शब्दावाचून संवाद साधणारे व्यंग्यचित्रकार - श्री. शि. द. फडणीस
शिवराम दत्तात्रय फडणीस, म्हणजे शि. द. फडणीस यांची व्यंग्यचित्रं बघत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. दिवाळी अंकांची मुखपृष्ठं, पुलं, चिंवी यांसारख्या लेखकांची अप्रतिम पुस्तकं, शालेय पाठ्यपुस्तकं यांतून शिदंची चित्रं घराघरांत पोहोचली. अनेकांना व्यंग्यचित्रांनी आकर्षून घेतलं ते शिदंच्या चित्रांमुळे. रोजच्या जगण्यातली विसंगती टिपणारे प्रसंग, निर्विष विनोद ही त्यांच्या चित्रांची बलस्थानं. व्यंग्यचित्रं ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज शिदंच्या चित्रांनी खोटे ठरवले.
'हसरी गॅलरी', 'चित्रहास', 'चिमुकली गॅलरी' या प्रदर्शनांद्वारे शिदंनी महाराष्ट्रातल्या गावोगावी चित्रकलेचे प्राथमिक धडे दिले. व्यंग्यचित्र म्हणजे काय, या कलेचं मर्मस्थान काय, हे शिदंनी महाराष्ट्राला शिकवलं. शिदंची चित्रं भारताबाहेरही लोकप्रिय झाली. जर्मनी, इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरली होती. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट्सनं त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला.
२०१२ साली 'रेषाटन - आठवणींचा प्रवास' हे शिदंचं आत्मचरित्र ज्योत्स्ना प्रकाशनाने प्रसिद्ध केलं. यावर्षी शिदंचं 'फडणीस गॅलरी - जर्नी ऑफ हिज कार्टून्स' हे अतिशय देखणं असं इंग्रजी पुस्तक ज्योत्स्ना प्रकाशनानेच प्रकाशित केलं आहे. ९ इंच x ११ इंच आकाराचं, १४४ पानांचं, आर्ट पेपरवर छापलेल्या या सुंदर पुस्तकातली बहुतेक सर्व व्यंग्यचित्रं रंगीत आहेत. काही तर त्रिमितीतही आहेत. पूर्वी अप्रकाशित अशी काही नवी व्यंग्यचित्रंही या पुस्तकात समाविष्ट केली आहेत.
'फडणीस गॅलरी - जर्नी ऑफ हिज कार्टून्स' या पुस्तकात शिदंच्या भनाट कलाकिर्दीचा आढावा घेतला आहे. शिदंच्या व्यंग्यचित्रांवर प्रेम करणार्या प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असणं आवश्यक आहे.
२०११ साली 'जत्रा'च्या दिवाळी अंकासाठी मी शिदंची मुलाखत घेतली होती. त्यांच्या भन्नाट कारकिर्दीतल्या अप्रतिम व्यंग्यचित्रांचा आढावा घेणारं पुस्तक प्रकाशित झाल्याच्या निमित्ताने ही मुलाखत मायबोलीवर प्रकाशित करतो आहे.
शिदंशी मारलेल्या या गप्पा...
शिदं, तुमचं बालपण कोल्हापुरात गेलं. चित्रकलेची आवड तुम्हाला लहानपणापासूनच होती का?
सगळ्या लहान मुलांना असते तशी, आणि तितकीच चित्रकलेची आवड मलाही होती. आपण मोठ्ठा चित्रकार व्हावं, असं काही लहानपणापासून मला वाटत नव्हतं. कोल्हापुराच्याही आधी काही काळ आम्ही बेळगाव जिल्ह्यातल्या भोज या गावी राहायला होतो. अगदी लहान गाव होतं हे. आमचं घर आणि जमीन तिथं होती. तिथे बेंदूर नावाचा सण साजरा केला जाई. आपल्याकडे बैलपोळा असतो, तसा कर्नाटकात हा बेंदूर. या सणाच्या वेळी आम्ही मातीचे बैल तयार करत असू. बैलगाडीही तयार केली जाई. हे बैल, बैलगाडी आम्ही रंगवत असू. बैलांची, शेतांची चित्रंही काढत असू. रथसप्तमीला आजी पाटावर चित्र काढून घेई. तर चित्रकलेचा असा संबंध अगदी लहानपणी आला. मग पुढे आम्ही कोल्हापूरला आलो. कोल्हापुरात चित्रकलेसाठी अतिशय पोषक असं वातावरण होतं. मंडईत, किंवा रंकाळ्याला वगैरे स्केचिंगसाठी मुलं जात असतात. मीही त्यांच्याबरोबर जायचो. कोल्हापुरात त्या काळी अनेक मोठे चित्रकार राहत असत. बाबूराव पेंटर, बाबा गजबर, चंद्रकांत मांढरे वगैरे. पण त्यांची नावंही मला खूप नंतर कळली.
शाळेत असताना मी एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट ग्रेडच्या परीक्षा दिल्या. चित्रकलेतली साक्षरता तपासणार्या या परीक्षा. त्यांतल्या इंटरमीजिएट ग्रेडच्या परीक्षेत मला तीन पारितोषिकं मिळाली. या परीक्षेत एक पारितोषिक मिळवणंही खूप कठीण. त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की आपल्यात एक चित्रकारही आहे.
कलाशिक्षणाची पंढरी असलेल्या जे. जे. कला महाविद्यालयात तुम्ही चित्रकलेचं शिक्षण घेतलं. कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास कसा झाला? आणि आपण चित्रकारच व्हायचं हे तुम्ही कधी ठरवलं?
माझे वडील माझ्या लहानपणीच गेले. आमचं एकत्र कुटुंब होतं. बालपणीच चित्रकलेबद्दल आवड माझ्या मनात निर्माण झाली होती. शाळेतल्या चित्रकलेच्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत होतो. मला बक्षिसंही मिळत होती. मॅट्रिकला असताना मी जाहीर करून टाकलं की, मला जे. जे. कला महाविद्यालयातच पुढे शिकायचं आहे. माझे सगळे भाऊ त्या वेळी कॉलेजात शिकत होते. कोणी सायन्सला होतं, तर कोणी आर्ट्सला. माझे काका त्यामुळं जरा काळजीत पडले. चित्रकला शिकण्यासाठी वेगळं महाविद्यालय असतं वगैरे त्यांना काही माहीत नव्हतं. नुसती चित्रं काढून हा मुलगा पोट कसं भरणार, असा प्रश्नही त्यांना पडला. कारण चित्रकार होणं म्हणजे भिकेचं लक्षण, अशीच तेव्हा समजूत होती. पण माझी इच्छा होती, म्हणून त्यांनी परवानगीही दिली. आमच्या कोल्हापुरातले लक्ष्मण फडके त्या वेळी जे. जे.ला अप्लाइड आर्ट्स (उपयोजित कला) विभागात होते. गायक सुधीर फडक्यांचे ते बंधू. त्यांनी मला अप्लाइड आर्ट्सला जायचा सल्ला दिला. मी त्यांना सांगितलं होतं की, मला पेंटिंग करायचं आहे, कमर्शियल आर्टमध्ये वगैरे मला रस नाही. पण ते म्हणाले की, अप्लाइड आर्ट्सला गेलास तर तुला पेंटिंगही करता येईल, आणि तुझा व्यवस्थित उदरनिर्वाह होईल इतके पैसेही मिळतील. मुंबईत नुसतं पेंटिंग करून तुला राहता येणार नाही. म्हणून फडक्यांच्या सल्ल्यानुसार १९४४ साली मॅट्रिक झाल्यानंतर मी जे. जे.त प्रवेश घेतला.
मला चित्रकारच का व्हायचं होतं, चित्रकलेविषयीची ती आंतरिक ओढ का होती, हे मला आजतागायत कळलेलं नाही.
कोल्हापुरात चित्रकलेला पोषक असं वातावरण असलं, तरी तिथलं आणि जे. जे.चं वातावरण सर्वस्वी वेगळं असणार. चित्रकला शिकण्यासाठी तुम्ही मोठ्या शहरात आल्यावर तुम्हांला हा फरक जाणवला का?
मी अप्लाइड आर्ट्सला गेलो तेव्हा मला, अप्लाइड आर्ट म्हणजे काय, जाहिरातक्षेत्र म्हणजे काय, हे काहीही माहीत नव्हतं. कोल्हापूरला आमच्या कानावर पडलेले शब्द म्हणजे पोर्ट्रेट, लँडस्केप, कम्पोझिशन वगैरे. मुंबईला आल्यावर मला मग जाहिरातक्षेत्रातही चित्रकारांना काम मिळतं, चांगला पगार मिळतो, हे कळलं. पण माझा कोल्हापूरचा पीळ कायम होता. रिऍलिस्टिक पेंटिंग, म्हणजे वास्तवावादी चित्र काढायला मला फार आवडायचं. जे. जे.त शिकत असतानाही मी चौपाटीवर वगैरे जायचो चित्र काढायला.
पेंटिंग ही तुमची खरी आवड होती. मग व्यंग्यचित्रं काढायला सुरुवात कशी आणि कुठून झाली?
हा सांधाबदल नेमका कधी झाला, हे सांगणं तसं अवघड आहे. व्यंग्यचित्र नावाची गोष्ट माझ्या पाहण्यात आली ती मुंबईला आल्यावरच. तशी कोल्हापुरात मी काही व्यंग्यचित्रं पाहिली होती मासिकांमध्ये. ’किर्लोस्कर’, ’स्त्री’, ’मनोहर’ या मासिकांचे संपादक होते शं. वा. किर्लोस्कर. ते उत्तम व्यंग्यचित्रकारही होते. त्यांची व्यंग्यचित्रं या मासिकांमध्ये असायची. हरिश्चंद्र लचक्यांची व्यंग्यचित्रं असत. पण व्यंग्यचित्रांशी खरी ओळख मात्र मुंबईतच झाली. कॉलेजच्या लायब्ररीत काही अमेरिकन, ब्रिटिश मासिकं यायची. त्यांपैकी मी ’पंच’ नियमितपणे वाचायचो. ’सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट’ नावाचं एक साप्ताहिक निघायचं. या साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर व्यंग्यचित्र असायचं. दिल्लीहून निघणार्या ’हिंदुस्तान टाइम्स’मध्ये शंकरची राजकीय व्यंग्यचित्रं असायची. दलालांची चित्रं तर मला फार आवडत. ती काही रूढार्थानं व्यंग्यचित्रं नव्हती, पण ती चित्रं फार मोहवून टाकणारी अशी होती. अशी सगळी चित्रं पाहिल्यावर वाटलं की, आपणही असं काहीतरी काढून पाहावं. म्हणून मी व्यंग्यचित्रं काढायला सुरुवात केली.
मग नंतर माझी काही व्यंग्यचित्रं मी काही मासिकांकडे पाठवली. ती छापून येतील असं काही वाटलं नव्हतं, पण त्यांपैकी एक व्यंग्यचित्र ’मनोहर’मध्ये प्रकाशित झालं. १९४६ साल असावं ते. त्या वेळच्या माझ्या अनुभवांचं प्रतिबिंब त्या चित्रात पडलं होतं. मुंबईत एका खोलीत लोक कसे राहतात, असा प्रश्न मला त्या वेळी पडला होता. माझ्या व्यंग्यचित्राचाही हाच विषय होता. नाव होतं - ’मुंबईचं हल्लीचं बिर्हाड’. ते ’मनोहर’मध्ये प्रकाशित झालं. आता जर त्या काळात सुरुवातीला काढलेली चित्रं पाहिली, तर ती फारच कच्ची वाटतील. अनेक त्रुटी लक्षात येतील त्या चित्रांमधल्या. पण माझं चित्र प्रकाशित झालं, तेव्हा मला फार आनंद झाला होता. मी मुंबईहून दिवाळीच्या सुमारास ट्रेनमधून कोल्हापूरला जात होतो. हातात ’मनोहर’चा अंक होता. डब्यातल्या प्रत्येकाच्या हातात ’मनोहर’चा अंक असावा, आणि ते मी काढलेलं चित्र पाहून हसावेत, असं मला वाटत होतं. तसं काही घडलं नाही. अर्थातच, पण आपण काढलेलं चित्र प्रकाशित होऊ शकतं, हे मला तेव्हा कळलं. पण तरी ही कला फक्त छंदापुरतीच मर्यादित ठेवायची, असंच मी ठरवलं होतं. कारण सृजनशीलतेचा कस पेंटिंग काढण्यातच लागू शकतो, असा माझा ठाम विश्वास होता. व्यंग्यचित्र काढण्यात चित्रकाराला आव्हान ते काय? व्यंग्यचित्र बघून दोन घटका करमणूक तेवढी होते. मनोरंजनाच्या पलीकडे त्यात काही नाही, अशीच माझी भावना होती.
मग व्यंग्यचित्रांचा गांभीर्यानं विचार तुम्ही कधी सुरू केला?
’हंस’ प्रकाशनाचे संस्थापक अनंत अंतरकरांनी त्या सुमारास ’हंस’, ’मोहिनी’, ’नवल’ अशी नवी मासिकं सुरू केली होती, आणि त्या निमित्तानं त्यांनी व्यंग्यचित्रांची एक स्पर्धाही जाहीर केली होती. मी माझं एक चित्र या स्पर्धेसाठी पाठवलं, आणि मला बक्षीसही मिळालं. अंतरकरांशी माझा परिचय झाला, आणि त्यांनी स्वत:हून माझ्याकडे चित्रं मागितली. व्यंग्यचित्रांसाठी माझ्या मागेच लागले ते. ’तुमच्या हातातली कला खूप दुर्मीळ आहे, तुम्ही तिचा पाठपुरावा करायला हवा, तिला वाया घालवू नका’, असं ते मला सारखं सांगत. त्यांना व्यंग्यचित्र या माध्यमाची उत्तम जाण होती. हे माध्यम वेगवेगळ्या घटनांवर भाष्य करायला उत्तमप्रकारे वापरता येईल, हे त्यांनी ओळखलं होतं.
व्यंग्यचित्रांनाच जास्तीत जास्त वेळ द्यायचा, त्यातच करिअर करायचं, हे तेव्हाच तुम्ही ठरवलं का?
अंतरकरांसाठी व्यंग्यचित्रं काढत असताना माझ्या लक्षात आलं की, या माध्यमाची कुवत फार मोठी आहे. अंतरकर म्हणतात तसं आपण खरंच ही कला गांभीर्यानं घ्यायला हवी. कारण विडंबनात्मक शैलीतून मला बरंच काही सांगता येत होतं. पोहोचवता येत होतं. त्यामुळं व्यंग्यचित्रांनाच मी माझं कार्यक्षेत्र मानलं आणि जास्तीत जास्त वेळ व्यंग्यचित्रांना दिला. पण तरीही मी म्हणेन की, पेंटिंग हा माझ्या व्यंग्यचित्रांचा पाया आहे.
आपण आता पेंटिंगबद्दल बोलत आहोत, म्हणून विचारतो. तुम्हांला नंतर कधी परत पेंटिंगकडे वळावंसं नाही वाटलं का?
मी ठरवलं होतं की, ही व्यंग्यचित्रं काढून झाली की मग परत पेंटिंगकडे पुन्हा वळू. पण गंमत अशी झाली की, व्यंग्यचित्रांचं माध्यम हे वाटतं तितकं वरवरचं नाही, हे मला कळलं. हे माध्यम फार मागत होतं माझ्याकडून. मला सतत आव्हान देत होतं. आणि म्हणून, कोणीतरी या माध्यमात गांभीर्यानं काम करायला हवं, असं मला वाटत होतं. मी पेंटिंग करत बसलो असतो, तर व्यंग्यचित्रांकडे दुर्लक्ष झालं असतं, ते बाजूला पडलं असतं. आणि पेंटिंगच्या दिशेनं जाणारं, संवाद साधणारं हे प्रभावी माध्यम हाताळावं, ही माझी तहान होती. त्यामुळे व्यंग्यचित्रांवरच मी माझी सारी ऊर्जा केंद्रित केली.
आता विचार केला तर व्यंग्यचित्रांकडे वळण्याचं, आणि त्यातच रमण्याचं अजून एक कारण माझ्या लक्षात येतं. लहानपणी कोल्हापूरला असताना गणेशोत्सवात मी नकलांचा कार्यक्रम करायचो. नकला करायचा छंदच होता मला. पुढे कमी झाला तो. पण आता असं वाटतं की, ती जी एक लहानपणापासून विनोदबुद्धी होती, विसंगती शोधण्याची दृष्टी होती, ती मी कागदावर उतरवली. हा जो नकलाकार माझ्यात दडला होता, तो माझ्यातल्या चित्रकारानं बाहेर काढला, असं मला वाटतं.
तुम्ही सुरुवातीच्या काळात जी व्यंग्यचित्रं काढली होती, ज्या व्यंग्यचित्रांपासून तुमच्या कारकिर्दीला सुरुवात झाली, त्यांचं स्वरूप कसं होतं? राजकीय व्यंग्यचित्रं होती का ती?
सुरुवातीच्या व्यंग्यचित्रांचा राजकारणाशी संबंध नव्हता. राजकीय व्यंग्यचित्रांकडे मी नंतर वळलो. सुरुवातीच्या व्यंग्यचित्रांमध्ये सामाजिक टिप्पणी होती, पण गंमत करून बाजूला व्हायचं, असंच त्यांचं स्वरूप होतं. दोन घटकांची गंमत होती ती माझ्यासाठी. नंतर मी त्यांच्यात गुंतत गेलो. पुढे मी अर्धवेळ नोकरी सुरू केली. तेव्हा मुंबईमध्ये हट्टंगडी आडनावाचे एक ज्येष्ठ पत्रकार होते. ते ’वीकेंड टिटबिट्स’ या नावाचं एक साप्ताहिक चालवायचे. त्यांच्यासाठी मी चित्रांची एक मालिका केली होती. खूप आवडली त्यांना ती. त्यांनी मला सांगितलं की, ’हे काम पुढे सुरू ठेव, थांबू नकोस. मी अनेकांकडून चित्रं काढून घेतली आहेत, पण तुझी चित्रं फार वरच्या दर्जाची आहेत’.
तुम्ही ज्या काळात व्यंग्यचित्रं काढायला सुरुवात केली, तो काळ हा बर्याच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा होता. भारताला स्वातंत्र्य मिळून काही वर्षं झाली होती. देशात तसं अस्थिर वातावरण होतं. या काळात व्यंग्यचित्रांद्वारे राजकीय टिप्पणी करावी, असं तुम्हाला कधी वाटलं नाही का?
मी राजकीय व्यंग्यचित्रंही तशी बरीच काढली. राजकीय व्यंग्यचित्रांचा विषय हा बरेचदा तात्कालिक असतो. त्यामुळे त्या चित्रांची पार्श्वभूमी माहीत असायला हवी. ’माणूस’, ’सोबत’ यांच्यासाठी काढलेल्या व्यंग्यचित्रांत राजकीय टिप्पणी होती. एका चित्राचं उदाहरण देता येईल. भारत अमेरिकेहून पीएल ४८० योजनेअंतर्गत धान्य आयात करत असे. १९६०च्या सुमाराची ही गोष्ट आहे. आपल्या देशात इतकं धान्य पिकत असताना अमेरिकेकडून धान्य विकत कशाला घ्यायचं, असं तेव्हा अनेकांनी म्हटलं होतं. तेव्हा मी एक चित्र काढलं होतं. या चित्रात महात्मा गांधींचा एक पुतळा होता. भवताली सगळी शेती होती. शेतात कणसं डोलत होती, आणि गांधीजींच्या गळ्यात जे पदक होतं, त्यावर लिहिलं होतं - पीएल ४८०. ज्या गांधीजींनी स्वावलंबनाचे धडे दिले, त्यांच्या गळ्यात तुम्ही कुठलं पदक घालता आहात? तर पीएल ४८०.
राजकीय टीकाचित्र म्हणजेच व्यंग्यचित्र, असा एक समज झाला आहे. तर ते तसं नाही. राजकीय व्यंग्यचित्रं प्रभावी असतात, ती आवश्यकही आहेत, पण व्यंग्यचित्र या शाखेचा ती केवळ एक भाग आहेत. राजकीय व्यंग्यचित्रं काढताना चित्रकार म्हणून तिथे रमण्याची संधी मिळेल, असं मला वाटलं नाही. मला काही वृत्तपत्रांनी नियमितपणे राजकीय व्यंग्यचित्रं देण्याविषयी विचारलं होतं. पण मी नकार कळवला. त्यांच्यासाठी काम केलं असतं तर मी पत्रकार झालो असतो. माझ्यातल्या चित्रकाराचं काय? राजकीय व्यंग्यचित्रांचं स्वरूप तात्कालिक असतं. ताज्या घडामोडींवर, राजकारणावर त्या चित्रांमधून भाष्य करावं लागतं, टिप्पणी करावी लागते. त्यामुळे ठरावीक वेळेतच ही चित्रं पूर्ण करावी लागतात. घड्याळाशी स्पर्धा असते, आणि तो माझा स्वभाव नाही. म्हणून राजकीय व्यंग्यचित्रांमध्ये मी रमलो नाही. पण माझ्या अनेक चित्रांमधून मी वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर टिप्पण्याही केल्या आहेत. ठरवून नव्हे, पण तशी कल्पना सुचली म्हणून. अशाच एका चित्रावरून वादसुद्धा झाला होता. महागाई हा त्या चित्राचा विषय होता. महागाईचा निषेध करण्यासाठी एक सभा भरलेली असते. कुठल्यातरी पक्षाच्या महिला आघाडीनं आयोजित केलेल्या त्या सभेला गर्दी बरीच असते. व्यासपीठावर एक स्त्री उभं राहून अगदी तावातावानं बोलत असताना तिच्या शेजारी बसलेल्या दोघीजणी तिच्या साडीचा पदर हातात घेऊन न्याहाळत असतात. माझ्या या चित्रावर कुठल्यातरी एका महिला मंडळानं आक्षेप घेतला. तर अशाही गमती घडतात. इतकी वर्षं व्यंग्यचित्रं काढूनही मला वाटतं की, व्यंग्यचित्रकलेचा पूर्ण वापर आपण केलेला नाही. तिला फक्त राजकीय व्यंग्यचित्रांपुरतंच आपण मर्यादित ठेवलं आहे. वॉल्ट डिस्नेनं कुठे राजकीय व्यंग्यचित्रं काढली? त्याचा मिकी माऊस जगभर पोहोचला, कारण ती एक सुंदर कलाकृती होती.
तुम्ही चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी जी चित्रं, मुखपृष्ठ रेखाटली होती, ती आजही अतिशय ताजी वाटतात. तुम्ही जेव्हा व्यंग्यचित्रं काढायला सुरुवात केली, तेव्हाची चित्रंही अतिशय सफाईदार आहेत. हे तुम्हांला कसं जमलं?
मी जेव्हा व्यंग्यचित्रं काढायला सुरुवात केली, तेव्हा ही चित्रं सर्वसामान्यांना कळायला हवीत, त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवीत, अशी माझी इच्छा होती. त्या काळच्या प्रचलित चित्रशैलीला बाजूला ठेवून, तिच्याकडे दुर्लक्ष करून, मी माझी चित्रं रंगवली. शिवाय मी कमर्शियल आर्टचा विद्यार्थी. साधंसोपं करून कसं सांगायचं याचं शिक्षण मला मिळालं होतं. त्यामुळं माझी चित्रं मी अगदी साधीसोपी ठेवली. शिवाय ही चित्रं मुखपृष्ठांवर येणार असल्यानं आकर्षक रंगसंगती वापरली. हेसुद्धा माझ्या कमर्शियल आर्टच्या शिक्षणामुळंच सोपं झालं. म्हणूनच ती आजही ताजी वाटत असावीत.
तुमच्या व्यंग्यचित्रांची एक स्वतंत्र शैली आहे. त्यांतला विनोद बोचरा नाही. त्यांतली पात्रं निष्कपट असतात. ही पात्रं दिसायलाही अगदी गोंडस असतात.
शैली हा चित्रकाराचा चेहरा असतो. चेहरा हा तुमचा तुम्हांला मिळालेला असतो. तसंच कोणाचंही अनुकरण केलं नाही, की तुमची स्वत:ची शैली आपोआप तयार होते. तुमच्यावर इतरांचा प्रभाव असू शकतो, पण तुमची शैली स्वत:ची असली पाहिजे. तशी ही माझी शैली आहे. ती आपोआपच आली माझ्या चित्रांमध्ये. दुसरं असं की, व्यंग्यचित्रं काढत असताना माझ्यातला चित्रकार सतत जागा असतो. एकदा कल्पना सुचली की ते चित्र सजवण्यात मी रमून जातो. पेंटिंगच्या भाषेतच मी माझ्या मनातली कल्पना लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळं माझ्या चित्रांमध्ये अगदी थोडं विरूपीकरण असतं. म्हणूनच तुम्ही म्हणता तशी माझी पात्रं गोंडस दिसत असावीत.
तुमची बहुतेक सगळी चित्रं शब्दविरहित का असतात? तुमची पात्रं बोलत का नाहीत? ही शब्दविरहित शैली तुम्ही जाणीवपूर्वक स्वीकारली का?
मला अनेकजण हा प्रश्न विचारतात की, ’तुम्ही ठरवून शब्द नसलेली चित्र काढता का?’ पण मला तालीमच तशी मिळाली आहे. शब्दांशिवाय, रेषांमधून केवळ चित्रं बोलायला हवीत. माझी बहुसंख्य चित्रं ही मुखपृष्ठांवर आली आहेत, आणि मुखपृष्ठांवर शब्द वापरता येत नाहीत. चित्राखाली टिपण देता येत नाही. मुखपृष्ठांसाठी वापरलेली ही शैली मग इतर चित्रांमध्येही उतरली. व्यंग्यचित्र हे मुळी संवादाचंच माध्यम आहे. ते काही शब्दांचं भाषांतर नव्हे. जीवनातल्या अनुभवांना असे काही पैलू असतात की जे शब्द पोहोचवू शकत नाहीत, फक्त चित्रंच पोहोचवू शकतात. शब्द जिथे थांबतात तिथे चित्र सुरू होतं. त्या माध्यमाचीच ती ताकद आहे. शक्य असेल तिथेच व्यंग्यचित्रांमध्ये संवाद वापरावेत, असं माझं मत आहे. मागे बंगळुरूला माझ्या चित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं. तेव्हा तिथले आयोजक मला म्हणाले की, ‘फडणीस, तुमची चित्रं बोलत नाहीत, पण म्हणूनच ती समजायला अडचण येत नाही. राज्य, देश यांच्या सीमा ओलांडून तुमची चित्रं संवाद साधतात.’ त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यू. आर. अनंतमूर्ती आले होते. ते म्हणाले की, ‘फडणीसांच्या इथल्या अनेक चित्रांमध्ये मला कविता दिसली.’
तुम्ही म्हणालात की, तुम्हाला घड्याळाशी स्पर्धा करत चित्रं काढायला आवडत नाही. तुम्ही जी चित्रं काढता, त्यामागची प्रक्रिया नेमकी काय आहे?
कुठल्याही चित्रामागची प्रक्रिया सांगणं हे फार कठीण असतं. ते शब्दांमधून नीट व्यक्त करता येत नाही. पण तरीही तुम्ही विचारलं आहे, म्हणून एक उदाहरण देऊन सांगण्याचा प्रयत्न करतो. फार पूर्वी पुण्यातल्या अलका टॉकीजजवळच्या चढावर मी एका मुलीला सायकल चालवताना बघितलं. त्या वेळी वारा बराच होता, आणि तिच्या साडीचा पदर वार्याबरोबर उडत होता. ती आपली सायकल दामटत चालली होती. त्या वेळी माझ्या मनात आलं की, या साडीचं जर शीड झालं, तर फार सोपं जाईल हिला पुढे जायला. बीजरूपानं ही कल्पना आल्यावर मग पुढचा प्रवास स्केचबुकातून झाला. अनेक शक्यतांचा विचार केला, अनेक प्रकारे कच्ची चित्रं काढून बघितली, आणि त्यातून जे चित्र तयार झालं, त्यात फक्त ’साडीच्या पदराचं शीड’ एवढंच कायम राहिलं. सायकल जाऊन होडी आली. नायिका होती म्हणून नायक आला. टिपूर चांदण्यात त्यांचा बोटीचा प्रवास सुरू आहे. आता या चित्रात कोणावरही टीका नाही, प्रहार नाही. कोणालाही बोचकारणारं हे चित्र नाही. ’कमर्शियल आर्टिस्ट गिल्ड’नं या चित्राला पारितोषिक दिलं होतं.
शिदं, आपण शैलीबद्दल मघाशी बोललो. त्याच अनुषंगानं अजून एक प्रश्न. एखाद्या व्यंग्यचित्रात तो चित्रकार दिसतो का? त्याचा स्वभाव त्या चित्रात उतरतो का?
एखाद्या चित्रात चित्रकारानं दिसणं, किंवा न दिसणं हे चित्रकाराच्या हातात नसतंच. तो दिसतोच त्याच्या चित्रांत. एखादं चित्र तो फार तर अलिप्त राहून काढू शकेल. पण प्रत्येक चित्रकार हा त्याच्या चित्रांमध्ये ‘दिसतोच’. जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन त्याच्या व्यक्तिरेखांमध्ये, त्याच्या शैलीमध्ये उतरतो.
चित्रकार म्हणून तुम्हाला जो आनंद मिळतो, तो चित्र काढण्याच्या प्रक्रियेतून मिळतो, की चित्र पूर्ण झाल्यानंतर मिळतो?
मला जेव्हा कल्पना सुचते, तेव्हाच माझ्या दृष्टीनं ते चित्र पूर्ण झालेलं असतं. पुढची जी प्रक्रिया आहे, ती वाचकांपर्यंत ते चित्र पोहोचवण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आहे. आता हे जे ’सुचणं’ आहे, त्यात आणि ते चित्र कागदावर पूर्ण होण्यात कितीही वेळ जाऊ शकतो, कारण चित्र कागदावर उतरवताना रचनेशी संबंध येतो, आणि रचनेत जर अडचण येत असेल तर अमुक इतक्या वेळात चित्र पूर्ण होईल, असं सांगता येत नाही. उदाहरणच द्यायचं झालं, तर जे व्हीनस आणि लक्ष्मीचं चित्र आहे, त्याची कल्पना मला सुचली, कच्चं रेखाटन केलं, पण चित्र काढताना रचनेशी अडलो. माझ्यापर्यंत ते चित्र पोहोचलं होतं, पण तुमच्यापर्यंत ते चित्र पोहोचवायचं कसं? अनेकदा मी ते चित्र काढायचा प्रयत्न केला, आणि सोडून दिला. पण ते चित्र काही मला स्वस्थ बसू देईना. या चित्रात सौंदर्याची देवता असलेली व्हीनस आहे, आणि चतुर्भुजा लक्ष्मी आहे. व्हीनसची मूर्ती आपण नेहमी बघतो, तिला हात नसतातच. व्हीनसची तशी मूर्ती बघून मला कल्पना सुचली की, आपल्याकडे चार हात असलेली लक्ष्मी या व्हीनसला भेटली तर काय होईल? ती आपले दोन हात व्हीनसला देईल. आपली भारतीय संस्कृती तशी आहे. आता ही कल्पना सुचली, तरी रचना गुंतागुंतीची आहे. मला अनेक दिवस काही सुचत नव्हतं. चित्र अपुरं ठेवता येत नव्हतं कारण या दोन बायका मला छळत होत्या. रोज मला त्या विचारायच्या, काय ठरवलंय फडणीस? कधी उतरवणार आम्हाला कागदावर? शेवटी पंधरा वर्षांनी मला हे चित्र पूर्ण करता आलं.
कल्पना सुचते कशी, हे मात्र मला सांगता येणार नाही. ती कल्पना जेव्हा चित्र बनून कागदावर येते, तेव्हा तिचं स्वरूपही बरेचदा बदललेलं असतं. कारण रेडिमेड विनोद माझ्यासमोर घडत नसतो. ’असं झालं तर?’, ’असं घडलं तर?’ अशा प्रश्नांतून काहीशा अतर्क्य घटना स्केचबुकातून चित्र म्हणून उभ्या राहतात. कल्पना सुचल्यानंतर त्या कल्पनेतून चित्र कसं तयार होईल, याचा शोध तुम्हीच घ्यायचा असतो, आणि खरा आनंद या शोध घेण्यात आहे. चित्र पूर्ण झालं, की त्या चित्रातून मिळणारा आनंद संपतो.
तुम्ही पुस्तकांसाठी चित्रं काढलीत, मुखपृष्ठं केलीत, पण तुमचं त्याहीपेक्षा महत्त्वाचं काम म्हणजे शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये चित्रांना स्थान मिळवून देणं. हे कसं जमून आलं?
मला आजही अनेकजण सांगतात की, तुम्ही पुस्तकांची, मासिकांची मुखपृष्ठं केली, अनेक व्यंग्यचित्रं काढली, पण गणिताच्या पुस्तकांसाठी तुम्ही जे काम केलं आहे, ते फार मोठं आहे. गणिताच्या पुस्तकांचं हे काम माझ्याकडे कसं आलं त्याचीही गोष्ट आहे. पूर्वी इयत्ता पहिलीसाठी पुस्तकंच नव्हती. पहिलीच्या मुलांना लिहितावाचता येत नाही, मग त्यांच्यासाठी पुस्तकंच नकोत, असा विचार तेव्हा लोकांनी केला होता. ज्ञान हे फक्त लिखित शब्दांतूनच मिळतं, असं आपण अजूनही समजून चालतोच. त्यामुळे पहिलीच्या मुलांसाठी पुस्तकंच नव्हती. दुसरीपासून पुढे मुलांना सगळ्या विषयांची पुस्तकं मिळत. पुढे पहिलीसाठीही पुस्तकं तयार करण्याचं ठरलं, पण मग लिहितावाचता न येणार्या मुलांना गणितासारखा विषय शिकवायचा कसा, असा प्रश्न समोर आला. मी ज्यांच्या पुस्तकांसाठी चित्रं काढली होती, असे काही लेखक तेव्हा पाठ्यपुस्तक निर्मिती समितीवर होते. त्यांनी मला गणिताच्या पुस्तकांसाठी चित्रं काढण्याविषयी विचारलं. चित्रांच्या माध्यमातूनच गणित शिकवायचं, म्हणजे गणिताबद्दलची जी भीती असते, तीसुद्धा कमी होईल, असा विचार त्या मागे होता. पण मुलं गणिताकडे दुर्लक्ष करून फक्त चित्रं बघत बसतील, अशी एक शंका पुढे आली. त्या समितीत प्रा. राईलकर होते. त्यांच्या ’गणिती तर्कशास्त्र’ या पुस्तकासाठी मी चित्रं काढली होती. त्यांनी माझ्या कामाची खात्री दिली. मग समितीचे सदस्य माझ्याकडे पुस्तकाची प्रत घेऊन आले. त्यात अर्थातच चित्रं नव्हती. हे काम वाटतं तितकं सोपं नाही, याची मला जाणीव होती. कॉलेजच्या पुस्तकात चित्रं काढणं सोपं होतं, कारण मला आधार होता शब्दांचा. पहिलीतल्या मुलांना चित्रांद्वारे गणिती संकल्पना समजावणं त्यापेक्षा कितीतरी अवघड होतं. कारण गणिती संकल्पना अमूर्त आहेत. बेरीज होते म्हणजे नेमकं काय होतं, वजाबाकी होते म्हणजे काय, हे समजवणार कसं? मी आठवडाभर बराच विचार केला, आणि मगच त्यांना होकार कळवला. पुस्तकातली सगळी चित्रं काढायला मला जवळजवळ एक वर्षं लागलं. पुस्तक तयार झाल्यानंतरही मला एका कसोटीतून जावं लागलं. त्या वेळी असलेल्या पंचवीस जिल्ह्यांमधल्या काही शाळांमध्ये ते पुस्तक वर्षभर वापरून चाचणी घेतली. शिक्षकांची, पालकांची, विद्यार्थ्यांची त्या पुस्तकाबद्दलची मतं जाणून घेतली. त्यांना ती चित्रं आवडल्याचं कळल्यावरच ते पुस्तक मंडळानं पास केलं. ही ७५ - ७६ सालची गोष्ट असेल.
या पुस्तकांमधली चित्रं तर सुरेख होतीच, पण गणिती संकल्पना समजावण्यासाठी चित्रांचा जो अप्रतिम वापर तुम्ही केला होता, त्याला तोड नाही.
गणिती संकल्पना चित्रांतून समजावणं, हेच तर मोठं आव्हान होतं. कुठेही शब्द न वापरता गणितातल्या संकल्पना समजावण्यासाठी मी दृष्टांत वापरले. पूर्वी साधुसंतांनी तत्त्वज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी किती सोपे, सहज दृष्टांत वापरले होते. गणितातलं अमूर्त तत्त्वज्ञान सांगण्यासाठी मीही अशीच साधीसोपी उदाहरणं वापरली. दुसरं म्हणजे अगदी रानातल्या धनगराच्या मुलाला आणि शहरातल्या एखाद्या विद्यार्थ्यालाही ती चित्रं समजली पाहिजेत, हे मी ठरवलं होतं. त्यामुळे चित्रांमध्ये एकदम टेलिफोन वगैरे दाखवून उपयोगाचं नव्हतं. आता हे जमवायचं असेल तर कुठली चित्रं वापरायची? स्वत:ची ओळख असलेली, सर्वांना माहीत असलेली वस्तू चित्रांत दाखवायची, असं मी ठरवलं. उदाहरणार्थ, वांग्याला स्वत:ची ओळख आहे. वांग्याचा आकार, रंग सगळ्यांनाच माहीत असतात. या गोष्टी काही बदलत नाहीत. लाडू मात्र चित्रात दाखवायला कठीण. तो चेंडूही वाटू शकतो.
पहिलीचं पुस्तक सगळ्यांना फारच आवडल्यावर मग मला पुढच्या इयत्तांच्या पुस्तकांसाठीही विचारलं गेलं. खूप मोठं काम होतं ते. माझ्या इतर पुस्तकांपेक्षा ते जास्त लोकांपर्यंत पोहोचलं.
तुम्ही चित्रं सर्वांना समजण्याबद्दल बोललात. इतर व्यंग्यचित्रांनाही हाच नियम लागू होतो का? म्हणजे एखादं व्यंग्यचित्र सर्वांना समजणं, हे गरजेचं असतं का? की ते कवितेसारखं, किंवा अमूर्त चित्रकलेसारखं असतं? म्हणजे एखादी कविता तुम्हाला नाही कळली, तर ती तुमच्यासाठी नाही, असं समजायचं?
पेंटिंग आणि व्यंग्यचित्र यांत फरक आहे. पेंटिंग हा स्वत:शी संवाद असतो. ते काढून झालं की, चित्रकाराचा संबंध संपतो. ते कोणाला कळलं, किंवा नाही कळलं, तरी काही फरक पडत नाही. व्यंग्यचित्रातला संवाद मात्र आपला आपल्याशी असा नसतो. त्या व्यंग्यचित्रातून मला काय सांगायचं आहे, हे जर बघणार्याला कळलं नाही, तर मग त्या संवादाला अर्थच राहत नाही. व्यंग्यचित्रांतून संवाद व्हायला हवा, स्वगत नव्हे.
उत्तम व्यंग्यचित्रकार होण्यासाठी आधी चांगला चित्रकार होणं आवश्यक आहे का?
होय. व्यंग्यचित्रांची, हास्यचित्रांची वाट ही चित्रकलेतूनच जाते. मी पोर्ट्रेटं केली आहेत, लॅण्डस्केप्स् केली आहेत. हे करत असतानाच त्या वाटेत मला व्यंग्यचित्रकला भेटली. विरूपीकरण, विद्रुपीकरण म्हणजे व्यंग्यचित्रकला नव्हे. एक गंमत सांगतो. कॉलेजात असताना एकदा मी व्यंग्यचित्र काढत होतो, आणि माझ्या एका शिक्षकांनी ते बघितलं. मला म्हणाले, ’ही अशी व्यंग्यचित्रं तू काढू नकोस. तू उत्तम पेंटिंग करतोस, तुझा हात खराब होईल’. व्यंग्यचित्र काढणं म्हणजे काहीतरी वेडंवाकडं रेखाटणं असाच अपसमज आहे. व्यंग्यचित्रकला अतिशय सोपी आहे, असा दुसरा अपसमज आहे. उत्तम व्यंग्यचित्रं काढण्यासाठी मेहनत, सराव या दोन्ही गोष्टी लागतातच. पेंटिंगचं शिक्षण घेतलं नसलं तरी हरकत नाही, पण चित्रकलेत उत्तम गती हवी. विनोदबुद्धी हवी. उत्तम निरीक्षणशक्ती हवी आणि चित्रकलेची भाषा तुम्हाला अवगत असायला हवी. हल्ली संगणकाचा वापर वाढला असला तरी रचनाकौशल्य, सौंदर्यदृष्टी यांना पर्याय नाही. म्हणूनच पूर्वीही आणि आजही व्यंग्यचित्रकार खूप कमी असावेत.
व्यंग्यचित्रकला हा शिकवण्याचा विषय नाही. तुम्ही कोचिंग क्लासात संगीत शिकू शकता, पेंटिंगसुद्धा शिकू शकता. पण व्यंग्यचित्रकला शिकू शकत नाही. ती उपजतच असावी लागते. अजूनही महाविद्यालयांमध्ये हा विषय शिकवला जात नाही. पण व्यंग्यचित्रकारांची संख्या कमी असली, तरी व्यंग्यचित्रं बर्याच लोकांपर्यंत पोहोचली आहेत. वर्तमानपत्रांतून, पुस्तकांमधून, प्रदर्शनांमधून लोक व्यंग्यचित्रांचा आस्वाद घेतात. हल्ली या विषयात संशोधनही होतं आहे. मी स्वत: हैदराबादला, पुण्यात व्यंग्यचित्रकलेवर अभ्यासकांसाठी व्याख्यानं दिली आहेत.
शिदं, तुमची चित्रं लोकप्रिय झाली, सामान्यांपर्यंत पोहोचली. पण याचा एक तोटाही झाला. तुमची परवानगी न घेता, ती अनेकांनी वापरली. अशा मंडळींना धडा शिकवण्यासाठी तुम्ही कायद्याचा आधार घेतलात. त्याबद्दल सांगाल?
हा अनुभव काही फारसा सुखद नाही, पण सांगणं खूप आवश्यक आहे. माझ्या चित्रांच्या चोरीचा पहिला अनुभव ६२-६३ साली आला. तेव्हा चित्रांसाठी अनेकजण माझ्या मागे लागत, पण मला काही सगळ्यांना चित्रं देणं शक्य नव्हतं. मी अनेकांना सरळ नकार द्यायचो. ज्यांना मी चित्रं देऊ शकलो नाही, अशांपैकी काहींनी, माझ्या आधी प्रकाशित झालेल्या चित्रांचे ठसे मिळवले, आणि चित्रं छापली. मला यातलं काहीही माहीत नव्हतं. त्यात आणखी वाईट गोष्ट म्हणजे अगदी सामान्य किंवा चावट मासिकांवरती माझी चित्रं प्रकाशित केली जात होती! हा सर्व प्रकार खूप त्रासदायक होता. कोणीतरी मला या प्रकाराबद्दल सांगितल्यावर मी वकिलांचा सल्ला घेतला. कायद्याचा अभ्यास केला, आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की, जसे संगीतकाराला, लेखकाला आहेत, तसेच प्रताधिकाराचे, म्हणजे कॉपीराइटचे हक्क चित्रकारालाही आहेत. तुमची मुद्रित चित्रं तुमच्या परवानगीशिवाय कोणीही वापरू शकत नाही, आणि चित्रं वापरायची असतील, तर ती त्या चित्रांचं मूल्य देऊनच वापरली पाहिजेत. तसं जर झालं नसेल, तर तुम्ही हरकत घेऊ शकता. सुरुवातीला मी आक्षेप घेतल्यावर काहींनी खळखळ केली पैसे द्यायला. पण परवानगीशिवाय चित्र वापरणं कमी झालं. अर्थात अजूनही हा प्रकार पूर्णपणे थांबलेला नाही. कोणी अज्ञानातून करतं, तर कोणी माहीत असूनही मुद्दाम करतं. पण हे प्रकार थांबायला हवेत. म्हणून मी हल्ली माझ्या प्रदर्शनातही बोर्ड लावतो की, मोबाईल किंवा कॅमेरा वापरून चित्रकाराच्या परवानगीशिवाय चित्रांचे फोटो काढू नका म्हणून. अनेकांना पटत नाही हे. पण कायद्यानं निर्मात्यांना दिलेलं संरक्षण आहे हे. नाही तर त्याला आपली कलाकृती लपवूनच ठेवावी लागेल.
शिदं, तुमच्या कुटुंबीयांविषयी आणि तुम्हांला आवडणार्या व्यंग्यचित्रकारांविषयी थोडं...
सध्या घरात आम्ही दोघंच असतो. मी आणि माझी पत्नी - लेखिका शकुन्तला फडणीस. तिनं ’माहेर’ आणि ’जत्रा’साठीही लेखन केलं आहे. विशेष म्हणजे ती व्यंग्यचित्रांच्या रसग्रहणात्मक लेखही लिहिते. माझ्या सगळ्या उपक्रमांत तिचा महत्त्वाचा सहभाग असतो. आम्हांला दोघी मुली. दोघीही विवाहित आणि पुण्यातच असतात. आवडत्या व्यंग्यचित्रकारांविषयी म्हणाल तर, ज्यांनी सतत व्यंग्यचित्रकलेत वेगळे प्रयोग केलेत असे माझे मित्र वसंत सरवटे. त्यांच्या चित्रांचा मी चाहता आहे. मारिओ मिरांडा, श्याम जोशी आणि प्रभाकर ठोकळ यांनीही वेगळ्या वाटेनं जाणारी चित्र काढली ती मला आवडतात. उदयोन्मुख व्यंग्यचित्रकारांमध्ये श्रेयस नवरे आणि ‘ललित’साठी व्यंग्यचित्र काढणारे अभिमन्यू कुलकर्णी यांची चित्र छान असतात.
मुलाखतीचं पूर्वप्रकाशन - 'जत्रा' (दिवाळी - २०११)
श्री. शि. द, फडणीस यांचं छायाचित्र - श्री. मिलिंद वाडेकर
श्री. शि. द. फडणीस यांच्या या मुलाखतीत वापरलेल्या सर्व व्यंग्यचित्रांचे हक्क त्यांच्याकडे राखीव आहेत. या चित्रांचा अन्यत्र कुठल्याही माध्यमात उपयोग करण्याची परवानगी नाही.
या मुलाखतीचा कुठलाही भाग अन्यत्र कुठल्याही माध्यमात प्रकाशित करण्याची परवानगी नाही.
श्री. शि. द. फडणीस यांची मुलाखत मायबोलीवर प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल मेनका प्रकाशन, पुणे, आणि श्री. शि. द. फडणीस यांचे मनःपूर्वक आभार.
सुरेख मुलाखत. सुंदर
सुरेख मुलाखत. सुंदर चित्रे.
आभारी आहे चिनूक्स.
या मुलाखतीचा कुठलाही भाग अन्यत्र कुठल्याही माध्यमात प्रकाशित करण्याची परवानगी नाही.>> कृपया थोडे स्पष्ट करणार का ?
या मुलाखतीचा दुवा मला माझ्या फेसबुक पेजवर द्यायला आवडेल. माझा अनुभव असा आहे की त्यातील (मला भावलेली) दोन-तिन वाक्य उद्घृत केल्यास लोकं आवर्जून वाचतात.
मी दुसर्या एका फेसबुक ग्रुपमध्येही तो दुवा शेअर करु इच्छिते.
अर्थातच त्यात आपले लेखन चोरण्याचा कसलाही हेतू नाही. जास्तीत जास्त लोकांनी वाचावे एवढीच इच्छा. लेखन तुमच्या नावानिशी तुमच्याच दुव्यावर, तुमच्याच पानावर असणार आहे.
रैना, दोन - तीन वाक्यं दिलेली
रैना,
दोन - तीन वाक्यं दिलेली चालतील.
धन्यवाद.
सुरेख झालीये मुलाखत!! प्रश्न
सुरेख झालीये मुलाखत!!
प्रश्न आणि उत्तरं दोन्हीही उत्तम.
चिनुक्स, शिदंच्या
चिनुक्स,
शिदंच्या चित्रकलेलीतील विविध अंगाची माहिती व टप्पे कळले.
कलेशी त़डजोड न करता शिदंच्या कुंचल्याला मार्मिकतेचे फटकारे होते व जीवनातील सहज घटनांतून एकेक रेखांकित कल्पना चमकून जात असत.
धन्यवाद. मुलाखती बद्दल...
मस्त मुलाखत
मस्त मुलाखत
मुलाखत आवडली. शि.द. फडणीस हे
मुलाखत आवडली. शि.द. फडणीस हे माझ्या आवडत्या व्यंगचित्रकारांपैकी एक आहेत.
आवडली मुलाखत.
आवडली मुलाखत.
मस्त झाली आहे मुलाखत. इथे
मस्त झाली आहे मुलाखत. इथे कुणी तरी लिहिलंय तसं त्यांची थोट प्रोसेस वाचायला आवडलं. त्यांनी पण अगदी प्रांजळपणे साध्यासोप्या शब्दांत सांगितलं आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे खरोखर एक एक व्यंग्यचित्र म्हणजे पेंटिंग आहे.
अजून आहेत का ती गणिताची पुस्तकं अभ्यासक्रमात? असतील तर मला आवडेल विकत घेउन संग्रही ठेवायला.
शिदंनी काही दिवसांपूर्वी
शिदंनी काही दिवसांपूर्वी शंभरीत प्रवेश केला. त्या निमित्ताने ही मुलाखत पुन्हा वर आणतो आहे.
सध्याच रेषाटन वाचायला सुरूवात
सध्याच रेषाटन वाचायला सुरूवात केली आहे. त्यात त्यांनी शंभरीत प्रवेश केल्याची सुवार्ता आली.
ही मुलाखत घेतल्याबद्दल आणि वरती आणल्याबद्दल धन्यवाद
Pages