दिठी

Submitted by अस्मिता. on 8 August, 2024 - 23:33

दिठी बघितला. कदाचित स्पॉयलर्स असतील.

अनेक दिवसांपासून बघायचा ठरवून त्याला शांतचित्ताने पाहायचे ठरवल्याने राहून जात होते.

किशोर कदम, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, अमृता सुभाष, उत्तरा बावकर, ओमकार पटवर्धन

किशोर कदमचाच(रामजी) चित्रपट आहे हा, बाकी सर्वांनी त्याच्या भूमिकेला न्याय मिळावा म्हणून आपापले काम चोख करूनही ते रूंजी घातल्यासारखे वाटत राहते. आपल्यापैकीच कुणातरी कलाकराचा अभिनय पूर्ण ताकदीने बाहेर पडावा म्हणून इतर कलाकरांनी एक पाऊल कुठेतरी मागे घेणं, तेवढा विश्वास दाखवणं फार सुंदर वाटतं. सुरेखशा जुगलबंदीत ह्याची क्वचित अनुभूती येते. सुरवातीपासून कोसळणारा सततधार पाऊस व मळभ आणि वारीला निघालेले तिघे चौघे. सगळेच विठूभोळे, कर्ताकरविता तोच आहे समजून कष्टात आयुष्य वेचणारे. अशाच प्रलयासारख्या कोसळणाऱ्या पावसाने नदीला आलेल्या पुरात रामजीच्या मुलाचा अघटीत मृत्यू होतो. ह्या पावसात विषण्णतेची छाया आहे. तुंबाड मधल्या पाऊस भयप्रद ताण देणारा होता, इथला विमनस्क करणारा वाटत राहतो. आपली त्याच्याशी नाळ जुळली की आपणही निरभ्र होण्याची वाट बघत रामजीचा तणाव सोसायला लागतो.

एरवी सर्वांचे सांत्वन करून दुःखभार हलका करणारा रामजी स्वतःच डोंगराएवढ्या शोकापुढे स्वतःला गमावून बसतो. सगळा चित्रपट हा तो ह्या अपत्यशोकाचा स्विकार कसा करतो( किंवा क्लोजर कसे मिळवतो) यावरच आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला वारीनिमित्त तीस वर्षे जाऊनही 'तो' आपल्यासोबत असे कसे करू शकतो, मग ते सगळे निरर्थक होते का, पुत्राला गती मिळाली असेल का, गती म्हणजे नेमके काय, ज्ञानअज्ञान, द्वैतअद्वैतभाव म्हणजे काय. ज्ञानेश्वरी लोक शेकडो वर्षांपासून वाचतात त्यात प्रत्येकाला आपापले उत्तर कसे मिळू शकते? असे अनेक प्रश्न त्याला आणि त्याचे जीवलग असलेले मोहन आगाशे, गिरीश कुलकर्णी व दिलीप प्रभावळकर यांना पडतात. रामजी विमनस्क अवस्थेत असताना जे काही हताशपणे बोलतो , त्यावरून त्याला नक्की किती यातना होत असतील याचे निरीक्षणातून अंदाज बांधत असतात. जणू यातून प्रेक्षकांचे प्रश्नच ऐरणीवर घेतले आहेत. मुलगा जाताच सून बाळंतीन होऊन नात झाल्याने रामजीला त्या नातीचा व सुनेचा आत्यंतिक राग येऊन त्यांना घर सोडून निघून जायची धमकी दिलेली असती. नात होऊन मुलगा आधीच गेल्याने झाल्याने असाही कुळाचा निर्वंश झाल्याची चर्चा होते.

गावातील एक पूर्ण वेळ भरलेली गायही सुरवातीपासून प्रसववेदनेने कण्हत हंबरत असते, आपल्यालाही ह्या दोघांची आता सुटका व्हावी असे वाटायला लागते. हा पोथीला शून्यात नजर लावून बसलेला असतो, जीवाचा कोंडमारा शिगेस पोचलेला असताना गाईची सुटका करण्यासाठी आलेले बोलावणे त्याला अव्हेरता येत नाही. कोसळत्या पावसात तो जुजबी सामान घेऊन तातडीने जातो. गाईला आडोसा करून धीर देत पाठीवर मायेने हात फिरवत तिची व पर्यायाने स्वतःची वेणांपासून सुटका करतो. हे दृष्य अतिशय भिडणारे व नितांत सुंदर उतरले आहे. वासरू जन्मताक्षणी जन्ममरण व त्यातील यातना यांचा स्विकार त्याला जमतो. अचानक उजाडते व पाऊस थांबून सगळे मळभ दूर होऊन कोवळे ऊन पडून फुलं डोलायला लागतात, हिरवी तृणे रसरसून वाऱ्यावर डोलतात. घरी परत येऊन तो मोठ्यामनाने सुनेची क्षमा मागून तिला घर सोडण्यापासून परावृत्त करतो, नातीचा मोठ्या मनाने स्विकार करतो.

अर्धवट राहिलेली पोथी पूर्ण करायला जातो व 'आमोद सुनांसि आले' ( 'द्वैतअद्वैत' हा आपपरभाव जाऊन सुगंध आणि नाक हे एकच असण्याची उत्कट अनुभूती आली.) ऐकताच भडभडून रडून घेतो व मोकळा होता.

चित्रपट अतिशय सुंदर आहे, आवर्जून बघावा असा. पावसाने कुंद झालेले वातावरण, पिवळसर प्रकाश, काही कृष्णधवल स्मृती , दिवटीच्या प्रकाशातल्या ओसऱ्या, पडवी, माळवदे सर्वच प्रकाशचित्रण अप्रतिम आहे. अभिनय, गाणी, अभंग सगळंच अतिशय उत्तम झालेले आहे.
©अस्मिता
https://www.maayboli.com/node/85328?page=16
बाकीची चर्चा येथे वाचता येईल. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेस्ट. तुला हवं तर तिकडचे सगळे प्रतिसाद कॉपी करून त्याचा एक प्रतिसाद कर इथे. सोपं जाईल वाचणार्‍यांना.

उत्तम केलंत.
मी नवा प्रतिसाद देतो.
चित्रपटाचं नाव दिठी का आहे?

दिठी म्हणजे दृष्टी /दृष्टिकोन, त्याला आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला या अर्थाने. कारण seeing हा शब्द चित्रपट चालू झाल्यावर दिठीच्या खालोखाल लिहिलेला होता.

भरत, तुमची 'मीवापु' वरील चर्चेची लिंक देता येईल का?

सर्वांना विनंती. जमले तर तिकडचे तुमचे प्रतिसाद इकडे चिकटवावेत. धन्यवाद. Happy
नवी भरही घालावी.

अतिशय तरल व सुंदर रसग्रहण. चित्रपट पाहिलेला नाही पण परीक्षण वाचून पाहिल्यासारखेच वाटत आहे. श्रद्धेशी निगडीत गोष्टी ह्रदयाच्या कानाने ऐकाव्यात मगच भिडतात. बुद्धीच्या कानाने ऐकल्यास निरर्थक वाटतील. रामजीने निवडलेला मार्ग, त्याच्या (आणि इतरांच्या) धारणा, मग त्या मार्गाद्वारे आयुष्यात घडलेल्या घटनांमागचा कार्यकारणभाव शोधण्याचा केलेला निश्फळ प्रयत्न, त्यातून आलेली अगतिकता, आणि मग त्याच मार्गातून मिळालेलं उत्तर हा सारा प्रवास पडद्यावर पाहणे... नक्कीच मनात साठून राहणारा चित्रपट. अद्वैतवाद इतक्या सुलभ रीतीने मांडून श्रद्धाळूना त्यांच्या मार्गात 'दिठी' देणारी कथा, त्यावरचा चित्रपट आणि त्याचे तुम्ही लिहिलेले परीक्षण हे सारेच सुंदर आहे. हे परीक्षण मा. मोहन आगाशे यांच्यापर्यंत पोहोचले यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत.

हे छान केलंस.

अतिशय हृदयस्पर्शी लिहिलं आहेस.

रसग्रहण छान लिहिलं आहे.
चित्रपट बघितलाय. सगळ्यांचे अभिनय आवडले होते, पण चित्रपट मला इतका उत्कट नव्हता वाटला खरं म्हणजे. अर्थात 'सुमित्रा भावे' हे स्टँडर्ड डोक्यात असल्यामुळे माझ्या अपेक्षा कदाचित जास्त होत्या.

खुप छान लिहिलं आहेस.
वावे, बरं झालं इथे लिहिलंस , आता बघणार नाही. हे चित्र च राहू दे मनात.

हृदय, तरल आणि मनाला खोल कुठेतरी भिडणारं लिहिलं आहेस अस्मिता.
छान हा शब्द फिका आहे खरंच

एकदम तरल , उत्कट आणि सुंदर लिहिले आहे.
चित्रपट नक्की बघणार.
आमोद सुनासी आले चर्चा आठवली.

हृदयाला स्पर्श करून गेलेलं काही अतिशय उत्तमप्रकारे शब्दात मांडता येण्याची कला भरभरुन आहे.
लिहीत रहा. Happy

चित्रपट आवर्जून बघा लोकहो. उत्कृष्ट आणि निर्दोष कलाकृती आहे. काहीतरी आरस्पानी बघितल्याचे समाधान मिळाले.
धन्यवाद सर्वांना. Happy

मला सगळ्याच कलाकृती/ भावभावना इतरांच्या मानाने जास्त भिडतात, जास्त जाणवतात, जास्त पोचतात आणि त्या जशा भिडल्या-पोचल्या तशा शब्दांत मांडताही येतात. त्यात तरल आणि उत्कट लेखन हा 'आपला' प्रांत वाटतो.‌

चिनूक्स यांचे अनेक आभार. /\ तुम्हाला माझा मजकूर भावला म्हणजे काहीतरी योग्यच लिहिले असेल. आपल्या दृष्टीने आपण योग्यच लिहीत असतो पण जे या निर्मितीचा भाग आहेत त्यांच्याकडून पोच येणे ही दादच वेगळी.

रामजीला सर्व जन्म मरण सायकल चे ज्ञान एकदम एका क्षणात होते ते क्रिस्चन धर्मात एपिफनी नावाचा प्रकार आहे त्या लेव्हल चे आहे.
>>> एपिफनीवर माझा विश्वास नाही. बघताना त्या एका क्षणात वठवलेला साक्षात्कार हा जन्मभराच्या चिंतनमननातून आलेला असू शकतो. एखाद्या माणसाला माहिती असते पण अनुभव आल्याखेरीज ती माहिती ज्ञान होत नाही. आत्मज्ञान तर मुळीच नाही. माहितगार भरपूर सापडतात, त्याने प्रभावित होऊ नये... ज्ञानी विरळा असतो. Information and knowledge यांत फरक आहे. विठ्ठलाचा ध्यास घेतल्याप्रमाणे हाही आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचायचाच पण अर्थ मात्र अपत्यशोकानंतर उमजला.

नात झाली म्हणजे वंश संपला हे अगदी रिग्रेसिव्ह विचार आहे. >>>> हो, आहेतच. आवर्जून लिहिले आहे ते त्यामुळेच. सगळा समाजच त्यावर पोसला आहे आपला. पण इथे पितृसत्ताक पद्धती विरोधात तलवार काढाविशी वाटली नाही कारण ही वाक्यं इतरांच्या तोंडून आलेली आहेत. प्रत्येकाचे या घटनेबद्दलचे पर्सेप्शेन वेगवेगळे दाखवले आहे. त्याच्या मनात काय होते हे कळत नाही, शिवाय मुलाच्या निधनाआधी सुनेशी नाते कसे होते हेही स्पष्टपणे दाखिवलेले नाही. आता या आयुष्यातील सर्वात निराश क्षणांमधे त्याला 'जज' करणे किंवा त्यावरून त्याची जडणघडण ठरवणे अयोग्य वाटते. म्हणून त्याबाबत काही लिहिले नाही.

------------
तिकडचा माझाच प्रतिसाद येथे जोडतेय.

सुंदर लिहिलयं! मला बघायचा आहे हा चित्रपट.
मूळ दि. बा. मोकाशींच्या कथेत रामजीचा तरुण मुलगा जातो पण सून, नात होणे वगैरे उल्लेख नाहीयेत, बरोबर ना? की माझा गोंधळ होतोय. कारण बरीच वर्षे (१५+ ?) उलटलीत मी ही कथा वाचल्याला.

https://www.maayboli.com/node/78907
चिनूक्स यांचा लेख

रमडची लिंक असलेली पोस्ट
खूप छान लिहीलं आहेस, अस्मिता. नेहमीप्रमाणेच शब्दांची उत्तम निवड.

२०१५ च्या बीएमेम मधे 'आमोद सुनासी' कथा जितू जोशीने वाचली होती त्याचं एका मिनीटाचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. गंमत म्हणून इथे लिंक डकवते आहे - https://www.youtube.com/watch?v=bm5GQrPP0HE

मलाही खूप दिवसांपासून हा बघायचा होता. तू आयपीटीव्हीवर आलाय लिहिलंस आणि लगेच काल सुरू केला पण मला सुरूवातीचे बरेचसे डायलॉग्स नीटसे ऐकू आले नाहीत. माहित नाही ऑडीओ प्रॉब्लेम आहे की आणखी काही. पण हा निवांत बघायला हवा सिनेमा. सतत काहीतरी प्रश्न विचारणारे, काहीतरी कमेंट्स करणारे लोकं नको मला आजूबाजूला. जेव्हा शक्यतो मी एकटी असेन तेव्हा बघते.

तूच म्हटल्याप्रमाणे तुझ्या पॅशनच्या विषयाशी निगडीत विषय आहे, त्यामुळे एका पॉईंट्ला तू लेखक दिग्दर्शकापेक्शाही वेगळी होऊन तुला जे वाटतंय ते जे लिहीलं आहेस ते तरल आहे. सिनेमा आवडणं ,इतका भिडणं, होईल; न होईल.. तुझं चिंतन आवडलं..

सुंदर रसग्रहण आहे.
विषय अध्यात्माकडे झुकणारा असल्याने भरभरून लिहीले गेलेले आहे. प्रकाशयोजना, पाऊस वगैरे छान टिपलंय.
आनंद देणारं लिखाण.
सिनेमा असाच असावा अशी अपेक्षा.

छान लिहीले आहेस अस्मिता!

माधव यांची (इथली) पोस्ट समजली पण मला असे वाटते की रामजी सध्याच्या लिबरल व्याख्येनुसार सगळे चेकमार्क्स चेक करणारा असायची गरज नाही. नातू/नात बद्दल त्याला जे वाटते ते चुकीचे असले तरी बर्‍यापैकी प्रातिनिधिक आहे. वास्तविक अशा व्यक्तीचे मत नंतर बदललेले दाखवण्याचा जास्त सकारात्मक परिणाम होईल.

* इथे "लिबरल" म्हणजे राजकीय बाफवर लिहीतात त्या लोकांबद्दल नाही. एकूण विचारस्वातंत्र्य/व्यक्तीस्वातंत्र्य/आधुनिक विचार वाले. चांगल्या अर्थाने.

रामजी सध्याच्या लिबरल व्याख्येनुसार सगळे चेकमार्क्स चेक करणारा असायची गरज नाही >>> लिबरल असायची जराही गरज नाहीये. पण तो सुजाण आहे - त्याच्या सुजाण असण्यावरच कथेचा डोलारा उभा आहे. तो जी ज्ञानेश्वरी वाचतो ती त्याच्यात थोडी झिरपली आहे. पण आता एक अतिशय कठीण धडा शिकायची वेळ त्याच्यावर आली आहे. 'वासांसि जीर्णानि' हे त्याने वाचलय ते आता आत्मसात करायची वेळ आली आहे. आजपर्यंत त्याचे अंडरग्रॅड चालू होते (त्या कोर्समध्ये ओल्या बाळंतिणीला घराबाहेर काढणे अतिशय चूक आहे हे शिकलवले जाते) आता पोस्ट ग्रॅज्युएशनची वेळ झाली आहे.

नातू/नात बद्दल त्याला जे वाटते ते चुकीचे असले तरी बर्‍यापैकी प्रातिनिधिक आहे. वास्तविक अशा व्यक्तीचे मत नंतर बदललेले दाखवण्याचा जास्त सकारात्मक परिणाम होईल. >>> नक्कीच होइल. पण हा सिनेमा सामाजिक नाहीये आणि प्रत्येक सिनेमा सकारात्मक असायची गरजही नाहीये. एका पाषाणहृदयी, रुढ्यांध सासर्‍याचे झालेले मतपरीवर्तन असा काही चित्रपट नाहीये हा.

रामजीला मुलाच्या मृत्युचा स्विकार करता येत नाहीये. परिस्थितीने त्याला आगतिक केलं आहे. मी रोज ज्ञानेश्वरी वाचत होतो, पापभिरु होतो पण तरी माझा मुलगा गेला म्हणून त्याचा ज्ञानेश्वरीवरही राग आहे. तो पारायणाला पण जात नाहीये. काहीही करून त्याला मुलगा परत यायला हवाय - पण तो येत नाहीये. त्यामुळे तो स्वतःवर, परिस्थितीवर चिडलाय, हतबल झालय. असा रामजी ज्ञानेश्वरीतली पुढची पायरी कशी गाठतो, मुलाच्या मृत्युचा स्विकार कसा करतो ते चित्रपट सांगतो.

वंश खुंटला म्हणून सुनेला घराबाहेर काढण्याइतक्या क्षुद्र विचारसरणीचा रामजी असता तर चित्रपटाची सगळी परिमाणेच बदलली असती. मग 'दिठी' जितका आवडला तितका आवडला नसता, त्याचं शिर्षकही दृष्टी चाललं असतं.

मी आधी या चित्रपटाविषयी लिहिले होते. अनेक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर या कथेवर एक भाग सादर झाला होता. नाव, कलाकार आठवत नाहीत पण अप्रतीम होता. त्यामुळे मी ही कथा मिळवून वाचली.
चित्रपटात काहीतरी सारखं राहून गेलं आहे असं वाटत होतं. सुनेला घराबाहेर काढण्याचा उल्लेख कथेत नाही तो पूर्णपणे अनावश्यक वाटला. मूळ कथा चित्रपटात बसवण्यासाठी पाणी घालून वाढवली आहे असं वाटत राहिलं. किशोर कदम भूमिका जगला आहे पण बाकीचे सर्व कलाकार हे ते कलाकारच वाटतात. कोणी नवीन, अनोळखी चेहरे घेतले असते तर जास्त परिणाम साधला असता.

Pages