कुट्टीची गोष्ट - पाठलाग
शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर, लगेच गावाला जायचं नाही, असं घरात पहिल्यांदाच घडत होतं. घरातल्या मोठ्या मुलांच्या कॉलेजच्या परीक्षा तर अजून चालू पण व्हायच्या होत्या. मग ठरलं, की यंदा नकोच मामा कडे जायला. किंवा अगदी जायचंच असेल, तर मग पुढच्या महिन्यात वगैरे बघू.
कुट्टीची सहावीची परीक्षा मात्र, एप्रिल च्या पहिल्या आठवड्यातच संपली. सुट्टीच्या पहिल्याच दिवशी ‘मग आता काय करायचं..?’ हा प्रश्न तिला पडला. बाहेर खेळायला मिळायचं ते संध्याकाळी पाच नंतर. कारण मार्च पासूनच बाहेर उन्हाच्या प्रचंड झळा! घरात तीच तीच जुनी पुस्तकं होती वाचायला.. पण आणखी काय मग..? भरतकाम.. पेंटिग.. पुठ्ठया बिठ्ठया च्या वेगवेगळ्या वस्तू..? कुट्टीला आवडायचं असं सतत काहीतरी करायला. मग आईच्या जरा मागे लागून.. म्हणजे तसा अगदी हट्ट करूनच.. पैसे मिळवले कुट्टीने आईकडून.. ते सगळं सामान आणायला.
सकाळी पटापट आंघोळ करून, धुबका फ्रॉक घालून, नऊ वाजताच कुट्टी घराबाहेर पडली. ती तर काय, आणखी लवकरही बाहेर पडली असती.. पण सकाळी लवकर दुकानं तर उघडायला पाहिजेत!
आताच ऊन वाढायला लागलं होतं. मार्केट खूपच लांब होतं. बाकी मैत्रिणींना कुणाला इंट्रेस्ट नव्हता सकाळी सकाळी मार्केट मध्ये येण्याचा. कुट्टीला संध्याकाळ पर्यंत थांबण्याचा धीर नव्हता... घरात फक्त दोनच सायकली. त्या पण मुलांच्या... ती तर एरवी पायीही गेली असती. पण ऊन आहे तर, ‘बसनेच जाऊन ये पटकन..’ असं आईनं सांगितलं होतं...
कुट्टी बस स्टॉप वर आली. पैसे अन् परवानगी मिळाली ह्याच आनंदात.. कुठे जावं बरं..? जायची ठिकाणं दोनच. एक जोशी मार्केट अन् दुसरं मंदिराजवळचं... जोशी मार्केट नको.. ते आणखीच उशिरा उघडतं. शिवाय तिथे एकच मोठं दुकान आहे.. आणि तिथे गर्दी पण खूप असते.. अन् बाकी सगळ्या दुकानात सगळं मिळतच असं नाही. उगाच खूप जास्त फिरफिर करायला लागते मग. त्यापेक्षा मंदिराजवळच्या मार्केट मध्येच जाऊया.. तिथे छोटी मोठी सगळीच दुकानं आहेत.. ती तिच्या विचारात गढली असतानाच बस आली.
अगदी रिकामी रिकामीच होती आज बस. तसंही ह्या वेळेला, एरवीही गर्दी कमीच असते. कॉलेजला, ऑफिसला जाणारे सगळे सायकलीच वापरतात.
“एक राजकमल..” कुट्टीने तिकीट घेतलं.
असं एकटीला बस मध्ये बसायची वेळ तशी फारशी येत नाही. नेहमी मैत्रिणी, नाही तर घरचं कुणी तरी सोबत असतच. मग कुट्टी निवांतपणे, खिडकी बाहेर बघत बसली. रोजचीच दृश्य.. पण तिच्या सुट्टी मुळे तिला आज सगळंच रेंगाळल्या सारखं वाटत होतं. एक दोन स्टॉप असेच गेले. अचानक तिला जाणवली, तिच्या वर कुणाची तरी रोखलेली नजर..
कुट्टीने मान वळवून आत बघितलं. दोन सीट सोडून मागे उजव्या बाजूच्या सीट वर एकजण बसला होता. दुसऱ्या बाजूच्या खिडकीशी बसला होता तो... डोळ्यांवर गडद निळा गॉगल.. त्याची मान तिच्या दिशेनेच वळली होती. तिने त्याच्याकडे बघितलं तरी त्याने जराही मान हलवली नाही.. तिनेच परत खिडकीतून बाहेर बघायला सुरवात केली. पण सतत टोचत असल्यासारखी, मागची नजर तिला बोचत राहिली.
तिचा बसस्टॉप आला, तशी कुट्टी सुटका झाल्यासारखी उतरली, अन् झपझप चालायला लागली. बसस्टॉप पासून मंदिरापर्यंत जायला चांगली दहा बारा मिनिटे लागायचीच.
एक दोन मिनिटातच कुट्टीला परत पाठीवर बोचणारी नजर जाणवायला लागली. तिनं थोडं थांबून वळून बघितलं.. तो ही तिच्या पाठोपाठ उतरला होता. अंगावर जरा काटाच आला. ती तशीच मंदिराच्या दिशेने चालायला लागली. रस्त्या वर सकाळची नेहमीची वर्दळ होतीच.
मंदिराजवळ आल्यावर, दुकानात जाण्याआधी दर्शन घेणं तर भागच होतं. शिरस्ताच होता तसा. देवाचं देऊळ आल्या नंतर दर्शन नं घेता, ते ओलांडून कधी पुढं जायचं नाही... देव कोपतो.. एका फुलाच्या दुकानाजवळ चपला काढून ती घाईघाईने मंदिरात शिरली. चपला काढण्यासाठी दुकानातून फुलं घेतलीच पाहिजेत असं काही नाही. तीही, इथली नेहमीचीच पद्धत. आई बरोबर, मैत्रिणीबरोबर ती नेहमी यायची इथे. ओटी.. फुलं.. तिच्याबरोबरचं .. कधीच कुणी विकत घेत नव्हत. अगदीच फुलं हवी असतील तर ती, घरूनच आणायच्या सगळ्या. चपला मात्र ठेवायच्या इथेच कुठल्या तरी दुकानाच्या फळी खाली....
कुट्टी मंदिरात देवीच्या मूर्तीसमोर हात जोडून, डोळे बंद करून उभी राहिली. डोळे उघडले तर.. शेजारी तो उभा..... तिला खूपच धडधडायला लागलं. आजूबाजूला पहिलं.. नऊवारी लुगड्यातली एक बाई प्रदक्षिणा घालत होती. तीही जरा धावतच त्या बाईच्या जवळ गेली अन् तिच्या शेजारून चालायला लागली. तिला आता थोडा आधार वाटला.
सकाळची वेळ असून सुद्धा ती बाई अगदी निवांत दिसत होती, देवदर्शनाला.. तिच्या आरामात प्रदक्षिणा घालणं चालू होतं. कुट्टीही मग, त्या बाईच्या जवळपास राहूनच चालायला लागली. किती प्रदक्षिणा झाल्या ते मोजलंच नाही मग. तो पुढे मागे कुठं दिसत नव्हता. तिला हायसं वाटलं.
देवदर्शन आटपलं .. तो नजरेआड गेला होता.. सुटकेचा निश्वास टाकून कुट्टी आता तिच्या आवडत्या कामाकरता, त्या चकचकीत दुकानात शिरली. सगळी दुकानं नुकतीच उघडत होती. तिने आरामात तिचं रेशीम.. झुंबर बनवण्याकरता टिकल्या.. स्पंजच्या बाहुली करता लागणारं सामान...... बघायला सुरवात केली. दुसरं कुणीच गिर्हाईक नसल्यामुळे दुकानदार पण निवांतपणे सगळं दाखवत होता. वेगवेगळे रंग.. इतक्या शेडस .. अगदी रमूनच गेली मग ती त्या सगळ्यात.
सगळं सामान मना सारखं मिळाल्यावर कुट्टीला अगदी कृतकृत्य वाटलं. मस्त जाणार आता पुढचे काही दिवस.. दुकानदार टोटल करायला लागला..
“एकशे सव्वीस रुपये..”
आई रागावणारच एवढे पैसे एकदम खर्च केले म्हणून.. कुट्टीनं तिची छोटीशी पर्स उघडली.
“हे घ्या पैसे..” दुकानदारा समोर एकदम नोटा आल्या.
तिनं दचकून बघितलं.. तो.. तो तोच होता.. दुकानदारासमोर शंभर शंभराच्या नोटा हातात घेऊन उभा होता... .. केव्हा आला तो इथे..? तिला एकदम रडुच फुटलं.
“काय झालं बेटा? काय झालं..?” दुकानदाराने प्रेमळ पणे विचारलं.
“हा.. हा.. हा माझा कुणीच नाही.. माझ्या मागे मागे आला..” तिनं रडत रडत कसबसं सांगितलं..
“क्या है बे.. क्यो इसके पीछे पडा..” काउंटर वरून दुकानदाराने त्याची कॉलर पकडली..
“नही.. नही.. मै तो पैसे..” कसाबसा कॉलर सोडवत तो पळाला.
कुट्टी अजूनही थरथरत होती.
“बस बेटा.. पाणी हवं..? गेला तो.. सोबत हवी का तुला....”
“न.. नको.. ती स्टूलावर टेकली. दोन पाच मिनिटे गेल्यावर, थोडी थरथर होती तरी, कुट्टी शांत झाली. पैसे दिले. सामान घेतलं अन् बसस्टॉप वर आली.
“झाली का तुझी खरेदी? आणलं एकदाचं सामान?” घरात पाय ठेवताच आईने विचारलं मात्र.. कुट्टीला एकदम रडू फुटलं.. नवीन उमाळ्याने .. स्फुंदुन.. स्फुंदुन...
“काय झालं..?” ह्या प्रश्नाला रडत रडत सगळी हकीकत सांगताना कुट्टीला खूपच अपराधी वाटायला लागलं. कुणी मागं लागणं ही स्वत:चीच चूक असल्यासारखं..
“पण तू रडत का बसलीस..? एक ठेवून द्यायची नं त्याला.. अशी कशी तू..” पुढचं सगळं ऐकतांना कुट्टीचं अपराधीपण वाढतच गेलं मग..
असं नको व्हायला पुढच्या वेळी...... कुट्टी ने स्वत:शी ठरवलं. कुणी असं मागं लागलं तर.. आपण काय बोलू शकतो ह्याची मनातल्या मनात कितीतरी वेळा उजळणी केली तिने..
कितीतरी महीने गेले नंतर. कुट्टी विसरली होती तो प्रसंग.
अशीच एकदा दुपार ओसरल्यावर ती घराबाहेर पडली, सायकल वर. मुख्य रस्त्यावर आल्यावर तिच्या लक्षात आली, सतत तिच्या पुढे मागे करणारी.. मध्येच तिच्या सायकल ला खेटून चालवायच्या प्रयत्नात असलेली दुसरी सायकल.. सायकल चालवणारा तो ‘तोच’ होता... गडद निळ्या गॉगल मधला.. घृणास्पद हसू तोंडावर असलेला.. कुट्टी चा परत थरकाप झाला. आईचं बोलणं आठवलं.. मनात तयार केलेली सगळी वाक्य आठवली..
दुसरी सायकल आता चांगलीच धीट झाली होती. त्या सायकलच पुढचं चाक तिच्या सायकलच्या मागच्या चाकाशी लगट करायला लागलं होतं. कुट्टी ने हिम्मत गोळा केली. ती भर चौकात आपल्या सायकल वरून खाली उतरली. तो ही थांबलाच तिथे..
“ए.. मला कशाला पाडतोस.. माझ्या सायकल ला का धक्का..” एवढे शब्द बोलून संपेपर्यंत तिचा आवाज भरून आला.. डोळ्यातून पाणी वाहायला लागलं.. पुढचे शब्द घशातच अडकून पडले.. तिच्या भोवती चौकात गर्दी जमायला लागली.. तमाशा बघायला लोकं जमत होते..
“क्या हुआ बेटा..? क्यो खडी हो यहा.. ” गर्दीतून आवाज आला. हा मोठा भैय्या पूर्वी कुट्टीच्या समोरच्या घरात रहायचा..
“भैय्या.. ये लडका.. मेरे पीछे..” तिला परत बोलता येईना.. भैय्या च्या लक्षात सगळी परिस्थिती आली..
“तुम जाओ.. मै देखता हू..”
गर्दीतून वाट काढत सायकल घेऊन कुट्टी घराकडे वळली.. हरल्यासारखी.. डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरूच होत्या.. काय नव्हत त्यात..? परत स्वत: करता उभं नं राहता आल्याची खंत.. अपमान.. आणी परत एकदा अपराधी भाव....
************
गोष्ट आवडली नाही असे नाही
गोष्ट आवडली नाही असे नाही म्हणत मी. पण ह्यातून काहीतरी मार्ग दाखवायला पाहिजे होता. एव्हढेच
नाहीतर आहेच "अंधेरा कायम रहे."
घरूनच मुलांना मुलींविषयी आदर,
घरूनच मुलांना मुलींविषयी आदर, समानता शिकवणे गरजेचे आहे. >> करेक्ट!
कितीही खंबीर, कणखर मुलगी असली, अगदी कराटे वगैरे शिकली तरी पिसाळलेल्या गँगसमोर ती एकटी काय करणार? तशी गँगच निर्माण होऊ नये यासाठी मुलांना योग्य प्रकारे वाढवणं आवश्यक आहे. मुलींनी खंबीर असायलाच हवं, पण तेवढंच पुरेसं नाही.
वावे हे खरे आहे.
वावे
हे खरे आहे.
Pages