पोळपाट

Submitted by मनीमोहोर on 29 July, 2024 - 14:49

पोळपाट

प्रत्येक लहान मुलाला पोळ्या करण्याची आवड असते. घरात पोळ्या करायला सुरवात झाली की ते ही लुटुलुटू चालत आपला भातुकलीतला पोळपाट घेऊन " मी पन कलनार पोया " म्हणत कणीक मागून घेत. मोठी माणसं त्याचं पोळ्या करणं बघून भलतीच खुश होतात, कणीक हाताला , जमिनीला, पोळपाटाला लागलेल्या आणि कोरड्या पिठीने सगळ अंग माखलेल्या त्या लहानग्याचे कौतुकाने फोटो , व्हिडिओ काढून ते क्षण कॅमेऱ्यात कायमसाठी बंदिस्त करून ही ठेवतात. परंतु जसं जसं वय वाढत जातं तसं तसं मात्र ही आवड अक्षरशः नफरत पर्यंत बदलते.

पोळ्या करायचा जनरली सगळ्यांनाच कंटाळा येतो. मी मात्र ह्य विधानाला अपवाद आहे. मला पोळ्या करायचा कंटाळा तर येत नाहीच उलट पोळ्या करणं माझ्या साठी जणु मेडीटेशनच आहे. पोळ्या करताना माझी अशी काही तंद्री लागते की विचारू नका. पातळ तरी ही फुगलेल्या, बदामी रंगावर भाजलेल्या आणि वर काही ठिकाणी चॉकलेटी डाग पडलेल्या, मऊ, लुसलुशीत, आणि खुसखुशीत घडीच्या पोळ्या ही माझी सिग्नेचर डिश आहे असं सगळे जण म्हणतात. हल्ली वयामुळे मला रोज पोळ्या करायला कोणी परवानगी देत नाही तो भाग वेगळा.

पूर्वी हातावरच रोटी, भाकरी केल्या जातं असत पण लाटण्याचा शोध लागला आणि पोळ्या करणं खुप सोपं झालं. जाडी, बारीक, स्टीलची, अल्युमिनियमची अशी अनेक प्रकारची लाटणी असतात. पण मला मध्यम जाडीच्या लाटण्याची सवय आहे. तसेच अजून ही हातावर रोटी, भाकरी करण्याची कला ही काही ठिकाणी टिकून आहे.

हल्ली अनेक ठिकाणी किचनच्या ओट्यावरच पोळ्या लाटल्या
जातात. पण मला मात्र पोळ्या करायला पोळपाटच लागतो. कधी अगदीच नसेल पोळपाट तर प्लेट उपडी घालून वेळ भागवून नेते मी पण ओट्यावर कधी लाटत नाही पोळ्या. संगमरवरी , ग्रॅनाईट, अल्युमिनियम , असे अनेक पोळपाट बाजारात मिळतात. हल्ली सिलिकॉन शीट वर ही पोळ्या छान लाटता येतात असं ऐकिवात आहे. पण मला पोळपाट लाकडीच आवडतो. लाकडाचं टेक्क्षर पोळी लाटण्यासाठी सर्वात चांगल असतं असं मला वाटत.

आमच्याकडचा पोळपाट फार म्हंजे फारच जंबो साइजचा आहे. प्रथम बघणारा प्रत्येक जण चकित होतो साइज बघून एवढा मोठा. त्यासाठी जास्त रुंद ओटा, मोठ बेसिन आणि ट्रॉली ही उंच अश्या खास सोयी करून घ्याव्या लागल्या आहेत किचन मध्ये ज्या मी आनंदाने केल्या आहेत. कारण हा पोळपाट खुप जुना आहे. तो कोकणातल्या आमच्याच फणसाचा असल्यामुळे त्याच्याशी थोडी भावनिक जवळीक ही निर्माण झाली आहे. घरच्या सुतारानेच तो केला असल्याने त्याच्या खालच्या बाजूला आमच्या आंब्याचा लोगो असलेले स्वस्तिकचे चिन्ह ही त्याने कोरले आहे त्यामुळे तर तो फारच खास आहे माझ्यासाठी. जवळ जवळ पन्नास साठ वर्ष वापरुन ही मूळचा पिवळसर रंग अजून ही टिकून आहे. थोडा ही कुठे काळा पडलेला नाहीये.

रोजच्या पोळ्या भाकरी वगैरे साठी तर पोळपाट वापरला जातोच पण थालिपीठं , वडे थापायचा प्लॅस्टिक कागद ठेवायला, अळुवड्या करताना अळूची पानं सारवायला, नारळाच्या वड्या थापण्यासाठी, दाणे वगैरे अरध बोबडे करण्यासाठी, क्वचित् कधी chopping बोर्ड काढायचा कंटाळा आला तर एक दोन मिरच्या किंवा एखादा टोमॅटो असं बारीक सारीक चिरण्यासाठी , कधी मोठ्या पसरट कढईवर झाकण ठेवण्यासाठी ही त्याचा उपयोग होतो.

पूर्वी पापड घरीच केले जातं आणि त्यासाठी शेजारणी आवर्जून आपापला पोळपाट घेऊन मदतीला ही जात असत. सगळया जनी गोल करून पापड लाटायला बसल्या की अनेक प्रकारच्या पोळपाटांच जणू संमेलनच भरत असे. दिव्यांच्या अवसेच्या कहाणीतल्या दिव्यांसारखी पोळपाट ही आपली सुख दुःख एकमेकांना सांगत असतील का तेंव्हा ? ( स्मित ) . तसेच शुभ कार्यासाठी करायच्या शकुनाच्या करंज्या करण्यासाठी ही अशीच शेजारणींची मदत घेत असत. तेव्हा तर करंज्या शकुनाच्या म्हणून त्या सवाष्णी बरोबर पोळपाटाला ही हळद कुंकू लावलं जात असे.

मागील शतकाच्या मध्यापर्यंत एकंदरच गरीबी, घरात मुलांची संख्या जास्त, मुलींना शिक्षण नाही ह्यामुळे आपल्या वडिलांच्या वयाच्या पुरषाशी दुसरेपणावर लग्न लावले जाई. निसर्ग नियमानुसार त्या मुलीला मुले ही होतं असत. आधीच वयाने जास्त असलेल्या नवऱ्याचा अकाली मृत्यू हे खूपच कॉमन होतं . मागे रहाणाऱ्या बाईसाठी दोन वेळा जेवण मिळणे ही दुरापास्त होत असे. कारण उपजीविकेचे साधन काही नाही आणि लहान मुलं पदरात .... चार सधन घरच्या पोळ्या आणि स्वयंपाकाची कामं करून ती आपल्या फाटक्या संसाराला ठीगळ लावून मोठा मुलगा नोकरीला लागे पर्यंत कसे बसे दिवस रेटत असे. अश्या अभागी स्त्रियांची सगळी भिस्त पोळपाटावरच असे. तोच त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधास्तंभ होत असे.

हेमा वेलणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती छान! खरंय प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय आणि प्रत्येकीचं एक फेवरेट लाटणं असतंच ज्याने तिला पोळ्या लाटण्याची सवय असते. दुसरं दिलं की जमत नाही. काय असेल ते असो.
संगमरवरी पोळपाट घ्यावा असं मला एकेकाळी फार वाटायचं. कारण काही नाही असंच. एकदम गुळगुळीत फिल आवडेल असं वाटलं होतं. पण जड पडेल म्हणून कधी आणला नाही.

तुमच्या पोळपाटाचा फोटो टाका ना हेमाताई.. फणसाचा म्हणजे?

पहिल्या वहिल्या इतक्या छान प्रतिसादाबद्दल धन्यवाद अंजली...

आत्ता मी घरी नाहिये त्यामुळे फोटो दाखवता नाही येणार, घरी गेले की दाखवते.
फणसाच झाड पडलं की त्याच खुप लाकूड मिळतं. , त्याच्या अश्या वस्तू केल्या जातात.

फणसाच झाड पडलं की त्याच खुप लाकूड मिळतं. , त्याच्या अश्या वस्तू केल्या जातात.>>>>> वाह! मस्तच
नक्की दाखवा फोटो.
खरंच कित्येक संसारांना हातभार लागला असेल या पोळपाट लाटण्यामुळे.
तुमच्या या रोजच्या जीवनातल्या म्हटलं तर साध्या पण किती व्हॅल्युएबल गोष्टींबद्दल लिहिता फार छान वाटतं. हा विषय कधी डोक्यातही नसता आला.

छान लेख नेहेमीप्रमाणे. अंजलीला मम.

पोळ्या करायला तुम्हाला आवडतं याबद्दल दंडवत स्वीकारा.

संगमरवरी आईने राजस्थानहुन आणलेला, माहेरी आहे. माझ्याकडे आईने दिलेला अल्युमिनियमचा आहे.

मस्त मस्त मस्त. लेख खूप आवडला.
मलाही पोळ्या करायला फार आवडतात. पण टम्म फुगली पाहीजे. आणि खरपूस सुगंध दरवळतो तो तर फार आवडतो.

माझी आईपण लाकडी पोळपाट वापरत असे. तिच्या समोर बसून गरम गरम पोळी भरपूर तूप लावून तव्यावरून थेट पानात वाढत असे, त्या आठवणी जाग्या झाल्या तुमच्या सुंदर लेखामुळे. आता सगळे काळाच्या पडद्याआड गेले, तो पोळपाटपण.

ममो,
नेहमीप्रमाणे मस्त लेख. तुम्ही म्हणता तसेच आमच्याकडेही ओट्यावर चपाती लाटायला नाही आवडत. आजकाल त्या ओट्यावरच्या सिलिकॉन शीट मिळतात त्यावर पुरी ते पोळी या विविध मापाचे एककेंद्री वर्तुळे असतात. त्यानुसार गोल लाटायच.
माझ्या आईच्या माहेरी त्या पोळ पाटाला एक खोलगट कान पण आहे. त्यात तेल ठेऊन ते चपातीला लावण्यासाठी.
पोळपाटाइतकेच लाटणे महत्त्वाचे. एकत्र कुटुंबात प्रत्येकीचे लाटणे वेगळे.
चांगला पोळपाट म्हणजे त्याला अंगचे पाय असावेत, म्हणजे तो एकसंध लाकडातून बनवलेला असावा. इति आई.
असा नसेल, तर घरात कधी सुतारकाम निघाले की आई त्याला राहिलेल्या लाकडातून "इस पोळपाट को नया पाय लगाके दो" अशी फुकट कामे करून घेत असे.

ऋतुराज आई भारीच Lol

पूर्वी लाकडी पोळपाटच असायचे, आमच्याकडेही तोच होता, आई राजस्थानला फिरायला गेलेली असताना हौसेने संगमरवरी आणला तिने, लहान होता, पण फार जड होता. फुलके टाईप छोट्या पोळ्या कराव्या लागायच्या आणि पोळ्या काम माझ्याकडेच असायचं जास्त करून त्यामुळे मी आपला लाकडी वापरायचे, मोठ्या मोठ्या पोळ्या उरकायच्या, लहान लहान पोळ्या करत खेळत कोण बसणार. वेळ जास्त जायचा.

लाटणे मला जाडसर लागते, ते बारीक, नाजूक पापडासाठीचंही होतं माहेरी, पोळ्या मात्र आईही जाड लाटण्याने करायची. मी पोळ्या ओट्यावर कधीच करत नाही, पोळपाटावरच करते. हल्ली बरेचदा पो भा केंद्रातून आणते पोळ्या.

मस्त लेख.
असे साधे तरीही सुंदर विषय तुम्ही छान खुलवता

छान लिहिलंय ममो, पण छोटा झालाय लेख. Happy
प्रतापगडाच्या पायथ्याशी एक मोठं दुकान आहे, जिथे शेजारी शिवकालीन गावाची प्रतिकृती आहे. त्या दुकानात लाकडी वस्तू फार छान मिळतात. दोनतीन वर्षांपूर्वी माझे आईबाबा तिकडे गेले असताना आईने तिथून पोळपाट घेतला. मी गावाला गेल्यावर पोळ्या करत असताना मला तो फारच आवडला आणि मी ते परत परत बोलूनही दाखवलं. Happy मग पुढच्या वर्षी आईबाबा परत तिकडे गेले असताना ( आमची कुलस्वामिनी तिथून जवळच आहे त्यामुळे तिकडे वारंवार जाणं होतं) माझ्यासाठीपण एक पोळपाट त्यांनी घेतला! मी सध्या तोच वापरते. खूपच मस्त आहे.
गावच्या फणसाच्या लाकडाचा पोळपाट, यावरून सुनीताबाईंच्या 'आहे मनोहर तरी' मधलं आठवलं. त्यांच्याकडेही अशा घरच्या फणसाचा् पोळपाट होता.

छान लेख!
मी पण सेम बोटीत. पोळ्या करायला मला खरंच आवडतात. पण मपली झेप फुलक्यांपुरतीच आहे.
आधी मला कणीक भिजवण्याचा भारी कंटाळा यायचा पण नंतर लक्षात आलं की दुसर्‍यानी भिजवलेली कणीक ती तशी नसते जशी मला हवी. सो ते ही काम मी आनंदानी करतो आजकाल. अर्थात घरी पोळ्या करायला मदतनीस असल्यानी मला वेळ फार कमी येते... असो.

मला पोळ्या करायचा कंटाळा तर येत नाहीच उलट पोळ्या करणं माझ्या साठी जणु मेडीटेशनच आहे. >>>> ही खरी कर्मयोग्याची मानसिकता, जी तुम्हाला सहज साधली आहे. याकरता तुम्हाला शिरसाष्टांग नमनच...

लेख नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर, सहजपणे उतरलाय...

चांगला पोळपाट म्हणजे त्याला अंगचे पाय असावेत, म्हणजे तो एकसंध लाकडातून बनवलेला असावा. इति आई. >>
यावरून लहानपणीची एक श्राव्य आठवण जागी झाली.
साधारणतः पन्नास एक वर्षांपूर्वीची पुण्याच्या थंडीमधली सकाळ. आमचं घर नदीजवळ, गावाबाहेर, वरचा मजला. त्यामुळे आसमंतात नीरव शांतता. सकाळी आमची शाळेची घाई, आणि बाबांची ऑफिसची. तिघांचा डबा सकाळी पावणेसातला तयार पाहिजे. साडेसहा पर्यंत बाबांची, माझी, बहिणीची अंघोळ आटपली की फरफरणारा रॉकेलचा स्टोव्ह बंद व्हायचा. एकदम शांतता पसरायची. आणि फक्त दोन आवाज यायचे.
बाबांचा पूजेचा, हलक्या आवाजात स्तोत्रपठणाचा.
आणि पोळी लाटताना आईच्या हातातल्या बांगड्या किणकिणायच्या! त्याला साथ आईच्या पोळपाटाची. चार पायांचा लाकडी पोळपाट. त्याचा एक पाय तुटलेला! पोळी लाटता लाटता त्या बाजूला भार पडला की विरुद्ध दिशेच्या पाय उचलून आपटला जायचा. खट्ट् खट्ट तालावर पोळ्या लाटल्या जायच्या.
सुमारे पन्नास वर्षं झाली, पण ती‌ सिंफनी अजून मनातून, कानातून जात नाही.

अंजू, सामो, उबो, ऋतुराज, किल्ली, वावे, योकु, शशांक, अबुवा सर्वांना धन्यवाद ...

इस पोळपाट को नया पाय लगाके दो" >> ऋतुराज हाहा, म्हणून अंगचे पाय चांगले... ओळखीच्या एकीच्या पोळपाटाचा असाच पाय निखळला होता तर ती पोळ्या करताना बरोबर तो त्याच्या
जागी नुसता ठेवत असे, पण पोळपाट त्यामुळे व्यवस्थित बसायचा. कोणाचा कधी खुर निघाला तर बसवे पर्यंत ही आयडिया करा.

ऊबो , सामो सहमत ... गरम पोळी आणि तूप भारीच लागत. खरपूस भाजलेल्या पोळीचा वास फारच आवडतो मला ही ...

अंजू, नेहमीप्रमाणे मस्त लिहिलं आहेस.

वावे, गेल्या वर्षी पुसद च्या यात्रेत ही खुप पोळपाट होते विकायला. आणि सगळे चांगले वाटत होते. असो. कोकणात फणसाच्या लाकडाचा पोळपाट असतो घरोघरी. कोकणात आमच्याकडे एक सुताराची खोपच आहे. झाडं भरपूर आणि वारा वादळात पडतात ही जुनी झाली की . त्याचं लाकूड ठेवलेलं असत त्या खोपिमध्ये. सुतारकाम निघालं की शक्यतो घरचंच वापरतो . अगदीच लागलं तर विकत आणायचं.असो. तू म्हटल्यावर मला ही आठवला आहे मधला पोळपाट.

ही खरी कर्मयोग्याची मानसिकता, जी तुम्हाला सहज साधली आहे. याकरता तुम्हाला शिरसाष्टांग नमनच... धन्यवाद.. मला अशी रिपी टेटिव ॲक्शन असलेली काम आवडतात.

योकू, पुढची पिढी असून पोळ्या करायला आवडतात म्हणून खुप छान वाटलं. कणीक ज्याची त्यांनी भिजवावी हे ही पटलच.

अबुवा फारच छान लिहिली आहेस आठवण. ह्या वरून माझ्या कोकणातल्या जाऊबाई आठवल्या. त्यांच्या हातात ही भरपूर काचेच्या, सोन्याच्या बांगड्या पटल्या कायम असत. त्या पोळ्या करायला बसल्या की अश्याच बांगड्या वाजत त्यांच्या. त्यांच्या पोळ्या एकदमच मस्त होत असत. तो एक बेंच मार्कच आहे आमच्याकडे. दुसरं म्हणजे हात पुसायची फडकी ही त्या स्वतः धुत असत. आणि चुबकून चुबुकुन, घासून अगदी लख्ख धुवत असत . त्या फडकी धुवत असताना ही बांगड्या अश्याच मस्त वाजत असत. मी जेव्हा अशी घासून फडकी धुते तेव्हा त्यांची आठवण येते आणि ती किणकिण अजून ही वाजते माझ्या कानात.

सुंदर आलेख, किचनमधली स्थित्यंतरं टिपणारा !

तुमच्याकडे फणसाच्या तर आमच्याकडे आंब्याच्या लाकडाचा एकसंध तीन पायाचा पोळपाट होता गावी. शेतातले एक प्रचंड मोठे आंब्याचे झाड वीज पडून वठले होते तर त्याचे काही लाकूड घरात नवीन माळवद, एक पुस्तकांचे कपाट, खुर्ची टेबल आणि हा ‘पोलपाट’ करायला कामी आले. अनेक वर्ष तो कमी वापरात असे कारण हातावर ज्वारी- बाजरीच्या भाकरी थापल्या जात. नंतर गहू आला, मग भरपूर वापर !

गावी अजून तीन मोठे पोलपाट पापड आणि पुरी- पापड्या लाटण्यासाठी होते, ते शेजारी-पाजारी सुद्धा जात. एरवी फक्त लग्न-सणवाराला बाहेर निघत. ते तिन्ही गोल नसून चौकोन होते ! त्यांची लाटणी पण वेगळी होती.

वरचा गोल पोलपाट ४० वर्ष अविरत सेवा देऊन थकला तेव्हां दुसरा संगमरवरी आला, तो २० वर्ष आहे, ४-५ दा घरं बदलली तरी शिफ्टिंगमधे एखादाच टवका उडालाय Happy एक कोरा ग्रेनाइटचा रिझर्व खेळाडू म्हणून आणला होता त्याला अजून काहीच फ़ील्डवर्क नाही मिळालेले.

तुमच्या लेखानी भूतकालात फिरवून आणले, अनेक आभार !

अनिंद्य, धन्यवाद... खूप छान आठवणी लिहिल्या आहेत. चौकोनी पोळपाट प्रथमच एकते आहे. आणि लाटणी वेगळी हे पण इमॅजिन करता येत नाहीये. असो.
एक कोरा ग्रेनाइटचा रिझर्व खेळाडू म्हणून आणला होता त्याला अजून काहीच फ़ील्डवर्क नाही मिळालेले. >> हा हा

मस्त लेख! पण तुम्ही इतके छान लिहिता त्यामुळे अजून अजून वाचावेसे वाटते, हे लगेच वाचून संपले असे वाटले.. पोळ्या करायला मला आवडते पण मिनिटाला एक पोळी अशी घाई असली की तल्लीन बिल्लीन होता येत नाही, हल्ली बरेचदा हेच होते. आमच्या घरी पण भाला मोठा एक पोळपाट होता त्याला वरून बघितले की कासव आहे असे दिसायचे त्याचे पाय तसेच होते व त्याला एक मान पण होती.. कालांतराने त्यातले एकेक तुटत गेले , मग त्याची डागडुजी केली व बहुतेक आई ने तो कोणालातरी दिला आहे. मला पातळ लाटणे आवडते, लाटणे बदलले कि अड्जस्ट व्हायला वेळ जातोच, त्यामुळे मी भारतातून माझे लाटणे घेऊन आले आहे. पोळपाट मात्र इथे आणलेला नाही. १st time इथे आले तेव्हा खूप वजन झालेले त्यामुळे नव्हता आणला तेव्हापासून उंच choping बोर्ड च्या चौकोनी ठोकळ्या वरच लाटायची सवय झाली आहे.. आजी व आईचे मिळून आईकडे संगमरवरी अल्युमिनियम व लाकडी असे बरेच पोळपाट होते, त्यातले काढले आता बरेचसे.

पापड लाटायला जायची आठवण मस्त.. मीही असे एके ठिकाणी एकदा लाटणे घेऊन गेले होते.. मज्जा आलेली. माझ्या एका frd च्या पोळ्यांना कायम रेषा रेषा दिसायच्या व मला फार आश्चर्य वाटायचे की हे कसे होत असेल? नंतर कळले कि त्यांच्या लाटण्याला अशा रेषा होत्या व त्या वापरून वापरून बुजल्या नव्हत्या!!

खूपच हृद्य लेख.
मलाही घरचा काळा- ब्राऊन , वापरुन गुळागुळीत -मऊ झालेला पोळपाटच लागतो. आणि तेच लाटणे. पोळ्या झाल्या की हातासरशी धुवून सिंक च्या नळामागे उभे लावून ठेवायचे. कुठल्याही ड्रॉवर मधे नाही बसत ही जोडी! लाटण्याचा उपयोग तर - नुसते पोळी लाटणे आहेच पण आणखीही बहुविध कारणांसाठी - जसे की वेलदोडे कुटायला, लसूण ठेचायला, सगळ्यात वरच्या कप्प्यातील डबा पुढे-पुढे सरकवत आणायला, कुणाची मान अवघडली असल्यास तिच्यावरुन फिरवायला..... Happy

आमच्याकडेही कोकणातल्या फणसाच्या झाडाचाच पोळपाट आहे. पिवळट. तो पूर्वी एकदा पडला आणि मध्यभागी चीर जाऊन उभे दोन तुकडे झाले. ते आजीने फेविकॉलने जोडले. त्यालाही आता २५-३० वर्षे झाली असतील. अजुनही त्यावरच पोळ्या करते आई.

पोळ्या करतानाची माझी आठवण म्हणजे सकाळी आई पोळ्या लाटायची आणि आजी ओट्यावर अर्धी मांडी घालून एकपाय अधांतरी सोडून किंवा तो अधांतरी पाय टेकवायला खाली स्टूल घेऊन बसत असे आणि पोळ्या भाजत असे. आणि आम्हाला हाका मारुन मारुन अरे आता शेवटची पोळी राहिल्येय या लवकर खायला सांगत असे. गरम पोळी म्हणजे तव्यावरुन डायरेक्ट ताटलीत पडलेलीच. इतर कुठे टेकली की ती गरम गरम नाहीच अशी तिनेच आमची ठाम समजुन करुन दिलेली. ती खायची म्हणजे तूप आणि किंचित भुरभुरवलेलं मीठ. चार घासात संपलीच, मग आजीला सांगितलं की आता आणखी अर्धीच दे, की ' अर्धी कसली खातो आहेस, खा अजुन एक' करुन आणखी एक पोळी पानात पडायची. अन्न फेकायचं नाही, पण तव्यावरची गरम पोळी मात्र चक्क उडून पानात यायची Lol आणि अर्धीच दे चा धोशा लावला की आजी अर्धी करुन द्यायची. पण आजीची अर्धी म्हणजे उगाच एक तुकडा काढलेली अर्धी मिळायची. अगं ही काय अर्धी झाली का म्हटलं की म्हणायची... 'मग! सांगत होते चालेल एक तुला तर!'
आम्ही पोळ्या होईपर्यंत उठलो नाही की चार पोळ्यांची कणिक उरवुन ठेवायला सांगायची आईला. आम्ही उठल्यावर मग आजी गरम गरम करुन द्यायची.

मला अगदी लहान असताना पोळ्या करायला फार आवडत असे. पण मी उठायच्या आधी आई आणि आजी पोळ्या उरकुन टाकत... कोण तो रामरगाडा आवरत बसेल! मग मी शेजारी चुलत आजोबा रहायचे त्यांच्याकडे जात असे. त्या आजीच्या पोळ्या उशीरा होत. आणि मला मोकळं रान मिळत असे. हा किस्सा कित्येक वेळा उगाळलेला असा आहे घरी. Happy

आता पोळ्या करायला आवडत वगैरे नाहीत पण करतो. पोळ्या केल्या की सगळ्यांनी गरमच खाल्ल्या पाहिजेत ही सक्ती मात्र करतोच. Happy

>>>>>>>मग! सांगत होते चालेल एक तुला तर!'
Lol
गूळ-तूप किंवा साखर-तूप पोळी मी अजुनही खाते. मुलीच्या मैत्रिणींना साखर तूप पोळी फार आवडे. मला इfunction at() { [native code] }अकं मस्त वाटे त्यांना करुन खाऊ घालायला. Happy शेवटी किराच्या आई व आजीने रोलिंग पिन आणून टॉर्टिआज केले. Happy पण त्याला बटर लावले का अन्य काही माहीत नाही. पण विस्कॉन्सिनमध्ये रिफाइन्ड बटर मिळत होते.

अतिशय सुरेख, निरागस लेख! अबुवा, अनिंद्य, उत्कृष्ट अभिप्राय!

वरवर निर्जीव वाटणाऱ्या वस्तूंमध्ये मोठे काव्य दडलेले असू शकते

जितका मोठा पोळपाट तितकीच लाटायची मजा मोठी... स्पेशली पुरणपोळी. आजीच्या मोठ्या पोळपाटावर तिला पुरणपोळ्या करताना बघणं फार सॅटीस्फाईंग होतं. अल्ल्द हाताने पूर्ण पंजाचा जोर न लावता फक्त अंगठा आणि त्याशेजारचं बोट याच्या बेचक्यात लाटणं धरून असा सरसर पोळीवर हात फिरायचा तिचा. कधी पोळपाटाच्या बाहेर पण उतू जायची पोळी मग अलगद खालून उचलून तितक्याच मोठ्या तव्यावर दोन्ही हाताने बाळाला झोळीत जोजवावं तशी ठेवत असे.

Anjali cool , छान आहे प्रतिसाद आणि आठवणी ही...

SharmilaR, नक्की लिहा तुमच्या ही आठवणी.

केश्र्वे, होय, प्रतिसाद ही सगळे मस्तच येतायत.

छल्ला, लाटण्याचे उपयोग भारीच सगळे , आमच्या किचन मधला पंखा स्टार्टर मारल्याशिवाय कधी कधी चालू होत नाही. ट्रेन मधल्या पंख्याला जसं पेन, कंगवा असं कश्याने तरी पुश करावं लागे तसं करावं लागत. पण तो वर उंच असल्याने तिथे ही लाटणं उपयोगी पडत. Rofl

सरळ साधा Rofl

सामो, छान वाटलं पोळीचा महिमा वाचून. गूळ तूप पोळी मला ही आवडते. गूळ पोळीचा जो गूळ करतो तो तर अप्रतिम लागतो साध्या पोळी बरोबर.

अमीतव, छान लिहिलं आहे. तीस पस्तीस वर्ष म्हंजे अगदी फेविकॉल का पक्का जोडच म्हणा ना ...
आजीची आठवण खुप छान... तुमच्या लिखाणात अजीचा संदर्भ बरेच वेळा येतो... अश्या आजीच्या आठवणी असणं म्हंजे नशीबवान आहात.

बेफिकीरजी, मन:पूर्वक धन्यवाद... प्रतिसाद आवडला.

अंजली, पुरणपोळ्या लाटण्याचे किती परफेक्ट लिहिलं आहेस. फारच आवडलं.

पुनः एकदा सर्वांना धन्यवाद.

वर्षानुवर्षे केल्या तरी ‘पोळ्या करण्यात एक्स्पर्ट’ हा किताब मी स्वत:ला कधीच देऊ शकले नाही (माझं रेटिंग ७/१0). म्हणजे बऱ्या म्हणता येतील इतपत पोळ्या मी सवयीने करते.. पण तेवढंच. माझ्या पोळ्या कधीच फुगून वगैरे बसत नाहीत, पण त्या आपल्या (नं फुगताच) आनंदी असतात. आणि त्या तितपत आनंदी करायला मला ‘माझं लाटणं (मुख्य नायक), माझं पोळपाट (सहनायक)’ लागतं. एकदा ते मिळालं, (म्हणजे असतंच तसं ते रोज), आणि इतर काही कामांची गर्दी नसली, (असं मात्र कधी कधीच असतं) की माझी पोळ्या लाटण्याची मस्त तंद्री लागते (तश्या पोळ्या अधून मधून फुगल्यासारखं करतात म्हणा! त्या करता तर मी ७/10 दिले स्वत:ला!). अशी छान तंद्री लागण्याच्या दोनच जागा, एक बाथरूम आणि दुसरी ही पोळ्या लाटण्याची.

एरवी कधी दुसरीकडे जाऊन पोळ्या लाटायची वेळच येत नाही. त्यामुळे ‘वेगळं पोळपाट, वेगळं लाटणं’ हे कधी टेस्ट केल्या गेलंच नव्हतं. पण म्हणूनच ‘माझं पोळपाट माझं लाटणं’ किती महत्वाचं आहे ते नव्हतं माझ्या लक्षात आलं. तर इतक्यांतच तीही वेळ (नुसतीच वेळ कसली.. छानपैकी काही दिवस.. काही महीने) येऊन गेली.

त्याचं झालं असं की, नुकतेच काही महिन्यांकरता आम्ही मुलाकडे (अमेरिकेला) गेलो होतो. त्याच्या घरात बाकी सगळा व्हेज/नॉनव्हेज स्वयंपाक (बहुदा रोजच) होत असला, तरी पोळ्या मात्र घरी कधीच होत नाहीत. रोज भातच! अगदीच कधी हव्या असल्याच पोळ्या, तर त्या विकतच्या! एकटा होता तेव्हाही तो कधी पोळ्या घरी करत नव्हता, आणी आता लग्न होऊन दुकटा झाला तरीही घरी पोळ्या करणं नाहीच.

‘पोळ्या लाटत बसल्यामुळे (किंवा उभे राहिल्यामुळे म्हणा ) बायकांची प्रगती खुंटते’ हे त्याचं मत. त्यामुळे कुणीही (त्याच्या)घरी पोळ्या बनवायला त्याचा सक्त विरोध! 'ना लाटुंगा... ना लाटने दूंगा..!' आता ‘आमची प्रगती नाही खुंटली ते.. एवढं आयुष्य गेलं आमचं नोकरी.. घरकाम.., पोळ्या लाटणं.. वगैरे वगैरे..’ असले डायलॉग काही मी टाकले नाही (त्याला कारण माझं अप्रगत असणं असावं बहुदा!). पण त्याच्या ठार विरोधाला नं जुमानता ‘मी आता इथे असतांना मात्र, पोळ्या मी(च) घरी(च) करणार(च)’ असं ‘च’ च्या भाषेत ठामपणे डिक्लेर(च) करून टाकलं.

एकतर तिथे अगदी रोज भरपूर वाचन.., ‘मॉर्निंग.. ईवनिंग.. वॉक’ करून सुद्धा हाताशी भरपूर वेळ उरायचा. शिवाय तेवढीच स्वत: करून त्यांना खायला घालायची माझी हौस भागवायची संधी! (शिवाय तिथला वेळ सत्कारणी लावणं, स्वत:चं उपयोगिता मूल्य.. वगैरे वगैरे साइड बेनिफिट!)
तर तिथे पोळ्या घरी करायच्या (ओके! आठवड्यातले जास्तीत जास्त चार दिवस फक्त.. इति मुलगा) म्हटल्यावर कणिक (विकत) आणण्यापासून तर पोळपाट लाटणं (घरातच) शोधण्यापर्यंतची तयारी करायची होती. कणिक पटकन आणून झाली, बाकी साधनं शोधायला जरा वेळच लागला. शेवटी बराच वेळ शोधाशोध करून सापडलं एकदाचं सगळं, एका नं उघडलेल्या बॉक्स मधे! पोळपाट (बरं....च उंच होतं) आणि लाटणं बघून तर मला हसायलाच आलं. ‘हे लाटणं नाही काही.. तिचा (सुनेचा) दांडिया आहे.’ मी सांगून टाकलं. (सून गुजराती आहे). पण तिच्या म्हणण्या प्रमाणे ते लाटणंच होतं. तिच्या दांडिया स्टिकस तिच्या गाडीत सुरक्षित होत्या. पूर्वी कधीतरी तिच्या लग्ना आधी तिची आई तिच्याकडे येऊन फुलके... ठेपले.. बनवून गेली होती. त्यामुळे किमान एवढं तरी घरात होतं.

आता (मुलं घरात नसतांना) पोळ्या करण्याची माझी झटापट सुरू झाली. सगळच नवीन! तिथला ओटा इथल्यापेक्षा खूपच उंच. त्यावर ते उंच पोळपाट! त्यात ते बा..री..क (दांडिया)लाटणं.. आणि ह्या सगळ्यात भर घालायला ते कधीच नं वापरलेलं (नं बघितलेला सुद्धा) इंडक्शन! पाच सात मिनिटे ठेवून सुद्धा तवा गरम का झाला नाही ह्याचा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं ‘आग रामेश्वरी..!..’ त्या चार बटनांच्या गोंधळात दुसराच कुठलातरी बर्नर चालू केला होता. (ह्या अनुभवा नंतर रोज इंडक्शन समोर उभं राहून ते चालू करण्यापूर्वी ‘दोन्ही बाजूची टोकाची बटणं पुढची.. आतली बटणं मागची..’ अशी कवायत करायला लागले.)

तर अशा झटापटीत पोळ्या तर केल्या, पण त्या काही मनासारख्या झाल्या नव्हत्या. म्हणजे अगदी मऊसूत वैगेरे एक्स्पेक्ट नव्हत्याच पण काही किमान (रेटिंग 7/10) अपेक्षा होती.(माझ्याकडून कुणाची कसलीच अपेक्षा नव्हती. माझीच माझ्या पोळ्यांकडून होती.) मग रोज ‘बघू.. आज कशा होतायत ..’ असं म्हणत अगदी जिद्दीने आणि नव्या उत्साहाने मी कणिक भिजवायला घ्यायचे. त्यात ज..र्रा गरम पाण्याने ती कणिक भिजवली, तर पोळ्या थो.. ड्या मऊ पणा कडे झुकतात हा शोध मला लागला. एकदा कणकेचा ब्रॅंड बदलून झाला. इंडक्शनचे सगळे बर्नर वेगवेगळ्या टेंमपरेचर वर ठेवून झाले...
मी माझ्या पोळ्यांवर फार खुष नसले तरी मुलं मात्र रोजच्या ताज्या (पोळ्यांच्या) आनदांत होती. मी कितीही आग्रह केला तरी मुलगा तव्यावरची पोळी कधीच खात नाही. ‘कुणीतरी लाटतय आणि तो खातोय..’ ही कल्पनाच त्याला आवडत नाही. जेवायला सगळ्यांनी बरोबरच बसायला पाहिजे हा त्याचा लहानपणापासूनचा आग्रह! पण सून मात्र माझ्या मेहनतीची आनंदाने दखल घ्यायची. तिला आवडते गरमागरम पोळी! मग ती ऑफिस मधून यायच्या वेळीच मी पोळ्या लाटायला घ्यायचे. एरवी ‘हम मीठा नही खाते आई..’ असं म्हणून घरात काहीही गोड करायला विरोध करणारी ती मात्र, गरमागरम पोळी, वर तूपगूळ घेऊन छान गट्टम करायची. आणि वर ‘बहोत मस्त बनी है आई!’ ही कॉम्प्लिमेंट! ‘मस्त’ हा तिचा खास आवडता शब्द जो कुठेही लावते ती!. मला अगदी धन्य धन्य व्हायचं.

बऱ्याच दिवसांनी नाशिकला घरी परत आल्यावर माझंच पोळपाट लाटणं मात्र मला वेगळं वेगळं वाटायला लागलं. आपलं लाटणं एवढं रुसून फुगल्या सारखं जाड कसं झालं तेच कळेना. आल्यावर सुरवातीला चार पाच दिवस तर इथेही झटापट करावी लागली सगळ्याशी. पण जरा रुटीन बसल्यावर मात्र माझ्याच पोळ्या मला आश्चर्यकारक रित्या मऊसूत वाटायला लागल्या. (पोळ्यांच रेटिंग 8/10!) मधे बरेच दिवस ‘नॉट सो मऊ’ पोळ्या खाल्याचा तो परिणाम असावा!

बापरे! खूपच मोठी झाली की (पोळी) प्रतिक्रिया!

SharmilaR धन्यवाद ...
गालातल्या गालात हसू आणणार, बरेच वेळा अगदी अगदी चा प्रत्यय देणारं अस मस्तच लिहिलं आहे. मजा आली वाचताना.

शर्मिला : प्रचंड आवडली तुमची पोस्ट. आणि तुमच्या मुलाचा 'ना लाटूंगा ना लाटने दूंगा' बाणा पण. तयार गरम गरम अन्न ताटात येत असताना इतरांसाठी कॉशसली थांबणे हे खरेच कौतुकास्पद आहे.

Pages