हळद वाढवते.
ओटीत जे हळकुंड घालतात त्याला
ओटीत जे हळकुंड घालतात त्याला मूळ फुटलेलं असावं असं ही आहे. >> त्याला लेकुरवाळी हळद म्हणतात.
छान लेख, आवडला एकदम.
छान लेख, आवडला एकदम.
एक प्रश्न आहे. आंबेहळद आणि नेहमीची हळद हा एकच प्रकार आहे की दोन्ही वेगळेवेगळे?
माझी आई रक्तचंदन, हळकुंड आणि
माझी आई रक्तचंदन, हळकुंड आणि तुरटी उगाळायची त्याची आठवण आली एकदम! Happy >>> स्वाती
त्याला लेकुरवाळी हळद म्हणतात. >> हे माहित नव्हतं, खूपच आवडला हा शब्द... आता हाच वापरणार. ShatmilaR, धन्यवाद.
स्वाती २ धन्यवाद.
उ बो, धन्यवाद... अंबे हळद आणि साधी हळद ह्या दोन्ही भिन्न आहेत दोन्ही हळदच असल्या तरी. अंबे हळदीला साधारण कैरी सारखा वास येतो म्हणून ती अंबे हळद, साध्या हळदी पेक्षा ती जास्त औषधी असते.
अनया, हळदी च्या रोपाचा फोटो दिलास म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद... धाग्याला शोभा आलीय त्यामुळे.
आहाहा, सुरेख लेख.
आहाहा, सुरेख लेख.
आई श्रावणी सोमवारी फोडणीचे तांदूळ करायची ते आठवलं. फोडणीत तांदूळ भाजून मग शिजवायची.
माहेरी हळदीची बाग आहे. आता कोणी करत नाही. पुर्वी हळद माहेरची यायची. बाबा गणपतीत जायचे तेव्हा मोठी मोठी हळदीची पाने आणि तवस घेऊन यायचे, पातोळे करायला. मला ते फार आवडत नाहीत पण हळदीच्या पानांचा सुवास तो दरवळ प्रचंड आवडतो.
मला लागलं की रक्त खूप वाहते त्यावेळी पटकन हळद लावली की रक्त थांबते. त्यामुळे अतिच बहुगुणी वाटते मला.
अनयाच्या शेतातील फोटोही आहाहा.
छान लेख!
छान लेख!
सध्या घरात कोकणातली हळद वापरते आहे त्यामुळे रंग आणि स्वादाबद्दल अगदीच सहमत आहे!
लेख आवडला.
लेख आवडला.
छान लिहिले आहे. प्रसन्न असते
छान लिहिले आहे. प्रसन्न असते तुमचे लेखन ममो.
कोकणच्या मातीतल्या लोहाबद्दल कल्पना नव्हती. सोजी मलाही आठवतोय. खेड्यापाड्यात भरपूर राहिले असल्याने बऱ्याच आठवणींना उजाळा मिळाला. आमच्याघरी कित्येक वर्षे चहापत्ती आणि साखर सोडून सगळे घरचे/शेतावरचेच असायचे.
आमच्याकडे लग्नाआधी देवब्राह्मण असते तेव्हा नवरीने मुसळाने हळकुंड कुटावे लागतात, तेव्हा मामी, मावशी, काकू मुसळाला हात लावत पारंपरिक गाणी गातात. हीच अर्धवट कुटलेली थोडीशी हळद नवरदेवाकडेही पाठवतात व त्यांच्याकडचीही नवरीकडे येते. नवरीला हातातल्या हिरव्या चुड्यासोबतही एक हळकुंडही बांधतात. ते लग्न झाल्यावरच दुसऱ्या दिवशी काढतात.
शिवाय मांडवाखाली जो तांब्याचा कलश असतो, त्यातल्या ओटीतही तांदळासोबत हळकुंड, खारीक, सुपारी, कवचासहित बदाम वगैरे असते. मी येथेही हळदीचे लोणचे घालते कधीतरी, फोटो सापडला तर देईन. रोज थोड्याथोड्या प्रमाणात सेवन केलेल्या हळदीने भारतीय वंशाच्या लोकांत अल्झायमर या स्मृतीभ्रंशाच्या आजाराचे प्रमाण कमी आहे असे वाचले होते. सूज आलेल्या भागावर अंबेहळद आणि रक्तचंदनाचा लेप लावतात. एक बजरंग लेप म्हणून मिळायचा त्यात हेच दोन घटक असायचे, त्याचा एक विशिष्ट वासही असायचा. बरेचदा बेसन, हळद आणि चंदनाचा फेसपॅक लावते, ते सोडून कशावरच विश्वास नाही. बरणी भरून बाथरूममधे ठेवली आहे.
संशोधनाबद्दलचे तथ्य माहिती नाही पण नोंदवून ठेवते आहे. येथे ट्यूमरिकच्या गोळ्या सर्रासपणे विकत आहेत आणि बऱ्यापैकी प्रसिद्ध आणि बहुचर्चित आहेत. हळद जास्त झाली की पचत नाही आणि उग्र लागते, आपले स्वैपाकातले सहज होणारे सेवनच आदर्श असावे. हळद ऑरगॅनिक खाल्लेली बरी म्हणजे तिचे संपूर्ण फायदे मिळतील असे मत बनले आहे. हळद मांगल्याचे आणि आरोग्याचे प्रतीक आहे खरी.
ममो,
ममो,
नेहमीप्रमाणेच सुंदर, स्मरणरंजनात नेणारा लेख.
गावी हळद होत असल्याने ती लागवडीपासून काढणीपर्यंतची सगळी दृश्ये डोळ्यासमोर आली.
त्या सगळ्या हळकुंडाची मोठी ऐरण लावली जाई. त्यामुळे नुसता हळदीच्या वासाचा घमघमाट सुटे. नंतर त्यातले मातृकंद आणि इतर कंद वेगळे करणे.
ती शिजवायला गावी एक प्रचंड काहील असे की जी चार जणांना उचलून न्यावी लागे. सगळं आठवलं.
शुभ कार्यात लेकुरवाळी हळकुंडेच वापरतात.
अवांतर:
हळदीचे शास्त्रीय नाव Curcuma अस आहे
ते आलय मूळ संस्कृतमधील कुंकुम (केशर) वरून, कुंकुमच अरेबिक मध्ये झालं Kurkum आणि मग ते लॅटिन मध्ये झालं Curcuma.
यावरूनच हळदीतल्या सक्रिय घटकाला curcumin हे नाव पडले.
हेमाताई, तुम्हाला असे काही
हेमाताई, तुम्हाला असे काही सुचतेच कसे? किती साधा विषय आहे आणि तुम्ही त्याचे "सोने" करून ठेवले आहे.
मला हळदीच्या पानांचा वास जराही आवडत नाही. आईला पातोळे भारी प्रिय होते, केले की मी मारुन मुटकून एखादा खायचो. हळदीच्या पानातले मोदक तर बिग टाइम नो नो.
पण हळदीचा रंग ! त्याशिवाय भारतीय जेवण बेरंग होऊन जाईल कदाचीत. चार ठाव जेवण असेल तर त्यात पिवळा रंग सर्वाधिक असतो. पोह्यांत हळद कमी पडली तर मी त्यांना अॅनिमीक पोहे म्हणतो. जी किंमत रक्तातल्या हिमोग्लोबीनला तेवढीच किंमत पोह्यातल्या हळदीला.
चवीबाबत तर विचारायलाच नको. हळद विरहीत फोडणी फार क्वचीत बनत असेल. त्यामुळे इतर रंगात आपला रंग विसरली तरी हळद चव मात्र राखतेच. हळदीची चव समजून घ्यायची असेल तर "The Hundred Foot Journey" हा सिनेमा नक्कीच बघावा.
लेख छानच नेहमीप्रमाणे. तुम्ही
लेख छानच नेहमीप्रमाणे. तुम्ही इतक्या आपुलकीने लिहिता की साधेसोपे विषय अगदी खास होतात!
आमच्याकडे कित्येक वर्षं घरगुती हळद असायची. मिळेल तेव्हा अजूनही आणते आई. कोकणातल्या हळदीचं चिकट होणं आणि लोह असल्यामुळे रंगातला फरक हे सासरी "भेसळ" वाटल्यामुळे मी चिडून हळदीसारखीच झाले होते हे आठवलं
माझं हळदीशी सख्य नाही याचं मलाच वाईट वाटतं. रोजच्या स्वयंपाकातला वापर सोडता तिचं - माझं जमत नाही.
नेहमीप्रमाणेच मस्त आणि उपयोगी
नेहमीप्रमाणेच मस्त आणि उपयोगी.
कोकणातल्या हळदीचं चिकट होणं
कोकणातल्या हळदीचं चिकट होणं आणि लोह असल्यामुळे रंगातला फरक हे सासरी "भेसळ" वाटल्यामुळे मी चिडून हळदीसारखीच झाले होते हे आठवलं >>> हाहाहा. त्यांना वरीजिनल भेसळ वाटली, भेसळ वरीजिनल वाटत असेल. मला ती केशरी रंगाची घरची हळदच आवडते. बाहेरची पिवळट मला रांगोळीचा रंग वाटते.
Pages