अजय आणि मनीषा दोघे बहीण भाऊ. दोघेही अभ्यासात, खेळात हुषार. आईबाबांचं आणि शाळेत शिक्षकांचं ऐकणारे, एकदम गुणी होते. त्यांना एकच वाईट सवय होती. दोघांना खादाडीची प्रचंड आवड आणि कुठे कोणताही खाण्याचा पदार्थ दिसला की कोणालाही न विचारता ते त्यावर डल्ला मारायचे. साहजिकच आई बाबा वैतागायचे. कोणत्याही गोष्टीला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही असं शंभरदा सांगून, समजावून, ओरडून झालं होतं. तेवढ्यापुरते अजय मनीषा सॉरी म्हणायचे पण परत ये रे माझ्या मागल्या! शेवटी आईबाबांनीही कंटाळून नाद सोडून दिला.
एके दिवशी आई बाबांना दूरच्या गावातल्या नातेवाईकांकडून आमंत्रण आलं. त्यांच्या आईचा शंभरावा वाढदिवस होता त्यामुळे मोठा समारंभ करणार होते. अजय मनीषाला खरं तर तिकडे अजिबात जायचं नव्हतं पण सगळ्यांनी या असा खास निरोप होता त्यामुळे नाईलाजाने दोघांना आई बाबांबरोबर जावं लागलं.
त्या नातेवाईकांचं घर म्हणजे मोठी जुनी हवेली होती. मोठे जिने, भिंतीवर चित्रे, झुंबरे टांगलेली. वाढदिवसाची उत्सवमूर्ती गौरीआजी दिवाणखान्यात आरामखुर्चीत विराजमान झाली होती. नावाप्रमाणे गोरापान रंग, पांढरेशुभ्र केस आणि तीक्ष्ण निळसर झाक असलेले डोळे.. तिच्याकडे बघून ती शंभरीची असेल असं वाटतंच नव्हतं. "एखाद्या परीकथेतून आल्यासारखी दिसते की नाही? ' मनीषा अजयच्या कानात कुजबुजली. पण तेवढ्या कुजबुजण्याचा आवाज ऐकून गौरीआजीने चटकन त्या दोघांकडे पाहिलं. आई पटकन पुढे झाली आणि तिने अजय मनीषाची ओळख करून दिली. आईने सांगायच्या आधीच त्या दोघांनी गुणी मुलांसारखा गौरीआजीला नमस्कार केला. गौरीआजी गोड हसली. गौरीआजींना शुभेच्छा द्यायला बरेच लोक आले होते. गौरीआजींवर भाषणे, अनुभव, कवितावाचन सुरु झालं. अजय मनीषा थोड्या वेळातच जाम कंटाळले. त्यांच्या बरोबरचीही कोणी मुले दिसत नव्हती.
'आई बाबा, आम्ही दोघे इथे बाहेर बागेत खेळायला जाऊ का जरा? ' अजयने विचारले.
'बरं ठीक आहे पण अर्ध्या तासात या आत परत. ' आई म्हणाली.
दोघेही खूष होऊन लगेच बाहेर सटकले. हवेलीच्या मागच्या बाजूला भली मोठी बाग होती. कारंजी, फुलांचे ताटवे, झाडांच्या रांगा अशी मस्त शोभा होती. दोघे खुषीत उड्या मारत धावत होते. अचानक एका झाडाजवळ मनीषाला ठेच लागली आणि ती थबकली.
'आई गं, काय लागलं पायाला माझ्या. अय्या ही तर पिशवी दिसते आहे..आणि किती छान सोनेरी रंगाची आहे बघ!"खरंच एक सोनेरी रंगाची पिशवी त्या झाडाच्या बुंध्याला टेकून ठेवली होती.
'चल उघडून बघू या" मनीषा उत्सुकतेने म्हणाली.
'अगं पण कोणाची आहे काय माहीत?"
'नुसतं उघडून बघायला काय हरकत आहे? मग बंद करून ठेवू जागच्या जागी. कोणाला कळणार सुद्धा नाही!"
शेवटी हो ना करता अजय तयार झाला. पिशवी उघडली तर त्याच्यात बिस्किटे भरलेली होती.
" अय्या बिस्किटं! किती मस्त दिसतायत ना. आणि आकार बघ. हे आहे 'क' अक्षरासारखं, आणि हे दुसरं आहे 'रा'!"
" हो ना आणि हे बघ 'प' मग हे 'सा'."
"अरे ही बाराखडीची बिस्किटे आहेत!" मनीषा एकदम टाळी वाजवून म्हणाली " बघ ना हे 'क', दुसरं हे 'का', मग हे 'कि'. अशी बारा बिस्किटे दिसतायत प्रत्येक अक्षराची. किती मस्त दिसतायत ना. चल ना तोंडात टाकू थोडी. मला फार खावीशी वाटतायत"
अजयलाही मोह आवरत नव्हता.
" पटकन ३-४ खाऊ आणि पिशवी बंद करून जागच्या जागी ठेवून सटकू कुणी इथे यायच्या आत!"
"आयडिया!" मनीषा म्हणाली " मी ना माझ्या नावाची बिस्किटे खाणार म -नी-षा. हा हे 'म' मिळालं, अरे किती मस्त चव आहे रे! जबरी एकदम. आणि हे 'नी' " तिने अधाशासारखं ते तोंडात कोंबलं.
" जी पहिली हातात येतील ती मी खाणार! " अजय पिशवीत हात घालत म्हणाला.
"म्याव म्याव!"
अजय इतका दचकला की त्याच्या हातून पिशवी खाली पडली. घाबरून त्याने बघितलं तर एक मांजर त्याच्या पायात घुटमळत होतं.
"आता हे मांजर कुठे आलं इथे अचानक. मनीषा बघ ग, तू म्हणायचीस ना की तुला मांजर पाळायचय म्हणून?" बोलता बोलता त्याने बाजूला पाहिले पण मनीषा दिसत नव्हती.
"मनीषा, मनीषा" त्याने हाका मारल्या पण मनीषाचा आवाज आला नाही.
अजय एकदम घाबरला. कुठे गेली असेल मनीषा. तो धावत धावत ते बागेत जिथे फिरत होते तिथे सगळीकडे जाऊन आला. बागेच्या प्रत्येक कोपर्यात शोधलं, मनीषाला अनेक हाका मारून झाल्या पण तिचा कुठेच पत्ता लागत नव्हता. क्षणापूर्वी शेजारी असलेली मनीषा एकदम गायब झाली होती. अजयला काय करावं सुचेना. घरात जाऊन आई बाबांच्या कानावर घालावं लागणार होतंच. तो सुन्नपणे हवेलीच्या दिशेने चालू लागला. मगाचच्या मांजराने त्याचा पिच्छा सोडलेला नव्हता.
"काय झालं रे बाळ? तू खूप घाबरलेला दिसतोस" एक गोड आवाज त्याच्या कानावर पडला. बागेतल्या कारंज्याच्या कठड्याला टेकून एक तरूण मुलगी उभी होती.गोरापान, प्रेमळ चेहरा. निळसर डोळे. अगदी गौरीआजीच्या डोळ्यांसारखे. तिच्या आणि गौरीआजीच्या चेहर्यातही खूप साम्य होतं.
"मी मीनाताई. काय झालं सांगतोस का मला? कदाचित मी मदत करू शकेन."
अजय क्षणभर सांगावे की नाही या दुग्ध्यात पडला पण मीनाताईचा चेहरा इतका प्रेमळ आणि आश्वासक होता की त्याला राहावलं नाही आणि त्याने सर्व कहाणी भडाभडा तिला ऐकवली.
मीनाताई क्षणभर विचारात पडली मग म्हणाली.
"मनीषाला तू शेवटचं पाहिलस तेव्हा ती काय करत होती?"
अजयने बिस्किटांची बात लपवून ठेवली होती पण मीनाताईचे डोळे त्याच्यावर अपेक्षेने रोखलेले होते. त्याने चुळबुळत बिस्किटांची गोष्ट सांगून टाकली.
"ती पिशवी तुम्ही कोणाला न विचारता उघडून बिस्किटे खाल्लीत, हो ना?" मीनाताईने शांतपणे विचारले.
अजयचा चेहरा लाल झाला " हो आमची चूक झाली खरंच. पुन्हा नाही कधीच असं करणार' त्याचे डोळे पाण्याने भरले ' पण मनीषा कुठे सापडेल?"
"बाराखडीची बिस्किटे' मीनाताई विचारात गढली होती " मला माझ्या आजीने अशाच बिस्किटांची गोष्ट सांगितली होती. म्हणे एका जादूगाराने ती बनवली होती. आणि तो त्या बिस्किटांच्या पिशव्या अशाच कुठे ना कुठे ठेवून जायचा"
"जादूची बिस्किटं? असं कसं शक्य आहे?"
"मला सांग मनीषाने कोणती बिस्किटे खाल्ली होती?"
"तिच्या नावाची. पहिली दोन खाल्ली आणि मग गायबच झाली ती. इतकं शोधलं पण मिळालीच नाही. आणि हे मांजर तेव्हापासून मागे लागलय माझ्या.!" अजय वैतागाने म्हणाला.
"अरे मनीषाचा पत्ता लागला!" मीनाताई एकदम हसली "तिने 'म' आणि 'नी' ही दोन अक्षरे खाल्ली आणि तिचं मनी -मनीमाऊत रुपांतर झालं! हे मांजर म्हणजे मनीषा आहे!"
"काहीतरीच काय?" अजयने अविश्वासाने मीनाताईकडे आणि त्या मांजराकडे बघितले. मांजर त्याच्याकडेच बघत होतं. त्याचे घारे डोळे हुबेहूब मनीषाच्या घार्या डोळ्यांसारखे होते.
"पण हे जरी खरं मानलं तर मग आता काय करायचं? मनीषा आता मांजरच राहाणार की काय?" त्याने धास्तीने विचारलं.
"अरे उपाय आहे ना सोपा! तिला 'षा' चं बिस्किट खाऊ घाल म्हणजे मनीची मनीषा होईल! चल ती पिशवी कुठे आहे तिथे जाऊ"
अजय स्वप्नात असल्यासारखा तिकडे गेला. पिशवी तशीच होती. त्याने भराभर त्यातून 'षा' चं बिस्कीट शोधलं आणि मांजरापुढे ठेवलं, मांजराने वाटच बघत असल्यासारखं त्यावर झडप घालून ते गट्ट केलं.
दुसर्याच क्षणी मांजर गायब होऊन त्याजागी मनीषा उभी होती! अजयचा क्षणभर डोळ्यावर विश्वासच बसेना पण मग आनंदाने त्याने तिला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यात पाणी होते.
"मीनाताई खूप खूप आभार ग तुझे!"
"आभार कसले रे. चला आता पळा आत. आणि लक्षात ठेवाल ना, कुठल्याही गोष्टीला विचारल्याशिवाय हात लावायचा नाही ते?"
"हो ग. कधीच विसरणार नाही आम्ही ते!"
दोघेही हवेलीत धावले. जेवणे झाली. दोघेही मीनाताईला शोधत होते पण ती कुठेच दिसत नव्हती. अचानक अजयचं लक्ष भिंतीवरच्या एका जुन्या फोटोकडे गेलं.
" हा बघ मीनाताईचाच फोटो" शेजारून जाणार्या एकाला त्याने मीनाताईविषयी विचारलं.
"मीनाताई कोण? हा फोटो तर गौरीआजींच्या लहानपणी काढलेला आहे. हा. गौरीआजींचं लग्नाआधीचं नाव मीनाक्षी होतं!"
अजय मनीषा अचंब्याने त्या फोटोकडे बघत राहिले. बाहेर निघताना आई बाबांचा डोळा चुकवून जिथे बिस्किटांची पिशवी होती तिथे ते गेले. पण ती पिशवीही गायब झाली होती.
"माझं तर डोकंच भणाणलय. बाराखडीची बिस्किटे काय, जादूने मांजर होणं काय, मीनाताई काय.. " मनीषा डोळे चोळत म्हणाली.
"हो ना. आणि अगं बरं झालं मी माझ्या नावाची बिस्किटे खायला नाही सुरवात केली ते.. माझा बकरा झाला असता!"
"बकरा?"
" अजय मधला अज म्हणजे बकरा ना? परवा बाबा आणि शेजारचे साठेआजोबा संस्कृत श्लोकांवर बोलत होते तेव्हा ऐकलं मी. बाप रे थोडक्यात बचावलो! "
दोघेही खळाळून हसले. आई बाबांच्या हाका आल्या तेव्हा गौरीआजीचा निरोप घेण्यासाठी ते आत पळाले. गौरीआजी तशीच गोड हसली. तिच्या निळ्या डोळ्यात एक मिश्कील चमक होती. जे घडलं ते खरच होत की भास होता त्याचा उलगडा अजय मनीषाला झाला नाही पण त्या बाराखडीच्या बिस्किटांनी एक चांगला धडा त्यांना नक्कीच शिकवला होता!
मजा आली वाचायला. अगदीच
मजा आली वाचायला. अगदीच बालकथा असे म्हणू शकणार नाही शैली तशी असली तरी.
एकदम क्यूट गोष्ट आहे!
एकदम क्यूट गोष्ट आहे!
एकदम इरॅशनल कथा आहे पण
एकदम इरॅशनल कथा आहे पण काहीतरी खेचक आहे त्यात. आवडली.
मस्त जमली आहे छोटीशी गोष्ट.
मस्त जमली आहे छोटीशी गोष्ट. बालकथा म्हणून नक्कीच चांगली आहे.
खूपच गोड आहे कथा. आवडली
खूपच गोड आहे कथा.
आवडली
कसली गोड गोष्ट आहे.
कसली गोड गोष्ट आहे.
आज लेकाला वाचून दाखवणार.
किती मस्त गोष्ट आहे! आवडली.
किती मस्त गोष्ट आहे! आवडली.
जे घडलं ते खरच होत की भास
जे घडलं ते खरच होत की भास होता त्याचा उलगडा अजय मनीषाला झाला नाही
>>>>>
मलाही झाला नाही... पण गोष्ट फार आवडली
खूप वर्षांनी प-यांच्या
खूप वर्षांनी प-यांच्या राज्यात नेलत .... धन्यवाद...
गोड आहे गोष्ट !
गोड आहे गोष्ट !
अरे व्वा.. खूप आवडली गोष्ट.
अरे व्वा.. खूप आवडली गोष्ट. खूप दिवसांनी परिकथा वाचली.. मुलीला पण वाचून दाखवेन रात्री
छान
छान
छान
छान
छान कथा.
छान कथा.
खरंच गोड आहे गोष्ट
खरंच गोड आहे गोष्ट
धन्यवाद सर्वांना! आवर्जून
धन्यवाद सर्वांना! आवर्जून गोष्ट आवडल्याचे कळवलेत त्यामुळे हुरुप वाढला
खूपच मस्त गोष्ट आहे एकदम
खूपच मस्त गोष्ट आहे एकदम वेगळी!
छान, मस्त आहे गोष्ट आवडली
छान, मस्त आहे गोष्ट
आवडली
छान कथा!
छान कथा!
भारी आहे कथा. कल्पना आवडली.
भारी आहे कथा. कल्पना आवडली.
'मनी' आणि 'अज' धमाल आहे.
काल लेकाला सांगितली.
काल लेकाला सांगितली.
मजा आली त्याला ऐकताना.
मस्त आहे कथानक. ह्याची ऑडिओ
मस्त आहे कथानक. ह्याची ऑडिओ किंवा व्हिडीओ छान बनेल
छान कथा... आवडली
छान कथा... आवडली
काल लेकाला सांगितली.
काल लेकाला सांगितली.
मजा आली त्याला ऐकताना.>>> धन्यवाद पियू. यानिमित्ताने ही कथा बालवाचकांपर्यंत पोचते आहे त्याचे खूप समाधान आहे
अरे व्वा.. खूप आवडली गोष्ट. खूप दिवसांनी परिकथा वाचली.. मुलीला पण वाचून दाखवेन रात्री>>> धन्यवाद मनिम्याऊ!
सर्वांचे खूप खूप आभार!
रसरंगी अभिनंदन !!
रसरंगी अभिनंदन !!
आजही लेकाने हट्टाने पुन्हा हीच गोष्ट सांगायला लागली आणि तेवढीच मन लावून ऐकली.
अश्या छान छान गोष्टी लिहीत रहा.
खूप दिवसांनी अशी जादूची गोष्ट
खूप दिवसांनी अशी जादूची गोष्ट वाचली. मस्त आहे.
मुलाला ऐकवते.
खूपच आवडली गोष्ट...
खूपच आवडली गोष्ट...
धन्यवाद सर्वांचे!
धन्यवाद सर्वांचे!
खरंच ही जादूची गोष्ट जादुई
खरंच ही जादूची गोष्ट जादुई आहे. गोड आहे.
छान आहे कथा
छान आहे कथा
आवडली
कल्पक आणि गोड
Pages