दारावरची थाप

Submitted by रुद्रदमन on 26 August, 2024 - 07:06

दारावरची ती थाप...

शहराच्या गोंगाटा पासून दूर, आम्ही शहराबाहेरील एका नवीन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला. नुकतेच लग्न झालेले असल्यामुळे पैशांची चणचण होती, त्यामुळे शहराबाहेर येणे भाग होते, पण त्याच वेळी या जागे ने आमच्या जीवनाला एक शांतता दिली होती. नव्या घरात शिफ्ट होऊन सहा महिने झाले होते. घराच्या समोरच मोठा कॉलनी रोड होता, आणि त्यावर स्ट्रीट लाइट चा खांब होता, त्यामुळे रात्री रस्त्यावर त्याचा छान उजेड असायचा. आमची बाल्कनी त्याच बाजूला असल्यामुळे रात्री बाल्कनी मध्ये बसून रस्त्यावरची तुरळक रहदारी बघत गप्पा मारण्यात बराच आमचा वेळ छान जायचा.

आमचे आयुष्य नव्या घरात छान चालले होते. सकाळचे ऊन, आजूबाजूला बऱ्या पैकी झाडी,संध्याकाळची हवा आणि रात्रीची शांतता हे सगळे आम्हाला शहराच्या धावपळी पासून वेगळे करून एक नवे जीवन देत होते. एक दिवस अनुला (माझी बायको) माहेरी जाण्याची इच्छा झाली.

"अहो ऐका ना, तीन महिने झालेत, घरातून बाहेरच गेले नाहीये. मला दोन-तीन दिवसांपासून आईची खूप आठवण येते आहे. मला भेटायचंय आईला," अनुने आपल्या शांत आवाजात सांगितले

"अग मग जाऊन भेटून येना, त्यात काय एवढे? पण तू एकटी कशी जाशील? अस कर, तू आवरून ठेव, मीच तुला सोडायला येतो,तसेही कुठे जास्त दूर आहे" मी प्रेमाने तिला बोललो.

ती आनंदात मला बिलगली आणि "Thanks, तुझ्यासारखा प्रेमळ नवरा भेटण्यासाठी नशीब लागते," असे बोलत बॅग भरण्यासाठी बेडरूमकडे धावली.

मी पण तिचा आनंद बघून खुश झालो आणि खुर्चीत बसून पेपर वाचू लागलो.

त्याच दिवशी दुपारी मी अनुला माहेरी सोडायला गेलो.
"जरा आराम कर, आईकडे आली आहेस तर. नाही तरी आपल्या घरी नोकरी, घर खूप दगदग होते तुझी, आणि काही लागलं तर मला कॉल कर," मी तिला बाईकवर बसताना सांगितलं.

"हो हो, इतकी काही काळजी करू नका. मी काही लहान मुलगी नाहीये," ती मिश्कीलपणे म्हणाली.

संध्याकाळी परतताना मी बाहेरच जेवण घेतलं. घरी पोहोचेपर्यंत चांगलाच अंधार पडला होता. मनात एक विचित्र बेचैनी होती.अनु च्या असण्याची खूप सवय झाली होती. पहिल्यांदाच मी आज घरात एकटा राहणार होतो. पार्किंगमध्ये गाडी लावत, "आज एकटे घरात कसे होईल?" मी स्वतःशीच बोलत घराकडे निघालो.

दरवाजा उघडताच सगळीकडे पसरलेली नीरव शांतता मनाला बोचली. अनुचा हसरा चेहरा गायब होता, तिला मी खूप मिस करत होतो. तिचे घरात नसणे ही माझ्यासाठी खूप जड भावना होती. मी ठरवले आज बाल्कनीत बसून 'किरदुर्ग' या कथेला पुढे नेईन.मस्त कडक कॉफी बनवून घेतली आणि टॅबलेट घेऊन बाल्कनीत येऊन बसलो.

रात्रीचे नऊ वाजले असतील, सगळीकडे मिट्ट काळोख पसरलेला, मस्त गार वारा वाहत होता. आकाशात तुरळक ढग जमले होते. "कदाचित आज अमावास्या असेल." मी स्वतःशीच बोलत कथेच्या विचारात हरवून गेलो.

किती वेळ गेला माहीत नाही, आजूबाजूच्या वातावरणामुळे लेखनाचा चांगलाच सुर सापडला होता. अचानक कसल्या तरी आवाजाने माझं लक्ष लेखनातून विचलित झाले. समोर बघितले तर समोरची स्ट्रीट लाइट चालू बंद होताना दिसली. मी उठून बाल्कनी च्या भिंतीजवळ गेलो आणि खाली पाहिले.ती तिथे होती. स्ट्रीट लाइट च्या पिवळसर उजेडात एक भेसूर आकृती. तिच्या अंगावर एक जुनी, रक्ताने मळलेली पांढरी साडी होती, जी हलक्याशा वाऱ्यात हलत होती. केस काळेभोर, मोकळे सोडलेले, त्या विखुरलेल्या केसांमध्ये काही भागांवर कोरडे झालेले रक्त चिकटले होते. पण जेव्हा तिच्या चेहऱ्यावर माझी नजर गेली, तेव्हा अंगावर काटा आला. तिचा चेहरा अत्यंत विकृत, रक्ताने माखलेला होता, जणू कोणीतरी तिचे मांस फाडून काढले होते. तिच्या कपाळा वरून रक्ताची धार अजूनही खाली ओघळत होती, आणि तिचे ओठ रक्ताळलेले, काळेकुट्ट होते, जणू काही तिने आताच कोणाला तरी फाडून खाल्ले असावे. तिच्या डोळ्यांचे पांढरे भाग पूर्णपणे रक्ताळलेले, आणि डोळ्यांच्या मधोमध लालबुंद झगमगता ठिपका होता, जो माझ्या दिशेनेच रोखला होता.

"अरे देवा!" मी एकदम मागे सरकलो आणि खुर्चीवर कोसळलो. मला काहीच कळत नव्हते, मी जे पाहिले ते खरे होते का, की माझ्या डोळ्यांचा भ्रम होता? मी हिम्मत गोळा करून परत थोडा उठून शहानिशा करण्याचा प्रयत्न केला, पण ती जागा आता रिकामी होती.

मी एक खोल श्वास घेतला आणि परत खुर्चीवर बसलो. डोळे बंद करून विचार करू लागलो, तेव्हाच अचानक सगळीकडे शांतता पसरली. किचनमधून येणारा फ्रिज चा आवाज बंद झाला होता.

"काय चाललय हे?" मी स्वतःशीच बोललो.

मी डोळे उघडून मागे पाहिले. लाईट गेली होती. परत समोर पाहिले तर स्ट्रीट लाइट चालू दिसली. विचारात पडलो, तेव्हाच दारावर जोरजोरात थापा पडायला सुरुवात झाली. थापांचा तो आवाज शांततेला छेदत थेट माझ्या हृदयावर घाव घालत होता. थंडी असतानाही मला दरदरून घाम फुटला. मी दरवाज्याकडे जाण्यासाठी उठलो आणि समोरची स्ट्रीट लाइट पुन्हा चालू बंद होऊ लागली. दारावर थापांचा आवाज अजूनही सुरू होता. माझ्या शरीरात भीतीने कंप निर्माण झाला होता.

"अनु, तूच आहेस का?" अनु माहेरी गेली आहे हे माहीत असूनही, मी दरवाज्याकडे बघत आशेने विचारले, पण उत्तर आले नाही.

माझ्या मनात एकच दहशत पसरली. मी घाबरून माझ्या हातांनी माझा चेहरा झाकला. मला वाटलं की हा एकटेपणा आज माझा घात करणार आहे. मी स्वतःशी विचार केला.

अचानक लाईट आली. मी धावत जाऊन दरवाजा उघडला. दारासमोर आमचे शेजारी उभे होते, जे त्यांच्या घरातून बाहेर पडत होते.

"काय झाले भाऊ, इतक्या वेळेपासून तुमची लाईट गेली होती," त्यांनी विचारलं.

"हो, अचानक गेली होती," मी थोडा घाबरून म्हणालो.

"काही हरकत नाही, असे होत असते इकडे. आज एकटेच आहात ना?" शेजारच्या काकांनी रहस्यमय नजरेने बघत विचारले.

"अं... अ... हो, हो, बायको आजच माहेरी गेली आहे," मी चाचरत बोललो.

"ठीक आहे, ठीक आहे, काळजी घ्या," असे म्हणत ते काका त्यांच्या फ्लॅटच्या दिशेने निघून गेले.

मी ते घरात जाऊन दरवाजा बंद करेपर्यंत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तिथेच उभा राहिलो. मन भयाण विचारांनी भरलेले होते. एक मन म्हणत होते त्यांना सांगावे का आपण काय बघितले ते. पण ते आपल्यावर हसतील. आपल्याला भित्रा ठरवतील असे वाटून मी तो विचार झटकून टाकला. दरवाजा बंद केला आणि पुन्हा बाल्कनीत जाऊन बसलो. मनात विचारांची गर्दी चालू होती, काहीतरी विचित्र चाललय हे नक्की होत.
अजून एक कप कडक कॉफी पिल्याशिवाय मेंदू चालणार नाही. असा विचार करत मी किचन मध्ये जाऊन परत एक कप कॉफी बनऊन घेतली. कॉफीचा कप उचलणार, तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर अनु नाव झळकले.
"हॅलो, अनु?" मी घाबरलेल्या आवाजात बोललो.

"काय झाले? असे घाबरल्या सारखे का बोलता आहात?" तिने विचारले.

"काही नाही, फक्त... तुझी आठवण येतेय," मी आवाजा मध्ये शक्य तेव्हढा सामान्य स्वर आणत तिला सांगितले.

"आय मिस यू टू. एव्हढे मोठे असून ही एकटे राहायला जमत नाही ना तुम्हाला?" ती हसत म्हणाली.

"हो, तसच काहीस आहे," मी तिच्या आवाजात शांतता शोधत होतो.

"ठीक आहे, काळजी घ्या. मी उद्याच परत निघून येईल, बस ना? आणि परत आठवण आली तर लगेच कॉल करा." ती म्हणाली.
मी होकार दिला,आणि तिला बाय करत कॉल कट केला.
कॉफी चे घोट घेत घेत बेड वर बसलो. काहीतरी वेगळेच घडते आहे हे मनात कुठेतरी जाणवत होते. कॉफी संपली पण त्या भेसूर चेहऱ्याचे चित्र डोक्यातून जात नव्हते.
कथेला आज च्या दिवस बाजूला ठेवून मी झोपायचे ठरवले. बेड वर बराच वेळ फक्त लोळत होतो पण झोप काही येत नव्हती. विचारांनी मनाला घेरले होते. "ती कोण होती? मी जे पाहिले ते खरे होते का?" हे प्रश्न मला सतावत होते. कधी तरी झोप लागली.
रात्री अचानक डोळे उघडले. परत तोच आवाज ऐकू येत होता. दारावर जोरजोरात थापा. मी घड्याळात बघितले, 3 वाजले होते. शरीर गोठले, अंगावर काटा आला. इतक्या रात्री कोण असेल ? मनात प्रश्नावर प्रश्न ... मी घाबरत बेडरूम च्या दरवाजात येऊन मुख्य दरवाजा कडे बघितले. पडणाऱ्या थापांनी दरवाजा थरथरत होता. दरवाजाच्या फटीतून एक मंद, पिवळट प्रकाश आत येण्याचा प्रयत्न करत होता. मी पुढे सरकलो , थापांचा आवाज अजून वाढला जसे काही बाहेर जे होते त्याला आत यायची खूप घाई झाली होती..

दार उघडायचे धाडस माझ्या अंगात शिल्लक नव्हते, पण तरीही मी कसल्या तरी ओढीने हळूहळू दरवाजा जवळ गेलो, दरवाजाच्या खटक्याला हात लावला. आणि धाडकन कोणतरी प्रचंड ताकदीने बाहेरून धक्का द्यावा तसा दरवाजा चौकटीमधून निखळून माझ्या अंगावर आला. मी कसा तरी घाई घाई ने बाजूला सरकलो. हेलपाटत मागे येऊन पडलो. काही क्षणात डोळे उघडले आणि दरवाज्याकडे बघितले.
समोर तीच होती... रक्ताळलेला चेहरा, लाल डोळे, तोंडातून रक्ताची धार अजूनही ओघळत होती. तिचे भयाण हास्य मला नजरेला भिडले, जणू काही ती माझी दरवाजा जवळ येण्याची च वाट बघत होती.

"कोण आहेस तू?" मी घाबरत विचारले.

ती काहीच बोलली नाही, पण तिचा चेहरा हसत होता, भेसूर पद्धतीने. माझे शरीर थरथरत होते. मी कसाबसा उभा राहून एक पाऊल मागे घेतले, तेवढ्यात ति एक पाऊल पुढे आली.
आणि अचानक सगळीकडे अंधार पसरला... माझ्या ही डोळ्यामध्ये काजवे चमकत अंधारी आली.
सकाळ झाली, आणि माझी झोप उघडली तेव्हा मी बेडवर होतो. डोके दुखत होते, मी जिवंत होतो. कालचे घडलेले एक भयानक स्वप्न होते का? पण मग तो भेसूर चेहरा, तो प्रकाश, ते सगळे खरे होते का? मी सांशक तेने उठलो आणि बेडरूम च्या दरवाजा जवळ जाऊन बाहेर बघितले. मुख्य दरवाजा अजूनही मोडून पडलेला होता. माझ्या पाया खालची जमीन सरकते की काय असे मला वाटून गेले. मी ठरवले, आज रात्री इथे थांबायचे नाही. मी अनुला घेऊन या घरातून कायमचे निघून जाण्याचा विचार केला. आणि त्याच दिवशी मी तिच्या माहेरी गेलो. तिथे तिला घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. माझ्या बोलण्यातील भीती तिला जाणवली. तशी ती खूपच समंजस होती. दोन दिवसात तिकडून च आम्ही नवीन भाड्याचे घर शोधले. मला परत त्या जुन्या घरात जायची हिम्मत नव्हती. पण सर्व सामान नीट आणण्यासाठी जावेच लागणार होते. खरे तर त्या दिवशी मोडलेला दरवाजा तसाच ठेऊन मी घर सोडलेले होते सामानाची काय परिस्थिती असेल हे नक्की मला ही सांगता येत नव्हते. तरीही जेव्हढे असेल तेव्हढे सामान आणण्यासाठी अनु च्या भावाला आणि माणसांना घेऊन तिथे जाण्यासाठी मी निघालो,
अनुला मात्र मी तिकडे येऊ दिले नाही. दरवाजा परत बसविण्या साठी सुतार पण बरोबर घेतला. तिथे पोहोचल्यावर मला मी वेडा होतो आहे की काय आशी शंका आली. दरवाजा अगदी व्यवस्थित होता. मला स्वतःवरच शंका यायला लागली. पण मला परत विषाची परीक्षा घ्यायची नव्हती. मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. तिथे नक्कीच काही तरी होते. सुतारा ला विना काम पैसे देऊन पाठवून दिले. सर्व सामान भरताना अंधार पडत आला होता. साधारण तिथून निघताना 9 वाजले. टेम्पो निघून गेल्यावर अनूच्या भावाने बाईक वळवली. मी मागे बसलो. अजून माझे लक्ष त्या स्ट्रीट लाईट कडे होते. पण तिथे सगळे काही सामान्य होते. थोडे पुढे गेल्यावर ज्या घरासाठी आयुष्याची जमापुंजी खर्ची घातली , ज्या घरात पुढील आयुष्याची सुरेख स्वप्ने पाहिली होती. ज्या घरात संसाराचे सुरुवातीचे सर्वात सुखी सहा महिने काढले होते. त्या घरा कडे शेवटचे बघण्याची एक अतूट इच्छा मनात निर्माण झाली. मी मागे वळून अस्वस्थ मनाने,आम्ही नवरा बायको ने ज्या बाल्कनी मध्ये कित्येक तास सुख दुःखाच्या गप्पा मारल्या त्या बाल्कनी कडे बघितले..
तिथे ती उभी होती,
रक्ताळलेला चेहरा, मोकळे सोडलेले केस,लाल डोळे, ओठांवर येणारी रक्ताची धार जिभेने चाटत. भयाण हास्य रक्तळलेल्या ओठावर आणून, तिच्या त्या त्वचा नसलेल्या हाताने मला परत येण्याची खूण करत ती माझ्याकडेच बघत होती.

त्या घटनेला कित्येक वर्ष लोटली. आम्ही पुन्हा त्या भागात कधीच गेलो नाही. एका एजंट च्या मदतीने ते घर परस्पर अगदी पडलेल्या किमतीत विकून टाकले.
पण आजही ती दारावरची थाप, तिचा रक्ताळलेला चेहरा आणि त्या रक्ताळलेल्या डोळ्यांमध्ये दडलेली भयानकता माझ्या मनात कोरली गेली आहे.

समाप्त..

लेखक: रुद्रदमण

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयकथा, रहस्यकथा वगैरे प्रकारांना एक 'नेमका शेवट' किंवा 'एक सकारात्मक शेवट' असतो असे वाचण्याची सवय झालेली असते. तसे येथे झालेले दिसत नाही, पण तो काही मोठा प्रश्न नाही. नकारात्मक / गूढ / अनाकलनीय शेवट असणे हेही होऊ शकतेच. प्रश्न हा आहे (असे मला तरी वाटते ) की, वाचकाला थोडी भीती वाटवणे या पलीकडे या कथेत काही सापडले नाही.

किंवा कदाचित माझ्याकडून ते निसटले असेल.

भय कथा च आहे ही... बाकी वाचकाला थोडी शी जरी भीती वाटली असेल तर नक्कीच मला आवडले मग ते... आणि शेवट वेगळा हवा होता असे म्हणालात ... तर ते समोरचे शेजारी होते ना त्यांना त्यांच्या भावा साठी तो फ्लॅट हवा होता... त्यांनी आणि त्यांच्या भावाने सर्व प्लॅनिंग करून हे नाटक उभे केले होते ...अगदी तोंड रंगवलेली स्त्री... स्ट्रीट लाईट चे चालू बंद होणे , त्याच्या फ्लॅट चे खालून main switch बंद करणे.. ... दार बाहेरून तोडणे.. आणि त्याच नंतर लाईट बंद करणे,त्याला अंधारी आल्यावर बेडवर नेऊन झोपवणे.. दुसऱ्या दिवशी तो अनु कडे गेल्यावर सुतार बोलावून तो दरवाजा नीट करून घेणे... सर्व त्यानीच केलेले होते... अशी पाताळयंत्री माणसे जागोजागी असतातच..
नंतर तो फ्लॅट त्यानीच घेतला पडलेल्या किमती मध्ये...

रुद्रदमण
तुम्ही प्रतिसादात दिलेला twist एकदम भारी आहे.

@केशवकुल धन्यवाद
खरे तर मला या ट्विस्ट वर दुसरा भाग लिहायची इच्छा होती.. पण बेफिकीर सरांच्या कमेंट मुळे तो इथेच सांगावा लागला..

rudradaman तुम्हीच समाप्त टाकलंय कथेच्या शेवटी म्हणून बेफिकीर यांनी ती कमेंट लिहिली. उगीच येडा बनवू नका आम्हाला.

@बोकलत सर या मध्ये वेडा बनवायचा काय प्रश्न आहे.. लिहिताना च दुसरा भाग मनात होता. पण आपली कथा वाचकाना किती आवडते हे बघितल्यावर पुढचे लिहू असे ठरवले होते... आणि तसेही मी काही लेखक नाही.. मनात काही कल्पना आली की ती कधीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो..

विविध लोक, विविध विचार प्रवाह चालू असणार, सोशल मीडियावर लिहिताना उलट सुलट कमेंट, त्यातून विचार मंथन आणि लिखाण थोडं थोडं बदलत जाणे, काही गोष्टी अजिबात न बदलता स्वतःची शैली म्हणून कायम ठेवणं, अश्या गोष्टी कोणत्या हे आयडेंटिफाय करणं हे होतच राहतं.
लिहिते राहा.
अवांतर (इमेजेस टाकल्यास त्या कॉपीराईट फ्री टाका शक्यतो.काहीच नाही मिळालं, कॉपीराईटवाली वापरावी लागली तर त्यात स्वतःचे थोडे बदल करून टाका.जेणेकरून पुढे हा मुद्दा उपस्थित होणार नाही.)

तुमच्या आयडी बद्दल उत्सुकता आहे. दमण (दीव-दमण वाले) मधली रुद्र नावाची व्यक्ती या अर्थाने आहे की रुद्राचे दमन करणारा या अर्थाने ? रुद्राचे दमन करणारा या अर्थाने असल्यास असे कोण होते ज्याने रुद्राचा पराभव केला ते वाचायलाही आवडेल.

कथा आवडली. चित्र नसल्यास अधिक आवडली असती. चित्रामुळे कथेत काय असणार याचा थोडा अंदाज आधीच आला होता. लिहीत रहा.

रुद्रदमण
तुम्ही फक्त एकच "थाप" मारली आहे. तेव्हा अजून येऊ द्या.

@केशवकूल
तुम्ही सांगितले थाप मारा आणि मारली आहे.. मध्यरात्रीचा थरारक.... चा दुसरा भाग पोस्ट केला आहे..

>>>>>>>>>.तुम्ही फक्त एकच "थाप" मारली आहे.
Happy
>>>>>>>>>>rudradaman तुम्हीच समाप्त टाकलंय कथेच्या शेवटी म्हणून बेफिकीर यांनी ती कमेंट लिहिली. उगीच येडा बनवू नका आम्हाला.
Happy

@सामो
धन्यवाद जसे तुम्ही म्हणता तसे...
अजून एक कथा पोस्ट केली आहे.. आवडली तर नक्की सांगा.. आणि तुम्ही सर्व म्हणतच आहात तर बेफिकीर सरांच्या कमेंट नंतरच मला तो ट्विस्ट सुचला असे जाहीर करतो... बस ना की अजून काही जाहीर करू

छान आहे कथा, प्रसंग छान रंगवले आहेत.

तुमचा twist हा अपेक्षित होता, मूळ कथे मधे तशी जागा दिली होती, त्यामूळे तुमच्या कडे हे लॉजिकल स्पष्टीकरण ह्या भायकथे साठी असणार हे कळत होत.
तुम्ही लगेच पोस्ट नसतं केलं तर कुणीतरी वाचकाने (कदाचित मी च) हे पोस्ट केलं होत.

पू. ले. शु.

रुद्रदमन,
तुमचा प्रतिसादातील ट्विस्ट आवडला.

आई ग.. कोणीतरी माझाच अनुभव लिहिते आहे असे वाटले. देजावू तरी कसे म्हणावे याला.. त्यात जे आपण बघतो ते कधीतरी आपल्याशी घडले आहे असे वाटते. इथे तर जे वाचत आहे जवळपास तेच थोड्याफार फरकाने माझ्याशी घडले आहे. मी माझ्या आयुष्यातील पहिली खरीखुरी अमानवीय भयकथा योगायोगाने अशीच बायको घरी नसताना लिहायला घेतली होती आणि त्या लेखनाचा परीणाम म्हणून भास म्हणा किंवा खरेच भूत प्रेत म्हणा, त्या दिवशी जो अनुभव घेतला त्यानंतर कधी भयकथा लिहावीशी वाटली नाही. ना त्या अनुभवा बद्दल कधी कुठे लिहिले, ना कोणाला सांगितले. अगदी बायकोला सुद्धा नाही. कारण एकतर तिने माझ्यावर विश्वास ठेवला नसता आणि ठेवला असता तर त्या घरात राहायला नकार दिला असता..

असो..
ही कथा आवडली. प्रतिसादात जी कलाटणी सांगितली ती सुद्धा आवडली. शैली छान आहे. लिहीत राहा...

अवांतर - तुमचे रूद्रदमन हे आयडी नाव मी आतापर्यंत रूद्र दमन असे न वाचता रूद्रद मन असे वाच होतो. (माझे मन च्या चालीत) Happy

मी लहान होतो तेव्हा सेम फोटोतली बाई माझ्यासोबत खेळायला यायची. रात्री सगळे झोपले की यायची. मी तिला ताई बोलायचो. मी म्हणायचो ताई तू सकाळी का नाही येत तर ती हसून बोलायची अरे मला सकाळी झोपायचं असतं म्हणून. मी म्हणायचो ताई तू वेडीच आहेत सकाळी कोणी झोपतं का? यावर ती विचित्र हसायची. मी म्हणायचो ताई तू नेशील का मला तुझ्या घरी तेव्हा ती बोलायची हो येत्या अमावस्येला कायमची नेईन हा तुला माझ्या घरी. मी खूश व्हायचो. एके दिवशी रात्री आई रात्री पाणी प्यायला उठली तर तिला मी एकटाच खेळताना दिसलो. आई नुसतीच हसली बोलली वेडा कुठला. शेवटी ती अमावस्येची रात्र आली. ठीक रात्री १२ वाजता आमच्या दारावर थाप पडली. दार उघडलं तर ताई. बोलली चल माझ्या घरी. मी पण बोललो चल जाऊ. मग ती मला एका झाडावर घेऊन गेली आणि भेसूर हसायला लागली बोलली तुझा खेळ संपला. मी खिशातून आणलेलं चॉकलेट शांत बसून खाल्लं आणि बोललो कदाचित तू मला ओळखलं नाहीस. तू मला इथे नाही आणलास तर मी स्वतः तुला इथे घेऊन आलोय. मी आहे बोकलत. पुढची गोष्ट लिहायचा कंटाळा आलाय आणि तुम्हाला माहित आहे पुढे काय झालं. टाटा बाय बाय.

मस्त आहे कथा. पुढचा भाग येऊ द्या.>>+१
तुमचा प्रतिसादातील ट्विस्ट आहे त्याला धरूनच तुमच्या स्टाइलने पुढचा भाग लिहा.