मध्यरात्री घडलेला रस्त्यावरील थरार
चकवा! ती जीवघेणी रात्र
वैयक्तिक कामे उरकून रात्री उशिरा मी आणि माझा एक मित्र गावी येत होतो. निघायलाच रात्रीचे 10 वाजले होते. थोडे अंतर आल्यावर भुकेची जाणीव झाली. रस्त्यात हॉटेल वर जेवण उरकून आम्हाला निघायला 1 वाजला होता.
मित्राला ड्राइविंग येत नसल्यामुळे गाडी मीच चालवत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूने किर्र काळोख दाटून आला होता. मध्यरात्र असल्यामुळे समोरून किंवा मागून एकही गाडी क्रॉस होत नव्हती.
त्या भयाण काळोखात फक्त आम्ही दोघे, वेगाने मार्गक्रमण करत होतो. रात्री दोन वाजत आले होते. अचानक मित्र ओरडला, आणि त्याने गाडी सावकाश करायला सांगितली. त्यावेळी आम्ही गुळेगाव च्या सावित्री नदी च्या पुलावर होतो. पूल जवळ जवळ अर्धा पास केला होता. मी त्याचा आवाज ऐकून दचकलोच, आणि गाडी हळू करून त्याच्या कडे प्रश्नार्थक बघितले.
तो म्हणाला की तिथे मागे पुलाच्या सुरुवातीला, एक स्त्री एका मुलाला पकडून उभी होती , आणि ती लिफ्ट साठी हात दाखवत होती.
मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघितले. कारण मी अशी कोणतीच स्त्री पाहिली नव्हती. मी त्याला तसे सांगितले की त्याला झोपेच्या धुंदीत भास झाला असावा, पण तो त्याच्या बोलण्यावर ठाम होता. तो पर्यंत आम्ही हळू हळू एक किलोमीटर पुढे आलो होतो.
त्याच्या वर विश्वास ठेवून, मी त्या स्त्रीला मदत करण्याच्या हेतूने गाडी मागे फिरवली. थोड्याच वेळात आम्ही त्या पुलावर पोहोचलो होतो.
तिथे दोन्ही बाजूला कोणीच नव्हते.
पुलाच्या दुसऱ्या टोकाला गाडी उभी करून आम्ही आजूबाजूला बघू लागलो. तिथे आम्हाला कोणीच दिसले नाही.. हिवाळ्याचे दिवस होते, थंड हवा सुटली होती. आम्हाला वाटले की वाहन मिळत नसल्याने आणि स्वतःचा आणि बाळाचा थंडी पासून बचाव करण्यासाठी ती स्त्री कदाचित पुलाच्या आडोश्याला बसली असेल. आम्ही टॉर्च काढून खाली उतरलो आणि आजूबाजूला शोध घेऊ लागलो. सर्व बाजूने अंधार साकाळला होता. बॅटरी च्या झोताच्या आजू बाजूला काहीच दिसत नव्हते. त्यात ती भयान शांतता आणि आजूबाजूच्या झाडांमधून येणारे रात्र किड्यांचे आवाज वातावरण अजूनच गूढ करत होते. आमचा भुता खेतांवर विश्वास नसल्याने.
आम्ही जास्तच बेफिकीर होतो.
बराच वेळ शोधल्यानंतर, त्याला भास झाला असावा असे नक्की करून, आम्ही परत गाडी कडे निघालो. पुलाचा उंचवटा चढत असताना मला एक बारीक आवाजातील रडणे ऐकू आले. मी थांबलो. मित्र थोडा मागे होता. मी त्याच्याकडे बघण्यासाठी मागे वळलो. बघतो तर मागे कोणीच नव्हते. एक केविलवाणे रडण्याचा आवाज मात्र येतच होता. मी मित्राला हाक मारायला सुरुवात केली. किर्र अंधार आणि तो रडण्याचा आवाज, त्यात अचानक गायब झालेला मित्र. भीतीने आवाज निघत नव्हता, तरी ही मनाची समजूत घालून त्याला शोधण्यासाठी, परत त्या पुलाच्या उंचवट्या वरून खाली उतरलो. तो कुठेच दिसत नव्हता. आता रडण्याच्या आवाजाची तीव्रता वाढली होती. मी मनाचा हिय्या करून, पुलाच्या खालच्या दिशेकडे बॅटरी चा झोत वळवला. समोर माझा मित्र पाठमोरा वाकून काही तरी बघत उभा होता.
मी त्याला हळूच आवाज दिला, पण त्याच्यापर्यंत तो पोहोचला नाही.
शेवटी नाईलाजाने मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला हात लावला. तर त्याने दचकून माझ्या कडे बघितले. तो प्रचंड घाबरलेला होता. त्याने पुलाच्या खालच्या बाजू कडे बोट केले. मी बघितले तिथे एक हिरवी साडी घातलेली स्त्री पाठमोरी बसलेली होती. तिच्या एका बाजूला बाळ झोळीत टाकलेले होते,आणि दुसऱ्या बाजूला जाळ सुरू होता. त्यावर एक पातेले ठेवलेले होते. रडत रडत त्यात हात घालून ती काहीतरी ढवळत होती. मला काही कळत नव्हते, मी हळू हळू पुढे जाऊ लागलो, तिच्या जवळ पोहोचलो. तिला हात लावणार तोच माझे लक्ष पातेल्याकडे गेले. त्यात एका पुरुषाचे डोके होते. ती स्त्री त्यावर पातेल्यातील उकळते पाणी हाताने ओतत रडत होती. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी भीतीने मागे वळणार, तेव्हाच तिने मागे वळून माझ्या कडे बघितले.
तिचा तो पांढराफट निस्तेज चेहेरा , गाल आत गेलेले आणि त्वचा हाडाला चिकटलेली, अंगावर मांस नावाचा प्रकारच नाही. डोळे आत खोबणीत गेलेले, डोळ्यात वेडसर पणाची झाक होती. डोळ्याभोवती गडद काळे रिंगण असल्यामुळे बुबुळे पांढरी फट दिसत होती. डोक्यातून कसल्या तरी जखमे मधून काळे रक्त खाली ओघळत होते.तिने वळून माझ्याकडे बघितले आणि त्याच क्षणी माझ्या मागून माझ्या मित्राची किंकाळी ऐकू आली. मी देवाचे नाव घेत मागे पळालो. बघतो तर माझा मित्र तिथे नव्हता. मी तसाच पळत गाडी जवळ आलो. मागे तिचे रडण्याच्या आवाजाचे रूपांतर आता जीवघेण्या किंकाळ्यांमध्ये झाले होते. गाडी जवळ येताच दिसले की माझा मित्र उघड्या दरवाजाजवळ बेशुद्ध पडलेला होता. मी त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होतो. पण तो काही उठत नव्हता. मागचे किंचाळण्याचे आवाज आता जवळ यायला लागले होते. आता त्या आवाजात लहान मुलाचे भेसूर रडण्याचे आवाज ही मिसळले होते.
मी क्षणाचाही विलंब न करता, मित्राला उचलून गाडीत टाकले व गाडी स्टार्ट केली.
गाडी वळवत असताना सहज नजर पुन्हा पुलाच्या कडेला गेली.
तिथे तीच भयानक आकृती भेसूर किंचाळत आमच्याच दिशेने येत होती. मी देवाचे नाव घेत गाडी सरळ रस्त्याला घेतली. मनावर पूर्ण ताबा मिळवला,आणि गाडी वेगाने सोडली.
माझे मिरर मधून मागे लक्ष गेले, तर ती अर्ध्या फूट उंच हवेत आमच्या गाडी मागे वेगाने येत होती. माझा मित्र अजून बेशुद्ध च होता. मी त्याला उठण्यासाठी आवाज देत होतो.
ती हिडीस आकृती भयानक चित्कार करत अगदी गाडी जवळ पोहोचली होती. आवाजाने कानठळ्या बसायला झाल्या होत्या.
माझी तर पूर्ण बोबडीच वळली होती. तेव्हढ्यात आमची गाडी पुलावरून बाहेर पडली.
त्याच बरोबर येणाऱ्या तिच्या किंचाळया चा आवाज कमी कमी होत गेला. मी मागे बघितले, पुलाच्या कडेवर ती क्रुद्ध चेहऱ्याने आमच्या कडे बघून किंचाळत होती.
आता आवाज आमच्या पर्यंत पोहोचत नव्हता. हळू हळू ती दिसेनाशी झाली.
मी गाडीचा स्पीड थोडा कमी केला आणि परत एकदा मित्राला उठवायला सुरुवात केली. पण तो काही हालत नव्हता. घसा कोरडा पडला होता, मी बॉटल उघडून पाणी पिले. उरलेली बॉटल त्याच्या चेहऱ्यावर रिकामी केली. तो खडबडून जागा झाला आणि घाबरून ओरडायला लागला.
मी त्याला समजावून शांत केले आणि नंतर सर्व सांगतो म्हणत देवाचे नामस्मरण करावयास सांगितले. गाडी पुढे सरकत होती. थोडा वेळ गाडी चालवल्यावर, मला पुन्हा एकदा समोर तोच पूल दिसला. माझी तर हिम्मतच खचली, डोके सुन्न झाले. परत एकदा गाडी पुलावर पोहोचली. आता मला आणि मित्राला दोघांना ती दिसली. अगदी सर्वात अगोदर मित्राला दिसली होती तशीच एका कडेला हात दाखवत उभी होती. पण तिच्या अंगावरच्या साडीचा रंग वेगळा होता. मघाशी पेक्षा ती वेगळीच भासत होती। आम्ही एकदा त्या संकटमधून सुटलो होतो. आता थांबून बघायची हिम्मत उरलीच नव्हती. आम्ही वेग वाढवून पुढे निघून गेलो. कित्येक वेळा आम्ही परत परत तोच पूल क्रॉस करत होतो आणि प्रत्येक वेळी ती स्त्री वेगवेगळ्या साडी मध्ये आम्हाला हात दाखवत होती. असे किती वेळ सुरू होते कोण जाणे कारण घडयाळ एकच वेळ दाखवत होते. आम्ही पहिल्यांदा पूल क्रॉस केला ती वेळ. शेवटी मी वैतागून पूल क्रॉस करून बरेच पूढे गेल्यावर गाडी बाजूला घेऊन उभी केली आणि तिथेच थांबायचे ठरवले डोळे बंद केले.
अचानक धड धड धड धड असा आवाज यायला लागला आणि मी डोळे उघडले. सूर्याची किरणे गाडी मध्ये येत होती. म्हणजे दिवस उजडून बराच वेळ झाला होता. आमच्या पुढे एक गाडी थांबलेली होती. आणि काही माणसे आम्हाला उठवण्यासाठी , दरवाजावर हाताने जोरजोरात आवाज करत होते. मी आणि मित्र गाडी मधून बाहेर आलो.
मी आजूबाजूला बघितले, आम्ही त्याच पुलावर होतो. पुलाच्या मध्यभागी आम्ही गाडी लावलेली होती. आमचे डोके ते बघूनच पूर्ण बधिर झाले होते.
आजूबाजूला दहा पंधरा लोक जमले होते.
"पोरांचे नशीब बलवत्तर म्हणून यांचा जीव वाचला, काल अगदी अमावस्येलाच हे तिच्या फेऱ्यात अडकले होते" आजूबाजूला कुजबुज आम्हाला ऐकायला येत होती.
क्रमशः....
लेखक~रुद्रदमन
छान. पुढील भागाच्या
छान. पुढील भागाच्या प्रतिक्षेत
@मनिम्याऊ
@मनिम्याऊ
सर्व 5 भाग पोस्ट केलेले आहेत