पोळपाट

Submitted by मनीमोहोर on 29 July, 2024 - 14:49

पोळपाट

प्रत्येक लहान मुलाला पोळ्या करण्याची आवड असते. घरात पोळ्या करायला सुरवात झाली की ते ही लुटुलुटू चालत आपला भातुकलीतला पोळपाट घेऊन " मी पन कलनार पोया " म्हणत कणीक मागून घेत. मोठी माणसं त्याचं पोळ्या करणं बघून भलतीच खुश होतात, कणीक हाताला , जमिनीला, पोळपाटाला लागलेल्या आणि कोरड्या पिठीने सगळ अंग माखलेल्या त्या लहानग्याचे कौतुकाने फोटो , व्हिडिओ काढून ते क्षण कॅमेऱ्यात कायमसाठी बंदिस्त करून ही ठेवतात. परंतु जसं जसं वय वाढत जातं तसं तसं मात्र ही आवड अक्षरशः नफरत पर्यंत बदलते.

पोळ्या करायचा जनरली सगळ्यांनाच कंटाळा येतो. मी मात्र ह्य विधानाला अपवाद आहे. मला पोळ्या करायचा कंटाळा तर येत नाहीच उलट पोळ्या करणं माझ्या साठी जणु मेडीटेशनच आहे. पोळ्या करताना माझी अशी काही तंद्री लागते की विचारू नका. पातळ तरी ही फुगलेल्या, बदामी रंगावर भाजलेल्या आणि वर काही ठिकाणी चॉकलेटी डाग पडलेल्या, मऊ, लुसलुशीत, आणि खुसखुशीत घडीच्या पोळ्या ही माझी सिग्नेचर डिश आहे असं सगळे जण म्हणतात. हल्ली वयामुळे मला रोज पोळ्या करायला कोणी परवानगी देत नाही तो भाग वेगळा.

पूर्वी हातावरच रोटी, भाकरी केल्या जातं असत पण लाटण्याचा शोध लागला आणि पोळ्या करणं खुप सोपं झालं. जाडी, बारीक, स्टीलची, अल्युमिनियमची अशी अनेक प्रकारची लाटणी असतात. पण मला मध्यम जाडीच्या लाटण्याची सवय आहे. तसेच अजून ही हातावर रोटी, भाकरी करण्याची कला ही काही ठिकाणी टिकून आहे.

हल्ली अनेक ठिकाणी किचनच्या ओट्यावरच पोळ्या लाटल्या
जातात. पण मला मात्र पोळ्या करायला पोळपाटच लागतो. कधी अगदीच नसेल पोळपाट तर प्लेट उपडी घालून वेळ भागवून नेते मी पण ओट्यावर कधी लाटत नाही पोळ्या. संगमरवरी , ग्रॅनाईट, अल्युमिनियम , असे अनेक पोळपाट बाजारात मिळतात. हल्ली सिलिकॉन शीट वर ही पोळ्या छान लाटता येतात असं ऐकिवात आहे. पण मला पोळपाट लाकडीच आवडतो. लाकडाचं टेक्क्षर पोळी लाटण्यासाठी सर्वात चांगल असतं असं मला वाटत.

आमच्याकडचा पोळपाट फार म्हंजे फारच जंबो साइजचा आहे. प्रथम बघणारा प्रत्येक जण चकित होतो साइज बघून एवढा मोठा. त्यासाठी जास्त रुंद ओटा, मोठ बेसिन आणि ट्रॉली ही उंच अश्या खास सोयी करून घ्याव्या लागल्या आहेत किचन मध्ये ज्या मी आनंदाने केल्या आहेत. कारण हा पोळपाट खुप जुना आहे. तो कोकणातल्या आमच्याच फणसाचा असल्यामुळे त्याच्याशी थोडी भावनिक जवळीक ही निर्माण झाली आहे. घरच्या सुतारानेच तो केला असल्याने त्याच्या खालच्या बाजूला आमच्या आंब्याचा लोगो असलेले स्वस्तिकचे चिन्ह ही त्याने कोरले आहे त्यामुळे तर तो फारच खास आहे माझ्यासाठी. जवळ जवळ पन्नास साठ वर्ष वापरुन ही मूळचा पिवळसर रंग अजून ही टिकून आहे. थोडा ही कुठे काळा पडलेला नाहीये.

रोजच्या पोळ्या भाकरी वगैरे साठी तर पोळपाट वापरला जातोच पण थालिपीठं , वडे थापायचा प्लॅस्टिक कागद ठेवायला, अळुवड्या करताना अळूची पानं सारवायला, नारळाच्या वड्या थापण्यासाठी, दाणे वगैरे अरध बोबडे करण्यासाठी, क्वचित् कधी chopping बोर्ड काढायचा कंटाळा आला तर एक दोन मिरच्या किंवा एखादा टोमॅटो असं बारीक सारीक चिरण्यासाठी , कधी मोठ्या पसरट कढईवर झाकण ठेवण्यासाठी ही त्याचा उपयोग होतो.

पूर्वी पापड घरीच केले जातं आणि त्यासाठी शेजारणी आवर्जून आपापला पोळपाट घेऊन मदतीला ही जात असत. सगळया जनी गोल करून पापड लाटायला बसल्या की अनेक प्रकारच्या पोळपाटांच जणू संमेलनच भरत असे. दिव्यांच्या अवसेच्या कहाणीतल्या दिव्यांसारखी पोळपाट ही आपली सुख दुःख एकमेकांना सांगत असतील का तेंव्हा ? ( स्मित ) . तसेच शुभ कार्यासाठी करायच्या शकुनाच्या करंज्या करण्यासाठी ही अशीच शेजारणींची मदत घेत असत. तेव्हा तर करंज्या शकुनाच्या म्हणून त्या सवाष्णी बरोबर पोळपाटाला ही हळद कुंकू लावलं जात असे.

मागील शतकाच्या मध्यापर्यंत एकंदरच गरीबी, घरात मुलांची संख्या जास्त, मुलींना शिक्षण नाही ह्यामुळे आपल्या वडिलांच्या वयाच्या पुरषाशी दुसरेपणावर लग्न लावले जाई. निसर्ग नियमानुसार त्या मुलीला मुले ही होतं असत. आधीच वयाने जास्त असलेल्या नवऱ्याचा अकाली मृत्यू हे खूपच कॉमन होतं . मागे रहाणाऱ्या बाईसाठी दोन वेळा जेवण मिळणे ही दुरापास्त होत असे. कारण उपजीविकेचे साधन काही नाही आणि लहान मुलं पदरात .... चार सधन घरच्या पोळ्या आणि स्वयंपाकाची कामं करून ती आपल्या फाटक्या संसाराला ठीगळ लावून मोठा मुलगा नोकरीला लागे पर्यंत कसे बसे दिवस रेटत असे. अश्या अभागी स्त्रियांची सगळी भिस्त पोळपाटावरच असे. तोच त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधास्तंभ होत असे.

हेमा वेलणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छान आहे.

शर्मिला : प्रचंड आवडली तुमची पोस्ट. आणि तुमच्या मुलाचा 'ना लाटूंगा ना लाटने दूंगा' बाणा पण. तयार गरम गरम अन्न ताटात येत असताना इतरांसाठी कॉशसली थांबणे हे खरेच कौतुकास्पद आहे...... +१.

शर्मिला फार मस्त पोस्ट. मुलाबद्दलही आदर वाटला.

गुजराती घरातले दांडिया टाइप लाटणे अगदीच माहितेय. आई गुजराथमध्ये वाढलेली असल्याने एक तसं लाटणे असायचेच आमच्याकडे, दोन होती खरंतर एक प्लेन आणि एक उभ्या रेषा डिझाईनचे पण आम्ही पापड करायचो त्याने.

मस्त
फोटो येणार होता ना?
शर्मि ला पण मस्त लिहीलं आहे.

धन्यवाद ममो, माझेमन, सामो, देवकी, अंजु,आदिती,मी_अनु.

ह्या लिखाणाचे सारे श्रेय ममो ह्यांना. 'पोळपाट ' वाचून माझे 'पोळ्या' अनुभव लिहायची इच्छा झाली.

देवकी अदिती अंजू शर्मिला धन्यवाद.
अदिति, सध्या घरी नाहीये त्यामुळे फोटो दाखवता येत नाहीये, घरी गेले की दाखवते फोटो. .
शर्मिला, धन्यवाद.. अग पण मी खरचं निमित्तमात्र, लिखाणाचं सगळं श्रेय तुझंच.... लिहिलं फारच सुंदर आहेस.

Pages