"शनिवार माझा आवडीचा….आवडीचा.... आवडीचा... " हे गाणं मी नेहमीच आळवते. सुट्टीचा दिवस हे प्रमुख कारण असलं तरी बाकीची कारणं पण (तितकीच, किंबहुना जास्तच) महत्वाची आहेत.
पहिलं कारण म्हणजे म्हणजे खूप झोपता येतं. सकाळी उठून रोजच्याप्रमाणे leave balance स्तोत्राची उजळणी करून आजही ऑफिसला जावं लागणार असा विचार करत कडवट तोंडाने उठण्याची गरज नसते. दुसरं कारण म्हणजे त्या दिवशी समस्त कुटुंबाला उपास असतो! साबुदाणा खिचडी करायला १५ मिनिटे खूप झाली. २ वाजेपर्यंत मस्त timepass करता येतो. २ वाजता दुसऱ्या भुकेची वेळ होते हे सांगायला नकोच!
पण ह्या वेळेस नेहमीच्या ठराविक दिनक्रमात बदल झाला. अस्मादिक साबुदाणा भिजत घालण्यास विसरले. इन्स्टंट साबुदाणे असतात, पण त्याची चव आवडत नसल्याने तो प्रकार रद्द ठरवण्यात आला. वरई आवडत नाही असे शिक्कामोर्तब बहुमताने झाले. मीच एकटी विनातक्रार वरई खाणारी पण अल्पमतामुळे काही चालले नाही. मग सकाळी सकाळी(९ वाजता हो) थालीपीठे करण्याची वेळ येऊन ठेपली. घरात राजगिऱ्याचे पीठ आणि उपासाची इतर मिश्र पीठे उपलब्ध होतीच. ती शोधण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम उरकला. हे प्रकरण जड जाणार असे अस्मादिकांना दिसू लागले होते. पण अहो आश्चर्यम! इतर स्वयंपाकाचा अनुभव असल्यामुळे आणि नशिबाने साथ (non-stick pan)दिल्यामुळे हा थालिपीठांचा development आणि testing कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
नमनाला घडाभर तेल ओतून झाले आहे. तर वाचकहो, किल्ली आज आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर शनिवारच्या ह्या(tried and tested) थालिपीठांची कृती सहर्ष सादर करत आहे.
साहित्य :
१. उपासाची पीठे/उपास भाजणी ह्या शीर्षकाने मिरवणारे दुकानात जे काही मिळेल ते घेऊन यावे. त्यात प्रामुख्याने राजगिरा, वरई, साबुदाणा, शिंगाडा ह्या पीठांचा समावेश असतो. बऱ्याचदा तयार भाजणीमध्ये मीठ, लाल तिखट, जिरे हे सुद्धा असतं. ते काय काय आहे ते पाहावं.
अस्मादिकांकडे राजगिरा पीठ होतं. वरई आणि साबुदाणा भाजून त्याला मिक्सिमध्ये फिरवलं. (साधारण किती थालीपीठे करायची आहेत त्यानुसार प्रमाण कमीजास्त करावे)
२. भाजलेल्या दाण्यांचा कूट
३. बारीक चिरून किंवा ठेचून, हिरव्या मिरच्या , चवीप्रमाणे किंवा लाल तिखट(इच्छेनुसार)
४. जिरे, चिमूटभर
५. तुम्हाला उपासाला चालत असेल तर कोथिम्बिर, बारीक चिरून (मी नव्हती टाकली)
६. सैंधव मीठ/ शेंदेलोण चवीनुसार
७. १/२ लहान बटाटे बारीक किसून
८. तूप
९. पाणी
कृती:
अंदाजे ४ थालीपीठे होतील इतपत पीठ मिक्स करून एका टोपात किंवा परातीत घ्यावे. त्यात इतर सर्व साहित्य घालून व्यवस्थित मिक्स करावे.
अंदाजे थोडे थोडे पाणी घालत थापता येतील अशा consistency मध्ये मळून घ्यावे. त्याचे प्रत्येक थालीपीठासाठी एक असा गोळा करवून घ्यावा. हातानेच चापट करत गोलाकार बनवावा. तव्याला (नॉन स्टिक पॅन असेल तर उत्तम ) थोडेसे तूप लावून घ्यावे. त्यावर हा पिठाचा गोळा गोलाकार थापत जावा. थापाने ही क्रिया मी डायरेक्ट पॅनवरच करते, खूप जण प्लास्टिक पेपरवर थापून नंतर पॅन मध्ये टाकतात. तसंही चालेल. थालीपीठ लावल्यानंतर त्याला ५-६ छिद्रे पाडून घ्यावी आणि त्यात थोडेसे तूप सोडावे.
झाकण ठेवावे आणि छान उलटसुलट परतून खमंग लालसर रंग येईपर्यंत भाजावे.
ही थालीपीठे ताजे घट्ट दह्याबरोबर खावी, अप्रतिम सुख देतात जिव्हेला!
ही झाली माझी कृती!!
तुम्हाला कोणाला आणखीन काही माहित असेल तर सांगावे. नक्की करून पाहीन, पुढच्या शनिवारी !
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
-------------------------------------------------------------------------------------------------------
वरई नै आवडत पण ही नवीन
वरई नै आवडत पण ही नवीन कोहळ्याची थालीपीठे जमतील असे वाटते आहे. वड्यांपेक्षा कमी फॅट्स म्हणजे घरचे डाएटिशिअन कडाडून हरकत घेणार नाहीत
BTW उपास-तापास करण्याची खरी मजा महाराष्ट्रातच, उपासाच्या पदार्थांचे जबरदस्त वैविध्य आहे आपल्याकडे.
जरूर प्रयत्न करा. खुसखुशीत
जरूर प्रयत्न करा. खुसखुशीत होतात
छान. सर्व डिश मस्त.
छान. सर्व डिश मस्त.
धन्यवाद
धन्यवाद
Pages