बनियन- एक कल्पवस्त्र

Submitted by ओबामा on 28 July, 2024 - 03:37

बनियन- एक कल्पवस्त्र
************************
सर्वप्रथम नुकत्याच झालेल्या एक शाही विवाह सोहळ्यात आजुबाजूला इतक्या महागड्या कपड्यात लोक वावरत असताना देखील ज्याने माझ्यासारख्या अंतर्वस्त्राला जागतिक कीर्ती मिळवून दिली आणि ज्याच्यामुळे या लेखाची कल्पना सुचली त्या जस्टिन बाबाला साष्टांग दंडवत!

काय बावचळलात ना, कल्पवस्त्र शब्द वाचून. बर, तुम्ही नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणता ते ऐकले आहे ना. नारळाच्या सगळ्या भागांचा मानवास पूर्णपणे उपयोग होतो, अगदी झाड पडल्यानंतरदेखील. मग मला सांगा, बनियन हे असे वस्त्र आहे ज्याचा उपयोग त्याच्या सर्व अवस्थामध्ये अगदी सगळ्या घरादाराला होतो. जरा वळून पहा आपल्या घरात. कुठे ना कुठेतरी तुम्हांला याचे अस्तित्व दिसेलच दिसेल. गाईड चित्रपटात, देव आनंद जसा म्हणतो ना तसा हा पण बोलायला लागला तर म्हणेल, सब जगह सिर्फ मैं हू, सिर्फ मैं. (कल्प म्हणजे अनेक वर्ष... तसेच वर्षोनवर्ष उपयोगी पडणारे वस्त्र) म्हणूनच मी त्याला कल्पवस्त्र म्हटले.

तसा हा बनियन म्हणजे तमाम पुरुष जातीचा अंगरक्षक. अगदी जन्माला आल्यापासुन ते मरेपर्यंत हा काही आपली साथ सोडत नाही... जणू आमची कवच कुंडलेच. प्रत्येकाची आपापली कवच कुंडले वेगळी....काही पांढरी, काही रंगीत तर काही मूळ रंग ओळखण्याच्या पलिकडची.... सगळ्या प्रसंगात हा पुरूषजातीचे नेटाने लज्जारक्षण करतो. लोकलच्या प्रवासातून विचविचल्यानंतर घरी निवांत पंख्याखाली उघडे बसायला आणि नेमकी सुंदर शेजारीण काहीतरी मागायला म्हणून घरात यायला एकच गाठ पडते.... तेव्हा हा चटकन तुमच्या लज्जारक्षणार्थ धावून येतो. बनियन घातल्यानंतर त्यातून तुमची पिळदार शरीरयष्टी उठून दिसत असेल तर मग, शेजारणीची कौतुकाची नजर आणि बायकोची चिडलेली नजर सांभाळताना इतकी त्रेधातिरपीट उडते की विचारू नका.....पण यात त्या बिचार्‍या बनियनचा काय दोष ?

तस बघायला गेल तर याची अगदीच किंमत नाममात्र पण एकदम बहुपयोगी. तसेच याचे नखरे म्हणून नाहीत, अंगात चढवला की संपल. बटन लावा, चेन लावा असली काही नाटके नाहीत. नवा कोरा बनियन घालणे हे खर तर एक अप्रुपच...त्याचा वास नाकात भरून घ्यायचा आणि अंगावर चढवल्यावर आरशात डोकवायचे. दोन अंगठ्यांनी त्याचे बंद नीट खांद्यावर बसल्याची खात्री करायची आणि मग हलकेच उजव्या किंवा डाव्या बाजूने कंबरेतून वळून आरश्यासमोर बॉडी बिल्डींगवाले करतात तशा पोझ देऊन आपल्या व्यक्तिमत्वावर आपणनच भाळून आपोआप तरंगायला सुरूवात होते. पण मग इतक्यावेळ आत ओढून धरलेल्या पोटाचा धीर सुटतो आणि ते हळूच मुळ पदावर येते आणि आपण जमिनीवर. मग आपला हात नकळत त्यावरून फिरतो आणि क्षणभराकरीता याचा घेर उगीचच वाढल्यासारखा वाटतो. त्यात बायको, मोठ्या मापाचा हा नवीन बनियन पण घट्ट होतोय आतातरी ते कमी करा म्हणून पांढर्या शुभ्र बनियनमुळे आपल्या चेहर्यावर आलेले तेज कमी करण्यास हातभार लावते.
लहानपणी आमच्या घरी सगळ्यांचे बनियन एकदम टिपीकल......काही बिनबाह्यांचे तर काही बाह्यांचे...पण रंग मात्र पांढऱ्या रंगाच्या आसपास कुठेतरी घुटमळणारा. दरवर्षी नवीन बनियन ही चंगळ आमच्या लहानपणी नव्हती. शर्टच्या आत कोण बघतो त्यामुळे एक जोडी बनियन काही वर्षे तरी आरामात जात. त्यावेळी खेळायला, जवळच्या वाण्याच्या दुकानातून सामान आणायला, अंगण साफ करताना, पाणी भरण्यासाठी इ. वेगवेगळ्या कामांमध्ये उपयोगी असा हा हरकाम्या. हा घामाचे, शाईचे, वरणाचे, भाजीच्या रसाचे, लोणच्याचे, चहाचे, हळदीचे असे वेगवेगळे डाग सहज झेलत असे......आणि वर दत्ताजी शिंद्यासारखा बचेंगे तो और लढेंगे हा त्याचा बाणा असायचा. त्यात आमचे बनियन म्हणजे तर आमच्या घरातल्या खाद्य संस्कृतीचे चालते बोलते पुस्तकच.... त्याकडे बघून कोणीही आमच्या घरात काय अन्न शिजवले आहे हे सहजपणे सांगू शकेल. आंब्याच्या दिवसात तर त्या “रसाळ तत्वज्ञानाचे” कित्येक धडे आमच्या बनियनवर सापडत. बनियनवरील हे डाग घालविण्यासाठी मग आई त्यांना निळेतून काढत असे. निळ्या रंगाचे बनियन घातल्यावर काही दिवस निळा कोल्हा म्हणून मित्र चिडवायचे, पण प्रत्येकाला काही ठराविक काळाने निळा कोल्हा व्हावेच लागे.

काही जणांचे बनियन पाहून ते आताच बॅार्डर वर जाऊन निधड्या छातीने शत्रूच्या गोळ्या हसत हसत झेलून आल्यासारखे वाटतात..... किंवा त्याची अवस्था मुंबईच्या रस्त्यांची पावसाळ्यातील जी अवस्था तशीच झालेली असते. तो मनुष्य पण मग मला मुंबई मपा सारखाच उदासीन वाटायला लागतो. माणसाचा खरा स्वभाव किंवा सांपत्तीक स्थिती त्याच्या बनियनवरूनच चटकन कळून येईल... माझे आतापर्यंतचे ठोकताळे- जो एकदम स्वच्छ बनियन घालतो तो नक्कीच स्वतःला फारच जपत असणार तसेच त्याची सांपत्तिक स्थिती उच्च असणार. मग असले बनियन फक्त राजकारणीच घालत असतील. त्यांच्या सांपत्तिक स्थिती बद्दल आपण न बोललच बर. ज्याच्या बनियनचा मूळ रंगदेखील ओळखू न येण्याइतके डाग पडलेला माणूस एकतर चित्रकार/रंगारी किंवा अजागळ असला पाहिजे. भरपूर भोक पडलेला बनियन घालणार्‍या मनुष्याला नक्कीच उपवर कन्या असणार. तिच्या लग्नाच्या चिंतेत अखंड बुडलेल्या माणसाला त्याच्या झिजलेल्या चप्पल किंवा फाटक्या बनियनपेक्षा मुलीच्या लग्नाची जास्त काळजी असते.

याचा उपयोग केवळ लज्जारक्षणा पुरता मर्यादित न राहता तो अगदी हरतर्‍हेच्या कामांसाठी खर्ची पडू लागला. पहिली कुर्‍हाड/कात्री याच्यावरच पडते आणि याचीच पहिली फाडाफाड होते. हा खराब झाला आणि फेकून दिला अस कधीच होत नाही....तो सेवानिवृत्त झाला की पहिल्यांदा त्याची रवानगी होते ती स्वयंपाकघराचा ओटा किंवा दुचाकी/चारचाकी पुसायला किंवा भांडी कोरडी करायला.... मग हळूहळू त्याची रवानगी फरशी पुसायला. जरा त्याचा रंग घरकामाने काळवडंला की मग त्याची अवनती होते ती शेगडी पुसायच्या कामावर....त्याची सर्वात अधोगती होते ती म्हणजे अगदी त्याची चिंधी जरी झाली तरी त्याची वात करुन चिमणीत घालायला ही कोणी मागे पुढे पहात नाही. वसतीघरात असताना तर हा म्हणजे चालता बोलता पंचा....धुतले हात की पूस त्याला, काही तोंडाला खरखट लागल की पूस त्याला, शाई लागली बोटाला की पूस त्याला, फार क़ाय तर कोणाच डोक दुखायला लागल की बांधली याची गाठ डोक्याला, असले नानाविध ठिकाणी याचा वापर...अहो प्रसंगी चहा गाळायला सुद्धा हा आमच्या कामी आलाय...

तस पहायला गेल तर बनियन बदलण्यासाठी किंवा टाकून देण्यासाठीची काही आचारसंहिता असते....शास्त्र असत ते. म्हणजे बघा वेगवेगळ्या मिमी व्यासाची व आत दोन बोटे घालून खाजवण्यासाठी उपयुक्त अशी ७-८ भोके पडली किंवा त्याच्या पट्ट्या खांद्यावरून सतत गळायला लागल्या, बनियनच्या बाह्यांची लांबी सदराच्या बाह्यांच्या बाहेर डोकवायला लागली (लंडन इंग्लंडपेक्षा मोठे) की पुढच्या येणाऱ्या महिन्यातील कोणत्याही चांगल्या सणाला दिवसाला नवीन बनियन मिळायचा. तसा हा अगदी स्वस्तात मिळणारा कपडा.... उपयुक्तता मात्र एकदम अनमोल.

मला अजूनही घरात बनियन घालून बसायला फार आवडते...एकप्रकारची सुरक्षतेची भावना राहते मनात. पण याच माझ्या बनियनची एक बाजू गचांडून घरात आमच्या म्हाळसेने माझ्या कडून किती कामे करुन घेतली ही विचारू नका.....तिच्यासमोर माझी ही कवचकुंडले कुचकामी ठरतात....

तर असा हा बनियन हा केवळ कापडाचा जिन्नस नसून समस्त पुरुष जातीचा तो एक जिव्हाळयाचा विषय...एकवेळ अब्रूवर शिंतोडे उडाले तर चालतील, पण पांढऱ्या बनियन........ नो नेव्हर!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी मिश्किल लिहिलंय. Lol

आम्हाला 9 वी की दहावीत एक धडा होता.
काळे केस नावाचा. लेखकाचे नाव आता आठवेना नेमके.
तशी शैली वाटली.

गेल्या वर्षीपासून चांगले बनियन मिळू लागले आहेत. आता त्रास संपला असल्याने लेखाची मजा घेता आली नाहीतर ..

मध्यंतरी रूपा के अंडरविअर और बनियन ही जाहीरात पाहून घेतले होते काही वर्षे. लक्स, व्हीआयपी आणि अजून काय काय. पण सगळ्यांची दोन तीन धुण्यात चाळण व्हायची. रूपा के .... आपण घातले तर वो क्या पहनेगी हे पटल्याने ते बंद केले.

कल्पवस्त्र !! परफ़ेक्ट एकदम. झकास लिहिले आहे.

… भरपूर भोक पडलेला बनियन …….

हे काही कुटुंबात मिरवतात. त्याने धनकुबेर प्रसन्न होतो का ? असावा.

एका प्रचंड श्रीमंत नातेवाईकांकडे आजोबा, वडील-चुलते आणि सर्व कर्ती मुले असेच भोकं असलेले बनियन मिरवतात. जितकी जास्त भोकं त्या पुरुषाची तितकीच जास्त नेटवर्थ असे त्यांचे गणित आहे Proud

मस्त!

बनियानला बनियान का म्हणतात कोण जाणे, पण त्याला गंजिफ्रॉक म्हणणारे लोकं माझ्यालेखी एकदम कंडम! हे जस्टीनभौ आणि त्यांच्या शिणेची मंडळी, ते रंगिबेरंगी जाळीची बनियानं घालणारे सगळेच कंडम...

बनियानाला महत्त्व येतं ते त्याला भोकं पडल्यावर! मग रोज विचार करावा लागतो, आज कोणता शर्ट घालावा म्हणजे भोकं (सहजासहजी) दिसणार नाहीत?!

आमच्या आजोळी बारदाना मोठा. १९८०च्या दशकात प्रत्येक उन्हाळ्यात लग्न, मुंज काही ना काही समारंभ असायचाच. मग गावोगावहून काका, आत्या, त्यांची मुलंबाळं, बाकी नातेवाईक असे सगळे जमायचे. तो नागपूरचा उन्हाळा. तट्टेगिट्टे लावून, कूलरसमोर पडले रहायची मंडळी! पण सगळ्या पुरूष मंडळींचा ड्रेस एकच - बनियान अन् पायजमा. एखाद-दुसरं कुणी धोतरात असायचं. आणि लहान मुलं अर्ध्या चड्डीत. त्यामुळे तुम्ही गच्चीत बघाल तर पंचवीस-तीस निरनिराळ्या आकाराची बनियानं वाळत घातलेली असायची! नागपूरला जाण्यापूर्वी बाबा सगळ्या बनियनांवर (आणि पायजमे, रुमाल, लंगोट वगैरे पांढऱ्या कपड्यांवर) नावं घालायचे - इनडेलिबल इंकनं. हो, नाही तर, कोणचं बनियान कोणाचे हे ओळखणार कसं एवढ्या कपड्यांत?!

धन्यवाद झकासराव, खंग्री बालक, अनिंद्य, वावे, भ्रमर, Srd, Abuva
@खंग्री बालक - नवीन बनियन आयुष्यभर तर नवीन रहाणार नाहीत ना...जेनव्हां जुने होऊन भोके पडतील तेव्हां लेख परत वाचा आणि मजा घ्या. रूपाचे वापरायचे नसतील तर व्हिआयपीचे वापरा..तुम्हांला पण व्हिआयपी असल्यासारखे वाटेल...

@ अनिंद्य - खरोखर आश्चर्य करण्यासराखे आहे. माझी आई कायम काही फाटलेले घातले की सांंगते...ते घालू नका रे दरिद्र येते घरात.

@ भ्रमर - कल्पवृक्षचा एकवेळ शोध लागेल पण तुमची इच्छा सफल होणे कठीण...तोपर्यंत हे बनियनरूपी कल्पवस्त्र स्वीकारणे जास्त व्यवहार्य

@Srd - पिक्चर रिलीज होऊन पेमेंट मिळाले नसेल शर्ट घ्यायला...किंवा पेमेंट म्हणूनडझन बनियनच मिळाले असतील...हा हाहा

@Abuva - अगदी...आई वेगळ्यावेगळ्या धाग्यांनी शिवण करून ठेवायची ओळख पटावी म्हणून..कित्येकदा आम्हांला जुने झालेले बनियन पाहुण्यांच्या बँगेमध्ये भरून त्यांचे चांगले लपवून ठेवले होते..खी खी...पुढच्या वेळी फोनवर बाबांची फोनवर यावर हमखास यावर तर्कार व्हायची.

माझी आई कायम काही फाटलेले घातले की सांंगते...ते घालू नका रे दरिद्र येते घरात. >>> १००++

बाकी तुमची बनियन कित्ती महागडी असू देत पण काहीच बनियन नशीबवान ठरतात. तनहा तनहामधील उर्मिला ही स्लिपमध्ये नसून बनियनमधली उर्मिला आहे एवढे पुरेसे ठरावे....

On a serious note, बनियन - अंत:वस्त्रे नेहेमी सर्वात्तम तीच घेतो. ती तशीच घ्यावीत. बाकी सर्व कपडे आपण “दुसऱ्यांसाठी” घालतो. फक्त हेच कपडे “स्वत:” साठी घालतो. ते बेस्टच घालावे. (यातून nudist लोकं वगळा, ते कपडेच घालत नाहीत Wink )

लहानपणी वाढत्या मापाचे बनियन ही सुद्धा एक कटकट होती.

>> धनी पुरुष आहेत हे यानिमित्ताने आज कळले. याआधी कधी प्रोफाईल बघितली नव्हती. धनश्रीचा शॉर्ट फॉर्म समजत होते Happy

माझेमन
तनहा तनहा बेस्ट आठवण एकदम

माझी आई कायम काही फाटलेले घातले की सांंगते...ते घालू नका रे दरिद्र येते घरात. >>>>>>
डिट्टो

संध्याकाळी झोपणे, संध्याकाळी केर काढणे - यानेसुद्धा लक्ष्मी रुसते

भारी लिहिले आहे Lol

माझी बनियान इथे.. सुचले, वेळ मिळाला तर लिहेन..

@ सामो सगळ्या आाया सारख्याच. स्वतः विरलेली साडी किंवा ब्लाऊज घालतील....शिळपाक खातील.....मुलांनी मात्र चांगले घालावे, खावे हा प्रेमळ हट्ट मात्र ही कारणे देऊन पूर्ण करून घेतात.

तो एक विनोद होता ना

एका विशिष्ट आडनावाचे कंजूष आजोबा बनियन फाटेपर्यंत घालतात. मग फाटले की त्याच्या वाती बनवून दिव्यात वापरतात. आणि मग त्याची काजळी काजळ म्हणून वापरतात. त्याची आठवण झाली.

बनियन वापरतात. मग त्याच्या उशीच्या खोळी करतात, मग त्याला हात पुसायचे फडके करतात, मग त्याचे पायपुसणे करतात. मग फाटले की त्याच्या वाती बनवून दिव्यात वापरतात. आणि मग त्याची काजळी काजळ म्हणून वापरतात.