दिठी

Submitted by अस्मिता. on 8 August, 2024 - 23:33

दिठी बघितला. कदाचित स्पॉयलर्स असतील.

अनेक दिवसांपासून बघायचा ठरवून त्याला शांतचित्ताने पाहायचे ठरवल्याने राहून जात होते.

किशोर कदम, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, अमृता सुभाष, उत्तरा बावकर, ओमकार पटवर्धन

किशोर कदमचाच(रामजी) चित्रपट आहे हा, बाकी सर्वांनी त्याच्या भूमिकेला न्याय मिळावा म्हणून आपापले काम चोख करूनही ते रूंजी घातल्यासारखे वाटत राहते. आपल्यापैकीच कुणातरी कलाकराचा अभिनय पूर्ण ताकदीने बाहेर पडावा म्हणून इतर कलाकरांनी एक पाऊल कुठेतरी मागे घेणं, तेवढा विश्वास दाखवणं फार सुंदर वाटतं. सुरेखशा जुगलबंदीत ह्याची क्वचित अनुभूती येते. सुरवातीपासून कोसळणारा सततधार पाऊस व मळभ आणि वारीला निघालेले तिघे चौघे. सगळेच विठूभोळे, कर्ताकरविता तोच आहे समजून कष्टात आयुष्य वेचणारे. अशाच प्रलयासारख्या कोसळणाऱ्या पावसाने नदीला आलेल्या पुरात रामजीच्या मुलाचा अघटीत मृत्यू होतो. ह्या पावसात विषण्णतेची छाया आहे. तुंबाड मधल्या पाऊस भयप्रद ताण देणारा होता, इथला विमनस्क करणारा वाटत राहतो. आपली त्याच्याशी नाळ जुळली की आपणही निरभ्र होण्याची वाट बघत रामजीचा तणाव सोसायला लागतो.

एरवी सर्वांचे सांत्वन करून दुःखभार हलका करणारा रामजी स्वतःच डोंगराएवढ्या शोकापुढे स्वतःला गमावून बसतो. सगळा चित्रपट हा तो ह्या अपत्यशोकाचा स्विकार कसा करतो( किंवा क्लोजर कसे मिळवतो) यावरच आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला वारीनिमित्त तीस वर्षे जाऊनही 'तो' आपल्यासोबत असे कसे करू शकतो, मग ते सगळे निरर्थक होते का, पुत्राला गती मिळाली असेल का, गती म्हणजे नेमके काय, ज्ञानअज्ञान, द्वैतअद्वैतभाव म्हणजे काय. ज्ञानेश्वरी लोक शेकडो वर्षांपासून वाचतात त्यात प्रत्येकाला आपापले उत्तर कसे मिळू शकते? असे अनेक प्रश्न त्याला आणि त्याचे जीवलग असलेले मोहन आगाशे, गिरीश कुलकर्णी व दिलीप प्रभावळकर यांना पडतात. रामजी विमनस्क अवस्थेत असताना जे काही हताशपणे बोलतो , त्यावरून त्याला नक्की किती यातना होत असतील याचे निरीक्षणातून अंदाज बांधत असतात. जणू यातून प्रेक्षकांचे प्रश्नच ऐरणीवर घेतले आहेत. मुलगा जाताच सून बाळंतीन होऊन नात झाल्याने रामजीला त्या नातीचा व सुनेचा आत्यंतिक राग येऊन त्यांना घर सोडून निघून जायची धमकी दिलेली असती. नात होऊन मुलगा आधीच गेल्याने झाल्याने असाही कुळाचा निर्वंश झाल्याची चर्चा होते.

गावातील एक पूर्ण वेळ भरलेली गायही सुरवातीपासून प्रसववेदनेने कण्हत हंबरत असते, आपल्यालाही ह्या दोघांची आता सुटका व्हावी असे वाटायला लागते. हा पोथीला शून्यात नजर लावून बसलेला असतो, जीवाचा कोंडमारा शिगेस पोचलेला असताना गाईची सुटका करण्यासाठी आलेले बोलावणे त्याला अव्हेरता येत नाही. कोसळत्या पावसात तो जुजबी सामान घेऊन तातडीने जातो. गाईला आडोसा करून धीर देत पाठीवर मायेने हात फिरवत तिची व पर्यायाने स्वतःची वेणांपासून सुटका करतो. हे दृष्य अतिशय भिडणारे व नितांत सुंदर उतरले आहे. वासरू जन्मताक्षणी जन्ममरण व त्यातील यातना यांचा स्विकार त्याला जमतो. अचानक उजाडते व पाऊस थांबून सगळे मळभ दूर होऊन कोवळे ऊन पडून फुलं डोलायला लागतात, हिरवी तृणे रसरसून वाऱ्यावर डोलतात. घरी परत येऊन तो मोठ्यामनाने सुनेची क्षमा मागून तिला घर सोडण्यापासून परावृत्त करतो, नातीचा मोठ्या मनाने स्विकार करतो.

अर्धवट राहिलेली पोथी पूर्ण करायला जातो व 'आमोद सुनांसि आले' ( 'द्वैतअद्वैत' हा आपपरभाव जाऊन सुगंध आणि नाक हे एकच असण्याची उत्कट अनुभूती आली.) ऐकताच भडभडून रडून घेतो व मोकळा होता.

चित्रपट अतिशय सुंदर आहे, आवर्जून बघावा असा. पावसाने कुंद झालेले वातावरण, पिवळसर प्रकाश, काही कृष्णधवल स्मृती , दिवटीच्या प्रकाशातल्या ओसऱ्या, पडवी, माळवदे सर्वच प्रकाशचित्रण अप्रतिम आहे. अभिनय, गाणी, अभंग सगळंच अतिशय उत्तम झालेले आहे.
©अस्मिता
https://www.maayboli.com/node/85328?page=16
बाकीची चर्चा येथे वाचता येईल. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy चीकू, मी ती कथा वाचलेली नाही. चित्रपट मला एक स्वतंत्र कलाकृती म्हणून भावला आहे. त्यातली एकही गोष्ट ( अमृता सुभाषला स्वप्नात महादेव-पार्वती मोती देतात तेवढी सोडून, तिही एका भोळसट, खेडवळ, गरीब बाईचे दिवास्वप्न म्हणून गोडच वाटली. फक्त कथेशी संलग्न नाही वाटली. ) अनावश्यक वाटलेली नाही. कथानकातील सगळे छोटेछोटे धागे कुठेतरी रामजीच्या क्लोजरशीच जोडलेले वाटले. चित्रपट फक्त एक तास तेवीस मिनिटांचा आहे. त्यामुळे लांबल्यासारखा वाटला नाही. उलट तेवढ्याच काळात सुद्धा रामजीचा घालमेल असह्य होते. कदाचित माझ्या मनात तुलना करायला काहीच नव्हते. कोरी पाटी होती म्हणून असेल. ज्यांनी कथा वाचलेली आहे व चित्रपटही पाहिलेला आहे ते यावर मत देऊ शकतील.

मला बघायचा आहे हा चित्रपट.
मूळ दि. बा. मोकाशींच्या कथेत रामजीचा तरुण मुलगा जातो पण सून, नात होणे वगैरे उल्लेख नाहीयेत, बरोबर ना? की माझा गोंधळ होतोय.
>>>>>
स्वातीताई, तुम्हाला आठवतेय ते बरोबर होते असे दिसतेय.

चित्रपट कसा वाटला या धाग्यावरील पोस्टवर व येथेही आवर्जून अभिप्राय देणाऱ्या सर्वांचे आभार. Happy

अरे वा! ह्यावर चित्रपट आहे होय! मी दि बा मोकाशींची 'आता आमोद सुनांसि आले' ही कथा ऑडिओ ऐकली होती आणि फार आवडली होती. वरती धाग्यात पटकथा वाचता वाचता तीच कथा आहे की काय असं सारखं डोक्यात येत होतं. शेवटी अडलेल्या गायीच्या गोष्टीचा भाग आणि 'आमोद सुनांसि' वाचून खात्री पटली. बघायलाच हवा.

अनेक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर या कथेवर एक भाग सादर झाला होता. नाव, कलाकार आठवत नाहीत पण अप्रतीम होता. .....
होय.आमोद सुनांसी आले याच नावाने आला होता. रामजीची भूमिका मोहनदास सुखठणकर यांनी केली होती.फार सुरेख होता तो भाग.

Pages