![Sequoia](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2024/08/13/Screen%20Shot%202024-08-13%20at%206.20.47%20PM.png)
जवळपास २०-२५ लोकांचं भोवती रिंगण होईल एवढं मोठं खोड असलेल्या महाकाय वृक्षांच्या वनात फिरायला चला !
मागच्या महिन्यात योसेमिटे नॅशनल पार्कला जोडून आठवडाभर जंगल भ्रमंतीचा बेत आखलेला. जिथे फोनला सिग्नलही मिळणार नाही अशा वळणावळणाच्या डोंगराळ भागात, झाडं, झुडुपं, वेली, खळाळतं पाणी अशा निसर्गात दिवसाचे १२-१४ तास मनमुराद भटकंती.
असं म्हटलं जातं की १८५२ च्या सुमारास ऑगस्टस डाऊड नावाच्या एका शिकाऱ्यास अस्वलाचा पाठलाग करताना हे महाकाय सिकोईया वृक्ष दृष्टोपत्तीस पडले. उत्तर अमेरिकेतल्या आदिवासी जमातीला शेकडो वर्षे परिचयाचे असलेले हे वृक्ष त्यानंतर जगाच्या बातम्यांमध्ये झळकले. लोकांना विश्वास बसावा म्हणून काही सिकोईया वृक्ष कापण्याचे अवघड उद्योग करून त्याच्या अजस्त्र खोडाचे जमिनीला समांतर छेद घेतलेले मोठाले लाकूड तुकडे जंगलातून वाहून आणून प्रदर्शनातून मांडले गेले.
सुमारे ३०० फूट उंच आणि ६०० टनहूनही अधिक वजनाचे पृथ्वीवर सर्वाधिक काळ जगणारे वृक्ष म्हणजे सिकोईया. यांची वाढ कधीही खुंटत नाही. गंमत म्हणजे अगदी टेकड्या डोंगर भागातही हे वृक्ष व्यवस्थित तग धरून राहतात कारण त्यांची मुळे ही खोडापासून १०० ते २०० फूट अशी लांबवर पसरतात आणि इतर सिकोईया वृक्षांच्या मुळांशी स्पर्धा न करता परस्पर गुंतून सहाय्यक बनतात. विस्तार आणि उंचीत न्यूयॉर्कच्या ‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’शी स्पर्धा करणारे हे सिकोईया वृक्ष म्हणजे एक नवलच आहे. आजरोजी पृथ्वीवर तीन हजारहून अधिक काळ जगणारी ही वृक्ष जमात आहे.
सिकोईयाच्या ढोल्यांमध्ये राहणाऱ्या खारी आणि अन्य वन्य प्राण्यांना पाहून या वृक्षांवर आपल्यालाही घर बांधून राहायला काय मजा येईल असा विचार आला. खरं म्हणजे अमेरिकेतल्या पर्यटन व्यवसायाला अनुसरून एखाद्या तरी सिकोईया वृक्षाशी लिफ्ट किंवा तरफा उभा करून वरपर्यंत जायची सोय का केलेली नाही हा प्रश्न पडला. मागच्या काही दशकात वणव्याच्या समस्येने अनेक सिकोईया भस्मसात केलेले आहेत ही माहिती वाचतानाच अनेक वृक्षांना या आगीची झळ लागलेली असल्याच्या खुणाही दिसल्या. खरं म्हणजे सिकोईया वृक्षाचे तांबडट, चॉकलेटी रंगाचे खोड बाहेरून तंतुमय असल्याने एका आगीत पटकन जळत नाही, उलटपक्षी ते संरक्षक ठरते. दरवर्षीच्या वाढत्या घेराने अन्य संसर्ग, किडीपासूनही ते सुरक्षित राहते तरी या वृक्षांची जपणूक आणि संवर्धन करणे आवश्यक आहे.
जनरल शर्मन, जनरल ग्रॅण्ट, ग्रिझिली जायंट, सेंटिनेल अशा अनेक पुराणवृक्षांना तिथे जमिनीवर कुंपण लावून संरक्षण दिले गेले आहे जेणेकरून पर्यटक फार जवळ जाऊन जाणते-अजाणतेपणी या वृक्षसंपदेस कोणताही धोका पोहोचवू नयेत यासाठी. शिवाय काही कारणाने हे वृक्ष पडण्याची आपदा उगवल्यास प्राणहानीची शक्यता निर्माण होऊ शकते ते टाळणेही तितकेच गरजेचे आहे. अनेक वृक्षांपाशी त्यांच्या काही अवाढव्य विस्ताराच्या फांद्या खाली पडलेल्या दिसत होत्याच. या अक्राळविक्राळ खोडांमधून एकावेळी दोन गाड्या जातील असे कोरलेले बोगदे मात्र अफलातून होते.
एकूण काय योसेमिटेचं मारिपोसा ग्रोव्ह आणि सिकोईया नॅशनल पार्कमध्ये फिरून परतताना छायाचित्रांखेरीज या वृक्षांची काय आठवण घेता येईल असं वाटलं आणि वृक्षांखाली पडलेली पाईनकोन सम दिसणारी सिकोईयाची अनेक फळे दिसली. बाहेरून हिरवी दिसणारी आणि मग वाळून तडकली की आतून अनेको ओटच्या आकाराच्या टपाटपा पडणाऱ्या बिया. या एवढ्याशा पंखवाल्या जिऱ्यासम दिसणाऱ्या बीमधून एवढी प्रचंड निर्मिती होणं ही खरंच निसर्गाची किमया. नवरा म्हणाला, “काय करणार आहात या बियांचं?” मी चटकन बोलून गेले… “बोन्साय!” सगळे खळखळून हसलो.
खरंच काय हरकत आहे, नाही का? साध्या साध्या झाडांचे करतोच की बोन्साय मग सिकोईयाने काय घोडे मारलेय? मात्र प्रयोगात चुकीने कुंडीच्या भोकातून या रोपाचे मूळ खाली गेलेच तर नजदिकच्या काही वर्षात आमच्या घराच्या जागीच टेक्सस सिकोईया स्मारक (मॉनुमेंट) उभं राहायचं ! मग घरच्याच सिकोईयावर ट्री हाऊस बांधायला कोणाची मनाई असेल?
~
सायली मोकाटे-जोग
https://sayalimokatejog.wordpress.com/2024/08/03/sequoia/
तीन हजारहून अधिक काळ जगणारी
तीन हजारहून अधिक काळ जगणारी ही वृक्ष जमात !!!!
नवीन माहिती. छान परिचय करून दिलात. आधी नाव वाचून जापानी वृक्ष असावा असे वाटले होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उत्तम माहितीपूर्ण लेख, फार
उत्तम माहितीपूर्ण लेख, फार आवडला
छान माहितीपूर्ण लेख.
छान माहितीपूर्ण लेख.
हि झाडे बघितली कि आपण किती
हि झाडे बघितली कि आपण किती खुजे आहोते जाणवते. योसेपिटी पेक्षाही सकोया नॅशनल पार्क मधे लोक कमी असल्यामूळे हे फिलिंग अधिकच येते.
मस्त परीचय.
मस्त परीचय.
अमेरीकेपेक्षा जास्त वयाचे आणि आकाराने जास्त मोठे सकोया चीनमध्ये आहेत अशी माहिती तिथेच मिळाली होती.
या वृक्षांवर आपल्यालाही घर बांधून राहायला काय मजा येईल असा विचार आला. >>> असं मात्र जराही वाटलं नाही. आधीच दुर्मिळ असलेले हे वृक्ष माणसाच्या हस्तक्षेपामुळे नामशेष होण्याची शक्यता अधिक. त्यांना आगीचे भय कमी असले तरी उंचीमुळे वीज पडण्याची भिती खूप जास्त असते. त्यामुळे त्यांची संख्या तशीही मर्यादितच असते.
हि झाडे बघितली कि आपण किती खुजे आहोते जाणवते. >>> अगदी. आम्ही गेलो होतो तेंव्हा एक झाड वीज पडल्यामुळे कोसळले होते. त्या आड्व्या पडलेल्या खोडाचा व्यास इतका होता की त्याच्यापुढे माणसे खुजी वाटत होती. उंचीपुढे तर कस्पटासमान वाटतात माणसे.
योगायोग म्हणजे, मागच्या
योगायोग म्हणजे, मागच्या महिन्यात आम्हीही योसेमिटीतच होतो. हा घ्या तेव्हाचा एक सिकोया चा फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
छान लिहिलंय. याबद्दल काही
छान लिहिलंय. याबद्दल काही माहिती नव्हतं.
मस्त परीचय.
मस्त परीचय.
छान
छान
उत्तम माहितीपूर्ण लेख.
उत्तम माहितीपूर्ण लेख.
सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद
सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!